प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - किंकर

Submitted by किंकर on 2 March, 2014 - 10:17

प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - या सदरात मी आज म्हणजे अपेक्षित कालावधी २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी संपल्या नंतर लिहित आहे . त्यामुळे तुम्हा सर्वांना कोणत्या म्हणीची प्रचीती आली सांगा बरे ? नाही ना आठवले , सांगतो ती म्हण म्हणजे 'वराती मागून घोडे'
पण इथे लिहावे वाटले त्याला आणखी एक कारण म्हणजे या धाग्याने बऱ्याच जणांना आजी/आजोबा यांच्या पिढीची आठवण तर झालीच, पण आपल्या मातृ भाषेतील समृद्ध दालनाची कवाडे हलकीशी उघडून त्यातील खजिन्याची झलक पण दिसली .
आता कदाचित तुम्ही यापूर्वी ऐकलेली एक गोष्ट प्रथम तुम्हाला परत एकदा सांगतो. गोष्ट आहे माकड आणि टोपीवाला यांची. हि गोष्ट गेल्या अनेक पिढ्या आपण ऐकत आलो आहोत. जश्या आपल्या पिढ्या बदलल्या तश्या टोपीवाल्याच्या पिढ्या पण बदलल्या. एक दिवस त्या टोपीवाल्या नातवाची व्यवसायात पडण्याची वेळ झाली. आपल्या टोप्या घेवून आता जे काही थोडेफार अरण्य राहिले होते, ते पार करून शहरातील मोठ्या बाजार पेठेत जाण्याची त्याची वेळ पण जवळ आली. मग त्याच्या आजोबांनी त्याला जवळ बसवून आपले, आपल्यानंतर त्याच्या वडिलांना आलेले अनुभव लक्षात घेवून चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या.
तसेच प्रत्यक्ष अरण्य पार करताना होणारी दमणूक, वाटेतील विश्रांती, झाडाखाली लागणारी झोप,त्या मोठ्या झाडावरची माकडे यांची आठवण ठेवून काळजी घेण्यास सांगितले. नातवाने सर्व सल्ले ऐकताना मी काय लहान आहे का ? असे आजोबांकडे पाहत आपले फेसबुक , ट्विटर वरील जे काय थोडेफार स्टेटस टिकून होते ते अपडेट केले आणि तो प्रवासाला निघाला.
त्या बिचाऱ्या नातवाला आजोबांनी अनेक गोष्टी म्हणी सांगितल्या होत्या पण 'इतिहासाची पुनरावृत्ती होते' हे सांगायचे राहूनच गेले होते. त्यामुळे प्रवासात नातू नेमका त्याच झाडाखाली आला,दमला आणि तिथेच झोपला,मग काय आताची माकडे पण तितकीच चपळ त्यांनी पण पेटीतील सर्व टोप्या पळवल्या.
जेंव्हा टोपीवाला नातू जागा झाला तेंव्हा पहिले तर काय पेटी रिकामी. मग त्याने वर झाडाकडे पहिले तर काय त्याच्या पेटीतील सर्व टोप्या घालून माकडे मजेत खेळत होती.
मग नातवाने प्रथम काठी उगारली तर काय माकडांनी छोट्या फांद्या उगारल्या, नातवाने दगड मारला तर माकडांनी फळे मारली लगेच नातवाला आजोबांनी सांगितलेली 'शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ' हि म्हण आठवली त्याने एकमेव डोक्यावर असलेली टोपी माकडांच्याकडे भिरकावली. आणि इथे जे घडले ते अकल्पित होते. झाडावरील माकडांनी आपापल्या टोप्या टाकल्या नाहीतच पण टोपीवाल्याची एकमेव टोपी पण पळवली. आणि एक माकड त्याला म्हणाले, " तुला काय वाटले आजोबा फक्त काय तुलाच आहेत ? "
यातून थोडक्यात घ्यायचा बोध काय तर ,'पुढच्यास ठेच मागचा शाहणा' आणि आजोबा प्रत्येकाला असतात. आणि त्या प्रमाणे मी आता माझी आजी आणि म्हणी याचा अनुभव आपणास या निमित्ताने सांगतो.
उचलले पेन लावले कागदाला ....
पूर्वी म्हणजे अगदी पूर्वी नाही ……फार तर तीस चाळीस वर्षांपूर्वी,मी तेंव्हा आजोळी राहत होतो तेंव्हाची गोष्ट. घरी दारी , शेती वाडीवर बोलणाऱ्या लोकांच्यात म्हणींचा वापर आगदी सहजतेने होत असे.माझी आजी देखील त्याला अपवाद नव्हती. आणि फक्त आजीच नाही आसपास राहणारे, कष्टकरी शेतकरी संपर्कात येणारा प्रत्येक जण आपले मत आपला विचार मांडताना समृद्ध भाषेचा वापर करीत असे.

आमच्या लहानपणी आम्ही तालुक्याचे गावी राहून शिकलो गावाचे नाव उरूण-इस्लामपूर ह्या गावाचे आणखी एक विशेष म्हणजे तालुक्याच्या ठिकाणची सर्व कार्यालये, म्हणजे तहसीलदार कार्यालय, गट विकास कार्यालय,पोलीस स्टेशन,कोर्ट हे उरूण -इस्लामपूर येथे आहे पण तालुक्याचे नाव मात्र आहे वाळवा तालुका.आणि मला वाटते कि तालुक्याचे गाव एका ठिकाणी आणि नाव एका ठिकाणी असे असणारा हा एकमेव तालुका असावा. थोडे विषयांतर झाले पण सांगण्याचा मुद्दा काय तर शेती प्रगत परिसरात राहताना भाषा जपण्याचे बाबत मात्र जुनी पिढी जागरूक होती. घरात जेवणाची वेळ झाली आणि आम्ही मित्र परिवारात भटकत( खरे तर उंडारत) असलो तर आजी मामास सांगे , जारे! "त्याला बोलवून आण" मग मामाने विचारले कि पण तो गेलाय कुठे तर आजी कधीही मी कोणत्या मित्राचे घरी असेन हे न सांगता मामास म्हणे 'चुकला पीर मशिदीत. कि,त्यानंतर मामा मला बोलवण्यासाठी माझ्या मित्राचे घरी हजर.त्या काळी महिनाअखेरीस शेजारी पाजारी तात्पुरती मदत मागणे हा नित्याचा प्रकार असे. पण ते काम आम्हा मुलांना सागितले कि,त्याचे खूप दडपण येत असे. असेच एकदा मला आजीने समोरच्या घरातून साखर आणण्यास जा म्हणून सांगितले आणि हातात वाटी दिली.मला ती वाटी हातात घेवून जाण्याची खूप लाज वाटत होती. मग मी ती वाटी मी चड्डीच्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो ते पाहून,आजी म्हणाली,"जारे हातात घेवून-' ताकाला जाताना भांडे काय लपवतोस'?" माझी मात्र विकेट उडालेली ??? ? आणायची आहे साखर आणि आजी म्हणते ताकाला जाताना भांडे काय लपवतोस?

अर्थात घरी आणि परिसरात तेंव्हा अशा खूप सुंदर म्हणी किंवा सुविचार कानी पडत, गल्लीतील काही घरे हि खणात मोजली जाणारी ,खणखणीत होती. त्याची सर्व साधारण रचना सारखीच म्हणजे प्रथम अंगण, मग ओसरी, त्यापुढे सोपा नंतर माजघर ..
अशा घरांच्या तुळईवर खडूनी सुविचार लिहिण्याची प्रथा असे त्यातील --' यत्न तो देव जाणावा ' प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे 'हे नेहमी दिसणारे सुविचार तर काही ठिकाणी संस्कृत सुभाषिते लिहिलेली असत. एका ठिकाणी - 'उगीचच मध्ये बोलून अपमान करून घेवू नका.'अशी पुणेरी वळणाची पाटी पाहिल्याचे आठवते तर हेच एका ठिकाणी ' जाणत्या समोर आपले गुण सांगू नयेत, कारण तो ते स्वतःच जाणतो. मुर्खासमोर आपले गुण सांगू नयेत कारण त्याचा उपयोग नसतो. असे भले मोठे वाक्य लिहून तुम्ही गप्प बसणे हिताचे हे सांगितले होते.

आता माझ्या शाळे विषयी म्हणाल तर, शाळा तिची परंपरा आमच्या गुरुजनानांनी आम्ही घडण्यासाठी घेतलेले कष्ट यांचे महत्व त्या काळी पुरेसे उमगलेच नाही असे आता म्हणावे वाटते. कारण १९६७/६८ साली इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला तेंव्हा आमच्या शाळेचे सुवर्ण मोह्त्सवी वर्ष होते.आणि आमच्या शाळेतील मुख्याद्यापक श्री. सांगलीकर सर आणि त्यांचे अनेक सहकारी अक्षरशः दारोदार फिरून शाळेच्या भविष्यातील विविध प्रकल्पांचे पूर्तीसाठी निधी संकलन करीत होते.

त्या काळी त्यात त्यांना किती यश आले किंवा कसे यांची आकडेवारी कधीच समजली नाही पण समृद्ध विचारधन विद्यार्थ्यांना दिले पाहिजे हे जाणून तसा प्रयत्न आमच्या त्या शाळेने नक्कीच केला असे मी आज मनपूर्वक आणि खात्रीने सांगेन. या वाक्याची प्रचीती आपणास यावी यासाठी मी शाळेत असताना वार्षिक स्नेह संमेलनासाठी शाळेने बोलावलेले प्रमुख पाहुणे कोण होते यांची माझ्या आठवणीतली नावे तुम्हास सांगतो, त्यात होते श्री. गं.बा. सरदार, अँडमिरल आवटी , श्रीमती शांता शेळके, श्रीमती इंदिरा संत. आणि तरीही आणखी तीन नावे आता विस्मृतीत गेली आहेत.पण एक खात्री आहे कि पाहुणे कोण होते हे आठवत नसले तरी त्यांनी स्नेह संमेलनाचे निमित्ताने दिलेले विचारधन कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात नक्कीच कोरलेले आहे. आजच्या संगणकीय जगताचे भाषेत सांगायचे झाले तर ते हार्ड डिस्कवर (नव्हे हार्ट डिस्कवर ) आहे.

त्या काळातील शिक्षक किंवा मास्तर यांना काय किंमत होती ते सांगायचे झाले तर माझे आजोबा श्री गणेश रघुनाथ कुलकर्णी हे बहे नावाच्या माझ्या आजोळचे गावी शाळेचे मुख्याद्यापक होते.त्यांना सर्वजण “बाबा मास्तर” म्हणत. त्यांचे निधन १९६४ साली झाले. आज पंचेचाळीस वर्षांनतर मी आजोळी गेलो तर,तेथील जुने जाणते लोक मला ओळखतात ते बाबा मास्तरांचा नातू म्हणून. त्यांची हि ओळख टिकली ती त्यांनी ज्ञान दानासाठी जे कष्ट त्याकाळी घेतले त्यामुळे.

आमच्या हि शाळेबाबत मला नेहमी असेच वाटत आले आहे कि, कदाचित आमच्या आधीच पन्नास वर्षे शाळेने त्या परिसरात असे अनेक विद्यार्थी घडवल्या मुळेच आमच्या कानावर समृद्ध भाषा पडत राहिली असेल का ? माहित नाही पण वयाचे भान न ठेवता जर आजी समोर कधी फुशारकी मारली तर मात्र आजी पटकन म्हणत असे तुझे हे नेहमीचेच आहे " उचलली जीभ लावली टाळूला "
पुढे जेंव्हा त्या म्हणीचा उलगडा झाला तेंव्हा पासून आपोआपच नको तेंव्हा नको ते इतरांना ऐकवण्याची सवय आपोआप मोडली. पण हि आठवण सांगण्यासाठी मात्र आज मी काय केले माहित आहे का ? नाही ना , काही नाही जेंव्हा हे सर्व आठवले तेंव्हा 'उचलले पेन आणि लावले कागदाला'.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला - वरात बरीच पुढे गेल्यामुळे ,सजलेले असून घोड्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही यावेळी असो . मुहूर्त चुकला दुसरे काय ?