मृत्युंजय

Submitted by व्यत्यय on 18 January, 2014 - 09:50

सर्व जगंच कसं नीट आखीव रेखीव आणि सुंदर होतं.
झोपडपट्ट्या नव्हत्या, गरीबी नव्हती. युद्ध नव्हती, कोणीही जन्मत: अधू किंवा अपंग नव्हतं. मनोरुग्णांचे कोंडवाडे नव्हते. वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाने सर्वच रोगांवर विजय मिळवलेला. अगदी म्हातारपणावर देखील. अपघातांमुळे होणारे तुरळक मृत्यू सोडले तर “मरण” हे काही कर्मठ विचारसरणीच्या लोकांचा दुराग्रह होता.
युनिट “सी” रूग्णालयाच्या प्रसुती विभागात अर्जुन एकटाच बसला होता. हल्ली कुठल्याही रूग्णालयाचा प्रसुती विभाग क्वचितच वापरला जायचा. जगाची लोकसंख्या १२ अब्ज एवढीच संतुलित ठेवण्यासाठी नवीन मुलांना जन्म देण्यावर प्रतिबंध लागू केले गेले होते. तुम्हाला तरुण ठेवणाऱ्या औषधांमधेच संततीनियमनाची औषधंही मिसळण्यात यायची. क्वचित कधी कोणी मेले तरच आणि तेव्हढ्याच मुलांना जन्म द्यायची परवानगी मिळायची. लोकं कित्येक दशकं वेटिंग लिस्टचा भाग बनून राहायचे. काही सहस्त्रकांपुर्वी अर्जुनच्या देशामध्ये साध्या दूरध्वनीसाठी असंच वर्षानुवर्ष ताटकळत रहावं लागे म्हणे. अनिर्बंध लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे सध्याची व्यवस्था योग्यच असलेल्याचं बहुसंख्याचं मत होतं. याविरुद्ध मत असणारे महाभाग एकतर स्वेच्छामरण पत्करत किंवा ढोंगी म्हणून त्यांच्या मताकडे दुर्लक्ष केले जाई.
बाप बनण्याची अर्जुनची घालमेल ओळखून त्याच्या बाबांनी स्वेच्छामरणाची तयारी दाखवली होती. त्यांच्या स्वेच्छामरण स्वीकारण्याच्या प्रतिज्ञापत्रामुळेच केवळ ७३ व्या वर्षी अर्जुन बाबा बनू शकणार होता. अर्थात आपल्या नातवंडांबरोबर काही दिवस घालवायची मुभा त्यांना मिळाली होती. आपल्या मृत्यूबद्दल कसलाही किंतु मनात न बाळगण्याबद्दल अर्जुनच्या बाबांनी अर्जुनची समजूत काढली. पण तरीही अर्जुनच्या मनात अपराधीपणाची भावना डोकावायचीच.
समोरच्या काचेच्या दरवाज्यामधे पडलेलं प्रतिबिंब त्याच्याकडे टक लाऊन बघत होतं. ज्या काळी चेहऱ्यावरून माणसाच्या वयाचा अंदाज बांधता येत असे तेव्हा अर्जुनचं वय पंचविशीच्या आजूबाजूला गणलं गेलं असतं. पण त्या चेहऱ्यावर होऊ घातलेल्या जुळ्या मुलांचा आनंद शोधूनही सापडत नव्हता. स्वेच्छामरणाला तयार व्यक्ती एकच पण होऊ घातलेली मुलं मात्र दोन. आता दुसरा कोणीतरी स्वयंसेवक शोधावा किंवा आपल्या एका मुलाला जन्मल्या जन्मल्याच कायमचं झोपवायचं अशा धर्मसंकटात अर्जुन अडकलेला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मरण पत्करा अशी विनंती करायला त्याची जीभ रेटेना.
विशेष आपत्कालीन परिस्थिती म्हणून आपल्या दोन्ही मुलांना जगायला मिळावे म्हणून अर्जुनने अर्ज केला होता. संबंधित अधिकाऱ्याने त्याचा अर्ज ठामपणे फेटाळला. त्या अर्जावर पुनर्विचार करण्याची विनंती करायला अर्जुन त्या अधिकाऱ्याला भेटायला गेला होता. अधिकाऱ्यारने सुरुवातीला नम्रपणे अर्जुनला नकार कळवला. पण शेवटी नाईलाजाने सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून त्याने अर्जुनला केबिन बाहेर काढले. त्याच केबिन बाहेर अर्जुन विमनस्कपणे बसला होता. अगतिकता, अपराधीपणा, राग अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ त्याच्या मनी उठलेला. तेवढ्यात दरवाजा उघडून तो अधिकारी बाहेर आला. अर्जुनला अजूनही समोर बसलेला बघून त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. ती नाराजी बघून अर्जुनच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. खाडकन उठून त्याने आपल्या खिशातून चाकू काढला आणि पुन्हा पुन्हा त्या अधिकाऱ्याच्या छातीत खुपसला. तो मेलाय याची खात्री झाल्यावर तोच चाकू त्याने आपल्या छातीत खुपसून घेतला. आपल्या दोन्ही मुलांबरोबरच आता आपल्या बाबांनाही पुढे जगायला मिळेल या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर विकट हसू पसरले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

brave.jpg

तुमचा लेख आवडला. अल्डस हक्सली च्या 'Brave new world' ची २०१४ ची मिनी आवृत्ती म्हणणे योग्य ठरेल.
छान कल्पनाविलास आहे. तुम्ही डॉक्टर आहात काय? निदान समाजशास्त्र विद्यार्थी तरी?

कल्पना फार आवडली. मस्त कथा.

फक्त, अर्जुनच्या मनातील विचार (प्रथम पुरुषी एकवचनी) स्वरूपात लिहिली असती तर जास्त परिणामकारक झाली असती असे वाटते.

धन्यवाद.
मूळ कल्पना पूर्णपणे माझी असं दावा मी करणार नाही. कधीतरी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी कथा/कादंबरीवरून ही कल्पना बरेच दिवस डोक्यात घोळत होती. नक्की कुठली कादंबरी ते आता आठवत नाही.

@सुरेश शिंदे: नाही हो, मी अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी होतो.

@मामी: मी आधी प्रथम पुरुषी एकवचनी लिहायला सुरुवात केली होती, पण खूप दिवस ही कथा अर्धवट अवस्थेत पडून होती. शेवटी बरीच काट-छाट करत काल मी घाई घाई मधे पूर्ण केली.

माझ्याहून अधिक प्रतिभावंत लेखकाला ही कल्पना नक्कीच खुप छान फुलवता येईल. मी देखील पुन्हा प्रयत्न करेन

कल्पना चांगली आहे पण चौकट मिसींग आहे.
जन्म/मृत्यु तसेच आयुष्य देखील कंट्रोल मधे असेल तर जुळे होणे missmatch वाटत आहे.
कथेचा विस्तार करून बघा.. लूपपोल निघून जातील...

घाईत नको... दोनतीन भाग झाले तरी चालेल...

माफ करा....कथेची कल्पना छान आहे म्हणून फक्त चांगली कथा होताहोता राहु नये म्हणून लिहीले

@उदयन : माफी मागायची अजिबातच गरज नाही.

खरंतर अनपेक्षित रित्या जुळी मुले होणं हेच या कथेचं मध्यवर्ती नाटय आहे. कितीही विस्तार केला तरी मला हा मुद्दा सोडता येणार नाही. तुम्ही काही कल्पना सुचवू शकता का?

चांगलीय! काही दिवसांपुर्वी 'इन टाइम' असा काहीतरी सिनेमा पाहिला होता....मध्यवर्ती कल्पना त्यातही अशीच होती!

जर जुळे हाच एक पाँईन्ट आहे तर कथेचा ग्राऊंड मधे बदल करावा लागेल
जसजशी कथा पुढे जाईल तसतसे वाचकाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळात जाईल