श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ९ - माऊलीविरचित भक्त लक्षणे ..

Submitted by पुरंदरे शशांक on 28 April, 2014 - 01:30

श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ९ - माऊलीविरचित भक्त लक्षणे ..

तयांचें आम्हां व्यसन | ते आमुचें निधिनिधान | किंबहुना समाधान | ते मिळती तैं ....
अर्थात - माऊलीविरचित भक्त लक्षणे ......

तो पहावा हे डोहळे | म्हणौनि अचक्षूसी मज डोळे | हातींचेनि लीलाकमळें | पुजूं तयातें ||२२३||
दोंवरी दोनी | भुजा आलों घेउनि | आलिंगावयालागुनी | तयाचें आंग ||२२४||

श्रीमद भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायाला "भक्तियोग" अशी यथार्थ संज्ञा आहे - कारण
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च |
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ||१३||
येथपासून ते अध्यायाच्या शेवटपर्यंत म्हणजे -

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते |
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ||२०||
येथपर्यंत भगवंतांनी जी भक्त लक्षणे सांगितली आहेत ती तर अप्रतिम आहेतच पण त्यावर माऊलींनी स्वयंप्रज्ञेने जे रसाळ व अतिशय अद्भुत भाष्य केले आहे ते तर अधिक बहारीचं आहे.

तो पहावा हे डोहळे | म्हणौनि अचक्षूसी मज डोळे | हातींचेनि लीलाकमळें | पुजूं तयातें ||२२३||
दोंवरी दोनी | भुजा आलों घेउनि | आलिंगावयालागुनी | तयाचें आंग ||२२४||

या दोन ओव्या केवळ वानगी दाखल घेतल्या आहेत. माऊली म्हणतात - वस्तुतः ब्रह्म / परब्रह्म हे मुळात निर्गुण, निराकार - पण भक्ताबाबत मात्र हे परब्रह्म इतके हळवे (?) होते की विचारायची सोय नाही !!

त्या निर्गुण, निराकारालाही त्या भक्ताचा इतका मोह होतो की अगदी साकार रुप धारण करावेसे वाटते - अचक्षु (डोळे विरहित) असूनही त्याला डोळे प्राप्त व्हावे असे डोहळे लागतात - का तर तो भक्त पाहता यावा म्हणून..

त्या साकाराच्या हातात कमळ का असते तर ते जणू त्या भक्ताची पूजा करण्यासाठी....

त्या साकाराला असे वाटते की या आपल्या प्रिय भक्ताला आलिंगन द्यायला दोन हात कमीच पडतील म्हणूनच की काय "चार हातांचे" (दोंवरी दोनी) असे ते (चतुर्भुज) रुपडे सज्ज होऊन येते.....

माऊलींची प्रतिभा इतकी अफाट आहे की त्या निर्गुण निराकाराला ब्रह्माला सगुण साकार का व्हावेसे वाटते याचे या दोनच ओव्यात त्यांनी असे काही प्रत्ययकारी वर्णन केले आहे की आपण केवळ दिङ्मूढ होऊन जातो ....

मात्र त्याआधी भक्त कोणाला म्हणायचे हे पाहणे अतिशय आवश्यक आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने भक्त कोण तर - जो देवळात जातो, पूजा-अर्चा करतो, जोरजोरात भजने - आरत्या म्हणतो तो भक्त. पण भगवंतांनी काय आणि सार्‍या संतांनी काय भक्त कोणाला म्हणायचे हे अतिशय सुस्पष्टपणे विशद केले आहे -

विभक्तपणें नसावें | तरीच भक्त म्हणवावें |
नाहींतरी वेर्थचि सिणावें | खटाटोपें ||१३|| - श्री समर्थ.
( जो भगवंताशी एकरुप होऊन भजन करतो तो भक्त)

भक्त ऐसे जाणा जे देही उदास | गेले आशापाश निवारुनी || - तुकोबा

शिवो भूत्वा शिवं यजेत | (शिवरुप होऊनच शिवाची पूजा करायची)
(आधी होता संतसंग | तुका झाला पांडुरंग | त्याचे भजन राहीना | मूळ स्वभाव जाईना)

लाली मेरे श्याम की जहाँ देखे वहाँ श्याम | मैं धुंडन गयी श्याम को मैं खुदही बन गयी श्याम | - मीराबाई.

भगवंतांनी तर अद्वेष्टा, निर्मम, निरहंकारी येथपासून स्तुति-निंदेला समान लेखणारा, संतुष्ट अशा अनेक लक्षणांनी भक्त म्हणजे काय ते सांगितले आहे (जे मुळातून बघणे गरजेचे आहे)

हे सगळे पहाता आपण सर्वसामान्यजण भक्ति करत असतो का आणखी काय हा संशोधनाचाच विषय होईल...

भक्ताचे मुख्य लक्षण म्हणजे - भगवंताशी एकरुप झालेला तो भक्त. असा भक्त देहाने जरी या जगात वावरत असला तरी मनाने तो भगवंताशी एकरुपच झालेला असतो. देह-मन-बुद्धी त्याने परमेश्वराला पूर्णपणे अर्पण केलेली असतात आणि आपल्या आयुष्यात जे काही होते ते भगवंताच्याच इच्छेने घडते असा त्याचा ठाम निश्चय असतो - मग ती गोष्ट इतरांच्या दृष्टीने चांगली असो किंवा वाईट असो, सुख असो वा दु:ख असो.

यानिमित्ताने एक गोष्ट आठवली - जरा जुन्या काळची गोष्ट - एक नवविवाहित जोडपे त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी एका जहाजातून प्रवास करीत असतात - नेमके वादळ होते - जहाज डगमगायला लागते - सर्व प्रवासी भयभीत होऊन जातात - कोणी प्रार्थना करतंय - तर कोणी वाचवा - वाचवा म्हणून ओरडतंय... या सगळ्या गदारोळात तो नवरा मात्र शांत बसलेला असतो - त्यामुळे त्याची बायको आश्चर्यचकित होऊन त्याला विचारते - तुम्हाला या वादळाची भिती नाही वाटत ? तुम्ही प्रार्थना नाही करत? त्यावर तो पती त्याच्या जवळची तलवार काढून तिच्या मानेवर ठेवतो आणि तिला विचारतो - तुझ्या मानेवर ही धारदार तलवार असूनही भिती वाटण्याऐवजी तू तर चक्क हसत आहेस ??
पत्नी म्हणते - तुमच्या हातात तलवार असल्यावर भिती कसली ?
पती - नेमके हेच आत्ता माझ्या मनात आहे - हे वादळ इतरांना कितीही भितीदायक असले माझ्या दृष्टीने ते भगवंताच्याच इच्छेने होते आहे - जर त्याची इच्छा असेल की मी बुडावे तर मला त्याचे बिलकुल वाईट वाटणार नाही - त्यामुळे मी उगाचच घाबरुन कशाला जाऊ ? आणि त्यामुळेच - "हे देवा, मला वाचव" अशी प्रार्थना करणे ही माझ्या दृष्टीने अतिशय विचित्र गोष्ट ...- मी असे कदापिही करणार नाही. "तो" जे काही करतो आहे ते सर्वच्या सर्व माझ्या भल्याचेच - असा माझा दृढ विश्वास आहे...

भक्ति ही सुळावरील पोळी असं तुकोबांनी जे म्हटलंय ते थोडेसे तरी आपल्या लक्षात यावे .... जरा कुठे आपले डोके दुखले किंवा ताप आला तर - हे भगवंता, वाचव रे मला !! , कुठे आहेस तू ?? माझी जराही काळजी तुला नाही का ?? असे म्हणणारे आपण कुठे आणि "फुटो हे मस्तक तुटो हे शरीर | नामाचा गजर सोडू नये" म्हणणारे तुकोबा कुठे - आपले आपल्यालाच कळून येईल ....

भक्त ऐसे जाणा जे देही उदास - हे भक्ताचे मुख्य लक्षण म्हणून बुवांनी का सांगितलंय ते लक्षात यावे.

भक्ताला काळजी असते उपासनेची, साधनेची. संसारातल्या सुखाने तो हुरळून जात नाही वा दु:खाने खचून जात नाही. तो म्हणतो - संसार म्हटला कि सुख-दु:ख आलेच - पण हे भगवंता, मला तुझा विसर पडू देऊ नकोस... या सुख-दु:खातही मला तुझाच आठव असू दे ....
भक्ताचे चित्त भगवंताच्या ठिकाणी अतिशय स्थिर झालेले असल्याने भौतिक मान-अपमान, सुख-दु:खे याने तो भक्त अजिबात विचलित होत नाही. याचा अर्थ असा नाही की सर्व संवेदना हरवून बसलेला तो एक उदास मानव-प्राणी होऊन रहातो. तर आपण जेवढा मान-अपमान, सुख-दु:खाचा बाऊ करतो तेवढा तो अज्जिबात करत नाही.

जेव्हा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा प्रत्यक्ष सुरु झाला तेव्हा त्यांचे सद्गुरु निवृत्तीनाथ हे पूर्णतः बोधावर असलेले महापुरुषही अक्षरशः धाय मोकलून रडू लागले - याचे कारण त्यांच्या ठिकाणी अंतःकरण नावाचीही चीज होती. पण नंतर मात्र स्वतःला आवरुन स्वहस्ते त्यांनी माऊलींना समाधीस्थळी नेऊन बसवले, त्यांना प्रेमाने आशीर्वादही दिले.
याउलट एखादी व्यक्ति अकारण आपल्याला काही अपशब्द बोलली असेल तर आपण ती गोष्ट वर्षानुवर्षे अंतःकरणात धरुन ठेवतो - हा आपल्यातला आणि संतांमधला फरक....
(व. पुं. च्या एका कथेमधे एक पात्र - अमुक अमुक व्यक्तिंचा हात माझ्या मृतदेहालाही लागू नये असे जे पार मृत्यूपत्रात लिहून ठेवतो - यात आपल्या दृढतर देहबुद्धीचे जणू प्रतिबिंबच उमटले आहे असे वाटते. )

भक्ताचे ह्रदय सदा सर्वकाळ मोकळे असल्याने त्यात अशा विचित्र गोष्टी भरलेल्या नसतातच तर दया - क्षमा - शांति - ईश्वरभाव अशा गुणांनी तिथे वास केलेला असतो - सहाजिकच भक्ताचे ह्रदय कायमच प्रसन्न, पवित्र असते.

अशा दैवी गुणांनी युक्त असा जो भक्त त्याचे वर्णन, त्याचे कौतुक प्रत्यक्ष भगवंतालाही किती आहे हे माऊलींनी त्या दोन ओव्यात इतक्या सार्थपणे केले आहे की त्या अध्यायातील इतर श्लोकांवरही माऊलींनी कसे निरुपण केले आहे ते आपण सहजच पाहू लागतो, अभ्यासू लागतो .....

जो सर्व भूतांच्या ठायीं | द्वेषांतें नेणेंचि कहीं | आपपरु नाहीं | चैतन्या जैसा ||१४४||
- जो कोणाही भूतमात्राचा (व्यक्तिचा) द्वेष करीत नाही, जसा चैतन्याला आप-पर (आपला आणि परावा) असा भाव नसतो तसेच या भक्ताचे असते.

वार्षियेवीण सागरू | जैसा जळें नित्य निर्भरु | तैसा निरुपचारु | संतोषी जो ||१५१||
- पाऊस पडला तरच समुद्र भरलेला असतो असे काही नसते - तो सदोदित जलसंपन्नच असतो तसा हा भक्त सदा (कोणी काही दिल्याशिवाय - निरुपचारी) संतोषयुक्त असतो -

जगचि देह जाहलें | म्हणौनि प्रियाप्रिय गेलें | हर्षामर्ष ठेले | दुजेनविण ||१६८||
या जगात सर्वत्र मीच भरुन राहिलो आहे असा ज्याचा बोध/ भाव असतो (त्याला दुसरा कोणी असा उरतच नाही - दुजेनवीण) त्यामुळे प्रिय - अप्रिय किंवा हर्ष-खेद अशी द्वंद्वे त्याच्याकरता शिल्लक रहात नाहीत. (ठेले =संपून जाणे)

जयाचिया ठायीं पांडवा | अपेक्षे नाहीं रिगावा | सुखासि चढावा | जयाचें असणें ||१७२||
ज्याला कोणाकडून कसलीही अपेक्षा नसते. त्यामुळे त्याच्याठिकाणी सुख सदोदित वाढतच असते. (चढावा=उत्तरोत्तर वाढ)

जो आत्मलाभासारिखें | गोमटें कांहींचि न देखे | म्हणौनि भोगविशेखें | हरिखेजेना ||१९०||
आत्मलाभासारखी सर्वात गोमटी वस्तू प्राप्त झाल्यामुळे कुठल्याही भौतिक गोष्टींचा भोग प्राप्त झाला तरी तो हुरळून जात नाही.

हें विश्वचि माझें घर | ऐसी मती जयाची स्थिर | किंबहुना चराचर | आपण जाहला ||२१३||
मग याहीवरी पार्था | माझ्या भजनीं आस्था | तरी तयातें मी माथां | मुकुट करीं ||२१४||

- हा भक्त आत्मरुप झाल्यामुळे सगळ्या विश्वात मीच आत्मतत्वाने भरुन राहिलो आहे अशी ज्याची ठाम खात्रीच असते आणि एवढ्या उत्तुंग बोधावर असलेला हा विश्वात्मक भक्त माझ्या भजनात रमून असतो त्या भक्ताला मी माझ्या माथ्यावर मुकुटाप्रमाणे धारण करतो.
(अणूरेणुया थोकडा | तुका आकाशाएवढा...)

या काही ओव्या केवळ उदाहरणादाखल देत आहे - जिज्ञासूंनी त्या मुळातूनच वाचाव्या अशी प्रेमाने व कळकळीने विनंती करतो.

तें तीर्थ तें क्षेत्र | जगीं तेंचि पवित्र | भक्ति कथेसि मैत्र | जयां पुरुषां ||२३५||
आम्हीं तयांचें करूं ध्यान | ते आमुचें देवतार्चन | ते वांचूनि आन | गोमटें नाहीं ||२३६||
तयांचें आम्हां व्यसन | ते आमुचें निधिनिधान | किंबहुना समाधान | ते मिळती तैं ||२३७||
- या ओव्यांनी माऊलींनी त्या भक्तिलक्षणाचा समारोप केला आहे तो ही किती ह्रद्य आणि गोड आहे पहा. असा जो खरा भक्त त्याचे जणू देवालाही व्यसन लागलंय .... - प्रत्यक्ष देवाला ज्याची भक्ति करावी (पूजाअर्चा करावी) असे वाटते ते हे भक्त ... इतक्या उंचीवर माऊलींनी सगळं नेऊन ठेवलंय .....

आपण यातून काय शिकायचे हे वेगळे सांगणे न लगे ....

माऊलींना अभिप्रेत असलेले हे भक्त वगैरे ही आपल्याला फारच उंचीवरची (किंवा अप्राप्यच म्हणाना..) गोष्ट झाली - या उभ्या आयुष्यात निदान एक चांगला - गुणी माणूस बनता आले तरी खूप झाले असे वाटते - त्यासाठीच माऊलींचरणी अंतःकरणापासून प्रार्थना ......

हरि ॐ ||

-----------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग १

http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ३

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ४

http://www.maayboli.com/node/46666 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ५

http://www.maayboli.com/node/46874 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ६

http://www.maayboli.com/node/46911 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ७

http://www.maayboli.com/node/46959 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ८
--------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

१] http://abhangdnyaneshwari.org/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप गरज होति आणि आहे अश्या सुन्दर लेखाची. भटकत असता, परत परत मार्ग दाखवण्यार्याचि. Thanks काका. खुप वाटत सगळ समजुन घ्याव, पण मन करु देत नाहि (खुप अस interest येत नाहि, जस हा धागा बाघितला आणि दुसर्या धाग्यावर कथा असेल तर मी कथा आधि वाचेल नन्तर अध्यात्म) . बुध्दिला पटत कि अध्यात्मा शिवाय पर्याय नाहि, पण वळत नाहि. मनाल कस वळण लावयाच, त्याच पण निरुपण कराल का Please.

तर आपण जेवढा मान-अपमान, सुख-दु:खाचा बाऊ करतो तेवढा तो अज्जिबात करत नाही.

फार उत्तम उपदेश. हे आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्याला मन स्थिर असायला पाहिजे, ते होत नाही हीच एक अडचण.
अपयश, निराशा, अपेक्षाभंग हे वारंवार अनुभवाला आले तर उरते ते उदास रहाणे, नि ते म्हणजे भोवर्‍यात सापडण्यासारखे आहे - खोल खोलच जात रहातो आपण. त्यातून सुटका होऊन आनंदी, उपयुक्त जीवन जगणे कठीण.

सुंदर !!

<<<<<भक्ताचे मुख्य लक्षण म्हणजे ..................................."फुटो हे मस्तक तुटो हे शरीर | नामाचा गजर सोडू नये" म्हणणारे तुकोबा कुठे - आपले आपल्यालाच कळून येईल >>>>>> चपखल.

शशांकजी ____/\____. अप्रतिम.

शेवटी जे वाक्य लिहिलंत ना ते ग्रेट.

या उभ्या आयुष्यात निदान एक चांगला - गुणी माणूस बनता आले तरी खूप झाले असे वाटते >>> अगदी अगदी

खूप छान निरुपण !

शशांक खूप छान निरुपण !! अतिशय सुंदर...त्यात
या उभ्या आयुष्यात निदान एक चांगला - गुणी माणूस बनता आले तरी खूप झाले असे वाटते >>>>> हा शेवट कळस वाटला..आपण सामान्य माणसे ही अपेक्षा करु शकतो आणि करायलाच हवी..:) लिहित रहा..गरज आहे अशा लिखाणाची..