खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)

Submitted by प्रमोद् ताम्बे on 1 April, 2014 - 19:54

खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)
 लोणचे xxx.jpg
साहित्य : अर्धा किलो जाड मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या , १००ग्राम मोहरीची डाळ , एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा मिरची मसाला एक पाकीट , एक डझन लिंबे , ५० ग्राम आले , एक वाटी तेल.फोडणीसाठी मोहोरी, हळद,हिंग व मेथीची पूड

कृती : प्रथम मिरच्या धुवून व स्वच्छ कापडाने पुसून कोरड्या करून घ्याव्यात व विळीवर चिरून त्यांचे बारीक तुकडे करून घ्या. चार लिंबांच्या फोडी करून घ्या.आल्याचे विळीवर किंवा सुरीने अतिशय बारीक तुकडे करून घ्या. मोहोरीची डाळ तेलात चांगली फेटून घ्या.
एका परातीत किंवा स्टीलच्या थाळ्यात मिरचयांचे तुकडे,आल्याचे तुकडे,लिंबाच्या फोडी , फेटलेली मोहोरीची डाळ , मिरची मसाला व मीठ घालून ते मिश्रण मोठ्या चमच्याने हलवून चांगले एकजीव करून घ्या व एका स्वच्छा व कोरड्या काचेच्या किंवा चीनी मातीच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरा. गॅसवर कढईत वाटीभर तेल घेऊन चांगले कडकडीत तापल्यावर त्यात मोहोरी,हळद,हिंग व मेथीची पूड घालून फोडणी करून ती थंड झाल्यावर बरणीत भरलेल्या मिरच्यांवर ओता व चमच्याने हलवून बरणी झाकण लावून त्यावर दादरा म्हणून एका स्वच्छ फडक्याने बांधून कपाटात ठेवा.

दोन तीन दिवसांनंतर बरणी उघडून पुन्हा एकदा चमच्याने हलवून तोंडी लावणे म्हणून खायला द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु. माझी आई असेच बनवायची लोणचे.
हे लोणचे आणि चुरमुरे...मस्त लागते. टीव्ही बघता बघता किंवा पुस्तक वाचतावाचता फडशा पाडायचा.
वरण भातावरही हे लोणचे छान लागते. Happy

मिरची लोणाच्यात चार लिंबांच्या फोडी घालाव्यात , व बाकीच्या लिंबांचा रस काढून लोणच्यावर टाकावा म्हणजे मुरल्यावर लोणच्याला चांगला खार सुटतो व तिखटपणाही कमी होतो.

मिरची मसाला काय असतो? हे करून बघावंसं वाटलं म्हणून सगळं आणलं पण मिरची मसाल्याचं काही लक्षात आलं नाही. इथे मिळतो की नाही काही कल्पना नाही.

तयार मिरची मसाला हा पुण्यात बेडकर,केप्र, किंवा प्रवीण असे लोणची मसाले करणार्‍या कंपनींचा मिळतो. घरी पण करता येतो,पण मला येत नाही म्हणून मी तयारच वापरतो.