त्याला पहिल्यांदा बाहेर घालव.. (विशेष माहितीसह)
आमच्या घरात मी सोडता बाकी सगळे स्त्री सदस्यच - आई, बायको व दोन मुली म्हणजे लेडिज होस्टेलच ! या सर्व मंडळींना अनेक कामांसाठी मला ऑर्डर सोडायची जन्मजात सवय आहे. पण देवाने माझी नेमणूक या घरात विशेष करुन का केली आहे त्याची जाणीव घरात पाल, झुरळ, अनेक प्रकारचे किडे वगैरे आले तर ही मंडळी आवर्जून करुन देतात. ईईईईईईईई........पाल (झुरळ, किडा काहीही टाकावे ) असे मोठ्याने चित्कारणे / ओरडणे / किंचाळणे असा मुख्य समारंभ असतो. सर्व शक्तीनीशी तो करुन झाला की मग सगळे समेवर येतात....
त्याला पहिल्यांदा बाहेर घालव....
आमच्या या लेडिज होस्टेलच्या "बारक्या"चे (सुज्ञ वाचकांना हा कोण हे सांगणे नकोच) मुख्य काम - हे असले किळसवाणे / विचित्र / भयानक / अजस्त्र - ( इथे त्यावेळेस जे सुचेल ते विशेषण वापरणे, ) प्राणी ताबडतोब घराबाहेर घालवणे हेच आहे अशी सर्वांची पूर्ण खात्रीच आहे. अजिबात अतिशयोक्ति करत नाही - पण मॉथ; म्हणजेच साधं मोठं फुलपाखरु जरी आलं तरी - या "पक्ष्याला" पहिले घराबाहेर काढ असेही उदगार येतात म्हणजे पहा !
काही दोस्त मंडळींनी शिकवल्यामुळे मी सर्व किडे पकडू शकतो, साप, उंदीर, सरडे, पाली हाताळतो याची जाहिरात मीच (वेड्यासारखी) या मंडळींसमोर का करुन ठेवली याचा मला आता पश्चात्ताप होऊन उपयोग तरी काय ?
तर एकदा असेच आम्ही सर्व निवांत टी. व्ही. पहात बसलो असताना माझ्या चतुर बायकोच्या अतिसंवेदनाक्षम कानांनी वेध घेतला तो एका किड्याच्या उडण्याच्या आवाजाचा (तशी ती शब्दवेधीच आहे याबाबतीत - कोण तो अर्जुन का कर्ण वगैरेंसारखी)....झाले....तिने ईईईईईईईईईईई चा सूर लावायचा अवकाश...मी सोडून सर्व सदस्य जिकडे दिसेल तिकडे पळू लागले. मला काही लक्षात यायच्या आत बाजूच्या दोन्ही बेडरुम्सची दारे लागलीदेखील होती व नेहेमीचे ब्रह्मवाक्य माझ्या कानावर आदळले .........
"त्याला पहिल्यांदा बाहेर घालव... "
मी पाहिले तर बिचारा "प्रेइंग मँटिस" माझ्या शेजारीच येऊन बसला होता. मी उत्साहाने बायकोला सांगू लागलो - अगं, तो साधा "प्रेइंग मँटिस", ते चितमपल्लींनी वर्णन केलेला - खंडोबाचा घोडा.
"शशांक, ते कोणीही असूदे...त्याला पहिला बाहेर घालव....."
"अगं, मस्त चान्स आलाय फोटो काढायचा तर ओरडतीएस का ?"
"अरे, XXXX, तुला फोटो काढायचं काय सुचतंय त्याला बाहेर काढायचे सोडून ?"
"तूच परवा मला ते वर्णन वाचून दाखवत होतीस ना एवढ्या कौतुकाने !"
"शशांSSSSक......"
इथे तिचा एकदम वरच्याचा वरचा "सा" लागल्यानं मी पुढे काही बोलू धजलो नाही.
सुदैवाने कॅमेरा जवळच असल्याने मला निवांत फोटो काढायला मिळाले. दोन्ही बंद खोल्यातून अनेक वेगवेगळे उदगार माझ्या कानावर येत होतेच पण नेहेमीसारखे त्याकडे दुर्लक्ष करुन मी प्रेइंग मँटिसचा फोटोसेशन पार पाडला.
अर्थातच त्या बिचार्याला फोटोसेशननंतर अगदी सांभाळून घराबाहेर सोडून दिले ! ( सर्व कीटकांचे पाय नाजुक असल्याने पटकन तुटू शकतात व असा जायबंदी कीटक कोणाचेही लगेच भक्ष्य होऊ शकतो निसर्गात )
बंद खोल्यातून तार व संतप्त स्वरात विचारणा झालीच. खात्री करुन घेण्यासाठी प्रथम दारे किलकिली करुन शत्रू (?) घराबाहेर गेला आहे हे पहाण्यात आले. मला दोन्ही हात पुढे करुन उघडून दाखवायची आज्ञा झाली. पूर्वी हे पकडलेले कीटक मी हातातच अथवा शर्टच्या खिशात अलगद ठेवायचो व सर्व आलबेल आहे झाले अशा समजुतीत मंडळी रीलॅक्स झाली की हळूच कोणाच्यातरी समोर पुन्हा धरायचो - मग पुन्हा किंचाळ्या वगैरे सर्व सीन होऊन मला शिव्याशाप मिळाले की मग मलाही एक प्रकारचा दचकावल्याचा आनंद (बाकी मंडळींना तो आसुरी वाटला तर माझा काय दोष) मिळायचा. तेव्हापासून माझी झाडाझडती हा नाट्याचा शेवटचा अंक असतो. असो, तर हे झाडाझडतीचे सगळे सोपस्कार पार पडल्यावर मग सर्व दोस्त (?) पक्षांनी सुटकेचा नि:श्चास टाकला व मी हे नवीन प्रकाशचित्रे (फोटो) संगणकावर उतरवण्याच्या मागे लागलो.
विशेष माहिती - याला प्रार्थना कीटक म्हणतात - पुढचे दोन पाय उचलून प्रार्थनेच्या पोजमधे दिसतात म्हणून. हा कीटक जबरदस्त भक्ष्यक (शिकारी / प्रिडेटर) असा असल्याने पाल याला खाणार नाही, हाच कदाचित पालीला खाईल. छोटे किडे, छोटे बेडूक, छोटे साप अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची हा कीटक पद्धतशीर शिकार करतो. डिस्कव्हरी चॅनेलवर हा चक्क हमिंग बर्ड व अगदी छोट्या उंदरांची शिकार करताना दाखवला आहे.
हा, टोळ व इतर किडे (गांधीलमाशी, मधमाशी सोडल्यास) माणसाला इजा पोहचवत नाही. झुरळे, किडे वगैरे सर्वांच्या पायाला थोडेसे काट्यासारखे असल्याने आपल्या अंगावर बसल्यावर थोडे टोचल्यासारखे होते. आपल्या अंगावर बसलेल्या किड्याला ओढून काढण्याऐवजी इतर काही कागद वगैरे सपोर्टसारखे पुढे केले तर तो त्यावर चढतो व आपल्याला किंचीत ओरखडल्यासारखे जे फिलींग येते तेही येणार नाही.
कोळी, सुरवंट अंगावर चिरडले गेल्यास शरीरावर रॅश किंवा गांधी येउ शकते. या परिस्थितीत घरगुती उपचार न करता ताबडतोब डॉ. कडे जाणे.
कुठलाही छोटा प्राणी माणसासारखा "अजस्त्र" प्राणी समोर आला की घाबरतोच. त्यात आपण पळापळ केली की त्याला भिती वाटून तो पळापळ करतो. आपण शांत (९०-९९% लोकांना हे शक्य नाही याची जाणीव आहे) राहिलो तर तो (सापदेखील) काही करत नाही. डॉ. प्रकाश आमट्यांचा नातू देखील विषारी साप, बिबळ्या, घोरपडी हाताळताना आपण पहातो की ! त्यामानाने "पाल", "किडे" हे तर किती किरकोळ !; यांना आपण न मारता, इजा न करता हाकलवू जरुर शकतो की - तेदेखील निसर्गाचे घटकच आहेत ना ? झुरळ, डास, ढेकूण्,पिसवा हे फार उपद्रवी व आजार फैलावणारे असल्याने त्यांचा बंदोबस्त करणे फार जरुरीचे आहे.
पाल तर किडे, झुरळे खाते म्हणजे उपयोगीच म्हणायची, ती कधीही आपल्याला त्रास देउ इच्छित नाही. भारतात सापडणारी एकही पाल विषारी नाही. पालीला एकवेळ हाकला, मारु मात्र नका.
किड्यांसंबंधात - भारतात सापडणार्या विषारी, घातक किड्यांची कोणाला विशेष माहिती असल्यास ती फोटोंसकट दिल्यास सर्वांनाच उपयोगी ठरेल.
सर्वात शेवटी टोळाचा फोटो टाकला आहे.
हाच तो बिचारा - घराबाहेर घालवायच्या आधीचा
टोळ / नाकतोडा / ग्रासहॉपर
http://www.seamstressfortheband.org/wp-content/uploads/2010/09/grasshopp... या साईटवरुन साभार ...
गिरीराज, तुम्ही तरीही जिवंत
गिरीराज, तुम्ही तरीही जिवंत आहात अजुन? >>>>> अगदी , माझ्या जवळ जरी आली ना तरी मी मरुन जाईन.
dreamgirl सह्हीच आहेस तु, पाली ला मारणं माझ्याकडुन ह्या जन्मात तरी शक्य नाही.
>>> "The only reason she keeps me alive is to open jars and kill bugs." अगदी खरं. म्हणुन तर आम्ही लग्न करतो.
प्रचंड अनुमोदन!
sorry हां शशांक ह्या पाली, किटकांच्या नादात मी तुमच्या लेखाबद्दल प्रतीसाद द्यायला विसरले.
मस्त लिहिलय तुम्ही...लेखन आवडलं
छान लेख..... आणि लेखातल्या
छान लेख..... आणि लेखातल्या सेलिब्रिटीचे फोटोही छान.
तुम्ही ’प्राणीमित्र’ आहात हे सद्ध्याच्या तुमच्या दोन लेखांवरून स्पष्ट होतंय.
पाली घालवण्यासाठी फोडलेल्या
पाली घालवण्यासाठी फोडलेल्या अंड्याचे कवच ठेवा घरात, पाली निघुन जाताता , अस वाचलं होतं कुठेतरी.
फोटो फार आवडले. पण खरे सांगू
फोटो फार आवडले. पण खरे सांगू का? मला 'टोळ' या प्रकाराची भीती वाटते. पाल, झुरळ, कोळी इथपासून ते साप दिसला तरी भीती नाही वाटत पण टोळ या प्रकाराची भीती वाटते. त्याचे एक कारण अस की तो अचानक उडतो. त्याला स्टार्ट अप वगैरे काहीही लागत नाही.
वरील सर्व मतांशी सहमत आहेच. शशांकराव , आपण लेखनही मस्त केलेत आणि फोटोही मस्तच!
मला काही प्रश्न आहेत.
१. हा असा टोळ काय खातो? किडे का?
२. या टोळाला पाल मारून खाते का?
३. हे टोळ इजा पोहोचवू शकतात का?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
काल इथे पोस्टलं आणि
काल इथे पोस्टलं आणि संध्याकाळी घरात पाल
हा कसला योगायोग? पालीला पाहून मी कथ्थकली, भांगडा सगळं काही केलं. शेवटी आईने त्या पालीला बाथरूममध्ये घालवलं. आणि मग दरवाजा बंद करून खिडकीतून बाहेर घालवलं. ५ मिनिटं बाथरूममध्ये फक्त आई, पाल आणि केरसुणी. आई बाहेर आल्यावर मी तिला दंडवत घातला. 
बेफिकीर, १. हा टोळ नाही, याला
बेफिकीर,
१. हा टोळ नाही, याला प्रार्थना कीटक म्हणतात. टोळाचे फोटो वेगळे टाकेन मा बो वर.
२. टोळ, छोटे किडे, फुलपाखरे हे पालीचे खाद्य आहे. हा कीटक जन्मजात भक्ष्यक (शिकारी / प्रिडेटर) असा असल्याने पाल याला खाणार नाही, हाच कदाचित पालीला खाईल. छोटे किडे, छोटे बेडूक, छोटे साप अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची हा कीटक पद्धतशीर शिकार करतो. डिस्कव्हरी चॅनेलवर हा चक्क हमिंग बर्ड व अगदी छोट्या उंदरांची शिकार करताना दाखवला आहे.
३. हा काय व टोळ काय माणसाला इजा पोहचवत नाही. झुरळे, किडे वगैरे सर्वांच्या पायाला थोडेसे काट्यासारखे असल्याने आपल्या अंगावर बसल्यावर थोडे टोचल्यासारखे होते. आपल्या अंगावर बसलेल्या किड्याला ओढून काढण्याऐवजी इतर काही कागद वगैरे सपोर्टसारखे पुढे केले तर तो त्यावर चढतो व आपल्याला किंचीत ओरखडल्यासारखे जे फिलींग येते तेही येणार नाही.
कुठलाही छोटा प्राणी माणसासारखा "अजस्त्र" प्राणी समोर आला की घाबरतोच. त्यात आपण पळापळ केली की त्याला भिती वाटून तो पळापळ करतो. आपण शांत (९८% लोकांना हे शक्य नाही) राहिलो तर तो (सापदेखील) काही करत नाही. डॉ. प्रकाश आमट्यांचा नातू देखील विषारी साप, बिबळ्या, घोरपडी हाताळताना आपण पहातो की ! त्यामानाने "पाल", "किडे" हे तर किती किरकोळ, यांना आपण न मारता, इजा न करता हाकलवू जरुर शकतो की - तेदेखील निसर्गाचे घटकच आहेत ना ? झुरळ, डास, ढेकूण्,पिसवा हे फार उपद्रवी व आजार फैलावणारे असल्याने मारले पाहिजेत.
या कीटकाबद्दल आस्थेने विचारणारा तू पहिलाच ! त्यामुळे मी जरा डिटेलवारच लिहिले आहे, बोअर होण्याची शक्यता आहे.
नुसते शशांक आवडेल - ते "राव", "जी" नको रे बाबा...
लेखन, फोटो आवडल्याच्या प्रतिसादाकरता मनापासून धन्यवाद.
अत्यंत आवडली ही माहिती. अनेक
अत्यंत आवडली ही माहिती.
अनेक गोष्टी समजल्या. खालील गोष्ट तर भयंकर आश्चर्यकारक वाटली.
हाच कदाचित पालीला खाईल. छोटे किडे, छोटे बेडूक, छोटे साप असे सर्व प्रकारच्या प्राण्यांची हा कीटक पद्धतशीर शिकार करतो. डिस्कव्हरी चॅनेलवर हा चक्क हमिंग बर्ड व अगदी छोट्या उंदरांची शिकार करताना दाखवला आहे.
आभार वगैरे मानत बसण्यापेक्षा मी आपला पुढचे असे काही प्रश्न असले तर आठवून ठेवतो, म्हणजे विचारता येतील.
-'बेफिकीर'!
शशांक, अटेंन्बरो साहेबांची,
शशांक,
अटेंन्बरो साहेबांची, लाईफ इन अंडरग्रोथ नावाची मालिका बघितली का ? खुप सुंदर चित्रण आहे.
गिर्याचे एक सिक्रेट लिहू का
गिर्याचे एक सिक्रेट लिहू का ? (त्याची परवानगी घ्यायची गरज नाही, पण कानठळ्या बसवणारे यक !! आवाज येतील, त्याचे काय ?)
गिर्याच्या भावाने एक कोंबडी पाळली होती, आणि तिला तो पालीच्या शेपटीचा खुराक देत असे. असे केल्याने कोंबडी मोठी अंडी देते, असे त्याचे म्हणणे. ती अंडी कोण खात असे, ते मात्र त्याने मला कधी सांगितले नाही.
दिनेशदा, गिर्याच्या भावाने
दिनेशदा,
गिर्याच्या भावाने एक कोंबडी पाळली होती, आणि तिला तो पालीच्या शेपटीचा खुराक देत असे. असे केल्याने कोंबडी मोठी अंडी देते, असे त्याचे म्हणणे. ती अंडी कोण खात असे, ते मात्र त्याने मला कधी सांगितले नाही.
किती पाली मारणार ? त्या पेक्षा सोपा उपाय सांगतो. मटण कापणार्या माणसाकडुन त्याचा लाकडी ओंडका वजा टेबल खरडुन ते कोंबड्यांना खाउ घातल्यास कोंबड्या चांगली अंडि देतात अस वाचलय.
ईईईईई! आता मी काही दिवस तरी
ईईईईई! आता मी काही दिवस तरी अंडी किंवा चिकन खाणार नाही
गिर्याच्या भावाने एक कोंबडी
गिर्याच्या भावाने एक कोंबडी पाळली होती, आणि तिला तो पालीच्या शेपटीचा खुराक देत असे. असे केल्याने कोंबडी मोठी अंडी देते, असे त्याचे म्हणणे. ती अंडी कोण खात असे, ते मात्र त्याने मला कधी सांगितले नाही.>>>>>> मोठी अन्डी हा प्रकार नन्तरचा. त्या आधी बराच काळ तिचे अन्डी देणे बन्द झाले आणि नन्तर निसर्गातया आढळणार नाही अशी गोष्ट तिच्या बाबतीत झाली. ती अगदी लठ्ठ होत गेली. शेवटी जाणकारांनी तो उद्योग बन्द करायला लावल्यावर ३-४ महिन्यांनी मोठमोठी अन्डी देणे सुरू झाले.
अर्थात हा प्रकार लहानपणचा उद्योग या सदरात मोडतो.
शशांक, तुझ्या लेखामुळे या
शशांक, तुझ्या लेखामुळे या किटकाचे नाव कळले. मी पण याचे काही फ़ोटो कढून ठेवले आहेत. बर्याचदा घरात येतो हा.
आतापर्यन्त मला अनोळखी किटकापासून एकदाच धोका पोचला होता. अगदी काळा आणि छोटा किटक मला गुढग्याच्या बाजूला चावल्याने भयंकर आग आग आणि त्याच्या आजूबाजूला अगदी कडक झाले होते. ४-५ दिवस तेव्हढ्या भागात खूप वेदना होत होत्या. नन्तरही तिथे एक बारीक भोक पडल्यासारखे होते जे बर्याच दिवसाने भरले. आजही त्या ठिकाणी काळा डाग आहे.
हा घ्या झब्बु. इकडे आहे.
हा घ्या झब्बु. इकडे आहे. http://www.maayboli.com/node/22139
बाकी अनेक संवाद अगदी सेम टु सेम.
पालीला पाहीले की माझी भार्या
पालीला पाहीले की माझी भार्या अगदी पं. बिरजुमहाराजापासुन ते शकीरा पर्यंत जेवढे न्रुत्यप्रकार आहे ते सर्व अत्यंत चपखलपणे, सर्व नवरसांसकट (श्रुगांर रसाव्यतिरिक्त) करुन दाखवते, ते जोपर्यंत, "पाल पळुन जात नाही / पालीची शेपटी तुटत नाही / पाल मरत नाहीए (हे एका तपात एकदाच घडते माझ्याकडुन)", तोपर्यंत चालु राहतात.
मग त्यामुळे मला किंवा कुटुंबियांना रिअलीटी डान्स शो पहायची गरज पडत नाही
पार्ल्यात रहात असताना एकदा
पार्ल्यात रहात असताना एकदा रात्रीचं जेवण झाल्यावर निवांत वाचत बसलो होतो. तेवढ्यात रामानंदमधल्या एका मित्राने फोन केला. फोनवर त्याचा आवाज तो एकदम टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटत होता.
'किर्या, असशील तिथून लगेच निघ आणि माझ्याकडे ये.'
'काय झालय?'
'जास्त विचारत बसू नकोस. लगेच ये.' खडाक.. मी पुढच काही विचारेपर्यंत त्याने फोन ठेवला होता.
मी तातडीने निघालो. मनात काही बाही विचार यायला लागले. त्याच्या घरी जाऊन बघतो तर मित्र कुटुंबकबिल्यासकट घराबाहेर उभा होता आणि घराचं दार बंद होतं.
'काय झालं? बाहेर का तुम्ही सगळे?'
पठ्ठ्या म्हणतो 'अरे घरात दोन टप्पोर्या (:)) पाली आल्यात.'
'अरे मग मार. बाहेर काय सगळे.. त्या पालींना आत ठेवून.'
'वेडा काय.. अरे या एवढ्या टप्पोर्या पाली आहेत.. घोरपडीएवढ्या. त्याच्याचकरता तर बोलावलय तुला.'
मी हळूच दाराची कडी काढली (मनातून चरफडत). दरवाजा उघडला. तेवढ्यात आठवलं म्हणून परत मागे वळून विचारलं 'झाडू कुठे आहे?'
'अरे गाढवा आधी दार बंद कर. झाडू आत किचनमध्ये आहे.'
बरं म्हणून मि आत गेलो. तर हॉलमध्येच भिंतीवर ती 'घोरपड' उभी (की बसलेली?) होती. (नेहमीच्याच आकाराची होती. :))
झाडूच्या पहिल्याच फटक्यात पालीने 'हे राम' म्हटलं. तिची तुटलेली शेपटी आणी धड घेऊन बाहेर आलो. त्याला दाखवलं तर त्याने डोळे मिटून घेतले.
'आधी ते बाहेर फेकून दे आणि दुसरी कुठेय?'
'दुसरी?'
'अरे दोन आहेत.'
आम्ही पुन्हा आत. दुसरीला शोधतोय तर ती सापडली किचनमध्ये. तिलाही 'हे राम' म्हणायला लावलं तेंव्हा कुठे हे सगळं कुटुंब आत सुखनैवपणे झोपायला गेलं.
हा प्रकार दुसर्यांदा झाल्यावर मात्र मी पार्ल्याची जागा सोडली. सध्या मी बोरिवलीला राहतो.
टोळ वेगळा... हा प्रार्थना
टोळ वेगळा... हा प्रार्थना कीटक... आणि आम्ही म्हणायचो तो नाकतोडा म्हणजे नक्की कोण?
छोटे बेडूक, साप उंदरांची शिकार का एकटा करतो का गटाने?
(जरा open minded असाल तर हा टेड व्हिडिओ बघाच : Marcel Dicke: Why not eat insects?)
वॉव सही फोटो, हे प्रार्थना
वॉव सही फोटो, हे प्रार्थना कीटक मुंबईत पण दिसतात का? मी कधी पाहील्याचे नाही आठवत.
खास नैरोबीतच आढळणारा एक किटक
खास नैरोबीतच आढळणारा एक किटक असतो (त्याला नैरोबी फ्लाय असेच म्हणतात.) बासमती तांदळाएवढाच असतो आकाराने आणि रंगाने लाल काळा असतो. तो चावत वगैरे नाही, पण त्याचा स्पर्श जरी झाला, तरी तो भाग लाल होतो, खाजतो, सुजतो. समजा तो हाताने चिरडला गेला, तर जिथे जिथे तो हात लागेल, तिथे तिथे तसेच होते.
मला एकदा प्रसाद मिळाला होता. चेहरा, मान, खांदा अशा नाजूक ठिकाणच्या त्वचेवरच परिणाम होतो. त्यावर लावायला एक क्रिमही मिळते इथे. तरीपण चार पाच दिवस त्रास होतो. मग त्या भागावरची त्वचा, सुकुन निघून जाते. स्थानिक लोक त्याच्यावर टुथपेस्ट लावायचा सल्ला देतात.
सुदैव एवढेच, कि त्याची प्रजा फार नाही.
http://en.wikipedia.org/wiki/Nairobi_fly
सॅम, हा जन्मजात शिकारी
सॅम,
हा जन्मजात शिकारी असल्याने एकटाच शिकार करतो. बस्स, अकेला ही काफी है | आमच्याकडील मांजरीलाही हे बच्चमजी एकदा तब्बल १० -१२ मिनिटे झुंज देत होते - धारातीर्थी पडायच्याआधी ! तो सहजासहजी कोणालाही हार जात नाही, अतिशय क्रूरकर्मा असून एखाद्या कसलेल्या योद्ध्याप्रमाणे पूर्ण डावपेचानिशी कायम आक्रमणच करतो.
कांदापोहे,
काय सुंदर फोटो काढलेस मित्रा, हॅट्स ऑफ ! मनापासून धन्यवाद.
अरे काय तुम्ही लोक्स ? मी
अरे काय तुम्ही लोक्स ?
मी कित्ती कित्ती मनापासून, आवर्जून माझ्या आवडत्या "सुंदर", "देखण्या" प्रेइंग मँटिसचे फोटो इथे टाकले - त्यावर एकही प्रतिसाद नाही ? तुम्ही सर्व लोक्स माझ्या विरुद्ध पार्टीला सामील दिसताय !>>>> मी, माझा नवरा आणि मुलगा तुमच्या पार्टीत
घरात महालक्ष्म्या त्यामुळे सर्व जवळचे नातेवाईक जमलेले. आणि बाहेरच्या आवारात "धामण साप" चांगली अडीच फुटाची .... घरी - दारी गोंधळ आणि मी हातात काठी घेऊन तिला / त्याला दिशा दाखवत होते , माझा मुलगा शुटींग करत होता आणि नवरा फोटो काढत होता .... मनसोक्त फोटो आणि शुटींग झाल्यावर आम्ही तिला / त्याला दिशा दाखवत दाखवत पुन्हा लांबच्या झाडीत सोडले
पण मग घरी आल्यावर मात्र आम्हा तिघांची पुजा झाली / बांधली
-- सर्वात जास्त माझी आणि वर त्या छोट्या मुलाला असे नादी न लावण्याची तंबी 
त्याला आधी बाहेर घालव .... च्या एवजी ह्या दोघांनाच बाहेर
धम्माल ! छान लिहिलंयस
धम्माल ! छान लिहिलंयस शशांक.
मला स्वतःला पालीची प्रचंड भिती वाटते.....भितीपेक्षा किळस वाटते.
लेकाच्या वाढदिवसाला आमच्या एका स्टाफने ६ पाली ( प्लॅस्टिकच्या !) गिफ्ट दिल्या. त्याला रागवायला लागले की तोच मला भिती घालतो....आई, माझी पाल टाकू का तुझ्या अंगावर ?.... त्याचे हावभाव पाहून मला हसू कोसळतं आणि प्रत्येकवेळी त्या स्टाफच्या नावाचा उद्धार होतो.
त्याला बाहेर
त्याला बाहेर घालवलंsssssssssssssssss. येस येस. सचिन तेंडुलकरने घालवलं.
शशांक, मस्त लेख, आणि पहिला
शशांक,
मस्त लेख,
आणि पहिला फोटो फार गोड आलाय.
सॅम - तू सुचवलेला "टेड
सॅम - तू सुचवलेला "टेड व्हिडिओ : Marcel Dicke: Why not eat insects?)" फारच छान - सर्वांनीच तो पहावा असा आहे.
दिनेशदा - अटेंन्बरो साहेबांच्या बर्याच मालिका पाहिल्या आहेत - वर तुम्ही म्हणता ती नेमकी कोणती ते आता तरी आठवत नाही. भारतात सापडणारे पण माणसाला घातक, विषबाधा करु शकणारे असे कीटक -फोटोसह टाकता येतील - अशी काही माहिती सुरु करता येईल का ? सगळ्यांना उपयोग होईल व सर्वसाधारण वाटणारी भिती कमी होईल असे वाटते. नैरोबीत सापडणार्या कीटकाबद्दल तुम्ही जशी माहिती दिलीत तशी देउ शकलो तर सगळ्यांना उपयोग होईल असे वाटते.
शशांक, ते सगळे लाईफ ऑन अर्थ
शशांक, ते सगळे लाईफ ऑन अर्थ मालिकेतले आहेत.
आपल्या दूष्टीने जर किटक अपायकारक मानले तर त्यांच्याही दृष्टीने, माणूस अपायकारकच मानला पाहिजे.
मला अटेन्बरो साहेबांचेच एक वाक्य आठवतेय. ते म्हणतात उद्या पूर्ण मानवजात पृथ्वीवरुन नष्ट झाली, तरी इथल्या जीवसृष्टीचे काहिही नुकसान होणार नाही, पण या छोट्या किटकांपैकी एक जरी प्रजाती नष्ट झाली, तर तिच्यावर अवलंबून असलेले अनेक जीव नष्ट होतील.
पण तरिही हा उपक्रम चांगलाच आहे.
शशांक, मस्त खुसखुशीत लेख!
शशांक, मस्त खुसखुशीत लेख!
असेच माहिती देणारे लेख येऊदेत अजून.
मूळ लेखापेक्षा प्रतिसादच मला
मूळ लेखापेक्षा प्रतिसादच मला आता जास्त धमाल वाटू लागलेत, त्याकरता परत वर आणलाय हा लेख...... गै. नसावा.
मी ,नवरा आणि आमचा लेक,
मी ,नवरा आणि आमचा लेक, तुमच्या पार्टीत आहोत. भोकं वाली प्लास्टिकची बरणी आहे घरी अशा पाहुण्याना गेस्टरुम म्हणुन . एखादा दिवस पाहुणचार करुन सोडुन यायच. आमच्या घरी , मागे डोंगर असल्यामुळे खुप वेगवेगळे किडे येतात. कोणी दिसला की पहिल्यान्दा कॅमेरा कुठय अशी हाक येते.
सुंदर प्रचि!! शेवटचा फ़ोटो
सुंदर प्रचि!! शेवटचा फ़ोटो दिसत नहीये.
मला आधी तो नाकतोडाच वाटला!
)
(आधी फ़ोटो पाहीले मग लेख वाचल्याचा परिणाम!
Pages