१) "बोलीभाषेची काव्यधारा" - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 06:29

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. अगदी दर दहा कोसांवर मराठीचं रुपडं बदलतं. वर्‍हाडी, अहिराणी, मालवणी, बेळगावी, कोल्हापुरी, नागपुरी, झाडीबोली अशा अनेक बोलीभाषांतून विविध विषयांना सामावणारं, लोकांशी थेट आणि जवळचा संवाद साधणारं लिखाण झालं आहे. बहिणाबाईंची कविता अहिराणीत होत्या. मालवणी दशावतारांसारख्या लोककलांमधून सर्वत्र पोहोचली. झाडीबोली रंगभूमी आजही पूर्व विदर्भात जोम धरून आहे.

म्हणूनच यंदा आम्ही 'मराठी भाषा दिवस - २०१४'च्या निमित्तानं 'बोलीभाषेतील काव्यधारा' हा एक आगळावेगळा उपक्रम आपल्यासाठी आणला आहे. या उपक्रमात मायबोलीकरांनी महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेत कविता, गझल, चारोळ्या इत्यादी. विविध काव्यप्रकार रचणं अपेक्षित आहे.

बोलीभाषांचं संवर्धन व्हावं, त्यात मायबोलीकरांचा सहभाग असावा, बोलीभाषांचं माधुर्य सर्वांसमोर यावं, हा आमचा प्रयत्न आहे.

नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक उपक्रम आहे.

२. या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस, २०१४' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

३. या उपक्रमासाठी खाली काही विषय दिले आहेत, या विषयांवर तिन्ही दिवशी काव्य रचायची आहेत.

४. दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही आणि कितीही विषयांवर आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्याही एका बोलीभाषेत कविता / चारोळ्या / गझल रचायची आहे.

५. काव्य स्वरचितच असावे. भाषांतरीत काव्य देऊ नये.

६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा कविता / चारोळ्या / गझल देऊ शकतात. परंतु एका वेळेस एकच काव्य द्यावे.

७. कविता , चारोळ्या , गझल इत्यादी सगळ्या प्रकारांत आपण बोलीभाषेतून काव्य रचू शकतात.

८. काव्य लिहिताना सुरुवातीला ते कोणत्या बोलीभाषेत लिहिले आहे, हे नमूद करणे बंधनकारक आहे.

--------------------------------------------

विषय :-

१. शाळा

२. सूर्य , चंद्र

३. भ्रमणध्वनी / मोबाईल

४. मी आणि मायबोली

५. आमचे शेजारी

६. स्वप्न

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड उपक्रमाला अनेक शुभेच्छा.:स्मित:

मायबोलीचे उत्तमोत्तम कवी, गझलकार आणी चारोळी कार याला चार चान्द लावतील अशी अपेक्षा.

आमच्याही नुसत्याच सदिच्छा!

पुणेरी मराठीच माझी बोली भाषा
तुम्हीच सांगा आता मी प्रवेशिका देऊ कशा? Proud

.

अहिरणीचा बाज
कोल्हापुरचा साज
गोजिरवाणी गजाली
सारी मंडळी कुठे गेली?

मयुरी, आर्यातै, इब्लिसदा तुमची अहिरणी,
गजालीकर गोगा, विवेकदादा, शैलजा राणी
विशालदादा, मल्ल्या आदि सोलापुरकर
सोबतीला दक्षिणातै, अशोकमामा आणि इतर कोल्हापुरकर
रोमातुन काय वाचताय? कुठे राहिलात?
रचुन टाका चारोळी तुम्हीही हातोहात Wink

______________

कोणीतरी लिहा पाहू चारोळी पटपट
नाहीतर आणखी सहन करावी लागेल माझ्या चारोळ्यांची कटकट Proud

रियाच्या चारोळ्यांची होतेय का कटकट?
पोरगी चांगलीच लिहित्येय की सटासट
कुणी कितीही केली वटवट
तरी तु लिहित रहा गं पटापट
कुणी आले तापट आणि वात्रट
तर तु ही आहेसचं की तितकीच नटखट

जाऊदे मेलं मी का करतेय वटवट!

माले थोड्या शंका शेतसः
१. हाउ कविता कोठे लिखान्या हेऽत? आठेच का? का अल्लग अल्लग बाफं काढाना शेतस?
२. सदाशिवपेठी बोलीमां लिखन्यात तं चाली का? का फकस्त अभदरं भासामा लिखान्या हेऽत? Wink

इब्लिस, कविता याच धाग्यावर लिहायच्या आहेत.

प्रमाण मराठी भाषेऐवजी मराठीच्या विविध बोलीभाषेतून कविता अपेक्षित आहेत.

आमचे पुणेरी शेजारी

शेजारी राहतात बेलसरे
पण बोलतील तेव्हांच खरे
त्यांना लागताच गरज
बघतात दार उघडुन सावज
आपल्याला हवं तेंव्हा
त्याची बंद दारे
कामवाल्या बाईची तक्रार
कधी सोसायटीतली तक्रार
पण आपणं जर्रा बोलु म्हटलं
तरं मात्र लग्गेच फरार
कार्यक्रमात मात्र हसुन खेळुन वागतात
गरज संपली की पालीसारखे झटकतात
असे आमचे शेजारी सांभाळतो आम्ही
काय करणारं जपतो माणुसकी आम्ही!

मी_आर्या, आज या उपक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने विषयात सूट देत आहोत. आपण आपल्याला हव्या त्या विषयावर कविता/गझल करू शकता.

धन्यवाद.

मंडळी,
थोडं गंभीर खरडलेलं आहे. काल आमच्या अंगणात बाबांनी लावलेली १०-१२ वर्षं जुनी असलेली काही झाडं (घराच्या पायामधे त्यांची मुळं गेल्याने) नाईलाजाने तोडावी लागली. झाडांवर घातलेला प्रत्येक घाव काळजावर होत होता.बाबांचं या प्रत्येक झाडाविषयी असलेलं नातं, आठवणी जाग्या झाल्या आणी डोळ्यात पाणी आलं. मग त्याच अवस्थेत, तोडक्या मोडक्या अहिराणीमधे काही ओळी खरडल्या. गोड मानुन घ्याव्या.

(घरात फक्त आज्जीच अहिराणी बोलायची. तिला जाऊन आता २०वर्ष झाली. आई-बाबांची भाषा मराठीच. अहिराणी भाषेत स्वतःचं असं काही लिहायचं, हा पहिलाच प्रयत्न. म्हणुन आधी बहिणाबाईकडे अहिराणीमधे लिहायची बुद्धी मागतेय.)

आजली बोले अहिराणी
माय मन्ही मराठी
अहिराणीमां लिखाले
बुद्धी दे वं बहिणाबाई

मतलबी रे मानसा
कसा व्हयना निर्दयी
कुर्‍हाड चाले झाडावर
घाव लेकीच्या हृदयी

(सोनचाफा)
तुन्हं फुल पहिलं वहिलं
बाबांच्या अस्थिवर वाहिलं
आज तुले छाटतांना
मन का रे नाही द्रवलं?

('केशर' आंबा)
हतबल मन्हा बाबा
बठे तुन्ह्या सावलीमां
होता वैभव निरखीत
मरणाच्या दारात उभा

(पेरु)
हाई आम्हना 'सरदार' पेरु
लोका सांगे कवतिके
त्यान्हाच खाले 'शेवटनं'
बाबाले न्हाऊ घाले लोके

असा कसा रे देवा
न्याव(न्याय) तुन्ह्या घरचा
लेकरान्या घरट्याकरता
बळी 'जुन्या खोडाचा'

आते कसानी सावली?
कोठेना 'खंड्या' नि 'कोकिळा'?
मन्या आंगणमां उना
बठ्ठा रखरखीत उन्हाळा

Pages