ऋतु - संधी

Submitted by पुरंदरे शशांक on 29 January, 2014 - 06:00

ऋतु - संधी

अलख गाजता शिशिराचा तो
तरुकुळ अवघे तल्लीन झाले
हिरवी-पिवळी वस्त्रे त्यागून
पुरेपूर ते निसंग झाले

पुष्पभूषणे नको उपाधी
दंड-कमंडलू हाती धरले
वैराग्याचे तेज झळकता
हस्त रवीचे मृदुमय झाले

उभे उभेचि लावी समाधी
श्वास निरोधन इतुके केले
जीवनरसही नको बोलुनी
धरणीमाते सचिंत केले

किती काळ ही लावी समाधी
द्विजगण अवघे व्याकुळ झाले
निष्पर्णशा त्या शाखांवर
गान तयांचे लोपून गेले

ऋतुराजाची येता स्वारी
ताम्रध्वजा त्या डोलु लागती
प्रसन्न हांसत डोलत शाखी
वृक्षकुळे त्यागती समाधी

गर्द हरित पालवी झळकता
पक्षीकुलांच्या कंठी गाणी
रंगांची उधळण होताना
वसंतचिन्हे उमटे रानी ......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच.

छान कल्पना आणि वर्णनही छान जमलंय.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनेक ओळींमधे मात्रांचा गोंधळ झाल्याने लय चुकल्याचे जाणवले.

अशा कविता परफेक्ट लयीत, वृत्तात असल्यास त्या अधिक खुलतात आणि प्रभावी होतात.
प्रांजळ मताचा राग नसावा ही अपेक्षा.

मस्तच !

सर्वांचे मनापासून आभार ....

उकाका - तुम्ही म्हणताय ते खरंए - तुमची मदत लागणार आहेच यासाठी .... राग वगैरे तर अजिबात नाहीये ...

अतिसुंदर !!!

शिशिर ऋतूचा स्वच्छन्द वात आला
कर्णी पर्णांच्या लागुनी म्हणाला
माळरानावर दूर एकवेळा
चला माझ्यासह खेळखेळ्ण्याला

प्राथमिक शाळेत असताना वाचलेली कविता आठवली .