नवपार्थहृद्गत : गीतेचा नव-आशयबोध

Submitted by भारती.. on 16 March, 2014 - 09:14

नवपार्थहृद्गत : गीतेचा नव-आशयबोध

दु:खकाळोखात चाचपलेलं,संदेह-आवर्तात झाकोळलेलं गीतेचं बांधकाम. ते प्रज्ञेच्या प्रकाशात पहाताना कसं वाटत असेल ? अन तेही समकालीन समवयीन प्रज्ञेच्या प्रकाशात ?

‘||नवपार्थहृद्गत||- एक आधुनिकतावादी गीताचिंतन’ वाचताना अशी काहीशी भावना मनात दाटली.गीतेवरचे दोन(च) महान भाष्यकार कमीअधिक नजरेखालून गेलेले पूर्ववयात,पण ते वेगळं होतं.श्रीज्ञानदेवांची जीवन-लेखन भूमिकाच ‘’अलौकिका नोहावे लोकांप्रती ‘’ या धारणेचे प्रात्यक्षिक,मग त्यांची गीता-टीकाही भगवद्गीतेच्या गाभाऱ्यातील विशुद्धार्थांची भावार्थदीपिका असणे क्रमप्राप्तच होते,आणि लोकमान्य टिळक तर लोकमान्यच. आधी स्वराज्यासाठी संघर्ष , मग धार्मिक सामाजिक लोकजागरण या तत्वावर आधारलेली त्यांची जीवनदृष्टी . म्हणून त्यांच्या गीता-रहस्यात कर्मवादाचा जागर असला तरी श्रद्धेय मूलतत्वांना प्रश्न विचारण्याची बंडखोरी असण्याचं कारण नव्हतं.

राजीव सानेंनी या पार्श्वभूमीवर स्वत:ला ‘नवपार्थ’ संबोधत व्यक्ती-समष्टी च्या अंतर्बाह्य विश्वाला,म्हणजेच समग्र अस्तित्वालाच, वेढून असलेले प्रश्न या काळातल्या तत्वचर्चेतल्या सख्यभूमिकेतून श्रीकृष्णाला विचारले आहेत, कित्येकदा त्याला खोडून काढले आहे,आपली नाराजी/ मते/आक्षेप स्पष्ट शब्दात नोंदवला आहे इतकेच नव्हे तर या श्रेष्ठ-परम सुहृदाला वैचारिक नवदर्शनस्वरूप पर्यायही सुचवले आहेत.

प्रतिमा प्रकाशन ,पुणे यांनी २००८ मध्ये प्रथम प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा अल्प आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

‘नवपार्थहृद्गत’ चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा आशयकोश लेखकाने स्वरचित वृत्तबद्ध कवितेत, तेही निरनिराळ्या वृत्तांत,अनेकदा नव-वृत्तातही (उदा. वसंततिल्का वृत्त ) व्यक्तवला आहे ! हे पद्यात्मक विवेचन एका विशिष्ट पद्धतीने येते.मूळ गीताश्लोक, त्याला मूळ अर्थाच्या अंगाने येणारे पण नवमतवादी असे अनुसाद, त्याला आक्षेप घेणारे ते प्रतिसाद, त्यावर स्वतंत्रपणे व्यक्त झालेले ते स्वयंसाद अशा तिहेरी बांधणीत .

आधीच गीताटीकेचा व्यामिश्र आशय,त्यात पुन: वृत्तबद्ध कवितेचा आव्हानात्मक आकृतीबंध .या दोन्ही काहीशा क्लिष्ट पातळ्यांवर वाचकाची दमछाक होऊ नये म्हणून पुन: हाच आशय सहज गद्य संवादाच्या स्वरूपात, पद्यासोबतच विवेचनात्मक विस्तार करत मांडण्याचा एक आगळावेगळा प्रयोग साने करतात.

हा नवपार्थ गीतासंहिता, त्यातले श्रीकृष्णाचा देवत्व हा भक्तीमार्गी प्रक्षेप आहे की नाही या स्वरूपाच्या उहापोहापासून दूर आहे.’’ माझी प्रकृती पांडित्यपूर्ण अभ्यासकाची नसून सृजनशील विचारकाची आहे ‘’असे साने म्हणतात. एका अर्थी ते आस्तिकांमधले नास्तिक आणि नास्तिकांमधले आस्तिक असल्याचे जाणवते.

ग्रंथाची मांडणी करताना आपले मनोगत साने प्रास्ताविकाच्या सात छोट्या पण अर्थवाही विभागातून स्पष्ट करतात.

‘’कोण हा नवपार्थ ‘’ या पहिल्याच प्रास्ताविक विभागात गीतेचा सयुक्तितेच्या कसोटीवर एक सुसंगत विचारव्यूह म्हणून पुनर्विचार होण्याची आवश्यकता ते प्रतिपादन करतात.भारतालाच नाही तर वैश्विक आत्म-आक्रोशाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा गीताविचार केवळ श्रद्धाविषय असून भागणार नाही,त्याचे शोधन करावे लागेल,कालौघात त्यात दाटलेले, विसंगत म्हणून आधुनिक बुद्धीवादी नास्तिक मनाला परके वाटणारे खंड छाटावे लागतील तरच गीतेतले अध्यात्म आजही प्रगतीशील, प्रवृत्तीपर आणि विचारस्वातंत्र्य जोपासणाऱ्या आस्तिक-नास्तिक व्यक्ती-समाजांना स्वागत व स्वीकार करण्याजोगे वाटेल अशा दृढ धारणेतून हे लेखन केले आहे.

ही आंतरिक विसंगती शोधण्यासाठी त्यांनी गीतेच्या संहितेत विखुरलेल्या व पुनरुक्त झालेल्या संकल्पना मूळ कथनात्मक क्रम सोडून एकमेकांशेजारी मांडल्या आहेत ज्यामुळे त्यात अंतर्भूत असलेला विरोधाभास स्पष्ट होईल व त्या अनुषंगाने श्रीकृष्णाला प्रतिप्रश्न करता येतील. ही वैशिष्ट्यपूर्ण मांडणी हे या पुस्तकाचे बलस्थान आहे.

दुसरा प्रास्ताविक विभाग ‘प्रश्न, जे उपस्थित करायचे राहूनच गेलेत !!’’ या बोलक्या शीर्षकाचा आहे .प्रश्न अनेक आहेत, प्रश्न पुढेही सातत्याने येत राहातील, पण या विभागात आलेले प्रश्न विशेष मूलगामी असे आहेत.

वानगीदाखल पहिलाच प्रश्न. महाभारतात अनेक घटना, खरे तर दुर्घटनाच, शेवटी युद्धभूमीवर विसर्जित झाल्या.गीतेची सुरुवातच अर्जुन-विषादाने होते. पण आज नवपार्थाला या युद्धप्रसंगाआधीच्या दोषास्पद घटनाक्रमातच काही उदात्त व अपरिहार्य दिसत नाही. ,’’मी वेळीच युधिष्ठिराशी शुभद्रोह ( म्हणजे योग्य कारणासाठी विरोध ) केला असता तर युद्धभूमीवर वेळ टळून गेल्यावर अर्जुन-विषाद व्यक्त करायची वेळच आली नसती .तथाकथित धर्म्यतेचे पटण्यासारखे निकषच नसावेत ? अनिर्णय व उलटसुलट निर्णय यांनीच प्रकरण चिघळून महासंहाराची वेळ आणली नाही काय ?’’ हा नवपार्थाने स्वत:लाच आश्चर्याने केलेला प्रश्न.

'सामाजिक नीतिमत्ता राखण्यास मोक्षोपदेशाचा उपयोग काय?' हा भगवंतांना केलेला दुसरा प्रश्न.
तिसरा, महत्वाचा प्रश्न - 'वर्णसंकराची चिंता परमेश्वरानेच प्रथमत: अर्जुनविषादयोगातच व्यक्त करावी, हा वर्ण हे वंशवादी असल्याचाच पुरावा नाही का ?'
या तिसऱ्या प्रश्नाची चर्चा महाभारताच्या अभ्यासकांनी सामाजिक संदर्भात केली आहे . वर्ण–वंशवाद विषयांचा संदर्भ आल्याने इथे आठवते की इरावती कर्वे यांनी महाभारत काळात ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य असे तीन वर्ण होते असे प्रतिपादन केले आहे. वैश्यांचेच पुढे दोन विभाग होऊन शूद्रवर्ण अस्तित्वात आला ( उत्पादन व विक्रेते वेगवेगळे झाले ) असे या मतामध्ये येते. क्षत्रियांमधलेही खालच्या स्तरावरले लोक शूद्रात गणले जाऊ लागले हे मत आंबेडकरांनी अधिक अधोरेखित केले. या मत-मतांतरातही समाज-अभ्यासकांमध्ये वर्ण हे महाभारत काळाच्या आधीपासूनच वंशवादी आहेत याबद्दल दुमत नाही. सामान्य वाचकालाही वर्ण हे महाभारत काळात तरी वंशवादीच होते हे सतत जाणवते. विदुर, कर्णाचा सूतपुत्र म्हणून उल्लेख व त्यातून त्याचा झालेला अव्हेर, द्रोणाचार्यांच्या क्षात्रकर्मात ( धनुर्विद्या शिकवणे ) त्यांच्या ब्राह्मणत्वाचा कोणालाही न पडलेला विसर यातून उभे रहाणारे समाजचित्र लवचिक उपजीविकावादी पण वर्ण-वंश जाणिवांच्या पकडीत असलेल्या समाजाचेच आहे.

हे झाले सामाजिक वास्तव, साने यांनी 'ते श्रीकृष्णाला स्वीकारार्ह आहे का?' अशा अंगाने विचारले आहे तर हा गीता-ईश्वर एकूणच वर्णसंकर विषयात समाजविरोधी काही न करण्याच्याच पक्षातला आहे हे त्श्रीकृष्णाने अन्यत्रही ( पहिल्या अध्यायाबरोबरच तिसऱ्या अध्यायातही ३.२४ या श्लोकात- ‘उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम | संकरस्य च कर्तास्यामुपहन्यामिमा: प्रजा:’) सांगितले आहेच ! तेव्हा हा प्रश्न ‘ईश्वराने असे समाजाचा अनुनय करणारे तत्त्व का म्हणून स्वीकारावे ?’ या वेगळ्या स्वरूपात यायला हवा होता असे वाटते.

कर्मविपाक,अहंकार,समदृष्टीविवेचन,कामप्रेरणा,फलहेतुकता या सर्व शुद्ध आध्यात्मिक संकल्पनांना या विभागात केलेले इतर मूलगामी प्रश्न पुढे येणारच आहेत.

चौथ्या प्रास्ताविकात ‘’ आधुनिकतावाद ‘ या अत्यंत व्यापक संज्ञेतून आपल्याला नेमके काय अभिप्रेत आहे हे साने स्पष्ट करतात. तसेही व्यासांच्या महाभारताचे शून्याकार अनुभव देणारे घटनाक्रम आजही आधुनिकच वाटतात, त्यातल्या व्यक्तींचा तत्वसंघर्ष कालातीत म्हणून एका अर्थी आधुनिक असला तरी ’’आधुनिक व्यक्तीला गतिमान स्वधर्म आणि गतिमान भूमिकाधर्म या दोहोंचे शोधन करत राहायचे असते ‘’ हे सानेंचे विधान समकालीन गतिमान अस्थिर जीवनाच्या संदर्भात यथार्थ वाटते .
लेखनामागच्या , त्याच्या आकृतिबंधामागच्या प्रेरणा, सूचना, श्रेयनिर्देश यांबद्दल सूक्ष्म विचार मांडणारी अन्य पाच ते सात क्रमांकाची प्रास्ताविके वाचून आपण पुस्तकाच्या मुख्यप्रवाहात शिरतो.

त्याआधी थोडेसे श्रेयनिर्देशाबद्द्ल.कारण केवळ ‘अंतर्दृष्टी आवश्यक असली तरी पर्याप्त नसते’ असे विधान करत सानेंनी येथे इहवाद व अध्यात्म यांची सांगड घालण्यासाठी आपण कोणत्या महत्वाच्या दर्शनांचा अभ्यास केला, कोणत्या विद्वज्जनांचे सहकार्य घेतले याचे या महत्वाच्या प्रास्ताविकात उल्लेख केले आहेत.त्यात बsर्गसन, कांट हुसsर्ल, युर्गेन हाबरमास , रिकर या पाश्चात्य तत्वज्ञांबरोबर श्रीनिवास दीक्षित,मे.पुं.रेगे,आचार्य विनोबाजी,सुहास पटवर्धन , देवदत्त कानिटकर , वि.य.कुलकर्णी, अजय व सुलभा ब्रह्मनाळकर यांचा नामनिर्देश केला आहे.

प्रत्येक प्रास्ताविक व प्रकरणाअंती मराठी/संस्कृत शब्द/संकल्पनांचे ‘समीपार्थी ‘ ( सानेंचा शब्द ) इंग्लिश शब्द आहेत जे फार अभ्यासपूर्वक सिद्ध केले आहेत.

‘श्रद्धा.जिज्ञासा आणि तत्वचर्चेतला खुलेपणा’ हे पहिलेच प्रकरण . श्रद्धास्वातंत्र्य मानण्याचे गीता-ईश्वराचे वेगळेपण , सख्यत्वभूमिका आणि तत्त्वबहुलतेचा स्वीकार यामुळे गीतेचा आशय व्यापक विश्वात्मक झाला आहे. गीतेच्या , गीता-ईश्वराच्या या स्वरूपामुळे आजही भक्त-अभ्यासक-चिकित्सक या सर्वांनाच आजही गीता-ईश्वराशी संवाद साधावासा वाटतो. साने एका सुंदर स्वयंसादातून गीता-ईश्वराला आपली नम्र पण चिकित्सक भूमिका सांगतात –

आक्षेपे मम सीमितज्ञचि अशा व्हावे जरा मंथन
तेजाळून उठो तुझाच महिमा यासाठि हे इंधन
कर्तृत्वा न गमावूनी विकसु दे अभ्यूदयाध्यात्म ते
जोपासो नच मोक्ष केवळ परी चारी पुरूषार्थ ते

पुढील प्रकरणात भारतात आणि महाभारतात धर्मग्लानी का आली आहे , सत्ताधाऱ्यांशी वेळीच शुभद्रोह (सानेंच्या स्वनिर्मित शब्दांपैकी हा एक महत्वाचा शब्द ) न केल्याने, त्याऐवजी सतत यांत्रिक धर्माचरण केल्याने, वेळोवेळी कोसळलेली अनर्थकारी संकट-परंपरा साने एक एक प्रसंग घेऊन , त्यावरच्या अर्थसौंदर्यपूर्ण पद्यरचनांसहित विश्लेषित करतात.

‘मोक्षोपदेश आणि युद्धप्रेरके ‘या प्रकरणात गीतेची मूळ बांधणी -युद्धातल्या स्वत:च्या भूमिकेबद्दलचा नैतिक क्षोभ, त्यातून उद्भवलेला अर्जुनाचा संभ्रम आणि त्यावर इलाज म्हणून भगवंताने त्याच्याशी केलेला युद्धधर्म आणि मोक्षोपदेश यांची सरमिसळ करणारा,आजच्या चिकित्सक वाचकाला अंतर्गत विसंगतीने युक्त वाटू शकणारा युक्तिवाद- चर्चिली आहे. भगवंताच्या युक्तीवादावर साने मार्मिक दीर्घ भाष्य करतात. अनेक संकल्पनांना प्रश्न विचारतात, निरनिराळ्या अध्यायातले त्यांचे क्रम मोडून त्या संकल्पना एकमेकांशेजारी आपल्या प्रयोगशाळेत ठेवतात.त्यांचे खंडन करतात. उदाहरणार्थ -
‘’तू फक्त निमित्तमात्र हो’’ यातले निमित्त होणे ही कृती कशी काय असू शकते ?
या युद्धात जर धर्माधर्मनिर्णयच होते तर ते महायोध्यांच्या द्वंद्वस्वरूपातच का खेळले गेले नाही ? सामान्य सैनिकांची जीवितहानी का ?
‘वासांसि जीर्णानि’ चा नियम युवा अभिमन्यूच्या शरीराला कसा लागेल ?
असे अनेक प्रश्न. त्यांची सानेंनी केलेली पद्यरूपे मार्मिक आहेत.

चौथे प्रकरण मोक्षकेंद्रीपणातून येणाऱ्या न्यायबुद्धीच्या अभावावर लक्ष केंद्रित करते. कर्मविपाक खरा मानला तरी तो न्याय्य कसा असेल ? सानेंचा स्वयंसाद ( वृत्त शार्दूलविक्रीडित)-
न्यायाची अट ही किमान कळणे आरोप ‘आरोपि’ला
अर्हत्वार्जन कोणत्या कृतीमुळे जी लाभ दे आजला
ज्याच्याबद्दल पारितोषिक मिळे वा प्राप्त हो दंडही
तेची ना कळता जीवास ‘शिकणे’ कैसे बने शक्यही ?

-हे वाचताना मर्ढेकर नाही आठवले तरच नवल..
‘’न्यायाच्या निज मंदिरात बसुनी साक्षीपुराव्याविना
किंवा काय गुन्हा असेल घडला सांगीतल्यावाचुन
न्यायाधीश असेल मानव तरी शिक्षा सुनावीत ना
देवाची परि न्यायरीति असले पाळील का बंधन !’’

येथे ईश्वराला अजून एका शब्दात सानेंनी पकडले आहे,जो शब्द माझ्यासकट समस्त स्त्रीजातीला कित्येकदा खटकला असेल ! ‘’ स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा: तेsपि यांति परां गतिं ‘’ (गीता ९.३२ ) यातील ‘’ पापयोनय: ‘’ म्हणजे पापयोनीत जन्मलेल्यांच्या (? म्हणजे आणखी कोण ?) बरोबरीने या स्त्री/शूद्र/वैश्य जातींचा श्रीकृष्णाने वैषम्यपूर्ण उल्लेख केला आहे . ( इथे सानेही ‘’विशेष म्हणजे स्त्री उच्चवर्णीय असली तरी स्त्री म्हणून तिला निम्नवर्णीय ठरवतोस !’’ असे मुद्दा स्पष्ट करण्यासाठी म्हणतात ते दुखतेच, असाही मुद्दा अस्तित्वात असावा हे अन्यायकारकच ! )

इतर अनेक अन्यायकारक संकल्पनांचा आधुनिक जाणिवेतून शोध घेताना सानेंना स्त्रियांबाबतची ही दुय्यमता दहाव्या अध्यायातील विभूतीयोगातही दिसते- बाकी सर्वोत्तमांची विशेषनामे ( जसे कपिल, राम, चित्ररथ, ‘’पांडवांत धनंजय ‘’ वगैरे ) पण स्त्रीमधील सर्वोत्तम सांगताना मात्र एखाद्या परमगुणशाली स्त्रीचा स्पष्ट नामोल्लेख न करता अमूर्त गुणांचा उल्लेख ! जणू काही स्त्रीलिंगी गुणच (‘’ वाणी, श्री ,कीर्ती, क्षमा,’’ वगैरे) सर्वोत्तम असू शकतात,हाडामासाची स्त्री सर्वोत्तम असूच शकत नाही असे म्हटल्यासारखेच हे आहे. साने हे प्रतिसादरुपात मांडतात-
जसे की वाणि ,श्री,कीर्ति ,क्षमा,मेधा,धृती,स्मृती
एकाही थोर नारीची का न व्हावी तुला स्मृती ?’’
तामसी भोजन (१७-१०) हे कोणी आवडीने खाते की ते दारिद्र्यातून लादले जाते ? या आणि अशा अनेक सूक्ष्म निरीक्षणांमुळे हे प्रकरण महत्वाचे झाले आहे.
शेवटी , ‘’मोक्षकेंद्री विचारात सामाजिक प्रक्रियांबाबतच्या विचाराचा ढळढळीत अभाव दिसून येतो’’ या निष्कर्षाप्रत साने येतात तेव्हा आपणही त्यांच्याशी सहमत असतो.

यापुढचे प्रकरण कर्मफलत्याग म्हणजे नेमके काय या कळीच्या विषयावर आहे. ‘योग: कर्मसु कौशलं ‘, ‘कर्मण्येवाधिकारस्ते ‘ वगैरे अगदी आपल्या नेणिवेपर्यंत पोचलेल्या धर्मविचारातून अनेक प्रश्न उद्भवतात. एक वर्तनशैली स्वीकारली जाते.तिची चिकित्सा आधुनिक परिप्रेक्ष्यातून या प्रकरणात केली गेली आहे, ती दीर्घ , अर्थपूर्ण , व्यामिश्र आहे. तिच्यातले काही ठळक मुद्दे फक्त –
-‘यज्ञेतर कर्मे मानवाला बंधनकारक आहेत’ ( ३.९) या विधानानंतर लगेच श्रीकृष्णांनी ‘यज्ञाने उत्कर्ष पावा, कामना पुरवून घ्या ‘ असे विरोधाभासी फलहेतुक (गीता ३.१० श्लोकातच ) विधान केले आहे .(याची चर्चा करताना साने यज्ञ हे उत्पादन व पर्यावरण रक्षण यांचे प्रतीक आहे असा सकारात्म अर्थ लावून पुढे जातात.यज्ञाची विविध स्थूलसूक्ष्म रूपे श्रीकृष्णांनीही वर्णिली आहेत तरीही प्रत्यक्षात यज्ञसंस्थेत शिरलेला कर्मकांडी दांभिकपणा वेळोवेळी समाजाच्या अध:पतनालाही कारणीभूत झाला आहे हेही कुठेतरी प्रश्नस्वरूपात यायला हवे होते असे वाटते.)
-फलत्यागातले त्यागफल- फलत्याग करण्यातून एक त्यागफल– ‘मोक्ष‘ हे अपेक्षिले गेले आहेच .मोक्षालाही फलत्व आहेच.म्हणजे सात्विक फलत्यागात सूक्ष्म आणि सर्वाधिक फलदायी फलाकांक्षा आहे !
-हाच विचार पुढे नेताना मग सरळसरळ फल इच्छिणारा कर्ता राजसी व म्हणून अनिवार्यपणे हिंसक हे गृहितक (१८.२७) एकांगी नाही काय ?
- समाजऋणाची जाणीव ठेवून फलस्वामित्व हे सर्वसमावेशक असावे असा एक चांगला पर्याय या विचार मंथनाअंती साने सुचवतात.

पुढील प्रकरणांमध्ये अनेक संज्ञा खोलात चर्चिल्या गेल्या आहेत त्यातील ‘समदृष्टी ‘ हा गीतेत वारंवार येणारा व आकलनास पचनी न पडणारा एक विचार.
‘सर्वभूतहित ‘ म्हणजे काय ? तर्काने ते शक्य आहे का ?
सानेंचा प्रतिसाद -
मृग धावे अकांताने , गाठाया व्याघ्रही तसा
उभयांचेहि कल्याण येथे चिंतू तरी कसा ?
थोडक्यात विवेक केव्हा व समदृष्टी केव्हा याचे निकष स्पष्ट न करता गीतेत समदृष्टीचे जे वारंवार एकांगी चित्रण आले आहे ते सानेंनी नेमक्या शब्दात परीक्षिले आहे.

तसेच इंद्रियदमनाबद्दल .काम हा नरकाकडे नेणाऱ्या तीन दारांपैकी पहिला (१६.२१),तो फक्त प्रजोत्पत्तीपुरताच क्षम्य ( गीता १०.२८- ‘प्रजनाश्चास्मि कंदर्प’’)
यावरचा सानेंचा प्रतिसाद (मंदाक्रांता)
‘’ऊर्मींना ज्या रिपुच गणुनी मानिसी पूर्ण दम्य
त्याही होती उचित समयी जीवकार्यी सुरम्य ‘’
शिवाय एकदा काम सर्वग्रासी आहे हे मान्य केले की त्याला शह देणारे काय शिल्लक रहाते ? दमन करावे तरी कसे ? शिवाय, दमनातून पोसला जाणारा अहंकार अधिक मोक्षनाशक नाही का ?
कामाच्या दमना पुरेल इतुकी शक्ती कुठूनी मला
त्यासाठी उपलब्ध एकच दिसे माझी अहंता मला !
एकूणच निरनिराळी इंद्रिये व त्यांचे काम्य विषय यात सरसकट निवृत्तीचा उपदेश करताना श्रीकृष्णांनी गीतेत अध्याय २ श्लोक ६७ मध्ये जी शीड व वारा यांची प्रतिमा वापरली आहे- ( ‘’तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवांभसि ‘’) - तीच वापरून साने ‘कुशल नाविक जसा कधी शिडे फुलवून तर कधी मिटवून अनुकूल प्रतिकूल काळात नौकानयन करतो तसे इंद्रियदमनाचे असावे ‘ असे सुचवतात .
‘मिटवू’ हाच एकांगी अर्थ का देसी संयमा
रसप्रज्ञत्व वाढावे पाळुनी नीतिनीयमा ..
यावर दुमत असायचं कारण नाही, फक्त आधुनिकतेच्या संदर्भात आज नीतिनियमांवर व कायद्यांवरही पडलेले नवे ताण, नवे वाद इथे आठवत रहातात इतकेच.

गुणत्रय व दैवासुरसंपद्विभाग या गीतेतल्या महत्वाच्या , परस्परसंबंधी सिद्धांतस्थिती. सात्विक, राजस आणि तामस या तीन गुणांच्या सर्व अध्यायात विखुरलेल्या वैशिष्ट्यांचा एक प्रदीर्घ तौलनिक तक्ताच(महत्वाच्या १७ निकषांवर - व्याख्या, लक्षण,फल,चलन आदि ) अकराव्या प्रकरणात देऊन सानेंनी एक मोठेच काम सोपे केले आहे. त्यातून उभ्या रहाणाऱ्या स्पष्ट अशा चित्रावरून त्यांनी आपली मते नोंदवली आहेत.
-गीतेतील व्याख्या पाहता ( गीता १४.८- मोह,अज्ञान,प्रमाद,आलस्य,निद्रा ) तामसी हा दंडनीयपेक्षा दयनीय वाटणारा गुणविभाग आहे. त्यातही निद्रासुख हे नेणीवेतून आत्मानंद देणारे, ते सर्वस्वी तामसी कसे ? तामसी आहाराबद्द्ल मागे आलेच आहे.तो अभावग्रस्तांवर लादला गेलेला आहे.तो पापमय कसा ?
-राजसी गुण हे आसुरी संपत्तीच्या लक्षणांजवळ जातात हे अनेक श्लोकांवरून अन्वयी वा व्यतिरेकी तर्काने सिद्ध होते. फार तर राजसी + तामसी = आसुरी या समीकरणातून नाकर्त्या तामसी श्रेणीबरोबरच कर्त्यासवरत्या , सामाजिक अभिसरणासाठी, प्रगतीशीलतेसाठी आवश्यक असलेल्या धडाडीच्या सकारात्म राजसी प्रवृत्तीवर अन्याय झाला आहे.
-सात्विकी= ब्राह्मणी=दैवी या गुणसमुच्चयाच्या उदात्तीकरणात फक्त मोक्षपुरुषार्थाचा विचार आहे,मानुषी आचारसंहितेचा नाही .
हे त्यांचे निष्कर्ष पौर्वात्य अध्यात्मातून पोसल्या गेलेया एका बाजूला तामसी अकर्तेपण व दुसऱ्या बाजूला सात्विकी अकर्तेपण या दुहेरी पलायनवादावर योग्य आक्षेप घेणारे आहेत.

यानंतर शेवटच्या टप्प्यावर सामाजिक/ नैतिक क्षेत्र थोडे बाजूला ठेवून क्षर-अक्षर पुरुष, क्षेत्र–क्षेत्रज्ञ (शरीर- प्रकृति आणि पुरुष ) या आध्यात्मिक संकल्पनांचा चिकित्सक आढावा घेत क्षर आणि अक्षर (जीवात्मा आणि परमात्मा ) यात झोत-स्रोत संबंध आहे अशा एका आत्मिक अनुभूतीपर्यंत साने येतात. गीतेत तेराव्या अध्यायात वर्णिलेले क्षेत्र (शरीर )केवळ जडाने बनलेले नसून त्यात मन ,इंद्रिये, अहंकार, बुद्धी ,इच्छा, द्वेष,सुखदु:खे,संघात, चेतना, धृति अशा बऱ्याच गोष्टी येतात. या क्षेत्रात राहून विशुद्धात्मा विकारी होतो . पण या दोन्हींच्या द्वंद्वात्मक संबंधामुळे जन्म/पुनर्जन्म घडवणारी कर्मे घडतात .
पुरुष: प्रकृतिस्थो हि
भुड्:क्ते प्रकृतीजान् गुणान्
कारणं गुणसड्.गोsस्य
सदसद्योनिजन्मसु (गीता १३.२१)
या प्रक्रियेला साने क्षर आणि अक्षर (जीवात्मा आणि परमात्मा ) यांचा झोत-स्रोत संबंध म्हणतात . गवाक्षातून येणारा प्रकाशझोत गवाक्षसापेक्ष असतो, तसा गवाक्षाच्या काचेच्या रंगानुसार गुणान्वित झालेला तो जीवात्मा, पण सूर्य, जो सर्वच जगाला उजळतो तो मूळ प्रकाशस्रोत, चित्स्रोत आहे तो परमात्मा.हीच ‘’योगमाया समावृतता’’ असे ते नोंदवतात. म्हणून ‘द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ‘ या श्लोकावरचा त्यांचा अनुसाद असा येतो -
आत्मे दोन्हीही या लोकी
क्षर आणिक अक्षर
क्षर होत ते जीवात्मे
त्यांचा चित्स्रोत अक्षर..

शेवटी पंधराव्या अध्यायांतीच्या ‘पुरुषोत्तमा’ची व्याख्या करणाऱ्या खालील श्लोकावर भाष्य करताना ते एक कळकळीची विनंती ईश्वराला करतात – या आत्मस्वरूपातून तू कर्तेपणाला वगळू नकोस, अकर्तेपणाचे महत्व इतके वाढवू नकोस की ते तुझ्याच मुळावर येईल ,कारण मी स्वत:ला अंशत: स्वनियंता,आणि तुला जगन्नियंता मानतो !
यस्मात्क्षरमतीतोsहं
अक्षरादापि चोत्तम:
अतोsस्मि लोकेच वेदेच
प्रथित: पुरुषोत्तम: (गीता १५.१८ )

आता गीतार्थाची शेवटची खडतर चढण. ईश्वराने गीतेत स्वत;च्याच स्वरूपाबद्दल, भूमिकेबद्दल परस्परविरोधी विधाने केली आहेत ज्यातून गोंधळ व गूढत्व वाढले आहे.
जसे की ‘ जे जे म्हणून आहे ते मीच हे महात्मे जाणतात’ -’वासुदेवं सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ‘ (७.१९)
असे असताना , ‘अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन:’ – ‘मी अमर्त्य, मर्त्य,मीच सत आणि असत’ ( ९.१९) हे एकीकडे , आणि ,‘नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:’(२.१६)- ‘असत भाव म्हणून विद्यमान होऊ शकत नाही, सत अभाव म्हणून विद्यमान होऊ शकत नाही !’’ (२.१६)
तर ही सर्व विधाने साने त्यांना आकळलेल्या ,गूढाचे निराकरण करणाऱ्या ‘ईश्वराचे प्रारूप’ या तेराव्या प्रकरणात स्पष्ट करतात.

येथे एक वाचक म्हणून हे जाणवते की साने चिद्विलासवादी अद्वैताचे आधुनिक परिभाषा तयार करून समर्थन करत आहेत.हे प्रारूप थोडक्यात असे आहे- ईश्वराची काही मुख्य स्वरूपे आहेत जी या परस्परविरोधी विधानांमधून आळीपाळीने प्रकट होतात. त्यात गूढता नसून नियमबद्धता आहे.

तृप्तसर्वात्मेश्वर अर्थात स्वसंवेद्य नित्यतृप्त शुद्ध सच्चिदानंद अक्षर-पुरुष किंवा तृप्तेश.हाच मोक्ष पुरुषार्थ .

निसर्गेश्वर ऋतेश -जडजगतात ( अपरा प्रकृती ) प्रकटलेला .(‘पुण्योगंध पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ’ गीता ७.९ –‘ पवित्र मृदगंधहि मीच आहे,अग्नीतले तेजहि मीच आहे’ – सानेंचा अनुसाद व इतर अशा अर्थाचे अनेक श्लोक, त्यांचे अनुसाद ) याच्या आराधनेत सामावलेला उद्योगपुरुषार्थ ‘अर्थ’ आहे .
माया असे ज्या ईश्वरीय निर्मितीला म्हटले जाते ती लीला करणारा सलील सच्चिदानंद – निर्मातेश्वर लीलेश. (काम पुरुषार्थ )

शुभेश- या निर्मातेश्वराच्या अनिर्बंधतेवर अंकुश ठेवणारा नियंतेश्वर. न्याय –धर्मपुरुषार्थ.

जीवेश- जीवात्मेश्वर जो जीवात प्रकटतो –संवाद पुरुषार्थ – अंतर्गत आराधना ( सानेंचा नवविचार ).

वैश्विक शक्तीच्या या रूपांचे प्रकटन मानवी जीवनाच्या स्तरावरही ‘सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो ‘ –‘मी सर्वांच्या हृदयात राहून त्यांना स्मृती ( विवेकाचे भान ) देतो ‘ अशा तऱ्हेने होते.हा ईश्वरीय साक्षात्कार म्हणजे सुहृदाच्या भूमिकेतून केलेला ईश्वराने आपल्या जीवनात केलेला कल्याणप्रद हस्तक्षेप आहे या सुंदर विवेकविचारापर्यंत साने अनेक श्लोकांचे परीक्षण करत येतात.

जेव्हा उत्तर लख्ख होत उमटे तुम्हा जिवांच्या मनी
जेव्हा येई स्वतंत्रता ‘स्व’ नियमुनी कर्तव्यनिष्ठेतुनी
जीवा भासत ‘मी मलाच आपुला’ अंतस्थ या मेलनी
तेव्हा जाण ‘शुभेश’ उत्तमरुपी स्पर्शीत हो जीवनी ..( अनुसाद वृत्त शार्दू.)

शेवटी , साने केवळ मोक्षपुरुषार्थाची भलामण करण्याआधी व्यक्तीला अन समाजाला-राष्ट्रालाही कृतीप्रज्ञ बनणे आवश्यक आहे म्हणून ‘सत्वगामी राजस’ किंवा ‘दैविगामी मानुष’ या कोटीची आवश्यकता प्रतिपादन करतात.

एका महान धर्मग्रंथावर केलेले हे आधुनिक चिंतन.अनेक सूक्ष्म पातळ्यांवरील अर्थांतरे अभ्यासणारे. याचा थोडक्यात परामर्ष घ्यायचा झाला तरी हा एवढा विस्तार झाला.याशिवाय अनेक संकीर्ण व महत्वाचेही मुद्दे आहेत जे विस्तारभयास्तव घेतले नाहीत.

नित्याराधनेतील या ग्रंथाला झापडे उघडून नव्या विचारांच्या प्रकाशात, ताज्या चर्चेच्या झुळुकीचा आनंद घेत अनुभवणे आवश्यक होते, राजीव सानेंनी हे साध्य केले आहे.

- भारती बिर्जे डिग्गीकर

-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसन्न आणि प्रभावशाली लिखाणाचा हा एक सर्वोत्कृष्ट नमुना. गीतेवर वारंवार लिखाण होत असते, वैचारिक चर्चा झडत असतात, नवनवीन अर्थांच्या पाकळ्या समोर फुलल्या जातात. अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांना विलक्षणरितीने भुलविणारा हा ग्रंथ, त्यावर श्री,राजीव साने यांच्यासारख्या जेष्ठ तत्त्वज्ञानी अभ्यासकाने सखोल असे केलेले विवेचन "नवपार्थहृद्गत" मध्ये कशारितीने प्रगट झाले आहे यावर भारतीताईंनी टाकलेला हा प्रकाश त्यांच्या तेजस्वी अशा बुद्धीची जाणीव इथल्या वाचकांना करून देत आहे. शब्दांचे केलेले योजन पाहता मराठी भाषेचा खजिनाच जणू त्यांच्याकडे सेवेला हजर आहे असेच वाटत जावे अशी रचना त्यानी वाक्यावाक्यात केली आहे, तीही अत्यंत सहजगत्या.

लेखाच्या शेवटी त्या म्हणतात..."...थोडक्यात परामर्ष घ्यायचा झाला तरी हा एवढा विस्तार झाला....", मी तर असेच म्हटले असते की विस्तार भयास्तव त्यानी लिखाण कधीच थांबवू नये. स्फटिकासारखे शुद्ध, प्रवाही शब्द त्यांच्या रंध्री भिनलेले आहेत. त्याचे सामर्थ्य वरच्या लेखात ज्या प्रभावीरित्या प्रकट झाले आहेत ते वाचल्यास खुद्द श्री.राजीव साने देखील असाच अभिप्राय व्यक्त करतील.

भारतीताई, लेख वाचायचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. निम्म्यापर्यंत जेमतेम पोचलेय पण तोवरही माझी व्यवस्थित दमछाक झाली आहे. मूळ पुस्तकाकडे वळण्याची माझी धमक, समज तर नाहीच, तुम्ही मांडलेलेही अनेक मुद्दे माझ्या डोक्यावरून गेले.

पण तरीही संपुर्ण लेख प्रयत्न करून वाचणार आहे. तुमच्या भाषासंपदेचे दर्शनही विलोभनीय आहे, त्याचा आनंद तर नक्कीच घेऊ शकते. त्यातून मग काही समजलं, काही विचारण्यासारख्या शंका निर्माण झाल्या तर दुधात साखर. मायबोलीवर तुमच्यासारख्या विदुषी वावरतात, शिवाय संवादासाठी सहज उपलब्ध असू शकतात हे आमचे भाग्य आहे.

घरी लोकमान्यांच्या मूळ गीतारहस्याची एक प्रत आहे. नव-याने फुटपाथवरच्या विक्रेत्याकडून आणलेली. कुणीतरी रद्दीत घातलेली. १९१५ सालातली तारीख आणि चिपळुणकरांचे नाव आहे त्यावर. ती हाताळायचा असाच एक केविलवाणा प्रयत्न ती आणली तेव्हा केलेला. प्रस्तावनेतच इतकी अडले ती आजतागायत पुन्हा हातात धरायचा धीर झालेला नाही. विषय आणि लेखक सगळेच माझ्या कुवतीपलिकडचे. ह्या पार्श्वभूमीवर तुमच्याबद्दल आभाळाएवढा आदर वाटतो.

साने एका सुंदर स्वयंसादातून गीता-ईश्वराला आपली नम्र पण चिकित्सक भूमिका सांगतात –
आक्षेपे मम सीमितज्ञचि अशा व्हावे जरा मंथन
तेजाळून उठो तुझाच महिमा यासाठि हे इंधन
कर्तृत्वा न गमावूनी विकसु दे अभ्यूदयाध्यात्म ते
जोपासो नच मोक्ष केवळ परी चारी पुरूषार्थ ते >>>>>> हे मला तरी विशेष वाटले.

याप्रकारचे लेखन करुन श्री. साने यांनी एक वेगळाच पैलू उलगडला आहे - ही बुद्धिवादी विचारणा आहे हेही त्यांनी अगदी स्पष्टपणे व मोकळेपणाने मांडले आहे.

भारतीताईंनीही अतिशय सुंदर आणि विचक्षणतेने हे सारे इथे मांडले आहे - ज्या मांडणाची मलाही भूलच पडली ...

आता राहता राहिला गीताग्रंथ -
गीतेच्या महासागरात अनेक बुद्धिवंतांनी, अभ्यासकांनी, समाजधुरीणांनी, श्रद्धावंतांनी अनेक पद्धतीने अवगाहन करुन त्यातील अनेक रत्ने बाहेर काढून दाखवली आहेत.

इतकेच नव्हे तर अनेक टीकाकारांनी गीतेत किती परस्परविरोधी विधाने आहेत, सद्यकाळात गीता किती निरुपयोगी आहे, इतकेच काय पण त्याकाळातही कृष्णाने अर्जुनाची कशी दिशाभूल केली - अशी अनेक प्रकारची दूषणेही दिलेली आहेत.

यासंबंधाने (फक्त गीतेच्याच नव्हे तर एकंदरीत परमार्थाच्या पण पर्यायाने आपल्या समग्र जीवनाच्यासंबंधाने) एक आठवण द्यावीशी वाटते - जी काही जणांना आवडेल तर काहीजण त्याला नाकेही मुरडू शकतील ...

पॉल ब्रंटन (इन द सर्च ऑफ स्पिरिच्युअल इंडिया या पुस्तकाचा लेखक - हे पुस्तक अतिशय वाचनीय असून तत्कालिन म्हणजे १९५० च्या आसपासच्या भारतातल्या अनेक साधु-संतांविषयी या लेखकाने अतिशय त्रयस्थपणे यात लिहिले आहे.) पॉल - हा मूळचा ब्रिटनवासी पण संपूर्ण भारतभर केवळ साधु-योगी यांच्या शोधात हिंडत असता श्री रमण महर्षींच्या आश्रमात गेला. पॉल स्वतः अतिशय बुद्धिवादी असल्याने अनेक वेगवेगळ्या शंका कागदावर लिहून घेऊन तो आश्रमात बसला - जिथे अनेक मंडळी ध्यानाला बसलेली होती - व स्वत: महर्षीही शांत ध्यानाला बसलेले होते. पॉलने विचार केला की महर्षी ध्यानातून उठले की हे सगळे प्रश्न त्यांना विचारायचे - तोपर्यंत काय करायचे म्हणून तोही डोळे मिटून बसला - बराच वेळ झाला - पॉलमहाशयांना इतके शांत वाटत होते की बस्स... त्याने डोळे उघडून पाहिले तो बराच काळ लोटला होता - महर्षी त्यांच्या खोलीत निघूनही गेले होते...
पॉलने विचार केला उद्या त्यांना विचारुयात सारे...
दुसर्‍या काय तिसर्‍या दिवशीही तीच स्थिती - तो तिथे बसला की त्याला इतक्या प्रगाढ शांतीचा अनुभव येत होता की त्याच्या सारख्या बुद्धीवादी माणसाच्याही लक्षात आले की महर्षी मला काहीही न बोलता ज्या प्रगाढ शांतीचा अनुभव देत आहेत तो अनुभव घेणे महत्वाचे का ते प्रश्न विचारणे महत्वाचे - अखेर त्याने तो कागद फाडून टाकला व काही दिवसातच महर्षीचा अनन्य भक्त बनून साधना करु लागला...
हे सगळे त्याच्या (पॉलच्या) शब्दात वाचणे हा खूप मोठा अनुभव आहे -अतिशय बोलका अनुभव आहे...

परमार्थात अनेक शंका येणे हे अतिशय चांगले लक्षण आहे - पण त्या माझ्या बुद्धीने सोडवू म्हटले तर ते फार अवघडही आहे - (कारण मी त्रयस्थपणे विचार करु शकतो का ?? - विनोबा म्हणतात - थर्मामीटरला स्वतःला ताप आलेला नसतो म्हणून तो खरा "तापमापक" होऊ शकतो Happy - इतकी आपली विचारसरणी त्रयस्थ होऊ शकते का ?)

जो तो आपापल्या पद्धतीने "एकाच" गोष्टीकडे पहात असतो - ज्याची जितकी समज वा जाण वा अनुभव तितके त्याला मिळते असे माझे एक बालमत .....

बरीच लांबण लावली त्याकरता क्षमस्व... Happy

वा शशांक, तुमचे 'बालमत' माझ्यासारख्या अल्पमतींसाठी खुपच सुबोध आहे Happy अतिशय समर्पक प्रतिसाद. आवडला, कारण समजला.

भारतीताई,
लेख अतिशय आवडला. पुस्तक घेऊ धजावेन की नाही सांगता येत नाही. पण प्रयत्न करेन वाचायचा.
आभारी आहे.

भारती लेख अर्धा वाचला आणि वाटले शांतपणे वाचायला हवे निट वाचल्यावर लिहीनच.
.>>>>शब्दांचे केलेले योजन पाहता मराठी भाषेचा खजिनाच जणू त्यांच्याकडे सेवेला हजर आहे असेच वाटत जावे अशी रचना त्यानी वाक्यावाक्यात केली आहे, तीही अत्यंत सहजगत्या.>>..हे अशोक यांचे मत अर्धा लेख वाचूनही पटणारे
तुझ्या सर्वच लेखाबाबत अस म्हणावस वाटत.
सइच्या प्रामाणिक प्रयत्नाला मात्र दाद द्यायला हवी..

भारतीताई,

लेख वरवर वाचला. नवीन शब्द आवडले (व्यक्तविणे, शुभद्रोह, इ.). परत सवडीने वाचेन. प्रतिसाद द्यायची इच्छा आहे. Happy

राजीव साने आणि तुम्हाला साष्टांग दंडवत!

आ.न.,
-गा.पै.

अतिशय सुरेख आढावा घेतलाय. अशोकराव म्हणतात त्याप्रमाणे भारतीताईंची शब्दरचना अप्रतिम. तीही सहज आल्याप्रमाणे. अशा विषयावर लिहिणे, ते देखिल अशा वेळी जेव्हा लेखक परंपरेपेक्षा वेगळ्या अर्थाचं काही बोलु इच्छीत आहे तेव्हा. भारतीताईंना सलामच करायला हवा.

बाकी विषयाबद्दल मत व्यक्त करायचं म्हटलं तर मुळ पुस्तक वाचायला हवं, ते न वाचताच मांडलेल्या एका मुद्द्याबद्दल मत व्यक्त करण्याचे धाडस करीत आहे. भारतीताई आणि माबोकर क्षमा करतील अशी आशा आहे.

दुसरा प्रास्ताविक विभाग ‘प्रश्न, जे उपस्थित करायचे राहूनच गेलेत !!’’ या बोलक्या शीर्षकाचा आहे .प्रश्न अनेक आहेत, प्रश्न पुढेही सातत्याने येत राहातील, पण या विभागात आलेले प्रश्न विशेष मूलगामी असे आहेत.
वानगीदाखल पहिलाच प्रश्न.महाभारतात अनेक घटना, खरे तर दुर्घटनाच, शेवटी युद्धभूमीवर विसर्जित झाल्या.गीतेची सुरुवातच अर्जुन-विषादाने होते. पण आज नवपार्थाला या युद्धप्रसंगाआधीच्या दोषास्पद घटनाक्रमातच काही उदात्त व अपरिहार्य दिसत नाही. ,’’मी वेळीच युधिष्ठिराशी शुभद्रोह ( योग्य कारणासाठी विरोध ) केला असता तर युद्धभूमीवर वेळ टळून गेल्यावर अर्जुन-विषाद व्यक्त करायची वेळच आली नसती .तथाकथित धर्म्यतेचे पटण्यासारखे निकषच नसावेत ? अनिर्णय व उलटसुलट निर्णय यांनीच प्रकरण चिघळून महासंहाराची वेळ आणली नाही काय ?’’ हा नवपार्थाने स्वत:लाच आश्चर्याने केलेला प्रश्न.

वर विचारलेल्या मुलगामी प्रश्नाबाबत माझे मतभेद आहेत. मुळात युद्धप्रसंगीच्या घटनाक्रमात काही उदात्त नव्हतेच. तसा दावा महाभारतकारांनी केल्याचं वाचलं नाहीय. मात्र अपरिहार्यतेचा मुद्दा हा वेगळाच आहे. आजच्या काळातील, सामाजिक चालिरेतीमधील आधुनिकतेच्या फुटपट्ट्या लावुन त्या काळातल्या माणसांची वागण्यातली अपरिहार्यता, असहाय्यता, त्यांच्या मर्यादा यांचे आकलन कसे काय होणार?

मुळात घडलेल्या घटनेबाबत जर आणि तर असे प्रश्न विचारता येतील, त्याबद्दल चर्चादेखिल करता येईल परंतु त्याबद्दल काही निष्कर्ष काढताना त्यावेळी असे केले असते तर ही वेळ आली नसती असा निर्णय देणे योग्य होणार नाही असे मला वाटते. यावर चर्चा करताना काही उदाहरणे देणे अस्थानी होणार नाही.

मयसभेत हिंडत असताना एके ठिकाणी दुर्योधन जमीन समजुन चालु लागला आणि पाण्यात पडला. तेव्हा द्रौपदी हसली आणि त्याला उद्देशुन म्हणाली "आंधळ्याचा पुत्रदेखिल आंधळाच".

जर द्रौपदीत संयम असता तर? जर तिच्यात एखाद्याच्या अंधपणाची थट्टा करण्याइतका विषारीपणा नसता तर? असे आपण द्रौपदीच्या किंवा कुणाच्यादेखिल स्वभावाबद्दल बोलु शकतो काय? जर द्रौपदी काहीच बोलली नसती तर कदाचित दुर्योधन जळत कुढत राहिला नसता आणि कदाचित पुढचा अनर्थ टळला असता. पण तसे व्हायचे नव्हते. द्रौपदीचा स्वभाव हा असा होता. तिच्या स्वभावाप्रमाणे ती बोलुन बसली. स्वभाव ही अपरिहार्यता असते. व्यसनाइतकाच स्वभावही हट्टी असतो. घटना घडताना असा स्वभाव हे महत्त्वाचे कारण असते. स्वभावो दुरीतक्रमः तेथे जर तर म्हणुन चालत नाही. असा विचार केल्यास आजवर घडलेल्या सर्वच चुकांच्या बाबतीत हे बोलता येईल. ती शक्तीशाली माणसे, पराक्रमी माणसे, ज्ञानी माणसे त्याकाळच्या परिस्थीती, आवर्तात सापडुन जे काही बोलतात, निर्णय घेतात त्यातुन निरनिराळे प्रसंग उभे राहतात. त्या माणसांचे वागणे त्याकाळच्या चौकटीतच तपासुन पाहावे लागणार असे मला वाटते.

क्षत्रियाला द्युताचे आव्हान नाकारता येत नाही असा त्याकाळी नियम होता. त्यातुन शकुनिला आणि दुर्योधनाला युधिष्ठीराचा जुगारी स्वभाव माहित होता. नियम आणि व्यसन यांची नीट विचार करुन त्यांनी हे आव्हान दिले आणि पांडव अलगद जाळ्यात सापडले. आता मला कूणी रमी खेळायला क्लबात चल म्हणुन खेचन नेऊ लागला तर मी जाईन काय? पण त्यावेळी ते शक्यच नव्हते. सामाजिक नियम आणि स्वभावगत दुर्बलता यामुळे युधिष्ठीर जाळ्यात अडकला. आता इतर पांडवांनी त्याला अडवलं असतं तर? कृष्णाने अडवलं असतं तर? विदुराने अडवलं असतं तर? पण कुणाकडुनच तसं झालं नाही. कारण आव्हान चलाखिने दिलेलं होतं, त्याकाळच्या नीती नियमांना अनुसरुन आणि युधिष्ठीराचा स्वभाव पारखुन दिलेलं होतं. जर इतकी प्रभावशाली माणसं आजुबाजुला असताना कुणीच युधिष्ठीराला अडवलं नाही याचा अर्थ तो नियम अतिशय प्रभावशाली असणार.

आता यावर कुणाचे असे म्हणणे असेल कि ते नियमच चुकीचे होते तर माझे काहीही म्हणणे नाही.प्रत्येक समाजाचे तत्कालिन नियम असतात, त्यावर तो समाज चालतो. तदनुसार घटना घडतात. त्यावर भाष्य करताना नवपार्थाने एकविसाव्या शतकातील नियम आणि विचारसरणी वापरणे कितपत योग्य असा प्रश्न माझ्या मनात आला अणि हा प्रतिसाद लिहीला. येथे कुणाही भक्तांचे मन दुखावण्याचा प्रयत्न नाही. खरं तर इतर अनेक मुद्द्यांवर लिहिण्याची इच्छा आहे. पण वेळ मिळेल असे वाटत नाही.

"....परमार्थात अनेक शंका येणे हे अतिशय चांगले लक्षण आहे....."

~ शशांक जी.....निव्वळ चांगले लक्षण नव्हे तर अत्यंत निरोगी असेच ते आहे. अगदी सोदाहरणाने तुम्ही भारतीताईंच्या लेखाला जो प्रतिसाद दिला आहे तोही त्यांच्या मूळ लेखाइतकाच दर्जेदार आहे. पॉल ब्रंटन याना आलेल्या प्रगाढ शांतीचा अनुभव कन्याकुमारीच्या रॉक मेमोरिअल इथे असलेल्या 'ध्यान मंदिर" खोलीत येऊ शकतो. तिथे मांडी घालून {ध्यानस्थच बसले पाहिजे असेही काही नाही} स्वस्थ बसले तरी जी एक मनःशांतीची अनुभूती प्राप्त होती त्याची प्रचिती बुद्धीवादी दृष्टीकोणातून विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना मिळू शकणार्‍या उत्तरापासून होणार नाही कदाचित. अर्थात प्रत्येकाच्या अनुभवाचा बाज वेगळा असतो हे मान्य करूनही म्हणावे लागेल की शांती मिळविण्यासाठी खास असे काही शास्त्र असेल वा नसेलही; पण जागा असा एक घटक आहे की तिथे गेल्यावर स्वतंत्ररित्या त्याची महती कळू शकते.

खरे आहे की जो तो प्रत्येक अनुभवाकडे आपल्या नजरेने पाहात असतो...त्याची जाण आणि समज या दोन घटकांवर त्या अनुभवाची पातळी निश्चित होत असते. त्यामुळेच "गीता" वर भाष्य करणार्‍यांमध्येही बाजूने तसेच विरोधात बोलणारे/लिहिणारेही प्रत्येक दशकात आपणास मिळत गेल्याचे आपण पाहतो आहोतच. नीरक्षीर विवेकाची गरज भासते ते अशाप्रसंगीच....आणि तो विवेक मिळतो आपल्याला श्री.राजीव साने तसेच भारतीताईंच्या लिखाणातून.

पुर्वार्धापेक्षा लेखाचा उत्तरार्ध समजून घ्यायला मला सुलभ वाटला. अधेमधे संदर्भांसाठी आलेले सानेंचे मूळ स्वयंसाद्-प्रतिसादही समजायला तुलनेने सोपे आहेत. त्यामुळे पुस्तकही चाळून बघायला हरकत नाही असे वाटून गेले.

भारतीताई, तुम्ही मन लावून केलेले पुस्तकाचे परिक्षण पुस्तकाचे महत्व पोचवते आहे. लेख अतिशय प्रभावी झाला आहे.

अतुल, अतिशय तर्कसंगत, अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारा प्रतिसाद आहे तुमचा. कृपया वेळ काढा आणि त्या अनुषंगाने आणखी लिहा.

जर द्रौपदीत संयम असता तर? जर तिच्यात एखाद्याच्या अंधपणाची थट्टा करण्याइतका विषारीपणा नसता तर? असे आपण द्रौपदीच्या किंवा कुणाच्यादेखिल स्वभावाबद्दल बोलु शकतो काय? जर द्रौपदी काहीच बोलली नसती तर कदाचित दुर्योधन जळत कुढत राहिला नसता आणि कदाचित पुढचा अनर्थ टळला असता.>>> अशा स्वरुपाचे अनेक प्रश्न मला दोन्ही महाकाव्यांमध्ये अनेक घटनांबाबत पडलेले आहेत. ज्या वर्तणुकीच्या भावी परिणामांचा सामान्य माणसाला अंदाज लावता येऊ शकतो, त्याबाबतीत ही दैवी माणसे अशी का वागली असावीत हे तर्कापलिकडचे आहे. त्यावर तुम्ही वर दिलेले विवेचन अगदी पटण्यासारखे आहे.

सई...

"...त्याबाबतीत ही दैवी माणसे अशी का वागली असावीत हे तर्कापलिकडचे आहे...." ~ इथे आपला (कदाचित) मतभेद होऊ शकतो. कृष्ण वगळला तर ह्या सा-या व्यक्ती आपल्यासारख्याच रक्तमांसाचा होत्या ज्याना सुखदु:खाच्या झालरी लागणे क्रमप्राप्त होते. यांचे नशीबही दैवी नव्हते....असते तर जुगारात हरणे, पत्नीची वस्त्रहरणामुळे विटंबना पाहणे नशिबी येणे, वनवासात जाणे, अज्ञातवासात अर्जुनाला बृहन्नडेचे रुप घेऊन राहणे, कृष्णसंगत संपताच सामान्यासारखा एक योद्धा होणे, अश्वत्थाम्याने त्यांच्यासमोर सार्‍या मुलांची हत्या करणे... अशा कित्येक घटना महाभारतात आल्याच नसत्या....दैवी माणसे असती तर हे भोग त्यांच्या कपाळी येणे शक्य नव्हतेच....अशा माणसांची पत्नी ती द्रौपदी....तिची मयसभा रांगोळी समयीची वर्तणूकदेखील हेटाळणीचे...म्हणजे सामान्यच....जी अटळ म्हणून स्वीकारणे भाग पडते.... युद्धाच्या ज्वाला भडकण्यासाठी कुठेतरी ठिणगी पडावी लागते....ती द्रौपदीमुळे पडली, इतकेच म्हणावे लागेल.

मामा, मी एकवेळ हे मान्य करते की तीही आपल्यासारखी हाडा-मांसाची सामान्य माणसे होती. पण तुम्ही वर दिलेल्या मोठ्या घटना घडण्यासाठी ज्या क्षुल्लक घटनांचे निमित्त झाले मी त्याबद्दल म्हणते आहे.

कोणावरही कोणतीही शेरेबाजी करताना सामान्य माणूस त्या समोरच्या माणसाच्या सामाजिक पातळीचा, पात्रतेचा, स्वभावाचा किंवा यापैकी एकाचा तरी थोडातरी सारासार विचार करतो, किंवा व्यसनाधीन माणसावर त्याच्या कुटूंबियांचे जरा तरी नियंत्रण असते, निदान एखाद्या निर्णायक प्रसंगी तरी सभोवती असलेली जबाबदार कुटुंबिय मंडळी सावधान रहातात... मी हे थेट द्युताबद्दल बोलत नाही, तर युधिष्ठिराच्या व्यसनाचे गांभिर्य सर्वांना माहिती असणे आणि त्याच्या संभाव्य स्वरुपाची कल्पना असण्याबद्दल म्हणतेय. मग भले तो त्याच्या कार्यक्षेत्रात कितीही थोर असो, कुटुंबप्रमुख असो वा काहीही. कैकयीच्या स्वभावाची चुणुक दशरथासारख्या बुद्धिमान राजाला वर मागण्याच्या प्रसंगापूर्वीदेखिल कुठे ना कुठे साध्याशा वागण्यातूनही दिसली असेलच. तेव्हा वर देताना ही याचा नक्की विधायक कारणासाठीच वापर करेलच असे नाही, ही घंटा दशरथाच्या डोक्यात किंचीत तरी वाजायला हवी होती. हे म्हणताना तो जर एवढा चक्रवर्ती राजा आहे तर त्याच्याजवळ थोडी तरी दूरदृष्टी किंवा आपापल्या कुटुंबातल्या व्यक्तिंचा नीट अभ्यास अपेक्षित आहे. हेही जाता जाता नमुद करते की अशा स्वरुपाचे तार्किक प्रश्न शिवचरित्राबाबत मात्र पडत नाहीत Happy निदान मला तरी.

पण अतुलनी दिलेली स्पष्टीकरणे म्हणुनच जास्त पटतायत, की मी या काळातले निकष त्या काळाला लागू होतात की नाही इथंपासून सुरुवात करायला पाहिजे. तेव्हाच्या सामाजिक, कौटुंबिक, राजकिय परिस्थितीचे मला पुर्णपणे आकलन होऊ शकते की नाही, तेच नाही झाले तर असे प्रश्न निर्माण होण्यालाही काही अर्थ उरत नाही. पायाच नसलेल्या निरर्थक शंका.

छानच सर्व प्रतिसाद ,धन्यवाद, पुस्तकाचा विषयच असा अवघड आहे की या गतिमान काळात ते डावलले जावे किंवा थोड्याच लोकांकडून वाचले जावे .
मात्र पुस्तकाच्या मूळ भूमिकेपासूनच मी या लेखनाचा अधिकाधिक आनंद घेत गेले. मीही कुणी विद्वान नाही, मात्र आपल्या बुद्धिशाली परंपरेचे मला वावडे नाही.असे लेखन अधिक लोकांपर्यंत पोचावे, माझ्यासारखाच त्याचा आनंद अनेकांनी घ्यावा असे मला वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.
शशांकजी म्हणतात तसे गीता हा विषय मोठा आहे, त्यावर अनेक महान लोकांनी आपली प्रज्ञाप्रतिभा पणाला लावली आहे.
पण परमेश्वर आणि त्याने निर्माण केलेले जीवन रसमय आहे ! जेव्हा रसनिष्पत्ती होते तेव्हा ते लेखन वाचनीय ठरते.
बुद्धी/समज/विद्वत्ता याहीपलिकडे उत्कटता हाही एक महत्वाचा निकष आहे. दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा, बुद्धीची बलस्थाने वेगळी तरीही प्रत्येकाला स्वत:ची मते मांडायचा , परमपित्याशी भांडायचा सुंदर अधिकार आहे.
अतुल, तुम्ही घेतलेले आक्षेपही मान्य आहेत. महाभारतासंदर्भात कुणी कसे वागायला हवे होते आणि कसे वागले यावर पानेच्या पाने खर्ची घालता येतील , तत्कालीन समाजचौकटी तपासाव्या लागतील. याविषयावर सानेंनी पुष्कळ लिहिले आहे,तुम्हाला पुस्तक मुळातून वाचावे लागेल. ते अधिक बोलूही शकतील,
पुन; एकदा एक सामान्य व्यक्ती म्हणून इथे मी नवपार्थाच्या बाजूने आहे ती अशासाठी की अर्जुनाने फार आधीच शुभद्रोह करून स्वत: जिंकलेली द्रौपदी युधिष्ठिराच्या लालसेपोटी /कुंतीच्या आग्रहापोटी पाचांमध्ये भिक्षा म्हणून वाटून घ्यायला ठाम नकार द्यायला हवा होता. त्या काळातही असा विवाह अन्य झाल्याचे दिसत नाही ( नियोग वेगळे ) तेव्हा ती फारशी प्रचलित लोकरीतीही नव्हती.

-अनर्थकारी अन्यायाची ती सुरुवात होती.

पुन; एकदा एक सामान्य व्यक्ती म्हणून इथे मी नवपार्थाच्या बाजूने आहे ती अशासाठी की अर्जुनाने फार आधीच शुभद्रोह करून स्वत: जिंकलेली द्रौपदी युधिष्ठिराच्या लालसेपोटी /कुंतीच्या आग्रहापोटी पाचांमध्ये भिक्षा म्हणून वाटून घ्यायला ठाम नकार द्यायला हवा होता. त्या काळातही असा विवाह अन्य झाल्याचे दिसत नाही ( नियोग वेगळे ) तेव्हा ती फारशी प्रचलित लोकरीतीही नव्हती.

-अनर्थकारी अन्यायाची ती सुरुवात होती.>>> यात दुमत असू शकत नाही.

पुन; एकदा एक सामान्य व्यक्ती म्हणून इथे मी नवपार्थाच्या बाजूने आहे ती अशासाठी की अर्जुनाने फार आधीच शुभद्रोह करून स्वत: जिंकलेली द्रौपदी युधिष्ठिराच्या लालसेपोटी /कुंतीच्या आग्रहापोटी पाचांमध्ये भिक्षा म्हणून वाटून घ्यायला ठाम नकार द्यायला हवा होता. त्या काळातही असा विवाह अन्य झाल्याचे दिसत नाही ( नियोग वेगळे ) तेव्हा ती फारशी प्रचलित लोकरीतीही नव्हती.

-अनर्थकारी अन्यायाची ती सुरुवात होती.

भारतीताई, मला वाटतं आपले दृष्टीकोणच वेगळे आहेत त्यामुळे याबाबत मतभेद आहेत. उदा. आपण याला अनर्थकारी अन्याय म्हटलं तरी स्वतः द्रौपदीने याबाबत कधी तक्रार केल्याचं वाचनात आलं नाही. उलट एक परंपरा (जांभुळाआख्यान?) अस सांगते की तिला कर्ण हा आणखि एक पती हवा होता. समाजातदेखिल ही घटना दुर्मिळ असली तरी गैर गणली गेली नसावी अन्यथा पाचांची पत्नी असुनही द्रौपदी प्रातःस्मरणिय गणली गेली नसती. खर्‍या अर्थाने अन्याय झाला तो अंबिका आणि अंबालिकेवर. कुरुराज्याच्या राण्यांना अतिशय उग्र अशा व्यासाशी मनाविरुद्ध नियोगाला सामोरं जावं लागलं. भीतीने डोळे मिटुन घेणे आणि भयाने पांढरे पडणे या गोष्टी स्वेच्छा दाखवित नाहीत. मात्र त्या स्त्रीयांना एकुणच महाभारतात फारसे महत्त्व नसल्याने त्यांचा अन्याय विचारात घेतला गेला नाही.

द्रौपदीची मात्र गोष्ट वेगळी आहे.

तिला पाचांची पत्नी असल्याचा अभिमान आहे. तिचे पाच पती शूर आहेत त्याचा अभिमान आहे. किचकाला ती सरळसरळ त्यावरुन धमकी देते. तिच्या वेणीसाठी दु:शासनाची छाती फोडली गेली आहे. तिच्या अपमानामुळे दुर्योधनाच्या मांड्या फुटल्यात. तिच्या लालसेमुळे जयद्रथाला जीव गमवावा लागला. तिची इच्छा केली म्हणुन किचक ठार झाला. या सार्‍या गोष्टी पती तिच्या ताब्यात होते, पराक्रमी पांडव तिच्या ताब्यात होते हेच दर्शवतात. अनर्थकारी अन्याय दाखवत नाहीत.

शिवाय तिचे पाच पुरुषांशी लग्न होणे या घटनेने महाभारताला कूठेही कलाटणी मिळालेली दिसत नाही. मला जर आणि तर या भाषेत बोलायचं नाही पण समजा ती फक्त अर्जुनाची पत्नी झाली असती तरी कर्णाचा अपमान झालाच असता, दुर्योधनाकडे पाहुन ती हसलीच असती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाउबन्दकी जी राज्य आणि वारसासाठी होती त्यापाई युद्ध झालेच असते त्यात फरक पडला असता काय?

या पुस्तकातील आणखि काही मुद्द्यांबाबत माझे मतभेद आहेत सवड मिळाल्यास लिहेन.

अतुल..... तुमचा हा प्रतिसाद भारतीताईंच्या वैचारिक बैठकीशी मतभेद दर्शविणारा असला तरी मला खात्री आहे की त्या यातील मुद्द्यांना उत्तर देतीलच. प्रश्न आहे तो Polyandry पद्धतीच्या अस्तित्वाचा (Polyandry = एका स्त्रीने एकापेक्षा अनेक भावांशी विवाह करणे). महाभारताच्या काळात द्रौपदीमुळे ही परंपरा पुढे अस्तित्त्वात येऊन टिकली की नाही हा मुद्दा नाही, कारण मुळात द्रौपदीच्या ह्या कृतीचे समर्थन करण्यापूर्वी हे लक्षात ठेवणे जरूरीचे आहे की ती पाच पांडवांची पत्नी स्वमर्जीने बनली नाही तर सासूने (तिच्या नकळत) तसे वाक्य उच्चारले...नंतर त्या मागे कुठला तरी गतजन्मीचा वर वगैरे पदर त्या कथेला जोडले गेले तो भाग अलाहिदा. Polygamy बराच काळ टिकली... आजही असणार...पण त्या तुलनेत Polyandry फारशी समाजात प्रचलित आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. हिमाचल प्रदेशातील काही दुर्गम भागात "एक पत्नी अनेक पती" ही चालरीत आहेच...पण त्याचे कारण आहे त्या जमिनीचे वाटप नको यासाठीही ठेवण्यात आली आहे. ती किती बरोबर वा किती चूक हा मुद्दा समाजशास्त्रज्ञाच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय होईल.

एक पत्नी पाच पती....हल्लीचा फोटो
Apoly.jpg

सा.न . सर्वाना भारतीताईंसगट
किती अभ्यास करतात लोक्स

पुन्हा सा.न.

____________/\_____________

भारतीताई मी आत्ता लेख अर्धाच वाचलाय, मला अजून दोन-तीन वेळा नीट वाचायला लागेल पण तुमच्या, परिचय करून देण्याच्या लिखाणशैलीला hats off.

अन्जू......

आत्ता तू भारतीसाठी "हॅट्स ऑफ" म्हणत आहेस, पण तिला प्रत्यक्ष ज्यावेळी भेटशील, बोलशील त्यावेळी तर हरवूनच जाशील.... मग त्यावेळी यदाकदाचित शेजारी असलो तरी मी तुझ्या ध्यानात देखील येणार नाही. इतका प्रभाव पडतो भारतीच्या बुद्धीमत्तेचा.

भारती,

लेख आवडला. पुस्तक वाचयची खूप उत्सुक्ता आहे. किती मोठ आहे? (पाने आणि वजन, टपालाने मागवायच्या द्र्ष्टिने)
सान्यान्चे लोकसत्ता मधले सदर आवडायचे. त्यांचे मराठी नविन नविन शब्द (जे काही प्रमाणात मला स्वत:ला क्लिष्ट सुद्धा वाटलेले आहेत) विचारपूर्वक वाचायला आवडायचे. वरील अतुल ठाकुर यान्च मत मला पटतय, की तुलना करताना दोन वेगळ्या काळातील आहे, पण आजच्या कालसुसन्गत प्रश्न हे पडणारच. पुस्तकाचा खरा रोख पुस्तक वाचल्याशिवाय मी अधिक काय बोलणार.
परिचय करुन दिल्या बद्दल धन्यवाद.

फार सुरेख रसग्रहण/परीक्षण भारती ताई! सगळा लेख किमान दोन तीन वेळा मनःपूर्वक वाचणार आहे! त्याशिवाय मला संपूर्ण कळणार नाहीये! मूळ पुस्तकही वाचण्याची इच्छा होते आहे!

लोक्स! हे सर्व वाचून आनंद होतो आहे.
सई, वैभव , अन्जू , जिज्ञासा तुम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात, हे विचार तुम्ही आत्मसात करणं आवश्यक आहे , उद्या तुमचीही नवमते यातून घडोत,आम्हाला वाचायला मिळोत.
अमितव , होय, साने यांची शैली थोडी क्लिष्ट वाटू शकते, कारण त्यांचे आशयद्रव्यच अवघड आहे.थोडी आपण सवय करून घेतली तर तिचा परिचय होतो, वाचण्याची मजा येते.त्यांचे लोकसत्तेतील लेखनही मला आवडते.पुस्तक दीडशे पानी आहे, बुकगंगावर आहे असं ऐकलं.

अतुल,
>>भारतीताई, मला वाटतं आपले दृष्टीकोनच वेगळे आहेत त्यामुळे याबाबत मतभेद आहेत. उदा. आपण याला अनर्थकारी अन्याय म्हटलं तरी स्वतः द्रौपदीने याबाबत कधी तक्रार केल्याचं वाचनात आलं नाही.>> होय, आपल्या मतांमध्ये फरक आहे. तुम्ही एका अभ्यासकाच्या चिकित्सकाच्या भूमिकेतून द्रौपदीकडे पहात आहात. मी एक स्त्री म्हणून तिच्या वेदनेकडे पाहिल्याशिवाय राहू शकत नाही.अशोक यांनी सांगितलेल्या जनरीती अस्तित्वात असतीलही, पण राजघराण्यात त्या रीतीचा प्रयोग एकाच कोवळ्या नववधूवर झाल्याचा उल्लेख आहे. द्रौपदी.तिला अर्जुनाने जिंकलं आहे , तीही अर्जुनावर शेवटच्या श्वासापर्यंत अनुरक्त आहे ( शेवटी ती पडते तेव्हा धर्मराज म्हणतात की तिने अर्जुनावर जास्त प्रेम केले म्हणून ती पडली ) .एक स्त्री म्हणून मला हे जाणवते की सामान्य घर असो वा राजघराणे नववधूला कित्येकदा फार भयाकारी परिस्थितीतून जावे लागते. माहेराने तिची जबाबदारी झटकली असते, सासरी विद्रोह करण्याइतके वय,अनुभव,सामाजिक स्वातंत्र्य , सुरक्षितता तिच्याकडे नसते.. आजही. मग तेव्हा द्रौपदीची मनस्थिती कशी असेल ? सासू आणि थोरल्या दीराने एक विचित्र निर्णय घेतला आहे.तो तिने पाळला यात तेव्हा तरी तिची इच्छा समाविष्ट नव्हती.या अधर्म्य अघटितांसाठी नंतर दिव्यकथा पुरवल्या जातात, लोककथांचीही त्यातच भर पडते.पुरुषाइतकीच स्त्रीही स्खलनशील असू शकते,पण ती मुळात एक दुर्बल घटक आहे हे विसरता येत नाही.
याही प्रक्रियेवर, तसेच अंबा अंबालिका ,भीष्म, पांडू, विदुर याही महत्त्वाच्याच विषयांवर सानेंनी अत्यंत सूक्ष्म तपशीलात लिहिले आहे.
हा लेख गीता तत्वज्ञानावर असल्याने मी ते थोडक्यात दिले आहे.
विषयांतर होतच आहे तर आता मात्र उदाहरणादाखल सानेंचा एक मला अत्यंत आवडलेला मुद्दा त्यांच्याच शब्दात श्लोकरुपात (पृथ्वी वृत्त ) देते -
व्यास हे सत्यवतीचे विवाहपूर्व अपत्य.पण नियोगविधीसाठी त्यांना उघडपणे आमंत्रित केले गेले.
पांडूच्या असमर्थतेमुळे कुंतीने नियोगविधीने तीन पुत्र प्राप्त केले . हे जर सर्व जगजाहीर होते तर कर्णाच्या जन्मरहस्याचीच इतकी गुप्तता कर्णवध होईपर्यंत का ?
स्वत:चि मुनि व्यासही जन्मती विवाहाविना
नियोगविधिला सुयोग्य कुरुवंशिच्या होत ना ?
कशास मग कुंतिला दडविणे पडे कर्ण तो ?
स्वयंवर पणी प्रयत्न करण्या अडे वर्ण तो ?

जन्मरहस्याचीच इतकी गुप्तता कर्णवध होईपर्यंत का ?
स्वत:चि मुनि व्यासही जन्मती विवाहाविना
नियोगविधिला सुयोग्य कुरुवंशिच्या होत ना ?
कशास मग कुंतिला दडविणे पडे कर्ण तो ?
स्वयंवर पणी प्रयत्न करण्या अडे वर्ण तो ?

सत्यवती ही धीवरकन्या होती. कुंती ही राजकन्या. सत्यवतीला पुत्रप्राप्ती झाली ती पराशर ऋषींपासुन. या ऋषींची पण गंमत असते. ते स्वतः अनेकदा स्खलनशील असतात आणि कार्यभाग साधल्यावर त्यांना "साद देती हिमशिखरे" आठवते. त्यात इतरांना संयमाचा उपदेश करताना स्वतः मात्र फट म्हणता शाप देऊन मोकळे इतका राग त्यांच्या नाकावर असतो. शंतनुला मुलिसाठी झुलवणार्‍या आणि तिला होणारे मुल राज्यावर बसेल ही अत्यंत कठीण अट त्याच्याकडुन मान्य करुन घेणार्‍या सत्यवतीच्या बापाने पराशर ऋषींना कसलिही अट घातल्याचं ऐकीवात नाही. त्याला ते शक्यच नव्हतं. तो कदाचित भस्मच झाला असता. हे सांगण्याचा उद्देश हा की जगाला पराशर माहित होते आणि त्यामुळे त्यांचा पुत्र व्यास देखिल माहित असणार. या संबंधामध्ये कसलाही चोरटेपणा नसावा असे मला वाटते.

याऊलट राजकन्या कुंतीने स्त्रीसुलभ इच्छीने एक मंत्र म्हटला आणि सुर्याकडुन पुत्रप्राप्ती झाली. तिचे लग्न झालेले नव्हते. नवर्‍याच्या परवानगीने हा सबंध आलेला नव्हता. यात चोरटेपणाच होता त्यामुळे हे लपवणे भाग पडले. त्यातुन हे मुल सुर्यापासुन झाले असे सांगण्याचाही कसलाच पुरावा कुंती कडे नसावा. तिच्यावर विश्वास कोण ठेवणार? सत्यवती आणि पराशर संबंधांची तिच्या वडीलांना कल्पना होती असे मला वाटते. कुंतीच्या बाबतीत मात्र पुढे पंडुच्या संमतीने झालेली संतती औरस ठरली. मुळातच याबाबतीत धीवरकन्या सत्यवती आणि राजकन्या कुंती हि तुलना बरोबर नाही असे माझे नम्र मत आहे. सत्यवती ही कुरुवंशात आली तेव्हा पराशर प्रकरण होऊन गेले होते. त्यामुळे तिच्या कुरुवंशाशी नंतर आलेल्या संबंधाचा व्यासजन्माशी संबंध जोडणे योग्य नाही.

कृपया मी विरोधासाठी विरोध करतो आहे असे समजु नये.

Pages