आईचे गाणे

Submitted by संतोष वाटपाडे on 22 April, 2014 - 05:44

लाव हात गं जात्याला.. सये हळद दळाया
बैस आज माज्यासंगं.. माजं दुखणं कळाया

माजी लेक मोठी झाली.. माला दिसलीच न्हाई
आता सोडून जाईल ..पुन्हा दिसायाची न्हाई

साडीचोळीमंधी पहा.. कशी गुणाची दिसंती
डोळं पाणावलं तिचं ..तरी माज्याशी हासंती

नगं लागाया नजर ..लावा काजळ गं तिला
उद्या हळद लागल ..माज्या लेकीच्या अंगाला

माजी लेकरं वाढली.. सावलीत पदराच्या
न्हाई नांदली खेळली.. कधी बाह्यर घराच्या

हातावरच्या मेंदींचं.. कसं चित्तर रंगलं
लावा साखरीचं पाणी.. मेंदी पांगंल पांगंल

बोलायाचं कोणासंगं ..पडवीत चुलीवर
कसं व्हईल गं माझं.. माझी लेक गेल्यावर

लेक सासराला जाय़ा.. न्हाई न्हाई म्हण जाई
तिला सांगा गं सयांनो.. सासू हाये तिची आई

उद्या हळद लागंल ..मंग चौघडा वाजंल
माझ्या चिऊचं लगीन.. सार्‍या गावात गाजंल

दगडाच्या जात्यातून.. रडायाचा सूर येतो
तसा तसा डोळ्यालाबी.. नदीवाणी पूर येतो

लेक जाणारंच व्हती.. तरी काळजाला घोर
कशी राहील सासरी.. माझी लाडकी ही पोर

गरागरा फ़िरवा गं.. बाकी हाये लई काम
कोणीतरी पुसा ना गं ..माज्या चिमणीचा घाम.....

-- संतोष वाटपाडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users