संयुक्ता पाऊल "पळते" पुढे - एक अनोखं गटग (सार्वजनिक धागा)

Submitted by मंजिरी on 30 March, 2014 - 09:29

२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि आऊटडोअर्सने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर ....? दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. आऊटडोअर्सने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले. इप्सित स्थळी पोचून स्ट्रेचिंग करुन झाल्यावर फोन वरुन "गेट-सेट-गो" चा सिग्नल देऊन पळायला सुरुवात केली. थँक्स टू आयफोन आणि थँक्स टू टेक्नॉलॉजी Happy २०१४ च्या फेब्रुवारी पर्यंत कधी ५के, कधी ७के, कधी १०के अशी वेगवेगळ्या अंतराची पाच-सहा वेळेस 'रनिंग गटग' झाली. मनात विचार आला की जर आम्ही दोघी ह्या दोन टाईमझोन्समध्ये जमवू शकतो तर यात इतर "संयुक्तांना" सहभागी केलं तर??

विचार आल्यावर लगेच ठरवून संयुक्तामध्ये या कल्पनेचं सुतोवाच केलं आणि महिला दिनाच्या मुहुर्तावर लगेच धागा सुरु केला. आऊटडोअर्सला खरंतर खूप रिस्पॉन्सची अपेक्षा नव्हती. पण सांगायला आनंद होतोय की तिचा चांगलाच अपेक्षाभंग झाला. Proud
आणि सुरुवात झाली एका अनोख्या संयुक्ता गटगच्या प्लॅनिंगला! आत्तापर्यंत आम्ही दोघीच करत असलेल्या गटगला आता थोडं मोठं स्वरुप येणार होतं. त्यानुसारच साधारण कल्पना होती 'एक वेळ - वेगवेगळी ठिकाणं'. म्हणजे एकाच वेळेस वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी या 'रनिंग गटग' मध्ये भाग घ्यायचा. अंतर ठरलं ५ किमी. आणि तारीख ३० मार्च २०१४! जपानमध्ये मी सकाळी ११.०० वाजता रनिंग सुरु करणार तेव्हा भारतात सकाळचे ७.३० झालेले असतील तर मध्य पूर्वेत सकाळचे ६.००. यातच अजून ५ वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी भाग घेऊन आमच्या उत्साहात भर घातली. सिंगापूर, युके, अमेरिका (इस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट) आणि ऑस्ट्रेलिया.

काही जणींना रनिंगची सवय होती तर काही जणींना रोजच्या चालण्याच्या व्यायामाची. काही जणींनी आत्तापर्यंत कधी सुरुवात केली नव्हती पण ह्या गटग मधे भाग घ्यायच्या निमित्तानी सुरुवात करायची होती. काही जणींना आपण हे अंतर चालत निश्चित पार करु असं वाटत होतं परंतू धावण्याबद्दल विश्वास नव्हता. मग हे फक्त "रनिंग गटग" न करता "रनिंग/वॉकिंग गटग" करायचं ठरलं. म्हणता म्हणता ५२ जणी जमल्या.
इथे एक बाब आम्हांला खूप कौतुकाची वाटली. भारतात एक तर उन्हाळा सुरु झालेला आणि तसं म्हटलं तर चालण्या-पळण्यासाठी घराच्या अगदी जवळपास सोयीची जागा असेलच असं नाही. पण असं असूनसुद्धा भारतातल्या संयुक्तांनीच मोठ्या संख्येने या रनिंग/वॉकिंग गटगमध्ये भाग घेतला.

आत्ता पर्यंत आम्ही दोघीच जेंव्हा हे रनिंग गटग करत होतो तेंव्हा जपान आणि युएई ह्या दोनच देशातल्या वेळा आणि ऋतुंची चिंता करावी लागत होती. पण आता सगळ्याजणी मिळुन वेगवेगळ्या आठ टाईमझोनमधल्या संयुक्ता होत्या. त्यातुन सगळीकडचे ऋतुही पूर्ण वेगळे. जपानमध्ये मी ३० मार्चला सकाळी ११.०० वाजता सुरु करणार तेंव्हा ऑस्ट्रेलियाची लोकल वेळ होत होती भर दुपारी १.०० आणि सिंगापुरला लोकल वेळ सकाळी १०.००. पण अमेरिकेच्या इस्ट कोस्टवर तेंव्हा होत होते २९ मार्चच्या रात्रीचे १०.०० व वेस्ट कोस्टला संध्याकाळचे ७.००. तर युके मधे तेंव्हा वाजणार होते ३० मार्चच्या पहाटेचे ३.००. त्यामुळे अगदी एकाच वेळी सगळ्यांनी धावण्याचं गणित थोडं अवघड वाटायला लागलं. मग सगळ्यांच्या वेळेचा आणि त्या-त्या देशातल्या ऋतुंचा विचार करून तीन ग्रूप पाडले. पहिल्या ग्रूपमधल्या म्हणजे सिंगापूर, अमेरिकेतल्या पूर्व किनार्‍यावरच्या व ऑस्ट्रेलियामधील संयुक्ता आत्ता ठरलेल्या वेळेच्या तीन तास आधी एकत्र सुरु करतील. ठरलेल्या वेळेवर दुसर्‍या ग्रूपमधल्या संयुक्ता ज्या जपान, भारत, मध्य पूर्व व अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर होत्या त्या ठरवून एका वेळेस धावतील. युकेतल्या संयुक्तांची वेळ कोणाबरोबरच जमत नव्हती त्यामुळे त्या त्यांच्या ३० मार्चला रविवारी सकाळी ७.३० ला एकत्र धावतील असं ठरवलं.

मध्य पूर्वेचे देश सोडल्यास सगळ्यांना सोईचा म्हणून रविवार ठरवला होता. पण कुवेतच्या एका संयुक्ताने आपल्याला रविवारी जमणार नाही म्हणुन शनिवारी एकटीने चालेन असं सांगून अप्रत्यक्ष भाग घेतला तर भारतातल्या एका संयुक्तेला सकाळी चालणं जमणार नव्हतं म्हणून तिनेही संध्याकाळी चालेन पण ठरलेलं अंतर चालून पूर्ण करेन असा संकल्प केला. त्या अगदी गटगमध्ये सगळ्यांच्या वेळेला सहभागी नसल्या तरी त्यांनी चालण्याचं ठरवलं होतं हेच पॉझिटिव्ह होतं.

बीबी उघडला, नावनोंदणी पण व्हायला लागली. तरी सगळ्यांना सतत मोटिवेट करत राहाणं खूपच गरजेचं होतं. त्यामुळे दर ३-४ दिवसांनी याच्याशी संबंधित चित्रं व त्याबरोबर संदेश टाकायचा असं ठरवलं जेणेकरून भाग घेतलेल्या संयुक्तांना ३० मार्चची, पर्यायाने सरावाची आठवण राहील आणि संयुक्तांचा उत्साहही वाढायला मदत होईल. मग एकमेकींचा उत्साह वाढवणं, टिप्स देणं, एकाच शहरात असणार्‍या संयुक्तांना भेटुन एकत्रच कुठे धावता/चालता येईल ह्या बद्दल चर्चा झडु लागल्या. हल्ली स्मार्टफोन्सवर चालण्या-धावण्याशी संबंधित बरीच चांगली चांगली अ‍ॅप्स मिळतायत. अंतराचा अंदाज येण्यासाठी हे गरजेचंही होतं. बहुतांशी जणी हे असं पहिल्यांदाच करणार होत्या त्यामुळे कोणतं अ‍ॅप चांगलं वगैरेची चर्चाही झालीच. ज्या आधीपासूनच अशी अ‍ॅप्स वापरत होत्या त्यांनी त्यांच्या अनुभवाची देवाण-घेवाण केली.
गटगच्या दिवशी त्या-त्या ग्रूपमधल्या सगळ्यांनी एकाच वेळेस धावणं/चालणं अपेक्षित होतं. त्यामुळे गटगसाठी "गेट-सेट-गो" चा सिग्नल द्यायला व्हॉट्सअॅप वर ग्रूप्स करायचे असं ठरलं. पुन्हा एकदा थँक्स टू द टेक्नॉलॉजी Happy त्याप्रमाणे दहा बारा दिवस आधीच बीबीवर लिहून नंतर वेळेत फोन नंबर्स मिळून ग्रूप करता यावा यासाठी सगळ्यांना संपर्कातून मेल टाकून फोन नंबर्स मागवले.

बीबी वेगळ्या अर्थाने पेटला होता. सगळ्याच जणी खूप उत्साहात होत्या. आणि मर्फीच्या नियमांनुसार १०-१२ दिवस आधी स्वत:चं आजारपण, मुलांचं आजारपण, ऑफिसमधल्या कामाचा ताण अश्या एकेक अडचणी यायला लागल्या. असं असलं तरी ठरलेल्या दिवशी धावायचा/चालायचा निश्चय अटळ होता.
ठरल्याप्रमाणे बरोब्बर दोन दिवस आधी व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रूप्स पाडले गेले. आणि तिथे चर्चेला सुरुवात झाली. टाईमझोनप्रमाणे जसं धावायचं/चालायचं ठरलं होतं, त्याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रूप्स तयार केले. सगळ्यांचे फोन नंबर्स त्यावर अ‍ॅड केल्यावर तिथे एकच गडबड सुरु झाली. Proud मायबोलीवर असतात त्याप्रमाणे इथेही बर्‍याच जणी रोमात होत्या. Wink

हां-हां म्हणता गटगचा रविवार उजाडला. सिंगापूरमध्ये सकाळचे ७ वाजत होते तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये सकाळचे १० तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर शनिवारची संध्याकाळ. तिथल्या संयुक्ता त्यांच्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता सुरु करणार होत्या. पहिला ग्रूप जपानच्या वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता सुरु करणार होता. ठरल्याप्रमाणे मी माझ्या ७.३० वाजता म्हणजे अर्धा तास आधी त्यांना पिंग करणार होते. पण त्या सगळ्या जवळजवळ तासभर आधीपासूनच उत्साहात तयार होऊन वेळ होण्याची वाट बघत होत्या त्यांचा उत्साह बघुनच हे गटग नक्की यशस्वी होणार ह्याचे सिग्नल्स मिळाले.

आमच्या ग्रूपची वेळ जवळ येत गेली तसे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेस यायला लागले. सगळ्यांना स्टार्टिंग पॉईंटला १५ मिनीटे आधी पोचून स्ट्रेचिंग करून तयार रहा अशी सूचना दिली होती त्याप्रमाणे सगळ्याजणी एकदम जय्यत तयारीत होत्या. माझ्या जपानच्या टाईमझोनबरोबर इतर ३ टाईमझोनमधल्या (भारत, युएई व अमेरिकेचा पश्चिम किनारा) संयुक्ता माझ्याबरोबर भाग घेणार होत्या. आम्ही ट्रॅकवर जायला निघायच्या आधीच पहिल्या ग्रूपमधल्या संयुक्तांचे कामगिरी फत्ते झाल्याचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. मी १०.४० ला ट्रॅकवर जायला निघाले, भारतातल्या संयुक्ताही त्यांच्या नियोजित ठिकाणी जायला निघाल्या होत्याच. बरोबर ११ च्या ठोक्याला आऊटडोअर्सने 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि एका मोठ्या ग्रूपच्या गटगला सुरुवात झाली. सगळ्यांचा उत्साह ऊतू जात असल्याने काहीजणी प्रत्येक कि.मी.चा अपडेट देत होत्या तर काहीजणींनी ठरलेलं अंतर पूर्ण झाल्यावरच अपडेट्स दिले. तासाभरात व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेसचा पूर यायला लागला. ठरल्याप्रमाणे जवळ जवळ सगळ्यांनीच या गटगमध्ये भाग घेऊन ते यशस्वी करून दाखवलं.

दुसर्‍या आणि तिसर्‍या ग्रूपच्या वेळेत तसं बरंच अंतर होतं. तिसर्‍या ग्रूपमध्ये फक्त युकेमधल्या संयुक्ता भाग घेणार होत्या. त्या त्यांच्या सकाळी ७.३० वाजता सुरु करणार होत्या. त्याप्रमाणे बरोबर ६.३० वाजता त्यांना पिंग करून तयारीला लागायची आठवण करून दिली. वेळेच्या आधी १५ मिनीटं पोचून स्ट्रेचिंग करायची आठवण करायलाही विसरलो नाही. बरोबर ७.३० वाजता त्यांनाही 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि त्यांच्या अपडेट्सची वाट बघत बसलो. ह्या गटग चा गड सर होण्याचा हा शेवटचा टप्पाच राहिला होता.तासाभरात त्यांचेही टार्गेट पूर्ण केल्याचे मेसेजेस ग्रूपमध्ये आले. आणि हे गटग खर्‍या अर्थाने यशस्वी झालं.

ह्या अनोख्या गटगमध्ये आम्ही सगळ्या "संयुक्तांनी" मिळून आज काही तासात जगभरातील २५० कि.मी.पेक्षा जास्त परिसर पायाखालून घातला. Happy
आत्तापर्यंत आम्ही दोघीच असं ठरवून धावत होतो त्यामुळे आमच्यात को-ऑर्डिनेशन उत्तम आहे हे कळलं होतंच. पण आता वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या इतक्या जणी असणार होत्या. इतका सगळा घाट तर घातलाय, नीट पार पडेल नां? याची धास्ती होती खरंतर थोडी. पण सगळ्या भाग घेतलेल्या संयुक्तांनी ती भिती व्यर्थ ठरवली. Happy त्यांचा उत्साह बघून आम्हांलाही हुरूप आला. या गटगनंतर असं गटग पुढेही करत राहू असा रिस्पॉन्स जवळपास सगळ्याच संयुक्तांकडून आला. त्यांच्या या सुचनेचा विचार नक्की करणार आणि पुढचं गटग अजून थोडं टार्गेट वाढवून करणार म्हणजे त्या निमित्ताने सगळ्यांचा नियमित सराव चालू राहील.

उत्साहाने भाग घेऊन हे गटग यशस्वी केल्याबद्दल संयुक्तातील सगळ्याच मैत्रिणींचे मनापासून आभार. तुम्ही नसतात तर आम्हांला इतका उत्साह आला ही नसता. Happy त्यामुळे हे अश्या प्रकारचं गटग ठरवण्याची कल्पना आणि प्लॅनिंग आमचं असलं तरी ती कल्पना प्रत्यक्षात उतरली ती सगळ्या संयुक्तांच्या सक्रिय आणि शिस्तबद्ध सहभागामुळेच!

या आगळ्या वेगळ्या गटगचे अनुभव आम्हांला सार्वजनिक बीबी वर मांडायची संधी दिल्याबद्दल संयुक्ता संयोजकांचे मनःपूर्वक आभार Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व संयुक्तांच अभिनंदन तसेच आडो आणि मंजिरी तुम्हा दोघींना खूप खूप धन्यवाद. अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा विचारसुद्धा कधी केला नव्हता.

गटगच्या दिवशी सकाळी ईकडे नाव नोंदवल्यावरसुद्धा परत झोपायची इच्छा झाली होती, आपण आजारी आहे अस वाटून. Happy पण एकदा चालायला सुरुवात केल्यावर खूपच मजा आली.

मी ७.२५ ला घरातून निघाली. वाशी स्टेशनला मी ८.१४ मिनिटांनी पोहचली. ४ कि.मी. झाले होते. पुन्हा चालतच घर गाठायच अस ठरवल. सेक्टर १७ च्या गार्डनच्या ईकडे आल्यावर थोड पाणी प्यायची इच्छा झाली. चालतच एक घोट पाणी प्यायली. कानात बोळे न घालता मस्त निसर्गाचा आस्वाद घेत चालली सोबत चिमणी - कावळ्यांचा आवाज, पिवळ्या फुलांचा सडा सोबत थंड वारा. खूपच छान वाटल. बरोबर ९ वाजता घरी आली. टोटल ८ किमी चालली. एकाच स्पीडवर चालली. अजिबात स्पीड वाढवला नाही की कमी केला नाही.

मी सर्प्राईज पार्टिसिपेशन च्या विचारात होते. एका संयुक्ताला म्हणलंही तसं पण काही अनपेक्षित गोष्टींमुळे नाही जमलं Happy
पुढच्या वेळेसाठी आत्तापासुनच हात वर Happy

सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल आभार.

हे गटग ठरवणं व त्याचा एक भाग होणं हा अनुभव खरंच खूप आनंद देऊन गेला.सहभागी संयुक्ताही प्रचंड उत्साहात होत्या. बीबी काढल्यापासून ते अगदी गटगच्या दिवसापर्यंत तोच उत्साह टिकून होता. ज्यांना अजिबातच चालण्याची सवय नव्हती त्यांच्यासाठी खरं म्हणजे ५ किमीचं अंतरही जास्तच होतं पण तरीही भाग घेऊन पूर्ण करणारच असा निश्चय होता.

या गटगमध्ये ज्या सहभागी झाल्या त्या आपले अनुभव लिहीत आहेतच. एकूण ७ देशातील परंतू ८ टाईमझोनमधील संयुक्ता यात सहभागी झाल्या.

जपानमधून, युएईमधून व ऑस्ट्रेलियामधून प्रत्येकी फक्त एक संयुक्ता होती. सिंगापूरमधून ४ संयुक्ता. अमेरिकेतल्या पूर्व किनार्‍यावरील ७ संयुक्ता, भारतातून सर्वाधिक म्हणजे २५ संयुक्ता होत्या. युकेमधून ३ संयुक्ता धावल्या तर अमेरिकिच्या पश्चिम किनार्‍यावरील ७ संयुक्तांनी यात भाग घेतला.

काहींना वेळ जमत नसल्याने त्यांनी त्यांच्या सोईच्या वेळेस चालून गटगमध्ये भाग घेतला.

congratulations girls... (maajhyaa explorer madhe gaDbaD aahe... mhaNUn English)
This is really motivating ... I will participate next time. Atleast I will give it the best shot Happy

एक वेगळ्याच प्रकारचे, अनोखे गटग झाले हे.
अश्या गटगचा मीही छोटासा भाग होते ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.
आडो आणि मंजिरी यांच्याबरोबरच माझ्या इतरही सहभागी मैत्रिणींचे आभार. या सर्वांचा उत्साह आणि सतत उत्तेजन देत राहणे यामुळे एवढा मोठा उपक्रम अगदी यशस्वीपणे पार पडला.
अशी गटग परत परत होत राहोत. Happy

प्रतिसादाबद्दल आभार Happy

हे गटग ठरवणं व त्याचा एक भाग होणं हा अनुभव खरंच खूप आनंद देऊन गेला > +१
सगळ्या उत्साही संयुक्तांना परत एकदा मनापासून धन्यवाद Happy

Pages