त्याला पहिल्यांदा बाहेर घालव....(विशेष माहितीसह)

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2011 - 09:32

त्याला पहिल्यांदा बाहेर घालव.. (विशेष माहितीसह)

आमच्या घरात मी सोडता बाकी सगळे स्त्री सदस्यच - आई, बायको व दोन मुली म्हणजे लेडिज होस्टेलच ! या सर्व मंडळींना अनेक कामांसाठी मला ऑर्डर सोडायची जन्मजात सवय आहे. पण देवाने माझी नेमणूक या घरात विशेष करुन का केली आहे त्याची जाणीव घरात पाल, झुरळ, अनेक प्रकारचे किडे वगैरे आले तर ही मंडळी आवर्जून करुन देतात. ईईईईईईईई........पाल (झुरळ, किडा काहीही टाकावे ) असे मोठ्याने चित्कारणे / ओरडणे / किंचाळणे असा मुख्य समारंभ असतो. सर्व शक्तीनीशी तो करुन झाला की मग सगळे समेवर येतात....
त्याला पहिल्यांदा बाहेर घालव....

आमच्या या लेडिज होस्टेलच्या "बारक्या"चे (सुज्ञ वाचकांना हा कोण हे सांगणे नकोच) मुख्य काम - हे असले किळसवाणे / विचित्र / भयानक / अजस्त्र - ( इथे त्यावेळेस जे सुचेल ते विशेषण वापरणे, ) प्राणी ताबडतोब घराबाहेर घालवणे हेच आहे अशी सर्वांची पूर्ण खात्रीच आहे. अजिबात अतिशयोक्ति करत नाही - पण मॉथ; म्हणजेच साधं मोठं फुलपाखरु जरी आलं तरी - या "पक्ष्याला" पहिले घराबाहेर काढ असेही उदगार येतात म्हणजे पहा !

काही दोस्त मंडळींनी शिकवल्यामुळे मी सर्व किडे पकडू शकतो, साप, उंदीर, सरडे, पाली हाताळतो याची जाहिरात मीच (वेड्यासारखी) या मंडळींसमोर का करुन ठेवली याचा मला आता पश्चात्ताप होऊन उपयोग तरी काय ?

तर एकदा असेच आम्ही सर्व निवांत टी. व्ही. पहात बसलो असताना माझ्या चतुर बायकोच्या अतिसंवेदनाक्षम कानांनी वेध घेतला तो एका किड्याच्या उडण्याच्या आवाजाचा (तशी ती शब्दवेधीच आहे याबाबतीत - कोण तो अर्जुन का कर्ण वगैरेंसारखी)....झाले....तिने ईईईईईईईईईईई चा सूर लावायचा अवकाश...मी सोडून सर्व सदस्य जिकडे दिसेल तिकडे पळू लागले. मला काही लक्षात यायच्या आत बाजूच्या दोन्ही बेडरुम्सची दारे लागलीदेखील होती व नेहेमीचे ब्रह्मवाक्य माझ्या कानावर आदळले .........

"त्याला पहिल्यांदा बाहेर घालव... "

मी पाहिले तर बिचारा "प्रेइंग मँटिस" माझ्या शेजारीच येऊन बसला होता. मी उत्साहाने बायकोला सांगू लागलो - अगं, तो साधा "प्रेइंग मँटिस", ते चितमपल्लींनी वर्णन केलेला - खंडोबाचा घोडा.

"शशांक, ते कोणीही असूदे...त्याला पहिला बाहेर घालव....."

"अगं, मस्त चान्स आलाय फोटो काढायचा तर ओरडतीएस का ?"

"अरे, XXXX, तुला फोटो काढायचं काय सुचतंय त्याला बाहेर काढायचे सोडून ?"

"तूच परवा मला ते वर्णन वाचून दाखवत होतीस ना एवढ्या कौतुकाने !"

"शशांSSSSक......"

इथे तिचा एकदम वरच्याचा वरचा "सा" लागल्यानं मी पुढे काही बोलू धजलो नाही.

सुदैवाने कॅमेरा जवळच असल्याने मला निवांत फोटो काढायला मिळाले. दोन्ही बंद खोल्यातून अनेक वेगवेगळे उदगार माझ्या कानावर येत होतेच पण नेहेमीसारखे त्याकडे दुर्लक्ष करुन मी प्रेइंग मँटिसचा फोटोसेशन पार पाडला.

अर्थातच त्या बिचार्‍याला फोटोसेशननंतर अगदी सांभाळून घराबाहेर सोडून दिले ! ( सर्व कीटकांचे पाय नाजुक असल्याने पटकन तुटू शकतात व असा जायबंदी कीटक कोणाचेही लगेच भक्ष्य होऊ शकतो निसर्गात )

बंद खोल्यातून तार व संतप्त स्वरात विचारणा झालीच. खात्री करुन घेण्यासाठी प्रथम दारे किलकिली करुन शत्रू (?) घराबाहेर गेला आहे हे पहाण्यात आले. मला दोन्ही हात पुढे करुन उघडून दाखवायची आज्ञा झाली. पूर्वी हे पकडलेले कीटक मी हातातच अथवा शर्टच्या खिशात अलगद ठेवायचो व सर्व आलबेल आहे झाले अशा समजुतीत मंडळी रीलॅक्स झाली की हळूच कोणाच्यातरी समोर पुन्हा धरायचो - मग पुन्हा किंचाळ्या वगैरे सर्व सीन होऊन मला शिव्याशाप मिळाले की मग मलाही एक प्रकारचा दचकावल्याचा आनंद (बाकी मंडळींना तो आसुरी वाटला तर माझा काय दोष) मिळायचा. तेव्हापासून माझी झाडाझडती हा नाट्याचा शेवटचा अंक असतो. असो, तर हे झाडाझडतीचे सगळे सोपस्कार पार पडल्यावर मग सर्व दोस्त (?) पक्षांनी सुटकेचा नि:श्चास टाकला व मी हे नवीन प्रकाशचित्रे (फोटो) संगणकावर उतरवण्याच्या मागे लागलो.

विशेष माहिती - याला प्रार्थना कीटक म्हणतात - पुढचे दोन पाय उचलून प्रार्थनेच्या पोजमधे दिसतात म्हणून. हा कीटक जबरदस्त भक्ष्यक (शिकारी / प्रिडेटर) असा असल्याने पाल याला खाणार नाही, हाच कदाचित पालीला खाईल. छोटे किडे, छोटे बेडूक, छोटे साप अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची हा कीटक पद्धतशीर शिकार करतो. डिस्कव्हरी चॅनेलवर हा चक्क हमिंग बर्ड व अगदी छोट्या उंदरांची शिकार करताना दाखवला आहे.

हा, टोळ व इतर किडे (गांधीलमाशी, मधमाशी सोडल्यास) माणसाला इजा पोहचवत नाही. झुरळे, किडे वगैरे सर्वांच्या पायाला थोडेसे काट्यासारखे असल्याने आपल्या अंगावर बसल्यावर थोडे टोचल्यासारखे होते. आपल्या अंगावर बसलेल्या किड्याला ओढून काढण्याऐवजी इतर काही कागद वगैरे सपोर्टसारखे पुढे केले तर तो त्यावर चढतो व आपल्याला किंचीत ओरखडल्यासारखे जे फिलींग येते तेही येणार नाही.

कोळी, सुरवंट अंगावर चिरडले गेल्यास शरीरावर रॅश किंवा गांधी येउ शकते. या परिस्थितीत घरगुती उपचार न करता ताबडतोब डॉ. कडे जाणे.

कुठलाही छोटा प्राणी माणसासारखा "अजस्त्र" प्राणी समोर आला की घाबरतोच. त्यात आपण पळापळ केली की त्याला भिती वाटून तो पळापळ करतो. आपण शांत (९०-९९% लोकांना हे शक्य नाही याची जाणीव आहे) राहिलो तर तो (सापदेखील) काही करत नाही. डॉ. प्रकाश आमट्यांचा नातू देखील विषारी साप, बिबळ्या, घोरपडी हाताळताना आपण पहातो की ! त्यामानाने "पाल", "किडे" हे तर किती किरकोळ !; यांना आपण न मारता, इजा न करता हाकलवू जरुर शकतो की - तेदेखील निसर्गाचे घटकच आहेत ना ? झुरळ, डास, ढेकूण्,पिसवा हे फार उपद्रवी व आजार फैलावणारे असल्याने त्यांचा बंदोबस्त करणे फार जरुरीचे आहे.

पाल तर किडे, झुरळे खाते म्हणजे उपयोगीच म्हणायची, ती कधीही आपल्याला त्रास देउ इच्छित नाही. भारतात सापडणारी एकही पाल विषारी नाही. पालीला एकवेळ हाकला, मारु मात्र नका.

किड्यांसंबंधात - भारतात सापडणार्‍या विषारी, घातक किड्यांची कोणाला विशेष माहिती असल्यास ती फोटोंसकट दिल्यास सर्वांनाच उपयोगी ठरेल.

सर्वात शेवटी टोळाचा फोटो टाकला आहे.

हाच तो बिचारा - घराबाहेर घालवायच्या आधीचा

Picture 271.jpgPicture 273.jpgPicture 267.jpgटोळ / नाकतोडा / ग्रासहॉपर
http://www.seamstressfortheband.org/wp-content/uploads/2010/09/grasshopp... या साईटवरुन साभार ...

grasshopper21.jpg

गुलमोहर: 

त्याकरता परत वर आणलाय हा लेख >>> बरं झाल अतिशय सुंदर लेख मिसला असता नाहीतर. Happy प्रचि मस्त आल्या आहेत.

पालींची मला ही किळस वाटते,
बाकी हे प्रेइंग मँटिस,विविध रंगी पतंग,छोटे किटक पाऊस सुरु झाला कि घरात येतात व लाइट भोवती घुटमळत रहातात.
दोन वर्षापुर्वी अश्याच पावसात एक माशी रात्री घरात आली जवळ पेपर किंवा रुमाल काहीच नव्हतं म्हणुन हाताने पकडण्याचा प्रयत्न केला तर ४४० व्होल्टचा धक्काच लागला जोरदार डंख करुन ती उडाली आणि थोड्यावेळाने माझा हात सुजला ठणके लागले रात्री १२.०० वाजता डॉक्टरकडे कुठे जायचे म्हणुन हाताला आयोडेक्स लावुन झोपलो, सकाळी पहातोतर सुज,दुखने काहीच नाही Proud

अरे मी कसा मिसला हा लेख? फोटो आणि लेख दोन्ही मस्तच!
शशांक अरे माझा लेक एकदा फोटोसाठी एका पालीच्या मागे लागला. म्हणजे तिने योग्य ती पोझ द्यावी म्हणून. शेवटी तिने दिली . आणि त्याने अगदी क्लोजप घेतला. अरे काय फॅन्टास्टिक आलाय म्हणून सांगू तो फोटो! ईईई...मलाही किळ्सच वाटते पालीची तरेही सांगते फोटो उच्चच आलाय. त्याने त्या फोटोला नाव दिलंय...लाफिंग लिझार्ड!
आमच्या घरात पाली असतात. पण मी सध्या त्यांना दया दाखवत नाही. काळं हिट घेऊन त्यांना मूर्छित करते. मग बाई आली की ..........यक!...जाऊदे!

धमाल लिहिलंय...
आमच्या घरी बरोबर उलट आहे...सगळेच बाप्ये..... पण कुत्र्याला घाबरते त्यासाठी मोठा मुलगा कंपनी देतो....आम्ही दोघं बाबा आणि लहान मुलगा यांच्या मागे लपतो कुत्रा दिसला की..

रच्याकने praying mantis मला दिसला नाही..फक्त Grasshopper Green चे फोटो दिसताहेत..मला वाटतं करड्या रंगाचा, जंगलात दिसतो तो न?? की माझीच काही गफलत होतेय...असो.....धमाल आहे तुमच्या घरी...:)

मस्तच्.... मला असल्या प्राण्यांची भिती वाटत नाही पण उंदिर आला की मात्र माझी वाट लागते. मग टेबल, खुर्ची, पलंग, सोफा इत्यादी सेफ वस्तुवर मी चढुन बसते आणि मग तिथुन मार्गदर्शन करते कुठे आहे, कुठे फटका मारायचा इ.इ. Happy

शशांक
लेख छानच.

खूप पूर्वी नवर्‍याने पाल मारलेली पाहून मला गरगरल्यासारखे झाले होते.तो दातओठ खाऊन पालीला मारत होता आणि मी 'नकोरे मारु,बाहेर घालव'.वगैरे बोलत होते.शेवटी वैतागून म्हणाला की झुरळांना मारताना भूतदया कुठे जाते.पाल पाळायची असेल तर पाळ! नंतर चुकूनमाकून पालूताई घरात आल्याच तर नवर्‍याकडे पुढच्या कर्मासाठी झाडू दिला जातो.

मस्त... लेख वाचून मजा आली . लेखामध्ये वर्णन केलेल्या सर्व प्राण्यांना मी पण जाम टरकून आहे. पण हे सर्व फार छोटे आहेत. पण असा एक प्राणी आहे, कि ज्याच्याशी वागताना अतिशय सावध राहावे लागते. (अतिशय हुशार, बेरकी, कधी डंख मारेल सांगू नाही शकत., विलक्षण memory) ....

छान माहितीपूर्ण व तरीही खुसखुशीत लेख व प्र.चि. ! शीर्षक तर फारच कल्पक व खेंचक !!
मीं चिपळूणला असताना हा टोळ [ बहुतेक हाच !] गॅलरीत, जिन्यावर स्तब्ध,दबा धरून बसलेला मीं बर्‍याच वेळां पाहिलाय.
[ कॉलेजमधे झुरळांचं 'डिसेक्शन' केल्याने माझ्या बायकोला झुरळांची भिती, किळस वाटत नाही. त्यामुळें, माझ्यावर व इतरांवर ईंप्रेशन मारायला झुरळं हलकेच पकडण्याची व बाहेर फेंकून देण्याची एकही संधी ती दवडत नाही.
सर्व दारं व खिडक्या बंद असतानाही पाली घरांत येतातच कुठून यावर एक वर्ष डोकं खाजवून नंतर मी तो शोध घेणं सोडूनच दिलं ! ]

मी पण कसा मिस केला हा लेख? लोळले मी हसून Rofl
मी या प्राणीमात्रांना घाबरत नाही, फक्त पालीची मात्र अत्यंत किळस येते. माझी आतापर्यंत ५ ते सहा घरं झाली आहेत, सगळीकडे पाली होत्या. किचन सिंक आणि गॅसच्या शेगडीखाली अशा त्यांच्या आवडीच्या जागा ठरलेल्या. कुणी म्हणेल खरकटं रहात असेल, झुरळं असतील वगैरे, पण नाही, स्वैपाकघर स्वच्छ असतं, पाली पोसल्या जातील इतकी झुरळंही नसतात घरात.. कित्येक वेळा नवरा घरी नसेल तर ती पाल सिंकमधे किंवा शेगडीखाली तशीच बसून आणि मी सिंककडे न फिरकता स्वैपाक करतेय असंही झालेलं आहे.

जरा जरी याबद्दल तक्रारीचा सूर काढला तरी नवरा आणि आता त्याचं ऐकून मुलगाही तू केवढी, ती पाल केवढी, ती तुला किती टरकली असेल असं बोलून सहानुभूती तर सोडाच, पार गाळातच काढतात Sad

प्रा. महाजनसरांनी केलेली पर्यावरणीय आदर्श कुटुंबाची व्याख्या आमच्या घरात सतत बोलून दाखवली जाते. नवरा, बायको, मुलं, थोडी झुरळं आणि १-२ पाली... Sad घर म्हटलं की हे असलंच पाहिजे म्हणे.

किती छान फोटो आहे. खरच आपण उगाच घाबरतो ह्या छोट्या छोट्या प्राण्यांना.

आत्ताच आमच्या लिफ्टमध्ये एक कबूतर अडकलं होतं. मुलाने (साडे पाच वर्षे) लिफ्ट बोलवली. दरवाजा उघडल्यावर समोर कबूतर. जोरात ओरडला, थरथर कापत घरात आला. त्याला सांगता सुद्धा येत नव्हतं काय आहे लिफ्टमध्ये. काहीतरी काहीतरी असं बोलत राहिला. कुत्रा आहे का मांजर आहे का ह्याला नाही म्हणून सांगितलं. दोन मिनिटांनी शांत झाल्यावर सांगितलं. कबूतर आहे. त्याला शाळेत जायला उशीर होत होता म्हणून जिन्याने उतरायला सांगितलं. पण माझी चूकच झाली. त्याला पाठवायला नको होतं. आज त्याला खूप मोठा धडा मिळता मिळता मी त्याला तो मिळू दिला नाही. मुलगा शाळेसाठी जिन्यातून उतरल्यावर ती लिफ्ट परत उघडली. ते कबूतर शांतपणे लिफ्ट मध्ये फेर्‍या मारत होतं. मोठ्या काठीने हळू हळू हुसकावून त्याला लिफ्ट बाहेर काढलं. मलाही भीती होतीच, ते अंगावर येईल. पण ते बिचारं चालत चालत गेलं.

पुढे ते उडालं आणि जिन्यातल्या खिडकीतून बाहेर जायचा प्रयत्न करू लागलं. मग मी त्याचा ट्रॅक ठेवला नाही.

मी मुलाला दाखवलं असतं की ते आपल्याला काही करत नाही आणि खरं तर ते स्वतःच अडकलं आहे आणि त्याला मदत करायला हवी तर कदाचित त्याची भीती गेली असती.

मस्तच आहे. काही ठिकाणी माझचं वर्णन आहे असे वाटले Proud खासकरून जिथे घाबरणे, आरडाओरडा करणे इत्यादी उल्लेख आहेत.

मला पालीची भीती नाही वाटत पण उडणार्या झुरळांची आणो किड्यांची प्रचंड वाटते.

लेक नाही घाबरत. असे प्रकार घरात आले तर हसत बसते आणि माझी दया आल्यावर तिच्या बाबूला मारायला बोलावते.

मी पण तुमच्या पार्टीत,, पाली उंदीरं, चिचुंद्री, झुरळं, आदलं, विंचू वगैरे सर्व काही घरात आल्यावर बाहेर हाकलता येतं. वेळ आली तर रट्टे मारून मारता येतं

कसलीही घाण किळस वगैरे वाटत नाही. Happy

मी पण तुमच्या पार्टीत,, पाली उंदीरं, चिचुंद्री, झुरळं, आदलं, विंचू वगैरे सर्व काही घरात आल्यावर बाहेर हाकलता येतं. वेळ आली तर रट्टे मारून मारता येतं.. कसलीही घाण किळस वगैरे वाटत नाही. >>> अगदी असच आहे माझ पण ...साप असेल तर मात्र आई लागते...माझे वडिल घाबरट आहेत्..मी कधीच पाहिल नाही त्यांना साप मारताना...शेजारी पण आईला बोलवायचे....
लेख मस्त्..हसुन हसुन मेले मी....फोटो झकास्....माझा नवरा पण तुमच्या category मधे ....सगळ्यांना जगु द्या...मुंग्या झाल्या तर हा तिथे जाता येता साखर टाकतो..:(

549528_10201702506777983_1554940298_n.jpg

हा विषारी किडा नाशिक मधेच बघितला.. २-३ इंच लांब असणारा.. अत्यंत घातक .. जिथे हा चावतो तिथे भयंकर आग होते आणि असंख्य छोटे पुरळ येतात.. सरळ डॉक्टर कडेच जाणे सोईचे असते ...

लेख मस्त आहे Happy

उंदीर सोडून इतर छोट्या मोठ्या प्राण्यांना मी नाही घाबरत. उंदीर काय पण उंदराचा भास जरी झाला तरी मी पहिले सेफ जागी जाऊन बसते Proud

माझ्या मैत्रिणीचे वडील इतके निसर्गवेडे आहेत की त्यांच्या वांगणीच्या घराच्या बेडरुम आणि बाथरुम मधल्या पॅसेजमधे मधमाशांनी पोळं केलय. ते काका खुशाल त्या बेदरुम मधे झोपतात आणि खिडकी उघडी ठेवतात मधमाशांना आत बाहेर करता यावं म्हणून. त्यांना एखाद दोन वेळा चावल्याही आहेत मधमाशा पण ते फारच दयाळू आहेत प्राणी पक्षी किड्यांच्या बाबतीत.

मी सुद्धा तुमच्या कुटुम्बातील स्त्री सदस्यान्च्या पार्टीत बर का,

कालच घरात एका "पल्लिदेवीन्चे" दर्शन झाले आणि "आधी तिला बाहेर घालव" अशी order सोडायला नवराही घरात नव्हता हो, फारच पन्चाईत झाली.

अगदी छान लिहिला आहे लेख, माहितीसहीत

उदयन, अरे हिला आम्ही "विन्चवाची मावशी" म्हणतो, पण नेमके नाव आठवत्/माहित नाही.
एकदा सकाळी रेल्वे स्टेशनला जाताना माझ्या प्यान्टीत मान्डीपाशी काही तरी वळवळल्यासारखे/टोचल्यासारखे झाले तेव्हा प्यान्टच्या कापडावरुनच मुठीत पकडून धरुन भर रस्त्यावर प्यान्ट सोडली होती, अन वळवळणारे बाहेर काढले अन बघितले तर ही मावशि निघाली, माझे नशिब ही चावली नव्हती.

तस तर गोम माहितीये ना सर्वांना? तीच ती शेकडो पाय असणारी? तर आमच्या घरातल्या फरशीला जिथेतिथे जोडांवर भेगा पडलेल्या, त्याचे खाली असल्या जीवजंतूंचे आगर. देवपुजेला नुस्ता टॉवेल गुन्डाळून बसलेलो असताना मांडीखाली काहीतरी वळवळले, आधी दुर्लक्ष केले, पण नन्तर प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे पाय उचलला अन तेव्हाच खरे तर ती चावली होती, तरी चावा हलकाच बसला होता, पण वीजेचा करंट बसावा तशी अंगभर कळ चमकुन गेली होती असे आठवते. जोरात चावली असती तर माझा थयथयाट झाला असता.

पण वर शशांक म्हणतो तसे हे जीव सहसा माणसाच्या वाट्याला जातच नाहीत.
फक्त ते शांत बसणे म्हणजे काय? कसे शक्य आहे कुणालाही? तर त्याचा अभ्यास चालू आहे माझा. मन केवळ दगडी/निष्ठुर वगैरे न करता उलट ही तर इश्वराचीच निर्मिती ज्याने मला निर्मिले असे समजुन त्या जीवाप्रति किळस/तिरस्कार / भिती वगैरे न ठेवता त्याचेबद्दल मन अतिशय स्नेहार्द्र करणे याचे प्रयोग चालू आहेत. काही बरावाईट नि:ष्कर्ष निघाला की कळविनच. अन ते कळविल्यावर अन्निसवाले वगैरे लगेच " शास्त्रशुद्ध वैज्ञानिक सन्ख्यात्मक" चाचण्या कुठाहेत म्हणून हैदोस घालतील हे सान्गायला ज्योतिष बघायचीही गरज नाही. असो.

कुंडलीमधे विशिष्ट स्थानी राहूचे विशिष्ट योग असल्यास/राहुचे जन्मनक्षत्र असल्यास, वगैरे प्रकारे राहूचा संबंध येत असल्यास इच्छा असो वा नसो, विषारी वस्तु व प्राणी यांचा सहवास/सहयोग जुळून येतोच. यावरही बराच अभ्यास बाकी आहे.

वाचला होता..
आज परत एकदा वाचला..
जॉईन झाल्यावर पहिली काही वर्ष रोमात होती ना म्हणुन,,
परत एकदा पागलासारखी हसली मी..
मला स्वतःला पाल, किडे, झुरळ सगळ्यांची भिती पेक्षा किळस जास्त येते..आणि ती ब्याद घरातुन गायब कशी करावी या विचार, चिडचिड, किळस पायी मी मनाचा हिय्या करुन पुर्ण जोर लावुन असेल ती वस्तु त्यावर आपटते..
किळस..अशक्य किळस..हि एकच भावना पुरेशी ठरते मला...
याक बाप्पा..
यापुर्वी राहायची तो फ्लॅट लिटरली ग्राउंड फ्लोअर ला होता..अशक्य गोमा निघायच्या तिथ..महिनाभरात खाली केला मी..
एक तर खाली गाद्या टाकुन झोपायचो (आताही तसच आहे म्हणा), शॉर्ट्स घालुन , आणि त्यात रात्री अभ्यास करायची सवय..एकदा मांडीला थंड जाणवल.. बघते तर हि मोठ्ठी गोम.. तिला तेव्हाच यमसदनी धाडून दुसर्‍या दिवशी सक्काळी घरमालकाला..आता हद्द झाली म्हणत घर सोडतेय हेच सांगुन आली..
आठवल तरी अजुनही काटा येतो..बेक्कार..

limbutimbu, तुमचा प्रतिसाद आत्ता वाचला.. तुम्हीच बस तुम्हीच समदु:खी.. लहानपणापासुनच घरच्यांनी गोम किती वाईट असते हे सांगुन ठेवलेय त्यामुळे मी १५ २० हात लांबच असते तिच्या..वळवळणारी गोष्ट म्हटली की काटे उभे होतात अंगावर अजुनही..
सापाबद्दल आकर्षण आहे पण..
इथ कुणाला सळी / कणा माहिती आहे का..
अगदी बारीक आणि गोल गुळगुळीत असतो..सापाच्या अगदी छोट्या पिल्लाएवढा लांब.. पण बारीक..किंचीत जरी धक्का लागला कि अशक्य वळवळतो तो..त्यामुळे त्याला पेपरवर पन उचलता येत नाही आणि ना ही तो सुपडी मधे धड राहतो..हा मात्र भितीदायक वाटतो मला किळस येण्यापेक्षा..त्याच्या अज्जिब्बात वाटेला जात नाही मी.. याक्क

या सर्व मंडळींना (म्हणजे या बाफ वरचे मेम्बर्स नव्हे. किडे) इजा न करता घराबाहेर कसे हाकलायचे याचे काही सल्ले द्या.

इथे मी कधीकधी पातळ लाँड्री बास्केट मधे पकडून घालवले आहेत. त्याचे धागे नाजूक असल्याने इजा होत नसावी असे वाटते.

<< मी कित्ती कित्ती मनापासून, आवर्जून माझ्या आवडत्या "सुंदर", "देखण्या" प्रेइंग मँटिसचे फोटो इथे टाकले - त्यावर एकही प्रतिसाद नाही ? ?? >>

हा घ्या .............

शशान्कजी, तुमचा हा लाडका पाहुणा माझ्या खिडकीबाहेर ३ दिवस मुक्काम ठोकून होता...
तुमच्या याच ले़खामुळे ओळखला मी त्याला..

जाताना एक हिरवा कोश बनवुन गेला.
त्याचे घरटे असेल का ते ?
त्यातुन काय बाहेर पडेल ? छोटे प्रेइंग मँटिस ?

Pages