नवपार्थहृद्गत : गीतेचा नव-आशयबोध

Submitted by भारती.. on 16 March, 2014 - 09:14

नवपार्थहृद्गत : गीतेचा नव-आशयबोध

दु:खकाळोखात चाचपलेलं,संदेह-आवर्तात झाकोळलेलं गीतेचं बांधकाम. ते प्रज्ञेच्या प्रकाशात पहाताना कसं वाटत असेल ? अन तेही समकालीन समवयीन प्रज्ञेच्या प्रकाशात ?

‘||नवपार्थहृद्गत||- एक आधुनिकतावादी गीताचिंतन’ वाचताना अशी काहीशी भावना मनात दाटली.गीतेवरचे दोन(च) महान भाष्यकार कमीअधिक नजरेखालून गेलेले पूर्ववयात,पण ते वेगळं होतं.श्रीज्ञानदेवांची जीवन-लेखन भूमिकाच ‘’अलौकिका नोहावे लोकांप्रती ‘’ या धारणेचे प्रात्यक्षिक,मग त्यांची गीता-टीकाही भगवद्गीतेच्या गाभाऱ्यातील विशुद्धार्थांची भावार्थदीपिका असणे क्रमप्राप्तच होते,आणि लोकमान्य टिळक तर लोकमान्यच. आधी स्वराज्यासाठी संघर्ष , मग धार्मिक सामाजिक लोकजागरण या तत्वावर आधारलेली त्यांची जीवनदृष्टी . म्हणून त्यांच्या गीता-रहस्यात कर्मवादाचा जागर असला तरी श्रद्धेय मूलतत्वांना प्रश्न विचारण्याची बंडखोरी असण्याचं कारण नव्हतं.

राजीव सानेंनी या पार्श्वभूमीवर स्वत:ला ‘नवपार्थ’ संबोधत व्यक्ती-समष्टी च्या अंतर्बाह्य विश्वाला,म्हणजेच समग्र अस्तित्वालाच, वेढून असलेले प्रश्न या काळातल्या तत्वचर्चेतल्या सख्यभूमिकेतून श्रीकृष्णाला विचारले आहेत, कित्येकदा त्याला खोडून काढले आहे,आपली नाराजी/ मते/आक्षेप स्पष्ट शब्दात नोंदवला आहे इतकेच नव्हे तर या श्रेष्ठ-परम सुहृदाला वैचारिक नवदर्शनस्वरूप पर्यायही सुचवले आहेत.

प्रतिमा प्रकाशन ,पुणे यांनी २००८ मध्ये प्रथम प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा अल्प आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

‘नवपार्थहृद्गत’ चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा आशयकोश लेखकाने स्वरचित वृत्तबद्ध कवितेत, तेही निरनिराळ्या वृत्तांत,अनेकदा नव-वृत्तातही (उदा. वसंततिल्का वृत्त ) व्यक्तवला आहे ! हे पद्यात्मक विवेचन एका विशिष्ट पद्धतीने येते.मूळ गीताश्लोक, त्याला मूळ अर्थाच्या अंगाने येणारे पण नवमतवादी असे अनुसाद, त्याला आक्षेप घेणारे ते प्रतिसाद, त्यावर स्वतंत्रपणे व्यक्त झालेले ते स्वयंसाद अशा तिहेरी बांधणीत .

आधीच गीताटीकेचा व्यामिश्र आशय,त्यात पुन: वृत्तबद्ध कवितेचा आव्हानात्मक आकृतीबंध .या दोन्ही काहीशा क्लिष्ट पातळ्यांवर वाचकाची दमछाक होऊ नये म्हणून पुन: हाच आशय सहज गद्य संवादाच्या स्वरूपात, पद्यासोबतच विवेचनात्मक विस्तार करत मांडण्याचा एक आगळावेगळा प्रयोग साने करतात.

हा नवपार्थ गीतासंहिता, त्यातले श्रीकृष्णाचा देवत्व हा भक्तीमार्गी प्रक्षेप आहे की नाही या स्वरूपाच्या उहापोहापासून दूर आहे.’’ माझी प्रकृती पांडित्यपूर्ण अभ्यासकाची नसून सृजनशील विचारकाची आहे ‘’असे साने म्हणतात. एका अर्थी ते आस्तिकांमधले नास्तिक आणि नास्तिकांमधले आस्तिक असल्याचे जाणवते.

ग्रंथाची मांडणी करताना आपले मनोगत साने प्रास्ताविकाच्या सात छोट्या पण अर्थवाही विभागातून स्पष्ट करतात.

‘’कोण हा नवपार्थ ‘’ या पहिल्याच प्रास्ताविक विभागात गीतेचा सयुक्तितेच्या कसोटीवर एक सुसंगत विचारव्यूह म्हणून पुनर्विचार होण्याची आवश्यकता ते प्रतिपादन करतात.भारतालाच नाही तर वैश्विक आत्म-आक्रोशाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा गीताविचार केवळ श्रद्धाविषय असून भागणार नाही,त्याचे शोधन करावे लागेल,कालौघात त्यात दाटलेले, विसंगत म्हणून आधुनिक बुद्धीवादी नास्तिक मनाला परके वाटणारे खंड छाटावे लागतील तरच गीतेतले अध्यात्म आजही प्रगतीशील, प्रवृत्तीपर आणि विचारस्वातंत्र्य जोपासणाऱ्या आस्तिक-नास्तिक व्यक्ती-समाजांना स्वागत व स्वीकार करण्याजोगे वाटेल अशा दृढ धारणेतून हे लेखन केले आहे.

ही आंतरिक विसंगती शोधण्यासाठी त्यांनी गीतेच्या संहितेत विखुरलेल्या व पुनरुक्त झालेल्या संकल्पना मूळ कथनात्मक क्रम सोडून एकमेकांशेजारी मांडल्या आहेत ज्यामुळे त्यात अंतर्भूत असलेला विरोधाभास स्पष्ट होईल व त्या अनुषंगाने श्रीकृष्णाला प्रतिप्रश्न करता येतील. ही वैशिष्ट्यपूर्ण मांडणी हे या पुस्तकाचे बलस्थान आहे.

दुसरा प्रास्ताविक विभाग ‘प्रश्न, जे उपस्थित करायचे राहूनच गेलेत !!’’ या बोलक्या शीर्षकाचा आहे .प्रश्न अनेक आहेत, प्रश्न पुढेही सातत्याने येत राहातील, पण या विभागात आलेले प्रश्न विशेष मूलगामी असे आहेत.

वानगीदाखल पहिलाच प्रश्न. महाभारतात अनेक घटना, खरे तर दुर्घटनाच, शेवटी युद्धभूमीवर विसर्जित झाल्या.गीतेची सुरुवातच अर्जुन-विषादाने होते. पण आज नवपार्थाला या युद्धप्रसंगाआधीच्या दोषास्पद घटनाक्रमातच काही उदात्त व अपरिहार्य दिसत नाही. ,’’मी वेळीच युधिष्ठिराशी शुभद्रोह ( म्हणजे योग्य कारणासाठी विरोध ) केला असता तर युद्धभूमीवर वेळ टळून गेल्यावर अर्जुन-विषाद व्यक्त करायची वेळच आली नसती .तथाकथित धर्म्यतेचे पटण्यासारखे निकषच नसावेत ? अनिर्णय व उलटसुलट निर्णय यांनीच प्रकरण चिघळून महासंहाराची वेळ आणली नाही काय ?’’ हा नवपार्थाने स्वत:लाच आश्चर्याने केलेला प्रश्न.

'सामाजिक नीतिमत्ता राखण्यास मोक्षोपदेशाचा उपयोग काय?' हा भगवंतांना केलेला दुसरा प्रश्न.
तिसरा, महत्वाचा प्रश्न - 'वर्णसंकराची चिंता परमेश्वरानेच प्रथमत: अर्जुनविषादयोगातच व्यक्त करावी, हा वर्ण हे वंशवादी असल्याचाच पुरावा नाही का ?'
या तिसऱ्या प्रश्नाची चर्चा महाभारताच्या अभ्यासकांनी सामाजिक संदर्भात केली आहे . वर्ण–वंशवाद विषयांचा संदर्भ आल्याने इथे आठवते की इरावती कर्वे यांनी महाभारत काळात ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य असे तीन वर्ण होते असे प्रतिपादन केले आहे. वैश्यांचेच पुढे दोन विभाग होऊन शूद्रवर्ण अस्तित्वात आला ( उत्पादन व विक्रेते वेगवेगळे झाले ) असे या मतामध्ये येते. क्षत्रियांमधलेही खालच्या स्तरावरले लोक शूद्रात गणले जाऊ लागले हे मत आंबेडकरांनी अधिक अधोरेखित केले. या मत-मतांतरातही समाज-अभ्यासकांमध्ये वर्ण हे महाभारत काळाच्या आधीपासूनच वंशवादी आहेत याबद्दल दुमत नाही. सामान्य वाचकालाही वर्ण हे महाभारत काळात तरी वंशवादीच होते हे सतत जाणवते. विदुर, कर्णाचा सूतपुत्र म्हणून उल्लेख व त्यातून त्याचा झालेला अव्हेर, द्रोणाचार्यांच्या क्षात्रकर्मात ( धनुर्विद्या शिकवणे ) त्यांच्या ब्राह्मणत्वाचा कोणालाही न पडलेला विसर यातून उभे रहाणारे समाजचित्र लवचिक उपजीविकावादी पण वर्ण-वंश जाणिवांच्या पकडीत असलेल्या समाजाचेच आहे.

हे झाले सामाजिक वास्तव, साने यांनी 'ते श्रीकृष्णाला स्वीकारार्ह आहे का?' अशा अंगाने विचारले आहे तर हा गीता-ईश्वर एकूणच वर्णसंकर विषयात समाजविरोधी काही न करण्याच्याच पक्षातला आहे हे त्श्रीकृष्णाने अन्यत्रही ( पहिल्या अध्यायाबरोबरच तिसऱ्या अध्यायातही ३.२४ या श्लोकात- ‘उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम | संकरस्य च कर्तास्यामुपहन्यामिमा: प्रजा:’) सांगितले आहेच ! तेव्हा हा प्रश्न ‘ईश्वराने असे समाजाचा अनुनय करणारे तत्त्व का म्हणून स्वीकारावे ?’ या वेगळ्या स्वरूपात यायला हवा होता असे वाटते.

कर्मविपाक,अहंकार,समदृष्टीविवेचन,कामप्रेरणा,फलहेतुकता या सर्व शुद्ध आध्यात्मिक संकल्पनांना या विभागात केलेले इतर मूलगामी प्रश्न पुढे येणारच आहेत.

चौथ्या प्रास्ताविकात ‘’ आधुनिकतावाद ‘ या अत्यंत व्यापक संज्ञेतून आपल्याला नेमके काय अभिप्रेत आहे हे साने स्पष्ट करतात. तसेही व्यासांच्या महाभारताचे शून्याकार अनुभव देणारे घटनाक्रम आजही आधुनिकच वाटतात, त्यातल्या व्यक्तींचा तत्वसंघर्ष कालातीत म्हणून एका अर्थी आधुनिक असला तरी ’’आधुनिक व्यक्तीला गतिमान स्वधर्म आणि गतिमान भूमिकाधर्म या दोहोंचे शोधन करत राहायचे असते ‘’ हे सानेंचे विधान समकालीन गतिमान अस्थिर जीवनाच्या संदर्भात यथार्थ वाटते .
लेखनामागच्या , त्याच्या आकृतिबंधामागच्या प्रेरणा, सूचना, श्रेयनिर्देश यांबद्दल सूक्ष्म विचार मांडणारी अन्य पाच ते सात क्रमांकाची प्रास्ताविके वाचून आपण पुस्तकाच्या मुख्यप्रवाहात शिरतो.

त्याआधी थोडेसे श्रेयनिर्देशाबद्द्ल.कारण केवळ ‘अंतर्दृष्टी आवश्यक असली तरी पर्याप्त नसते’ असे विधान करत सानेंनी येथे इहवाद व अध्यात्म यांची सांगड घालण्यासाठी आपण कोणत्या महत्वाच्या दर्शनांचा अभ्यास केला, कोणत्या विद्वज्जनांचे सहकार्य घेतले याचे या महत्वाच्या प्रास्ताविकात उल्लेख केले आहेत.त्यात बsर्गसन, कांट हुसsर्ल, युर्गेन हाबरमास , रिकर या पाश्चात्य तत्वज्ञांबरोबर श्रीनिवास दीक्षित,मे.पुं.रेगे,आचार्य विनोबाजी,सुहास पटवर्धन , देवदत्त कानिटकर , वि.य.कुलकर्णी, अजय व सुलभा ब्रह्मनाळकर यांचा नामनिर्देश केला आहे.

प्रत्येक प्रास्ताविक व प्रकरणाअंती मराठी/संस्कृत शब्द/संकल्पनांचे ‘समीपार्थी ‘ ( सानेंचा शब्द ) इंग्लिश शब्द आहेत जे फार अभ्यासपूर्वक सिद्ध केले आहेत.

‘श्रद्धा.जिज्ञासा आणि तत्वचर्चेतला खुलेपणा’ हे पहिलेच प्रकरण . श्रद्धास्वातंत्र्य मानण्याचे गीता-ईश्वराचे वेगळेपण , सख्यत्वभूमिका आणि तत्त्वबहुलतेचा स्वीकार यामुळे गीतेचा आशय व्यापक विश्वात्मक झाला आहे. गीतेच्या , गीता-ईश्वराच्या या स्वरूपामुळे आजही भक्त-अभ्यासक-चिकित्सक या सर्वांनाच आजही गीता-ईश्वराशी संवाद साधावासा वाटतो. साने एका सुंदर स्वयंसादातून गीता-ईश्वराला आपली नम्र पण चिकित्सक भूमिका सांगतात –

आक्षेपे मम सीमितज्ञचि अशा व्हावे जरा मंथन
तेजाळून उठो तुझाच महिमा यासाठि हे इंधन
कर्तृत्वा न गमावूनी विकसु दे अभ्यूदयाध्यात्म ते
जोपासो नच मोक्ष केवळ परी चारी पुरूषार्थ ते

पुढील प्रकरणात भारतात आणि महाभारतात धर्मग्लानी का आली आहे , सत्ताधाऱ्यांशी वेळीच शुभद्रोह (सानेंच्या स्वनिर्मित शब्दांपैकी हा एक महत्वाचा शब्द ) न केल्याने, त्याऐवजी सतत यांत्रिक धर्माचरण केल्याने, वेळोवेळी कोसळलेली अनर्थकारी संकट-परंपरा साने एक एक प्रसंग घेऊन , त्यावरच्या अर्थसौंदर्यपूर्ण पद्यरचनांसहित विश्लेषित करतात.

‘मोक्षोपदेश आणि युद्धप्रेरके ‘या प्रकरणात गीतेची मूळ बांधणी -युद्धातल्या स्वत:च्या भूमिकेबद्दलचा नैतिक क्षोभ, त्यातून उद्भवलेला अर्जुनाचा संभ्रम आणि त्यावर इलाज म्हणून भगवंताने त्याच्याशी केलेला युद्धधर्म आणि मोक्षोपदेश यांची सरमिसळ करणारा,आजच्या चिकित्सक वाचकाला अंतर्गत विसंगतीने युक्त वाटू शकणारा युक्तिवाद- चर्चिली आहे. भगवंताच्या युक्तीवादावर साने मार्मिक दीर्घ भाष्य करतात. अनेक संकल्पनांना प्रश्न विचारतात, निरनिराळ्या अध्यायातले त्यांचे क्रम मोडून त्या संकल्पना एकमेकांशेजारी आपल्या प्रयोगशाळेत ठेवतात.त्यांचे खंडन करतात. उदाहरणार्थ -
‘’तू फक्त निमित्तमात्र हो’’ यातले निमित्त होणे ही कृती कशी काय असू शकते ?
या युद्धात जर धर्माधर्मनिर्णयच होते तर ते महायोध्यांच्या द्वंद्वस्वरूपातच का खेळले गेले नाही ? सामान्य सैनिकांची जीवितहानी का ?
‘वासांसि जीर्णानि’ चा नियम युवा अभिमन्यूच्या शरीराला कसा लागेल ?
असे अनेक प्रश्न. त्यांची सानेंनी केलेली पद्यरूपे मार्मिक आहेत.

चौथे प्रकरण मोक्षकेंद्रीपणातून येणाऱ्या न्यायबुद्धीच्या अभावावर लक्ष केंद्रित करते. कर्मविपाक खरा मानला तरी तो न्याय्य कसा असेल ? सानेंचा स्वयंसाद ( वृत्त शार्दूलविक्रीडित)-
न्यायाची अट ही किमान कळणे आरोप ‘आरोपि’ला
अर्हत्वार्जन कोणत्या कृतीमुळे जी लाभ दे आजला
ज्याच्याबद्दल पारितोषिक मिळे वा प्राप्त हो दंडही
तेची ना कळता जीवास ‘शिकणे’ कैसे बने शक्यही ?

-हे वाचताना मर्ढेकर नाही आठवले तरच नवल..
‘’न्यायाच्या निज मंदिरात बसुनी साक्षीपुराव्याविना
किंवा काय गुन्हा असेल घडला सांगीतल्यावाचुन
न्यायाधीश असेल मानव तरी शिक्षा सुनावीत ना
देवाची परि न्यायरीति असले पाळील का बंधन !’’

येथे ईश्वराला अजून एका शब्दात सानेंनी पकडले आहे,जो शब्द माझ्यासकट समस्त स्त्रीजातीला कित्येकदा खटकला असेल ! ‘’ स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा: तेsपि यांति परां गतिं ‘’ (गीता ९.३२ ) यातील ‘’ पापयोनय: ‘’ म्हणजे पापयोनीत जन्मलेल्यांच्या (? म्हणजे आणखी कोण ?) बरोबरीने या स्त्री/शूद्र/वैश्य जातींचा श्रीकृष्णाने वैषम्यपूर्ण उल्लेख केला आहे . ( इथे सानेही ‘’विशेष म्हणजे स्त्री उच्चवर्णीय असली तरी स्त्री म्हणून तिला निम्नवर्णीय ठरवतोस !’’ असे मुद्दा स्पष्ट करण्यासाठी म्हणतात ते दुखतेच, असाही मुद्दा अस्तित्वात असावा हे अन्यायकारकच ! )

इतर अनेक अन्यायकारक संकल्पनांचा आधुनिक जाणिवेतून शोध घेताना सानेंना स्त्रियांबाबतची ही दुय्यमता दहाव्या अध्यायातील विभूतीयोगातही दिसते- बाकी सर्वोत्तमांची विशेषनामे ( जसे कपिल, राम, चित्ररथ, ‘’पांडवांत धनंजय ‘’ वगैरे ) पण स्त्रीमधील सर्वोत्तम सांगताना मात्र एखाद्या परमगुणशाली स्त्रीचा स्पष्ट नामोल्लेख न करता अमूर्त गुणांचा उल्लेख ! जणू काही स्त्रीलिंगी गुणच (‘’ वाणी, श्री ,कीर्ती, क्षमा,’’ वगैरे) सर्वोत्तम असू शकतात,हाडामासाची स्त्री सर्वोत्तम असूच शकत नाही असे म्हटल्यासारखेच हे आहे. साने हे प्रतिसादरुपात मांडतात-
जसे की वाणि ,श्री,कीर्ति ,क्षमा,मेधा,धृती,स्मृती
एकाही थोर नारीची का न व्हावी तुला स्मृती ?’’
तामसी भोजन (१७-१०) हे कोणी आवडीने खाते की ते दारिद्र्यातून लादले जाते ? या आणि अशा अनेक सूक्ष्म निरीक्षणांमुळे हे प्रकरण महत्वाचे झाले आहे.
शेवटी , ‘’मोक्षकेंद्री विचारात सामाजिक प्रक्रियांबाबतच्या विचाराचा ढळढळीत अभाव दिसून येतो’’ या निष्कर्षाप्रत साने येतात तेव्हा आपणही त्यांच्याशी सहमत असतो.

यापुढचे प्रकरण कर्मफलत्याग म्हणजे नेमके काय या कळीच्या विषयावर आहे. ‘योग: कर्मसु कौशलं ‘, ‘कर्मण्येवाधिकारस्ते ‘ वगैरे अगदी आपल्या नेणिवेपर्यंत पोचलेल्या धर्मविचारातून अनेक प्रश्न उद्भवतात. एक वर्तनशैली स्वीकारली जाते.तिची चिकित्सा आधुनिक परिप्रेक्ष्यातून या प्रकरणात केली गेली आहे, ती दीर्घ , अर्थपूर्ण , व्यामिश्र आहे. तिच्यातले काही ठळक मुद्दे फक्त –
-‘यज्ञेतर कर्मे मानवाला बंधनकारक आहेत’ ( ३.९) या विधानानंतर लगेच श्रीकृष्णांनी ‘यज्ञाने उत्कर्ष पावा, कामना पुरवून घ्या ‘ असे विरोधाभासी फलहेतुक (गीता ३.१० श्लोकातच ) विधान केले आहे .(याची चर्चा करताना साने यज्ञ हे उत्पादन व पर्यावरण रक्षण यांचे प्रतीक आहे असा सकारात्म अर्थ लावून पुढे जातात.यज्ञाची विविध स्थूलसूक्ष्म रूपे श्रीकृष्णांनीही वर्णिली आहेत तरीही प्रत्यक्षात यज्ञसंस्थेत शिरलेला कर्मकांडी दांभिकपणा वेळोवेळी समाजाच्या अध:पतनालाही कारणीभूत झाला आहे हेही कुठेतरी प्रश्नस्वरूपात यायला हवे होते असे वाटते.)
-फलत्यागातले त्यागफल- फलत्याग करण्यातून एक त्यागफल– ‘मोक्ष‘ हे अपेक्षिले गेले आहेच .मोक्षालाही फलत्व आहेच.म्हणजे सात्विक फलत्यागात सूक्ष्म आणि सर्वाधिक फलदायी फलाकांक्षा आहे !
-हाच विचार पुढे नेताना मग सरळसरळ फल इच्छिणारा कर्ता राजसी व म्हणून अनिवार्यपणे हिंसक हे गृहितक (१८.२७) एकांगी नाही काय ?
- समाजऋणाची जाणीव ठेवून फलस्वामित्व हे सर्वसमावेशक असावे असा एक चांगला पर्याय या विचार मंथनाअंती साने सुचवतात.

पुढील प्रकरणांमध्ये अनेक संज्ञा खोलात चर्चिल्या गेल्या आहेत त्यातील ‘समदृष्टी ‘ हा गीतेत वारंवार येणारा व आकलनास पचनी न पडणारा एक विचार.
‘सर्वभूतहित ‘ म्हणजे काय ? तर्काने ते शक्य आहे का ?
सानेंचा प्रतिसाद -
मृग धावे अकांताने , गाठाया व्याघ्रही तसा
उभयांचेहि कल्याण येथे चिंतू तरी कसा ?
थोडक्यात विवेक केव्हा व समदृष्टी केव्हा याचे निकष स्पष्ट न करता गीतेत समदृष्टीचे जे वारंवार एकांगी चित्रण आले आहे ते सानेंनी नेमक्या शब्दात परीक्षिले आहे.

तसेच इंद्रियदमनाबद्दल .काम हा नरकाकडे नेणाऱ्या तीन दारांपैकी पहिला (१६.२१),तो फक्त प्रजोत्पत्तीपुरताच क्षम्य ( गीता १०.२८- ‘प्रजनाश्चास्मि कंदर्प’’)
यावरचा सानेंचा प्रतिसाद (मंदाक्रांता)
‘’ऊर्मींना ज्या रिपुच गणुनी मानिसी पूर्ण दम्य
त्याही होती उचित समयी जीवकार्यी सुरम्य ‘’
शिवाय एकदा काम सर्वग्रासी आहे हे मान्य केले की त्याला शह देणारे काय शिल्लक रहाते ? दमन करावे तरी कसे ? शिवाय, दमनातून पोसला जाणारा अहंकार अधिक मोक्षनाशक नाही का ?
कामाच्या दमना पुरेल इतुकी शक्ती कुठूनी मला
त्यासाठी उपलब्ध एकच दिसे माझी अहंता मला !
एकूणच निरनिराळी इंद्रिये व त्यांचे काम्य विषय यात सरसकट निवृत्तीचा उपदेश करताना श्रीकृष्णांनी गीतेत अध्याय २ श्लोक ६७ मध्ये जी शीड व वारा यांची प्रतिमा वापरली आहे- ( ‘’तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवांभसि ‘’) - तीच वापरून साने ‘कुशल नाविक जसा कधी शिडे फुलवून तर कधी मिटवून अनुकूल प्रतिकूल काळात नौकानयन करतो तसे इंद्रियदमनाचे असावे ‘ असे सुचवतात .
‘मिटवू’ हाच एकांगी अर्थ का देसी संयमा
रसप्रज्ञत्व वाढावे पाळुनी नीतिनीयमा ..
यावर दुमत असायचं कारण नाही, फक्त आधुनिकतेच्या संदर्भात आज नीतिनियमांवर व कायद्यांवरही पडलेले नवे ताण, नवे वाद इथे आठवत रहातात इतकेच.

गुणत्रय व दैवासुरसंपद्विभाग या गीतेतल्या महत्वाच्या , परस्परसंबंधी सिद्धांतस्थिती. सात्विक, राजस आणि तामस या तीन गुणांच्या सर्व अध्यायात विखुरलेल्या वैशिष्ट्यांचा एक प्रदीर्घ तौलनिक तक्ताच(महत्वाच्या १७ निकषांवर - व्याख्या, लक्षण,फल,चलन आदि ) अकराव्या प्रकरणात देऊन सानेंनी एक मोठेच काम सोपे केले आहे. त्यातून उभ्या रहाणाऱ्या स्पष्ट अशा चित्रावरून त्यांनी आपली मते नोंदवली आहेत.
-गीतेतील व्याख्या पाहता ( गीता १४.८- मोह,अज्ञान,प्रमाद,आलस्य,निद्रा ) तामसी हा दंडनीयपेक्षा दयनीय वाटणारा गुणविभाग आहे. त्यातही निद्रासुख हे नेणीवेतून आत्मानंद देणारे, ते सर्वस्वी तामसी कसे ? तामसी आहाराबद्द्ल मागे आलेच आहे.तो अभावग्रस्तांवर लादला गेलेला आहे.तो पापमय कसा ?
-राजसी गुण हे आसुरी संपत्तीच्या लक्षणांजवळ जातात हे अनेक श्लोकांवरून अन्वयी वा व्यतिरेकी तर्काने सिद्ध होते. फार तर राजसी + तामसी = आसुरी या समीकरणातून नाकर्त्या तामसी श्रेणीबरोबरच कर्त्यासवरत्या , सामाजिक अभिसरणासाठी, प्रगतीशीलतेसाठी आवश्यक असलेल्या धडाडीच्या सकारात्म राजसी प्रवृत्तीवर अन्याय झाला आहे.
-सात्विकी= ब्राह्मणी=दैवी या गुणसमुच्चयाच्या उदात्तीकरणात फक्त मोक्षपुरुषार्थाचा विचार आहे,मानुषी आचारसंहितेचा नाही .
हे त्यांचे निष्कर्ष पौर्वात्य अध्यात्मातून पोसल्या गेलेया एका बाजूला तामसी अकर्तेपण व दुसऱ्या बाजूला सात्विकी अकर्तेपण या दुहेरी पलायनवादावर योग्य आक्षेप घेणारे आहेत.

यानंतर शेवटच्या टप्प्यावर सामाजिक/ नैतिक क्षेत्र थोडे बाजूला ठेवून क्षर-अक्षर पुरुष, क्षेत्र–क्षेत्रज्ञ (शरीर- प्रकृति आणि पुरुष ) या आध्यात्मिक संकल्पनांचा चिकित्सक आढावा घेत क्षर आणि अक्षर (जीवात्मा आणि परमात्मा ) यात झोत-स्रोत संबंध आहे अशा एका आत्मिक अनुभूतीपर्यंत साने येतात. गीतेत तेराव्या अध्यायात वर्णिलेले क्षेत्र (शरीर )केवळ जडाने बनलेले नसून त्यात मन ,इंद्रिये, अहंकार, बुद्धी ,इच्छा, द्वेष,सुखदु:खे,संघात, चेतना, धृति अशा बऱ्याच गोष्टी येतात. या क्षेत्रात राहून विशुद्धात्मा विकारी होतो . पण या दोन्हींच्या द्वंद्वात्मक संबंधामुळे जन्म/पुनर्जन्म घडवणारी कर्मे घडतात .
पुरुष: प्रकृतिस्थो हि
भुड्:क्ते प्रकृतीजान् गुणान्
कारणं गुणसड्.गोsस्य
सदसद्योनिजन्मसु (गीता १३.२१)
या प्रक्रियेला साने क्षर आणि अक्षर (जीवात्मा आणि परमात्मा ) यांचा झोत-स्रोत संबंध म्हणतात . गवाक्षातून येणारा प्रकाशझोत गवाक्षसापेक्ष असतो, तसा गवाक्षाच्या काचेच्या रंगानुसार गुणान्वित झालेला तो जीवात्मा, पण सूर्य, जो सर्वच जगाला उजळतो तो मूळ प्रकाशस्रोत, चित्स्रोत आहे तो परमात्मा.हीच ‘’योगमाया समावृतता’’ असे ते नोंदवतात. म्हणून ‘द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ‘ या श्लोकावरचा त्यांचा अनुसाद असा येतो -
आत्मे दोन्हीही या लोकी
क्षर आणिक अक्षर
क्षर होत ते जीवात्मे
त्यांचा चित्स्रोत अक्षर..

शेवटी पंधराव्या अध्यायांतीच्या ‘पुरुषोत्तमा’ची व्याख्या करणाऱ्या खालील श्लोकावर भाष्य करताना ते एक कळकळीची विनंती ईश्वराला करतात – या आत्मस्वरूपातून तू कर्तेपणाला वगळू नकोस, अकर्तेपणाचे महत्व इतके वाढवू नकोस की ते तुझ्याच मुळावर येईल ,कारण मी स्वत:ला अंशत: स्वनियंता,आणि तुला जगन्नियंता मानतो !
यस्मात्क्षरमतीतोsहं
अक्षरादापि चोत्तम:
अतोsस्मि लोकेच वेदेच
प्रथित: पुरुषोत्तम: (गीता १५.१८ )

आता गीतार्थाची शेवटची खडतर चढण. ईश्वराने गीतेत स्वत;च्याच स्वरूपाबद्दल, भूमिकेबद्दल परस्परविरोधी विधाने केली आहेत ज्यातून गोंधळ व गूढत्व वाढले आहे.
जसे की ‘ जे जे म्हणून आहे ते मीच हे महात्मे जाणतात’ -’वासुदेवं सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ‘ (७.१९)
असे असताना , ‘अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन:’ – ‘मी अमर्त्य, मर्त्य,मीच सत आणि असत’ ( ९.१९) हे एकीकडे , आणि ,‘नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:’(२.१६)- ‘असत भाव म्हणून विद्यमान होऊ शकत नाही, सत अभाव म्हणून विद्यमान होऊ शकत नाही !’’ (२.१६)
तर ही सर्व विधाने साने त्यांना आकळलेल्या ,गूढाचे निराकरण करणाऱ्या ‘ईश्वराचे प्रारूप’ या तेराव्या प्रकरणात स्पष्ट करतात.

येथे एक वाचक म्हणून हे जाणवते की साने चिद्विलासवादी अद्वैताचे आधुनिक परिभाषा तयार करून समर्थन करत आहेत.हे प्रारूप थोडक्यात असे आहे- ईश्वराची काही मुख्य स्वरूपे आहेत जी या परस्परविरोधी विधानांमधून आळीपाळीने प्रकट होतात. त्यात गूढता नसून नियमबद्धता आहे.

तृप्तसर्वात्मेश्वर अर्थात स्वसंवेद्य नित्यतृप्त शुद्ध सच्चिदानंद अक्षर-पुरुष किंवा तृप्तेश.हाच मोक्ष पुरुषार्थ .

निसर्गेश्वर ऋतेश -जडजगतात ( अपरा प्रकृती ) प्रकटलेला .(‘पुण्योगंध पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ’ गीता ७.९ –‘ पवित्र मृदगंधहि मीच आहे,अग्नीतले तेजहि मीच आहे’ – सानेंचा अनुसाद व इतर अशा अर्थाचे अनेक श्लोक, त्यांचे अनुसाद ) याच्या आराधनेत सामावलेला उद्योगपुरुषार्थ ‘अर्थ’ आहे .
माया असे ज्या ईश्वरीय निर्मितीला म्हटले जाते ती लीला करणारा सलील सच्चिदानंद – निर्मातेश्वर लीलेश. (काम पुरुषार्थ )

शुभेश- या निर्मातेश्वराच्या अनिर्बंधतेवर अंकुश ठेवणारा नियंतेश्वर. न्याय –धर्मपुरुषार्थ.

जीवेश- जीवात्मेश्वर जो जीवात प्रकटतो –संवाद पुरुषार्थ – अंतर्गत आराधना ( सानेंचा नवविचार ).

वैश्विक शक्तीच्या या रूपांचे प्रकटन मानवी जीवनाच्या स्तरावरही ‘सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो ‘ –‘मी सर्वांच्या हृदयात राहून त्यांना स्मृती ( विवेकाचे भान ) देतो ‘ अशा तऱ्हेने होते.हा ईश्वरीय साक्षात्कार म्हणजे सुहृदाच्या भूमिकेतून केलेला ईश्वराने आपल्या जीवनात केलेला कल्याणप्रद हस्तक्षेप आहे या सुंदर विवेकविचारापर्यंत साने अनेक श्लोकांचे परीक्षण करत येतात.

जेव्हा उत्तर लख्ख होत उमटे तुम्हा जिवांच्या मनी
जेव्हा येई स्वतंत्रता ‘स्व’ नियमुनी कर्तव्यनिष्ठेतुनी
जीवा भासत ‘मी मलाच आपुला’ अंतस्थ या मेलनी
तेव्हा जाण ‘शुभेश’ उत्तमरुपी स्पर्शीत हो जीवनी ..( अनुसाद वृत्त शार्दू.)

शेवटी , साने केवळ मोक्षपुरुषार्थाची भलामण करण्याआधी व्यक्तीला अन समाजाला-राष्ट्रालाही कृतीप्रज्ञ बनणे आवश्यक आहे म्हणून ‘सत्वगामी राजस’ किंवा ‘दैविगामी मानुष’ या कोटीची आवश्यकता प्रतिपादन करतात.

एका महान धर्मग्रंथावर केलेले हे आधुनिक चिंतन.अनेक सूक्ष्म पातळ्यांवरील अर्थांतरे अभ्यासणारे. याचा थोडक्यात परामर्ष घ्यायचा झाला तरी हा एवढा विस्तार झाला.याशिवाय अनेक संकीर्ण व महत्वाचेही मुद्दे आहेत जे विस्तारभयास्तव घेतले नाहीत.

नित्याराधनेतील या ग्रंथाला झापडे उघडून नव्या विचारांच्या प्रकाशात, ताज्या चर्चेच्या झुळुकीचा आनंद घेत अनुभवणे आवश्यक होते, राजीव सानेंनी हे साध्य केले आहे.

- भारती बिर्जे डिग्गीकर

-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>हे पुस्तक लवकरच मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध होईल >>

आभार चिनूक्स !

अतुल, मी आता येथे सानेंनाच निमंत्रित करू इच्छिते Happy आणि अशासाठी थांबते की हा वाद चालूच राहील आणि गीता या माझ्या प्रिय विषयाकडून चर्चेचा ओघ महाभारतकथेच्या महासागरात लुप्त होईल.

एक आठवलं, असं वाचलं होतं की स्वत: व्यासांना महाभारतकथा लिहून आत्मिक शीण आला होता तेव्हा नारदांनी त्यांना श्रीकृष्णाचं चरित्र- श्रीमद्-भागवत लिहायला सांगितलं . महाभारत हे काय नाही ?एक महाकाव्य, एक बृहद् कथा, एक पुरातत्व शोध.. या सर्वांतून आज आपल्या हातात लखलखीत रत्नासारखी भगवद्गीता शिल्लक आहे, तो शुद्ध तत्त्वज्ञान-आत्मज्ञानाचा कालातीत कथानकातीत विषय आहे .. या सर्व वादांच्या चिखलात हे कमळ फुललं आहे असं मी म्हटलं तर माझ्या कवीपणाला माफ करा !

भारतीताई,

हा धागा तुमचा आहे. माझ्यामुळे तुम्ही थांबण्याची आवश्यकता नाही. मी मात्र आता थांबतो. कवीच्या प्रतिभेपासुन मी अनेक योजने लांब आहे. कवीतेशी आमचा संबंध आस्वादापुरताच आहे. त्यातील वृत्त, शास्त्र कळत नाही इतका अडाणीपणा माझ्यात आहे. कवीची प्रतिभा पाहुन मला फक्त थक्कच व्हायला होतं.

हा धागा चिकीत्सेपेक्षाही आस्वाद या भुमिकेतुन काढला असावा असे वाटते. मी ज्या तर्‍हेने माझे म्हणणे मांडत आहे त्यामुळे मुळ काव्याचा आस्वाद बाजुला राहुन येथे कुरुक्षेत्र निर्माण होईल ही भीती अगदीच निराधार नाही. त्यामुळे मी या धाग्यावर आता वाचनमात्रच असेन. माझ्यामुळे या धाग्याचा मुड बिघडला असल्यास क्षमस्व.

श्री. राजीव साने यांचे म्हणणे जाणुन घ्यायची उत्सुकता मात्र आहे.

अतुल....

तुमच्या वरील प्रतिसादातील भावनेला भारतीताई स्वतंत्र उत्तर देतीलच, तरीही मायबोलीमाध्यमातून मी जितके त्याना ओळखतो त्याच्या आधारे अगदी ठामपणे (त्यांच्याचवतीने) म्हणू शकतो की त्या "धाग्याचा मूड बिघडत चालला आहे..." असे कधीच म्हणणार नाहीत. शेवटी त्यांच्या लिखाणावर जी चर्चा चालली आहे ती केवळ अभ्यासपूर्ण आहे असे नव्हे तर ती सकस आहे. भारतीताईंची भीती साधार आहेच....म्हणजे गीतेपासून फटकून आपण महाभारतातील काही वादग्रस्त ठरू शकतील अशा विषयाकडे जात आहोत...पण म्हणून तुमच्यासारख्या समाजशास्त्र अभ्यासकाच्या मतप्रदर्शनाचे त्या नेहमीच स्वागत करतील हा विश्वास जरूर मनी ठेवा.

अशा बौद्धिक चर्चांची....मतभेद अपेक्षूनही....सध्या फार गरज आहे.

अगदी अगदी मामा. चर्चा कशी असावी, व्हावी याचे हे उदाहरण म्हणुन घेता येईल. संयत भाषा, मुद्देसूद मांडणी, चर्चेत सहभागींविषयी योग्य तो आदर या बाबी मुद्दाम वाचण्यासारख्या आहेत. भारतीताई आणि अतुल, या लेखानिमित्ताने अशा चर्चेचाही मोठा आनंद दिला आहेत तुम्ही.

लेख वाचला. पण पुर्णपणे कळला असं म्हणता येणार नाही. परत परत वाचून बघेन Happy

भारतीची इतके कठिण विषयांचे शिवधनुष्य पेलायची ताकद वादातीत आहे Happy

आभार अश्विनी  गीता हा विषय फार महान लोकांचाच असं मला वाटत नाही. तो प्रत्येकाचा, प्रत्येकाच्या आत्मसंघर्षाचा आहे. म्हणून हे धारिष्ट्य केलं.
अशोक,सई, नेहमीप्रमाणेच मला समजून घेतलंत !
अतुल,कुठेही जाऊ नका ! तुमच्या अभ्यासपूर्ण आवाक्याचं आणि प्रतिसादातील कळकळीचं मला फार कौतुक आहे.मला इतकंच म्हणायचं होतं की महाभारताच्या भरात गीतेकडे दुर्लक्ष्य होऊ नये.
हा लेख फक्त आस्वादासाठी लिहिलेला नाही, त्यात गीतेच्या सानेंनी केलेल्या अर्थान्वयनाच्या रसग्रहणाबरोबरच त्यावरचे माझे काही आक्षेपही मी नोंदले आहेत .. पण गीताचर्चेत महाभारतावरून तलवारी उपसल्या जाणं क्रमप्राप्त ( हे विनोदानेच ) तेव्हा मी परत त्या मुद्द्यावर येते.
द्रौपदीवरचा माझा काहीसा feminist प्रतिवाद मी काल दिला होता.
आता कर्णजन्मरहस्याबद्दल .सत्यवतीचं मूल – महर्षी व्यास - विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलं होतं.
यावर ‘’ जगाला पराशर माहित होते आणि त्यामुळे त्यांचा पुत्र व्यास देखिल माहीत असणार. या संबंधामध्ये कसलाही चोरटेपणा नसावा असे मला वाटते.’’ असं तुम्ही म्हणता. पण स्वत: सत्यवतीने वंशवृद्धीसाठी नियोगाला भीष्माने नकार दिल्यावरच व्यासांना पाचारले तेव्हा हा भूतकाळ शक्यतो लपवण्याचीच तिची इच्छा दिसते. काही गोष्टी सर्वश्रुत असूनही उघडपणे चर्चिल्या जात नाहीत .
आता, कुंतीलाही हाच न्याय लावला जाऊ शकत नाही का ? कुंतीला अभिचार मंत्राने पुत्रप्राप्ती करून घेता येते , तिची तीनही मुले पांडूपासून झालेली नाहीत, मंत्रप्रयोगातून झालेली आहेत, इतकेच नव्हे तर सवत माद्री हिलाही तिने त्या मंत्राचा लाभ करून दोन पुत्रांचे मातृपद बहाल केले आहे हे सर्वश्रुत आहे. शिवाय अभिचारमंत्र ही प्रत्यक्ष विवाहयबाह्य संबंधापेक्षा कदाचित वेगळी व अद्भुताचे अधिष्ठान असल्याने अधिक जनसंमत प्रक्रिया आहे. तेव्हा कुंतीने जर त्याच मंत्राने कर्ण जन्मला , तो सूर्यपुत्र आहे हे अगदी शेवटी सांगण्याऐवजी एवढ्या दीर्घ आयुष्यप्रवासात आधीच सांगितले असते तर तिला सर्वांची सहानुभूती मिळाली असती. सत्यवतीपेक्षाही. कर्णाची कवचकुंडले , परम वीरत्व या अद्भुताचा सज्जड पुरावा होता..पण हे रहस्य कुंतीने आधी कधीही जगजाहीर न करता कर्णालाच युद्धाच्या आधी गाठून सांगितले.त्याचा तेजोभंग झाला ! दुसरा घोर अन्याय , नकळत जन्मदात्या आईकडूनच झालेला.कर्णाने मात्र त्या दु:खातही तेजस्वीपणे ‘’ मी आणि अर्जुन यापैकी एक धरून तुझी पाच मुले शिल्लक रहातील ‘’ असे उदार वचन तिला दिले.शिवाय त्याच्या मृत्यूनंतर हा रहस्यभेद तिनेच केला ! क्षत्रियाला योग्य असे कर्णाचे अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून ! काय साध्य झालं ?

‘’ कशास मग कुंतिला दडविणे पडे कर्ण तो ?’’ या पार्श्वभूमीवर सानेंचा तो श्लोक मला पटतो...

भारतीताई, आज लेख वाचून पूर्ण केला. चार भागात वाचला पण अजूनही पूर्ण कळला नाही. पण तुम्ही जो काही अभ्यासपुर्ण परिचय करून दिलात वेगवेगळ्या उदाहरणासहित, त्याबद्दल तुम्हाला ____/\____.

अजून काही वेळा मला वाचायला लागेल. शशांकजी, तुम्ही अशा विषयावर किती सुंदर भाष्य करता पण माझी आकलन-शक्ती कमी आहे, त्यामुळे एकदा वाचून नाही कळत मला.

Pages