पंचनामा.

Submitted by किश्या on 16 March, 2014 - 05:58

आज सुदाम सकाळीच रानातुन चक्कर मारुन परतत होता. चेहर्यावर जरा जास्तच आनंद होता..डोक्यात काय काय विचार चालु होते.. या वेळेला पिक चांगले आले आहे. मागच्या वर्षी दुष्काळामुळे आपल्या हातात काहीच लागले नाही.. आणि घर दुरुस्त करायचे होते ते सुध्दा राहिले नविन काहीच वस्तु पण घेता आली नाही.. कमीत कामी ह्या वर्षी तरी ते करता येईल... आणि मुलीच्या लग्नाचे कर्ज देखील फेडता येईल. म्हणजे मुलाच्या शिक्षणाला पण खर्चला सुद्धा ठेवता येईल...

"काय सुदामा कसा काय म्हणतीय पिक पाणी?? औंदा काय लै मज्जा आहे राव तुझी.. जवारीच कणीस तांब्या सारख पडलयं मर्दा रानात" पाटील.

"राम राम पाटील. वाईच जाऊन आलो रानात आत्ता जवारी आलीया भरत आता. यंदा पाऊस चांगला झालाया.. जवारी, गहु, आणी लागलच तर थोडफार उस बी हाय.. जरा दिसतय चांगलच तवा निघल पिक चांगल समदी वरच्याच कृपा बघा..." सुदामा..

"हाई का बार खिश्यात जरा लावला असता...बस जरा वाईच काय हाय घरी तरी जाशील घटका भर बसुन" पाटील.

हे ऐकताच सुदामाचा हात खिश्याकडे गेला. बंडीतुन हात घालुन चंची बाहेर काढली आणि तंबाखुला चुना चोळायला लागला..

"कसा हाय पाटील आपली काळजी वरच्यालाच असते बघा... आता हेच बघा ना मागल्या वर्षी पाऊल लैच कमी पडला. कापसाला उतार कमी आला.. त्यापाई पैका बी हातात कमीच पडला... जवारी तर घरी खाया पुरतीच आली मंग घरी काय ठेवायची आणी इकायची काय.. त्यात मुलीच लगीन झालं... लै परेशान झालो बघा... कर्ज चा बी लै तगादा लागला होता. पण देवाच्या कृपेने औंदा सगळ ठीक ठाक झालाया... " सुदामा.

"कस हाय सुदामा आपुन आपल्या परीने कष्ट केले ना की वराचा बराबर फळा देतुया तवा काळीजी नकोस करु तो आहेच आपल्या सोबत." पाटील पिचकारी टाकत म्हणाले..

"येतो पाटील घरी माणुस वाट पाहत असेल.. भाकरी घेऊन परत रानात जायच हाय."

"बर ये बोलु नंतर.."

सुदामा आखरावरुन घराच्या दिशेला निघाला.. घरी आल्या आल्या त्याने अंघोळ करुन देवकी समोर जेवणाची परात घेऊन बसला. देवकीने कालवण आणि भाकरी परातीत ओतुन बोलु लागली..

"काय हो औंदा खोती द्यायची का जवारी काढायला.. पोरगी बी नाय हाताखाली आपल्या आणि म्हयच्यान नाई व्हायची काढन जवारी समदी.."

"बघु की थोडासा हाय येळ अजुन आपल्या कड आत्ता तर कुठ हुरडा संपत आलाय... होळी झाली की लागु कामाला लागु आपन. कालवण लै झक्कास झालया बरका.. संतु कुठ दिसना झाला त्यो कुठ खपलाय?"

"अहो त्यो गण्या कड गेलाया कुठल तरी पुस्तक विसरा हाय म्हणे कसल तरी"..

"चल भाकरी बांध लवकर जातु जरा लवकर रानात पाणी बी द्यायच ऊसाला आधीच तर लाईट नसती आता हाय तर टाईम नग घालवायला"

हे सगळ सांगायच्या आधीच देवकीने भकरीच गठुड बांधुन तयार केले होते. सुदाम्याने बैल गाडी जुंपुन रानात निघाला होता.. सोबत रेडीओ घ्यायला विसरला नाही.. तेवढाच काम करताना विरंगुळा म्हणुन.. दुसर काही लागत नसल तरी बिड केंद्र तर हमाकस लागायचा आणी विविध भारतीवर ५ वाजता बातम्याही ऐकायला मिळायच्या...

अरं ये नवन्या एक गाय छाप घे बर संपत आलीया पुडी... जाता जाता नवनाथ च्या तपरीवरुन गायछाप घेऊन खिशात कोंबत रानात जायला तो सज्ज झाला होता.. जाताना तो सगळ्यांचे राम राम घेतच होता.. रानात गेल्यावर बैलाला पाणी पाजुन त्याणे आंब्याच्या झाडाखाली सोडले...सोडता सोडता एक नजर त्याने झाडाला लागलेल्या कैर्याकडे टाकली...अजुन छोट्याच होत्या...तरी पण त्याला बर वाटलं...

चला मोटर चालु करुन पाणी दार्यात सोडुन द्याव आणी निवांत पडाव थोडावेळ असा विचार करुन त्याने तंबाकु तोंडात टाकली आणि स्टार्टरच बटन दाबलं.. दार धरुन आल्यावर त्याने रेडीओ चालु करुन आंब्याच्या झाडाखाली अंग टकुन दिलं...

त्याला जाग आली ते रेडिओवरच्या बातम्यांच्या आवाजाने..
"आजच्या ठळक बातम्या....."

"मलेशिया वरुन बिजींगला जाणारे विमान अचानक गायब.. अपघाताची शक्यता"
"मोदींचा आज महाराष्ट्र दौरा... आज पुण्यात"
"लोकसभेच्या निवडणुक तारखा जाहीर....."
"पश्चिम महाराष्ट्रात गारापीटीची धुमाकुळ"

हे ऐकुन सुदामाच्या काळजातत धस्स झालं.. डोक्यात विचारांच काहुर माजलं.. आपल्याकडे गारपीट झाली तर हातातोंडाशी आलेला घास निघुन जायचा...आणी सगळे स्वप्न जागीच विरुन जायचे..... अश्या विचारतच तो वर आभाळाकडे बघु लागला तसा अंदाजच तर काहीच दिसत नव्हतं पण तो घाबरला होता हे खरं... संध्याकाळ झाली तसा तो घाराकडे परतण्यासाठी निघाला...

घरी आल्यावर त्याने देवकीला ऐकलेली बातमी सांगितली तसे तिला पण धस्स झाल पण तिचा देवावर फार विश्वास होता...

"अवं अस काई म्हणु नगा सा काई व्हणार नाई.. त्यो आहे ना त्यालाच काळजी हाय आपली... त्याला काय कळत न्हाई का आपण आपल्या पोटच्या पोरासारखं जपलया आपला पिकाला ते...."

"बघु काय होतय ते त्यालाच काळजी.."

जेवण झाल्यावर देवकीने चुल सारवुण झोपण्याच्या तयारीला लागली... तेवढ्यात वार सुटलं....सुदामाच्या आभाळाकडे पाहील तर ढग दाटुन आले होते... आणि तासाभरातच वादळ सुरु होऊन पावसाला सुरुवात झाली होती... घरावरी पत्रे वरच्या दगडाला जुमानत नव्हते... ते हि तग न धरता शेजार्याच्या परसात जाऊन पडले होते..
छप्पर राहीलच नव्हतं आहे ते सामान आवरण्याच्या मागे सुदामा आणि देवकी लगले होते... तेवढ्यात गारा पडु लागल्या... बैलांना गारांचा मारा सहन नव्हता होतं ते जिवाच्या आकांताने ओरडत होते... सुदामा त्यांना सोडयला धावला.... त्यांना सोडुन येई पर्यंत.. स्वंयपाक घरात भाजीचे डालगे.. पिठाचे डबे परसाच्या मार्गावर लागले होते... त्यांना वाचवणे शक्य नव्हते... सगळा संसार सोडुन सुदामा त्याच्या बायका पोरांना घेऊन मारोतीच्या मंदीरा कडे पळाला होता.... कारण आसरा तिथेच मिळणे शक्य होते.... मंदिरात पोहचल्यावर मंद दिवाच्या प्रकाशात मारुतीची मुर्ती त्याच्याकडे पाहुन हसत असल्याचा भास सुदामाला झाला होता....

रात्रभर....रात्रभर पावसाचा थैमान चालु होता..वरुन आभाळ सुदामाच्या स्वपणांवर पाणि फिरवत होता आणि त्याचा निचरा सुदामाच्या आणि देवकीच्या डोळ्यातुन होत होता...

पहाटे पहाटे पाऊस थांबल्यावर त्याने आधी बायकोला घेऊन घराकडे गेला.... घराची अवस्था तर पहाण्यासारखीच नव्हती..... एक पत्तरही जाग्यावर नव्हतं... सगळाच सगळाच संसार वाहुन गेल्यासारखा झाला होता... बैलही बाभळीच्या झाडाखाली आसरा घेऊन उभे होते....

"देवके एक काम कर आता हे सगळ आवर.. पाटला कडुन किलोभार जवारी घेउन ये आणि भाकरी कर मी रानातुन चक्कर मारुन येतो बघतो काही उरल आहे का ते..." भरलेल्या डोळ्याने तो निघाला होता.. बैलांना शेतात न्यायचा काही संबधच नव्हता कारण त्यांना आधी दवाखाण्यात घेऊन जाने गरजेचे होते.. गारांमुळे त्यांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या..

सुदामा शेताच्या बांधावर उभा राहुन आपल्या स्वप्नांची माती झालेली बघत होता.... एकही कणीसाची माण वर नव्हती सगळे मातीते झोपुन गेले होते...मातीत गारांचा थर साचला होता..आंब्याचा झाडाला एकही कैरीच काय पान ही शिल्लक राहील नव्हतं...उभा उस पार आडवा झाला होता.... बैलांपुढे टाकायला एक वाढगही शिल्ल्क राहील नव्हतं.... हे सगळ बघुन सुदामाच्या पायातील त्राण निघुन गेले होते.... डोक धरुन खाली बसायच सुध्दा त्याला समजत नव्हतं...

दुसर्या बांधावरुन पाटलांनी हाक मारली....

"अरं ये सुदामा काय झाल रे हे.... सगळच गेल की रं काहीच उरल नाही कस व्हायच र आता.. "
"मालक काईच समजत नाय बघा" हे अस बोलुन सुदामा लहान मुलासारख रडत होता...

******************************************************************************************************************

चार दिवस............ चार दिवस सलग गारांच थैमान चालु होत... होत नव्हत ते सगळच गेल होतं....दरम्यान त्याने बातम्यात ऐकल होत की सरकार पंचानामा करुन नुकसान भरपाई देणार होत... पण त्यासाठीही आचारसंहीता होती म्हणुन काहीच तातडीचे आदेश निघत नव्हते...

"उद्यापासुन महाराष्ट्रात शेतकार्याच्या नुकसानीचे पंचनामे सुरु होणार आहेत.."

दुसर्या दिवशी तलाठी गावात आला... सरपंचाच्या म्हणन्यानुसार तलाठीने ठरवले की समिती येईपर्यंत कमीत कमी रानातुन एक चक्कर मारुन यावं म्हणजे अंदाज तरी कळेल की किती नुकसान झाल आहे ते. सुदामा ग्रामपंचायतीत हजर होताच सगळ्यांच्या मतानुसार सगळ्यानी सुदामाच्या रानात जायच ठरवलं....

तलाठ्याने बांधावरुनच नजर फिरवली... अस वाटत होत की तिघे जवारी नसुन फक्त चिखलच होता... तलाठी आणि सरपंचात काहीतरी कान गोष्टी झाल्या सुदामाला काहीच कळाल नाही काय चालु आहे ते.. पण......

संध्याकाळी सरंपच घरी आले...
चहा पाणी झाल्यावर सरपंच सुदामाला म्हणाले, "सुदामा मी बोललो तलाठ्याशी पंचनाम्यासाठी तो पैसे मागत आहे.... आणि तो ऐकत पण नाहीये रे.. म्हणतोय की समिती येणार हाय तर ते बी पैसे मागतात म्हणजे त्याच्या शिवाय पंचनामा होणार नाही म्हणे......"

"किती मागतोया पैसे.....???" सुदामा अगतिकपणे विचारत होता..

"५००० रुपये तरी लागतील म्हणत होता...." सरपंच

"पर मालक कुठुन आणायचे पैसे येवढे.. आमी गरीब माणस .. तुम्ही बघतच हैसा ना की सगळच वाहुन गेलया.. बैलाला बी दवाखाण्यात न्यायला पैसे नाहीत..."

"अरं ते बरोबर आहे रे पण मी तरी काय करु सांग... त्यो ऐकतच नाहीये आता काय वाटल तर उद्या बोलुन बघ ऐकल तर ऐकल तर तुझं मला निरोप द्यायचा सांगितला होता मी दिला माझ काम संपलया आता..."

हे ऐकुन सुदामाच्या पायाखालची जमीन सरकली....सरपंच निघुन गेल्यावर सुदामाला काहीच समजत नव्हतं काय करायच ते... तो सरळ पाटला कडे गेला....

"पाटील तुम्हीच सांगा काय करायच ते त्यो तलाठी पैसे मागत आहे हो पंचानामा करण्यासाठी... अवो कुठुन आणु पैसे आता त्याला द्यायला?? सगळच वाहुन गेलया. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर हाय तुम्हाला तर सगळं माहीती हाय.. मुलीच्या लग्नात सगळं साचवलेल गेल हो मालक.. आणि आता ह्या वर्षी पाऊस पाणि चांगल झाल होतं म्हणुन उस बी लावला होता... ते बी बँकेच कर्ज काढुन... पर सगळच गेल हो पाटील काय करु.. बायकोला बी काही आनता नाही आलं.. पोराची फि भरायचीया नाय भरली तर पोरग एक वरीस माग पडलं....आणि मला त्याला मोठेपणी माझ्या सारख नाय करयाच कर्जबाजारी....आता नाही शिकल तर कधी शिकल त्यो???? बैल बी अंगान सुलजेत हो गाराचा मार खावुन खावुन त्यांचे बी हाड दुखत असतील त्यांच्या जखमा बी चिघळल्यात पन औषध आनाया एक रुपाया बी नायं... आता त्यांना तोंड नाही म्हणुन बोलता येत नाही हो पर आपल्याला कळतयाना त्यांच दुखणं....घर बी नाही र्हायलं ते बी पडुन गेलया ते कधी दुरुस्त करुन आणि माझा संसार कधी लावु????" सुदामाच्या डोळ्यातल पाणि थांबत नव्हतं....

हे सगळ ऐकुन पाटलांच्या डोळ्यात बी पाणि आलं होत पण ते तरी काय करणार होते.. सरपंच होतास तसा... त्यांना माहीती होत की तो तलाढ्यासोबत सगळ्या योजनांचे पैसे खातो म्हणुन....आणि पाटलांना हे पण माहीत होत की तक्रार करुनही काही होणार नव्हत कारण तहशीलदारालाही हप्ता जात होता... हे सगळ असच चालु होत कित्येक वर्षांपासुन......

"सुदामा काय कराव तुझ सांग आता ते मला बी पैसे मागत होते, मलाच समजत नाहीये काय कराव ते.... तक्रार करुनही काही उपयोग होनार नाहीये.. समितीला येऊ देत बघु काय होतय ते "

दोन दिवासांनी समीती आली... ठरल्या प्रमाने पंचनामे सुरु झाले....

"काय रे किती लांब आहे शेत तुझं??" तुक्या ला विचारलं...
"जी जवळाच हाय चला की बांधावर जावुन बघु" तुक्या.
"त्याची गरज नाहीये सांग रानात काय काय होतं? "
"जवरी आणी करडी" तुक्या...
"काय हो तलाठी साहेब खरय का हे??"
"हो ७/१२ वर नोंद आहे" तलाठी
"किती उरल पीक तुझ"
"सगळच गेलया साहेब काहीच राहील नाहीये" तुक्या
"ठीक आहे.. परतावा किती द्यायलास??? "
"म्हणजे??" तुक्या
"कळत नाहि का रे तुला, तुझ्या मायला सांग पैसे कधी देतो ते.."
"मालक नाही हो काहिच नाहीये काही तरी करा"...
"चल रे उठ रे... तलाठी १०% नुकसान टाका"
"चल रे सुदामा बोल किती नुकसान झालय??"
"मालक बैलाला कडबा बी नाय उरला हो टाकायला...."
"पैसे आणलेस का? "
"नाई ओ मालक काहीच उरल नाही सरकारी मदद मिळाली तर काही तरी होईल न्हायतर विष घ्यायला पैसे न्हाईत"
"सगळ्यांच तेच हाल हायेत सुदामा.. माझ्याच रानात काय उरल न्हाई मग मी कस करु सांग मला बी पैसे पाहीजेत ना पुढच्या वर्षी शेती करायला.. तुम्हाला काय सरकार देईल भरपाई आमच काय आम्हाला ते बी मिळायच नाही कारण आम्ही तलाठी ना आम्हाला पगार मिळतो.... साले सगळ्या भरपाया तुम्हाला आम्हाला काही मिळायला नको का?? पैसे देत असशील तर बोल नाही तर काहीच मिळनार नाही सरकार कडुन...आन आम्ही नोंद करणार नाही.."

"अवो मालक अस नका हो करु काही तरी दया करा...वाटल तर जे पैसे येतील त्यातले काढुन घ्या पर अस अन्याव नका करु......"

"चल रे उठये इथुन काही होणार नाहीये...."

त्रासुन गेलेला सुदामा घरी आला तो काही तरी ठरवुनच..... देवकीने भाकरी थापुन ठेवल्या होत्या... रागा रागा जेवण करुन दोघही झोपी गेले.....

****************************************************************************************************************

दुसर्‍या दिवशी सकाळी पेपरला बातमी होती..

"राज्यात गारपीटीचा पहिला बळी गेला..........."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयानक वास्त्व..
६७ वर्ष झाली स्वातंत्र्य मिळुन. कोणतही सरकार आलं तरी हे बदलणार नाही.
हर हात कटोरा.. हर हात बाबाजी का ठुल्लु...

खरोखर सुन्न करणारे कथानक .......

काय करीत असतील बिचारे शेतकरी ?? कोणाकडे याची फिर्याद करणार ??

शशांक जी...
काय करणार शेतकरी बिचार.... खर सांगतो पिक कर्ज काढयला सुध्धा बँक वाले खुप त्रास देतात...
खताचे भाव वाढतच राहतात... बी बियानावर खुप खर्च होतो.. शेतीच्या कामाला मजुर मिळत नाही... चुकुण मिळालाच तर दुप्पट पैसे घेतो... गोढ्यात दुष्काळा मुळे एक जनावर राहिल नाही...:( आणि अजुन किती तरी अडचणी फेस करत ते शेतीच करतात आणि देशाला जगवतात...

खुप त्रास होतो असं काही वाचलं, बघितलं का? आपल्याला अन्न देणारा शेतकरी मात्र उपाशी झोपतो. देशाला जगवतो पण स्वतः आत्महत्या करतोय. कधी बदलणार हे सर्व Sad
आपण काय करु शकतो आपल्या अन्नदात्यासाठी?

मी जे लिहिते आहे ते चूक आहे. पण तरीही मनात आले ते स्पष्टपणे लिहिते, कथेतल्या सुदाम्याला जर आत्महत्या करायचीच होती तर तलाठी आणि तहसिलदाराचा बळी घेऊन मग आत्महत्या केली असती तर बाकीचे शेतकरी तरी सुटले असते ना.

वास्तवाला धरुन कथासुत्र... खुपच चांगल्या वेदना मांडल्या गेल्या आहेत!
खते, किटकनाशके, बियाने, यांच्या किंमती वारेमाप वाढलेल्या आहेत.... यावर कोणाचेही नियंत्रण नाही.... आज चारही बाजुने सगळ्यात जास्त शेतकर्‍यांचीच लुट होत आहे.....सध्या शेतीएवढा हलकट धंधा राहला नाही.... त्यामूळे गावातली तरुण शेती करायला तयार नाहीत, शेतमालाला भाव नाही हेच वास्तव आहे.

गारांच्या वर्षावाचे फोटो तेव्हा कित्येकांनी मोठ्या आवडीने आणि हे आपल्या महाराष्ट्रात झाले या कौतुकाने एकमेकांना शेअर केले होते. ज्यात मी पण एक होतोच. आणि काही दिवसांतच बातम्या सुरू, गारपीटीच्या तडाख्याने पुन्हा एकदा शेतकरीराजाचा बळी घ्यायला सुरुवात केलीय. उभे पीक नष्ट झाल्याने आतापर्यंत अमुकतमुक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. एकीकडे आपण आयुष्यात आलेल्या अपयशांनी खचून आत्महत्या म्हणजे कमजोर मनाचे वा भ्याडपणाचे लक्षण वा आयुष्यावर प्रेम नसने वगैरे चर्चा करत असतो तर एकीकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती नैसर्गिक आपत्तींमुळे निर्माण होते. ज्याला रोखायला सारेच राज्यकर्ते नाकर्ते ठरतात. कोणीही त्या शेतकर्‍यांना साधा विश्वास देऊ शकत नाही की राजा यातून तू बाहेर पडशील. कारण सरकारने मदत करायची ठरवली तरी त्याच सरकारचे सेवक ती शेतकर्‍यांपर्यंत न पोहोचता स्वताच्या खिशात कशी जाईल हे बघतात. भ्रष्टाचार या देशात इतका पसरला आहे की मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे ही एक रीतच झाली आहे. बरे तो मरणारा मरूनही प्रश्न जैसे थे च आहे. शेतकर्‍याने आत्महत्या केली या बातमीवरच तो विषय संपत नाही. तर पुढे त्याच्या कुटुंबियांचे काय होते देवास ठाऊक. जे काही होत असेल त्याची बहुधा बातमीही बनत नसेल. ज्याला एकाच वादळी तडाख्यानंतर आत्महत्या करावी अशी परिस्थिती उद्भवत असेल त्याचे नेहमीचे जीवनही काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी. शहरात बसून तरी ती कल्पना नाहीच येत. थोडीफार करून दिलीत या कथेच्या निमित्ताने त्याबद्दल आभारी आहे.

मला असे वाटते की कथेत जरा कल्पकता आणून शेतक-याने परिस्थितीवर मात करण्यासाठीचे उपाय शोधले असते (कल्पकताच, प्रत्यक्षात अवघड आहे हे मला पूर्ण माहिती आहे) तर थोडे पॉझिटिव्ह सिग्नल देता आले असते. विचार करायला हवा की जर सरकार मदत करत नाही आणि जर स्वत: परिस्थितीतून उठता येत नाही तर मदत आणखी कुठे कुठे मागता येईल?
प्रश्नाना उत्तरे आता शोधायलाच हवीत

व्हेञ्चर फंडिंग करता येईल का? शहरवासीय मदत करू शकतील का? अशा लोकांपर्यंत कसे पोचायचे? इ. इ.

वनीता जी तुमचा विचार खरच खुप चांगला आहे...
शहरवासीय मदत करू शकतील का?>>>
खरचं याचा विचार करायला पाहिजे कारण कथावाचुन माझ्या मित्रांचे हेच म्हणने होते की तो काही मदद करु शकतो आर्थिक सुध्दा...
खरच आपल्याला अस काहीस करता येईल का??
अशी काहीशी संस्था उभी करता येईल का???
जी शेतकर्‍यांना अश्या परीस्थीतीत मदद करण्यात कामाला येईल...
कुणाचे काही मत आहेत का ह्या बद्दल???