६ व्या मजल्यावरील खिडकी

Submitted by vt220 on 9 May, 2014 - 14:10

खिडकी – जगापासून अलिप्त राहून जगाचं निरीक्षण करण्याची जागा!

माझं लहानपण बैठ्या घरात गेलेलं. घराला खिडक्या होत्या पण बाहेरचं जग अगदीच नजरेच्या टप्प्यात होतं. खिडकीचा अलिप्तपणा तितकासा नव्हता. २००१ साली आम्ही दहिसरला ६व्या मजल्यावरील घरात राहायला आलो आणि खिडकीची एक वेगळी मजा कळली.
सुरुवातीला दहिसर नदीचं, मावळत्या सूर्याचं, मावळत्या सूर्याच्या प्रकाशात स्वत:चं दैवी अस्तित्व दाखवणारी चर्चची इमारत, चर्चच्या कॉलेजच्या आवारातील छोटंसं शहरी जंगल यांचं दर्शन घेण्यातच कित्येक सकाळी आणि संध्याकाळी गेल्या. उंचावरल्या “व्हँटेज” पॉईंटवरून जग पाहण्यातली मजा काही औरच होती. नदीपल्याड काही झोपडीवजा घरं आहेत. तिथली लहान मुलं नदीच्या सुकलेल्या पात्रात खेळतात, पतंग उडवतात. नदी काठावरच्या वस्तीत सारे सण वेगळ्याच धामधुमीत साजरे व्हायचे आणि अजूनही होतात. घराजवळच्या शाळेबाहेर पालकांची आणि चिमुकल्या मुलांची लगबग चालू असते. पावसात तर चिमुकल्या रेनकोट घातलेल्या मुलांची लगबग बघण्यात मनाला एक वेगळीच शांतता वाटते. एखाद्या शांत दुपारी कॉलनिबाहेरच्या वर्दळ नसलेल्या म्युनिसिपल रस्त्यावर नजर टाकली तर एखादे कॉलेज युगुल गुलुगुलू करताना दिसतं. त्यांना ६व्या मजल्यावरून कुणी पहात असेल ह्याची कल्पनाही नसते आणि पर्वाहि! त्यांची कुजबुज जरी ऐकू आली नाही तरी नवाळीच्या प्रेमाचं लाजरेपण दिसतं. पण कधी चुकून नव्या युगाच्या ओंगळवाण्या प्रेमाचं दर्शन देखील होतं. मग खिडकीच बंद करून टाकते.
शहरात राहून नदी आणि नदीवरचा पूर ह्याची कल्पनाच कधी नव्हती. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचं दृश्य पहिल्यांदा ह्या ६व्या मजल्यावरच्या खिडकीतून बघितलं आणि त्याची मजा समजली. पण मग ह्याच नदीचं २००५ सालातलं रौद्र रूपसुद्धा ह्याच ६व्या मजल्याच्या खिडकीतून बघितलं. खिडकीचा अलिप्तपणा तेव्हा पहिल्यांदा जाणवला. २६ जुलैच्या दिवशी मी ऑफिसमधेच रात्र काढली होती. २७ जुलैला सकाळी घरी जाताना प्रलयाच्या खुणा बघितल्या पण प्रलयाचा अनुभव मिळाला नव्हता. एक दोन आठवड्यानंतर परत खूप पाउस पडला. प्रलयाच्या आठवणी ताज्या असल्याने अख्खी मुंबई घरीच राहिली होती. नदीला पुन्हा पूर आला होता. ६व्या मजल्याच्या खिडकीतून पूर दिसत होता. उन्हाळ्यातल्या काळपट नाल्याचा ५० फुट रुंदीचा वाहता तांबड्या पाण्याचा जलरस्ता झालेला दिसत तर होता पण जाणवला नाही. मग खाली उतरून आम्ही बघायला गेलो आणि पाण्याची रौद्रता पहिल्यांदाच जाणवली. खरं तर तोवर आयुष्यात मला कधी पाण्याची भीती वाटली नव्हती. पण तेव्हा ते प्रचंड वेगाने वाहणारं पाणी पाहून खरोखरच धडकी भरली. पाण्याच्या आवाजाच्या वर हृदयातली धडधड जाणवत होती. तो दिवस २६ जुलै नव्हता पण त्या प्रवाहाकडे बघून २६ जुलैला कसा हाहाकार माजला होता असेल ह्याची जाणीव झाली. बाजूने धोधो वाहत, मार्गात आलेल्या सगळ्या छोट्या-मोठ्या वस्तूंना प्रचंड वेगाने स्वाहा करत जाणारी नदी उगीचच आपल्या दुबळेपणाची जाणीव देऊन गेली.
हळूहळू नव्याची नवलाई संपली. घरात नवीन वहिनी आणि मग भाची आली. स्वत: मी ऑफिसच्या कामात व्यस्त होते आणि कामानिमित्त मुंबईबाहेर येजा झाली. खिडकी मागे पडली. मधल्या काळात बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे मी एका पक्षीदर्शन सहलीला गेले. सुंदर सुंदर पक्षी बघताना मागे हरवलेल्या निसर्गाला नव्याने भेटले. घरी परत आल्यावर आजूबाजूचा निसर्ग नव्याने पाहायला शिकले. निसर्गाने पण निराश नाही केलं. वसंतातली नव्या पालवीने नटलेली झाडं, उन्हाळ्यातला रखरखाट आणि त्या रखरखाटातही नजरेला थंडावा देणारा भगवा-लाल गुलमोहर, पिवळाजर्द बहावा, पावसाळ्यातली धुऊन साफ केलेली हिरवाई आणि हिवाळ्यातला शांत निरव सूर्यास्त. निसर्गाची वेगवेगळी रुपं खिडकीने दाखवली. कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, पोपट हे नेहेमीचे पक्षी बघता बघता बुलबुलचा शोध लागला. एके सकाळी एका नव्या पक्षाने आपल्या कूजनाने कुतूहल जागवलं. ह्या खिडकीतून त्या खिडकीतून शोध शोध शोधल्यावर अचानक इमारतीखाली असलेल्या पिंपळावर दयाळ दिसला. त्याचं शेपूट उडवत ह्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणं भारी आवडलं. काही दिवसांनंतर एका दूरच्या झाडावर डोक्यावर लाल ठिपका असलेला एक चिंटूकला पक्षी दुर्बिणीत दिसला. इंटरनेटवर शोधाशोध केल्यावर वाटलं बहुतेक शिंपी असावा. त्याच भ्रमात काही दिवस गेले. अचानक एक दिवस भाऊ पिंपळावर विराजमान झालेले दिसले आणि साक्षात्कार झाला हा तर तांबट. पुढल्या जानेवारीत तर मजाच झाली. पिंपळाला भरपूर फळं आली आणि बाप रे! पिंपळ तांबट पक्ष्यांनी भरून गेला. प्रत्येक फांदीवर एक दोन. मधेच पुकपुक कि टुकटूक करत आपली गिरणी चालवत बसलेले. बरोबरीने पिवळ्या रंगाच्या हळद्याला पण घेऊन आले. हळद्या मात्र थोडा लाजाळू आहे, कधी कधीच दिसतो. मधल्या काळात कोतवालाने पण आपली हजेरी दिली. त्याची उडून जाता जाता परत फांदीवर परतण्याची सवय आणि वेगवेगळ्या आवाजातल्या साद घालण्याचं निरीक्षण करण्यात काही दिवस गेले. एके सकाळी रस्त्याच्या कडेच्या झाडावर सूर्यपक्षांनी घाला घातलेला दिसला. बारीक रंगीत कागदाच्या कपट्यासारखे उडणारे सूर्यपक्षी अचानक कुठनं आले. खरं तर हे सगळेच पक्षी अचानक कधी आले आणि इतक्या वर्षात मी त्यांना पाहिलं कसं नाही ह्याचं खरच आश्चर्य वाटतं. आता लिहिता लिहिता अचानक लक्षात येतंय हि तर खिडकीचीच देण आहे! मुंबईत भर रस्त्यावरून जाताना मधेच थांबून झाडं न्याहाळण्याइतकी काही मी निबर पक्षीनिरक्षक झालेले नाहीय. रस्त्यावरचा सतत वाहता प्रवाह, पादचाऱ्यांची वर्दळ पक्षीनिरीक्षण करण्यासाठी बिलकुल अनुकूल नाही. खिडकीचं स्थैर्य, शांतता, अलिप्तता आणि सगळ्यात महत्वाची ६व्या मजल्याच्या खिडकीची उंची म्हणजे पक्षीनिरीक्षणासाठी एकदम उत्तम जागा आहे.
रोजच्या रामरगाड्याला कंटाळून सुट्टी घेऊन आपण निसर्गाच्या सानिध्यात पर्यटन करावयास जातो. पण निसर्ग तर आपल्या आजूबाजूला सगळीकडेच आहे. आयुष्याच्या वर्दळीच्या रस्त्यावरून धावतपळत दिनचर्या करताना मधेच कधी थोडं थांबून अशी एखादी अलिप्तता देणारी खिडकी उघडावी आणि आयुष्याकडे नव्या नजरेने पहावं. जाणवेल जीवन किती सुंदर आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्याच्या वर्दळीच्या रस्त्यावरून धावतपळत दिनचर्या करताना मधेच कधी थोडं थांबून अशी एखादी अलिप्तता देणारी खिडकी उघडावी आणि आयुष्याकडे नव्या नजरेने पहावं.>>>>>> हे खुप भावलं.

सुंदर लेख.

पक्ष्यांच्या बाबतीत अगदी असेच होते, ते असतात आपल्या आजूबाजूला पण आपल्याला 'नजर' नसते आणि ती 'नजर' असा कसलासा कोर्स किंवा वर्कशॉप केल्यावर आपल्याला मिळते आणि अचानक सगळे पक्षी आपले अस्तित्व जाणवून देतात.

आवडले लिखाण Happy

हर्पेन, मृदुला, निलुदा अभिप्रायाबद्दल धन्यवाद. सॉरी धाग्यावर परत येऊन बघितलच नाही.
किरण पुरंदरे यांच्या पुस्तकांचे परीक्षण आणि त्यांचे काही लेख लोकसत्ता मध्ये वाचले आहे. छान लिहितात ते.
मधल्या काळात भारद्वाज बघितला. कधी सकाळी सकाळी आवाज ऐकू येतो. एवढा मोठा पक्षी मुंबई शहरात आजूबाजूला पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. Happy