काय घडतंय मुस्लिम देशांत? प्रस्तावनेचा समारोप -

Submitted by शबाना on 6 April, 2014 - 14:39

या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.

http://www.maayboli.com/node/48375

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.

मी प्रयत्न जरूर करेन इथे येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा - पण सगळ्यांचीच उत्तरे नाहीत माझ्याकडे, वाचन आहे आणि काही विचार आहेत. इथल्या प्रतिक्रियाव्यतिरिक्त मला बऱ्याच जणांनी संपर्क करून काही सूचना, प्रश्न आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. स्वतःबद्दल व त्यांच्या मतांबद्दल अगदी प्रांजळपणे लिहिले आहे. मी सर्वांची आभारी आहे कारण यामुळे लिहिण्याचा हुरूप वाढला पण त्याचबरोबर माझ्या मनातल्या काही शंका दूर झाल्या.

एक कबुली आधीच द्यावी असे वाटते. बाकी लिखाणापेक्षा हे लिखाण थोडे गंभीर आहे कारण विषय तसा आहे. या विषयावर खूप सरळसोट, बेछूट असं ऐकण्याची, वाचण्याची तशी सवय आपल्याला आहे. प्रयत्न करूनही मला साधं या विषयावर लिहिता येत नाही. मला स्वतःला लिहिलेलं क्लिष्ट वाटतंय. त्यामुळे इथे आलेल्या प्रतिसादांबरोबर मी सहमत आहे. पण साध्या, सोप्या, रंजक शैलीत सगळंच बसणार नाही त्यामुळे काही गोष्टी रटाळ वाटतील कदाचित. बराच भाग इतिहास आणि या प्रदेशातल्या राजकारणावर आहे. दोन्ही विषयांवर एकमत असणे अशक्यप्राय . घडलेल्या घटनांचे अगदी सतराशे साठ अनुवाद होऊ शकतात. लोकांच्या विचारप्रणाली, अनुभव, माहिती, कुठून माहिती मिळाली त्याचा स्त्रोत या सगळ्या घटकांनुसार घटना, व्यक्ती आणि त्याचे संदर्भ वेगळे असणार. लोकांनी ते जरूर मांडावेत. पण, 'मी असे ऐकले होते, वाचले होते आणि तू असे म्हणत आहेस तर अमक्या तमक्याचा खुलासा आता कर'च' - नाही तर तुझे म्हणणे चुकीचे असा, ' बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल', हा अटीतटीचा सामना रंगवूयात नको!

प्रस्तावनेत म्हणल्याप्रमाणे अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या संकल्पना, सिद्धांत यांचा आधार घेऊन विवेचन केले आहे. मराठीत यातल्या संज्ञा किचकट वाटतात आणि त्याला काही पर्याय नाही. त्यामुळे फार जांभया आल्या तर एक कॉफी, चहा आपापल्या आवडीप्रमाणे करून घ्या अशी नम्र विनंती.

शुद्धलेखनाच्या चुका राहून जातात. पण या मुख्यतः मराठीत संगणकावर टंकलेखनाचा तितका सराव नाही, त्यामुळे आहेत. अन्यथा मास्तरणीच्या मुलीकडून असा प्रमाद घडणार नाही. गालावर उठलेल्या बोटांची आणि त्याबरोबर मनात उठलेल्या जळजळीत तरंगांची आठवण आयुष्यभर ताजी राहील इतका सराव बाईंनी करून घेतला आहे. एकून 'शिक्षिका' नाव सार्थ आहे या जमातीसाठी -- असले आततायी अनुभव देणाऱ्या बायांना आणखी काय म्हणणार?

थोड्या छुप्या आणि काहीजनांनी उघडपणे व्यक्त केल्याप्रमाणे माझ्या नावावरून काही ग्रह लोकांनी बांधलेले दिसतात म्हणून हा एक खुलासा. माझ्या नावावरून माझी 'सामाजिक - धार्मिक' ओळख मुस्लिम वाटते आणि ते खरे आहे. पण त्यामुळे या समाजात जे काही दिसते, चालते चांगले किंवा वाईट , त्या सगळ्याचे मी प्रतिनिधित्व करत नाही. कदाचित काही गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे थोडं वेगळं ज्ञान असू शकेल, पण ते परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. माझा जन्म मुस्लिम कुटुंबातला आणि माझ्या आईकडून माझे धार्मिक शिक्षण झालेले आहे जरूर, पण मला धर्मातील सगळ्या गोष्टींचे आकलन झाले आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. जिथे आपण जन्मलो, जे संस्कार आपल्यावर झाले आणि आपल्याला अतिशय जवळच्या, वंदनीय लोकांनी सांगितले, शिकवले तेच अंतिम सत्य हे मला पटत नाही. या अर्थाने मुस्लिम ही माझी ' सामाजिक - धार्मिक' ओळख असे मी म्हणते. मुळातच धार्मिक शिक्षण हे फार व्यक्तीवादी असे माझे मत आहे. आपल्याला ज्या कोणाकडून हे शिक्षण मिळते त्या व्यक्तीच्या स्वतःच्या आकलनानुसार, अभ्यासानुसार, अनुभवानुसार तो/ ती आपल्या चेल्यांना घडवत असतो/ते. हेच कारण आहे अगदी लिखित परंपरा असणाऱ्या एकग्रंथी इस्लाम, ख्रिश्चन अशा धर्मांमध्येही अनेक पंथ, अनेक प्रवाद अगदी प्रेषित काळापासून दिसून येतात. धर्मसंस्थापक आणि नंतर प्रसारक जे सांगतात, आपला अध्यात्मिक अनुभव, समज आणि शिकवण ते समजण्याची कुवतही प्रत्येकाची वेगवेगळी असते. उदा द्यायचे झाले तर उद्या परग्रहावर सृष्टी आढळली तर तिथे जी व्यक्ती पहिल्यांदा जाईल ती व्यक्ती पृथ्वीची प्रतिनिधीच. ती पृथ्वीचे वर्णन ज्या प्रकारे करेल त्यावर तिथल्या प्राण्याची ( मनुष्यच असेल कशावरून? ) पृथ्वीची समज बनेल. आता जाणारी व्यक्ती नारळीकरंसारखी शास्त्रज्ञ असेल तर तिचे समजावणे आणि समोरच्या प्राण्याची पृथ्वीची समज वेगळी असेल. पण जर दुसरी व्यक्ती उदा जावेद अख्तर सारखा कवी वगैरे असला तर पृथ्वीचे रसभरीत वर्णन करेल आणि पुढे सोचा है क्या कभी? असे फरहानच्या आवाजातील गाणेही ऐकवेल. Happy यावरून त्या प्राण्याची समस्त पृथ्वीतलाची व तिथल्या मनुष्य समाजाची धारणा बनेल. अशा समजावण्यात त्या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या असतात - समोरच्याची भाषा, आकलनशक्ती, समज ई ई कुठलाही अध्यात्मिक किंवा धार्मिक अनुभव व शिक्षण थोडे याच मार्गाने जाते असे मला वाटते. एका अर्थाने माझ्या मां कडून माझे शिक्षण झाले ते चांगलेच. कारण कुठल्याही एका चौकटीत बसणारी ती नाहीच आणि ती जरी काही गोष्टी निग्रहाने पाळत असली तरी तिने आमच्यावर कुठल्या गोष्टीची सक्ती केली नाही. आज ही सगळे धार्मिक विधी ती करते, आम्ही पाळावेत अशी तिची अपेक्षा बोलून दाखवते आणि जेव्हा करायचे तेव्हा एक पालक म्हणून सगळे संस्कार तिने केले. पण खोट्या अभिनिवेशाने येणारा दुराग्रह कधी त्या शिक्षणात नव्हता. सर्व धर्मांचा आदर आणि त्याबद्दल वाचन, विचार चिंतनास माझ्या मां बाबांनी प्रोत्साहनच दिले. कुठल्याही एका पठडीत न बसता वाढण्याचे जसे फायदे असतात तसे काही दुष्परिणाम ही असतात. त्यातून आम्ही अगदी सही सलामत गेलो कारण धर्म, पेशा यातून व्यक्त होणारी दोघांची परोपकारी आणि कर्तव्यनिष्ठ वृत्ती आणि वागणूक आणि त्या आधारावर असणारी सर्व धर्म समुदायातली त्यांची आणि आमची उठबस. यानंतर मुस्लिम म्हणून येणारे काही नेहमीचे अनुभव होतेच - विखारी जातीयवादाचे दाहक चटके ही होते. पण एकुणातच माणुसकीने वागणाऱ्या आणि विश्वासाने हात पुढे करणाऱ्या लोकांची संख्या नेहमीच अधिक होती. वाईट अनुभवांचे वैषम्य उगाळण्यापेक्षा सकारात्मक अनुभव वाढवणे मला जास्त संयुक्तिक वाटते. या अनुभवांवर कधी तरी लिहीन. आपल्यापैकी काहींनी व्यक्तिगत विचारणा केली त्याच्या उत्तरादाखल ही माहिती.

भारतातील मुस्लिम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांवर विविध अंगाने लिखाण झालेले आहे. जगातील तिसऱ्या नंबरची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत स्वप्नवत अशा नाही तरीही बऱ्याच एकोप्याने अजून तरी एकत्र आहे. फाळणीचा दाह सोसलेली आणि पाकिस्तानच्या द्विराष्ट्रिक सिद्धांतास पुरून उरलेली नवीन मुस्लिम पिढी समाज व राजकारणात भारतीय संविधानाच्या आधारावर घट्ट पाय रोवून उभी आहे. मुंबई, गुजरात, मुझप्फ़रपूर हे घडत असतानाही या देशाच्या विकासाचा आणि भवितव्याचा आपण भाग आहोत हे येथील बहुसंख्याक मुस्लिम जाणतात आणि त्याप्रमाणे आपापल्या परीने प्रयत्नरत असतात. प्रत्येक धर्म व समुदायाचे आपआपले प्रश्न आहेत, समस्या आहेत. परंतु मुस्लिमप्रश्नाला एक आंतरराष्ट्रीय परिमाणही आहे आणि कळतनकळत इथल्या मुस्लिम आणि आम जनमानसावर त्याचा प्रभाव आणि परिणामही आहे. धार्मिक हिंसाचार आणि उन्मादाने हा प्रश्न सुटणारा नाही. त्यातून अधिक जटील समस्या पुढे येणार आणि त्याचा राष्ट्राच्या सर्वच अंगांवर भीषण परिणाम होणार, त्यामुळे काही लोकांना वाटले तरी हा समस्येचा उपाय होऊच शकत नाही. येणाऱ्या काळात देश आणि समाजासमोर असलेली आव्हाने पेलताना त्यांची शास्त्रीय उकल व्हावी, घेतले जाणारे निर्णय हे माहिती व अवलोकनाच्या आधारे घेतले जावेत आणि त्यातूनच भारताची पंचशीलावर आधारित पुरोगामी वाटचाल चालू राहावी अशी कळकळही यांमागे आहे. कुठल्याही समाजात धर्मांधता वाढली की स्त्रिया आणि मुली यांच्या हक्कांचे आणि स्पेसचे नियंत्रण, दमन होतेच. सर्वच धर्मसंस्था आणि त्यावर आधारित रूढी पुरुषप्रधान आहेत. मुस्लिम महिला जीवनाच्या साऱ्या क्षेत्रात अग्रेसर दिसतात परंतु त्यांची एकूण संख्या फार कमी आहे.साक्षरता, अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभाग, राजकीय सहभाग यांचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहे. तीव्र गतीने होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे या समाजातील महिलांचे स्थान हे गेल्या अर्ध शतकातील कामाची अगदी वाट लावणारे आहेत. हा माझा जिव्हाळ्याचा विषय आणि म्हणूनच या लिखाणाचे वैयक्तिक पातळीवर परिणाम होणार हे जाणूनही स्पष्टपणे लिहिण्याचा हा खटाटोप !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ही प्रस्तावना समारोप पोस्टही आवडली.

येणाऱ्या काळात देश आणि समाजासमोर असलेली आव्हाने पेलताना त्यांची शास्त्रीय उकल व्हावी, घेतले जाणारे निर्णय हे माहिती व अवलोकनाच्या आधारे घेतले जावेत आणि त्यातूनच भारताची पंचशीलावर आधारित पुरोगामी वाटचाल चालू राहावी अशी कळकळही यांमागे आहे >>. ब्राव्हो !

येऊदेत अजून !

शबाना,

तुमच्या लेखनातून एक दृष्टीकोन मिळणार आहे हे नक्की. तो सुसंगत असेल अशी अपेक्षा आहे. तसेच तो संतुलित ठेवण्याकडे तुमचा कल असेल हेही या लेखावरून कळतं. वाचायला उत्सुक आहे! Happy

आ.न.,
-गा.पै.

शबाना, you are becoming an asset of Maayboli! मी तुमची खूप मोठी fan बनत चालले आहे!
लिखाण अतिशय आवडलं! ह्या लेखमालिकेची वाट पाहात आहे. एक विनंती: जर मराठी शब्दाला अधिक प्रचलीत असा इंग्रजी वा हिंदी/उर्दू शब्द असला तर तो कंसात द्यावा म्हणजे समजायला सोपे जाईल.

किती सुरेख लिहितेस शबाना. भाषा सौदर्य म्हणजे काय? भाषेमध्ये कस काय सौदर्य असत? अस जर मला कोणी विचारलं तर मी हे तुझे लेख (आणि सगळेच ) वाचा अस इतरांना सांगीन .:)
लेखमालेच्या प्रतीक्षेत Happy

वाचतेय.. खूप प्रश्न आहेत जे वेळ मिळेल तसे, विषयानुरुप विचारेनच..

स्त्रिया आणि धर्माचा पगडा ह्यावर अचूक लिहिलय. it gets scary at times.

शबाना, प्रस्तावना वाचताना जे मनात लहान सहान प्रश्न उपस्थित झाले होते आणि जे विचार मनात आले होते त्याला साजेशी ही पोस्ट लिहिलीत. काही अपवादीत प्रकरणे वगळता मला समाजकारण, राजकारण, इतिहास या विषयांनी कधीच आकर्षित केले नाही त्यामुळे मला अधूनमधून कंटाळवाणे वाटणार हे कबूल करून तरीही नेटाने पुढचे लेखही वाचणार आहे. लिहीत राहा.

शबाना, प्रस्तावना वाचताना जे मनात लहान सहान प्रश्न उपस्थित झाले होते आणि जे विचार मनात आले होते त्याला साजेशी ही पोस्ट लिहिलीत >> +१.

सुंदर प्रस्तावना.

शबाना, परत एक विनंति. पुढचे लेखन करतान त्यात काही आपले किंवा ओऴखीतल्या लोकांचे वास्तव अनुभव अवश्य लिहा. तूमच्या लेखनात जो पर्सनल टच नेहमी असतो.. तो इथेही असवाच असे वाटते.

सर्व फार भाबड्या पद्धतीने लिहिले आहे. किंवा काहीतरी प्रुव्ह करण्यासाठी.

ऊदा :

<<पाकिस्तानच्या द्विराष्ट्रिक सिद्धांतास पुरून उरलेली नवीन मुस्लिम पिढी समाज >> म्हणजे काय? पुरुन उरली म्हणजे काय? का सध्या जास्त ऑप्शन्स नाहीत म्हणुन गप्प बसलेली ? त्यांना माहीती आहे की पाकीस्तानात तर जाता येणार नाही आणि गेलो तर हाल होतील म्हणुन इथे राहीले असतील तर त्याला कुठल्या सिद्धांताला पुरुन उरले असे म्हणता येणार नाही.

<<वाईट अनुभवांचे वैषम्य उगाळण्यापेक्ष<<>> ह्या पेक्षा वाईट अनुभव का येतात ह्याचा जास्त खोलात जाउन विचार करा.

<<मुंबई, गुजरात, मुझप्फ़रपूर हे घडत असतानाही या देशाच्या विकासाचा आणि भवितव्याचा आपण भाग आहोत हे येथील बहुसंख्याक मुस्लिम जाणतात >>> खरे तर असेच चालू राहीले तर हिंदू ना च ह्या देशात भवितव्य नाही असे वाटायला लागेल.

<<उदा द्यायचे झाले तर उद्या परग्रहावर सृष्टी आढळली तर तिथे जी व्यक्ती पहिल्यांदा जाईल ती व्यक्ती पृथ्वीची प्रतिनिधी<<>> पण ती पहीली व्यक्ती मुस्लीम असेल तर म्हणेल मी आधी मुस्लीम आहे आणि मग पृथ्वीची रहीवासी. आणि त्या परग्रहाला १००% मुस्लिम बनवणे हे माझे जीवित कार्य आहे.

प्रसाद१९७१,

तुमचे आक्षेप ग्राह्य आहेत. पण ही लेखमाला बऱ्याच मोठ्या मुस्लिम जगताबद्दल माहीती देणारी आहे. केवळ भारतीय मुस्लिमांसंबंधी नाही. त्यामुळे तुमचे आक्षेप योग्य असले तरी इथे उचित नाहीत असं माझं मत आहे.

भाबडेपणाने लिहिलेला लेख असला तरी चालेल. दृष्टीकोन मिळणं महत्त्वाचं, नाहीका? जागरूक भारतीयांनी त्यात भर टाकून स्वत:ची निरीक्षणे आणि मते यांची जोड द्यायला कुणाचीच हरकत नाही. Happy

आ.न.,
-गा.पै.

पण ही लेखमाला बऱ्याच मोठ्या मुस्लिम जगताबद्दल माहीती देणारी आहे>>>

पण ही माहिती खरी आहे असे इथे सर्व जण धरुन च चालले आहेत असे प्रतिक्रियांवरुन दिसते.
ह्या एकाच लेखात इतकी चुकिची गृहितके रेटुन सांगितली आहेत. असे करण्या मागचा उद्देश काही सरळ दिसत नाही.

गापै - तुम्ही सुद्धा ह्या असल्या भुलथापांना बळी पडावे. Sad

पण ही माहिती खरी आहे असे इथे सर्व जण धरुन च चालले आहेत असे प्रतिक्रियांवरुन दिसते.

तुम्हाला खोटं मानायचं असेल तर खोटं माना. कुणी अडवले आहे का?

आणि इथले लिहिलेले जर खोटे असेल तर खरे काय आहे, हे स्वतंत्र धागा काढून तुम्हीही लिहू शकता.

पण ती पहीली व्यक्ती मुस्लीम असेल तर म्हणेल मी आधी मुस्लीम आहे आणि मग पृथ्वीची रहीवासी. आणि त्या परग्रहाला १००% मुस्लिम बनवणे हे माझे जीवित कार्य आहे.

तुम्ही स्वतःला आधी पृथ्वीवासी माना, अन मग हिंदू माना, तुम्हाला कोण अडवले आहे? तुमचा प्रेफ्रन्स हाच आदर्श आहे, हे ठरवणारे तुम्ही कोण?

प्रसाद१९७१,

एकीकडे तुम्ही म्हणता की :

>> सर्व फार भाबड्या पद्धतीने लिहिले आहे. किंवा काहीतरी प्रुव्ह करण्यासाठी.

आणि दुसरीकडे म्हणता :

>> ह्या एकाच लेखात इतकी चुकिची गृहितके रेटुन सांगितली आहेत. असे करण्या मागचा उद्देश काही सरळ दिसत
>> नाही.

नक्की काय ते ठरवा. Happy क्षणभर गृहीत धरूया की शबाना यांना काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. तर काय सिद्ध करायचं आहे असं तुम्हाला वाटतं?

मी ही लेखमाला कशासाठी वाचतोय ते सांगतो. मला आजची वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे. कालचा इतिहास मला थोडाफार ठाऊक आहे. इतिहासाची वस्तुस्थितीशी सांगड घालतांना जे प्रश्न उत्पन्न होतात ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मला या लेखमालेतून उत्तरं शोधायची नसून योग्य प्रश्न शोधायचेत. Happy शबाना यांची गृहितकं चुकीची असतील तर त्या चुकांचं प्रतिबिंब माझ्या प्रश्नांत पडेल (असा माझा समज आहे).

मात्र तुम्हाला माझं हे मत पटलं पाहिजेच अशी सक्ती नाही. Happy

आ.न.,
-गा.पै.

ज्यांना इस्लामचा उदय आणि इतिहास समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी Karen Armstrong ची Moahmmed आणि Short History of Islam ही दोन पुस्तके recommend करेन.

बाकी स्वयंसिद्ध, सर्व ज्ञानी लोक माझ्यासारख्या अल्पमतीच्या लिखाणावर एव्हढा वेळ का व्यर्थ घालवत आहेत हे माझ्यासाठी सृष्टीच्या उत्पत्तीएव्हढे गहन कोडे आहे.

आधीचा भाग (प्रस्तावना) कुठे शोधायची?
मदत हवी आहे.
(दोन मिनिटांनी: हे विचारल्यावर आधीचे लेख कसे शोधायचे ते लक्षात आलं आणि लेख सापडले.)

शबानाजी, कृपया आधीच्या भागांचे दुवे नव्या लेखात देता येतील का?