सामाजिक उपक्रम - वर्ष २०१४ - पूर्वतयारी (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 29 January, 2014 - 14:31

नमस्कार,
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सामाजिक उपक्रमाचे हे पहिले आवाहन.

गेल्या काही वर्षात आपण काही संस्थांना वस्तुरुपात मदत केली. त्या सर्वच संस्था शाळांशी निगडीत असल्याने त्यांना दरवर्षी मदतीची जरूर असतेच. त्यानुसार यावर्षी देखील जितकी मदत करता येईल ती करणार आहोतच पण त्याचबरोबर आपल्यापैकी कोणाची एखाद्या नवीन गरजु संस्थेची ओळख झाली असेल तर त्याबद्दलची माहिती मागवत आहोत.

ज्या संस्थेला वस्तुरुपात मदत हवी असेल त्याबद्दल खालीलपैकी शक्य तितकी माहिती द्यावी.

१. संस्थेचे नाव. (संस्था नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती.
२. वेबसाइट असेल तर त्याचा दुवा
३. संस्थेला सरकारी वा बाहेरुन अतिशय कमी मदत मिळत असावी. आपण अशाच संस्था निवडतो.
४. संस्थेला सध्या ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे त्याची यादी व प्रमाण. तसेच त्या वस्तू विकत घेण्यासाठी किती पैसे लागू शकतील ते लिहावे.
५. आयकरात सूट मिळू शकत असेल तर तेही लिहा. पण बहुतेकवेळा ती सूट संस्थेला पैशाची मदत केली तरच मिळू शकते, वस्तुरुपात केली तर नाही.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील

२०१० मधे हा उपक्रम सुरु करण्यात आला. केलेल्या कामाची माहिती खाली देत आहे.

वर्ष २०१०

देणगीदारांची संख्या – १३
एकुण जमा देणगी - रुपये ५३,३८८/-
१. संस्था - पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळा
अंधशाळेच्या मुलींना अत्यावश्यक अशा गोष्टी काही महिन्यासाठी (रक्कम रुपये ९६००) व रोख (१०,०००/-+७०९४ )
२. सुमती बालवनाला २६६९४ / - मुलांसाठी १० चटया आणि निवासी मुलांना लागणार्‍या कपाटांसाठी दिली.

वर्ष २०११

देणगीदारांची संख्या – १७
एकुण जमा देणगी - रुपये ५६,८१०/-.
संस्था - पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळा
१. संस्था - पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळा
अंधशाळेला ज्या वस्तु देण्यात आल्या त्यांची किंमत >> रुपये ३६,०००/-
वस्तु अंधशाळेला पोचवण्यासाठी आलेला खर्च >> रुपये ८१०/-.

२. सावली ट्रस्टला दिलेली रक्कम >> रुपये २०,०००/- ज्यातुन ४ मुलांच्या वर्षाच्या शिक्षणाचा व इतर काही निघु शकला.

वर्ष २०१२

एकूण देणगीची रक्कम रुपये ५०,५१५.२६ एवढी जमली.
देणगीदार - अंदाजे १५.
त्यापैकी ३५००० रुपये पुणे, कोथरुड येथील अंधशाळेला वस्तूरुपाने मदत दिली.
महिलादिन २०१२ गरजू संस्थेला मदत उपक्रमात जमा झालेल्या निधीतून १४,००० रुपयांच्या सोलापूर येथून खरेदी केलेल्या १०० सिंगल कॉटन प्रिंटेड बेडशीट्सची मदत सटाणा, जि. नाशिक येथील निवासी अपंग कल्याण केंद्राच्या वसतिगृहातील मुलांना करण्यात आली. तसेच ह्या संस्थेच्या वाचनालयाला १९ पुस्तके भेटीदाखल दिली.

वर्ष २०१३

देणगीदारांची संख्या - २०
एकुण जमा देणगी - १,३८,२६९.१० रुपये

संस्था - शबरी सेवा समिती
तीन वजनकाटे - रुपये २५५०/-
आदिवासी भागात चालविल्या जाणार्‍या १२ मराठी माध्यमाच्या शिशुशाळांसाठी शैक्षणिक साहित्य - रुपये २६.९६२/-
पुस्तके - रुपये १,३९६/-

संस्था - भगीरथ ग्राम विकास
२७ सौरदिव्यांचे वाटप - रुपये ४०,५००/-
संस्थेच्या शाळेतील मुलांसाठी चालविल्या जाणार्‍या वाचनालयासाठी व मोठ्यांसाठीच्या वाचनालयासाठी २६ पुस्तके - रुपये ५,७०७/-

संस्था - पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळा
सीकॉन कंपनीचा सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर (डिस्पोझल युनिट) - रुपये ३८,३००/-

एकुणे वस्तुरुपात दिलेल्या देणगीची रक्काम - १,१५,४१५ रुपये

उरलेली रक्कम अंधशाळेच्या मुलींना नियमीत लागणार्‍या हायजीन वस्तुंकरता ठेवलेली आहे. आतापर्यंत ह्याचा विनियोग होऊ शकला नाही ह्याचे कारण गेली ३ वर्षे आपण जो स्टॉक दिला तो बराच जास्त झाला व तो अजुनही संपलेला नाही. अंधशाळेच्या मुख्याध्यापिकांनी स्टोक जेव्हा संपत येइल तेव्हा ताबडतोप कळवु असे सांगितले आहे. अंदाज आहे की ह्या मे-जुनमधे त्यांना नविन स्टॉक लागेल तेव्हा ही रक्कम वापरु).

ह्याशिवाय मैत्री, सावली, सटाणा ह्या संस्थांना देखील देणग्या मिळाल्या.

तर आजपर्यंत आपण ज्या संस्थांपर्यंत पोचु शकलो त्यांची पुन्हा एकदा यादी,

शबरी सेवा समिती
भगिरथ ग्रामविकास
कोथरुड अंधशाळा
मैत्री
सटाणा येथील अपंग मुलांसाठी चालवण्यात येणारी संस्था (सटाणा निवासी अपंग कल्याण केंद्र)
सावली सेवा ट्रस्ट

ह्यावर्षी पण सर्व संस्थांना संपर्क करुन त्यांना मुलांसाठी कशाची गरज आहे विचारुन घेतले जाईल व मिळालेल्या देणगीतुन जितकी गरज भागवता येइल तितकी भागवली जाईल.

विशेष सुचना -
सावली संस्थेतर्फे ज्या मुलामुलींच्या शिक्षणाची व इतर गोष्टींची देखील काळजी घेतली जाते त्यातल्या काही मुलांच्या शिक्षणाचा खर्च बर्‍याच मायबोलीकरांनी उचलला आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष. ह्या वर्षीच्या देणग्या देखील ह्याच उपक्रमाद्वारे मागवल्या जातील. जुनमधे मुलांच्या शाळांच्या फिया भराव्या लागतील.

वर आवाहन केल्यानुसार ह्याशिवाय अजुन काही गरजु संस्थेची तुम्हांस माहिती असेल तर अवश्य कळवा.

अधिकाधीक संस्थांपर्यंत पोचायचे धाडस केवळ मायबोलीकर देणगीदारांमुळेच करत आहोत. हा उपक्रम संस्था व देणगीदार ह्यांच्यातले केवळ माध्यम आहे.

देणग्या, महिला दिन ८ मार्च पासुन मागवण्यास सुरु करत आहोत.

ह्यावर्षी उपक्रमात सहभागी होत असलेली नावे,
अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी.

अजुन ज्यांची इच्छा आहे त्यांनी जरूर सहभागी व्हावे.

धन्यवाद

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अकु.

मला या कामात मदत करायला आवडेल. काय काय करता येईल खरंच माहित नाही पण जितका वेळ काढता येईल तितका काढुन नक्की सहभागी होईन.

मैत्रीकडून आलेले निवेदन

‘मैत्री’ – ‘100 दिवसांची शाळा, मेळघाट’ उपक्रम
1997 पासून मेळघाटामध्ये ‘मैत्री’ ने काम सुरु केले ते ‘कुपोषण आणि बालमृत्यू’ या समस्यांवर. आरोग्यासेवा उपलब्ध करुन देणे हा तातडीने करायचा उपचार आपण केलाच. मात्र या समस्यांना मुळापासून उखडून टाकण्यासाठी आरोग्याबरोबरच शिक्षण, शेती, रोजगार, संघटन अशा सर्व पातळ्यांवर कामाची गरज आहे हे लवकरच लक्षात आले. स्थानिक लोकांना सक्षम बनवणे हा या मागचा कळीचा मुद्दा. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने ‘मैत्री’ ने काम सुरु केले. मेळघाटातील चिलाटी या दुर्गम ठिकाणी ‘मैत्री’ चे तीन कार्यकर्ते निवासी स्वरूपात काम करु लागले. आजूबाजूच्या गावांशी संपर्क वाढवणे, आदिवासी लोकांसाठी असलेल्या योजनांची लोकांना माहिती देणे, रोजगार हमीची कामे सुरु करण्याबाबत पाठपुरावा करणे असे अनेक उपक्रम चालू झाले.
याबरोबरच पावसाळ्याचे तीन-चार महिने चालणारी ‘धडक मोहीम’ ही तर ‘मैत्री’ ची खास ओळख झाली. दुर्गम भागामध्ये पावसाळ्यात स्वयंसेवकांच्या तुकड्या पाठवून तत्काळ आरोग्यसेवा पुरवणे व बालमृत्यू रोखणे हे या मोहिमेचे वैशिष्ट्य. 1997 पासून मेळघाटाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ‘मैत्री’ धडक मोहीम राबवते. 2/3 वर्षे एका भागात स्वयंसेवकांच्या मदतीने काम करणे, आरोग्यमैत्रिणी तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे व त्यांच्याकडे मुलांच्या, गरोदर महिलांच्या आरोग्याची जबाबदारी सोपवण्याइतक्या त्या तयार झाल्या की दुस-या भागात ‘धडक मोहीम’ घेणे असे स्वरूप ठेवल्यामुळे आज 75 हून अधिक गावांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
2011 पासून मेळघाटात ‘मैत्री’ ने शिक्षण या मूलभूत गोष्टीवर भरीव, दीर्घकालीन परिणाम करणारे, टिकाऊ व स्वयंनियंत्रित काम करण्याचे ठरवले. पहिल्या वर्षी ने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य 40 मुलांसाठी 100 दिवसांची निवासी शाळा चालवली. शाळा संपल्यानंतर त्या सगळ्यांना आश्रमशाळेत दाखल करुन खंडित झालेला त्यांचा शिक्षणप्रवाह पुन्हा सुरु केला. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 2012 मध्ये 3 गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर आपण 100 दिवस काम केले व सुमारे 70 मुलांपर्यंत आपण पोहोचलो. दोन्ही वर्षांचे हे उपक्रम स्वयंसेवकांच्या मदतीनेच पार पडले. त्यामुळे ‘धडक मोहीमे’ प्रमाणेच ‘100 दिवसांची शाळा’ हा पण मेळघाटातील ‘मैत्री’ चा चेहरा बनला.
तीन गावांमध्ये उपक्रम संपताना पालकांच्या बैठकी घेतल्या, तेव्हा सर्व पालकांनी सांगितले की, “वर्षभर आमच्या मुलांना असे काही मार्गदर्शन मिळाले तर जास्त उपयोग होईल. आमच्या गावात शाळा नीट चालतील. गावाच्या शाळेचे शिक्षक कित्येक दिवस, महिने गैरहजर असतात त्यामुळे मुलांचे नुकसान होते. त्याकरता तुम्ही काहीतरी करा”. पालकांकडून आलेल्या या मागणीमुळे नक्कीच हुरुप वाढला आणि यावर्षी म्हणजे 2013 जून पासून स्वयंसेवक व स्थानिक तरुण यांच्या एकत्रित सहभागातून आपण वर्षभर शाळेला ‘पूरक वर्ग’ असा उपक्रम सुरु केला. त्याची थोडक्यात रूपरेषा अशी आहे.
• 11 गावांमधून 10 वी, 12 वी किंवा पदवीधर तरुण ‘गावमित्र’ म्हणून निवडले.
• दररोज शाळेच्या आधी एक ते दोन तास गावमित्रांनी मुलांना शाळेत जमा करुन मराठी व गणित यामधील मूलभूत कौशल्ये त्यांनी शिकवायची. येथील स्थानिक भाषा आहे कोरकू व शाळेचे माध्यम आहे मराठी त्यामुळे भाषा शिकवण्यावर विशेष भर द्यावा लागतो.
• दर महिन्याला चिलाटीमध्ये एक शिबिर/ कार्यशाळा असते. यावेळी स्वयंसेवकांचा गट तेथे जातो. सर्व गावमित्र पण मुक्कामी येतात. स्वयंसेवक त्यांना पुढच्या महिन्यात काय शिकवायचे याचे प्रशिक्षण देतात. तसेच गावागावांमध्ये जाऊन स्वयंसेवक स्वत: शिकवतात.
• चिलाटीमध्ये रमेश व अशोक हे आपले स्थानिक कार्यकर्ते स्वयंसेवक नसताना गावांना भेटी देणे, गावमित्रांना मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे इ कामे व एकूणच स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम करतात.
• स्वयंसेवक वर्षभरात एकूण 100 दिवस मेळघाटात शिकवण्याच्या कामी मदत करतात म्हणून उपक्रमाचे नाव आपण ‘100 दिवसांची शाळा’ असेच ठेवले आहे.

गावमित्रांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम केल्याचे अनेक फायदे जाणवतात ते असे.
• मुख्य म्हणजे वर्षभर मुलांना मार्गदर्शन मिळते.
• गावमित्रांना सतत प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच शिकवण्याचे कौशल्य पण वाढते.
• कोरकू भाषिक गावमित्राबरोबर शाळेत येणारी लहान मुले पटकन संवाद साधू शकतात.
• सातत्याने राखल्याने मुलांना कसा फायदा होते हे पालकांना समोरच दिसते आणि यातूनच त्यांच्याकडून शिक्षकावर काही प्रमाणात दबाव यऊन त्याच्या उपस्थितीमध्ये वाढ होते.

त्यामुळे पुढील वर्षी आपण याच पद्धतीने आताची गावे व नवीन 2/3 गावे या उपक्रमामध्ये घेणार आहोत. नवीन गावांमध्ये ‘गावमैत्रिणी’ शोधण्यावर आपला भर असेल कारण घरातील आई शिक्षणाच्या प्रवाहात आली तर तिच्यामार्फत इतर अनेक चांगल्या गोष्टी आपण घरोघर पोहोचण्याचा प्रयत्न करु शकतो जसे दैनंदिन स्वच्छता व आरोग्याच्या सवयी, परसबाग लागवड, पोषक आहार इत्यादी. पुढील वर्षी काही नवीन कार्यक्रम या उपक्रमामध्ये करण्याचे आपण ठरवले आहे. त्याचा थोडक्यात तपशील याप्रमाणे -
 ’एक गाव – एक वाचनपेटी’ – प्रत्येक गावामध्ये एक वाचन पेटी तयार करणे ज्याचा उपयोग लहान मोठी मुले, तरुण मुलेमुली तसेच मोठी मंडळी पण करु शकतील. यातून वाचन संस्कृती तयार होऊ शकेल व त्याचा शिकण्याकरता नक्की फायदा होईल. याकरता पुढील साहित्य लागेल.
o स्टीलची पेटी – पुस्तके ठेवण्याकरता (परतवाडा, अमरावती भागात अशा पेट्या बनवण्याचा व्यवसाय चालतो. साधारण रु. 1600 ते 1800 मध्ये ब-यापैकी मोठ्या आकाराची पेटी मिळू शकते.
o पुस्तके –
 अगदी लहान मुलांसाठी मोठी चित्रे असलेली
 वाचायला शिकू लागलेल्यांकरता मोठ्या अक्षरांमधील लहान लहान गो असणारी मराठी पुस्तके
 मोठ्या मुलांना आवडतील अशी पुस्तके
 तरुण मुले व मोठ्या माणसांना वाचता येतील अशी पुस्तके
 ‘फिरती विज्ञान पेटी’ – विज्ञान प्रयोगांचे काही मूलभूत साहित्य असलेली पेटी चिलाटीमध्ये असेल. स्वयंसेवक वेगवेगळ्या गावांमध्ये हे साहित्य नेऊन मुलांना प्रयोग करुन दाखवतील, करायला देतील. यातून विज्ञानातील संकल्पनांची तोंडओळख मुलांना होईल आणि त्यातूनच जिज्ञासा वाढेल. याकरता पुढील साहित्य लागेल.
o स्टीलची पेटी – विज्ञान साहित्य ठेवण्याकरता
o विज्ञान प्रयोग साहित्य
 परीक्षानळ्या, चंचूपात्र, स्पिरीट दिवा, लिटमस पेपर, भिंग, आरसा, प्रिझम, काही रसायने, चुंबक इ. – साधारण 20 मुलांना पुरेल असे.
 आपले शरीर कसे काम करते हे दाखवण्याकरता काही नमुने (उदा. दातांची रचना, पोटाची रचना, फुफ्फुस इ.)
 आर्किमिडीज स्क्रू, सोपे पंप, हवेचा दाब वा तत्सम काही प्रयोगांचे सामान
o मायक्रोस्कोप
 ‘बालकदिन’ – या वर्षी आपण 11 गावातील मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धा गावांमध्ये घेतल्या. नंतर चिलाटीत एकत्रित स्पर्धा घेतल्या. सुमारे 100 मुले यावेळी चिलाटीत राहिली. असा बालकदिन पुढील वर्षी पण आपण घेणार आहोत. याकरता पुढील साहित्य लागेल.
o क्रीडासाहित्य
o बक्षिसे देण्याकरता वस्तू
o मुलांसाठी पोषक खाऊ
 ‘अभिव्यक्ती शिबिरे’ – वर्षातून दोन वेळा 10 दिवसांचे शिबिर स्वयंसेवकांच्या मदतीने आपण घेणार आहोत. यामध्ये स्वत:ला व्यक्त करण्याची संधी देणा-या व सर्जनशील प्रवृत्तीला उत्तेजन देणा-या गोष्टी जसे विविध हस्तकौशल्ये, नृत्य, नाट्य, गायन, वादन इ. चा समावेश आपण करणार आहोत. याकरता पुढील साहित्य लागेल.
o चित्रकला, रंगकामाचे साहित्य – रंग, ब्रश, खडू, चित्रांची पुस्तके इ.
o विविध प्रकारचे कागद – कार्डशीट, ओरीगामी कागद, पुट्ठे, रंगीत स्टीकर पेपर, जिलेटीन पेपर इ.
o मातीकाम, कातरकाम, ठसेकाम इ. साहित्य
o मुलांना त्यांचे साहित्य ठेवण्याकरता फाईल, पिशवी
 ‘आमचीच भाषा, आमचीच पुस्तके’ – ’मराठी आणि कोरकू’ अशा दोन भाषेत मजकूर असलेले आणि प्राथमिक शाळेतील मुलांना सहज समजेल असे चित्रांनी नटलेले पुस्तक उपलब्ध झाले तर? आजपर्यंत तरी असे पुस्तक मेळघाटात नाही. मान्यवर शिक्षण तज्ज्ञ ‘वर्षा सहस्त्रबुद्धे’ यांच्या मार्गदर्शनाखाली मूलगामी प्रकाशनाने टाटा ट्रस्ट च्या मदतीने नंदूरबार जिल्ह्यातील भिलोरी व पावरी भाषिक मुलांसाठी अशी पुस्तके तयार केली. तोच धागा धरून वर्षाताईंच्याच मार्गदर्शनाखाली मूलगामी प्रकाशनाकडूनच मेळघाटातील कोरकू मुलांसाठी पण त्यांच्या भाषेमध्ये पुस्तके आणण्याचे “मैत्री” ने ठरवले आहे. वर्षाताई, माधुरी पुरंदरे, मूलगामी प्रकाशन याकरता विनामोबदला काम करणार आहेत. मात्र पुस्तक छ्पाई व वितरणाकरता खर्च येणार आहे. यासाठीचे एक निवेदन सोबत जोडले आहे. याकरता आपण काही मदत करु शकलात तर नक्कीच उपयोग होईल.

 ‘मैत्री’ च्या कार्याचे स्वरूप हे साधारण असे आहे. आपल्याला शक्य असेल त्या मार्गाने आपण यात जरूर सहभागी व्हा, तसेच वस्तू रूपाने अथवा पैसे देऊन हातभार लावा.

 एकूण मैत्रीविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी http://maitripune.net पहा.

 ‘मैत्री’ ही नोंदणीकृत संस्था आहे व तिला दिलेल्या देणगीकरता भारतीय आयकर नियमांनुसार 80G अंतर्गत आयकरात सवलत मिळते. वस्तूरुपाने दिलेल्या देणगीची किंमत सांगितल्यास तशी पावती ‘मैत्री’ कडून मिळू शकेल.

संस्थेची माहिती देण्याबद्दल उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व. संस्थेकडून गरजू वस्तूंची माहिती येणे बाकी असल्याने आधी माहिती टाकली नाही.

संस्थेचे नावः राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्था
पत्ता:12152, Kanchanshree, Shirole Road, Opp. Fergusson College, Shivajinagar, Pune-411001. Tel:25531881
चालवत असलेले उपक्रमः सुमती-बालवन शाळा, पाखरमाया अनाथाश्रम
संस्थेबद्दल माहिती: २००१ साली संस्थेची स्थापना झाली. संस्थेतर्फे कात्रजच्या पुढे असलेल्या गुजर-निंबाळकरवाडी ह्या गावात आर्थिक दृष्ट्या हालाखीची परिस्थिती असलेल्या मुला-मुलींकरता सुमती बालवन ही शाळा चालवली जाते. तसेच गरजू आणि अनाथ मुलांकरता पाखरमाया हे अनाथाश्रम चालवले जाते. शाळेत सध्या साधारण १५० विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यातील साधारण १५% मुलं ही वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच, लघूउद्योगाचे शिक्षण देऊन लवकर स्वावलंबी बनविण्याकडे शाळेचा कल आहे. अनाथाश्रम आणि वसतिगृहातील मुलांचा राहण्याचा, शाळेचा खर्च, सकस आहार, वैद्यकीय मदत हे सर्व संस्थेमार्फत केले जाते.
रेजिस्टेशन नंबरः Maharashtra/846/2001/Pune, dated July 26, 2001.
निकडीच्या वस्तू:
1.Handmade paper A4 size--200
2.Chart papers-100
3.Crape papers-50
4.Glitter pens-all colours
5.Pattern scissors-5
6.Scissors-5
7.Quilling instruments
8.Quilling papers.
9.Ruled papers-5 rims.
10.A4 size computer papers
11.Drawing papers-100
12.Painting brushes.
13.Wall mounted cupboards-2

धन्यवाद मो. ही माहिती सामाजिक उपक्रम आवाहन बाफावर टाकते आहे. तू अगोदर ह्या संस्थेबद्दल बोलली होतीस.

Pages