कोकणात आहे मी

Submitted by वैवकु रीटर्न्स on 12 March, 2014 - 09:38

पापण्यांमधे लपल्या श्रावणात आहे मी
आजही तुझ्या घरच्या अंगणात आहे मी

मी मना तुला कुठले कर्ज मिळवुनी देवू
ह्या भिकार श्वासांच्या तारणात आहे मी

आरश्या तुला माझी साक्ष द्यायची आहे
की तिच्याच हातांच्या कंकणात आहे मी

मी पुन्हा पुन्हा त्याचा शोध घेत का जातो
शोध घेत जाण्याच्या कारणात आहे मी

गुटगुटीत दैवाला पाहुनी मला कळले
ते अश्यामुळे आहे ..शोषणात आहे मी

जन्म तो बरा गेला चर्मकार होतो मी
आज हा कशासाठी ब्राम्हणात आहे मी

केव्हढी जुनी व्याधी , पाय ..पण बरा केला !
त्या कुडाळशास्त्र्यांच्या ह्या ऋणात आहे मी

काल मी कुठे होतो मी उद्या कुठे आहे
आज जात आहे जो त्या क्षणात आहे मी

फोनवर तुला येते गाज सागराची जी
कोकणात आहे मी !! ...कोकणात आहे मी !!

तू मला शिकवलेला खेळ खेळती सारे
कोणत्या प्रशालेच्या प्रांगणात आहे मी ?

मी अता स्वतःमधल्या मीपणात नाही रे
विठ्ठला तुझ्यामधल्या तूपणात आहे मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी ..एकही प्रतिसाद नाही म्हणून म्हटलं बघूयातरी काय लोच्या आहे ते
असो
झाले बघून पण काही कळले नाही
असो

मी मना तुला कुठले कर्ज मिळवुनी देवू
ह्या भिकार श्वासांच्या तारणात आहे मी

काल मी कुठे होतो मी उद्या कुठे आहे
आज जात आहे जो त्या क्षणात आहे मी<<< व्वा वा

फोनवर तुला येते गाज सागराची जी
कोकणात आहे मी !! ...कोकणात आहे मी !!<<< छान