'कुणी घर देता का घर' - नटसम्राटांचा टाहो.

Submitted by जीएस on 19 June, 2014 - 18:22

आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे. आणि त्यांचा हा नवा नाट्यप्रवेश नेहेमीप्रमाणे जनतेपर्यंत नेण्याचे 'बहुतही क्रांतीकारी' काम अर्थातच केले आहे मिडीयातील एकमेव KCHP (केजरी सर्टिफाईड ऑनेस्ट पर्सन [या सर्टिफिकेशनसाठी देणगीसह भेटा अथवा लिहा.....]) पुण्यप्रसून वाजपेयी यांनी.

त्याचे झाले असे की 'केजरीवालांना आल्या सव्वातीन नि:स्वार्थी शिंका' या एक्सक्ल्यूझिव ब्रेकींग न्यूजवर काम करावे की 'केवळ झाडांना मिळावा कार्बन डायऑक्साईड म्हणून केजरी करतात श्वसन' ही न्यूज स्टोरी चालवावी याबद्दल सल्लामसलत करण्यासाठी आपले बक्राजी (बहुतही क्रांतीकारी पुण्यप्रसून वाजपेयीजी) दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या गेलेल्या फ्लॅटमध्ये राजीनामा देऊन चार महीने झाले तरी ठाण मांडून बसलेल्या केजरीजींकडे गेले होते. 'केजरी (अखेर) सरकारी घर सोडणार' ही बातमी आधीच अठ्ठेचाळीस तास सतत उगाळून झाली होती, आता प्रत्यक्ष सोडतांनाच एखादा चावा घेऊन तो पुढे आठवडाभर चघळावा हाही उद्देश होताच.

पण बघतात तो काय, केजरीसाहेबांचा नेहेमीप्रमाणे यू टर्न !! भाड्याने मिळालेले घर गेले, दुसरे मिळत नाही, केजरीसाहेब काही घर सोडत नाहीत. दुसरा एखादा वार्ताहर असता तर हे बघून केंव्हाच हिरव्या रंगाचा होऊन उडून गेला असता. पण या दोघांनी डोके चालवले.... आत हे दोघे कसे डोके चालवतात याबद्दल बोलणे आले !!!

'सब मिडीया बिकी हुई है, भ्रष्ट है' असे केजरीजी व त्यामागून केजरीपूजक कोरसमध्ये सतत म्हणत असतात. मुलाखती, बातम्या वगैरे कशा मॅनेज केल्या जातात, कुठला विषय जास्त चालवायचा, काय बोलले काय नाही म्हणजे लोकांना आपले खरे म्हणणे कळू न देता त्यांचा पाठिंबा मिळवता येईल असे सगळे साटेलोटे / फिक्सिंग मिडिया व राजकारण्यांचे असते. हे कसे घडते याचे सव्वा मिनिटाचे थेट चित्रणच बघा.

http://www.youtube.com/watch?v=yRGNTXDO7dI

अरेच्चा हे तर बक्राजी आणि केजरीजी दिसत आहेत !! कसे डोके चालवतात ते पाहिले ना ? तर असे डोके चालवले आणि पुन्हा जन्माला आला नटसम्राटांचा ऐतिहासिक नाट्यप्रवेश ' कुणी घर देता का घर ?'

या नाट्याचे वर्णन करण्यास माझे शब्द अपुरे आहेत. ते वाचताच अंध केजरीपूजकांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागतील, काही मठ्ठ दुष्मन आनंदाने नाचू लागतील, सोनियास्तवक कुमार केतकर आजवर आपण लाचारीत बक्राजींपेक्षा कसे कमी पडलो याने लज्जित होतील. तर माझ्यासारख्या अदानी व अंबानी यांचा हस्तक ( अंबानी, अदानी व माझ्या नवात आय आणि एन ही दोन अक्षरे समान असल्याने मी त्यांचाच एजंट असल्याचा पुराव्यासकट खळबळजनक गौप्यस्फोट आपवाल्यांनी करण्यापूर्वी मीच हे नम्रपणे नमूद करतो) असलेल्या माणसांना मात्र काही प्रश्न पडतील. तुम्हीही वाचा...

http://prasunbajpai.itzmyblog.com/2014/06/blog-post_17.html

अरेरे बेघर झाले, हाय ! जनतेच्या कल्याणासाठी रस्त्यावर आले !! कुटुंबाच्या हालअपेष्टा !!! थांबा !!डोळ्यातले पाणी पुसून मला काही नोंदी करू द्या.

१) २८ डिसेंबर २०१३ रोजी केजरीवाल मुख्यमंत्री झाले. तीन चार दिवसातच त्यांना पाच बेडरूमची दोन घरे मिळणार असल्याची बातमी आली. केजरीवाल हे नेहेमी 'मी आम आदमी आहे, साधा रहाणार, व्ही आयपी संस्कृती मला नको' वगैरे म्हणत. त्या पार्श्वभूमीवर दोन मोठी घरे स्वीकरण्याबद्दल टीका होऊ लागली.

२) ४ जानेवारी २०१४ रोजी केजरीवाल यांनी नेहेमीप्रमाणे मिडियात प्रचंड गाजावाजा करून 'मी साधाच माणूस आहे, मला कशाला एवढी मोठी घरे? माझे हितचिंतकही हेच सांगत आहेत, नको, साधेच घर द्या' असे म्हणत सरकारी घरे नाकारल्याची बातमी झळकली. बक्राजींनी या साधेपणाबद्दल क्रांतीकारी चॅनलवर केजारती सुरू केली.

३) पण हाय रे दैवा ! Times Now ने महिन्याभरातच असे उघडकीला आणले की मुख्यमंत्री झाल्यावर ४८ तासाच्या आत ३० डिसेंबरला केजरीवाल यांनी स्वतःच त्या दोन घरांची ताबडतोब मागणी केली होती (पत्र उपलब्ध आहे), आणि घरे मिळाल्याबद्दल टीका झाल्यावर ते स्वतःच मागितले होते ते साळसूदपणे लपवून घरे नाकारल्याचा गाजावाजा केला.

४) मुख्यमंत्र्याने सरकारी बंगल्यात रहाण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. आक्षेपार्ह आहे तो या सगळ्या प्रकरणातला अप्रामाणिकपणा आणि ढोंगीपणा.

५) १४ फेब्रुवारी २१०४ ला केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते तोंडाने सतत ज्याचा जप करत असतात त्या प्रामाणिकपणा वा नैतिकता यांचा स्वतःच्या वागण्यातूनही आदर्श घालून द्यायचा असता तर त्यांनी दुसर्‍या दिवशी घर सोडायला हवे होते. त्या ऐवजी ते उपनियम आणि सवलतींचा आधार घेत त्या घरातच ज्यांच्यावर ते सतत टीका करतात त्या इतर अनेक लोकप्रतिनिधींप्रमाणेच ठाण मांडून बसले आहेत.

६) असे प्रदीर्घ काळ ठाण मांडू नये म्हणून भाडे वसूल करण्याची तरतूद आहे तर त्या भाड्याचा गाजावाजा करून ती रक्कम आयआयटीतल्या मित्रांच्या लोकवर्गणीतून जमा करून भरत आहेत. लोकसेवेचा बहाणा करून स्वतःच्या कुटुंबाचा खर्च इतरांकडून पदरात पाडून घ्यायचा हा प्रामाणिकपणा वा आदर्श नैतिक आचरण आहे का ?

७) असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सरकारी नोकरीत असतांना केजरीवाल सरकारी खर्चाने परदेशी शिक्षणासाठी गेले. या शिक्षणाचा उपयोग पुन्हा देशाला झाला पाहिजे म्हणून परत आल्यावर तीन वर्षे तरी काम करणे अथवा ते पैसे सरकारला परत करणे आवश्यक आहे. एखाद्या प्रामाणिक माणसाने जनतेचा पैसा आपण वापरला आहे लक्षात घेउन परत आल्यावर तळमळीने काम केले असते. काही कारणाने नोकरी सोडली तर किमान नियमानुसार पैसे परत केले असते. केजरीवाला यांनी तसे केले नाही २००६ ला राजीनामा दिल्यापासून ते टाळाटाळ करत राहिले. जनतेचे पैसे बुडवले. २०११ साली यावरून टीका झाल्यावर ते सुमारे नऊ लाख रुपये त्यांनी भरले. पण कसे भरले तर पुन्हा आय आय टीच्या मित्रांची लोकवर्गणी !!! स्वतःचे वैयक्तिक उत्पन्न वा जनतेकडुन लोकवर्गणीतून मिळालेली थैलीसुद्धा स्वतःकडे न ठेवता समाजासाठी खर्च करणारे अनेक समाजसेवक आहेत. पण समाजसेवेचा बाऊ करून स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी निधी जमवणे फारच क्रांतीकारी आहे.

८) बरे, लेखात लिहिल्याप्रमाणे हे खरेच बेबस, बेघर वगैरे आहेत का? डोक्यावर छत नाही अशी करूण परीस्थिती आहे का ? समाजासाठी सर्वस्व उधळून दिले आहे का?

केजरीवाल यांचे दिल्ली परिसरात तीन फ्लॅट आहेत.
१) इंदिरापुरम, गाझियाबाद येथे फ्लॅट आहे.
२) सिवनी येथे एक फ्लॅट आहे.
३) पत्नीचा गुरगाव येथे सव्वादोनहजार स्क्वेअरफुटांचा फ्लॅट आहे.

वीस लाखाहून जास्त कॅश व सोने आहे.
पत्नी इन्कम्टॅक्स कमिशनर दर्जाची अधिकारी आहे. साधारण दहा लाखाहून अधिक उत्पन्न व शिवाय इतर सुविधा.

असा मनुष्य तीन चार महिन्याच्या भाड्यासाठी इतरांचे पैसे कसे वापरतो? जरी ते त्यांच्यासाठीच दिले तरी ते चळवळीसाठीच वापरणे असेच कुठल्याही नैतिक जबाबदारी मानणार्‍या नेत्याने केले असते असे वाटते.

९) बाकी कोणी घर देत नाही वगैरे हास्यास्पद बाबींबद्दल काय लिहावे !!! 'आप'ला मानणारे पन्नास लाख दिल्लीकर बहुतेक अंबानींना सामील झाले आहेत असे वाटते.

सतत काहितरी नाट्यमय बातम्या निर्माण करून चर्चेत रहायचे, हंगामा करायचा, सहानुभुती मिळवायची हा केजरीवाला यांचा बिनबुडाचा कार्यक्रम दिवसेंदिवस जनआंदोलनाची विश्वासार्हता रसातळाला नेत आहे. सरकार काँग्रेसचे येवो वा भाजपचे वा अजून कोणाचे ! जागरूक सामान्य लोकांच्या संघटनेची/ पक्षाची गरज आहेच, आणि आता जनतेनेच ढोंगी नेत्यांना दूर करून हा प्रयोग वाचवायची आवश्यकता आहे.

सध्या मात्र मी एवढेच म्हणेन की 'कुणी घर देता का घर' या नटसम्राटांच्या नव्या क्रांतीकारी नाट्यप्रवेशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंय!

जीएस, 'मिर्ची'बाई येईपर्यंत खुर्चीची व्यवस्था करुन ठेवा. Wink

जीएस, फार दिवसांनी आलात. आल्याआल्या षटकार!

व्यवस्थित मुद्देसूद लेखन केले आहेस. मला केजरीवालच्या या ढोंगीपणाचा खरंच राग येतो. टीआरपीसाठी बघावटेतेव्हा वाटेल ते करत असतो.

जीएस! मस्तच लिहलयस!
केजरीवाल चे ड्रामे बघुन मला शोलेतला टाकिवरचा सिन आठवतो.. आणि अमिताभ चा डॉयलॉग तर अगदी फीट बसतो " साला नौटकी घडि घडि ड्रामा करता है!"

मस्त लिहिलं आहेस. पहिल्यांदा केजरीवाल निवडून आले तेह्वा मी दिल्लीतच होते - रादर रेल्वे प्रवासात होते, दिल्लीला पोहोचत होते. लोक इतक्या उत्साहाने सेलफोनवरुन रिझल्ट्सचे अपडेत देत - घेत होते, चर्चा सुरु होत्या... काही अति उत्साही लोकांनी रेल्वे डब्यात भांगडा नाच करुन झाला. लोकांनी आपल्याकडच्या मिठाया वाटलेल्या रेल्वेच्या डब्यात. खूप उत्साहात होती जनता. लोकांनी फार आशा आणि अपेक्षा ठेवल्या होत्या केजरीवाल आणि आप पार्टीकडून. नंतरचे एकेक प्रकार पाहता, सगळंच मुसळ केरात, असं वाटलं असणार लोकांना. Sad

ब्राव्हो, भ्रमनिरास झालेल्यांपैकी एक अस्मादिक पण Sad
तुम्ही ५० लाख दिल्लीकर म्हणता, एवढे जाऊ द्या निदान जे अगदी जवळचे (?) नेते, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यापैकी कोणी नाही का देऊ शकत घराची सोय करून ? अगदीच काही नाही तर निदान पक्ष कार्यालय तर असेल ? Uhoh

जीएस, सणसणीत!! एकंदरच आपच्या प्रचाराची पद्धत बघता जनता अजून दूर जाईल आप पासून इतका इमोशनल ड्रामा चालू आहे...उबग आणण्याइतका.

केजरीवाल या सरकारी घरात येण्याआधी कुठे रहात होते? तिथे परत जायला काय अडचण आहे?

ड्रामाबाजीचा कंटाळा आलाय त्यांच्या. आणि त्याच्यासाठी कॉन्ग्रेस वा भाजप वा आणखी कुठल्याही पक्षाचे समर्थकच असलं पाहिजे असं नाही (इथे आपवाद्यांना विरोध केला की लग्गेच कॉन्ग्रेस वा भाजप काय करतंय तुमचं अशा सुरात प्रश्न विचारले जातात)..

टाईम्सऑफइंडिया च्या बातमीनुसार ते बायकोला प्रमोशन मिळून क्वार्टर मिळायची वाट बघताहेत म्हणे (तिच्या पदानुसार प्रशस्तच क्वार्टर असेल).

इथे आपवाद्यांना विरोध केला की लग्गेच कॉन्ग्रेस वा भाजप काय करतंय तुमचं अशा सुरात प्रश्न विचारले जातात)..<<< अर्थातच!!! त्यातही आपला विरोध केला की आपण भाजपासमर्थक-> मोदीसमर्थक->हिंदुत्ववादी->पुनाओक समर्थक अस प्रवास क्षणात पार करतो. Proud

इथे आपवाद्यांना विरोध केला की लग्गेच कॉन्ग्रेस वा भाजप काय करतंय तुमचं अशा सुरात प्रश्न विचारले जातात >>> अगं विरोध जाऊच दे. अगदी पेशन्स राखून, तुम्ही नक्की काय करणार? कसं राज्य करणार विचारलं, भ्रष्टाचाराव्यतिरिक्त इतर भल्यामोठ्या प्रॉब्लेम्सवर काय सोल्युशन्स आहेत तुमच्याकडे? असं विचारलं तरी त्याला उत्तर न देता "भाजपा विरोध" हा एक कलमी कार्यक्रम सुरु होतो. "भ्रष्टाचार विरोध" ह्या सोबत राज्य चालवण्यासाठी बरंच काही लागतं हे त्यांच्या गावीच नाहिये. सद्ध्या त्यांचा "काँग्रेस विरोध" हा कार्यक्रम नाहिये कारण शत्रूचा शत्रू हा मित्र असतो ह्या उक्तीनुसार चालू आहे त्यांचं. जे काही प्रचाराच्या नावाखाली चालू आहे ते निव्वळ जळफळाट आहे हे खेदाने म्हणावे लागतेय इतके स्पष्ट आहे. एक छोटं राज्य नाही सांभाळता आलं आणि हे राष्ट्र सांभाळणार?

>>त्यातही आपला विरोध केला की आपण भाजपासमर्थक-> मोदीसमर्थक->हिंदुत्ववादी->पुनाओक समर्थक अस प्रवास क्षणात पार करतो Lol

ढोंगी पणा पुरे आता... असं म्हणत २-२ कानफडात का देत नाही ह्याचे आई वडील? असं सतत वाटत राहतं.

रोखठोक लिहिलंयस.
मला खरंचच त्यांच्याकडून सुरुवातीच्या काळात कमालीच्या अपेक्षा होत्या. पण आता त्यांची थेरं बघून टोकाचा भ्रमनिरास झालाय, होतोय. स्वतःचंच हसू येतंय काय आपण भुललो या माणसाला!
मूर्खपणाचा कळस चालू आहे... शिसारी आलीये त्या माणसाची. इतकी इतर कोणत्याही राजकारण्याबद्दल वाटली नाही.

लय हासले!! Lol
खरच सुरवातीला खुप आशा लावुन बसले होते लोक केजरीवर! शिसारी यायला लागलीय या ड्रामेबाजीची आता!

पगारे जसे कॉन्ग्रेसचे खंदे समर्थक आहेत तसे आपचे कोणी दिलो जानसे समर्थक आहे का माबोवर ?
निदान काही वेगळे पैलू वाचायला मिळतील. एके असे का करत आहे, इ. तसेच पार्टीची सद्यस्थिती काय आहे, इ.

सहसा माणसं ओळखताना माझा सिक्स्थ सेंस चांगला काम करतो. भले तो प्रत्यक्षातल्या आयुष्यात असो की जालावरील मायावी आयुष्यात.
पण आप बाबतीत कसा काय ते कळेना झाले अक्षरशः त्यांची मेंबरशिप पण घेवुन टाकली, पण जास्त हात पाय हलवण्या अगोदरच आपने आपले इंद्रधनुषी रंग उधळायला सुरुवात केली आणी मी त्यांचे फोनही उचलणे बंद केले.

Pages