एका वडाची व्यथा

Submitted by डॉ अशोक on 12 June, 2014 - 06:57

एका वडाची व्यथा
=============
वर्षातून एकदा येणाऱ्या या दिवसाची मी आताशा आतुरतेनं वाट पाहतच नाही. यायचा तो येतोच हा दिवस. त्याला न येण्याचं स्वातंत्र्य नाही. ईतर केंव्हा येण्याचं स्वातंत्र्य नाही. यायचं ते आजच. मलाही वाटतं. मोगऱ्या सारखं फुलून यावं. गुलाबासारखं डुलावं. आंब्यासारखा मोहोर मिरवत मोहरून जावं. हे पारंब्याचं लटांबर द्यावं झुगारून आणि व्हावं सुटसुटीत गुलमोहोरासारखं. पूर्वी पोरं येऊन सूर-पारंब्या खेळत. माझ्या अंगा खांद्यावर बागड्त. ती पोरं आता आजी-आजोबा झालीत. त्यांच्या नातवांना आता मैदानात जाऊन खेळायला मैदानं तरी उरलीयत कुठं? मी मात्र सूर हरवल्या सारखा, पारंब्या घेवून उभा आहे. परवाच ती माणसं आली. रस्ता रुंद व्हायचाय म्हणे. त्यात माझी अडचण होतीय ! अडचण कुणाची कशानं होईल हे काय माझ्या हातात नाही.
तुम्हा माणसांची पण मला गंमत वाट्ते. इथं, माझ्या सांवलीत, पारावर बसू्न गुलाबावर, मोगऱ्यावर कविता लिहितात. तो बालकवी ! औदुंबरावर कविता लिहिलीय म्हणे त्यानं ! माझ्यावर कविता लिहिलीय कां हो कुणी ? हे कवी कुणाचं कवतिक कशामुळे करतील सांगता येत नाही. गुलाब फुलांचा राजा हे खरं. पण त्याचं कौतुक कशामुळे? तर तो काट्यातही फुलतो, हंसतो म्हणून ! चंदनाचं अप्रूप कशानं ? तर साप तिथं असतात म्हणून ! गुलमोहोराचं कौतुक कशानं तर उन्हात त्याला फुलोरा येतो म्हणून! आता मला काटे नाहीत, साप माझ्या जवळ येत नाहीत, मी उन्हात फुलारून येत नाही हा काय माझा दोष आहे? मी उन्हात सांवली देतो हे पुरेसं नाही? अगदी झाडाच्या आधारानं वाढणाऱ्या वेलींवर कविता होतात, देवावर वाहिलेल्या फुलांवर कविता होतात, पण माझ्यावर नाही. आमची आठवण फक्त वर्षातून एकदा. दोऱ्यांनी जखडून टाकायला ! हे खरं की ह्या पारंब्यांमुळं मी कुणाला दाढी फुटलेल्या म्हाताऱ्या सारखा वाटत असेन. पण म्हातारी मंडळीही माझ्यावर लिहित नाहीत तेंव्हा वेदना होतातच.
आणखी एक. इथं माझ्या समोर सात जन्माचे वायदे होतात ! उद्या काय होईल याची शाश्वती नाही आणि सात जन्माचे वायदे, सात जन्मांची स्वप्न पाहणाऱ्या या स्त्रिया पाहिल्या की गंमत वाटते. आज माझ्या पारंब्या जमिनीत घुसून तिथं माझा दुसरा भाऊ उभा राह्यलाय. फार पाहिलंय मी. सात जन्मांचं सोडा. एक जन्म तरी हे कसे एकत्र रहातात याचंच मला कोडं वाटतं.
जाऊ द्या. आज भेटलो. उद्या हा रस्ता रूंद झाला तर मी असेन की नसेन? नसेनच बहूदा ! तेंव्हा मग .......... ?
पण मी नसेनच असे तरी कसे म्हणू. माझ्याच पारंब्या जमिनीत जातात आणि माझेच भाऊबंद मी जाण्याच्या आधी माझ्या पुढ्यात उभे ठाकतात. मी कुठे जातो. मी तर इथेच आहे. माझे रुपडे बदलले म्हणून काय झाले. 'आड वाटेल दूर एक माळ' अशी कविता रचणारे मला आठवतात. माझ्या खांद्यावरील झोक्यांच्या दोरखंडाचे वळ कायम ताजे आहेत जसे पिढ्यामागून पिढ्यांच्या ओठावरचे हसू ताजे आहे. मी आहे पण तुम्हीच मला शोधीत नाही. मी असेन तिकडे वाट वाकडी करीत नाही. जन्मो जन्मीचे वायदे करीत आहात पण त्या साठी मझ्याच हातापायाचा एखादा तुकडा तोडून त्याच्या भोवती करीत आहात. अरे मी फार दूर नाही, केवळ माझ्याकडे पाहण्याची इच्छा ठेवा. ती पाखर पहा अजूनही मला हुडकीत दूर दूर येतात, मग तुम्हीच का नाही येत. की मीच 'या चीमाण्यानो परत फिरा' म्हणत तुमची वाट पाहत शिणून जायचं!
-अशोक
टीप: शेवटचा परिच्छेद: डॉ जयंत बरीदे, औरंगाबाद यांचे सौजन्याने !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !