अभिप्राय, रसग्रहण आणि समीक्षण म्हणजे काय?

Submitted by अभय आर्वीकर on 8 March, 2014 - 23:42

एक जिज्ञासा :

अभिप्राय, रसग्रहण आणि समीक्षण

यामध्ये नेमका फ़रक काय असतो? या तिन्ही प्रकारातील सिमारेषा मला नीट लक्षात येत नाही आहे.

चर्चा अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री.गंगाधर मुटे यांच्यासारख्या मर्मज्ञ अभ्यासू व्यक्तीचे धागे नेहमीच उत्सुकता जागृत करणारे असतात. वरील धागा हा जरी शंकासमाधानाच्या हेतूसाठी असला तरी तो वाचकांच्या दृष्टीने बराचसा उपयुक्त आहे. सीमारेषांचा उल्लेख असला तरीही तिन्ही नामांचा एकमेकाशी या ना त्या निमित्ताने संबंध आहे....तिन्हींची व्याख्या जवळपास एकाच घरातील सदस्यांप्रमाणे एकत्र येऊ शकते :

१. अभिप्राय = इंग्रजीमध्ये आपण A comment....View....Opinion....Meaning....Sense अशा अर्थानी "साधेपणाने" या नामाकडे पाहू शकतो.... उदा. "आज भाकरीबरोबर हिरव्या चटणीचा खर्डा झकास लागत होता..." हा एका गृहिणीच्या पाककला कौशल्याबाबतचा खाणार्‍याने दिलेला "अभिप्राय"....इथे टीका अभिप्रेत नाही.... केवळ एक कॉमेन्ट आहे....जिचे अस्तित्व क्षणिकही राहू शकेल.

२. रसग्रहण = Appreciation, Judgement, Rise of Value = या नामाला व्यापक अर्थ असू शकतो....किंबहुना तसे अपेक्षितच असते. इथे बहुधा कौतुकाचा वर्षाव असतो. उदा. लता मंगेशकरांच्या गाण्यांचा इतिहास, सचिन तेंडुलकराचे क्रिकेट जीवन, कुसुमाग्रजांचे साहित्यक्षेत्रातील स्थान.....अशी काही नावे की जी घेता क्षणीच आपल्या नजरेसमोर त्यांच्या भव्य कारकिर्दीचा हिरवागार गालिचा पसरतो आणि किंबहुना काहीवेळा असेही भासते...यांच्या कर्तृत्वाच्या रंगपटाचे रसग्रहण करण्याबाबत आपल्यावरच मर्यादा पडतात....कारण यांच्या नावाकडे आपण आदरानेच पाहतो आणि मग यथाशक्ती रसग्रहण करायला लागतो.....हा प्रकारही शक्यतो टीकेच्या प्रांगणात येत नाही.

३. समीक्षण = Criticism, Review = हे नाम मात्र रोखठोक आणि मनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता एखाद्या घटनेविषयी, गोष्टीविषयी, कलाकृतीविषयी केलेले थेट भाष्य होय. साहित्यक्षेत्रात या नामाला अनन्यसाधारण महत्व आहे असे दिसते. सर्वश्री नरहर कुरुंदकर, रा.भा.पाटणकर, प्रभाकर पाध्ये, द. भि. कुलकर्णी आदी काही दर्जेदार नावे घेतली म्हणजे त्यानी साहित्याविषयी केलेले लिखाण हे बर्‍याच अंशी "समीक्षण" या सदरात येते. या दिग्गजांच्या लिखाणातील टीका एखाद्या कथा, कविता वा कादंबरीवरील नसून त्या अनुषंगाने साहित्याच्या जडणघडणीवरील ते अभ्यासपूर्ण भाष्य असते. कै. कुरुंदकरांनी रणजित देसाई यांच्या "श्रीमान योगी" ला लिहिलेली अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना हा समीक्षण लिखाणाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आजही गणला जातो. "समीक्षण" लिहिण्यास पात्र होण्यासाठी फार मोठी अभ्यासाची मिळकत असावी लागते संबंधित लेखकाकडे.

~ थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिप्राय व्यक्त केला जातो तो प्रदर्शन ,चित्रपट पाहिल्यावर ;लेख ,कविता ,प्रवासवर्णन इ वाचल्यावर .यात पसंती ,नापसंती,शुभेच्छा आणि स्वत:चे अनुभवही लिहिले जातात .

कवितेचे बहुधा रसग्रहण केले जाते .मला यात काय समजले अथवा यातून कवीने काय भावना सूचीत केल्या आहेत वगैरे .उदा : बालकविंच्या औदूंबर कवितेत "पाय पसरूनी जळात बसला असला औदूंबर ।" असला म्हणजे कसला आणि पाय पसरून ?
फुलाचे विच्छेदन न करता मधुरस घ्यायचा .

समिक्षा चित्रपट ,अग्रलेख इतयादित काय चांगले वाईट आहे ते किती लोकांना आवडेल वगैरे लिहितात .त्याप्रकारच्या इतर कूतींशी तुलना असते .

परीक्षण करताना अमुक एक गोष्ट अभिप्रेत आहे अथवा त्यासाठी केलेला प्रयत्न कितपत साध्य झाला आहे ते पाहायचे .विडंबन ,विनेदी लेखन कसे झाले आहे .चित्रपटाने करमणूक केली का ?चित्रफित डॉक्युमेंटरी ने हेतू साध्य झाला का ?एवढेच नाहीतर फोनसचे पण परीक्षण करतो .खरोखर या किंमतीला हा घ्यावा का वगैरे .

अमेय....

"परीक्षण" (परिक्षण नव्हे).... = To do examination of a certain thing or kind of testing या अर्थाने ह्या नामाकडे पाहा. इंजिनिअरिंग क्षेत्रात अमुक एका इन्स्ट्रुमेन्ट्सचे 'टेस्टिंग' केले जाते त्या पद्धतीला ते करणारी व्यक्ती "परीक्षण केले आणि मंजूर वा नामंजूर केले" असा शेरा देते.

येस, 'परीक्षण' मध्ये काही मोजता येण्यासारख्या निकषांचा आधार असावा असेच वाटत होते.

(परिक्षण नव्हे...) याचा अर्थ कळला नाही मामा.

अमेय....

मी पाहिले आहे....बर्‍याच ठिकाणी, अनेकदा नकळतसुद्धा.... परीक्षण हा शब्द "परिक्षण" असा लिहिला जातो. या निमित्ताने का होईना अचूक लिखाण काय आहे तेही वाचकांना समजावे त्यासाठी तसा उल्लेख केला होता.

रसग्रहण याचा एकाच ओळीत अर्थ सांगितला गेला , तो अधिक विस्ताराने लिहिण्याची गरज आहे . गद्य उतार्‍याचे
रसग्रहण करण्याची फारशी गरज नसते, पण कवीला एखादी कविता कोणत्या वेळी , कोणत्या घटनेमुळे सुचली, त्या वेळी कवीच्या मनात कसे कसे भाव उमटले असतील आणि त्या भावनांनी प्रेरित होवून कवीता / काव्य / शेर / चारोळी काहीही कसे तयार झाले असेल , त्याची वाचकाला सहज समजेल अशा शब्दात मांडणी करणे म्हणजे रसग्रहण करणे होय. थोडक्यात कवीता स्फुरतांना , कवीला जसा आनंद प्राप्त झाला असेल , त्या आनंदाची अनुभूती वाचकाला शब्दांनी प्राप्त करून देणे म्हणजे रसग्रहण करणे होय. वाचकाला ,कवीच्या भुमिकेत शिरण्यासाठी प्रव्रुत्त करणे , हे चांगल्या रसग्रहणाचे द्योतक आहे , असे माझे मत आहे.