येडे गुंडे (Movie Review - Gunday)

Submitted by रसप on 16 February, 2014 - 23:47

काळा. काळ्या रंगाचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. त्याच्यासोबत इतर कुठलाही रंग शोभतो, उठून दिसतो. 'मॅच' होतो. काळा रंग पार्श्वभूमीवर असला तर लहानात लहान नक्षी, वस्तूसुद्धा स्पष्ट होते. थोडक्यात काहीही 'खपवायचं' असेल, तर काळा जवळ करावा ! पांढरा रंगही असाच सर्वसमावेशक आणि वैश्विक. पण त्याचा शुभ्रपणा टिकवण्यासाठी प्रचंड काळजी घ्यावी लागते, तितकी काळ्याचा गडदपणा टिकवण्यासाठी घ्यावी लागत नाही. इतकं लक्षात आलं की बास्स ! एक १००% यशस्वी कथानक गुंफता येतं. एक रंग मनाचा - काळा - भरला की बाकी रंग अगदी तैयार उपलब्ध आहेतच ! थोडा दोस्तीचा पिवळा, थोडा प्रेमाचा गुलाबी, थोडा कायद्याचा पांढरा आणि रक्ताचा लाल. कॅनव्हासवर रंग फेका, रेघोट्या ओढा की चित्र तयार !

'गुंडे'मध्ये असे काहीही नाही, जे आधी दाखवले गेले नाही. जे आधी आपण पाहिले नाही. किंबहुना ट्रेलर बघून आपल्याला कहाणीचा जो अंदाज येतो, त्या अंदाजालाही 'गुंडे' चुकवत नाही. ह्या चित्रातले सगळे रंग, चित्रकाराने भरायच्या आधीच आपण ओळखलेले असतात, ते तसेच भरले जातात, तिथेच भरले जातात आणि तेव्हढेच !

१९७१. भारत-पाकिस्तान युद्धानंतर 'बांगलादेश' जन्माला आला आणि अनेक विस्थापित भारतात आले. ह्या विस्थापितांत असतात 'बिक्रम' आणि 'बाला' हे दोघे मित्र. हे दोघे लहानगे उपासमारीमुळे कासावीस असताना 'लतीफ' हा बंदुकांचा स्मगलर त्यांना आसरा देतो आणि त्याचे 'हुकमी हस्तक' बनवतो. पण वखवखलेल्या मिलिटरी ऑफिसरच्या 'भुके'पासून स्वत:ला वाचवण्यासाठी दोघे जण त्या ऑफिसरचा खून करतात आणि पळून कलकत्त्यास येतात. इथेही आयुष्य त्यांच्यासाठी सरल नसतंच. सततच्या बिकट परिस्थितीमुळे लहान वयातच गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत जाते आणि गैरमार्गाने का होईना पण ह्या कलकत्त्यावर राज्य करायचं, ही दुर्दम्य महत्वाकांक्षा दोघांच्या मनात बीज धरते. कोळश्यापासून सुरुवात करून मासळी, लोखंड, जमीन अश्या विविध क्षेत्रात हे दोघे आपला काळा धंदा पसरवतात आणि कलकत्त्यावर हुकुमत गाजवणारे कुख्यात गुंड बनतात. गुंड असले, चोर असले तरी 'हीरो' आहेत त्यामुळे त्यांचा काळा पैसा ते शाळा, इस्पितळं, अनाथालय ह्यांसाठीही वापरतात आणि गोरगरीबांत एक प्रकारची इज्जतही कमावतात.
पण कितीही चिकणे, बॉडी बिल्डर, हीरो असले तरी असतात गुंडच, त्यामुळे खलनिग्रहणाय एसीपी सत्यजित सरकार (इरफान खान) येतो. त्याचे काम सोपे करण्यासाठी वर्षानुवर्षं १००% यशस्वी ठरलेला फॉर्म्युला म्हणून दोघा मित्रांमध्ये फुट पाडायला एक ललना 'नंदिता' (प्रियांका चोप्रा) येते. सगळे तसेच घडते, जसे आपल्याला वाटत असते, जसे आपण ह्यापूर्वीही अनेकदा पाहिलेले असते. (खरं तर मी अगदी शेवटपर्यंत सगळं सांगून टाकलं तरी 'स्पॉयलर' ठरणार नाही, अशी माझी पूर्णपणे खात्री आहे पण तरी पुढचं सांगत नाही.)

digital-poster-of-gunday.jpg

'बिक्रम'च्या भूमिकेत 'रणवीर सिंग' आणि 'बाला'च्या भूमिकेत 'अर्जुन कपूर' काही विशेष मजा आणत नाहीत. गॉन आर दोज डेज, जेव्हा संताप दाखवताना अभिनेते डोळ्यात निखारे आणत. आता फक्त गाल थरथरवतात. ह्या दोघांच्याही अभिनयाची परिसीमा तिथपर्यंतच असावी. दोन्ही भूमिकांत खरं तर छाप सोडण्यासाठी बराच वाव होता. परंतु, जो विद्रोह, असंतोष ह्याआधी अमिताभ, संजीव कुमार, धर्मेंद्र, सनी देओल, वगैरेंनी आपापल्या शैलीत अफलातून दाखवला आहे, त्याच्या आसपासही बिक्रम आणि बाला पोहोचत नाहीत. पाटा खेळपट्टीवर ६० चेंडूत ४० धावा काढणारा फलंदाज जितका छाप सोडतो, तितकीच छाप हे दोघेही सोडतात.

प्रियांका चोप्रा बऱ्याच काळानंतर एका बऱ्या, काही तरी किंमत असलेल्या भूमिकेत दिसली आहे. मला फारशी आवडत नसली तरी इतर अनेक बाहुल्यांपेक्षा कैक पटींनी सरस आहेच. त्यामुळे तिच्या ह्या चित्रपटनिवडीबद्दल तिचे अभिनंदन !

इरफान खान, स्वत:ची अभिनय शैली असलेले फार कमी अभिनेते असतात त्यापैकी एक. अश्या अभिनेत्यांना पिळदार देहयष्टी, चिकना चेहरा वगैरेची आवश्यकता नसते. इरफान खान अत्यंत सहजतेने एसीपी सरकार साकारतो. त्याच्यासाठी ही भूमिका तशी खूपच सोपी म्हणायला हरकत नाही. बहुतेक एकही री-टेक वगैरे न घेता किंवा सीनही न ऐकता त्याने आपलं काम चोख केलं असावं.

'शोले', 'दीवार' किंवा अगदी आजकालचा 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' किंवा 'आन', 'खाकी' ई. काही कथानकंच अशी असतात, की त्यांची जोरदार संवादांची मागणीच असते. किंवा असं म्हणू की तिथे परिस्थितीनुरूप सहजपणे जोरदार संवाद जन्मच घेतात. पण 'गुंडे' सगळ्यात जास्त निराशा इथेच करतो. काय तर म्हणे - 'हम गुंडे थे, गुंडे है और गुंडेही रहेंगे !' अत्यंत पांचट संवाद अपेक्षाभंग करतात.

'सोहेल सेन' चं संगीत बऱ्यापैकी श्रवणीय आहे. ही गाणी पहिल्यांदा ऐकताना तरी अत्याचारी किंवा कंटाळवाणी वाटली नाहीत. आजच्या काळात हे सिनेसंगीतकाराचे एक जबरदस्त यशच मानावे.

खरं तर १९७१ च्या युद्धानंतर निर्माण झालेला 'बांगलादेश' हा भाग १९४७ सालीच भारतापासून वेगळा झालेला होता. हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला तो पाकिस्तानचा तुकडा पडून आणि जे काही लोक तिथून भारतात आले, ते युद्धापूर्वीच पाकिस्तानच्या जाचाला कंटाळून आले होते. किंबहुना, प्रचंड प्रमाणात येणारे विस्थापितांचे लोंढे, त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला बंगालच्या सुव्यवस्थेवरील ताण हेसुद्धा ह्या युद्धाचं व स्वतंत्र देशनिर्मितीचं एक महत्वाचं कारण होतं. 'अधिकृतरीत्या' त्या भागातून भारतात येणारे लोक खरं तर युद्धानंतर थांबले होते. १९७१ साली कुठली तरी नवीन सीमारेषा आखली गेली होती, त्यामुळे भारताचाही काही भाग बांगलादेशात गेला आणि त्यामुळे कालपर्यंत भारतीय असलेले काही लोक अचानक विस्थापित झाले, हे करुण, भेदक वास्तव म्हणजे मला 'गुंडे'मुळे मिळालेलं इतिहासाचं लेटेस्ट अपग्रेडेड व्हर्जन आहे.
बरं, कहाणीत असंही काही नाही की ती कुठल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवरच घडायला हवी होती. कारण 'व्हिक्टीम्स ऑफ सिस्टीम' तर कसेही पैदा होतातच. पण तरी हे ठिगळ जोडलंय. जुन्या इतिहासाचा चुकीचा अन्वयार्थ अनेकदा लावला गेलाय पण इतक्या नव्या इतिहासाचाही विपर्यास करावा, ही एक बौद्धिक दिवाळखोरीच. त्याहीपेक्षा वाईट हे की, अशी दिवाळखोर निर्मितीही भरपूर गल्ला जमवेल, पुरस्कार मिळवेल आणि 'स्टार्स' जन्माला घालेल. मग उद्या हेच 'स्टार्स' एखाद्या टीव्ही शोमध्ये येतील आणि 'कॉफी विथ करण' मध्ये आलेल्या 'स्टुडन्ट ऑफ द इअर' वाल्या वरुण धवन आणि आलिया भटनी दिलेल्या उत्तरांप्रमाणे, 'भारताचे राष्ट्रपती 'डॉ. मनमोहन सिंग' किंवा 'पृथ्वीराज चव्हाण' आहेत', असे अकलेचे तारे तोडतील.

असो !
हम येडे थे, येडे है और येडेही रहेंगे !

रेटिंग - *१/२
http://www.ranjeetparadkar.com/2014/02/movie-review-gunday.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स रसप.. तुम्ही रिव्ह्यू लिहून फक्त लोकांचे पैसेच नव्हे तर वेळही वाचवता आणि असले पकाऊ पिक्चर पाहिल्यानंतर होणारी डोकेदुखीही थांबवता. तुम्हाला शतश: धन्यवाद.
रच्याकने, कोणी फँड्री पाहिला का? कसा आहे ? मी ऐकलं खूप चांगला आहे म्हणून...

ते टंग टंग गाणे काल परवा लग्नसमारंभात तुफान वाजत होतं. रणवीर सिंग का काय आहे तो अगदी वेस्ट ऑफ टाइम आहे.

>> थँक्स रसप.. तुम्ही रिव्ह्यू लिहून फक्त लोकांचे पैसेच नव्हे तर वेळही वाचवता आणि असले पकाऊ पिक्चर पाहिल्यानंतर होणारी डोकेदुखीही थांबवता. तुम्हाला शतश: धन्यवाद. <<

वेळ आणि डोकेदुखीचं जौंद्या..... पैसे वाचत असतील तर माझ्या खर्चाला जरासा हातभार लावा की !
Wink
Sad

>> विजय देशमुख | 17 February, 2014 - 11:13 नवीन
रसप :- यापुढे परिक्षणाच्या खाली बॅंक अकाऊंट नंबरही टाका हाहा <<

हो.. ही आयडिया भारी आहे !

मी वाट बघत होतो या लेखाची. खरं तर त्या काळाच्या बॅकग्राऊंडवर एक छान चित्रपट निर्माण होऊ शकला असता.

जुन्या इतिहासाचा चुकीचा अन्वयार्थ अनेकदा लावला गेलाय पण इतक्या नव्या इतिहासाचाही विपर्यास करावा, ही एक बौद्धिक दिवाळखोरीच >> अनुमोदन. अत्यंत दिवाळखोर सिनेमा.

बरं, अशा उदात्तबिदात्त बॅकग्राऊंडवर सिनेम्याची अशी सुरूवात झाल्यावर आपल्या अपेक्षा भलत्याच वाढतात. बालकलाकारांनी इतका 'गुस्सा' दाखवल्यावर, ते पडद्यावर पळता पळता मोठे झाल्यावर, मोठे कलाकार काय गुस्सा दाखवतील म्हणून आपण भिजल्या कोंबडीगत सीटवर गुमान बसायची तयारी करतो. पण कसचं काय. इतक्या मोठ्या फाळणीसारख्या दु:खद, उदात्त आणि आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर तयार झालेले गुंडे ऐंशीच्या दशकातल्या वेशभुषेच्या नावाखाली सर्कसमधल्या विदूषकाचे कपडे घालतात. कुठच्याही हायरार्कीतले गुंडे बोलणार नाहीत, अशी भाषा आणि संवादफेक करतात. अनुक्रमे चिरक्या आणि पिचक्या आवाजात बोलतात. बच्चनची भ्र्ष्ट नक्कल करत सतत रागाला येऊन दात दाखवतात. 'कलकत्ता म्हणजेच हे दोन गुंडे' असं समीकरण झाल्यानंतरही माकडचाळे करत भर भाजीबाजारात मच्छीबाजारात फिरतात. 'काला पत्थर' वाले कपाळावर हात मारून घेतील असं तोंड काळं करून, विचित्र हसत, दात दाखवत आणि सुमार अभिनय करत कोळशाच्या खाणींमध्ये वावरतात. सारंच वरवरचं प्रकरण. कुठेच काही ठोस, ठाम आणि स्प्ष्टपणे उभं राहत नाही.

त्यातल्या त्यात रणवीर जरा बरा आहे. बाकीचा साराच आनंद आहे. 'गुस्से को पालना सिखो' असं ज्याला पुन्हा पुन्हा सांङितलं जातं त्या अर्जून कपूरने अमिताभ, विनोद आणि ध्रमेंद्र असोच, पण गेला बाजार सनी देओलकाकांची शिकवणी लावली तरी थोडाफार फरक पडेल. बाकी पन्नाशी उलटल्यावरही नुसत्या डोळ्यांतून अंगार आणि गुस्सा दाखवणारी बच्चनची पात्रं नि मुद्राभिनय यांच्या सार्‍या कक्षांच्या बाहेर!

या सिनेम्याच्या हिरोईनीचं कशाबद्दलच नाव नाही घेतलं तरी चालेल.

आणि तमाम मराठी वृत्तपत्रांच्या रिव्ह्यूजचा भयंकर कंटाळा आला. 'वासेपूरच्या शेड्स आहेत', 'ऐंशीच्या दशकातला अंगार आहे', 'आपापलं काम चोख केलं आहे', 'भिडणारं झालं आहे', 'प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद आहे', 'संगीत कर्णमधूर आहे', 'उत्तम अभिनय केला आहे', 'विचारात पाडणारं आहे' अस्लं तेच ते वाचून हतबलता येते. हाच 'वासेपूर' आला तेव्हा एकाही वृत्तपत्राला ते नक्की काय प्रकर्ण आहे, ते समजलं नव्हतं. जिकडे बघावं, तिकडे प्रेक्षकांची दिशाभूल. अ‍ॅवार्ड्स, क्रिटिक्सकडून कौतुक आणि भारताबाहेरून कॉमेंट्स यायला सुरूवात झाली तेव्हा सारे खडबडून जागे झाले. मग 'वासेपूर' मध्ये नक्की काय आहे, काय नवं आहे- याचा आपापल्या परीने शोध लावत बसले. 'फँड्री'चंही तेच. 'समाजातलं दाहक वास्तव,' 'जातिव्यवस्थेवर भिरकावलेला दगड', 'हटके आणि निरागस प्रेमकथा' असे कौतुकाचे हार सगळीकडे चढवले आहेत. प्रेमकथा आणि जातिव्यवस्था यांचा पटकथेला फक्त भक्कम आधार आहे, या दोन्हीपेक्षाही फार महत्वाची गोष्ट नागराज मंजूळेला सांगायची आहे- हे धडधडीत आणि स्पष्ट दिसत असूनही ते कुणी लिहित नाही. नागराजने स्वतः साकारलेलं एक छोटं पात्रही या इतक्या अनुभवी वृत्तपत्रसमीक्षालेखकांना नवा विचार करायला भाग पाडत नाही हे फार विशेष.

असो. विषयांतराबद्दल क्षमस्व. 'लेडीज वर्सेस..', 'लुटेरे' इ. मधला रणवीर जरा बरा वाटलेला म्हणून गुंडे पाहण्याचं धाडस केलं. पण केव्हा संपतो असं झालं. इरफान खान नसता तर वैतागुन उठून येता तरे आलं असतं. पण निर्माते तेवढे तरी शहाणे आहेत म्हणायचे. बाकी 'येडे गुंडे' याच शब्दांत वासलात लावणं योग्य आहे.

साजिरा.....
तुमचा सात्विक संताप समजू शकतो..!!

>> इरफान खान नसता तर वैतागुन उठून येता तरे आलं असतं. <<

अगदी !!

----------

सिद्धार्थ कपूर नव्हे, अर्जुन कपूर !

आणि तमाम मराठी वृत्तपत्रांच्या रिव्ह्यूजचा भयंकर कंटाळा आला. 'वासेपूरच्या शेड्स आहेत', 'ऐंशीच्या दशकातला अंगार आहे', 'आपापलं काम चोख केलं आहे', 'भिडणारं झालं आहे', 'प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद आहे', 'संगीत कर्णमधूर आहे', 'उत्तम अभिनय केला आहे', 'विचारात पाडणारं आहे' अस्लं तेच ते वाचून हतबलता येते. हाच 'वासेपूर' आला तेव्हा एकाही वृत्तपत्राला ते नक्की काय प्रकर्ण आहे, ते समजलं नव्हतं. जिकडे बघावं, तिकडे प्रेक्षकांची दिशाभूल.
अ‍ॅवार्ड्स, क्रिटिक्सकडून कौतुक आणि भारताबाहेरून कॉमेंट्स यायला सुरूवात झाली तेव्हा सारे खडबडून जागे झाले. मग 'वासेपूर' मध्ये नक्की काय आहे, काय नवं आहे- याचा आपापल्या परीने शोध लावत बसले.
'फँड्री'चंही तेच. 'समाजातलं दाहक वास्तव,' 'जातिव्यवस्थेवर भिरकावलेला दगड', 'हटके आणि निरागस प्रेमकथा' असे कौतुकाचे हार सगळीकडे चढवले आहेत. प्रेमकथा आणि जातिव्यवस्था यांचा पटकथेला फक्त भक्कम आधार आहे, या दोन्हीपेक्षाही फार महत्वाची गोष्ट नागराज मंजूळेला सांगायची आहे- हे धडधडीत आणि स्पष्ट दिसत असूनही ते कुणी लिहित नाही. नागराजने स्वतः साकारलेलं एक छोटं पात्रही या इतक्या अनुभवी वृत्तपत्रसमीक्षालेखकांना नवा विचार करायला भाग पाडत नाही हे फार विशेष.>>> पर्फेक्ट!

>> थँक्स रसप.. तुम्ही रिव्ह्यू लिहून फक्त लोकांचे पैसेच नव्हे तर वेळही वाचवता आणि असले पकाऊ पिक्चर पाहिल्यानंतर होणारी डोकेदुखीही थांबवता. तुम्हाला शतश: धन्यवाद. << +१००१

सततच्या बिकट परिस्थितीमुळे लहान वयातच गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत जाते आणि गैरमार्गाने का होईना पण ह्या कलकत्त्यावर राज्य करायचं, ही दुर्दम्य महत्वाकांक्षा दोघांच्या मनात बीज धरते. कोळश्यापासून सुरुवात करून मासळी, लोखंड, जमीन अश्या विविध क्षेत्रात हे दोघे आपला काळा धंदा पसरवतात आणि कलकत्त्यावर हुकुमत गाजवणारे कुख्यात गुंड बनतात. >> हे वाचुनच लक्षात आले की त्या दोघा मुलांना ते जमणार नाही, जमलेले नसणार.

वॉस्स अप वर गेले दोन दिवस मेसेज फिरत होता, (काय ते नाही सांगणार हं, सस्पेन्स फोडले आहे, पण ते खरे खोटे देव जाणे) तेव्हा मी हा कोणता पिक्चर चौकशी केल्यावर या चित्रपटाबद्दल समजले.
मला मग त्या मेसेज पाठवणार्‍यांचेच हसायला आले की जे सिनेमे मी पोस्टर बघूनचा कधी जाणार नाही त्याचे भांडे फोडून हे माझी मजा घेतल्याचे आव आणत आहेत.
असो, पण अश्यांचे कोणी परीक्षण लिव्हले असेल तर मात्र न चुकता वाचतो, त्यातून जास्त मनोरंजन होते, जे आपण अपेक्षेप्रमाणे केलेच Happy

विजय देशमुख | 18 February, 2014 - 06:27
चित्रपट बकवास असला की परिक्षण वाचायला जास्त मजा येते.

>> मला तर बर्‍याचदा लिहायलाही जाम मजा येते, अश्याच चित्रपटांवर..!! उदा. जब तक हैं जान, धूम-३, राऊडी राठोड.. जाम मजा आली होती लिहिताना ! Wink

..................................... तेव्हा मी हा कोणता पिक्चर चौकशी केल्यावर या चित्रपटाबद्दल समजले.>>>>>> काय हे???????? असे करु नये रे अभिषेक. आपण नाही बघणार पण इतर कुणला हा मुवी बघायचा असु शकतो असा विचार करावा की नाही.

मला तर बर्‍याचदा लिहायलाही जाम मजा येते, अश्याच चित्रपटांवर..!! उदा. जब तक हैं जान, धूम-३, राऊडी राठोड.. जाम मजा आली होती लिहिताना ! >>>>>> रसप जतहैजा बेष्ट होतं Happy

असे करु नये रे अभिषेक. आपण नाही बघणार पण इतर कुणला हा मुवी बघायचा असु शकतो असा विचार करावा की नाही.
>>>>>>
अरे ओये, पुर्ण वाचा, मी नाही तर मला लोकांचा असा मेसेज आला सस्पेन्स सांगून माझा पोपट करायला तेव्हा मी त्या मेसेज पाठवणार्‍यांकडे चौकशी केली की हा कोणता नवीन पिच्चर.. कारण रिलीज होऊन चर्चा झाल्यावरच सिनेमे माझ्या कानापर्यंत येतात.
बाकी मी हा मेसेज कोणाला पाठवलाही नसता, कारण असे टुक्कार चित्रपट मी फॉलो करतो हेच कसेसेच..

अरे पण अभिषेक, तोच सस्पेन्स तू इथं वरच्या पोस्टमध्ये सांगून टाकलास की. Proud गुंडे आपल्याला आवडत नाही ते ठीक, पण त्याचे चाहतेही असतीलच.

खी खी खी...
हो रे,
पण आता हे परीक्षण वाचल्यावर ते पुण्याचेच काम नाही का ठरत, तरी करतो पोस्ट संपादीत.. Happy

ही गाणी पहिल्यांदा ऐकताना तरी अत्याचारी किंवा कंटाळवाणी वाटली नाहीत. आजच्या काळात हे सिनेसंगीतकाराचे एक जबरदस्त यशच मानावे. >>> Lol Proud

चित्रपट अजुन बघितला नाही पण याच्या प्रमोशन साठी रणवीरसिंग आणि अर्जुन कपुर कपिलच्या "कॉमेडी नाईट्स" मध्ये आले होते, तो भाग मात्र प्रचंड आवडला. Happy
रसप, खास जतहैजा... चे परिक्षण एकदम भारीच.

Pages