रिमझीम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...

Submitted by अतुल ठाकुर on 21 June, 2014 - 11:45

bollywood-rain-romance.jpg

मुंबईला कुणी कितीही नावे ठेवोत पण मुसळधार पावसातली मुंबई देखणी दिसते यावर सर्वांचे एकमत व्हावे आणि त्यातही ही मुंबई जर सत्तरच्या दशकातली असेल तर क्या कहने. पुलंनी सर्व बलाढ्य शहरांमध्ये फक्त मुंबई ही स्त्रीलिंगी आहे हे नमुद केले आहे. या देखण्या मुंबईला आणखी देखणेपणाने सादर केले आहे बासु चटर्जींनी आपल्या “मंजील” चित्रपटात. “रिमझीम गीरे सावन” या गाण्यावर बरेच काही लिहिता येईल. लताने गायिलेले उजवे कि किशोरचे उजवे असा वादही घालता येईल. मात्र मला त्यात पडायचे नाही. या लेखात तरी फक्त लताच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अत्यंत आशयघन असलेल्या या चित्रपटाची कथाही मी सांगणार नाही कारण या गाण्याचा तसा कथेशी संबंध नाही. गाण्याचा सुरेख तुकडा बाजुला काढुन, कथा माहित नसताना देखिल त्याचा आस्वाद घेता येईल इतके हे गाणे अप्रतिम आहे. साधारणपणे याचं चित्रिकरण फोर्ट, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, मुंबई युनिव्हर्सिटीचा भाग, फाउंटन या भागात केलेले दिसते. चित्रपट १९७९ मधला आहे. सत्तरचे जादुई दशक. अमिताभचा उदयकाल. मात्र अजुनही तो वेगळ्या भूमिका करत असतानाचे ते सुदैवी दिवस. त्यात मौशमी चटर्जीसारखी निपूण आणि देखणी अभिनेत्री. हे सारे रसायन एकत्र येऊन सौंदर्याचा जो अविष्कार घडला तो म्हणजे “रिमझीम गीरे सावन”.

मी जेव्हा हे गाणे पाहिले तेव्हा आणि त्यानंतर नेहेमीच हे गाणं ऐकताना मला पावसाच्या गारेगार सरी अंगावर कोसळत असल्याची अनुभूती येते. लताने आवाजात चिंब ओलावा आणुन ही गाणे गायिले आहे अशातर्‍हेने वातावरणाची अनुभुती आवाजात देणारी दुसरी गाणी मला तरी चटकन आठवत नाहीत. पण ही अनुभुती येथेच संपत नाही. गाण्यात नुसता पाऊसच नाही तर एकमेकांच्या हातात हात घालुन प्रेमात अगोदरच चिंब भिजलेले प्रियकर आणि त्याची प्रेयसी देखिल आहेत. त्यांना पावसात भिजताना मनात लागलेल्या प्रणयाच्या आगीची अनुभुती येते आहे. कवी योगेश यांचे समर्पक शब्द या गाण्याला लाभले आहेत. “नेमेची येतो मग पावसाळा” तेव्हा हाच पावसाळा एवढा वेगळा का भासतो आहे हा प्रश्न प्रेयसीला पडला आहे. “पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल, अबके बरस क्युं सजन सुलग सुलग जाये मन…” पडद्यावर गाणे जरी कुणी गात नसले तरी गाण्यातील भावना प्रेयसीच्या आहेत असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. एकुणच हे गाणे मौशमीच्या अमिताभबद्दलच्या मुग्ध भावना मुकपणे व्यक्त करतं.

गाण्याचं चित्रिकरण हा एक अतिशय आकर्षक भाग. बासुदांनी मुंबईचा पावसाळा दाखवुन प्रेक्षकाला अगदी गारेगार करुन सोडलं आहे. मुळात हा कॄत्रिम पाऊस नाही. अस्सलपणाची किमयाच वेगळी. कधी भुरभुरत, तर कधी जोरात पडणारा पाऊस, मरीन ड्राईव्हच्या रस्त्यांवर उसळणार्‍या समुद्राच्या लाटा, मैदानावर जागोजाग साचलेले पाणी, अवतीभवती छत्र्या घेऊन चाललेले मुंबईकर, पाण्यातुन चाललेल्या गाड्या, अशी सुखद दृश्य बासुदांनी घेतली आहेत. पाउस थांबल्यावर ओली झालेली मुंबई, तिथले शांत झालेले जीवन. खरंतर अमिताभ आणि मौशमी इतकेच दुसरे आणखि एक प्रणयाराधन या गाण्यात चालले आहे ते पाऊस आणि मुंबईचे. त्याने प्रणयात तिला चिंब भिजवुन शांत केले आहे. पावसाळ्यात अंधारुन आल्यावर जाणवणारा गोड काळीमा आणि त्यात मुंबैच्या जुन्या भागातला परिसर या सार्‍यांनी आपली जादु या गाण्यात पसरली आहे. बासुदांच्या चित्रिकरणाइतकेच सुंदर संगीत आणि आकर्षक चालीचे श्रेय आरडीला द्यायलाच हवे. डोळे मिटुन हे गाणे ऐकल्यास आपल्यालाही कुठेतरी पावसाळ्यातल्या ओळखिच्या गोड खुणा पटतात आणि मन सुखावुन जाते.

अमिताभच्या उंच देहयष्टीसमोर मौशमी छोटी वाटते पण कदाचित त्यामुळेच हे जोडपे अतिशय सुरेख दिसले आहे. त्याच्या लांब टांगा टाकत चालण्याबरोबर तिला जवळपास धावावे लागते पण तिही प्रियकराच्या वेगाशी जुळवुन घेऊन त्याच्या बरोबरीने त्याच्या सहवासाचे सुख घेत पावसाची मजा लुटते आहे. मौशमीचे हसणे आकर्षक आणि त्या दाताच्या ठेवणीमुळे तर तीचे हसणे अतिशय गोड वाटते. हे हसु या गाण्यात अनेकदा दिसते. मरीनड्राईव्हच्या धक्क्यावर उभे राहुन अमिताभ क्षणभर तिला थांबायला सांगुन सिगरेट काढतो आणि ती भिजलेली पाहुन फेकुन देतो, त्यावेळी मौशमी लाजवाब. असे क्षण या गाण्यात अनेक आहेत. हे हळुवारपणे पाहात, गाणे ऐकत वेचण्यात मजा आहे. शेवटी एक रिकामी बेंच पाहुन ती दोघे त्यावर एकमेकांच्या बाहुंत विसावतात आणि एका सुरेल गाण्याची, दृश्याची सांगता होते ती प्रेक्षकांना चिंब करुनच Happy

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑल टाईम फेव्हरिट गाणं. किशोरकुमारच्या आवाजातील ऐकायला जास्त आवडतं आणि लता मंगेशकरांच्या आवाजातील बघायला जास्त आवडतं. मौशुमी चॅटर्जी किती पिटुकली दिसते अमिताभपुढे, पण खूप गोड दिसतात दोघेही.

लेख मस्त आहे.

या गाण्यामधे चित्रीकरण करताना नायक आणि नायिकेला कोरीओग्राफ्ड स्टेप्स जास्त नाहीत. नुसतं पावसातून चालत जा, धावत जा एकमेकांशी बोला वगैरे सूचना असाव्यात. Happy पण गाण्याच्या चित्रीकरणाचा हा पावसाळी अफलातून ईफेक्ट एडिटींगमध्ये आलेला आहे.

मला फेबु वर आलेल्या कमेंटस मध्ये हा चित्रपट बराच रेंगाळला होता असं म्हटलं आहे. त्यामुळे फारएण्ड यांचे निरिक्षण अचुक वाटते Happy

लताचे ते ला ला ला ला फारच गोड Happy

अश्विनीके सारखंच मलाही हे लताचं बघायला नि किशोरकुमारचं ऐकायला जास्त आवडतं.

बाकी त्यावेळची मुंबई आणि तो पाऊस..... Happy

आगावा, मुकेशचं ’चंदन सा बदन’ लतापेक्षा वरचढ आहे म्हटल्याबद्दल जाहीर णिषेढ!! त्रिवार!
अरे, नुक्ताच गायनाच्या क्लासमधून चीज शिकून आलेला कसं म्हणून दाखवेल तसं म्हटलय रे..
चंदन साबदन... दोष नदेना ज्ग्वालो... हे ऒफ़ बीट एखाद्याच वेळी हरकत म्हणून नाही... सगळ्याच वेळी नियम म्हणूनच. फ़ार फ़ार सरळसोट म्हटलय हे सर्वांगसुंदर गीत.

गाण्यात शब्दं "ठेवणे" ह्याला खूप महत्वं आहे. त्यानं गाणं घडीव रहातं. सम गाठत तालासुरात गात गाण्याची ढासळवलेली अनुपम शिल्पं ऐकवत नाहीत. मुकेशच्या आवाजात एक प्रकारचा निर्व्याज प्रामाणिकपणा आहे. तो मला अत्यंत भावतो. पण ह्या एका गाण्याची पार वासलात लागलीये असं माझं प्रामाणिक मत आहे. हे मत जाहीरपणे नोंदवल्याने कुणाला वाईट वाटत असल्यास, माफ़ी मागते... पण मत बदलणार नाहीये.

हे गाणं मला वारंवार ऐकायला भाग पाडून माझ्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम करीत राहिल्याबद्दल नवर्‍याचा(माझ्या) पण जाहीर निषेध!! अनेकवार... (दूष्टपणा करीत गाडीत लावतो. एकाच गाडीचे दोन भाग दोन दिशांना जाऊ शकत नाहीत ह्याचा फ़ायदा...)

मुकेशच्या आवाजात एक प्रकारचा निर्व्याज प्रामाणिकपणा आहे. >>> ज्जे ब्बात!
लताबाईंचे गाणे गाण्याच्या 'टेक्निकल' बाबीत मुकेशपेक्षा १०० घरे वर आहे यात कोणालाच शंका नसावी पण 'किसी और को शायद कम होगी मुझे तेरी बहुत जरुरत है' मधली प्रामाणिक,तीव्र,सच्ची आर्तता मला त्यांच्या आवाजात नाही ऐकू येत!

अतुल, मस्त वाटलं वाचून! तुमचे आभार कसे आणि किती मानु? Happy

देवा! आयशप्पत, तुला जुन्या मायबोलीत लिहीलेलं अजून आठवतं? Happy ह्या गाण्याबद्दल गिर्‍याने (गिरिश सोनार) लिहीलं होतं.

येस चिन्नु. मला दोन्ही लेख आठवत आहेत. तुझा मस्त होताच पण गिर्‍याचा भन्नाट. आता हे तिसरे व्हर्जन पण मस्त आहे. मी लिंक शोधतो आहे पण कुणाला मिळाली तर नक्की टाका इथे. Happy

ऊत्तम...!

'त्या' काळातला मुंबईचा पाऊस... तेही मरीन ड्राईव्ह च्या किनार्‍यावर... त्यात बच्चन व मौशमी अगदी मुक्तपणे खुललेले, सहज व निर्व्याज.! त्याला लता चा आवाज आणि पंचमचे संगीत...

'चिंब' भिजणे स्वाभाविक आहे.

ही अशी गाणी अजरामर कारण ती 'अनुभूती' देतात..!

मस्त लेख ! मलातर गाण्याप्रमाणेच तुमचा लेख वाचतानाहि पावसाची व पावसाळी वातावरणाची अनुभुती आली ़ परत एकदा पटल कि मुंबईच्या पावसाची सर ईथे अमेरिकेत नाहि Happy

मस्त लेख .. अतिशय सुंदर गाणं .. हा लेख त्या गाण्याला चांगला न्याय देत आहे असं वाटलं ..

आगाऊ ने म्हंटल्याप्रमाणे ही दोन्ही व्हर्जन्स् अगदी वेगळ्या कलाकृती वाटतात .. लताचंही तितक्याच ताकदीचं पण खूप जास्त युथफुल वाटतं ..

पाऊस सुरु झाला कि हे गाणं हमखास आठवतं.
खुप आवडीचे आणि मनातले गाणं.
सर, तुम्ही इतकं छान वर्णन केलय कि गाणं नव्यानं समजल. ऑल टाईम फेवरेट गाणं आणि सादरीकरण दोन्ही.

रिम झिम गिरे सावन

एक न पकडलेली चोरी , खुद्द चोरानेच सांगितली

https://youtu.be/eLxm35IhbfU

मालक आणि चोर दोघेही हुशार.

हे दोन्ही एकदम ऐकल्यावर आता मला वादा रहा सनम होंगे जुदा न हम , हेही त्याच चालीत वाटू लागले आहे

Pages