आरस्पानी...राजवर्खी - ध्वनिमुद्रण

Submitted by चिनूक्स on 27 February, 2014 - 13:29
mbd2014whitelogo.jpgदहाबारा वर्षांपूर्वीच्या एका संध्याकाळी फर्गसन महाविद्यालयाच्या अ‍ॅम्फिथिएटरात कुसुमाग्रजांची कविता मला नव्यानं भेटली. काव्यवाचनाच्या एका कार्यक्रमात. श्री. विनय आपटे आणि श्रीमती शैला मुकुंद यांनी सादर केलेला हा कार्यक्रम बराच गाजला होता. दोघांचीही आवाजावर जबरदस्त हुकुमत. भाषेची जाण अव्वल. शब्दांचा तोल जराही न ढळू देता केलेल्या त्या अप्रतिम सादरीकरणानं कुसुमाग्रजांची चित्रदर्शी कविता अक्षरशः जिवंत झाली. त्या कवितांचं सौंदर्य आणि त्यांतले मूलगर्भी, तत्त्वदर्शी विचार अधिकच झळाळून उठले. त्या संध्याकाळी विनय आपटे आणि शैला मुकुंद यांनी माझ्या मनःपटलावर उमटवलेली कुसुमाग्रजांच्या कवितांची चित्रं आजही तितकीच ताजी आहेत.

१९९२-९३ साली श्री. प्रभाकर पाटणकर आणि श्रीमती शैला मुकुंद यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. कार्यक्रमाचं नाव - 'आरस्पानी...राजवर्खी'. कवितांची निवड, संहितालेखन श्री. पाटणकर यांचं. रसिकांना अतिशय आवडलेला हा कार्यक्रम अचानक थांबला तो पाटणकरांच्या अकाली मृत्यूमुळे. मात्र हा कार्यक्रम सुरू राहावा, अशी पाटणकर कुटुंबाची इच्छा होती. मग विनय आपटे आणि शैला मुकुंद यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचं सादरीकरण पुन्हा सुरू केलं. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक कार्यक्रम झाले. कुसुमाग्रजांची कविता अनेकांचं आयुष्य श्रीमंत करून जात होती.

या कविता किंवा निदान त्यांची झलक मायबोलीवर असावी, म्हणून पाचेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. विनय आपटे यांची परवानगी होती. त्यासाठी त्यांना दोनतीनदा भेटलोही होतो. पण कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण उपलब्ध होत नव्हतं.

श्री. विनय आपटे यांच्या दु:खद निधनानंतर आता या कविता मायबोलीवर येत आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने. श्रीमती वैजयंती आपटे व श्रीमती शैला मुकुंद यांनी केलेल्या तत्पर मदतीमुळेच या कविता समस्त मायबोलीकरांपर्यंत पोहोचू शकल्या आहेत. शैलाताईंनी ही ध्वनिमुद्रणं उपलब्ध करून दिली आहेत.

खाली तीन ध्वनिमुद्रणं आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम नाही. कार्यक्रमाचा संपादित अंश आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम लवकरच मायबोलीवर ऐकता-बघता येईल.

या कार्यक्रमाच्या रूपाने कुसुमाग्रज, विनय आपटे व प्रभाकर पाटणकर यांच्या स्मृती कायम राहतील, याची खात्री आहे.

Araspani_Rajwarkhi.jpg


***


***


***


ही ध्वनिमुद्रणं मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्याची अनुमती दिल्याबद्दल आणि ती तातडीनं उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती वैजयंती आपटे व श्रीमती शैला मुकुंद यांचे मायबोली.कॉम ऋणी आहे. त्यांच्या अजोड सहकार्यामुळेच हा ठेवा मायबोलीकरांपर्यंत पोहोचू शकला आहे.

तसंच कुसुमाग्रज प्रतिष्ठान, श्री. विद्याधर नीमकर व चतुरंग प्रतिष्ठान, कॉण्टिनेण्टल प्रकाशन व पॉप्युलर प्रकाशन यांचेही मायबोली.कॉम आभारी आहे.

***

श्री. विनय आपटे व श्रीमती शैला मुकुंद यांचं छायाचित्र श्रीमती शैला मुकुंद यांच्या खाजगी संग्रहातून.
ध्वनिमुद्रणांच्या आधीचं व नंतरचं संगीत प्रताधिकारमुक्त. कलाकार - GreenDJohn

***

ही ध्वनिमुद्रणं संबंधितांच्या परवानगीशिवाय कोणत्याही माध्यमातून प्रसारित करण्यास परवानगी नाही.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली प्रशासन आणि चिनूक्स यांचे मनःपूर्वक आभार.
फार छान उपक्रम.

विनय आपटेंचे सादरीकरण नाही आवडले. Sad कवितांमधील भाव त्या त्वेषात हरवून जातात असे वाटले.
फक्त ' गेला कोण कोण राहिला, हे मज जन्मभराचे कोडे पडले' हे आवडले.

शैला मुकुंद यांचे सादरीकरण भावले, नेटके वाटले. भावपरिपोषक.

असे कार्यक्रम अजून व्हायला हवेत.

ध्वनिमुद्रणांच्या आधीचं व नंतरचं संगीत प्रताधिकारमुक्त. कलाकार - GreenDJohn >> छान वाटतय ते पार्श्वसंगीत.

दोघांचेही कविता वाचन आवडले.
शब्दांमधून शोधलेली लय, त्यांचे उच्चार , सादरीकरण चांगले आहे.

चिनूक्स आणि मायबोली शतानेक धन्यवाद.

व्वा ऑस्सम ! धन्यवाद !

आपटेंबद्दल रैनाला अनुमोदन थोडा त्वेष कमी असला असता तरी चालले असते. शैला मुकुंद ह्यांचे सादरीकरण आवडले. प्रेम कुणावर करावं ह्यात तर लगेच तो फरक ओळखू येतो.

Pages