वृद्ध पालकांची काळजी व देखभाल

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 7 June, 2014 - 07:37

आपले वृद्ध पालक आपल्यासोबत राहत असोत किंवा वेगळे राहत असोत, त्यांची काळजी वाटणे हे साहजिक, स्वाभाविक आहे. आपल्या मात्या-पित्यांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा विनासायास, आनंदाने व निरामय आरोग्याने व्यतीत करता यावा असे बहुतेकांना नक्कीच वाटत असणार! परंतु प्रत्यक्षात ते साध्य होतेच असे नाही. नोकरी-व्यवसायातून सेवानिवृत्त होऊन आपला वेळ उत्तम प्रकारे घालवणारे जसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच व्याधी अथवा अन्य काळजी - चिंतांमुळे ह्या काळाचा व्यवस्थित आनंद न घेऊ शकणारेही बरेच वृद्ध आहेत.

आपल्या वृद्धापकाळाची तजवीज आपणच केली पाहिजे, आपण आर्थिक, व्यावहारिक किंवा शारीरिक बाबींसाठी कोणावरही अवलंबून राहता कामा नये हा निर्धार व त्या दृष्टीने नियोजन करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आजकाल दिसतात. काहीजण स्वेच्छेने वृद्धाश्रम किंवा केअर होमचा पर्याय निवडतात. पण सर्वांनाच ते शक्य होत नाही. अशा वेळी त्यांच्या आर्थिक, व्यावहारिक, आरोग्याच्या व देखभालीच्या गोष्टींकडे त्यांचे जवळचे नातेवाईक, जसे की मुलगा-सून, मुलगी-जावई, बंधू - भगिनी किंवा इतर जवळचे नातेवाईक लक्ष देताना दिसतात. अनुभवातून शिकत जातात.

काही मुख्य गोष्टींचे नियोजन केल्यास ते वृद्धांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी खूप सोयीचे जाते. अर्थातच ह्यातील काही गोष्टी त्या ज्येष्ठांचे सहकार्य व अनुमोदन मिळाल्याखेरीज शक्य होणार्‍या नाहीत. परंतु त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना शांतपणे आपली बाजू सांगून व त्यांच्या आत्मसन्मानाला व निर्णयस्वातंत्र्याला कोठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत पावले उचलली तर बर्‍याचशा गोष्टी शक्य होणार्‍या आहेत.

कोणत्या आहेत ह्या गोष्टी?

१. घरातली व्यवस्था

वृद्ध व्यक्ती जर स्वतंत्र, वेगळ्या घरात राहत असेल तर ते घर वृद्ध व्यक्तीच्या हालचालीच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सोयीचे बनविणे. जर वृद्ध व्यक्ती तुमच्या सोबत राहत असेल तर घरातला व घराभोवतीचा त्यांच्या वावराचा भाग त्यांना हालचालीसाठी व वावरासाठी सोयीचा करणे.

ह्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींची यादी देता येऊ शकेल. पण तरी मुख्य काही गोष्टी इथे देत आहे :

अ. वृद्धांना चालण्यास आधार लागत असेल किंवा जोर जात असेल तर भिंतीला, जिन्याला व बाथरूम - शौचालयात रेलिंग्ज, हाताने पकडायचे बार्स बसवून घेणे.

आ. बाथरूम व घरातल्या फारश्या / टाइल्स या अती गुळगुळीत, निसरड्या नसाव्यात.

इ. घरातले गालिचे, पायात अडकणारी जाजमे व वाटेत येणारे फर्निचर काढून टाकावे. वाटेत येणार्‍या, जागा खाणार्‍या, बोजड व जास्तीच्या वस्तू कमी कराव्यात. वावरायला सुटसुटीत व स्वच्छ करायला सोपी अशी जागा असावी.

ई. बाथरूममध्ये बाथ स्टूल वर वृद्धांना बसायला उठायला त्रास होत असेल तर तिथे सरळ एखादी न डगमगणारी खुर्ची ठेवावी. त्यावर बसून ते शॉवर घेऊ शकतात किंवा अंघोळ करू शकतात.

उ. रात्री पुरेसा प्रकाश देणारे नाइट लॅम्प्स, पॅसेजमध्ये वृद्धांना न अडखळता चालता येईल इतपत प्रकाश देणारे दिवे - घरात,घराबाहेरच्या पोर्च - जिने - पायऱ्यांजवळ असावेत.

ए. वृद्ध व्यक्ती व्हीलचेअरने घरात वावरत असतील तर त्यांच्या सोयीची रॅम्प्स बसवून घेणे.

तसेच त्या घराचे भाडे, कर, मेन्टेनन्स, कागदपत्रे इत्यादींची व्यवस्था बघणे. तशी व्यवस्था अगोदरपासून अस्तित्वात असेल तर ती सुरळीत चालू राहण्यासाठी हातभार लावणे.

२. वृद्धांचे आरोग्य, तपासण्या, उपचार, व्यायाम व सुरक्षा व्यवस्था

वृद्धांचे आरोग्य, तपासण्या, उपचार, व्यायाम व सुरक्षा व्यवस्था यांच्या दृष्टीने त्यांची व्यवस्था लावून देणे किंवा तशी व्यवस्था लावण्यास त्यांना मदत करणे.

अ. वृद्धांच्या वैद्यकीय तपासण्या, उपचार यांचे नियोजन. आवश्यकतेनुसार त्यांच्या डॉक्टरशी संपर्कात राहणे.

त्यांना उत्तम सुविधा देणारे डॉक्टर, स्पेशालिस्ट्स, पॅथॉलॉजिकल लॅब्ज, हॉस्पिटल, सोयीचे केमिस्ट-फार्मसिस्ट, नर्सिंग ब्युरो इत्यादींबद्दल माहिती पुरविणे. किंवा त्यांच्यासाठी ती व्यवस्था बघणे.

त्यांच्या डॉक्टर व इतर वैद्यकीय अपॉइंटमेंट्सचे रिमाइंडर / कॅलेंडर बनवून देणे वा तसे बनवण्यास मदत करणे. औषधे घेण्याच्या वेळा, डोस, तब्येतीच्या करावयाच्या नोंदींची यादी ही त्यांच्या औषधाच्या ट्रे जवळ किंवा कपाटाजवळ त्यांना किंवा त्यांची देखभाल करणार्‍या व्यक्तीस दिसू शकेल अशी लावून ठेवणे.

आ. वृद्धांना त्यांच्या प्रकृतीप्रमाणे घरात किंवा घराबाहेर व्यायामाच्या सोयी उपलब्ध करून देणे. घरातली वृद्ध व्यक्ती पेशंट असेल व काही कारणाने घराबाहेर जाऊ शकत नसेल तर घरी व्यायामाची साधने उपलब्ध करून देणे. तसा व्यायामही शक्य नसेल तर घरी फिजिओथेरपिस्ट बोलावून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वृद्ध व्यक्तीकडून योग्य व्यायाम करवून घेणे. हळूहळू त्यांना घराबाहेर पडून व्यायाम करण्यास प्रवृत्त करणे. त्यांचा उत्साह वाढविणे.

इ. वृद्ध व्यक्ती स्वतंत्र, वेगळी राहत असल्यास ते घर जास्तीत जास्त सुरक्षित कसे करता येईल हे पाहणे. तुमच्या सोबत राहाणार्‍या वृद्धांनाही सुरक्षेची गरज असते. त्यांना ती मिळत आहे ना, ह्याची खातरजमा करणे.

ई. कुटुंबातील वृद्धांना त्यांच्या डॉक्टरने सांगितलेले पथ्य, व्यायाम व जीवनशैली राखायला मदत करणे.

३. आर्थिक व्यवहारांचे नियोजन

ही खरे तर अगदी संवेदनशील बाब आहे. अनेक वृद्धांची आपल्या मुलांना किंवा अन्य नातेवाईकांना आपल्या आर्थिक बाबींबद्दल माहिती देण्याची किंवा त्याबद्दल काही सांगण्याची तयारी नसते. त्यांना तसे करणे असुरक्षित वाटते. आणि त्यात चूकही काही नाही. त्यांना तुम्ही त्यांची आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे पाहणे, पडताळणे इत्यादी गोष्टी जर अनकम्फर्टेबल वाटत असतील तर अशा वेळी त्यांना त्रयस्थ अशा प्रोफेशनल व्यक्तीचे साहाय्य उपलब्ध करून देणे हे नक्कीच तुमच्या हातात असते. किंवा त्यांच्या विश्वासातील प्रोफेशनल तज्ज्ञ व्यक्तीकडून ते ही पडताळणी करून घेऊ शकतात. परंतु ते तसे करत आहेत ना, त्यांची सारी कागदपत्रे व्यवस्थित आहेत ना, त्यांना कोणत्या प्रकारच्या साहाय्याची गरज आहे हे पाहणे आपल्या हातात असते.

खास करून विस्मरणाचा त्रास होत असलेल्या, किंवा वयानुसार आपला आत्मविश्वास कमी झालाय असे वाटणार्‍या, गोंधळ उडणार्‍या वृद्ध पालकांच्या बाबतीत अशी काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते.

ह्याच बरोबर ते कोणाकडून आर्थिक दृष्ट्या फसवले तर जात नाहीत ना, त्यांना कोणी खोट्या स्कीम्स सांगून गंडवत तर नाही ना, किंवा त्यांच्या भावनांना हात घालून - त्यांच्या विस्मरणाचा वा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळत तर नाही ना, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. अन्यथा ते त्यांच्याच स्वतःच्या हक्काच्या पैशाला, प्रॉपर्टीला मुकू शकतात.

४. कायदेशीर मदत व आरोग्य विमा / योजना

आपल्या वृद्ध पालकांची कायदेशीर व्यवहारांची कागदपत्रे, त्यांचे आरोग्यासंबंधी किंवा अन्य प्रकारचे विमे उतरवले असतील, कोणत्या आरोग्य योजनेत पैसे गुंतविले असतील तर त्याबद्दलची त्यांची कागदपत्रे अद्ययावत आहेत ना, त्यांना त्यात कोणत्या मदतीची गरज आहे का हे पाहणे.

५. वृद्धांचा हुरूप, उत्साह, आनंद टिकविणे आणि स्नेही - मित्रजनांचा सहवास राखायला मदत

अ. आपल्या कुटुंबातील वृद्धांचे स्वतःचे आयुष्य निरामय, आनंदी राखण्यासाठी प्रयत्न चालू असतील तर उत्तमच आहे. परंतु काही कारणामुळे ते त्यात मागे पडत असल्यास त्यांच्या आजूबाजूला आनंदी, उत्साहाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करायला मदत करणे.

आ. वृद्धांना त्यांचे स्नेही, आप्त, त्यांचे सोशल सर्कल यांच्याशी संपर्क राखायला मदत करणे.

इ. त्यांना ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, ज्या वस्तू व माणसे त्यांना खूप प्रिय आहेत अशा व्यक्ती वा वस्तूंच्या सहवासापासून त्यांना वंचित न ठेवणे. त्यांना अशा अ‍ॅक्टिविटीज करण्यास प्रोत्साहन देणे.

ई. वृद्ध पालक जर ई-साक्षर असतील तर त्यांना फेसबुक सारख्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांच्या संपर्कात राहायला, जगातील बातम्या वाचायला, उत्तम प्रेरणादायी व्हिडियो पाहायला उद्युक्त करणे.

ह्यातील सर्वच गोष्टी सर्व काळ शक्य होतीलच असे नाही. परंतु आपल्याकडून आपण प्रयत्न करत राहायचे हे जर पक्के ठरविले असेल तर कोणता ना कोणता मार्ग निघतच राहील.

आजारी, अंथरुणाला खिळून असणार्‍या वृद्ध पालकांची देखभाल

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असे म्हटले जाते ते उगीच नाही. आणि त्यातच जर ती वृद्ध व्यक्ती आजाराने, व्याधीने ग्रस्त असेल, तिच्या हालचालीवर - खाण्यापिण्यावर - व्यवहारावर त्यामुळे जर मर्यादा आल्या असतील, आणि त्यातून जर ती व्यक्ती अंथरुणाला खिळून असेल तर हे बालपण हट्टी व चिडकेही होऊ शकते.

अशा वेळी आपल्याला त्यांचे जर कष्टाने करणे जमत नसेल तर सरळ नर्सिंग ब्युरोमधील नर्स / आया / मावशी त्यांच्या देखभालीसाठी ठेवावी. म्हणजे त्यांचीही आबाळ होत नाही व तुम्हालाही पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे त्रास सहन करावा लागत नाही.

आजारी पालकांनाही जितकी शक्य असतील, झेपत असतील तितकी कामे स्वतःची स्वतः करू द्यावीत. (अगदी त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालणे, वर्तमानपत्राची पाने नीट जुळवून लावणे, पांघरुणाची घडी करणे, स्वतःचे केस विंचरणे - कपडे बदलणे - स्नानादि कार्यक्रम इ. इ.) त्यांची हालचाल होणे आवश्यक आहे. हवे तर तुम्ही त्या कामांवर देखरेख करू शकता किंवा त्यांना त्यात थोडी मदत करू शकता. पण असे स्वतःचे काम स्वतः केल्याने त्यांचा आत्मविश्वास राखला जाण्यात मदत होते.

त्यांना जशी औषधोपचार, शुश्रूषेची गरज असते तशी प्रेमळ स्पर्शाची, आश्वासनाचीही गरज असते. त्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालविणे, मायेचा स्पर्श, त्यांचा हात हातात घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हेही त्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते. 'आपण इतरांना हवे आहोत' ही भावना त्यांच्यासाठी मोलाची असते.

ह्या खेरीज वरवर किरकोळ वाटल्या तरी वृद्धांच्या मनाला टवटवी देणार्‍या, त्यांना प्रसन्न करणार्‍या अनेक गोष्टी आहेत...

उदा.

१. रोज थोडा वेळ तरी ते सकाळ सायंकाळच्या कोवळ्या उन्हात बसतील असे पाहणे.

२. त्यांना स्वतःचे ग्रूमिंग वृद्धत्वामुळे जमत नसेल तर त्यासाठी त्यांना साहाय्य करणे. अगदी केसांना कलप लावण्यापासून ते पायाची नखे काढण्यापर्यंत! किंवा तुम्ही प्रोफेशनल व्यक्तींना घरी बोलावून घेऊन असे ग्रूमिंग सेशन अ‍ॅरेंज करू शकता. फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, पुरुषांच्या बाबतीत दाढी - कटिंग हेही त्यांचे मन प्रसन्न ठेवण्यास साहाय्य करते. तसेच बदललेल्या आकारानुसार त्यांचे कपडे त्यांच्या मापाचे, आवडीच्या रंगसंगतीचे, कम्फर्टेबल मटेरियलचे व सुटसुटीत आहे ना, हे पाहणे.

३. वृद्धांना आपल्या समवयस्कांशी संपर्कात राहण्यास, स्नेहीजनांच्या भेटीगाठी घडवून आणण्यास प्रोत्साहन देणे.

४. त्यांना समाजोपयोगी कार्यात आपले मन रमविणे शक्य असेल तर त्यासाठी प्रवृत्त करणे.

५. आधुनिक तंत्रज्ञानाशी व सोशल मीडियाशी त्यांची नाळ जोडणे. त्याद्वारे त्यांच्या जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यास त्यांना मदत करणे. अर्थात या माध्यमांबद्दल त्यांना पुरेसे जागृत करून मगच!

६. हे अतिमहत्त्वाचे : वृद्धांना नित्य उपयोगी पडणारे किंवा त्यांना सेवा पुरवणार्‍या व्यक्ती / संस्थांचे नाव - संपर्क क्रमांक ठळक अक्षरात, त्यांना नजरेस पडेल अशा ठिकाणी नोंदवून ठेवणे. तसेच इमर्जन्सीच्या वेळी ज्यांच्याशी संपर्क साधायचा अशा व्यक्ती / संस्थांची नावे, फोन नंबर्स, पत्ते हे मोठ्या, ठळक अक्षरात फोनपाशी लावून ठेवणे.

सेवा सुविधा

अ. वृद्ध व्यक्ती जर स्वतंत्र , वेगळी राहत असेल तर तिला गरजेप्रमाणे घरपोच सेवा पुरविणार्‍या दुकाने, संस्था इत्यादींची सेवा उपलब्ध करून देणे. ह्यात अगदी घरपोच लाँड्री, औषधे, दूध, वृत्तपत्र, केबल सेवा, जेवणाचा डबा घरपोच देणारे, चिरलेली भाजी व फळे, किराणा सामान, कुरियर सेवा, वेगवेगळे कर भरणे - बँकेचे व्यवहार - बिले भरणे इत्यादी सेवा घरपोच पुरविणार्‍या संस्था, घरपोच लायब्ररी, घरी येऊन ग्रूमिंगची सोय पुरविणारी संस्था, घरातील उपकरणांचा व वाहनांचा नियमित, चांगला मेन्टेनन्स ठेवणारे तंत्रज्ञ, खात्रीलायक प्लंबर - इलेक्ट्रिशियन - सुतार - घरगुती कामासाठी मदतनीस - सुरक्षासेवक पुरविणार्‍या संस्था इत्यादी बरेच प्रकार आवश्यकतेनुसार अंतर्भूत होऊ शकतात.

तसेच घरी येऊन नियमित वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर्स, पॅथ लॅब्ज तंत्रज्ञ हेही उपलब्ध होऊ शकतात. वेळोवेळी ही यादी अपडेट करणे.

वृद्धांना वाहन चालविणे शक्य नसेल व पब्लिक ट्रान्स्पोर्टने जा - ये करणे शक्य नसेल तर ओळखीच्या रिक्षा / टॅक्सी / कॅब सुविधेचे नाव - नंबर्स त्यांना उपलब्ध करून देणे. किंवा त्यांना बाहेर जाण्यासाठी सोबत आवश्यक असेल तर तशी खात्रीलायक व्यक्ती किंवा मदतनीस त्यांच्या बरोबर जाईल हे पाहाणे.

आ. वृद्धांना खात्रीलायक कायदेशीर साहाय्य करणार्‍या, त्यांना संघटित करणार्‍या संस्था व उपक्रमांशी त्यांची ओळख करून दिल्यास तेही त्यांच्यासाठी चांगलेच ठरते.

इ. वृद्ध व्यक्तींसाठी खास बनवलेले मोबाईल्स, वाचण्यास / पाहण्यास मदत करणारी उपकरणे, श्रवणयंत्रे, त्यांना सुलभतेने हालचाल करण्यास किंवा वावरण्यास मदत करणारी उपकरणे उपलब्ध करून देणे व त्यांना ती वापरण्याचे प्रशिक्षण देणे.

ही यादी किंवा सांगितलेल्या गोष्टी परिपूर्ण नक्कीच नाहीत. त्यात त्रुटी असू शकतात. परंतु ह्या काही प्राथमिक गोष्टी आपल्याला माहित असतील तर त्यांच्या अनुषंगाने नियोजन करणे तुलनेने सोपे जाऊ शकते.

अनेकदा आपल्या वृद्ध पालकांच्या काळजीत व देखभालीच्या कामात आपण एवढे गुंतून जातो की मुळात आपण हे सर्व का करतोय त्याचा विसर पडू शकतो. आपल्या इच्छेखातर व त्यांच्यावरील प्रेमापोटी आपण हे करत आहोत हे आपण विसरता कामा नये. तसे विसरले जाण्याचे प्रसंग बरेच संभवतात. पण त्या वेळी धीर राखणे, मनाची ताकद गोळा करणे, स्वतःला थोडा अवधी देणे व किंचित अलिप्त होऊन शांतपणे विचार करणे हे महत्त्वाचे ठरते. त्याचा उपयोग आपल्याला आपले स्वतःचे मानसिक संतुलन राखण्यास आणि त्या वृद्ध व्यक्तीची योग्य देखभाल करण्यास होतो हे नक्कीच!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकु, तुमचे सगळेच लेख असतात, तसाच दुसरं बालपण लाभलेली बालकं कशी सांभाळावीत याबबद्दलचा हा लेख उत्तम व कॉम्प्रिहेन्सिव्ह झालेला आहे.

घरातल्या वृद्धांची काळजी कशी घ्यावी याबद्दल लिहितातानाच, ती काळजी का घ्यायची, अन त्याबदल्यात त्यांच्याकडून अन आपल्याकडून काय तडजोडी / अ‍ॅडजस्टमेंट्स अपेक्षित आहेत, याबद्दल थोडं शॉर्ट झालंय शेवटच्या परिच्छेदात. त्याबद्दल अधिक चर्चा वाचायला आवडेल. कारण घरातला म्हातारा/म्हातारी हे घरातले नॉन-प्रॉडक्टिव्ह मेंबर्स असतात. अन त्यांची बर्‍यापैकी हेळसांड झालेली दिसून येते. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती हेदेखिल सत्य आहेच. ह्याच जगात श्रावणबाळाचे नमुनेही असतात, अन कर्कश-खडूस म्हातारे देखिल असतातच.

ग्रोइंग ओल्ड ग्रेसफुली, किंवा म्हातरं व्हायचं प्लॅनिंग कसं करावं? याबद्दलही या ग्रूपमधे काही लिहा, अशी विनंती. ४०शी, ५०शी, ६०ठी इ. टप्प्यांत, किंवा मुलं शिक्षणासाठी / नोकरीसाठी घराबाहेर पडण्याचा टप्पा, सुना - जावई येण्याचा टप्पा, नातवंड येणं. रिटायर होणं. स्वतःचं, जोडीदाराचं मोठं आजारपण / निघून जाणं.. इ.

या टप्प्यांशी, अन यात भेटणार्‍या, दूर जाणार्‍या सगळ्यांशी, नव्या नात्यांशी, नात्यांतल्या दुराव्यांशी जुळवून कसं घ्यायचं? त्यासाठी शरीराची, मनाची, अन पैशाची तयारी कशी करता येईल? यावरही असे विस्तृत लेख व चर्चाही या विभागात असाव्यात असे वाटते.

ता.क.
पालकांची जबाबदारी घ्याययला लावणारा कायदाही अस्तित्वात आहे.
या कायद्याबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल.

अकु, लेख सर्वसमावेशक झाला आहे. त्यातून अजून काही पॉइंट्स पुढे येतीलच.

पालकांची जबाबदारी घ्याययला लावणारा कायदाही अस्तित्वात आहे.>>> तो कायदा आहे. पण त्याचा वापर करण्यसाठी झगडण्याची परिस्थिती, मनस्थिती पालकांची उरलेली नसते हे ही तितकंच खरं आहे.

प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद!

इब्लिस, ज्येष्ठांसाठी असलेल्या कायद्याबद्दल मी पूर्वी मायबोलीवर एक माहितीवजा लेख लिहिला होता त्याची लिंक : http://www.maayboli.com/node/26632

तुम्ही लिहिलेल्या विषयांवर खरोखरी चर्चा, लेख, अनुभव कथन ह्या उत्तररंग विभागात झाले तर त्यातून अनेकांना उपयोग होईल.

मला ज्या ज्या विषयांवर शक्य आहे त्यांवर लिखाणाचा प्रयत्न करेनच!

अरुंधती, खूप उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद!

>>वृद्धांच्या वैद्यकीय तपासण्या, उपचार यांचे नियोजन. आवश्यकतेनुसार त्यांच्या डॉक्टरशी संपर्कात राहणे

याबद्दल माहिती असलेली एक उपयोगी बाबः
काही डॉक्टर्स, जेरिअ‍ॅट्रिशिअन्स यांनी एकत्र येऊन वर्षाची एक ठराविक रक्कम घेऊन (नागपुरात तरी) एक चांगली सेवा उपलब्ध करून दिली आहे. दर महिन्याला घरी येऊन हेल्थ चेकअप करतात. काही ठराविक काळानंतर नियमीतपणे रक्त तपासणी होते. त्यासाठि घरी येऊन रक्त काढतात. २४ तास अँब्युलन्सची सेवा असते. इतर ठिकाणीही अश्या सेवा उपलब्ध असतील.

Hello Mrunmayee:

Can you please provide more details (names, contact details) about the doctors who provide this type of service in Nagpur?

- Mandar

अकु, छान धागा.

माझेही चार पैसे. अर्थातच ज्याच्या त्याच्या मानसिक, शारिरीक व आर्थिक कुवतीनुसार वापर करावा.

१. शक्य असेल तर वृद्धांच्या खोलीत वेगळा टीव्ही असावा. त्यावर कोणते प्रोग्रॅम्स पहावेत हा त्यांचा पर्याय असावा. हल्ली हेड फोन्स वाले टीव्ही मिळतात. ते लावले की त्यांच्या आवाजाचा त्रास तुम्हाला होणार नाही. व ते पण खूश.

२. तुम्च्या मुलांच्या अभ्यासासाठी आज्जी-आजोबांच्या टीव्ही वर गदा आणू नका. टीव्ही चालू असेल तरी दुसर्‍या खोलीत जावून आपला अभ्यास करायची सवय मुलांना लावता येते. आम्ही लावली.

३. स्वच्छतागृहात हॅन्ड वॉश व फ्लश जरूर बसवावे. त्याचा फायदा होतो. फोल्डींगचा कमोड पण बसवता येतो त्याचा विचार करावा. रोजच्या रोज संडास व बाथरुम साफ करण्याकरता शक्य झाल्यास नोकर ठेवला तर त्रास कमी होतो व स्वच्छता रहाते.

४. त्यांना बसल्या बसल्या करता येण्याजोगी कामे विचार करून ठरवावीत. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे. त्यांना बरे वाटते.

५. त्यांच्या खोलीत केराचे स्वतंत्र टोपली, जमिनीवरचा कपडे वाळत घालायचा स्टॅन्ड, वाटी चमचे ताटली अस सेट, पाण्याचा माठ वगैरे गोष्टी ठेवाव्यात.

६. औषधे वेळच्या वेळेत घेतली जावीत व घेतली का नाही हे आठवण्यासाठी महिनाभराचा वारानुसार दिवसात ३ वेळेची औषधे ठेवण्यासाठी प्लॅस्टीकचा डबा मिळतो तो जरूर आणावा.

७. खोलीत एक फळा ठेवावा ज्यावर निरोप लिहिता येइल, आणावयाच्या सामानाच्या /आठवणींच्या गोष्टीसांठी उपयोग होईल.

८ त्यांचे डॉ. तपासण्यांचे वेळापत्रक असलेले कॅलेंडर भिंतीवर लावावे. पुढील तपासणीच्या तारखांची नोंद कॅलेंडरवर ठेवावी.

९. देवभक्त वृद्धांसाठी खोलीतच तसबीर, काही उपकरणी, देवाचे लहानसे देवघर वगैरे ठेवावे. तिथल्या तिथे त्यांचा टाईम पास चांगला होतो. देवाचे जे काही ते वाचत असतील त्याच्या एन्लार्ज्ड झेरोक्स, भिंग वगैरे तिथेच ठेवावे.

१० त्यांच्यासाठी २-३ वृत्तपत्रे स्वतंत्रपणे लावावीत. आपले वृत्तपत्र वेगळे ठेवावे. चिड्चिड कमी होते.

११. काही खाण्यापिण्याच्या वस्तु त्यांच्या खोलीतच ठेवाव्यात.

१२. नौवारी आज्ज्यांना त्यांच्या मनाविरुद्ध गाऊनची सक्ती करू नये. नौवारी हल्ली कमरेला इलॅस्टीक असलेल्या शिवून मिळतात. त्याचाही विचार करावा.

१३. त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या जिव्हाळ्याच्या लोकांना आमंत्रित करावे. आपले राग लोभ मधे आणू नयेत.

१४. घरी न्हावी बोलावून त्यांची दाढी, हेअर कट वगैरे करून घ्यावा.

१५. जुने टेपरेकॉर्डर्स व कॅसेट्स आवडीणे ऐकतात व ऑपरेट पण करु शकतात त्यांच्यासाठी त्याची सोय करावी.

१६. त्यांची मेडिकल हिस्ट्रीची फाईल वर ठेवावी. पटकन सापडेल अश्या ठिकाणी ठेवावी.

१७. अ‍ॅमब्युलन्स वगैरे नं. त्यावरच लिहून ठेवावेत.

१८. घरी येणार्‍या डॉ. शी बोलून ठेवावे व त्यांचे नं. फाईलवर लिहून ठेवावेत.

१९. त्यांच्यासाठी कुपथ्य असलेल्या गोष्टी त्यांच्यासमोर खावू नयेत व त्याबद्दल बोलही नये त्यांच्यासमोर.

नंतर दिवस घालण्यापेक्षा ते असताना त्यांचे दिवस नीट जातील एवढे जरूर पहावे.

हल्लि १ वर्शापासुन मझि आई माझ्या समोर १ति रहाते. वेगला तिवि ,टीवी, आहे. फक्त किचन अकत्र. दोघि मजेत.

we have appointed cook,and 2 more women for washing and utensil cleaning.
No issue on homework. we go to places we like..together or separate.Financially sound so we r buying the comforts and living comfortably
.

इब्लिस हे जे म्हणताहेत <<<<<ग्रोइंग ओल्ड ग्रेसफुली, किंवा म्हातरं व्हायचं प्लॅनिंग कसं करावं? याबद्दलही या ग्रूपमधे काही लिहा, अशी विनंती. ४०शी, ५०शी, ६०ठी इ. टप्प्यांत, किंवा मुलं शिक्षणासाठी / नोकरीसाठी घराबाहेर पडण्याचा टप्पा, सुना - जावई येण्याचा टप्पा, नातवंड येणं. रिटायर होणं. स्वतःचं, जोडीदाराचं मोठं आजारपण / निघून जाणं.. इ. या टप्प्यांशी, अन यात भेटणार्‍या, दूर जाणार्‍या सगळ्यांशी, नव्या नात्यांशी, नात्यांतल्या दुराव्यांशी जुळवून कसं घ्यायचं? त्यासाठी शरीराची, मनाची, अन पैशाची तयारी कशी करता येईल? यावरही असे विस्तृत लेख व चर्चाही या विभागात असाव्यात असे वाटते.>>>> त्यावर चर्चा/बाफ/लेख खरंच काढता येतील का? वर प्रतिसादात आलेले धागे ह्या प्रश्नांना निगडीत नाही आहेत, असे वाटते.

हे सगळे प्रश्न तसे आपल्या(सध्या म्हातारे नसलेल्या व्यक्तींच्या) बाजूने आहेत, पण घरातल्या वृद्धांना किंवा वृद्धत्वाकडे वाटचाल करणार्‍या इतरांना 'ग्रोइंग ओल्ड ग्रेसफुली'साठी कशी मदत करता येईल, ही चर्चा झाली तर खरंच उपयुक्त असेल.

आसपासच्या घरांत हा प्रश्न खूपदा पाहिलाय (आमच्या घरांतही अर्थात येऊ घातलाय). त्या वयातल्या सगळ्यांनाच समाजसेवा/व्यायाम/तब्येत सांभाळणे/छंद जोपासणे आवडेल असे नसते... बर्‍याचदा चांगले/वाईट कुठलेच समवयस्क मित्रमंडळही नसते... स्वतःला योग्य प्रकारे गुंतवून ठेवण्याची गरजही वाटत नसते. ती वाटत असलीच तर त्यावर मात करण्यासाठी लागणारी चिकाटी नसते... पण या सगळ्यात इतर कुटुंबीयांच्या रोजच्या दिवसांची फरफट होत रहाते, आणि त्यातून नको ते प्रसंग फारच लवकर उद्भवू लागतात... तेव्हा त्यांना मदत करून, नकळतपणे समुपदेशन करून त्यांची आवड/उद्योग शोधून देणे, एवढं जरी करता आले तरी खूप होईल असे वाटते. बर्‍याचदा लोक मग या व्यक्तींना या ना त्या यात्रा/ट्रिपसाठी पाठवतात.(अर्थात त्यातही प्रवास आवडला/झेपला पाहिजे). घरातल्या इतर मंडळींनी समजून घ्यावे, हे मान्यच पण तुम्ही पण समजून घ्या, हे सांगणारं कुणी नसेल तर परिस्थिती बिकट होऊन बसते. आई/बाबांच्या या स्वभावावर उपाय काहीतरी असेल तर ते करून बघू की, असं म्हणणारे इतर कुटुंबीय बरेच पाहण्यात आहेत, पण त्यांना काय करावे, हे समजत नसते. समुपदेशन हा एक पर्याय असतोच, पण त्यातही बर्‍याचदा दोन्ही बाजूंनी तयारी नसते. मग सहसा फॅमिली डॉक्टर (असतील तर)शी चर्चा हाच एक मध्यममार्ग असतो, पण तीही बर्‍याचदा निष्फळ असते.

हे लिहिताना फार विस्कळीत होतंय, त्याबद्दल क्षमस्व. मागे मी असा काही धागा काढायचा विचारही केला होता, पण माझ्याकडे मुळात या प्रश्नांना जवळपास जाणारीही उत्तरे नाहित, किंवा किमान प्रश्न मांडता येतील, इतका अनुभव नाहीये, मग काय डोंबल धागा काढणार?

अकु लेख आवडला. आपले लेख नेहमीच विचार करायला लावणारे असतात.
बर्‍याचदा वृद्ध पालकांची देखभाल ही प्रेमभावनेपेक्षा कर्तव्यबुद्धी च्या भावनेने केली जाते. ते योग्य कि अयोग्य हा वेगळा विषय आहे. वृद्धत्वात होणारे मेंदुतील बदल हे वर्तणुकीतील बदलाला कारणीभुत होतात. त्याचा कार्यकारणभाव हा तरुण पिढीच्या मुलांना लक्षात येत नाही.उदा. आपल्याच घरात पदार्थ चोरुन खाणे, काल्पनिक स्टोर्‍या रचून सांगणे वगैरे. लहान मुल जशी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नाना क्लुप्त्या करतात तसच काहीसे यांच्याबाबत असते.
लेख वाचताना अंतर्मुख झालो. आईच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याकडून शक्य असतानाही राहून गेल्या याची जाणीव झाली.खंतही वाटली. आईची देहदान व नेत्रदान ही इच्छा पुर्ण करता आली याचे समाधानही वाटले.
.
.
संध्याछाया भिवविती हृदया

वृद्धांच्या चवीच्या जाणीवा वयोमानानुसार कमी झालेल्या असतात का? माझं असं ऑब्जरवेशन आहे की बरेचदा ज्ये नांना पदार्थ आवडत नाहीत. मधून मधून त्यांच्या आवडीचे पदार्थ आवर्जुन करावेत. त्यांच्या रेसिपीने करावेत. रेसिपी विचारली तरी त्यांना बरे वाटते! माझ्या ८५ वर्षाच्या (सोवळ्या) पणजीला माझी आई रोज काय स्वयंपाक करायचा/एखादा पदार्थ कसा करायचा असे विचारायची. इतर नातसुनांपेक्षा आमच्याकडे तिला सहाजिकच जास्त आवडायचे. (आईचे ते वागणे माझ्या लक्षात होते म्हणून मी पण आजेसासुबाईना विचारायचे. पण त्यामुळे मला स्वयंपाक येत नाही वगैरे असा घरातील सदस्यांचा गैरसमज झाला ते सोडा! Wink Biggrin )

बर्‍याचदा वृद्ध पालकांची देखभाल ही प्रेमभावनेपेक्षा कर्तव्यबुद्धी च्या भावनेने केली जाते.>>>>खरंय हो!

प्रेमभावनेपेक्षा कर्तव्यबुद्धी च्या भावनेने >> पालकांचे 'करावेसे' वाटणे हे महत्वाचे आहे. नाहीतर वृध्दाश्रमांमध्ये कितीतरी वृध्द त्यांच्या पोटच्या मुलांनी आणून सोडलेले आढळतातच तसेही!

सुमेधाव्ही, चांगल्या टिपा.

आपल्या कुटुंबातील वृध्दांचा आर्थिक बाबींचा पसारा बराच मोठा असेल तर त्यांना तो आटोक्यात आणायला मनविणे व त्यासाठी त्यांना साहाय्य करणे हे आवश्यक असते. त्यांच्या महत्वाच्या कागदपत्रांना स्कॅन करून सॉफ्ट कॉपीज स्वरूपात ठेवल्यास त्यांची गैरसोय होणे टळते व चिंता काही प्रमाणात कमी होते.

आमच्याकडे तूर्तास ९ बँकांमधल्या खात्यांपासून ६ बँक खात्यांपर्यंत प्रगती आहे. ह्यापेक्षा कमी खाती होण्याचे चिन्ह नाही.

ग्रोइंग ओल्ड ग्रेसफुली >> आजवर जे जे ग्रेसफुल वृध्द पाहिलेत त्यांच्याबाबत जाणवलेल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे,
त्यांनी वाढत्या वयाचा बाऊ केला नाही, पण त्याचबरोबर वयानुरूप येणाऱ्या मर्यादांना हसत खेळत स्वीकारले. त्याबद्दल कुरकुरत बसले नाहीत.
सजग राहून वयानुसार आहार, व्यायाम, दिनचर्या यांत बदल. नियमित चेक अप.
मनाने व विचारांनी तरूण राहण्याचा प्रयत्न.
यंग जनरेशन किंवा जनरेशन नेक्स्ट शी संवाद साधून त्यांचे विचार, दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न, त्यांच्याकडून नव्या गोष्टी शिकण्याची तयारी.
माझं तेच खरं हा हेका नाही. जिथे त्यांना एखादी गोष्ट पटत नाही तिथे ती का पटत नाही हे सांगणं व नंतर शांतपणे बाजूला होणं.
मोठा मित्रपरिवार, जनसंपर्क आणि सर्व वयोगटांतील लोकांशी मैत्र.

आणखी काही बाबी जाणवल्या... त्यांनी अनेक गोष्टी विचारपूर्वक अंगिकारल्या होत्या...

जसे की,

आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा इतरांना करून देणे. सामाजिक किंवा समाजोपयोगी कार्यात व्यस्त राहणे.
आपलं मन न मारता आयुष्याचा आनंद घेणे, लहानांमध्ये लहान होऊन दंगा करणे, विचारला तरच सल्ला देणे, आपले छंद जोपासणे.
फक्त मी व माझे कुटुंब एवढाच परिघ व विचार न ठेवता आपल्या विचारांची व परिघाची व्याप्ती वाढविणे. आपले सोशल सर्कल प्रयत्नपूर्वक वाढविणे व जोपासणे. मुलंबाळंकुटुंब ह्यात अडकून न पडता त्यांना व स्वत:ला स्पेस देणे. आपल्या जोडीदारालाही आपल्या सोबत नेणे.

अर्थात, यापेक्षा वेगळा विचार वा वर्तन करणारे व तरीही ग्रेसफुली ओल्ड होणारे लोक असू शकतात.

अरु ने लिहिलेल्या 'ग्रोइंग ग्रेसफुली' कॅटेगरी मध्ये माझ्या साबा येतात (एक्सेप्ट नियमित चेकअप आणि 'हेका' :-P. पण हेका चालूच असला तरी आम्हा सगळ्यांना त्याची सवय झाली आहे. ते हेका आम्ही ह्या कानाने ऐकून घेतो आणि त्या कानाने सोडून देतो. त्याचा परिणाम त्यांच्याशी असलेल्या संबंधांवर कधीच होऊ दिला नाही. त्यांच्या हेकेखोरपणासकटच she loves us and we love her. रेग्युलर चेक अप साठी को-ऑपरेट न करणे हे हेक्याअंतर्गतच येतं.)

अकु खुप छान लेख आहे.
सुमेधाव्हींची हरकत नसेल तर त्यांच्या उपयुक्त सुचना हेडरमध्ये टाकता येतील का?
तसेच तुझ्या 'ग्रोईंग ओल्ड ग्रेसफुली'वाल्या टिपा वेगळा बीबी काढुन तिथे चर्चा सुरु करता येईल का?
धन्यवाद. Happy

Pages