संयुक्ता पाऊल "पळते" पुढे - एक अनोखं गटग (सार्वजनिक धागा)

Submitted by मंजिरी on 30 March, 2014 - 09:29

२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि आऊटडोअर्सने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर ....? दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. आऊटडोअर्सने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले. इप्सित स्थळी पोचून स्ट्रेचिंग करुन झाल्यावर फोन वरुन "गेट-सेट-गो" चा सिग्नल देऊन पळायला सुरुवात केली. थँक्स टू आयफोन आणि थँक्स टू टेक्नॉलॉजी Happy २०१४ च्या फेब्रुवारी पर्यंत कधी ५के, कधी ७के, कधी १०के अशी वेगवेगळ्या अंतराची पाच-सहा वेळेस 'रनिंग गटग' झाली. मनात विचार आला की जर आम्ही दोघी ह्या दोन टाईमझोन्समध्ये जमवू शकतो तर यात इतर "संयुक्तांना" सहभागी केलं तर??

विचार आल्यावर लगेच ठरवून संयुक्तामध्ये या कल्पनेचं सुतोवाच केलं आणि महिला दिनाच्या मुहुर्तावर लगेच धागा सुरु केला. आऊटडोअर्सला खरंतर खूप रिस्पॉन्सची अपेक्षा नव्हती. पण सांगायला आनंद होतोय की तिचा चांगलाच अपेक्षाभंग झाला. Proud
आणि सुरुवात झाली एका अनोख्या संयुक्ता गटगच्या प्लॅनिंगला! आत्तापर्यंत आम्ही दोघीच करत असलेल्या गटगला आता थोडं मोठं स्वरुप येणार होतं. त्यानुसारच साधारण कल्पना होती 'एक वेळ - वेगवेगळी ठिकाणं'. म्हणजे एकाच वेळेस वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी या 'रनिंग गटग' मध्ये भाग घ्यायचा. अंतर ठरलं ५ किमी. आणि तारीख ३० मार्च २०१४! जपानमध्ये मी सकाळी ११.०० वाजता रनिंग सुरु करणार तेव्हा भारतात सकाळचे ७.३० झालेले असतील तर मध्य पूर्वेत सकाळचे ६.००. यातच अजून ५ वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी भाग घेऊन आमच्या उत्साहात भर घातली. सिंगापूर, युके, अमेरिका (इस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट) आणि ऑस्ट्रेलिया.

काही जणींना रनिंगची सवय होती तर काही जणींना रोजच्या चालण्याच्या व्यायामाची. काही जणींनी आत्तापर्यंत कधी सुरुवात केली नव्हती पण ह्या गटग मधे भाग घ्यायच्या निमित्तानी सुरुवात करायची होती. काही जणींना आपण हे अंतर चालत निश्चित पार करु असं वाटत होतं परंतू धावण्याबद्दल विश्वास नव्हता. मग हे फक्त "रनिंग गटग" न करता "रनिंग/वॉकिंग गटग" करायचं ठरलं. म्हणता म्हणता ५२ जणी जमल्या.
इथे एक बाब आम्हांला खूप कौतुकाची वाटली. भारतात एक तर उन्हाळा सुरु झालेला आणि तसं म्हटलं तर चालण्या-पळण्यासाठी घराच्या अगदी जवळपास सोयीची जागा असेलच असं नाही. पण असं असूनसुद्धा भारतातल्या संयुक्तांनीच मोठ्या संख्येने या रनिंग/वॉकिंग गटगमध्ये भाग घेतला.

आत्ता पर्यंत आम्ही दोघीच जेंव्हा हे रनिंग गटग करत होतो तेंव्हा जपान आणि युएई ह्या दोनच देशातल्या वेळा आणि ऋतुंची चिंता करावी लागत होती. पण आता सगळ्याजणी मिळुन वेगवेगळ्या आठ टाईमझोनमधल्या संयुक्ता होत्या. त्यातुन सगळीकडचे ऋतुही पूर्ण वेगळे. जपानमध्ये मी ३० मार्चला सकाळी ११.०० वाजता सुरु करणार तेंव्हा ऑस्ट्रेलियाची लोकल वेळ होत होती भर दुपारी १.०० आणि सिंगापुरला लोकल वेळ सकाळी १०.००. पण अमेरिकेच्या इस्ट कोस्टवर तेंव्हा होत होते २९ मार्चच्या रात्रीचे १०.०० व वेस्ट कोस्टला संध्याकाळचे ७.००. तर युके मधे तेंव्हा वाजणार होते ३० मार्चच्या पहाटेचे ३.००. त्यामुळे अगदी एकाच वेळी सगळ्यांनी धावण्याचं गणित थोडं अवघड वाटायला लागलं. मग सगळ्यांच्या वेळेचा आणि त्या-त्या देशातल्या ऋतुंचा विचार करून तीन ग्रूप पाडले. पहिल्या ग्रूपमधल्या म्हणजे सिंगापूर, अमेरिकेतल्या पूर्व किनार्‍यावरच्या व ऑस्ट्रेलियामधील संयुक्ता आत्ता ठरलेल्या वेळेच्या तीन तास आधी एकत्र सुरु करतील. ठरलेल्या वेळेवर दुसर्‍या ग्रूपमधल्या संयुक्ता ज्या जपान, भारत, मध्य पूर्व व अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर होत्या त्या ठरवून एका वेळेस धावतील. युकेतल्या संयुक्तांची वेळ कोणाबरोबरच जमत नव्हती त्यामुळे त्या त्यांच्या ३० मार्चला रविवारी सकाळी ७.३० ला एकत्र धावतील असं ठरवलं.

मध्य पूर्वेचे देश सोडल्यास सगळ्यांना सोईचा म्हणून रविवार ठरवला होता. पण कुवेतच्या एका संयुक्ताने आपल्याला रविवारी जमणार नाही म्हणुन शनिवारी एकटीने चालेन असं सांगून अप्रत्यक्ष भाग घेतला तर भारतातल्या एका संयुक्तेला सकाळी चालणं जमणार नव्हतं म्हणून तिनेही संध्याकाळी चालेन पण ठरलेलं अंतर चालून पूर्ण करेन असा संकल्प केला. त्या अगदी गटगमध्ये सगळ्यांच्या वेळेला सहभागी नसल्या तरी त्यांनी चालण्याचं ठरवलं होतं हेच पॉझिटिव्ह होतं.

बीबी उघडला, नावनोंदणी पण व्हायला लागली. तरी सगळ्यांना सतत मोटिवेट करत राहाणं खूपच गरजेचं होतं. त्यामुळे दर ३-४ दिवसांनी याच्याशी संबंधित चित्रं व त्याबरोबर संदेश टाकायचा असं ठरवलं जेणेकरून भाग घेतलेल्या संयुक्तांना ३० मार्चची, पर्यायाने सरावाची आठवण राहील आणि संयुक्तांचा उत्साहही वाढायला मदत होईल. मग एकमेकींचा उत्साह वाढवणं, टिप्स देणं, एकाच शहरात असणार्‍या संयुक्तांना भेटुन एकत्रच कुठे धावता/चालता येईल ह्या बद्दल चर्चा झडु लागल्या. हल्ली स्मार्टफोन्सवर चालण्या-धावण्याशी संबंधित बरीच चांगली चांगली अ‍ॅप्स मिळतायत. अंतराचा अंदाज येण्यासाठी हे गरजेचंही होतं. बहुतांशी जणी हे असं पहिल्यांदाच करणार होत्या त्यामुळे कोणतं अ‍ॅप चांगलं वगैरेची चर्चाही झालीच. ज्या आधीपासूनच अशी अ‍ॅप्स वापरत होत्या त्यांनी त्यांच्या अनुभवाची देवाण-घेवाण केली.
गटगच्या दिवशी त्या-त्या ग्रूपमधल्या सगळ्यांनी एकाच वेळेस धावणं/चालणं अपेक्षित होतं. त्यामुळे गटगसाठी "गेट-सेट-गो" चा सिग्नल द्यायला व्हॉट्सअॅप वर ग्रूप्स करायचे असं ठरलं. पुन्हा एकदा थँक्स टू द टेक्नॉलॉजी Happy त्याप्रमाणे दहा बारा दिवस आधीच बीबीवर लिहून नंतर वेळेत फोन नंबर्स मिळून ग्रूप करता यावा यासाठी सगळ्यांना संपर्कातून मेल टाकून फोन नंबर्स मागवले.

बीबी वेगळ्या अर्थाने पेटला होता. सगळ्याच जणी खूप उत्साहात होत्या. आणि मर्फीच्या नियमांनुसार १०-१२ दिवस आधी स्वत:चं आजारपण, मुलांचं आजारपण, ऑफिसमधल्या कामाचा ताण अश्या एकेक अडचणी यायला लागल्या. असं असलं तरी ठरलेल्या दिवशी धावायचा/चालायचा निश्चय अटळ होता.
ठरल्याप्रमाणे बरोब्बर दोन दिवस आधी व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रूप्स पाडले गेले. आणि तिथे चर्चेला सुरुवात झाली. टाईमझोनप्रमाणे जसं धावायचं/चालायचं ठरलं होतं, त्याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रूप्स तयार केले. सगळ्यांचे फोन नंबर्स त्यावर अ‍ॅड केल्यावर तिथे एकच गडबड सुरु झाली. Proud मायबोलीवर असतात त्याप्रमाणे इथेही बर्‍याच जणी रोमात होत्या. Wink

हां-हां म्हणता गटगचा रविवार उजाडला. सिंगापूरमध्ये सकाळचे ७ वाजत होते तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये सकाळचे १० तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर शनिवारची संध्याकाळ. तिथल्या संयुक्ता त्यांच्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता सुरु करणार होत्या. पहिला ग्रूप जपानच्या वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता सुरु करणार होता. ठरल्याप्रमाणे मी माझ्या ७.३० वाजता म्हणजे अर्धा तास आधी त्यांना पिंग करणार होते. पण त्या सगळ्या जवळजवळ तासभर आधीपासूनच उत्साहात तयार होऊन वेळ होण्याची वाट बघत होत्या त्यांचा उत्साह बघुनच हे गटग नक्की यशस्वी होणार ह्याचे सिग्नल्स मिळाले.

आमच्या ग्रूपची वेळ जवळ येत गेली तसे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेस यायला लागले. सगळ्यांना स्टार्टिंग पॉईंटला १५ मिनीटे आधी पोचून स्ट्रेचिंग करून तयार रहा अशी सूचना दिली होती त्याप्रमाणे सगळ्याजणी एकदम जय्यत तयारीत होत्या. माझ्या जपानच्या टाईमझोनबरोबर इतर ३ टाईमझोनमधल्या (भारत, युएई व अमेरिकेचा पश्चिम किनारा) संयुक्ता माझ्याबरोबर भाग घेणार होत्या. आम्ही ट्रॅकवर जायला निघायच्या आधीच पहिल्या ग्रूपमधल्या संयुक्तांचे कामगिरी फत्ते झाल्याचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. मी १०.४० ला ट्रॅकवर जायला निघाले, भारतातल्या संयुक्ताही त्यांच्या नियोजित ठिकाणी जायला निघाल्या होत्याच. बरोबर ११ च्या ठोक्याला आऊटडोअर्सने 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि एका मोठ्या ग्रूपच्या गटगला सुरुवात झाली. सगळ्यांचा उत्साह ऊतू जात असल्याने काहीजणी प्रत्येक कि.मी.चा अपडेट देत होत्या तर काहीजणींनी ठरलेलं अंतर पूर्ण झाल्यावरच अपडेट्स दिले. तासाभरात व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेसचा पूर यायला लागला. ठरल्याप्रमाणे जवळ जवळ सगळ्यांनीच या गटगमध्ये भाग घेऊन ते यशस्वी करून दाखवलं.

दुसर्‍या आणि तिसर्‍या ग्रूपच्या वेळेत तसं बरंच अंतर होतं. तिसर्‍या ग्रूपमध्ये फक्त युकेमधल्या संयुक्ता भाग घेणार होत्या. त्या त्यांच्या सकाळी ७.३० वाजता सुरु करणार होत्या. त्याप्रमाणे बरोबर ६.३० वाजता त्यांना पिंग करून तयारीला लागायची आठवण करून दिली. वेळेच्या आधी १५ मिनीटं पोचून स्ट्रेचिंग करायची आठवण करायलाही विसरलो नाही. बरोबर ७.३० वाजता त्यांनाही 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि त्यांच्या अपडेट्सची वाट बघत बसलो. ह्या गटग चा गड सर होण्याचा हा शेवटचा टप्पाच राहिला होता.तासाभरात त्यांचेही टार्गेट पूर्ण केल्याचे मेसेजेस ग्रूपमध्ये आले. आणि हे गटग खर्‍या अर्थाने यशस्वी झालं.

ह्या अनोख्या गटगमध्ये आम्ही सगळ्या "संयुक्तांनी" मिळून आज काही तासात जगभरातील २५० कि.मी.पेक्षा जास्त परिसर पायाखालून घातला. Happy
आत्तापर्यंत आम्ही दोघीच असं ठरवून धावत होतो त्यामुळे आमच्यात को-ऑर्डिनेशन उत्तम आहे हे कळलं होतंच. पण आता वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या इतक्या जणी असणार होत्या. इतका सगळा घाट तर घातलाय, नीट पार पडेल नां? याची धास्ती होती खरंतर थोडी. पण सगळ्या भाग घेतलेल्या संयुक्तांनी ती भिती व्यर्थ ठरवली. Happy त्यांचा उत्साह बघून आम्हांलाही हुरूप आला. या गटगनंतर असं गटग पुढेही करत राहू असा रिस्पॉन्स जवळपास सगळ्याच संयुक्तांकडून आला. त्यांच्या या सुचनेचा विचार नक्की करणार आणि पुढचं गटग अजून थोडं टार्गेट वाढवून करणार म्हणजे त्या निमित्ताने सगळ्यांचा नियमित सराव चालू राहील.

उत्साहाने भाग घेऊन हे गटग यशस्वी केल्याबद्दल संयुक्तातील सगळ्याच मैत्रिणींचे मनापासून आभार. तुम्ही नसतात तर आम्हांला इतका उत्साह आला ही नसता. Happy त्यामुळे हे अश्या प्रकारचं गटग ठरवण्याची कल्पना आणि प्लॅनिंग आमचं असलं तरी ती कल्पना प्रत्यक्षात उतरली ती सगळ्या संयुक्तांच्या सक्रिय आणि शिस्तबद्ध सहभागामुळेच!

या आगळ्या वेगळ्या गटगचे अनुभव आम्हांला सार्वजनिक बीबी वर मांडायची संधी दिल्याबद्दल संयुक्ता संयोजकांचे मनःपूर्वक आभार Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उपक्रम आणि अभिनंदन.

आमच्या जीममध्ये असं बरेचदा करतात, वेळा जुळवून नाही पण एका रजिस्टरमध्ये नोंद करून मग शेवटी नोटीसबोर्डवर त्यात्यावेळी धावले/चालले गेलेले अंतर वगैरे लिहितात. मग एखाद्या मॅरेथॉनला वगैरे ग्रुपने नोंद करून धावणे हे पण केलेलं पाहातेय.

ग्रेट गोईंग आडो आणि मंजिरी! सर्व सहभागी झालेल्या संयुक्तांचं मनःपूर्वक अभिनंदन! अनेकींनी ह्या निमित्ताने पहिल्यांदा (किंवा पुन्हा) चालायला / पळायला सुरुवात केली, ह्या गटगसाठी नियमित सराव केला आणि अचानक उद्भवलेल्या हवामान - पेचप्रसंगांमुळे पाऊल मागे न घेता उलट मस्तपैकी गटगमध्ये सहभाग घेतला हे खूपच उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे. अशी गटग नियमित व्हायला हवीत!

टेक्नॉलॉजीमुळे हे सहज शक्य झाले. पण आडो आणि मंजिरी दोघींनी ज्या नेटाने हा उपक्रम तडीस नेला त्यासाठी जोरदार टाळ्या! Happy

मस्तच वाटलं या भव्य उपक्रमात भाग घेऊन. किती मजा आली. असा मेगा इव्हेंट आयोजित केल्याबद्दल आडो आणि मंजिरीचे किती आभार मानावे असं झालंय.

मी रेसकोर्सवर चालणार होते. पण ड्रायव्हरनं बातमी दिली की गाडी सुरूच होत नाहीये. आमची गाडी म्हातारी झाली आहे त्यामुळे हल्ली अधून मधून त्रास देते बिचारी. मग लगेच बेत बदलून खालच्या गार्डनमध्येच चालायचं ठरवलं. रेसकोर्सचा ट्रॅक २.२ किमी चा आहे हे माहित होतं म्हणून मी कोणतंही अ‍ॅप डालो केलं नव्हतं. पण अर्धा तास हाताशी होता म्हणून खाली बागेत बसून आधी जॉग-ट्रॅकर डालो केलं. ते कसं चालतं हे बघायला एक दोन फेर्‍या मारल्या. किमी काही मोजेना. मग अ‍ॅक्च्युअल चालणं सुरू झाल्यावर दोन फेर्‍यांनंतर लक्षात आलं की मी जीपीएस सुरू केलं नव्हतं. ते केलं अन एक बया प्रत्येक मिनिटांनंतर किमीचा अपटेड द्यायला लागली. लै भारी!

बागेच्या एका पॅचमध्ये चांगलाच भन्नाट वारा होता. मी वार्‍याच्या विरुध्द दिशेने चालत असल्याने आपोआप रेझिस्टन्स वॉकिंग झाले.

५ किमी ६० मिनिटे.

वा! भारी आहे कल्पना.

ह्या अनोख्या गटगमध्ये आम्ही सगळ्या "संयुक्तांनी" मिळून आज काही तासात जगभरातील २५० कि.मी.पेक्षा जास्त परिसर पायाखालून घातला. <<< हे वाचताना भारी वाटलं.

मजा आली भाग घेऊन . नेहमीचा जॉगिंग ट्रैक वेगळा भासू लागला सुरुवात केल्यावर..
चार किमी नंतर पायांनी थोडा असहकार पुकारला अस वाटलेल
पण आता नंतर एकच उरल आहे अस स्वतला बजावून पूर्ण केले
मंजिरीचे मोटिवेशनल मेसेज खूप उपयोगी पडले पुश अप करायला
ऑफिसच्या ताणामुळे प्रैक्टिस हवी तशी झाली नव्हती
पण संयुक्तानी मोटिवेट केल
त्यामुळे जमेल तेवढा सराव केला

थैंक्स आडो आणि मंजिरी
एवढा सुंदर उपक्रम राबव्ल्या बद्दल

आता मी तसेच काही संयुक्तानी रोज नित्य नेमाने हा उपक्रम चालू ठेवायच ठरवल आहे

tmp_Screenshot_2014-03-30-08-31-22904794388.png

मंजिरी, आडो, थॅंक्स Happy मी ६० मिनिटांत ६ किमी चालले. सकाळी परत पाठ दुखू लागल्यामुळे कढत पाण्याने शेकवल्यावर बरं वाटलं. दूध पिवून सगळा जामानिमा केला आणि शूज घातल्यावर उकाड्याने ब्रह्मांड आठवले. आज इकडे सकाळी खूप ह्युमिड होतं आणि प्रचंड उकडत होतं. मग पटकन साधा सुती ड्रेस घातला चपला सरकवल्या, टँग लिंबूपाण्याची बाटली आणि थोडे पैसे व मोबाईल ठेवलेले स्लिंग पाऊच (एक्स्पो मध्ये घेतलेले) लटकवले आणि निघाले. सुरुवात करताना व्हॉट्सॅपवर नसलेल्या एका संयुक्तेला समस टाकला सुरुवात करतेय म्हणून आणि जी निघाले ती परत येईपर्यंत बरोब्बर ६ किमी ६० मिनिटांत. एकदाही थांबले नाही की एकदाही टँगचा घोट घ्यावासा वाटला नाही. उन्हं डोळ्यावर येणार नाहीत अशी दिशा पकडून चालायला सुरुवात केली. अज्जिबात दमायला झालं नाही.

वाटेत एका ओळखीच्या काकांनी हटकलं तर त्यांना खुणेनेच बोट गोलगोल फिरवत आणि बोटांनीच चालण्याची खूण करत वॉक घेतय सांगितलं तर त्यांनीही हसून खुणेनेच चालू दे चालू दे म्हटलं. मला आधी वाटलेलं की आता २ मिनिटं तरी थांबावं लागतंय कीकॉय.

माझ्यापुढे चालणार्‍या एका अनोळखी काकांनी अचानक धावायला सुरुवात केल्यावर मलाही धावावंसं वाटू लागलं पण ३ वर्षांपुर्वी जिममध्ये धावायचे त्यानंतर एक व्यायाम म्हणून धावायची सवय उरली नसल्याने मन आवरलं. उगाच पायात क्रँप्स आले तर पुढचे किलोमिटर्स ढेपाळायचे. घराजवळच्या एका फेन्सिंग असलेल्या तळ्याभोवतीच्या ट्रॅकवर थोडं थोडं धावायची प्रॅक्टीस करु शकले तर पुढच्या अश्या इव्हेंटला नक्की धावणे आणि चालणेचं काँबिनेशन करुन टारगेट पुर्ण करेन.

३.१५ माइल्स इन ४८ मिनिट्स. प्रचंड भारी वाटतय!! माझी फास्टेस्ट ५के.
मंजिरी, आडो फार भारी कल्पना.. थँक्स अ लॉट. सगळ्या मुलींनीही जॉईन करून मस्त दाद दिली कल्पनेला. मी आधी नाहीच म्हणत होते, पण तो धागा वाचून जोर आला व करून बघुया म्हटले. १तास लागेल असे वाटले होते परंतू सगळ्या धावतायत ह्या विचाराने मीही निम्मे अंतर धावले.धम्माल आली!
आपण हे दर महिन्याला करूया.

वा, अभिनंदन सगळ्या धावणार्‍या, चालणार्‍या संयुक्तांचं आणि अभिनव कल्पनेचं.

येस. मस्त अनुभव आणि कल्पना. आडो आणि मंजिरीने व्यवस्थित सगळ्यांना मोटिवेट करत ठेवले. भारीच गटग झाले. Happy

येस. मस्त अनुभव आणि कल्पना.
आडो आणि मंजिरीने व्यवस्थित
सगळ्यांना मोटिवेट करत ठेवले.
भारीच गटग झाले.>>> +1

खूप मजा आली या गटगला. केदारने पहिले सायकलिंग गटग केले तेव्हा मी पुण्यात होते आणि जायची खूप ईच्छा होती पण जाणे शक्य नव्हते. तेव्हापासून अश्या एखाद्यातरी "अ‍ॅक्टीव्ह" गटगत भाग घ्यावा अस. खूप वाटत होते. या ५के रन च्या निमीत्ताने हे करता आले. खर तर मी चालते त्यामुळे इथेही मी चाललेच. प्रचंड पाऊस आणि थोडी थंडी यामुळे एकदा रद्द करावे असे वाटले पण केले नाही. नेहमीचे कपडे न घालता विंटरचे स्नो हायकिंग बूट, स्किइंगची पॅन्ट, जाकीट असा सगळा वॉटरप्रुफ जामानिमा करून बाहेर पडले आणि भर पावसात चालायला सुरूवात केली. सगळ्याजणी कुठे ना कुठे जगात आपल्यासोबत पळत आहेत या उत्साहाच्या भरात पहीले २ मैल फार पटकन संपले, नंतर पावसाचा जोर वाढला त्यामुळे जरा गती कमी झाली चालण्याची.
एकुण वेळ १ तास, कापलेले अंतर ५.४ के.
सगळ्यांनी खूप मोटीव्हेट केले आधीचे २ दिवस त्यामुळे प्लॅन न बारगळता पार पडला त्यामुळे ट्रीट म्हणून रात्री थेटरात जावून क्वीन बघितला. मस्त आहे सिनेमा.

आऊटडोअर्स आणि मंजिरीने खरोखरच अतिशय उत्तम संयोजन केलं ह्या उपक्रमाचं. अनेकानेक धन्यवाद दोघींना. सहभागी संयुक्तांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. जगभरातल्या संयुक्तांनी एकत्र ठरवून धावायचं/चालायचं ही कल्पनाच रोमांचकारी होती Happy

मी पाच किमी चालून पूर्ण करायचं ठरवलं होतं. रोज सकाळी साडेसातला चालतेच पण तीनच राऊंड्स घेते ( साधारण २.४ किमी ) पूर्वी ट्रेडमिलवर कधीकधी पाच किमी चालले आहे पण त्याला आता फारच काळ लोटला. गेल्या आठवड्यात नेहेमीपेक्षा थोडंसंही जास्त चालून बघायला झालं नाही. तीनच्या ऐवजी आज साडे-सहा राऊंड्स घ्यायच्या एवढं माहीत असल्याने करु शकू ह्यात तर काही शंका नव्हती पण दमायला किती होईल ह्याचा अंदाज येत नव्हता.

प्रत्यक्षात वेगळाच अनुभव आला. एरवीपेक्षा वेगळं म्हणजे जॉगट्रॅकर चालू केलं होतं आणि गाणी ऐकत होते. जीपीएस चालू व्हायला वेळ लागला त्यामुळे मी शेवटच्या अडीच राऊंड्स अ‍ॅक्युरेट मोजल्या आणि त्यावरुन आधीच्या चार राऊंड्स कॅल्क्युलेट केल्या. एरवी तीन राऊंड्स झाल्या की मला 'बास' असं वाटायला लागतं तसं आजही वाटायला सुरुवात झाली होती. थांबण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे चालत राहिले. चार राऊंडस झाल्यावर एकदम मस्त वाटायला लागलं. अजून कितीही आरामात चालू असं वाटायला लागलं आणि अगदी सहज ५.१६ किमी झाले- ४९ मिनिटांत. हा अनुभव ट्रेडमिलवरही यायचा. पहिली २० मिनिटं उगीच कंटाळा येणे, दमल्यासारखं वाटणे वगैरे व्हायचं. एकदा का ती मिनिटं क्रॉस झाली की पुढचा वॉक मस्त व्हायचा. काय कारण आहे ह्यामागे कोण जाणे !

एकदम फ्रेश, हलकं वाटतंय आज. हा उपक्रम सातत्याने होत राहो ह्यासाठी शुभेच्छा Happy

Been there ....done that......feeling awesome!

मी काल एका अनोख्या अश्या रनिंग वॉकींग गेट टुगेदर मध्ये सहभागी झाले. यात ठराविक वेळी जगातल्या काही देशातल्या ५२ मैत्रिणींनी एका वेळी आपापल्या देशात एकाच वेळी ५ कि.मी. पळायचा संकल्प सोड्ला. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, यूके, य़ूएई, अमेरिका (ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट) आणि अर्थातच "मेरा भारत"…… हे ते देश!
हो आणि या सगळ्या मराठी आहेत हे वैशिष्ठ्य!
यातलं ५ कि.मी. चालणं हे माझ्यासाठी विशेष नव्हतं. पण या मागचा विचार!
या इव्हेंटचं नियोजन काही मैत्रिणींनी स्वत: केलं. (आउट्डोअर्स आणि मंजिरी या त्य. दोघी. )ते फार जबरदस्त होतं. या ग्रुपसाठी एक whats app ग्रुप नव्याने बनवला गेला. त्यामुळे सगळ्याजणी एकमेकींच्या ट्चमध्ये राहिल्या.

यात सोयीसाठी ३ ग्रुप्स केले गेले. कारण भारतातल्या सकाळी ७ वाजता इथे डीसी मध्ये रात्रीचे १०.१५ (साधारण).
सध्याची इथली हवा लक्षात घेता इतक्या रात्री पळणं अवघड. म्हणून आम्हाला ईस्ट कोस्ट वासीयांना संध्या. ७ चा टाइम दिला होता.
तर हा विचार झाल्यापासून इथे अमेरिकेत बर्फ सुरू झाला. मग परवापासून जोरदार पाऊस!
काल सकाळी मी what's app वर कळवून टाकलं ....."heavy rains here in DC...not sure about evening event"

पण मला पुन्हा जो मेसेज आला "pls try trade mill at home!" त्याने माझ्या भावनांना हात घातला. मग जसे साडेसहा झाले….(बाहेर पाऊस चालूच)........तशी माझ्या मनातली अस्वस्थता वाढली.
मग विचार केला......साध्या पावसासाठी साधं चालणं का रद्द करायचं? मग केला सगळा जामानिमा आणि मुलीला फ़ोन केला. तर तीही तयार झाली. ठरल्याप्रमाणे संध्या. ७ ला १० मिनिटे असताना रेडी रहायचा मेसेज. बरोब्बर ७ वाजता जपानमधल्या .(फार ईस्ट) मैत्रीणीचा signal..........गेट सेट गो !
मनात फार भारी वाटत होतं. बाहेर पाऊस चालूच. जीपीएस चालू केलं. आणि दोघी निघालो. ५ कि.मी. साधारण ५० मिनिटात कम्प्लीट केले.......भर पावसातच!
हे काही फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी टायमिंग नाही. पण ही रेसही नव्हतीच ! एक आगळं वेगळं रनिंग/वॉकींग गेट टुगेदर!
यातली संघभावना महत्वाची!
And I am sure I am the eldest in this group! So what???????
आडो मंजिरी आणि सर्व संयुक्तांचं हार्दिक अभिनंदन!

एकच नंबर... सगळ्या सहभागींचे हार्दिक अभिनंदन...

माबोवर वेगवेगळे स्पेशल गटग व्हायला लागले आहेत.. क्या बात है.. लगे रहो..

मला आणि mgeeta ला 5K अंतर पूर्ण करायला ४२ मि लागली. मी आयुष्यात पहिल्यांदाच धावले. चालण्याची सवय होती, सुमारे ४ मैल, त्याचा नक्कीच फायदा झाला. mgeeta च्या सपोर्ट मुळे पूर्ण केले न कंटाळता. मजा आली.

हे ऑर्गनॉईज केल्या बद्द्ल मनापासून आभार, नाहीतर मी काही हे असले धाडस केले नसते. Happy आपल्या मैत्रिणी इतर ठिकाणी धावता आहेत, ह्या भावनेमुळे कमिटमेंट पूर्ण करणे सोपे गेले.

आउटडोअर्स आणि मंजिरीचं ह्या अनोख्या गटगच्या कल्पनेबद्दल आणि ऑरगनायझेशनबद्दल आभार!!

मला पळायची आधीपासून सवय होती त्यामुळे जेंव्ह्या ही कल्पना मांडण्यात आली तेंव्हा माझा हात आधी वर होता, पण ऑफिसमध्ये हेक्टीक काम, घरची कामं इत्यादी मुळे तयारीला काही वेळ मिळाला नाही. गटगच्या आधीच्या आठवड्यात ३ दिवस पळले तीच मुख्य तयारी.

माझ्या वेळेप्रमाणे मी २९ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता पळणार होते. आमच्याकडे २९ला सकाळपासून पाऊस होता तेंव्हा ट्रेडमिल वर पळायचं का बाहेर हे नक्की ठरत नव्हतं. संध्याकाळी पाऊस थांबला म्हणून बाहेर जाऊ म्हटलं पण तेवढ्यात ७ वाजायच्या थोडं आधी परत थोडं अंधारून आलं. त्यामुळे रिस्क नं घेता ट्रेडमिल वर पळायचं ठरवलं. शनिवार असल्याने बाकीची विकेंडची कामं काही चुकली नव्हती. पण शेवटी साडेसहा वाजता सगळं बंद करुन थोडी शांत बसून राहिले. ७ वाजता मंजिरीच्या सिग्नल आल्यावर पळायला सुरुवात केली. खरं तर बाहेर पळायलाच खूप आवडतं पण ट्रेडमिल वर असल्याने एलिव्हेशन/स्पीड कमी जास्त करत बाहेरच्या चढ उतारावर पळल्याचा जवळपासचा अनुभव घेत पळले. Happy पुढेही अश्या गटगमध्ये रेग्युलरली भाग घ्यायला आवडेल :).

Pages