अजब सोहळा - Fall Colors

Submitted by सत्यजित on 3 March, 2014 - 15:35

एक जीर्ण पोक्त पान
झाडावरुन कोसळलं
त्या पडत्या पानाला पाहून
झाडंही थोडं हळहळलं

हिरव्या कोवळ्या पालवीच्या
कडा झाल्या तेंव्हा ओल्या
वादळ तगल्या पानाचाही
कधीतरी होतो पाचोळा

वार्‍यावरती चालली होती
फरफट त्या पानाची
मृत्यू का ठरवतो किंमत
प्रत्येकाच्या जगण्याची?

वार्‍यावरती उडत पान
झाडाहून ही उंच गेलं
डवरलेलं झाड पाहुनी
पान मात्र हबकून गेलं

क्षणात साक्षात्कार झाला
जीवनाचा अर्थ कळाला
वार्‍या संगे फेर धरोनी
नाचू लागला पाचोळा

कुणी तरी ते पान
भगवद्गीतेत जपलं आहे
त्या जीर्ण पानाच्या जाळीत
जीवनसार लपलं आहे.

-सत्यजित.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

farch chhan

कुणी तरी ते पान
भगवद्गीतेत जपलं आहे
त्या जीर्ण पानाच्या जाळीत
जीवनसार लपलं आहे.>>>>>>>>>>>.अतीशय सुन्दर!