तिने लग्न मोडलं..

Submitted by वेल on 27 January, 2014 - 08:08

एक छोटीशी कथा.

*********************************

तिने घरी गेल्या गेल्या आई बाबांना हाक मारून समोर बसवून घेतलं. तिचा निर्णय झाला होता पण तो निर्णय त्याला सांगण्यापूर्वी तिला आपल्या आई बाबांना सांगायच होतं. कपडे बदलून हात पाय धुण्याइतका वेळही तिला वाया घालवायचा नव्हता.
"आई, बाबा मला तुमच्याशी बोलायचय."
"भांडण झालम का कौस्तुभशी तुझं"बाबांनी थट्टेच्या स्वरूपात म्हटलं.
"मला कौस्तुभ बरोबर लग्न करायचं नाहीये."
"अग महिन्यावर लग्न आलं आणि आज असं का म्हणते आहेस अचानक? काय केलं त्याने?"आईने काळजीने विचारलं.
"मला त्याच्या सवयी नाही आवडत."
"अग दोन माणसांच्या सवयी नेहमीच वेगळ्या असतात. थोडं फार अ‍ॅडजस्ट करायलाच लागतं. तुझ्या आईला नाही का घर अगदी स्वच्छ लख्ख लागतं आणि मला नाही जमत म्हणून काय आम्ही लग्न मोडलं का? तुझी आई आवरते आहे आणि तिने पसारा कॉर्नर बनवला आहे माझ्यासाठी."
बाबा नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असत.
"अग तू आज त्याच्य मित्राच्या लग्नाला गेली होतीस ना मग काय झालं तिथे?"
"बाबा हे आजचं नाही आहे, मी लग्न ठरण्याआधीपासून पाहाते आहे आणि आज त्याचा कळस झाला."
"अग काय झालं ते बोल ना, नुसतं गोल गोल काय फिरते आहेस." आई
"आज त्याच्या मित्राचं केव्हिनच्या लग्नाची होतं. पार्टी एकदम मस्त होती, भरपूर खायला प्यायला. हो अगदी प्यायला सुद्धा होतं. आणि जेवणात भरपूर प्रकारचं नॉन व्हेज होतं "
"अच्छा म्हणजे तो नॉन व्हेज खातो आणि ड्रींक्स घेतो का? आणि म्हणून तुला लग्न मोडायचं आहे का?"
"आई नॉन व्हेज मीसुद्धा खाल्लय. मी त्यावर टिका करत नाहीये. तू ऐकणार आहेस पूर्ण का मधे मधे प्रश्नच विचारत राहणार आहेस."
"नमनाला घडाभर तेल ओतू नकोस, लवकर सांग काय ते."
"आई लग्न ठरल्यापासून आम्ही जेव्हा जेव्हा फिरायला गेलो आहोत तेव्हा तेव्हा मी पाहिलय त्याचं लक्ष माझ्याकडे कमी आणि आजूबाजूच्या मुलींकडे जास्त असतं. मी कधी फारसं मनावर घेतलं नाही. शिवाय दर वेळी हॉटेलात खायला गेल्यावर तीन चार डिशेस मागवायच्या आणि अर्थातच सगळं खाऊन होत नाही त्यामुळे त्या फुकट घालवायच्या. आज सुद्धा तसच झालं. एक तर केव्हिनच्या पार्टीत ड्रींक्स होते. हा बराच प्यायला त्यासोबत त्याने बरेच स्टार्टर्स खाल्ले. पार्टीत डान्स चालू होता तर तो डान्स करायलाही गेला. केव्हिनच्या बायकोची ज्युलीची एक मैत्रिण होती तिच्यासोबत डान्स करत होता. परक्या मुलीशी लगट करावी ती किती? काही सीमाच नाही. त्या मुलीनेच कंटाळून डान्स पार्टनर बदलला. तिच्याशी डान्स करून झाल्यावर मग अजून एका मुलीबरोबर डान्स केला त्याने, तेव्हाही तेच. मला पाहूनच संताप आला.
त्याचा डान्स करून झाला, मग आम्ही दोघं जेवायला गेलो, मी त्याला म्हणत होते, तुझ्या मित्रांसाठी जेवायचं थांबूया, पण त्याने जेवायला घेतलं. पूर्ण ताट भरून फक्त नॉन व्हेज. अर्धसुद्धा खाल्लं नसेल बाकीच फेकून दिलं. तेव्हा आम्ही दोघांनीच जेवायला घेतलं होतं. मग केव्हिन आणि ज्युली जेवायला बसले तेव्हा मित्रांसोबत पुन्हा हा जेवायला बसला, पुन्हा तेच, ताट भरून जेवण घेतलं पण अर्ध्याहून जास्त फुकट घालवलं. शेवटी मी त्याच्या मित्राशी परमिंदरशी बोलले, ह्या त्याच्या सवयीबद्दल, तो म्हणाला, कौस्तुभ नेहमी असाच वागतो, खूप डिशेस मागवतो, खूप वाढून घेतो, आणि फुकट घालवतो. पूर्वी तो ड्रींक्स सुद्धा फुकट घालवायचा. तो जेवायला सोबत असला की त्याचे मित्र त्याच्या आधी वाढून घेतात आणि त्याला जास्तीची कोणतीही ऑर्डर द्यायला बंदी असते. तरी त्याने जर ऑर्डर केलेच तर त्याचं बील त्यालाच भरायला लावतात. परमिंदर केव्हिन श्रीराम आणि कौस्तुभ इंजिनियरिंगपासून एकत्र आहेत. परमिंदर म्हणाला गेली दहा वर्ष तरी त्याचं वागणं बदललं नाही. एकदा तर त्याच्या मित्रांनी त्याला मानसोपचार तज्ञाकडेही नेलं होतं. त्याने सांगितलं ह्याला कोणताही आजार नाहीये, फक्त पैशाचा माज आहे.
मला किळस आली हे सगळं पाहून आणि ऐकून आणि म्हणून मी ठरवलय मी कौस्तुभशी लग्न करणार नाही. आता मला प्लीज हे सांगू नका की स्वभाव बदलेल आणि एवढ्याश्या कारणासाठी लग्न मोडायची गरज नाही. मी अशा माणसासोबत आयुष्य काढू शकत नाही. तेव्हा आता आपण बसून हे ठरवू की त्याच्या घरी हे कसं कळवायचं. "

अशा तर्‍हेने इतर सर्व गोष्टी मेळ खात असतानाही जुईने लग्नाच्या एक महिना आधी स्वतःच लग्न मोडलं. कौस्तुभच्या घरी लग्न का मोडलं ह्याचं कारण सांगताना जुईच्या आईवडिलांना खूप त्रास झाला, पण जुईने ठरवलं होतं खोटं बोलायचं नाही. कौस्तुभ आणि जुईचे घर जवळ जवळ असल्याने त्यांच्या कुटुंबियात मित्रमंडळी कॉमन होते.त्या कॉमन मित्रमंडळींपैकी कोणीच जुईसाठी स्थळ आणले नाही.
यथावकाश जुईच लग्न झालं. कौस्तुभचं लग्न देखील झालं परंतु आजही कौस्तुभचे आईवडिल जिथे शक्य असेल तिथे - कॉमन मित्रमंडळींमध्ये जुईला दोष देतात.

तिचं चुकलं की बरोबर हे तुमचं तुम्हीच ठरवा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, डेलिया आणि स्वस्ति यांना अनुमोदन.
शेवट सुचवा भन्नाट आयडिया आहे... "आक्षेप" च्या बीबीवर गडाबडा लोळले होते... Lol

Pages