ए टी एम मशीन !

Submitted by तुमचा अभिषेक on 4 April, 2014 - 13:04

माणसाची किंमत जिथे पैश्यात मोजली जाते तो हा जमाना. तिथे एटीएम मशीन म्हणजे वजन काटा. त्यातून खडखड आवाज करत बाहेर पडणार्‍या कोर्‍या करकरीत नोटा तुमचे आजचे वजन. पाठोपाठ तुमची समाजातील पत लिहून येणारी बॅंकबॅलन्स स्लीप. आठ हजार रुपये मी काढले होते आणि शिल्लक जमा तिच्यावर दाखवत होती तब्बल चार लाख, चौसष्ट हजार, आठशे सतरा रुपये. आजची तारीख तेवीस. पगाराला आठवडा बाकी. तो झाला की हा आकडा सव्वापाचच्या घरात. महिन्याभरात मोठा खर्च न आल्यास पुढच्या महिन्याअखेरीस मी पाच लाखाच्या क्लबमध्ये हक्काने विराजमान होणार होतो. हा हिशोब लावतच मी बाहेर पडलो तर समोर तोच तो मगासचा रखवालदार.

"क्या टाईम हुआ साहबजी?" ...... मी एटीएममध्ये प्रवेश करत असतानाचा त्याने घोगर्‍या आवाजात विचारलेला प्रश्न!
स्साला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता हा आवाज. बहुतेक कॉलेजच्या वॉचमनचा. पण त्याचा बांधा याच्यापेक्षा दणकट होता. हा त्यामानाने किरकोळ दिसतोय. रंगही तुलनेत उजळ. छ्या, काय करायचे आहे अंदाज लाऊन. तसेही रात्रपाळीचे सारे वॉचमन सारखेच. थंडीपासून बचाव करायला तोंडाला मफलर गुंडाळला की त्या आडून सार्‍यांचाच आवाज तोच तसाच घोगरा. मफरलचा रंगही काळानिळा नाहीतर करडा. छ्या नको बोलूनही डोक्यात वॉचमनचाच विचार. यावेळी दुसरा विचार तरी कोणाचा येणार होता डोक्यात...

रात्री साडेअकराची वेळ. ऑफिसच्या कामानिमित्त चेंबूरला पहिल्यांदाच जाणे झाले होते. कुठल्याश्या गल्लीबोळातून रिक्षावाल्याने स्टेशनला आणून आदळले आणि त्याच्या डुर्र डुर्र करत पुन्हा स्टार्ट केलेल्या रिक्षाचा आवाज पार होईपर्यंत ध्यानात आले की आजूबाजूला एखाद दुसरी पानपट्टी, त्यावर लागलेले उत्तर भारतीय लोकसंगीत आणि त्या तालाला काटशह देत रस्त्यापलीकडे भुंकणारी कुत्री. एवढाच काय तो आवाज. बाकी भयाण शांतता. माणसाला माणसाचीच जाग लागते. नाहीतर ती स्मशानशांतता.

समोर स्टेशनचा ब्रिज होता, पायथ्याशी तिकीटघर. माझा मध्य रेल्वेचा पास या हार्बर लाईनला कामाचा नव्हता. किमान कुर्ल्यापर्यंत तरी तिकीट काढावे लागणार होते. सुटे पैसे आहेत की नाही हे चेक करताना आठवले पाकिटात पैसे जेमतेमच उरले आहेत. शंभराच्या दोन नोटा आणि काही चिल्लर. आपल्या इकडचे एकमेव एटीएम मशीन सकाळी नादुरुस्त होते. आतापर्यंत कोणी हालचाल केली नसल्यास आताही जैसे थे च असणार होते. खरे तर याचीच संभावना जास्त होती. पण मग इथे रात्रीच्या वेळी एटीएम शोधणे तसे धोक्याचेच. पानपट्टीवर एटीएमची चौकशी म्हणजे दरोड्याला आमंत्रण. पण काय ते नशीब. पानपट्टीकडे नजर टाकतानाच त्याच रस्त्याला पुढे बॅंक ऑफ बरोदाचा प्रकाशफलक झगमगताना दिसला. यावेळेस लाईट म्हणजे नक्कीच एटीएम असणार.

पानपट्टीवरून पुढे पास होताना आता गुलझारसाहेबांची गझल ऐकू आली. वाह! क्षणात पानवाल्याची आवड बदलली होती. काय तो अंदाज. होठो से छू लो तुम.. हे गुलझार की जावेद. काय फरक पडतो. पुढे या बाजूला जरा जाग दिसत होती. स्टेशनबाहेर पडणारा एक रस्ता पुढच्या अंगाला होता, जो लोकांच्या सवयीचा असावा. पूलावरून येण्यापेक्षा फाटकाचा वापर सोयीचा असावा. इथे थोडीफार वर्दळ होती. एटीएमच्या आत देखील होती. मी रिकामेच समजून आत शिरायला दरवाजा ढकलणार तोच तो आतूनच उघडला गेला. लडखडतच एक स्वारी बाहेर पडली. आत शिरल्यावर त्या लडखडण्याचे कारण सांगणारा उग्र दर्प नाकात थोडावेळ दम करून गेला. बाहेर वॉचमनशी थोडीफार हुज्जत घातल्याचा आवाज. कदाचित उगाचच. तो आवाज शांत झाला तसे मी कार्ड काढून मशीनमध्ये सरकावले. बटणे दाबत असतानाच किती पैसे काढायचे याचा हिशोब डोक्यात. सहा हजारांची गरज आणि वर दोनेक हजार खर्चाला. म्हणजे टोटल आठ हजार!

पैसे पडतानाच मोजत होतो.. एक दोन तीन चार, पाच सहा सात आठ .. सवयीनेच ! मान्य एटीएम कधी चुकत नसावे. पण जिथे पैश्याचा संबंध येतो तिथे बापावर विश्वास ठेऊ नये. हे तरीही एक मशीनच .. दहा अकरा बारा तेरा, चौदा पंधरा आणि सोळा ! पाचशेच्या सोळा कडक नोटा, मात्र शंभरचे सुट्टे न आल्याने चरफडलोच जरा.

पैसे व्यवस्थितपणे पाकिटात कोंबत वेळ न दवडता बाहेर पडलो तर तिथे नेक्स्ट कस्टमर लाईनीत हजर होताच. मुंबई शहर, लाखो करोडोंची उलाढाल. पैसा इथून तिथे नुसता खेळत राहतो तिथे या पैश्याच्या यंत्राला कशी उसंत मिळणार. त्याची घरघर सदैव चालूच. बाहेरचा वॉचमन मात्र आता खुर्चीत बसल्याबसल्या थोडा पेंगू लागला होता. मगाशी वेळ त्याने यासाठीच विचारली असावी. त्याची डुलकी काढायची वेळ झाली असावी. हातात घड्याळ न घालता, घडोघडी वेळ चेक न करता, रात्र कशी निघत असेल त्याची. त्याचे तोच जाणे. आजूबाजुची सारी दुकाने एकदा बंद झाली की रात्रीचे बारा काय आणि दोन काय. शेवटची ट्रेन तेवढी जाताना टाईम सांगून जात असेल, आणि त्यानंतर सकाळी मॉर्निंग अलार्म द्याला तीच पुन्हा येत असेल. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव ठेवलेला वॉचमन, त्याच्याकडे साधा मोबाईल नसावा. त्यात असते की घड्याळ. कि उगाचच विचारायची म्हणून विचारली वेळ, रात्रीचे कोणी बोलायला मिळत नाही म्हणून, काहीतरी विषय काढायचा म्हणून... " ओये भाईसाब ...." ईतक्यात पाठीमागून एक चौकडीचा शर्ट घातलेला, दाढीवाला माणूस हाका मारत, कदाचित मलाच पुकारत, माझ्या अंगावर धाऊन येताना दिसला आणि मी एक हात पॅंटच्या मागच्या खिशात ठेवलेल्या पाकिटावर घट्ट ठेऊन सावध पावित्रा घेतला.

तो काय बोलत होता हे त्याच्या गावंढळ हिंदीच्या उच्चारांवरून समजत नव्हते. पण तो मला एटीएम जवळ पुन्हा यायला सांगत होता. काहीतरी गोंधळ झाला असावा तिथे. वोह पैसा आपका है क्या? हा एवढा एकच प्रश्न माझ्या डोक्यात शिरला. प्रश्न पैश्याचा असेल तर ते कसेही डोक्यात शिरतेच.

गडबड होऊ शकत होती. यामागे डावही असू शकत होता. रात्री बाराचा सुमार, अनोळखी जागा, एटीएम मशीनच्या जवळ, फक्त ’तो’ ‘मी’ आणि तिसरा तो रखवालदार. त्यातही त्या दोघांच्या आपापसातील संबंधाबद्दल मी अनभिज्ञ. दूर नजर टाकली तर मगाशी दिसणारी वर्दळ पार मावळली होती. कदाचित ट्रेनच्या येण्यानेच त्या भागाला थोडीफार जाग येत असावी. ट्रेन गेली आणि पुन्हा सामसूम. पण स्टॅडला लागलेल्या रिक्षांमध्ये अंधार असला तरी बहुतेक त्यात चालक झोपून असावेत. हाकेच्या अंतरावरच होते, जर तशीच गरज लागली तर...

मला बोलावणारा माणूस एव्हाना एटीएम जवळ परतला होता. तिथे त्याचे वॉचमनशी बोलणे चालू होते. वॉचमनच्या हातात होती एक कोरी करकरीत पाचशेची नोट. एक बेवारस नोट जिच्यावर कदाचित माझा मालकीहक्क असावा अशी त्यांना शंका होती. आणि इथे मलाही त्यांच्या हेतू वर शंका घेण्यास पुरेसा वाव होता.

ईतक्यात स्टेशनमधून ट्रेनच्या भोंग्याचा आवाज ऐकू आला म्हणजे पुढचा काही वेळ तरी या परिसराला पुन्हा जाग येणार होती. काय प्रकरण आहे हे आता बघायला हरकत नव्हती. पाचशेची नोट अशी स्वस्थ बसू देणार नव्हती. जवळ पोहोचलो तर अजूनही त्याचे वॉचमनशी हुज्जत घालणे चालूच होते. म्हणजे कदाचित ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते. निदान तसे दाखवत तरी होते. खरे खोटे देवास ठाऊक, पण अजूनपर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरक्षित होते. आलबेल !

त्या दाढीवाल्याने वॉचमनच्या हातातून पाचशेची नोट खेचून माझ्यापुढे सरकावली जी त्याला एटीएम जवळ सापडली होती. त्याच्या आधी पैसे काढणारा मीच होतो, तर ती नोट माझीच असावी या सरळ हिशोबाने तो ती नोट माझ्या हवाली करत होता. मात्र वॉचमनची याला आडकाठी होती. कारण हा काही नोट माझीच असल्याचा सबळ पुरावा नव्हता. सारा प्रकार माझ्या लक्षात आला होता. तरीही यामागे काहीतरी वेगळाच डाव असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आजच्या तारखेला एवढा प्रामाणिकपणा. पचायला जरा जडच. पण विचार करायला वेळ कोणाला होता. त्या नोटेने एक भुरळशी घातली होती. मगाशी खडखडत एटीएममधून बाहेर पडणार्‍या नोटा माझ्या स्वताच्या होत्या. निघणार्‍या प्रत्येक नोटेगणिक माझे बॅंकबॅल्न्स घटत होते. पण हि मात्र फुकट होती. विनासायास मिळणारा पैसा. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मिळणारा फ्री हिट. कसाही उडवा कसाही टोलवा. कोणाला नको असणार होता असा पैसा.

मगाशी आलेल्या ट्रेनमधील लोकांचा एक गुच्छा एव्हाना स्टेशनाबाहेर पडला होता. तर तितकेही भितीचे कारण नव्हते. आतापर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरळीत होते. आलबेल !

.......... पण आता ती नोट मिळवायची कशी याबाबत माझे विचारचक्र सुरू झाले. ती नोट माझी नव्हती हे मला ठाऊक होते. समोरचा माणूस कसलीही चौकशी न करता मला देण्यास तयार होता. मात्र वॉचमनने घेतलेल्या आक्षेपानंतर त्याने मला माझ्याजवळचे पैसे मोजून खात्री करून घेण्यास सांगितले. मी पाकिटातून पैसे काढून त्यांच्यासमोर मोजणार, मग ते आठ हजार भरणार, मी चुरगाळून फेकलेली पावती त्या एटीएमच्या जवळच पडली असणार आणि ती पडताळून बघायची बुद्धी दोघांपैकी कोणाला झाल्यास मी आठच हजार काढले होते हे त्यांना कळणार. बस्स, इथे काहीतरी चकमा देणे गरजेचे होते.

पाकिटातून पैसे मोजायला म्हणून बाहेर काढताना मोठ्या चलाखीने मी त्या बंडलातील एक नोट खाली सरकवून ते उचलले. आता माझ्या हातात पंधरा नोटा होत्या. आठ हजार मी एटीएममधून काढले हे मी स्वताहून डिक्लेअर करून झाले होते. कोणी त्यावर आक्षेप घेतला असता मगाशी चुरगाळलेली पावती मी स्वता शोधून त्यातला आठ हजारांचा आकडा दाखवू शकलो असतो. आता फक्त पंधरा नोटा मोजून दाखवायची औपचारीकता पुर्ण करायची होती.

एक दोन तीन चार .. पाच सहा सात आठ ... नोटा मोजताना हात थंड पडल्याचे जाणवत होते. कसली ती हुरहुर. कसला तो आनंद. पाच सहा सात आठ .. नऊ दहा अकरा बारा... कोणी हातातून खेचून सहज पळून गेले असते एवढ्या अलगद आणि बेसावधपणे मी त्या नोटा मोजत होतो. नऊ दहा अकरा बारा .. तेरा चौदा... चौदावी नोट मोजताच माझा चेहरा खर्रकन उतरला. त्या खाली नोटच नव्हती. पाकिटात होती ती पंधरावी नोट आणि सोळावी समोरच्याच्या हातात. ती बेवारस नोट माझी स्वताचीच आहे हे समजले तसे पाचशे रुपयांचे नुकसान झाल्याची भावना मनात दाटून आली. एवढे वाईट तर कदाचित माझे पाचशे रुपये हरवल्यावर देखील वाटले नसते जेवढे ते परत मिळताना वाटत होते. खिन्नपणेच मी ती नोट माझी आहे म्हणत त्याच्याकडून स्विकारली.

पाठीमागे मात्र वॉचमनची अखंड बडबड अजूनही चालूच होती. किती बोलतो हा माणूस. त्याने कदाचित माझ्या बरोबरीनेच नोटा मोजल्या होत्या. त्याला काय कसला हिशोब अजून लागला नव्हता देव जाणे. माझ्याकडे ग्यारंटी म्हणून माझा फोन नंबर मागत होता. मागाहून कोणी या नोटेवर आपला मालकी हक्क सांगायला आला तर कसलाही लफडा व्हायला नको हा यामागचा हेतू. मी ना हुज्जत घालण्याच्या मनस्थितीत होतो ना संवाद वाढवण्याच्या. त्याने माझा नंबर टिपायला मोबाईला काढला तसे मी माझा रटलेला नंबर बोलायला सुरूवात केली.. एट टू फोर फाईव्ह .. डबल एट .. सेव्हन एट .. स्साला कोण हा ? .. याला का देऊ मी माझा नंबर.. ? शेवटचे दोन आकडे मी मुद्दामच चुकीचे दिले.

पलटून पाहिले तर एव्हाना तो दाढीवाला माणूस निघून गेला होता. त्याने त्याचे पैसे काढले होते, त्याचे काम झाले होते आणि माझे कवडीमोलाचे धन्यवाद स्विकारण्याचीही तसदी न घेता तो आपल्या मार्गाला पसार झाला होता. आता मला स्वताचीच लाज वाटू लागली होती. त्याचा प्रामाणिकपणा डोळ्यात खुपू लागला होता. जगाला प्रामाणिक माणसे का नको असतात याचे कारण समजत होते.

एकच काय ते चांगले होते, अजूनपर्यंत सारे काही ठिक होते. सारे काही सुरक्षित होते. आलबेल !

फक्त मला माझी किंमत समजली होती ... जास्तीत जास्त पाचशे रुपये !!

..............................................................................
...............................................
..........................

दुसर्‍या दिवशी जाग आली तोच मावशीच्या हाकेचा आवाज. सोन्या काल रात्री तू चेंबूरवरूनच आलास ना?

का? काय झाले?

हि बातमी बघ ....

न्यूज चॅनेलवर खालच्या बाजूला एक पट्टी सरकत होती ..
क्षुल्लक कारणासाठी डोक्यात दांडा घालून बळी --- फक्त पाचशे रुपयांसाठी रखवालदाराने गमावला जीव --- एटीएम मशीनच्या बाहेरच आढळला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह --- आरोपीच्या शोधासाठी पोलिस तपासणार एटीएम मशीनचे रेकॉर्ड ........ एटीएम मशीनचे रेकॉर्ड ...... पोलिस तपासणार ...

बस्स पुढचे काही वाचवले नाही...

मी धावतपळतच बेडरूममध्ये आलो. दार लाऊन घेतले. कडी घट्ट लागलीय याची खात्री केली आणि थरथरत्या हातांनीच पाकीट काढून सार्‍या नोटा पुन्हा एकदा मोजायला घेतल्या. एक दोन तीन चार .. पाच सहा सात आठ... मनात विचारांचे नुसते काहूर माजले होते. हात कालच्यापेक्षा जास्त थंड पडले होते. नऊ दहा अकरा बारा .. तेरा चौदा पंधरा सोळा... आता फक्त हात गळून पडायचे बाकी होते. कारण अजूनही एक नोट हातात शिल्लक होती. ती सतरावी होती.. सतरा म्हणजे खतरा.. तब्बल साडेआठ हजार रुपये. म्हणजे काल हिशोबात मी कुठेतरी चुकलो होतो. म्हणजे ती नोट माझी नव्हतीच. याचा अर्थ...........

आता काहीच ठिक नव्हते. काहीच आलबेल नव्हते. आता माझी किंमत .... काहीच उरली नव्हती !

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक,

साला काय त्रास आहे
लाईफ बकवास आहे
हातामध्ये ओरबाडलेला
कुण्यामुखीचा घास आहे

अशी कथा लिहिणं अवघड असतं. अभिनंदन.

आ.न.,
-गा.पै.

सर्व'च प्रतिसाद - आभार, धन्यवाद

कथा अर्थातच काल्पनिक. जर कोणाशी असे घडले असल्यास निव्वळ योगायोग समजावा. जर पुढेमागे घडल्यास चमत्कारीक योगायोग समजावा.

ना कुठे घडलेला किस्सा ना कुठे ऐकण्या वाचण्यात आलेली बातमी.

तरी कोणत्या वृत्तपत्राला रकाना भरायला म्हणून याचे कथासार बातमीच्या स्वरूपात टाकायचे असल्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक Happy

Mast......

Pages