मना घडवी संस्कार

Submitted by गंधा on 27 May, 2014 - 01:54

असं म्हटलं जातं की संस्काराच्या मजबूत पायावर युगपुरुष घडतात. शिवाजी, संभाजी, बाजी, तानाजी असे अनेक कीर्तिवान पुरुष संस्काराच्या भक्कम पायावर हिंदुंच राज्य उभं करू शकले. आज प्रत्येक पालक ‘संस्कार’ म्हणून काय शोधतोय? हे आपलं आपल्यालाच कळण कठीण झाल आहे.
शाळेच्या सुट्टीच्या महिन्यात संस्कार क्लासेसमध्ये आपल्या पाल्याला सुसंस्कारित करण्यासाठी आजचे पालक काही हजारांची बरसात करून निर्धास्त होतात आणि मग “अरे तिकडे ना लायब्ररीत संस्कारचे वर्ग चालू आहेत” असं ऐकमेकांना सांगताना दिसतात. संस्कारवर्गाच्या फीजचे आकडे ऐकले कि झोप उडते. सावंतबाई त्यांचा मुलगा चिंटूबद्दल सांगत होत्या, “अहो ऐकलत का विमलाताई, माझ्या चिंटूच्या संस्कार क्लासचं टाइमिंग इतक चेंज होत ना, की काय सांगू? त्याला पाठांतराला टाईम म्हणजे अगदी टाईमच पुरत नाही. त्याचे इतरही क्लासेस असतात आणि त्यात तो टायर्ड होतो बिच्चारा! स्कूलमधून घरी येईपर्यंत संस्कारांची वेळ झालेली असते मग काय तसाच तिकडे पळत-पळत जातो. त्यानंतर स्विमिंगचा क्लास. नंतर घरी येतो थकलेला. रात्री थोडावेळ टीव्ही पाहतो and हि स्लीप्स व्हेरी अर्ली. मग काय मी म्हणते, चिंटू, डू नॉट गेट शॉवर हं. आणि अहो तसाच जातो स्कूलला हरीमध्ये”. ही अशी पालकांची होणारी धावपळ खूप ठिकाणी पाहायला मिळते.
संस्कार म्हणून आपण नक्की काय शोधत आहोत?
“बेधुंद जगाच्या अंधकारी मिरवीत असे अज्ञान
अन मग, अज्ञानाचे फिरता वारे शोधीत असे संस्कार”

आजच्या युगात प्रत्येक मनुष्य हा संस्कार हे काहीतरी सोनाराच्या दुकानात काही ग्रेममद्धे मिळणारी वस्तू आहे, अशाच आविर्भावात त्याच्या अथक शोधात फिरताना दिसतो. इकडे सावंत बाई त्यांच्या मुलाच्या ट्युशनचं कौतुक करत असताना दुसरीकडे शेजारील दुकानात काम करणारा रामा हा त्याच्या मुलाला सुट्टीच्या दिवसात बरोबर घेऊन येत असे. त्याचाही मुलगा ९-१० वर्षाचा म्हणजे चिंटू एवढाच असेल वयाने.
असं वाटतं की आजकाल लोकांचा स्वतःवर विश्वास म्हणून राहिलाच नाही. काय ते सगळ स्टेट्सचं माप लावून अभ्यास, संस्कार विकत घ्यायचच ध्येय असतं ह्यांचं. काही सुशिक्षित आणि सुधारित म्हणवणाऱ्या मंडळींची बहुतेक हि कल्पना असते, की संस्कार हे सुट्टीच्या महिन्यांत आटपणारं शुल्लक काम आहे. त्यातूनच संस्कार या भूताचा मुगुटमणी मुलांच्या डोक्यावर चढविण्यासाठी पालकांमध्ये चुरस लागते. मग एखाद्या उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत कधीतरी एकदा हे काम आटपून टाकू म्हणजे झालं.
अशा मनस्थितीतिल सुशिक्षित पालकांचा अट्टाहास पाहता हसावं कि रडावं तेच कळत नाही. तिकडे तो रामा आपल्या मुलाला कामात मदत कशी करावी हे शिकवण्यासाठी दुकानात बरोबर घेऊन येतो. रामाला त्याच्या आयुष्यात जे महत्वाचे वाटतात असे संस्कार, रामा स्वतःच्या प्रत्येक कृतीतून पुढच्या पिढीत यावेत यासाठी सतत प्रयत्नशील दिसतो. दुकानांतील साफसफाई कशी करायची, गिऱ्हाईकांजवळ कसं बोलायचं याचे प्रशिक्षणरुपी संस्कार करताना पाहून गम्मत वाटते. रामाच्या आयुष्यातील गरजेची आणि म्हटलं तर महत्वाची अशी व्यावहारिक संस्कारांची पुंजी, रामा किती सहजपणे मुलाच्या हाती सोपवत होता ना? संस्कारांचे १-२ क्लास लावून मिळणाऱ्या विकतच्या संस्कारापेक्षा रोजच्या वागणुकीतून मिळणारी शिकवणूक आयुष्यात फार कामी येणारी होती. सावंतबाई डोक्याला पेन करून चिंटूच्या ट्युशन सांभाळण्यात गर्क असताना हा रामा मात्र आपल्या सुटसुटीत कामाच्या वेळेत मुलाला सुट्टीचा सदुपयोग करून घे बाबा! हे सांगत असतो.
रामासारख्या हातावर पोट असणाऱ्या म्हणजे अगदी (हैंड-टू-माउथ जीवन जगणाऱ्या) रोजचा पगार मिळेल तेव्हा चूल पेटेल इतकी सामान्य परिस्तिथी असणाऱ्या जनांना हि संस्कार नावाची काय चीज आहे हे माहित नाही. पण चांगली वागणूक म्हणून माणसाने सतत कष्ट करायला हवेत, मितभाषी असाव, रोज ब्राम्ह मुहूर्तावर उठावं हा साधा विचार, शिस्त या सदराखाली ती माणसं किती सहज देतात. पैशाचा सदुपयोग आणि वेळेचाही!
आज परदेशी आल्यावर आपणापैकी बरेचजण बेसिक वाटणारे पण काही महत्वाचे असे गुण अंमलात आणताना दिसतात. म्हणजे बाहेरून घरी आल्यावर हातपाय धुणे, किंवा रोज आई-बाबांना नमस्कार करणे. असे आणखी काही.... आता तुम्ही म्हणाल कि हे पूर्वी ठीक होतं. त्याकाळी सगळीकडे माती असल्यामुळे हातपाय धुणे हे गरजेचे असे.... पण आता विकसित देशात या साऱ्या गोष्टी रूढी, परंपरा (म्हणजेच ओल्ड फैशन) या संज्ञेत गणल्या जावू लागल्या आहेत. कोणी या विचारला पुष्टी देण्यासाठी म्हणेल कि आज इथे रस्त्यावरचा कचरा कधी पायाला लागतो का किंवा मातीचे रस्ते कुठे पहायला मिळतात? शिवाय मंडळी म्हणतील आमच्या पायात सतत बूट असतात आणि तसंही इथे घरात आलेली धूळ, जीवजंतू कार्पेटवर दिसतात कुठे? पण आपला हा गोड गैरसमज चुकीचा आहे असं नाही का वाटत? परदेशातील अनेक लहान मुलांच्या स्कीन अलर्जीचे कारण कार्पेट वरील धूळ असं सांगितलं जातं. तसच फळ, भाजीपाला हा दुकानाच्या बंद फ्रीजमध्ये असूनही आपली आई ते घरी आणल्यावर वापरण्यापूर्वी धुतेच की.... कधी विचारलय का आपण तिला की... ती असं का करत असेल?
दुसरी गोष्ट म्हणजे आई-बाबांना नमस्काराची. “मातृदेवो भव, पितृदेवो भव” ह्या वचनाप्रमाणे ज्यांनी आपल्याला हे जग पाहण्याची संधी दिली आणि चिमुकल्या जीवाचे प्रेमाने संगोपन केले म्हणून आपण त्याची जाणीव व कृतज्ञता ठेवण्यासाठी त्यांना नमस्कार करण्याची सवय लावणे गरजेचे नाही का?
असो, सुज्ञास अधिक सांगणे न लगे. पण खरच संस्कार म्हणजे नक्की काय? योग्य आचार-विचार, गुण-अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार? की जीवनात मनाला कधीही अहंकाराची बाधा होऊ न देता विनम्र असणे म्हणजे संस्कार? आपली कथा त्या कस्तुरी मृगासारखी तर झाली नाही ना? म्हणजे स्वतःकडे कस्तुरी असूनही त्याची जाणीव मात्र आपल्याला नाही. संस्कार शोधायला गेल्यावर, हाती नक्की काय लागतं हे मोठ प्रश्नचिन्ह आहे.
मला आठवतं आमच्याकडे सकाळी आंघोळ केल्यावर १२ सूर्यनमस्कार घातले नाहीत तर सकाळचा नाश्ता मिळत नसे. आजी म्हणत असे सूर्यनमस्कारामुळे शरीर लवचिक आणि कणखर बनण्यास मदत होते. संध्याकाळचा परवाचा का म्हटला जातो, याचा आज विचार करता असं जाणवत कि तिन्हीसांजेचा परवाचा म्हटल्यानंतर घरचं वातावरण प्रसन्न होतं आणि मनसुद्धा एकाग्र होऊन गृहपाठ चांगल्या प्रकारे होतो. अशा ह्या जडणघडणीमुळे नित्यपाठाचे धडे आम्हाला घराच्या ओसरीवरच अगदी सहज मिळत असत.
आज पालक आपल्या मुला-मुलींना जिम व स्विमिंगला जाण्याची सक्ती करतात. तसेच काम्युकेशन, लीडरशिप आणि प्रेझेंटेशन स्कील अशा साऱ्या क्लासेस मधील गोष्टी व्यक्तिमत्व विकास (पर्सन्यालेटी डेव्हलपमेंट) म्हणून आजची पिढी स्वीकारत आहे. ह्या साऱ्याला संस्कारांचं बदलतं स्वरूप म्हणायचं का?
संस्कारांनी मनावर योग्य परिणाम होतात. आयुष्य समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी मदत होते. जसं एखाद्या रत्नाला पैलू पाडल्यानंतर ते रत्न पूर्वीपेक्षा तेजस्वी होतं किंवा एखाद्या चित्रात रंग भरत गेल्यावर ते जसं उठावदार आणि सुंदर दिसतं, तसं संस्कारांचा मनावर असामान्य परिणाम होउन दिव्य तेजाचा उदय होतो. शेवटी निरोगी, सात्विक, धर्मशील आणि सामर्थ्यवान पीढी घडवणे हेच तर असते संस्कारांचे ध्येय, नाही का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटले.आजकाल मुले म्हणजे गुण मिळवण्याचे मशीन झाले आहेत.मुलांना नाही हे पटतच नाही.त्यांना हे पटवुन देण्यात पालक कमी पड्तात्.आणि शिस्त म्हणाल तर शुन्य मला नेहमी विचार पडतो ४ तास शाळेत शिस्तीत वागणारी मुले घरी दिवस दिवस धिंगाना का घालतात्?याचा अर्थ घरातले संस्कार कुटेतरी कमी पडतात.

गंधा,
चांगलं लिहिलंय, विचारमंथन आवडलं.

संस्कार ही कुठल्या क्लासला जाऊन शिकायची गोष्ट आहे असे मला तरी वाटत नाही. ते घरातल्या माणसांच्या वागण्या-बोलण्यातून मुल उचलत असतं. मात्र आपण जे मुलांना करायला सांगतो किंवा करु नये असे सांगतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या कृतीत दिसावी लागते कारण मुलं अनुकरणप्रिय असतात व पालकांचे वागणे, बोलणे तसेच्या तसे उचलतात, तेच योग्य असे त्यांना वाटत असते, लहान असताना तरी. आपण मुलांना खरे बोलावे असे सांगतो पण घरी अमक्या-अमक्याचा फोन आला तर मी नाहिये असं सांग असे मुलांदेखत झाले की आपल्या वर्तणूकीतील विरोधाभास मुलांवर परिणाम करतो. मान्य आहे की व्यावहारीक जगात अगदी १००% खरेपणाने रहाणे शक्य नाही, पण आपण खोटे का बोललो याचे कारण मुलाला पटवून सांगायचा प्रयत्न करावा, उदा. कुणाला वाईट वाटू नये म्हणून, त्रास होवू नये म्हणून खोटे बोलले जाते, तेव्हा त्या माणसाच्या मनाचा विचार केला म्हणून खोटे बोललो किंवा आपल्या खोटे बोलण्यामुळे दुसर्याला त्रास/अडचण होणार नाही याचा विचार करून बोलावे असे आपण मुलांना पटवून देवू शकतो.

एकत्र कुटुंबात किंवा कमीत कमी आजी-आजोबांच्या सहवासात वाढलेली मुले संस्कारक्षम असतात असे आढळते, भावंडांशी एकत्र खेळणे, वाढणे यामुळे तडजोड, समजूतदारपणा अंगी बाणला जातो.

आपण उल्लेख केलेल्या काम्युकेशन, लीडरशिप आणि प्रेझेंटेशन स्कील वा व्यक्तिमत्व विकास या बाबीं मात्र मुलाच्या प्रोफेशनसाठी पूरक ठरतात व त्या व्यावसायिक पातळीवर तरी आवश्यक आहेत असे वाटते.

गा पै- हो मी ती वेबसाईट पहिली आहे.

सिमा२७६ – धन्स

आशिका- धन्स...
पण आज काम्युकेशन, लीडरशिप आणि प्रेझेंटेशन स्कील वा व्यक्तिमत्व विकास या बाबींचच खुप अवडंबर माजलंय.
बुद्धीचा विकास होणं हि एक प्रक्रिया आहे. यात हे कोर्सेस पूरक आहेत पण संस्कारांशिवाय अपुरे आहेत.

गन्धा

धन्स>>>धन्यवाद + थँक्स्=धन्स

माबोवर स्वागत Seema२७६...

लेखविषय सुंदर

रामाची कथा वाचून मला आमच्या पेपरवाल्या काकांची आठवण झाली.मुलगा लहान आहे.शाळेत जातो.उन्हाळ्याची सुट्टी आहे.तर त्याला पहाटे चारला उठवतात.पेपर-गट्ठे उतरवून घेणे,सॉर्ट करणे,पुरवण्या लावणे,पॅम्फ्लेट्स टाकणे,मुलांना मॅनेज करणे असं सगळें शिकवतात.मुलगा हुशार आहेच पण त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 'हे माझे व्यावहारीक संस्कार आहेत" असं म्हणतात. खरतर घरातले लोकच चांगले संस्कार करू शकतात.बाहेर शिबीरात धाडण्यापेक्षा,जरा मुलांना वेगवेगळे विषय,कथा,अनुभव सांगितले तर मुलं जास्त समरसून समजतात आणि आपल्या पालकांच्या जवळदेखील येतात.तसेच त्यांना त्यांचा अभिमानपण वाटू लागतो.

लेख संदर्भ छान आहेच.लेखही व्यवस्थित मांडला आहे.लेखाचा उत्तरार्ध जास्त आवडला.

शुभेच्छा
ध!