कृष्णलीला

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

कृष्णलीला
लेखक: आशिष महाबळ, अदिती जोशी
रेखाटने: सोनाली फडके
मराठी विज्ञान परिषदेच्या २०१३ दिवाळी अंकात प्रकाशीत

"अहो हे पाहिलत का?", किंचित घाबरलेल्या स्वरात सौ. म्हणाल्या.
"काय?", टाईम्सच्या अंकाआडूनच शब्दकोड्यामध्ये व्यत्यय आणला जात आहे हे जाणवेल अशा सूरात श्री उत्तरले.
"अहो, पृथ्वी नष्ट होणार आहे म्हणे".
"आता  निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट नष्ट होतेच", श्रीं चा अजूनच त्रासिक आवाज.
"तसे नाही हो. आपल्या हयातीतच तो दिवस येणार असे हे म्हणताहेत", अजून घाबरा आवाज.
"म्हणू दे. २०१२ मध्ये झाली का नष्ट पृथ्वी? नाही ना? आताही नाही होणार".
"पण हे आता खगोलशास्त्रज्ञ म्हणताहेत. त्यांना पृथ्वीजवळ एक कृष्णविवर सापडलय म्हणे".
हे ऐकून मात्र आपल्या कोड्यापेक्षा हे कोडे महत्वाचे आहे हे श्रींच्या लक्षात आले आणि त्यानी आपला मोर्चा टी.व्ही.कडे वळवला. टी.व्ही. वरील निवेदिका सांगत होती - ”आपल्या दीर्घिकेच्या मध्याचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांना आकाशगंगेतील एका छोट्या भागातील तारे दिसेनासे झाल्याचे लक्षात आले आहे. इतर अनेक कारणे निकालात निघाल्यानंतर हे एका कृष्णविवरामुळे होत असल्याच्या निष्कर्षाप्रत सर्व पोहोचले आहेत. कृष्णविवरे ही आपल्या दीर्घिकेसह सर्वच दीर्घिकांच्या मध्यभागात असतात. पण हे कृष्णविवर त्या मध्याच्या आणि आपल्या मधे आहे, आणि अचानक निर्माण झाल्याप्रमाणे त्याने काही तारे आपल्याआड अचानक लपविले आहेत”.

टी.व्ही. वर आणि एकूणच मीडियात नवे खेळणे मिळाल्याप्रमाणे अभ्यासक खूष झाले होते. त्यांचे उत्साही लेख वाचून आम जनतेतही औत्सुक्य पसरले होते. टी.व्ही. वर ‘आपले शास्त्र' ह्या कार्यक्रमात चर्चा सुरु होती. डॉ. अ.मु.क यांनी सांगितले “दिवसागणिक पृथ्वी सूर्याभोवतीच्या आपल्या कक्षेत सरकत गेली आणि त्यामुळे वेगवेगळे तारे ग्रहण लागल्याप्रमाणे दिसेनासे झाले. पृथ्वी आणि तारे यांच्यामधली अंतरे मोजण्यासाठी पॅरॅलॅक्सचे तत्त्व वापरतात.” त्यावर अँकरने विचारले “हे कसले तत्त्व?” डॉ. अ.मु.क परत सांगू लागले “गाडीतून प्रवास करतांना आपल्याला जवळच्या वस्तू ह्या लांबच्या वस्तूंपेक्षा वेगवान भासतात, ते ह्या पॅरॅलॅक्समुळेच. एकीकडे गायब होणाऱ्या आणि दूसरीकडे पुन्हा प्रकटणाऱ्या ताऱ्यांवरून लक्षात आले की तो काळा प्रकार जवळपासच कोठेतरी आहे. कृष्णाविवराचे स्थान शोधण्यासाठी ही महत्वाची माहिती होती.” प्रेक्षकांनी कृष्णविवरातून तर प्रकाश येत नाही मग प्रकाशाचे मोजमाप कसे आणि कशाला केले अशी शंका मांडली. डॉक्टर म्हणाले “कृष्णविवराकडून प्रकाश प्राप्त होत नाही. तरी त्याच्या वस्तुमानामुळे मागील ताऱ्यांचा प्रकाश गुरुत्विय भिंगाच्या तत्त्वाप्रमाणे वक्र होऊन पृथ्वीपर्यंत पोचतो आणि त्यावरून कृष्णविवराचा आकार व वस्तुमान मोजता येते. त्या मोजमापावरून हे धूड आपल्याच परसात असल्याचे लक्षात आले. केवळ आपल्या सूर्यमालेतच नाही तर मंगळाच्या कक्षेच्याही आत आहे हे ही कळले.” मात्र पुढील होणारे परिणाम सांगणे डॉक्टर अ.मु. क ह्यांनी त्या कार्यक्रमात टाळले. सध्या आपल्या सूर्यमालेतील ग्रहांवर काही परिणाम नव्हता झाला. म्हणजे त्या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्यापेक्षा बरेच कमी असणार. पण तरीही ते फार जवळ आले तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीला नूडलसारखे ताणून, स्वत:भोवती चकलीसारखे सर्पिलाकृती गुंडाळत गिळंकृत करू शकेल हे ही लक्षात आले. ही शक्यता कुठल्याश्या कार्यक्रमात पण सामान्य जनतेला नंतर कळलीच.

krishnaleela_fig.jpg

हे कळल्यावर मात्र या बातमीमुळे पसरु शकणारी घबराट थोपवण्याकरताची सरकारी यंत्रणा कार्यरत झाली. वर्तमानपत्रात ‘शास्त्रीय’ स्पष्टीकरणे येऊ लागली.
श्री: "अग हे पाहिलंस का? हे कृष्णविवर का बनलं या बद्दल लोक काय काय म्हणताहेत?"
सौ: "आज काय नवीन?" संसार सांभाळताना ‘कृष्णविवर आलं तर बरं’ म्हणायची वेळ रोज सौ वर यायची; त्यांचे स्वत:चे पेज ३ वाचन बारगळायचे, पण ऐकायची उत्सुकता मात्र कमी नसायची. आजकाल शब्दकोड्याआधी श्री कृष्णविवराच्या पेज ३ कडेच आधी वळत असत आणि आपल्या सराईत टिपण्णींसहीत त्याबद्दलच्या बातम्या सौ. ना सुनावत. हल्ली रोज एक नवीन शक्यता, छे, शक्यता कसली, ठासून मांडलेली थियरी “दैनिक थेरी” ह्या सदराखाली प्रकाशित होऊ लागली होती.

हा मग श्रींचा रोजचाच कार्यक्रम झाला. सकाळच्या चहानाश्त्याला गरमागरम टिप्पणीची फोडणी मिळू लागली एके दिवशी एक थेरी मांडली गेली. श्री वाचू लागले " 'आपण पाठवलेले संदेश मिळून परग्रहवासियांनी आपल्याला नष्ट करण्याकरता अॅक्शन अॅट अ डिस्टन्सनी हे कृष्णविवर बनविले'. हे थेऱ्या मांडणारे पृथ्वीवासी लोक तसे हुशार (!!) असतात बरं का. हे कृष्णविवर अचानक सापडलं म्हणजे कुणी दूरुन पाठवलं, आणि हळू हळू ते आपल्याकडे आलं असं नाही वगैरे सारख्या ‘साध्या’ गोष्टी ते बरोबर सांभाळतात. गनिमी काव्याप्रमाणे अचानक हे कृष्णविवर प्रकट करतात. त्यामुळेच बहुधा अनेक लोक अशा बाबतीत ‘अॅक्शन अॅट अ डिस्टन्स’ सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. पण जाऊ द्या, लोकांच्या विश्वासाबद्दल न बोललेलंच बरं".

मग दुसर्या दिवशी ही दुसरीच थेरी आली: " 'बरम्युडा त्रिकोणासारखा अॅट्रॅक्टर, पण अवकाशात तयार झालेला'.  कृष्णविवराचे सर्व वस्तुमान एका बिंदूत एकवटलेलं असतं. त्याचा प्रभाव सर्व बाजूंना समान असल्याने  श्रॉस्शील्ड नामक शास्त्रज्ञाने नेमून दिलेल्या त्रिज्येनुसार त्याचा ‘आकार’ ठरतो. जितकं वस्तुमान जास्त, तितकी ही त्रिज्जा मोठी. ह्या त्रिज्येचा आत जर कोणतीही वस्तू आली तर कृष्णविवर ती  गिळंकृत करतं. छोटं कृष्णविवरही आसपासच्या गोष्टी गिळंकृत करू शकतं. हे सर्व नियम धाब्यावर बसवून म्हणे अवकाशीय त्रिकोण - यात पुन्हा समत्रिभूज की नाही याबद्दलही उप-थेऱ्या आहेत. एकानी तर चक्क अवकाश त्रिमीत असतं असं म्हणून त्या अवकाशीय पाहुण्याचं नामकरण बरम्युडा पिरॅमीड असं करून टाकलं आहे".

krishnaleela_fig2.jpg

आणि तिसर्या दिवशी ही तिसरी थेरी म्हणजे अगदी कमालच झाली!  " 'पृथ्वीची युगानुयुगांची एकूण लोकसंख्या इतकी झाली की त्यांच्या आत्म्यांचे एकूण वस्तुमान टोलमन-ओपनहाईमर-फ़ोलकोफ लिमीट  पलिकडे जाऊन त्याचे कृष्णविवर बनले'. महाकाय ताऱ्यांचे ह्या टो-ओ-फो लिमिट इतके वस्तुमान झाले की तो न्युट्रॉन तारा आतल्याआत कोसळतो आणि त्याचे कृष्णविवर बनते. कमी वस्तुमानाच्या ताऱ्यांचं तसं नसतं, त्यांनी चंद्रशेखर लिमिट गाठली की ते श्वेत बटू तारे होतात. ह्या आत्म्यांच्या वाढत्या वस्तुमानानी ती टो-ओ-फो लिमिट गाठण्याआधी त्यापेक्षा कमी असलेली चंद्रशेखर लिमीट गाठल्यावर त्या ताऱ्याचा श्वेतबटू तारा व्हायला हवा. तसं का झालं नाही याबद्दलचं वक्तव्य तितकंच अतर्क्य आहे. आणि एकूण वस्तुमान पुन्हा  सूर्यापेक्षा कमी कसे झाले याबद्दल अवाक्षरही नाही." एकूणात या थेऱ्या नसून उगीच प्रचार माध्यमांची थेरं होती.

प्रसारमाध्यमांनी या एकंदरीत प्रकरणाचा असा वणवा पसरवल्यावर त्यावर आपलीही पोळी भाजून घ्यायची सर्वांचीच लगबग उडाली. अर्थातच या गोष्टींशी अर्थाअर्थी संबंध नसलेले गट देखील पुढे सरसावले. राजकारण्यानी परग्रहवासी सोडून हे कृष्णविवर आपल्या शत्रुदेशाचे नवे अस्त्र आहे असे म्हणणे सुरु केले; तर देववाद्यांना या घटनेचे भाकीत त्यांच्या पट्टग्रंथात अचानक सापडले. एक उदाहरण द्यायचे झाले तर कल्कि म्हणे काळ याचा अपभ्रंष आहे, आणि जगाचे रहाटगाडे संपवायला शिव अवतरला आहे. सर्व देव सारखेच म्हणणाऱ्यांना विष्णु काय आणि शिव काय, अवतरला म्हणजे झाले. दैववाद्यांचे तर विचारायलाच नको! बिरबलाच्याही पुढे जाऊन एकही प्रकाशकण निसटू न देणाऱ्या कृष्णविवरावर देखिल ते आपली खिचडी पकवायला सक्षम होते. आणि नेहमीचे माथेफिरु कॉन्स्पिरसी थेअरी वाले तर होतेच.

काही कल्पना मात्र अतर्क्य कोटीतल्या नसायच्या. एक शक्यता वैज्ञानिकांनी आधी खिजगणतीत धरली नव्हती पण कुठे तरी त्यांना कल्पना होती की असे होऊ शकते. ती म्हणजे जेनेवा येथील Large Hadron Collider (LHC) मध्ये घडवून आणल्या जात असलेल्या मूलकणांच्या टकरेतून अतिसूक्ष्म कृष्णविवरे बनू शकतात. कृष्णाविवराचा नाश हा त्याच्या वस्तुमानावर आधारीत तापमानानुसार होतो. ही एल एच सी जनित कृष्णविवरे अणुपेक्षा छोटी असल्याने लगेच त्यांचे बाष्पिभवन व्ह्यायला हवे किंवा त्यांच्या अधिक घनतेमुळे पृथ्विच्या मध्याला ती पोहोचून तिथे लक्षावधी ते कोट्यावधी वर्षे काही न होता स्थिरावायला हवी. खरेतर मोठे कृष्णविवर LHC मुळे बनले असते तर ते बनतांना तिथे उर्जापात जाणवला असता. तसे झाले तर नव्हते, पण तरीही ही शक्यता गृहीत धरायला हवीच होती. ही एल एच सी निर्मित आपत्ती निस्तरण्यासाठी लगेच ‘डॅमेज कंट्रोल उच्चपातळी समिती’ नियुक्त केली गेली.

बाकी निर्माण कसेही झाले असो, या ‘दैनिक थेरी’ प्रकारामुळे एक फायदा हा झाला की सर्वांच्या कृष्णविवरांबद्दलच्या ज्ञानात बरीच भर पडली. उदा. थर्मोडायनॅमिक्सच्या प्रमेयांप्रमाणे कोणत्याही संवृत्त गोष्टीची entropy (अस्ताव्यस्तता) कमी होऊ शकत नाही. कृष्णविवरातील अस्ताव्यस्तता खरी आहे की नाही याबद्दल अभ्यासकांचे पण एकमत नव्हते. कोणत्याही कृष्णविवराचे पूर्ण विवरण केवळ त्याचे वस्तुमान, त्यावरील विद्युतभार आणि त्याची फिरण्याची गती यावरून देता येते. कृष्णविवरामध्ये एखादी वस्तू पडते तेंव्हा त्या वस्तूचे नामोनिशाण नष्ट होते पण त्याचवेळी कृष्णविवराचे वरील तिन्ही गुणधर्म म्हणजेच वस्तुमान, विद्युतभार आणि त्याची फिरण्याची गती बदलतात. पण ती वस्तू आत नेमकी कोणत्या स्वरुपात राहते हे कुणालाच माहीत नव्हते.

ह्या कृष्णविवराने गिळंकृत करण्यापासून स्वतःला कसे वाचवावे हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत होता. काही लोकांनी वैयक्तिक यानांमधून पृथ्वीपासून दूर जायचे ठरविले. श्री व सौ आपल्याला कोणता उपाय करता येईल ह्याची चर्चा करताना बुद्धी, माहिती ह्यापेक्षा आपल्या खिशाचे मत जास्त मानत होते. बाकी लोकांनी मात्र त्या कृष्णविवराला थोपवण्याकरता अनेक उपाय आपापल्या मतांप्रमाणे सुरु केले. काही लोकांच्या मते जुन्या ग्रंथांमधे दिलेल्या काही वनस्पतींचा एक काढा प्यायला की कृष्णविवर काही करु शकणार नाही (बहुधा त्यांना असे म्हणायचे असेल की काही झाले तरी ‘खास काढ्या’मुळे कळणार नाही - एकूण काय त्यांचे वक्तव्यपण काढ्याप्रमाणे गढूळ  होते). दुसरे एक मत असे होते की सगळ्या प्रार्थना स्थानांवर हायड्रोकार्बन्सच्या कांड्या मंद जाळल्या तर कृष्णविवराचे किंवा त्याच्या परग्रहवासी धन्याचे मतपरिवर्तन होईल. हे असे प्रकार म्हणजे नेहमीचेच होते. बुडत्याला काडीचा आधार प्रमाणे जेंव्हा बुडता नुसताच बुडत असतो (म्हणजे बुडून मरत नसतो) तेंव्हा(च) या गोष्टींचा फायदा होतो.

पण नव्या अडथळ्यांना जास्त धाडसी व कधीकधी जास्त बिनडोक प्रयत्न लागतात. अशातील हे दोन प्रकार पहा- (१) सोशल मिडिया वर खालील प्रमाणे ग्रुप्स बनवणे: if 1 billion people join this group, the blackhole will go away. (२) कृष्णविवरांची entropy  हा प्रकार पूर्ण न कळलेल्यांनी (ती पूर्ण कुणाला कळली आहे म्हणा?) एक भलतीच शक्कल काढली. Organization म्हणजे कमी entropy. मग घ्या विश्वकोशांचे गठ्ठे, वेदांची बाडे आणि द्या खायला ती त्या कृष्णविवराला. या कल्पनेला काही श्रीमंत पाठीराखे मिळाल्यामुळे चक्क असे एक रॉकेट रवाना झाले. इतक्या सगळ्या संगठीत ज्ञानामुळे entropy तर संपूनच जाईल. शिवाय आत वेद टिकले तर अज्ञान दूर होऊन कृष्णविवरही आपले तोंड काळे करेल म्हणे.

वैज्ञानिकांचीही डोकी चालत होतीच. लघुग्रह आपल्या दिशेनी आला तर काय करायचे याचा बराच विचार झालेला होता (उदा. अशा लघुग्रहाच्या एका बाजूला पांढरा रंग दिला तर एक बाजू जास्त गरम होईल आणि त्यामुळे तो लघुग्रह जास्त वेगाने फिरुन त्याची कक्षा बदलली जाऊन तो दूर निघून जाईल) पण कृष्णाविवराबद्दल अजून विचारमंथन चालू होते. अगदी छोट्या कृष्णविवरांचे तापमान सभोवतालच्या तापमानापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे ते हॉकींग किरणे उत्सर्जीत करतात आणि वस्तुमान क्षय होऊन त्यांचा ऱ्हास होतो. मोठी कृष्णविवरे स्वत:च बाहेरुन उर्जा मिळवून अजूनाजून गलेलठ्ठ होतात. अशा कृष्णविवरांकरता एक जालीम उपाय म्हणजे मॅग्नेटीक गन वापरुन खूप इलेकट्रॉन्स त्यात फायर करायचे. कृष्णविवर जेंव्हा एखाद्या ताऱ्यापासून बनते तेंव्हा त्या ताऱ्याप्रमाणेच कृष्णविवरावरील विद्युत्भार थोडासाच किंवा शून्य असतो. इलेक्ट्रॉन्सचे एकमेकांना दूर ढकलणारे कुलंब बल गुरुत्वाकर्षण बलापेक्षा इतके जास्त असते की इलेक्ट्रॉन्सचा मारा करुन विद्युतभार जर वाढवला तर कृष्णविवराचे बाष्पिभवन वेगाने होते. हा एकच मार्ग रामबाण आहे हे  सर्वांना जाणवले. यानांच्या मदतीने अशी उपकरणे लगोलग रवाना झाली.

इतरांची चर्चा टिपेला पोचल्यावर एका निरीक्षकांनं ब्रेकिन्ग न्यूज म्हणून ते कृष्णविवर आता निघून गेल्याची बातमी दिली. आणि मग आपण सुचवलेल्या उपायांच्या परिणामीच धरतीवर आलेलं हे संकट टळलं असा दावा करत ते श्रेय लाटण्याची अहमहमिका सुरु झाली. नेमका कोणता उपाय लागू पडला यावर अर्थातच कुणाचे एकमत होणे शक्य नव्हते. श्री आणि सौ यांच्या मध्ये ही त्यावरून मतभेद आहेत. पण वरील प्रकार झाल्यानंतर  विचारांना भरपूर खाद्य पुरवून, आणि मुख्य म्हणजे पृथ्वीला खाद्य न बनवता, ते कृष्णविवर अंतर्धान पावले होते.

विषय: 
प्रकार: