आनंदवनातल्या मुलामुलींशी पत्रमैत्री

Submitted by चिनूक्स on 13 May, 2014 - 00:58

बाबा आमट्यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाबद्दल नव्यानं माहिती देण्याची गरज नाही. बाबांनी वसवलेल्या आनंदाच्या या वनात अनेकांना त्यांच्या आयुष्याचं सुख गवसलं आहे. या आनंदवनात आणि महारोगी सेवा समितीच्या सोमनाथ प्रकल्पात सध्या २५० - ३०० मुलंमुली राहतात. आनंदवन हेच त्यांचं हक्काचं घर आहे.

या मुलामुलींना आनंदवनात आणि सोमनाथला प्रेम, आपुलकी, मैत्री मिळत असली, तरी बाहेरच्या जगातही त्यांचे मित्र, किंवा नातलग असावेत, अशी इच्छा आहे. याचं कारण असं की, यांपैकी काही मुलंमुली अनाथ आहेत. काहींना एकटे पालक वाढवत आहेत. काही मुलामुलींना आनंदवनातल्या रहिवाशांनी दत्तक घेतलं आहे. अनेकांच्या पालकांना त्यांच्या कुटुंबांनी कुष्ठरोगामुळे किंवा अपंगत्वामुळे घराबाहेर काढल्यानं हक्कानं आजी-आजोबा-मामा-आत्या अशी हाक मारता येईल, अशा व्यक्ती नाहीत. काहींचे पालक अंध किंवा मूकबधिर आहेत, तर काहींचे अशिक्षित. त्यामुळे पालकांशी संवाद साधणं, हीदेखील समस्या आहे. या मुलामुलींनी आनंदवनातच त्यांची नाती निर्माण केली असली, आनंदवनवासीयांनी या मुलामुलींना जिव्हाळ्यानं वाढवलं असलं, तरी आनंदवनाबाहेरची नातीही त्यांचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर, समृद्ध करतील, असं आम्हांला वाटतं.

त्या दृष्टीनं मायबोलीकरांच्या मदतीनं एक उपक्रम सुरू करावा, अशी इच्छा आहे. आपल्यापैकी अनेकांचे पूर्वी पत्रमित्र होते. उत्तम शाईच्या पेनानं आपण पानंच्या पानं भरून पत्रं लिहीत असू. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी, गमतीजमती त्यांना कळवत असू.

आनंदवनातल्या या मुलामुलींचे मित्र बनून, किंवा त्यांच्याशी आजोबा-आजी, काका-मामा-मावशी-आत्या असं नातं जोडून तुम्ही त्यांना पत्रं लिहिलीत तर त्यांना खूप आनंद होईल. तीही तुम्हांला पत्रांतून उत्तर देतील. तुमचं जग आणि त्यांचं जग पत्रांच्या माध्यमातून एकत्र यावं, त्यांना आनंदवनाच्या बाहेरही आप्त आणि सुहृद लाभावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे.

सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. तुमच्याशी पत्रातून संवाद साधू शकतील, अशी ५-१८ या वयोगटातली पन्नास मुलंमुली आनंदवनात आहेत. या उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ इच्छित असाल, तर कृपया या बाफवर तसं लिहा. लवकरच मुलामुलींची नावं इथे आम्ही लिहू, आणि तुम्ही त्यांना पत्रं लिहू शकाल.

या उपक्रमातून तुम्हांलाही आनंदच मिळेल, याची आम्हांला खात्री आहे.

धन्यवाद.

- डॉ. शीतल आमटे, चिनूक्स (चिन्मय दामले), रार (आरती रानडे)

एक महत्त्वाचं - या उपक्रमातून तुम्ही आनंदवनातल्या मुलामुलींना आर्थिक मदत करावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. तशी मदत करायची असल्यास कृपया महारोगी सेवा समितीच्या शिक्षणविभागाशी संपर्क साधावा. हा उपक्रम केवळ पत्रं लिहिण्यापुरताच मर्यादित आहे.

त्याच अनुषंगाने अजून एक. कुठलाही गैरसमज करून न घेता तुम्ही हे वाचाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही लिहिलेलं पत्र कदाचित तो मुलगा / मुलगी आपल्या वर्गात वाचून दाखवू शकेल, हे कृपया ध्यानात असू द्या. Happy हे लिहिण्यामागे तुमच्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र अजाणतेपणी असं होऊ शकतं, म्हणून केवळ हे लिहिलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उपक्रम. मुलांनी पत्रे लिहिले तर चालतील का ह्याचे उत्तर मिळालेले दिसले नाही की माझे हुकले ते वाचायचे?

सुनिधी आणि सावली, मला वाटते चालेल. वर चिनुक्सला विचारले होते की मुलीने इंग्रजीमध्ये पत्र लिहीले तर चालेल का? त्याचे उत्तर त्याने हो असे दिले आहे.

सुनिधी: मोठ्या माणसांसोबत छोट्या मुलांनी पत्रे लिहिलीत तर अधिक उत्तम. त्याने खरी मैत्री वाढेल व मुले आपसात connect करू शकतील

मलाही आवडेल या उपक्रमात सहभागी व्हायला. त्या निमित्ताने बंद पडलेले हस्तलेखनही पुन्हा नव्याने चालु होइल Happy

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वल आभार Happy

लहान मुलांनीही पत्र लिहायला हरकत नाही. इंग्रजीतही लिहिली तरी चालेल. पण त्या इंग्रजी पत्राबरोबर तुम्हीही एक पत्र लिहावं, त्या इंग्रजी पत्रात काय लिहिलं आहे, ते मराठीत लिहू शकाल का? म्हणजे मुलं इंग्रजीतल्या पत्राला बिचकणार नाहीत, आणि तुम्हां दोघांनाही उत्तर पाठवतील.

परदेशातल्या मायबोलीकरांकडून मिळालेला प्रतिसाद मस्त आहे. परदेशातून आलेल्या पत्रांना उत्तरं कशी द्यायची याची चाचपणी आम्ही करत आहोत. सोय, उपलब्ध मनुष्यबळ, खर्च या सगळ्यांचा अंदाज घेऊन, स्थानिक पोस्टऑफिसाशी संपर्क साधून इथे आठवडाभरात लिहिलं तर चालेल का? Happy

चांगला उपक्रम आहे. एक सुचवावेसे वाटते -
जे लोक पत्रं लिहायला उत्सुक आहेत त्यांनी त्यांची आवश्यक ती वैयक्तिक माहिती संस्थेकडे देणे बंधकारक करावे. 'आवश्यक ती' म्हणजे कोणाला उगीच फालतुगिरी करायला वाव मिळणार नाही अशी.

याबाबत टीमने विचार केला असेलच.

मलाही या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. मी भारतात राहत नसल्यामुळे मला ई-मेल चा पर्याय सोयीस्कर आहे. खूप सुंदर उपक्रम आहे.

मी पण या उपक्रमात सहभागी होऊ इच्छितो.
या पत्र मधेय मी खूप मनोरंजक आणि उपयोगी माहिती त्यांच्या सोबत शेयर करेल. मी आत्ता पासूनच कामाला सुरवात करून ठेवतोय

वरदा.. त्या २०१२ सालच्या बातमीचे पुढे काही झाले ते कळत नाही. माझ्या पुण्यातल्या एका मित्राच्या आईने संक्रांतीचे तिळाचे लाडू पोस्टाने नायजेरियाला पाठवले होते, ते व्यवस्थित मिळाले... पण दिवाळीला.

प्रिंटचा खर्च जास्त वाटत असेल तर स्कॅन केलेली पत्रे एखाद्या मोबाईल फोनवरती सेव्ह करून नेता येतील.

मुलांनी देशात कुणाकडे पत्रे पाठवली तर ती स्कॅन करून इमेलवर परदेशात पाठवता येतील. जेणेकरून परदेशी पत्र पाठवायचा खर्च वाचेल. आणि त्या त्या व्यक्तींची/ त्यांच्या मित्रमंडळींची देशात चक्कर झाली की ती ती पत्रे त्यांना प्रत्यक्ष मिळतील.
स्कॅन करून इमेलवर पाठवणे हे तिथूनही शक्य आहेच पण पुण्या मुंबईतून पत्रे कलेक्ट करणे हे कदाचित परदेशातून येणार्‍या व्यक्तीसाठी सोयीचे असेल. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीच स्कॅन करून मग ती पत्रे पुण्यामुंबईत कुणाकडे तरी पाठवून ठेवू शकता.
अर्थात तुमच्या सोयीने जे योग्य असेल ते.

तूर्तास अक्षर सुधारेपर्यंत मी यामधे मदत करायला तयार आहे. आलेली पत्रे स्कॅन करून इमेल करायची आणि मग परदेशातल्या लोकांची व्हिजिट होईल त्याप्रमाणे ती त्यांना द्यायची किंवा नुसतीच जमा करून परदेशातले लोक येतील तेव्हा त्यांना द्यायची या दोन्हीपैकी काहीही मला जमू शकेल.

मी उत्सुकतेने गूगल करून बघितले असता अंगोलामधे ६० पोस्ट ऑफिसेस सध्या चालू आहेत >> +१

नायजेरियाच्या पोस्टाची तर चक्क वेबसाइटसुध्दा आहे Happy

ज्यांना इमेलवरुनच भारतात पत्र पाठवायची आहेत त्यांच्यासाठी एक सोय भारतीय पोस्ट ऑफीस करुन देते. इ-पोस्ट
http://indiapost.nic.in/
आपण पाठवलेले इमेल भारतातील डेस्टीनेशनला प्रिंट करुन पोहोचवले जाते.
ही सर्विस वापरुन पाहीली नाहीये. शिवाय त्यात मराठी पत्र पाठवलं तर प्रिंट होईल का वगैरे गोष्टी प्रत्यक्ष वापरुनच बघाव्या लागतील

आनंदवनातुन परदेशी पत्र पाठवण्यासाठी स्टँप लावलेले / पोस्टेज पेड केलेले लिफाफे वगैरे आपल्याकडुन देता येऊ शकतील का?

स्टँप लावलेले / पोस्टेज पेड केलेले लिफाफे >> कल्पना चांगली आहे पण कसे मिळवणार? भारतातील स्टँप परदेशात नाही मिळणार. आणि परदेशी स्टँप भारतीय पोस्ट नाही स्वीकारणार (असं जनरली वाटलं नसेल तर सांग)

मलापण यामधे भाग घ्यायचा आहे. लिहायची सवय पूर्णपणे गेली आहे. पण मराठीत टाईप करून त्याची प्रिंटआउट पत्र म्हणून चालेल का?

भारतातून या छोट्या मित्रांनी इमेल / स्कॅन करून मला उत्तर पाठवले तरी चालेल. पोस्टाच्या खर्चाच विचार करता. पण मला यामधे सहभागी व्हायचं आहे.

< मराठीत टाईप करून त्याची प्रिंटआउट पत्र म्हणून चालेल का?>

नक्की चालेल. Happy

सावली, अमित, नीरजा
लवकरच उत्तर देतो.

मस्त उपक्रम आहे. लेकीला (८ वर्षे वय) खुप आवडेल पत्र लिहायला. लेक जर पत्र लिहीणार असेल तर तिचा पत्र मित्र / मैत्रीण साधारण कोणत्या वयोगटातील असेल?

Pages