'कापसाची म्हातारी', 'शिंगवाला उंदीर' आणि 'कुनीदेशातल्या कथा'

Submitted by सावली on 4 June, 2014 - 00:02

नुकतीच मनोविकास प्रकाशनानं ही माझी तीन लहान मुलांसाठीची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. खरंतर मला लिखाणाचा काही अनुभव नाही. लेकीला कथा सांगताना योगायोगानं मी त्या लिहून ठेवू लागले होते. त्या अाधी परीक्षेचे पेपर आणि टेक्निकल डॉक्युमेंटेशन यांव्यतिरिक्त काहीही लिहायची मला सवय नव्हती. पण या बालकथा मुलांना आवडल्या, काही मायबोलीकरांना अावडल्या आणि मग प्रकाशकांनाही अावडल्या. त्यामुळे मनोविकास प्रकाशनातर्फे माझी तीन बालकथांची चित्रमय पुस्तकं प्रकाशित होत अाहेत. या पुस्तकांत मुलांना अावडतील असे कॅरेक्टर स्टिकरही असणार अाहेत.

ही तीनही पुस्तकं मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहेत.

या पुस्तकांविषयी थोडंसं -

१. कापसाची म्हातारी -

Kapasachi Mhatari.jpg

मुलांना झाडं, पानं, फुलं यांच्याबद्दल उत्सुकता असतेच. त्यांबद्दल गोष्टी ऐकायलाही अावडतात. या पुस्तकातल्या निसर्गकथा मुलांचं कुतूहल वाढवून त्यांना निसर्गाच्या अधिक जवळ अाणतील असं वाटतं. कापसाची म्हातारी, पाण्याच्या थेंबानं केलेला प्रवास, पडणार्‍या तारकांना जाळ्यात पकडणारी परी, रुसलेले इंद्रधनुष्य अशा गमती असलेल्या बालकथा या पुस्तकात अाहेत. प्रत्येक कथेला साजेशी पानभर रंगीत चित्रं मुलांना नक्की भुरळ घालतील. अगदी लहान मुलांना चित्र दाखवत अाईबाबांनी किंवा शाळेतल्या दिदीनं वाचून दाखवण्यासारख्या किंवा नुकतंच वाचायला शिकणार्‍या मुलांना स्वत: वाचता येऊ शकतील अशा या कथा मुलांना अावडतील, असं वाटतं.

२. शिंगवाला उंदीर -

shingawala undir.jpg

निसर्गाबरोबरच मुलांना अाजूबाजूला दिसणार्‍या प्राण्यांबद्दलही खूप कुतूहल असतं. उंदीर, माऊ, बेडूक, मासे, कासव, चतुर, वाघोबा अशा प्राण्यांबद्दल असलेल्या या कथा मुलांना नक्कीच खदखदून हसवतील. या पुस्तकातही असणारी पानभर रंगीत चित्रं मुलांचं पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाढवत त्यांना पुस्तक हाताळायला, वाचायाला उद्युक्त करतील, असं वाटतं. या गोष्टी मुलांना अाईबाबा / दिदी यांच्याकडून ऐकायला किंवा स्वत: वाचायलाही सोप्या अाहेत.

३. कुनीदेशातल्या कथा -

Kunideshatalya katha.jpg

कुनी नावाचा एक काल्पनिक देश! या देशातल्या वेगवेगळ्या रंगाच्या तीन बेटांवर घडणार्‍या गमतीजमती सांगणार्‍या गोष्टी या पुस्तकात अाहेत. कुनी देशातले लोक, त्यांची भाषा , तिथल्या चालीरीती यांच्याबद्दलच्या वेगळ्याच मजेदार गोष्टी या पुस्तकात वाचता येतील. चंद्रावर जाणारे ससे, मावळायला विसरणारा सूर्य, जंगल सोनेरी करणार्‍या परीला मदत करणारी छोटी मुलगी - मोमो, हिमपर्‍यांना धडा शिकवणारी झाडं अशा अनेक गमती या पुस्तकात घडतात. या पुस्तकातल्या कथा थोड्या मोठ्या अाहेत. साधारण सातआठ वर्षांवरील मुलांना त्या स्वत: वाचता येऊ शकतील. लहान मुलांना आवडतील अशी पानभर सुंदर चित्रं या कथांना दृश्यरूप देतात.

या तिन्ही पुस्तकासाठी ऋजूता घाटे यांनी अतिशय सुंदर आणि गोंडस चित्रं काढलेली अाहेत. रंगीत चित्रं असली तर मुलांना पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण होतं अाणि ही चित्रं मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही आवडण्यासारखी अाहेत.

या पुस्तकांत गोष्टींचे शेवट सकारात्मक करण्याकडे माझा भर होता.

बर्‍याचजणांना प्रत्येक बालकथेतून काहीतरी शिकवण मिळायलाच हवी, दुष्ट विरुद्ध सुष्ट किंवा काहीतरी वाईट घडतं आणि मग कोणालातरी शिक्षा होते, असा एक साचा असायला हवा, अशा काही अपेक्षा असतात. ते मात्र मी टाळलेलं अाहे. काही कथांमधून झाडं, पाणी, प्राणी यांबद्दल माहिती मिळतेही. पण या कथा वाचून मुलांना निखळ अानंद मिळावा, हीच एक अपेक्षा होती अाणि अाहे. यांतल्या काही कथा मायबोलीवर प्रकाशित झालेल्या अाहेत. त्या मायबोलीकरांच्या ज्युनिअर गटाला अावडल्याही होत्या. मायबोलीच्या अाणि मायबोलीकरांच्या प्रोत्साहनामुळेच ही पुस्तकं प्रकाशकांपर्यंत पोहोचवण्याची हिंमत मी केली होती. अाता नव्या कथांसहित चित्रमय पुस्तकंही ज्युनिअर माबोकरांना अावडतील, असं वाटतं.

पुस्तकं वाचली / वाचून दाखवलीत की ज्युनिअर माबोकरांच्या प्रतिक्रिया इथे कळवायला विसरू नका.

***

ही तीनही पुस्तकं मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहेत.

१. कापसाची म्हातारी - https://kharedi.maayboli.com/shop/kapasachi-mhatari.html

२. कुनीदेशातल्या कथा - https://kharedi.maayboli.com/shop/kunideshataly-katha.html

३. शिंगवाला उंदीर - https://kharedi.maayboli.com/shop/shingawala-undir.html

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह सावली.. कसली क्यूट दिसत आहेत पुस्तकं.. आणी टिपिकल साचा नाही गोष्टींचा हे वाचून अगदी आत्ताच घ्यावीशी वाटताहेत.. घेईन लौकरच

तुझं खूप खूप अभिनंदन!!! Happy

मस्त सावली!! पुनश्च अभिनंदन!!
मी कालच मायबोलीवरून ही पुस्तकं मागवली आहेत.

वा, पुस्तकांची कव्हर्स तर खूपच मनमोहक दिसताहेत.

खास मुलांसाठी काढलेल्या या पुस्तकांकरता मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छाही .... Happy

सावली, अभिनंदन आणि शुभेच्छा!!!!!

पुस्तकांची कव्हर्स एकदम क्युट आहेत. लहान मुलांना पटकन आवडतील अशी Happy

सावली, मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा Happy
मुखपृष्ठं फारच सुरेख झाली आहेत. अगदी बघितल्याक्षणी पुस्तक उचलावेसे वाटेल.
ऑर्डर करते लवकरच.

पुस्तकांबद्दलचे लिखाण इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स.

ही पुस्तके प्रकाशित होण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे मायबोली. माझी पहिली बालकथा मी इथेच प्रकाशित केली होती आणि ती काही मायबोलीकरांना आणि ज्यु. माबोकरांनाही आवडली होती. त्यात असंख्य चुका होत्या पण तरिही इथे सगळ्यांनी त्याचे कौतुक केल्यामुळे सुधारणेला वाव आणि लिहिलेल्या कथा प्रकाशकांना दाखवायला हिंमत मिळाली. ( हे पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहीलेही होते पण मुलांच्या पुस्तकाला सहसा प्रस्तावना नसते त्यामुळे ती या पुस्तकातही आली नाही. ) त्यामुळे मायबोलीचे आणि मायबोलीकरांचे विशेष आभार. त्यांनी हुरुप वाढवला नसता तर या कथा मी प्रकाशकांना दाखवल्याच नसत्या. Happy
ही पुस्तके मुलांपुढे आणण्याची संधी दिल्याबद्दल मनोविकास प्रकाशन यांचेही मनःपूर्वक आभार.

Thank you so much!
पुस्तकं खूऊऊऊऊऊउप मस्त असणार आहेत याची खात्री आहे.
आईशी बोलून तिच्या शाळेसाठी बल्कमध्ये तिनही पुस्तकं खरेदी करेन पण शाळेने नाही म्हणल्यास माझ्या तर्फे द्यायला प्रत्येकी किमान एक तरी घेईनच.

सेनापती,
ही तीनही पुस्तकं मायबोलीच्य अखरेदीविभागातून विकत घेता येतील.
खरेदीच्या लिंका वर दिल्या आहेत.

सावली, मी तुझी पुस्तकं मागच्या वर्षीच घेऊन ठेवली होती.. (आमच्याकडे मुलांना महिन्याला साधारण ४-५ नवी पुस्तकं आम्ही देत असतो. आता हिवाळी सुट्टी म्हणून संख्या आधीच १२ वर गेलीये. शिवाय व्हरायटी असावी, म्हणूनही तीनही एकत्र नाही दिलीत. ) नुकतंच मुलांसाठी पहिलं(कापसाची म्हातारी) वाचायला काढलंय. दोघांनाही खूप्प्प्प्प आवडलंय. तेव्हा पुढच्या महिन्याअखेर तीनही पुस्तकांची रिव्ह्यु इथे लिहीन. व्यक्तिशः मला गोष्टीतल्या पात्रांची नावे खूप आवडली... धनुकला, थेंबुटला किती गोडड आहेत, किंवा किन्ना, स्पृहतारका ही नावेसुद्धा हटके असूनही मुलांना आकर्षित करून घेता येण्यासारखीच आहेत.

बर्‍याचजणांना प्रत्येक बालकथेतून काहीतरी शिकवण मिळायलाच हवी, दुष्ट विरुद्ध सुष्ट किंवा काहीतरी वाईट घडतं आणि मग कोणालातरी शिक्षा होते, असा एक साचा असायला हवा, अशा काही अपेक्षा असतात. ते मात्र मी टाळलेलं अाहे. >>>> यासाठी तुला जादूची झप्पी. कारण गोष्टी वाचून संपल्यावर नेहेमीचा तात्पर्यवाल्या प्रश्नाला बगल दिली गेली होती, पण तरी थोड्या वेळाने मुलाने स्वतःहून येऊन सांगितलं... "आई, या गोष्टीचं ताप्पय्य (तात्पर्य) सांगताना नवी गोष्टच सांगावी लागेल ना?" मला मस्स्त वाटलेलं. थँक्यु!

पुढची पुस्तके कधी येणार?

मायबोली खरेदी विभाग चालत नाहीये कां?

अवांतराबद्दल माफी असावी पण मला अशीच मुलांसाठीची काही पुस्तकं मागवायची होती.

Pages