लिखाण

Submitted by मित्रहो on 15 May, 2014 - 12:20

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.”

पुलंची ही वाक्ये वाचनात आली आणि मी भारावून गेलो. ठरवले आपण सुद्धा कुठल्या तरी कलेशी मैत्री जोडावी. कुठलीतरी कला आत्मसात करावी पण कुठली कला हा फार मोठा प्रश्न होता. गाणे शिकावे म्हटले तर मला माझ्या गाण्याची पट्टी चांगली ठाउक होती. ‘सा’ लागल्याशी मतलब तो खालचा की वरचा असल्या भानगडीत कधी मी पडलो नाही. तेंव्हा माझे गाण्याशी नाते फक्त ऐकण्यापुरते हे मी पुरते जाणून होतो. बर चित्रकलेविषयी तर बोलूच नका. मला माझी चित्रकला म्हटली कि ती हत्ती आणि चार आंधळ्यांची गोष्ट आठवते. शाळेत असताना चित्रकला हा विषय होता म्हणून चित्रे काढावी लागायची. तेंव्हा एखादे चित्र काढावे आपल्या मित्रांना दाखवावे तर एक म्हणायचा घोडा, एक गाढव, कुणी हरीण तर कुणी चक्क उंदीर. असे काही झाले की मनात शंका यायची मी खरच कुत्राच काढायला घेतला होता ना. हे आमचे असले कलादिरिद्री लक्षण. असा मनुष्य काय कुठल्या कलेची जोपासना वगेरे करनार.

बराच विचार केल्यानंतर मी ठरविले आपण लिहायला घ्यायचे. हि सर्वात सोपी कला आहे कारण यात वाचनाऱ्याची प्रतिक्रिया तुम्हाला प्रत्यक्षात दिसत नाही. तेंव्हा माझ्यासारख्या कलादरिद्री मनुष्यासाठी जगन शिकायचा तोच उत्तम उपाय होता. मग लिहायच तर काय लिहायच? कशा प्रकारचे लिखाण मी लिहायला हवे? हल्ली दोनच प्रकारच्या लिखाणाची चलती आहे, एक पाककलेचे आणि दुसरे चेतन भगतचे. मी दोनही प्रकारात मोडत नाही. बर शाळा कॉलेज्यातल्या अभ्यासक्रमात रोमांस वगेरे कधी शिकवले नाही त्यामुळे तो रोमांस, प्रेम कशासी खातात काही कल्पना नाही. तेंव्हा त्या रोमँटीक कविता आपल्या नशीबी नाही हे लक्षात आले. आमच्या सारख्याच आयुष्य हे असे

रोज सकाळी उठावे, दात घासावे, नुसता डीओ न मारता आंघोळ करुनी ऑफिसाशी जावे|
खरड खरड खरडावे, भरड भरड भरडावे, वर्षाकाठी मिळनाऱ्या चार टक्क्यांसाठी मर मर मरावे|
गचके सोसावे, धक्के खावे, त्या गचक्यात नि धक्क्यात तिच्या भाजीचे विसरावे|
तिने रुसावे, मी हसावे, आणि मग फॅशन टिव्ही न लावता ती तिथे तर मी इथे निजावे |

असल आयुष्य जगनाऱ्या माझ्यासारख्याच्या मनात समाजाविषयी चीड वगेरे निर्माण होणे शक्यच नाही तेंव्हा तो बंडखोर वगेरे कवी होणे काही शक्य नाही. बर आमच्या घरात अठरा विश्वे दारिद्र वगेरे काहीच नव्हते, तोंडात चांदीचा चमचा टाकलेली गर्भश्रीमंती जरी नसली तरी चांगल रोज दोन वेळेचे गिळायला मिळत होता, अंग झाकेल एवढा कपडा मिळत होता. ना आम्ही पेपर टाकला की ना भाजीची गाडी चालवली ना कुणाच्या गाड्या पुसल्या. असल्या कुठल्या यातना उपभोगायला नाही लागल्या तरीही मी काही ‘जेथे कर माझे जुळती’ असे म्हणावे असला कुठला पराक्रम केला नाही. तेंव्हा असल्या चरीत्राचा माणूस आत्मचरीत्राच्या लायकीचा नाही हे मला पक्क ठाउक होत. आत्मचरीत्र नाही तर स्वतःच्या अऩुभवांविषयी काही लिहावे असा विचार केला. चांगली पाच पन्नास पाने लिहीली सुद्धा. पण कालच माझ्या वाचनात आले की मोनिका लेंव्हनस्की पण तिच्या अनुभवाविषयी लिहीणार आहे म्हणून. बोंबला, आता ती जर का तिच्या अनुभवाविषयी लिहीणार असेल तर आमचे अनुभव कोण वाचनार. तेंव्हा काय लिहावे हा प्रश्न अनुत्तरीतच होता.

मग या महाजालात सर्च मारला. येथे लोक काय वाट्टेल ते अगदी सहजच लिहून जातात. हा प्रकार आवडला आपल्याला. आपल्याला वाटेल ते लिहायचे वाचनाऱ्याला आवडेल ते तो वाचनार, परत ती प्रकाशक नावाची मधली नोकरशाही नाही वाचकांशी थेट संवाद, थेट प्रश्नाला थेट उत्तर.

मग मी पण मित्रहोचा प्रपंच सुरु केला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users