अजून चालतोची वाट !

Submitted by किंकर on 7 March, 2013 - 21:38

आजही प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि ,झाशीची राणी ते मलाला युसुफझाई ,माया त्यागी ते ज्योतीसिंग पांडे अजूनही वाट बिकटच आहे.

८ मार्च १९०८ रोजी मतदान ह्क्कासाठीचे न्यू यॉर्क मधील महिलांचे आंदोलन असो किंवा दोन दिवसांपूर्वीचे तरन तारण येथील एका पिडीत महिलेचे एकाकी आंदोलन असो,जगण्याच्या प्राथमिक हक्काची लढाई स्त्रीला अजूनही लढावीच लागत आहे.आणि हाच आपला सर्वात मोठा पराभव आहे.

'तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई'....
अशी प्रार्थना माय भवानीस करताना आपण स्त्रीला परिपूर्ण आदिमायेच्या स्वरुपात पाहतो ते खरे कि,
झेंडू बाम ते शीला कि जवानी या आयटेम सॉंग मधून पाहताना आपण जे हीन होतो ते खरे....
या प्रश्नांच्या गर्तेतून मला बाहेर पडायचे आहे.

'बंदिनी स्त्री हि बंदिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मो जन्मीची कहाणी ...
बंदिनी स्त्री हि बंदिनी'
या ऐवजी ...
'सत्यता शोधण्या घेउनी लेखणी
जाहली दामिनी मूर्त सौदामिनी
दामिनी ...दामिनी'
या रुपात मला स्त्री कडे पहायचे आहे.

'मेरा भारत महान' यातील स्वाभिमान लोप पावून जर हे ब्रीदवाक्य उपहासात्मक विशेषण बनणार असेल
तर त्याच्या वेदना नक्कीच त्रासदायक ठरतील.आज चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून चेहरा विद्रूप करणाऱ्याना या दुष्कृत्यात भारताचा क्रमांक चौथा आहे याची जाणीव पण नसेल, पण या बातमीने भारतीय म्हणून ताठ मानेने समोर पाहतांना होणाऱ्या वेदना, तितक्याच गंभीर आहेत.जितक्या त्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे स्त्रीस भोगाव्या लागतात.

हल्ल्यातून वाचल्यावर समोर असलेले जगणे मरणप्राय आहे म्हणून दया मृत्यु मागणारी सोनाली मुखर्जी काय ,किंवा लष्कराचे अनिर्बंध अधिकार कमी करा म्हणून गेली तेरा वर्षे अन्न नाकारणारी इरोम शर्मिला काय ,येथे यात लढणारी स्त्री कोणता लढा देत आहे,त्यातील त्यांचे यश अपयश काय ? यापेक्षा खरोखरच आम्हाला जगण्याचा काय अधिकार उरतो ? ...हा प्रश्न अंतर्मुख होत आपल्याच मनाला विचारावा लागेल, याची जाणीव देणारी वेदना मन क्रूद्द करत आहे.

त्यामुळे आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने ......

शेतावर राबणारी कष्टकरी ते कार्यालयातील सहचरी यापैकी मला कोठेही भेटणाऱ्या स्त्रीचा संधी असून देखील मी गैरफायदा घेणार नाही.किंवा तिला अगतिक वाटेल असे वर्तन चुकून हि मी करणार नाही अशी प्रतिज्ञा जेंव्हा प्रत्येकजण स्वतःशी करेल तोच खरा जागतिक महिला दिवस असेल.

..........आणि असा आंतरिक बदल जेव्हा घडेल,तेंव्हा महिलांचा आदर करण्यासाठी,असा एखादा दिवस साजरा करण्याची गरजच उरणार नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंकर, खूप छान! विचारपूर्वक लिहिलेला लेख !! विचार करायला लावणारा लेख!!!
<<<<<.........आणि असा आंतरिक बदल जेव्हा घडेल,तेंव्हा महिलांचा आदर करण्यासाठी,असा एखादा दिवस साजरा करण्याची गरजच उरणार नाही>>>> अगदि पटलं !

किंकर, खूप छान! विचारपूर्वक लिहिलेला लेख !! विचार करायला लावणारा लेख!!!
<<<<<.........आणि असा आंतरिक बदल जेव्हा घडेल,तेंव्हा महिलांचा आदर करण्यासाठी,असा एखादा दिवस साजरा करण्याची गरजच उरणार नाही>>>> >>>>>>>>>>>>>+१०००००००००००००००००००००००००००