तृतीयपंथीय

Submitted by बेफ़िकीर on 15 April, 2014 - 23:21

नमस्कार!

ही एक फक्त 'चालू घडामोड' नाही तर बर्‍यापैकी व्यापक विषय आहे, पण येथील विषयांच्या सदरांपैकी तो 'चालू घडामोड' ह्या सदरात सर्वाधिक चपखलपणे बसतो असे वाटले म्हणून ह्या सदरात लिहीत आहे.

तृतीयपंथियांना सर्वोच्च न्यायलयाने एक 'कायदेशीर अस्तित्व' बहाल केलेले आहे. सर्वोच्च न्यायालय असेही म्हणते की हा वैद्यकीय किंवा सामाजिक विषय नसून 'मानवी अधिकारां'चा विषय आहे.

लहानपणापासून आजवर समाजात कोठेही दिसणारे तृतीयपंथीय (किन्नर / हिजडे) हा बर्‍याच अंशी एक कुतुहल, थट्टा, किळस अश्या भावनांचे मिश्रण असलेला विषय असल्याचा प्रभाव सर्वत्र पसरल्याचे चित्र दिसत असे. हे तृतीयपंथीय लोकल ट्रेन्समध्ये पैसे मागणे, देहविक्रय करणे असे व्यवसाय (!) करताना आढळत. नुकताच मी ज्या स्नेहालयात जाऊन आलो त्यांच्या संस्थेशी निगडीत असे अनेक तृतीयपंथीय आहेत जे देहविक्रय करतात. त्यांच्याकडे प्रामुख्याने लष्करातील कर्मचारी शरीरसुखासाठी येतात व अनैसर्गीक संभोगाची इच्छा पुरवून घेतात.

स्त्रीही नाही व पुरुषही नाही ही अवस्था त्या व्यक्तीसाठी लज्जास्पद तर इतरांसाठी हास्योत्पादक आहे हे समीकरण रूढ झाल्यासारखे चित्र असताना अनेक संस्था, व्यक्ती व चळवळींच्या माध्यमातून आता सर्वोच्च न्यायालयाने ही एक समाधानकारक व पुरोगामी भूमिका घेतलेली आहे.

आता कोणत्याही शासकीय अर्जात कदाचित लवकरच 'सेक्स - मेल / फिमेल / ट्रान्सजेंडर' असे काहीसे दिसायची शक्यता आहे, ह्या तृतीयपंथीयांना लवकरच आरक्षण मिळू शकेल. त्यांना समाजाने स्वीकारायला किती काळ जावा लागेल हे मानसिकतेमधील लवचिकतेवर, औदार्यावर अवलंबून असले तरी तसे आगामी काळात होईल इतके नक्की! शाळेमधील वर्गांमध्ये कदाचित आता अशी मुले शिकायला बसू शकतील आणि इतर विद्यार्थ्यांना त्यांचे पालक व शिक्षक 'अश्या मुलांना हसायचे नाही' असे शिकवू लागतील.

कदाचित आपल्याला ट्रीट करणारा मेडिकल ऑफिसर एखादा तृतीयपंथीय असेल आणि गाजलेलाही असेल. कदाचित एखादा संशोधक तृतीयपंथीय असेल.

हे सगळे होईल तेव्हा होईल, पण तूर्त एक मोठीच लढाई ह्या तृतीयपंथीयांनी जिंकलेली आहे.

मात्र मला एकदा हैदराबाद पुणे प्रवासात एक एम डी मेडिसीन डॉक्टर भेटला होता. प्रवासात वेळ घालवायला म्हणून त्याच्याशी ज्या अनेक चर्चा केल्या त्यापैकी चर्चेचा काही भाग तृतीयपंथीयांबाबत होता. त्यातून त्याने मला जी माहिती सांगितली ती काहीशी गोंधळात पाडणारी वाटली व येथे असलेल्या तज्ञांनी त्याबाबत आपली मते देऊन कृपया उपकृत करावे.

१. शरीररचनेनुसार जे जन्मतः तृतीयपंथीय असतात त्यांच्यात दोन प्रकार असू शकतातः

अ - त्यांना जन्मतः लिंग असते पण टेस्टिकल्स नसतात (त्यामुळे ते पुरुष ठरू शकत नाहीत)
ब - त्यांना जन्मतः योनी असते पण योनीखाली टेस्टिकल्सही असतात व स्त्रीप्रमाणे अंतर्गत रचना नसते.

२. जे तृतीयपंथीय चुकून तृतीय पंथात मोडतात ते ह्या दुसर्‍या 'मुख्य प्रकारात' येतात. ते म्हणजे त्यांचे एक कोणतेतरी लिंग नक्की असते, पण जन्माच्यावेळी ते न आढळल्याने त्यांचे संगोपन विरुद्ध लिंगीयाप्रमाणे करणे सुरू होते. पुढे पुढे त्यांची मानसिकता (उदाहरणार्थ) स्त्रीप्रमाणे तर शारीरिक वाढ पुरुषाप्रमाणे होते.

३. तिसर्‍या प्रकारात बालकाचे / किशोरवयीन अवस्थेतील मुलामुलीचे लिंग समजूनही केवळ देहविक्रयामार्फत उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे / स्वतःला एक वेगळ्या प्रकारचे शारीरिक सुख घेण्याची सोय करता यावी / किंवा चक्क वयाने वाढलेल्या व्यक्तीला स्वतःच दुसर्‍या लिंगीयाप्रमाणे वागण्याची इच्छा व्हावी म्हणून बाहेरील जामानिमा पूर्णपणे बदलला जातो व कपड्यांच्या आत व्यक्ती तशीच राहते.

आता ही माहिती जर योग्य आहे असे मानले, तर सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या आदेशानंतर व ह्या माहितीच्या प्रकाशात (तसेच इतर काही तत्सम विषयांच्या प्रकाशात) मला काही प्रश्न पडले आहेत, ज्यावर कृपया चर्चा व्हावी अशी विनंती:

१. सर्वात प्रथम म्हणजे तृतीयपंथीय हा मानवाधिकाराच्या व्याप्तीतील विषय जर मानला जात असेल तर समलैंगीकता का मानली गेली नाही? (कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावीत, समलैंगीकता अनैसर्गीक आहे असे माझे मत त्या चर्चेच्यावेळी नव्हते तर ती नैसर्गीक असणे ठसवले जाण्याचा अतिरेक आणि समुपदेशनाने ओरिएन्टेशन बदलते किंवा नाही ह्यावर माझी मते मांडलेली होती. हे नोंदवण्याचे कारण म्हणजे तेच वाद येथे होऊ नयेत ही अपेक्षा असल्याचे सांगणे!)

२. नैसर्गीकरीत्या तृतीयपंथीय असलेल्यांनाच कायदेशीररीत्या तृतीयपंथीय म्हणून आरक्षण मिळावे की जे जबरदस्तीने वा स्वेच्छेने तसे झाले आहेत त्यांनाही? मग ह्याचा गैरवापर वगैरे टाळण्याच्या यंत्रणाही अर्थातच अस्तित्वात आणाव्या लागतील हे आलेच.

३. काही जण मुद्दाम तृतीयपंथीय होऊन आरक्षण मिळवू शकतील का?

४. आज जे तृतीयपंथीय शरीर विक्रय करतात व मानहानीकारक जिणे जगतात त्यांचे पुनर्वसन कसे होऊ शकेल?

५. सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊन मोकळे झाल्यानंतर माणसाची मानसिकता बदलण्याची जबाबदारी कोणत्या सरकारी संस्थेने घ्यावी?

हे प्रश्न माझ्या मनात आले, इतर कोणाला काही इतर प्रश्न असल्यास कृपया तेही नोंदवावेत.

पण एकुणात, पूर्वी हे तृतीयपंथीय शुभशकुनी समजले जात. ते श्रीमंतही असत. राजेरजवाड्यांकडे ते मोठे पद मिळवून असत. काही मुस्लिम राजवटींमध्ये लहानपणीच काही मुलांना मुद्दाम पौरुषत्वापासून दूर करून पुढे मोठे झाल्यावर स्त्रियांच्या महाली संरक्षक म्हणून नेमण्याची विचित्र प्रथाही होती. असेही समजले जाते की तृतीयपंथीयांच्या शरीरात अधिक ताकद असते, हा फक्त समज असावा. त्यांचा आशीर्वाद शुभ मानणारे अजूनही खूपजण आहेत. लोकल ट्रेन्समध्ये ते आले की स्त्रिया / मुली मान खाली घालून झोपल्याचे नाटक करतात व त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद (शाब्दिक / शब्दहीन) साधणे टाळतात. लहान मुले व अनेक पुरुष त्यांना हासतात. 'छक्का' हे संबोधन एखाद्या शिवीप्रमाणे आजही वापरले जाते. मात्र आता हे लोक 'आम्हाला किन्नर' म्हणा असे म्हणत आहेत. हिजडे, छक्के ही विशेषणे वापरू नका असे म्हणत आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे, तृतीयपंथीय म्हणजे एखादा वेल ड्रेस्ड, वेल मॅनर्ड माणूस नजरेसमोर येतच नाही. आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते पुरुषी थाटाच्या व्यक्तीने साडी वगैरे नेसून अत्यंत भडक मेक अप केलेला असणे, टाळ्या वाजवणे व उगाचच अती भडकपणामुळे तिरस्करणीय दिसत असणे!

हे सगळे चित्र केव्हा बदलेल तेव्हा बदलेल, पण ह्या बातमीमुळे 'गे संघटनाही' 'अपबीट' झालेल्या आहेत.

बाकी काही असो, एक देश म्हणून आपण अधिक 'ह्यूमन' होत आहोत हे चांगलेच म्हणावे लागेल.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर, तुमच्या प्रश्नाची उत्तरे माझ्या http://vishesh.maayboli.com/node/1362
कथेतूनच कॉपी पेस्ट करतेय.
<<<<"प्रकाश, प्रत्येक पेशंट ही नवेनवे शिकण्याची एक संधी असते. आता तू सांग, या पेशंटवरून तू कायकाय शिकलास?"
हिपॅटिक फेल्युअरची ट्रीटमेंट, त्यातले नवेनवे शोध डिस्कस झाले. लेक्चरर आपापल्या परीने भर घालत होते. ए एस सी मॅडम आणि उप बॉस ए बी जोशीसर राऊंडवर इतके छान शिकवायचे की बाकीच्या युनिटची पोरंपण वेळ मिळताच सीतेच्या युनिटचे राऊंड ऐकायला यायचे.
बरं, आता "डिसऑर्डर्स ऑफ सेक्शुअल डिफरंसीएशनविषयी सांग."
यानंतर मग गर्भधारणेनंतर गर्भाचे लिंग कसे ठरते, कितव्या आठवड्यात ओळखू येते, गुणसूत्रांच्या सदोष विभागणीमुळे होणारे टर्नर सिंड्रोम ,क्लाईनफेल्टर सिंड्रोम असे दोष यांवर चर्चा झाली. त्यानंतर मानवात लिंगनिश्चितीच्या चार टप्प्यांविषयी जोशीसरांनी माहिती दिली. गर्भधारणेच्यावेळी होणारी गुणसूत्रीय निश्चिती, मग टेस्टीज/ओवरीज अशा अंतर्गत अवयवांची निश्चिती, स्त्री-पुरुष फरक करणार्‍या बाह्यांगांची निश्चिती आणि त्यानंतर मानसिक स्तरावर होणारी लिंगनिश्चिती. यातील प्रत्येक टप्प्यावर काहीना काही बाधा येऊन लिंगनिश्चितीत संदिग्धता निर्माण होते आणि मग तयार होतात हे अर्धनारीनर. समाजाची अवहेलना झेलणारे, आईवडिलांकडूनही दुस्वासिले जाणारे.

यातला बराच भाग एम. बी. बी. एस. करताना गायनॅकमध्ये त्या त्या वेळी अभ्यासून विसरलाही गेला होता. मात्र सीतेच्या दोन्ही शिक्षकांनी मेडिसीनच्या दृष्टिकोनातून यांना हार्मोन्सचे आणि इतर आजार कसे होतात, हेसुद्धा शिकवले.
"देन अ‍ॅट व्हॉट स्टेज हर प्रोग्रेस हॅज स्टॉप्ड?" सरांनी प्रकाशला प्रश्न विचारला.
प्रकाशला उत्तर देता आले नाही. किंवा त्याने दिले नाही.
मग सरच म्हणाले, "शी ईज नॉट अ हर्मॅफ्रोडाईट, शी ईज अ कॅस्ट्रेटेड मेल. यू मे एक्झमिन अँड कन्फर्म."
"शी ईज नॉट अलॉविंग एनी एक्झामिनेशन", सीतेने सांगितले.
"देन लीव्ह ईट अँड रिड अबाऊट कॅस्ट्रेशन फॉर अवर नेक्स्ट राऊंड". असे म्हणून ए एस सी मॅडम गेल्या.

सीतेने वेळात वेळ काढून मोठ्या उत्सुकतेने कॅस्ट्रेटेड मेल्सबद्दलची माहिती वाचून काढली.
भारतात रस्त्यांवर पैसे मागत फिरणारे बहुतांश तृतीयपंथी एकतर दिखावा करणारे खरेखुरे पुरुषच असतात किंवा अंडकोष/ वीर्यकोष काढून टाकलेले पुरूष. शक्यतो मुलगा वयात येण्याआधीच ही अंडकोष काढण्याची क्रिया करतात. बहुतेक वेळा निर्जंतुक उपकरणे वगैरे न वापरता. त्यासाठी अशा तृतीयपंथी टोळ्यांचा खास हजाम असतो. हे सगळे सहन करणारा वाचलाच तर आयुष्यभर मेल हॉर्मोन्स - पुरुषी संप्रेरकांची उणीव त्याच्यात राहते. स्त्री हार्मोन्स काही प्रमाणात स्त्री पुरूष सगळ्यांच्यातच स्रवत असतात. पुरुषी हार्मोन्सचा प्रभाव गेल्याने मग केवळ स्त्री हार्मोन्स शिल्लक असणार्‍या या व्यक्तीचे शरीर हळूहळू स्त्रीसारखे दिसू लागते. आवाजही बदलतो. वाईट संगतीच्या नादाने लैंगिक मार्गाने पसरणारे आजार, एडस्, हेपॅटायटिस बी या लोकांना गाठतात. बाकी या लोकांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीविषयीही खूप संदर्भ होते, पण सीतेला ते सगळे वाचायला एवढ्या धावपळीत वेळ नव्हता.>>>>

लेख आणि अशोक यांचा प्रतिसाद आवडला.

बाकी इझी मनीची चटक वगैरे गोष्टी समाजातील इतर घटकांनाही लागू पडतात. सिग्नलला उभे राहून अवहेलना झेलत पैसे मिळवणे होते कारण दुसरा काही पर्यय नाही. सन्मानाने जगायचे पर्याय उपलब्ध झाल्यास बहुसंख्य तृतीयपंथी सो कॉल्ड इझीमनीच्या पाठी जणार नाहीत अशी आशा आहे.

इतक्यात लिहिणार नव्हतो. पण "१. समलैंगिकता हा विषय सर्वस्वी भिन्न असल्याने त्याला मान्यता नाही हे या अगोदरच सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले असल्याने या धाग्यात त्याबद्दल चर्चा येऊ नये....कारण अगोदरच भरपूर देवाणघेवाण झाली आहेच यावर." हे वाचल्यावर लिहिणे भाग पडले.

मूळ लेखातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर : समलैंगिकता हाही मानवाधिकाराचाच विषय आहे.
वेगळे उत्तर लिहिण्यापेक्षा एक लिंक देतो आहे. http://www.yogyakartaprinciples.org/
(ही ज्योजाकर्ता प्रिन्सिपल्स युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत मांडली गेली होती.

http://www.yogyakartaprinciples.org/principles_en_principles.htm

All human beings are born free and equal in dignity and rights. All human rights are universal, interdependent, indivisible and interrelated. Sexual orientation[1] and gender identity[2] are integral to every person’s dignity and humanity and must not be the basis for discrimination or abuse.

[1]UNDERSTANDING ‘sexual orientation’ to refer to each person’s capacity for profound emotional, affectional and sexual attraction to, and intimate and sexual relations with, individuals of a different gender or the same gender or more than one gender;

[2]UNDERSTANDING ‘gender identity’ to refer to each person’s deeply felt internal and individual experience of gender, which may or may not correspond with the sex assigned at birth, including the personal sense of the body (which may involve, if freely chosen, modification of bodily appearance or function by medical, surgical or other means) and other expressions of gender, including dress, speech and mannerisms;

आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे वळूया. या मुद्द्याच्या सुनावणीदरम्यान केंद्रशासनाने ट्रान्स्जेंडर्सना सगळे हक्क आहेत (मतदानाचा, निवडणूक लढवण्याचा - शबनम मौसी - मध्यप्रदेशात आमदार म्हणून निवडले/ल्या गेले/ल्या होते/त्या) वेगळी ओळख आहे(म्हणजे M/F ऐवजी T) , पण आरक्षणासाठी एक वेगळा वर्ग म्हणून त्यांना मान्यता देता येणार नाही असे म्हटले होते.

कलम ३७७ रद्दबातल करण्यास नकार देणार्‍या सर्वोच्च न्यायालयातूनच असा निकाल यावा या दृष्टीनेदेखील ही महत्त्वपूर्ण घटना आहे.

<सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊन मोकळे झाल्यानंतर माणसाची मानसिकता बदलण्याची जबाबदारी कोणत्या सरकारी संस्थेने घ्यावी? > हेही काम सरकारने करायचे असेल तर झालेच.

<हे सगळे चित्र केव्हा बदलेल तेव्हा बदलेल, पण ह्या बातमीमुळे 'गे संघटनाही' 'अपबीट' झालेल्या आहेत. > Transgenders are part of the lgbt (lesbian, gay, bisexual and transgender) community. They take part in the gay pride walk.
समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा त्यांच्यासाठीचा हा एक मोजका प्रसंग. (LGBT तले अन्य तीन घटक उर्वरित समाजाप्रमाणेच सो कॉल्ड सामान्य जीवन (शिक्षण, नोकरी,......) जगत असतात या अर्थाने.

जाता जाता : नाझ फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात कलम ३७७ च्या संबंधाने curative petition दाखल केलेली आहे.

<मुंबईत तरी अनेक जण नवसासाठी किंवा पैश्यासाठी मुद्दाम अत्याचार करवून या पंथाला लावले जातात.
( असे टाईम्स ऑफ इंडीया मधे वाचले होते. ) अनेक सिग्नल्सवर किंवा जिथे जिथे तरुण तरुणी एकत्र दिसतात तिथे ते त्रास देतातच. आणि बहुतांशी लोकांना त्यांची किळस वाटत असल्याने त्यांना पैसे मिळतातच. ( तसे वाटण्यासाठी अंगावर थुंकणे, असभ्य चाळे करणे, कपडे वर करणे, नको तिथे स्पर्श करणे असे ते सर्रास करतात.)

पुर्वी त्यांचे एरीया आणि दिवस ठरलेले असत, आता तसे दिसत नाही. ईझी मनीची चटक लागल्याने त्यातले किती जण रुढ जीवन स्वीकारतील आणि त्यांना तशी संधी मिळेल, हे काळच ठरवेल.>

सर्रास? मी ज्या मुंबईत राहतो, तिथे असे प्रकार अपवादानेच आढळले. ट्रेनच्या प्रवासातही - एकदाच त्रास म्हणावा असे वर्तन पाहायला मिळाले- तेही लांब पल्ल्याच्या गाडीत.

बाकी काही असो, एक समाज म्हणून आपल्याला अधिक 'ह्यूमन' व्हायला भरपूर वाव आहे.

वरदा.. असे अनुभव आले ते छानच. पण मला तरी ते अपवादात्मक वाटतात.
साती.. माझ्या स्विस भेटीत एक टूअर गाईड थाई होता. तो तृतीयपंथी होता. त्याने आपली जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडली. आपल्या वेगळेपणाचे भांडवलही केले नाही कि ते लपवलेही नाही. त्यामूळे आम्हा कुणालाच
काही विशेष वाटले नाही.

हेही काम सरकारने करायचे असेल तर झालेच.<<<

मुद्दा असा आहे की आपल्याकडे कायदे करतात पण अंमलबजावणी व कायद्यातून अपेक्षित असलेला मानसिकतेतील बदलही घडवून आणण्यासाठी काही 'खास / विशेष' प्रयत्न केले जाण्याच्या 'लायकीचा' आपला देश आहे हे लक्षात घेतात की नाही ते समजत नाही.

उदाहरणार्थ - अमानुष अत्याचार व ठरवून गँग रेप करणार्‍यांना फाशी द्यावी हा झाला कायदा! त्या कायद्याचे सर्वसामान्याने स्वागत केले. मात्र मुलायमच्या बकबकीवर नुसताच संताप (व तोही जनतेकडून ) व्यक्त झाला. आता इतक्या मोठ्या नेत्याची मानसिकता बदलणे किंवा त्याच्या वक्तव्यांची दखल घेऊन त्याला शिक्षा ठोठावणे हीसुद्धा सरकारचीच कर्तव्ये नाहीत का?

बाकी किन्नर हे एल जी बी टी चे एक भाग आहेत हे मला ज्ञात नव्हते असे नाही, चिनूक्सांच्या धाग्यावरील चर्चेच्या अनुषंगाने फक्त एक अ‍ॅडिशनल विधान मी केले की ह्या सगळ्यामुळे तेही अपबीट झालेले आहेत. बहुधा मी त्या वाक्यात 'अर्थातच' / 'अपेक्षेनुसार' / 'साहजिकच' असे काही लिहिले असते तर बरे झाले असते.

धन्यवाद!

मात्र ह्या तुमच्या लिंकबद्दल खरेच धन्यवाद, व्याख्या पुरेश्या क्लीअर आहेत व अर्थातच पटण्याजोग्याही!

>>>वेगळे उत्तर लिहिण्यापेक्षा एक लिंक देतो आहे. http://www.yogyakartaprinciples.org/<<<

सहृदयतेने हाताळलेला महत्वाचा लेख , अशोक यांचा प्रतिसादही अभ्यासपूर्ण.
वरदाशी सहमत, मला कित्येकदा भले वाटणारे तृतीयपंथी दिसलेत. त्यांच्याबद्दल कणव वाटते ती अशासाठी की दुसऱ्या कोणत्याही शारीरिक व्यंगाकडे समाज सहानुभूतेने बघतो पण लैंगिक व्यंग घेऊन जन्माला आलेल्यांची फक्त परवडच होताना दिसते . अगदी सुशिक्षित घरातूनही बहुतांश हेच चित्र.अशा घटकांना न्याययंत्रणेने न्याय दिला आहे..

अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आणि विचारप्रवर्तक लेख.
या प्रश्नाची एक वेगळी बाजू मला मांडाविशी वाटते. जर यातल्या काही व्यक्तिंमधे जेनेटीकली हा प्रश्न असेल तर जगभर हा प्रश्न असायला हवा. पण मी पाहिलेल्या पाश्चात्य देशात कुठेच एकत्रीतपणे इतके तृतीयपंथी पाहिल्याचे आठवत नाही. Transgender हा समाजाने स्वीकारलेला प्रकार सगळीकडेच आहे. पण भारतासारखे त्यांचे घोळके मला तरी इतर देशात दिसले नाहीत. कदाचित इतर देशातले मायबोलीकर त्यांचे अनुभव सांगू शकतील.

म्हणजे भारतापुरते म्हणायचे तर हा प्रश्न नैसर्गिकरीत्या जितका असायला हवा त्यापेक्षा अधिक अनैसर्गिकपणे/कृत्रिमपणे वाढवला आहे का?

सरकारने आता नवीन कायद्यानुसार या गटातील व्यक्तींना "ओ.बी.सी." चा दर्जा दिला असून सार्‍या नोकरीच्या ठिकाणी याना आरक्षण लाभेल. पण कळीचा मुद्दा असा आहे की एका सर्व्हेनुसार असे दिसून आले आहे जवळपास ९८% तृतीयपंथीय निरक्षर आहेत. यापैकी आता शिक्षित होण्यासाठी कोण प्रयत्न करीत असेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे सरकारी नोकर्‍यातील आरक्षणाचा विचार करता याना कोणत्या पदासाठी पात्र धरले जाईल हाच मोठा प्रश्न आहे. सरकारी कार्यालयातील शिपायासाठी किमान ८ वी पास अशी शैक्षणिक अर्हता आहे....ही जमात इतकेही शिकलेली दिसत नाही. स्कॅव्हेन्जर, स्वीपर यांच्या जागा याना मिळणार नाहीत कारण त्यासाठी वेगळी कॅटेगरी आहेच. वॉचमन म्हणून याना कुणी ठेवणार नाहीच. अगदी ए.टी.एम. मशिनच्या ठिकाणीसुद्धा निवड होणार नाही.

कठीण आहे.

अजय यांच्या प्रतिसादातील दोन्हे परिच्छेद एकत्र वाचल्यावर मला "इतर देशांत तृतीयपंथीयांना समाजात सामावून घेतले जाते. त्यांना इतर समाजापासून वेगळे होऊन स्वतःचा वेगळा गट करून राहावे लागत नाही; मग भारतात असे का होते? या अर्थाने हा प्रश्न अनैसर्गिक/कृत्रिमपणे वाढवला आहे" असा अर्थ लागला. तृतीयपंथीयांची संख्या कृत्रिमपणे वाढवली जाण्याचा प्रश्न त्यांना अभिप्रेत नसावा.

जेनेटिकली त्या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या असणे हा नैसर्गिक प्रश्न. समाजापासून त्यांना वेगळे राहावे लागणे हा कृत्रिम प्रश्न. केवळ जेनेटिकली वेगळे असल्याने त्यांना उपजीविकेचे हे मार्ग शोधावे लागावेत याचे मूळ समाजाच्या मानसिकतेत आहे की काही जण म्हणतात तशी जेनेटिकली त्यांच्यात इझी मनी(!)ची चटक वाढीस लागली आहे?

बरोबर भरत....

आता तुमच्या प्रतिसादानंतर श्री.अजय यांचा मुद्दा नव्याने दुसर्‍यांदा वाचल्यावर त्याना नेमके काय अभिप्रेत आहे हे समजले. प्रतिसादामागील भावना तशी मनात ठसण्याचे कारण म्हणजे नेमक्या याच मुद्द्यावर मी दोन दिवसापूर्वी एका चर्चेत (स्थानिक पातळीवर) भाग घेतला होता त्यावेळी "हिजडे आपल्या टोळीत लहान मुलांना पळवून आणून कृत्रिमरित्या त्याना आपल्यासारखे बनवितात का ?" हा विचार आला होता. पोलिससुद्धा हिजड्यांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करतात असेही सामोरे आले. पण सरकारी पातळीवर या प्रश्नाला नकारार्थी उत्तर होते....म्हणजे "मुलांना कृत्रिमरित्या हिजडे बनविले जात असल्याची तक्रारी नाहीत..." असे.

हे सारे डोक्यात होते....आणि अजय यांचा प्रतिसाद सामोरा आला....मग माझे उत्तरही त्याच अनुषंगाने उतरले गेले. मी त्या प्रतिसादातील नको असलेला भाग काढून टाकतो, भरत.

मला दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत

पहिला अर्थ मयेकरांनी घेतल्याप्रमाणे समाज सामावून घेत नसल्यामुळे त्यांना एकत्र वेगळ्या गटात रहावे लागते.

पण दुसरा अर्थ वर मूळ लेखात लिहलेला ३ रा प्रकार आहे

>३. तिसर्‍या प्रकारात बालकाचे / किशोरवयीन अवस्थेतील मुलामुलीचे लिंग समजूनही केवळ देहविक्रयामार्फत उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे

यातल्या कुठल्या कारणामुळे त्यांच्या संखेत वाढ दिसते ते माहिती नाही. पण मला ही दोन्ही कारणे असावित का हा प्रश्न पडला आहे.

अजून एक तिसरे एक कारण असून शकते. भारतात एकूणच लोकसंख्या जास्त असल्याने कुठल्याही गटात मोडणार्‍या व्यक्ती दर एकक भूभागात जास्त असणार (एकूण जागतीक गुणोत्तरापेक्षा जास्त नसल्या तरी) त्यामुळे वरवर पाहता त्यांची संख्याही जास्त वाटणार.

सर्वोच्च न्यायायलाच्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती देणार्‍या बातमीची लिंक देत आहे.

तृतीयपंधीयांना आपले जेंडर स्त्री किंवा पुरुष असे नोंदवावे लागणार नाही . त्यांना स्वतःची वेगळी लैंगिक ओळख मिळेल हा निर्णयाचा एक भाग झाला.

मूळ लेखातल्या १,२,३ या मुद्द्यांची उत्तरे पुढील विधानांतून मिळावीत.
We hold that values of privacy, self-identity, autonomy and personal integrity are fundamental rights guaranteed to members of the transgender community.
Self-defined sexual orientation and gender identity is integral to their personality,
Their rights had to be protected, “irrespective of chromosomal sex, genitals, assigned birth sex, or implied gender role” to ensure a dignified life for them.
A psychological test and not a biological test has to be used to identify transgenders.
Any insistence to undergo a sex re-assignment surgery was “immoral and illegal”.

त्यांचा आरक्षणावरील हक्क मान्य करताना आणखीही काही हक्क मान्य केले गेले आहेत.
will have all rights under the law, including the right to marry each other, adopt, divorce, succession, inheritance and also to claim benefits under welfare programmes such as MNREGA.

या निकालानंतर LGBT संघटनांना मनोबल मिळण्याचे कारण पुढील विधानांत आहे. Each person’s self-defined sexual orientation and gender identity is integral to their personality and is one of the most basic aspects of self-determination, dignity and freedom. The court also pointed out that the term “transgender” will include gay, lesbian and bisexual. But it stopped going further on this by saying: “While dealing with the present issue we are not concerned with this aforesaid wider meaning of the expression transgender.”

साती - तुमचा प्रतिसाद नीट वाचला. समजला व आवडला. इन्टरेस्टिंग सायन्स असल्याचे सहज जाणवण्याइतका तुमचा प्रतिसाद सुलभ व सोपा आहे समजायला. धन्यवाद!

भारती - लैंगीक व्यंग घेऊन जन्माला आलेल्यांची परवड होते हे पटलेच. त्यामागे समाजाची मानसिकताच आहे.

अजय - तुम्ही नोंदवलेला मुद्दा फार महत्वाचा वाटला. किंबहुना, तुमचा मुद्दा (मला जर नीट समजला असेल तर) सरळ सरळ भारतीय समाजाने तॄतीय पंथियांची संख्या विविध कारणांनी, विविध मार्गांनी मुद्दाम वाढवली असावी काय असा असावा असे वाटले. मला तरी असे वाटते की तसे म्हणायला वाव आहे. विकृत मानसिकतेची भूक भागवणे हाही काहींच्यासाठी एक उपजीविकेचा व्यवसाय असावा. त्यातच ९९.९९% समाज तृतीयपंथियांना बहिष्कृत करणार्‍या मानसिकतेचा आहे. त्यामुळे संख्येने वाढलेले हे किन्नर एकमेकांसोबत राहात असावेत व ज्यातून ते घोळक्यात वावरताना व काही विशिष्ट व्यवसायच (उपजीविकेचे मार्ग चोखाळताना) दिसत असावेत.

मयेकर - ह्या नवीन प्रतिसादातील माहिती समजली व ती देण्याबद्दल धन्यवाद! बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळालीच आहेत. (आता राहिले इतकेच, की एवढे सगळे ज्या न्यायालयाला समजते त्याला समलैंगीकता का पटत नसावी?)

अर्थात, इतरही अनेक गोष्टी अजूनही तश्या राहिलेल्या आहेतच.

१. अशिक्षित बेकार किन्नरांना समाजात कसे आणणार?

२. कृत्रिमरीत्या एखाद्याला अर्धनारीनर बनवणे कमी होईल का, थांबेल का? (ह्यात असे म्हणायचे आहे की निव्वळ स्वार्थासाठी असे केले जाते, तेथे ते थांबेल का? एखाद्याला स्वतःलाच तसे व्हायचे असेल तर नव्हे)

३. हे किन्नर पुरुषांसाठीच्या सुविधा स्वीकारणार की स्त्रियांसाठीच्या! (उदाहरणार्थ - रेल्वेमधील राखीव डबे, शिक्षणासाठी असलेल्या सुविधा, नोकरीच्या ठिकाणी असलेल्या सुविधा वगैरे)

४. आपण आता स्वीकृत व इतरांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिक म्हणून गणले जाणार आहोत ह्याचे भान ठेवून स्वतःच्या व्यक्तिमत्वातील भडकपणा, स्वस्तपणा, थेट लैंगीकतेकडे निर्देश करणारे वर्तन, विकृत वर्तन ह्या सर्वाचा हे किन्नर हळूहळू त्याग करण्यास तयार होणार का?

५. क्रॉसड्रेसर (बाय चॉईस) ह्या प्रकाराला किन्नर म्हणून ट्रीट करणे / न करणे ह्यातील योग्य काय?

चु भु द्या घ्या, विशेषतः पाचव्या प्रश्नात मला जे विचारायचे आहे ते मी नेमके विचारू शकलेलो आहे की नाही हे मला लक्षात आलेले नसल्याने!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आज जाऊबाईंना फोन केला तेव्हा बोलता बोलता हा विषय निघाला. त्यांचा ग्रूप गेली दहा वर्षे या घटकांसाठी काम करत आहे. त्या म्हणाल्या की बरेच जण १०वी-१२वी झालेले आहेत. घर सुटलेले, कुटुंबाने पाठ फिरवलेली त्यात समाजाची मानसिकता अशी की भीक मागणे आणि सेक्स वर्कर म्हणून काम करणे हे दोनच पर्याय यांच्यापुढे असतात. जे लोक अर्धशिक्षित, अशिक्षित आहेत त्यांना मेणबत्या, उदबत्या वगैरे बनवायला शिकवायचे प्रयत्न सुरु आहेत.
बाकी समाजाबद्दल बोलायचे तर अस्पृशःता ही कायद्याने गुन्हा ठरवल्याने या दुर्बल घटकांवर होणारे अन्याय थांबले नाहित. रेपच्या केसेसमधे पिडीत स्त्रीला दोष द्यायला, boys will be boys म्हणायला समाज तयार असतो. या बाबतीतही समाजाची मानसिकता बदलणे हेच मोठे आव्हान असेल.
कृत्रीमरीत्या अर्धनारी बनवणे होत असावे हा मुद्दा मला नेहमीच अस्वस्थ करत आला आहे. एकंदरीतच रत्यावर वाढणारी मुले, त्यांचे होणारे शोषण, याचा एक भाग म्हणून हे होत असते. मुलींना पळ्वून वेश्या व्यवसायात ढकलेले जाते तसेच हे प्रकार चालतात. आपला समाजही असा आहे पिडीत व्यक्तीचे मागे फिरायचे सगळे मार्ग हा सभ्य समाज बंद करतो , वाममार्गाने जगायला भाग पाडतो आणि समाजातील वाईट गोष्टींना एकप्रकारे मदतच करतो.

४. आपण आता स्वीकृत व इतरांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिक म्हणून गणले जाणार आहोत ह्याचे भान ठेवून स्वतःच्या व्यक्तिमत्वातील भडकपणा, स्वस्तपणा, थेट लैंगीकतेकडे निर्देश करणारे वर्तन, विकृत वर्तन ह्या सर्वाचा हे किन्नर हळूहळू त्याग करण्यास तयार होणार का? >>>
माझा ह्या विषयावर अभ्यास नाही पण सर्वसामान्यपणे मनुष्य जोवर अर्थार्जनाचा सबळ पर्याय समोर येत नाही तोवर ज्या वर्तनाच्या जोरावर पैसा मिळतो ते वर्तन (स्वस्तपणा, थेट लैंगीकतेकडे निर्देश करणारे वर्तन, विकृत वर्तन इ.) चालू ठेवतो.

मयेकर,

पुन्हा धन्यवाद ह्या लिंकबद्दल! मी वाचायला सुरुवात केली पण ते बरेच मोठे असल्याने वाचन पुढे ढकलले इतकेच!

बेफी जी ---- आपल्या ? मधे मल अजुन एक कायम पडलेला ? म्हणजे --- ह्या लोकाना सैन्यात भरती होणे शक्य आहे का ? तिथे त्याना सगळ्याच अर्थाने काळजी घेतली जाईल ..म्ह्णजे काम मीळेल , त्याच्या ताकदीचा / क्षमतेचा उपयोग होयिल, अर्थार्जन , आणी तुमच्या १ . आणी ४ . ह्या ??? ची काही अन्शी उत्तरे मीळण्यास हरकत नाही . .....

वरदा म्हणते त्या प्रमाणे मला पण ह्या लोकान्चा चागला अनुभव आहे ..पण सुरुवातिला जाम घाबरले होते ...

साती ची पोस्ट अभ्यास पुर्ण ..

वरिल लिन्क वाचते आहे ....

अजय,

>> पण मी पाहिलेल्या पाश्चात्य देशात कुठेच एकत्रीतपणे इतके तृतीयपंथी पाहिल्याचे आठवत नाही.

याचं कारण म्हणजे भारतात तृतीयपंथी पूर्वापार वावरत आलेले आहेत. वैदिक परंपरेत त्यांनाही स्थान होते. यावर एक लांबलचक लेख सापडला. पूर्ण वाचला नाही. कदाचित तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील : http://www.galva108.org/Tritiya_prakriti.html

त्यामुळे न्यायालयाचा तृतीय लिंग स्वीकारण्याचा निर्णय एके प्रकारे वैदिक परंपरेशी मिळताजुळता आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

बेफिकीर,

>> (आता राहिले इतकेच, की एवढे सगळे ज्या न्यायालयाला समजते त्याला समलैंगीकता का पटत नसावी?)

न्यायालायाने समलैंगिकता हा प्रचलित कायद्यानुसार गुन्हा असल्याचे केवळ सूचित केले आहे. त्याच निकालपत्रात कायद्यात बदल करण्याचे काम न्यायासानाचे नसून सरकारचे आहे असेही नमूद केले आहे. सरकारने कायदा बदलावा असे सुचवले आहे.

तसेही पाहता समालैंगिक वर्तनाच्या व्यक्तींना वैदिक परंपरेत त्यांचे स्वत:चे स्थान होतेच. अधिक माहितीसाठी एक लांबलचक इंग्रजी लेख देतो आहे. मी पूर्ण वाचला नाहीये : http://www.galva108.org/Tritiya_prakriti.html

आ.न.,
-गा.पै.

प्रश्न इथे योग्य की नाही माहिती नाही पण बरेच जाणकार असल्याने विचारत आहे..
१) जे जन्मापासुन असे असतात त्यांच्या लैंगिक जाणिवा नक्की कशा असतात आणी कुठल एक लिंग नक्की नसल्याने त्या जाणिवा/ गरजा कधीच पुर्णपणे शमत नसतिल काय?

२) आई गरोदर असताना काही प्रॉब्लेम झाला तर अशी मुले जन्माला येतात की अस काही एक कारण नाही , व्यंगच आहे..

३) ज्यांना मुद्दाम अस बनवलं आहे त्यांच्या जणिवांच काय? जे बाळ मुलगा म्हणुन जन्माला आलं आहे त्याच लिंग बदलणे इमॅजिन होतय (बरोबर की नाही माहित नाही) पण मुलिंच लिंग जबर्दस्ति बदलणे/ त्यांना अस बनवणे हे कस होत?

माननिय प्रशासक
हा काय प्रकार आहे ? हे बेफिकिर म्हनजे राश्ट्रपतिचे दुत आहे का ? हे काहि पन जुलाब केल्यासारक लिहुन ठेवतात आनि दुस-याच्य इथ येउन दमदाटि करतात. हि दडपशाहि नाहि का ? आपन न्याय करावा. आपल्यावर पुर्न विश्वास आहे.

जर हे राश्ट्राति असतिल तर काहि म्हनन नाहि. पन आमच्यसारकेच सामान्य सदस्य असतिल तर सारखि सारखि प्रत्येक ठिकानि वॉर्निन्ग द्यायला यान्चा काय अधिकार आहे याचा खुलासा व्हावा. याना अशे अधिकार असतिल तर म्हनने मागे घेतो पन नसतिल तर याना कन्ट्रोल मधे ठेवावे हि नम्र विनन्ति. त्याना तक्रारि करायच्या असतिल तर आपल्याजवल करायला सान्गाव्यात हि विनन्ति.

रमा.
तुम्हि कोन आहात हे माहित नाहि. पन बेफिकिर यानि माझ्या प्रत्येक धाग्यवर येउन काय प्रकार केला हे पाहिले नाहि अस वाततय. साति यान्च्या धाग्यवर पन जिथ तिथ कुजक नासक लिहित आलेत. याना विचारुन इतरानि धागे काडायचे का ? याना आधि पन सान्गितल होत काय तक्रारि असतिल तर मायबोलिकड करा. कुजक नासक लिहु नका. पन कालच्य धाग्यवर पन तेच. तो धागा उडवला . तुम्हि विचारल म्हनुन खुलासा करतो.

काल ग्रुहमन्त्र्यान्च्या एका वाक्यावरुन सगळिकड गोम्धळ चालु होता. राजिनाम्याचि मागणि होत होति. त्यावरुन त्यानि राजिनामा द्यावा का अस टायटल असलेला धागा मि काडला होता. इब्लिस यानि कळले नाहि म्हटले म्हनुन एका बातमिचि लिन्क पन दिलि आणि ति बातमि कोपि पेस्ट पन केलि. तर यानि तिथ प्रसासक याना भल मोठ पत्र लिहिल. हे करायचि काय गरज होति ? त्यान्च्यकडेच द्यायच पत्र. ते डुख धरल्यासारक वागत आहेत म्हनुन त्यान्च्यासारखिच इथ तक्रार केलि आहे. यात कुनाच चुकल ? ताई तुम्हि बेफिकिर यान्च्या फेन नसाल तर सान्गा.

त्यानि ओब्जेक्शन घेतल होत कि अस टायटल कस काय चाल्त ? हा विशय कस काय चाल्तो ? आता जो विशय जिव्हाल्याचा असल त्यावरच मानुस लिहिनार का ? सगलि दुनिया काल राजिनामा मागत होति म्हनजे कायतरि कारनच असल ना ? ते आम्हाला जिव्हाल्याच वाटल. छक्क्यान्चा प्रश्न याना जिव्हाल्याचा वातला. मग कुनाला ओब्जेक्शन असलच कि त्यावर पन. पन घेत्लय का कुनी ? ज्याचा त्याच इन्टरेस वेगला.

Pages