त्याला पहिल्यांदा बाहेर घालव....(विशेष माहितीसह)

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2011 - 09:32

त्याला पहिल्यांदा बाहेर घालव.. (विशेष माहितीसह)

आमच्या घरात मी सोडता बाकी सगळे स्त्री सदस्यच - आई, बायको व दोन मुली म्हणजे लेडिज होस्टेलच ! या सर्व मंडळींना अनेक कामांसाठी मला ऑर्डर सोडायची जन्मजात सवय आहे. पण देवाने माझी नेमणूक या घरात विशेष करुन का केली आहे त्याची जाणीव घरात पाल, झुरळ, अनेक प्रकारचे किडे वगैरे आले तर ही मंडळी आवर्जून करुन देतात. ईईईईईईईई........पाल (झुरळ, किडा काहीही टाकावे ) असे मोठ्याने चित्कारणे / ओरडणे / किंचाळणे असा मुख्य समारंभ असतो. सर्व शक्तीनीशी तो करुन झाला की मग सगळे समेवर येतात....
त्याला पहिल्यांदा बाहेर घालव....

आमच्या या लेडिज होस्टेलच्या "बारक्या"चे (सुज्ञ वाचकांना हा कोण हे सांगणे नकोच) मुख्य काम - हे असले किळसवाणे / विचित्र / भयानक / अजस्त्र - ( इथे त्यावेळेस जे सुचेल ते विशेषण वापरणे, ) प्राणी ताबडतोब घराबाहेर घालवणे हेच आहे अशी सर्वांची पूर्ण खात्रीच आहे. अजिबात अतिशयोक्ति करत नाही - पण मॉथ; म्हणजेच साधं मोठं फुलपाखरु जरी आलं तरी - या "पक्ष्याला" पहिले घराबाहेर काढ असेही उदगार येतात म्हणजे पहा !

काही दोस्त मंडळींनी शिकवल्यामुळे मी सर्व किडे पकडू शकतो, साप, उंदीर, सरडे, पाली हाताळतो याची जाहिरात मीच (वेड्यासारखी) या मंडळींसमोर का करुन ठेवली याचा मला आता पश्चात्ताप होऊन उपयोग तरी काय ?

तर एकदा असेच आम्ही सर्व निवांत टी. व्ही. पहात बसलो असताना माझ्या चतुर बायकोच्या अतिसंवेदनाक्षम कानांनी वेध घेतला तो एका किड्याच्या उडण्याच्या आवाजाचा (तशी ती शब्दवेधीच आहे याबाबतीत - कोण तो अर्जुन का कर्ण वगैरेंसारखी)....झाले....तिने ईईईईईईईईईईई चा सूर लावायचा अवकाश...मी सोडून सर्व सदस्य जिकडे दिसेल तिकडे पळू लागले. मला काही लक्षात यायच्या आत बाजूच्या दोन्ही बेडरुम्सची दारे लागलीदेखील होती व नेहेमीचे ब्रह्मवाक्य माझ्या कानावर आदळले .........

"त्याला पहिल्यांदा बाहेर घालव... "

मी पाहिले तर बिचारा "प्रेइंग मँटिस" माझ्या शेजारीच येऊन बसला होता. मी उत्साहाने बायकोला सांगू लागलो - अगं, तो साधा "प्रेइंग मँटिस", ते चितमपल्लींनी वर्णन केलेला - खंडोबाचा घोडा.

"शशांक, ते कोणीही असूदे...त्याला पहिला बाहेर घालव....."

"अगं, मस्त चान्स आलाय फोटो काढायचा तर ओरडतीएस का ?"

"अरे, XXXX, तुला फोटो काढायचं काय सुचतंय त्याला बाहेर काढायचे सोडून ?"

"तूच परवा मला ते वर्णन वाचून दाखवत होतीस ना एवढ्या कौतुकाने !"

"शशांSSSSक......"

इथे तिचा एकदम वरच्याचा वरचा "सा" लागल्यानं मी पुढे काही बोलू धजलो नाही.

सुदैवाने कॅमेरा जवळच असल्याने मला निवांत फोटो काढायला मिळाले. दोन्ही बंद खोल्यातून अनेक वेगवेगळे उदगार माझ्या कानावर येत होतेच पण नेहेमीसारखे त्याकडे दुर्लक्ष करुन मी प्रेइंग मँटिसचा फोटोसेशन पार पाडला.

अर्थातच त्या बिचार्‍याला फोटोसेशननंतर अगदी सांभाळून घराबाहेर सोडून दिले ! ( सर्व कीटकांचे पाय नाजुक असल्याने पटकन तुटू शकतात व असा जायबंदी कीटक कोणाचेही लगेच भक्ष्य होऊ शकतो निसर्गात )

बंद खोल्यातून तार व संतप्त स्वरात विचारणा झालीच. खात्री करुन घेण्यासाठी प्रथम दारे किलकिली करुन शत्रू (?) घराबाहेर गेला आहे हे पहाण्यात आले. मला दोन्ही हात पुढे करुन उघडून दाखवायची आज्ञा झाली. पूर्वी हे पकडलेले कीटक मी हातातच अथवा शर्टच्या खिशात अलगद ठेवायचो व सर्व आलबेल आहे झाले अशा समजुतीत मंडळी रीलॅक्स झाली की हळूच कोणाच्यातरी समोर पुन्हा धरायचो - मग पुन्हा किंचाळ्या वगैरे सर्व सीन होऊन मला शिव्याशाप मिळाले की मग मलाही एक प्रकारचा दचकावल्याचा आनंद (बाकी मंडळींना तो आसुरी वाटला तर माझा काय दोष) मिळायचा. तेव्हापासून माझी झाडाझडती हा नाट्याचा शेवटचा अंक असतो. असो, तर हे झाडाझडतीचे सगळे सोपस्कार पार पडल्यावर मग सर्व दोस्त (?) पक्षांनी सुटकेचा नि:श्चास टाकला व मी हे नवीन प्रकाशचित्रे (फोटो) संगणकावर उतरवण्याच्या मागे लागलो.

विशेष माहिती - याला प्रार्थना कीटक म्हणतात - पुढचे दोन पाय उचलून प्रार्थनेच्या पोजमधे दिसतात म्हणून. हा कीटक जबरदस्त भक्ष्यक (शिकारी / प्रिडेटर) असा असल्याने पाल याला खाणार नाही, हाच कदाचित पालीला खाईल. छोटे किडे, छोटे बेडूक, छोटे साप अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांची हा कीटक पद्धतशीर शिकार करतो. डिस्कव्हरी चॅनेलवर हा चक्क हमिंग बर्ड व अगदी छोट्या उंदरांची शिकार करताना दाखवला आहे.

हा, टोळ व इतर किडे (गांधीलमाशी, मधमाशी सोडल्यास) माणसाला इजा पोहचवत नाही. झुरळे, किडे वगैरे सर्वांच्या पायाला थोडेसे काट्यासारखे असल्याने आपल्या अंगावर बसल्यावर थोडे टोचल्यासारखे होते. आपल्या अंगावर बसलेल्या किड्याला ओढून काढण्याऐवजी इतर काही कागद वगैरे सपोर्टसारखे पुढे केले तर तो त्यावर चढतो व आपल्याला किंचीत ओरखडल्यासारखे जे फिलींग येते तेही येणार नाही.

कोळी, सुरवंट अंगावर चिरडले गेल्यास शरीरावर रॅश किंवा गांधी येउ शकते. या परिस्थितीत घरगुती उपचार न करता ताबडतोब डॉ. कडे जाणे.

कुठलाही छोटा प्राणी माणसासारखा "अजस्त्र" प्राणी समोर आला की घाबरतोच. त्यात आपण पळापळ केली की त्याला भिती वाटून तो पळापळ करतो. आपण शांत (९०-९९% लोकांना हे शक्य नाही याची जाणीव आहे) राहिलो तर तो (सापदेखील) काही करत नाही. डॉ. प्रकाश आमट्यांचा नातू देखील विषारी साप, बिबळ्या, घोरपडी हाताळताना आपण पहातो की ! त्यामानाने "पाल", "किडे" हे तर किती किरकोळ !; यांना आपण न मारता, इजा न करता हाकलवू जरुर शकतो की - तेदेखील निसर्गाचे घटकच आहेत ना ? झुरळ, डास, ढेकूण्,पिसवा हे फार उपद्रवी व आजार फैलावणारे असल्याने त्यांचा बंदोबस्त करणे फार जरुरीचे आहे.

पाल तर किडे, झुरळे खाते म्हणजे उपयोगीच म्हणायची, ती कधीही आपल्याला त्रास देउ इच्छित नाही. भारतात सापडणारी एकही पाल विषारी नाही. पालीला एकवेळ हाकला, मारु मात्र नका.

किड्यांसंबंधात - भारतात सापडणार्‍या विषारी, घातक किड्यांची कोणाला विशेष माहिती असल्यास ती फोटोंसकट दिल्यास सर्वांनाच उपयोगी ठरेल.

सर्वात शेवटी टोळाचा फोटो टाकला आहे.

हाच तो बिचारा - घराबाहेर घालवायच्या आधीचा

Picture 271.jpgPicture 273.jpgPicture 267.jpgटोळ / नाकतोडा / ग्रासहॉपर
http://www.seamstressfortheband.org/wp-content/uploads/2010/09/grasshopp... या साईटवरुन साभार ...

grasshopper21.jpg

गुलमोहर: 

शशान्कजी,

लगेच प्रतिसाद दिल्याबद्द्ल आभार !!

दुसर्या फोटोतील पिल्लावळ खिडकीबाहेर दिसली तर घरी काही खरे नाही...

अरे मी कसा मिसला हा लेख? फोटो आणि लेख दोन्ही मस्तच! Happy

मी तुमच्या विरुध्द पार्टीत.. फुल्पाखरु आलं तरी मी तिकडे जात नाही

शशान्कजी, माझे एक निरीक्षण - तुम्ही दिलेल्या चित्रात कोषाचा रंग फान्दीच्या रंगाशी मिळताजुळता आहे.
तर माझ्या घरी हलका हिरवा आहे - जो भिंन्तीच्या रंगाशी मिळताजुळता आहे !!
निरखुन पाहिल्याशिवाय दिसत नाही तो कोष...

ईवलासा जीव तो, पण Common sense केवढा !!

Pages