करायला गेले गूळपोळी...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

साहित्य: सारणासाठी- दोन वाट्या किसलेला गूळ, पाऊण वाटी तिळाचा कूट, एक वाटी बेसन, १/४ जायफळ
पारीसाठी- दोन वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, एक कणी मीठ, एक डाव तेल

कृती: इ.स. १८५७ मधे आपल्या मातोश्रींना विचारुन गूळपोळीची कृती एका चिठोर्‍यावर लिहून घेणे. घर बदलले, नोकरी बदलली, घरात लहान बाळ आल्यावर आयुष्य उलटे-पालटे बदलले तरी तो चिठोरा प्राणांहुन अधिक जपून ठेवणे. पूढे २०१० सालात संक्रांतीच्या आगेमागे कुणी नवी-जुनी गृहिणी "पाककृती माहिती आहे का" धाग्यावर गूळपोळीची कृती विचारेल. तिच्या पाठोपाठ अजून एखादी 'घरात तूर डाळ, राजगिरा आणि धाकट्याच्या वाढदिवसाला केक करायला आणली होती ती ब्राऊन शुगर एवढेच जिन्नस आहेत. दुकानात जायला वेळ नाही. तेव्हा आहे त्या सामानात गूळपोळी करता येइल अशी कृती सांगा की' अशी लाडिक विनवणी करेल. मायबोलीवरील दादा लोक तुरीच्या डाळीपासून अमृत बनवु शकतात तर गूळपोळी क्या चीज ? ह्या विनंत्यांचा मान ठेवून लगबगीने एक फक्कड हमखास यशस्वी कृती येइल. ह्या सर्वांकडे 'काय पण स्वयंपाकी जमलेत' असा विचार करुन तु क टाकावा. संक्रांत जवळ येइल तशा 'माकाचु' वरील पोस्टींची वाढती संख्या बघून गालातल्या गालात हसावे. गूळपोळीच्या नावाने तोंडाला पाणी सुटेल त्याकडे लक्षपुर्वक दुर्लक्ष करावे. पण मग आपल्या मैत्रिणींच्या विपू, नेहेमीचे बाफ, पाककृती विभाग असे सगळे नुसते गूळपोळीमय झाल्यावर 'मी पण गूळपोळी करणार' असे एकीच्या विपूत जाहिर करावे. एक ते दोन तासांत सगळ्या मायबोलीवर खबर पोचेल आणि (न विचारताच) गूळपोळी विषयावर विपूमागून विपू येतील. गूळपोळी बिघडल्यास त्याचा मायक्रोवेव्हमधे बकलावा करावा (आणि सासरच्या पाहुण्यांना खाऊ घालावा) अशा पण विपू येतील. त्या सर्व विपू फक्त वाचाव्यात. आपल्या सुगरणपणाच्या कमाल आणि किमान मर्यादा फक्त एक आपली जन्मदात्री ओळखून असते त्यामुळे तिने सांगितलेल्या कृतीनेच गूळपोळी करावी. त्यासाठी घरी येऊन निमूट "तो" चिठोरा शोधावा.

ती कृती वाचता वाचता माकाचु वरील पोस्टी आठवून पोटात गोळा येइल. नकोच ती गूळपोळी त्यापेक्षा भारतात जाऊन खाऊन येते असा विचार करुन चिठोरा रोज दिसेल अशा ठिकाणी ठेऊन द्यावा. तसे पण आईच्या हातची सर येणार आहे का माझ्या गूळपोळीला ? पण गूळपेळी करणार अशी खबर कानोकानी झाल्याने 'मी करणार(च) आहे' असे शक्य होइल तिथे सांगत रहावे. संक्रातीच्या दिवशी सगळ्यांना 'केली का गूळपोळी ?' विचारत सुटावे. एखादी मैत्रिण आस्थेने गूळपोळी कशी झाली विचारेल तर संक्रांत वीक डे ला आहे ह्याचा (गैर)फायदा घेऊन नोकरीच्या नावाने 'नै बै..वीक डे ला गूळपोळी ? छे छे काय शक्यय हाश्श हुश्श' करावे. आईला पण 'अगं वीक एंडला करणारच आहे गूळपोळी' असे सांगून प्रत्यक्ष करायची वेळ येइल तेव्हा गव्हाची खीर करावी. ह्याच दरम्यान भारतातून आणलेले सामान देण्याच्या निमित्ताने (आणि गूळपोळीच्या मिषाने) फचिन घरी यायचं म्हणेल. त्याला मामा बनवण्याचे सर्व हक्क अपल्या लेकाने राखून ठेवल्याचा फायदा घ्यावा आणि गूळपोळी व्यतिरिक्त इतर चारीठाव स्वयंपाक करावा. संक्रांत उलटुन रथसप्प्तमी सुद्धा गेल्यावर गूळपोळीच्या प्रकरणावर पडदा पडला अशी स्वत:ची समजूत घालावी.

अशातच एके दिवशी अचानक ध्यानीमनी नसताना प्रीतिकडे गूळपोळी खायचा योग येइल आणि गूळपोळीची खुमखुमी टरारुन वर आलेल्या हरभर्‍यासारखी (साभारः प्रा. देशपांडे) वर येईल. ह्यानंतर वीक डे/वीक एंड ह्याची पर्वा न करता जो पहिला रिकामा दिवस हाती लागेल तेव्हा "तो" चिठोरा बाहेर काढावा आणि मग.....

पारीसाठी साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तशी कणिक भिजवून घेणे. त्याला तेलाचा हात लावून झाकून ठेवणे. मग गूळपोळीसाठी गूळ किसून घ्यायचा असतो हे विसरुन सुरीने गुळाच्या जमेल तशा खपल्या काढायला सुरुवात करणे. तुम्ही रहात असाल तिथल्या हवामानामुळे गूळ कोरडा पडला असेल तर सुरीने भोस्कुन त्याचे वेडेवाकडे खडे पाडणे. मनात 'पग्या आणि पूनम येडेच आहेत म्हणे कूकरमधे गूळ मऊ करुन घ्या' वगैरे विचार चालु द्यावेत. एकीकडे तूप घालुन बेसन भाजायला घेणे. थंड हवेत नदी थिजते तुपाची काय कथा हे लक्षात आल्यावर ते बेसन बाजुला ठेवून अर्धी वाटी बेसन तेल घालून पुन्हा भाजायला घेणे. गुळाच्या पुरेशा खपल्या आणि खडे जमले की त्यात तिळाचा कूट घालणे. एव्हाना गूळ किसून घ्यायचा असतो ह्याची आठवण येइलच. काय मी करु, कसं मी करु ह्या अवस्थेत थोडा वेळ गेल्यावर करपत्या बेसनाच्या वासाने भान येइल. भर्रकन ते एका ताटात काढून गार करायला ठेवणे. त्या खड्यांचं काय मी करु, कसं मी करु सुरुच ठेवणे. पण....घाबरायचे काही कारणच नाही. स्वत:मधल्या कप्लक सुगरणीची ओळख पटवून द्यायची हीच वेळ आहे. गरम बेसन जर गुळात घातले तर ते खडे नक्कीच वितळतील. विचार पूर्ण व्हायच्या आत कृती करावी. नाही तर "बेसन गरम असताना गुळात घालु नकोस, गूळ वितळायला लागेल आणि सारण चिक्कट होइल" हा आईने दिलेला सल्ला आठवेल. योग्य वेळ टळुन गेल्यावर हा सल्ला आठवला की पुन्हा काय मी करु, कसं मी करु !!! हृदयाचे ठोके जरा सावकाश पडायला लागले की इकडे तिकडे नजर टाकावी. नवरा नजरेच्या टप्प्यात आल्यास त्याला 'अब (ये गूळ वितळने लगा तो) मै क्या करु ?' असे विचारावे. तो अर्थातच 'आमच्यात गूळपोळी खात नाहीत, करत तर त्याहुन नाहीत' असं म्हणून जबाबदारी झटकेल तेव्हा नुसत्या नजरेने त्याला टप्प्याबाहेर घालवावे. आता तीच नजर इकडे-तिकडे गरागरा फिरवत काय मी करु, कसं मी करु !!! चॉप सेटिंगवर मिक्सरमधून काढले सगळे तर खडे फुटतील काय ? सुगरण लागली कामाला. ते सगळं मिक्सरच्या भांड्यात ओतून ऑन बटन दाबले रे दाबले पुर्वायुष्यातली एक नको ती आठवण येइल. पहिल्यांदा बटाट्याचे पराठे करायचे होते तेव्हा अर्धवट शिजलेल्या बटाट्यातले खडे फोडण्यासाठी सारण असेच मिक्सरमधे फिरवले होते. चिक्कट झालेले ते भांडे दोनदा डिश वॉशरमधे आणि अर्धा डझनवेळा हाताने धुवावे लागले होते. पण त्यात काssssय..होतं असं कधी कधी...नै का ? ह्या सारणाचं तसं होइलच असं काही नाही. आणि झालं तsssssर ? नुसत्या विचारानेच ठोके धावु लागतील. ते काबूत आणून एका डावाने सगळे मिश्रण हलवावे. गूळ पुरेसा कोरडा असल्याने चिकट्ट वगैरे काही झाले नसेल. मग नव्या जोमाने मिक्सर चालु करावा व शक्य तेव्हढे दळण दळावे. काही कुच्चर खडे तसेच राहतील ते आपल्या पोळी लाटण्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवून राहु द्यावेत. हुश्श !!! आता जरा दम खावा.

आता गूळपोळी करायला घ्यावी. सारण बर्‍यापैकी कोरडे आसल्याने पारीत भरुन त्याचा गोळा वळताना तारांबळ उडेल. 'इतकी तारांबळ तर लेकाला पहिल्यांदा आंघोळ घालताना झाली नव्हती' असे शेरे घरातल्या काही व्यक्ती देतील पण त्यांना मह्त्व द्यायचे कारण नाही. कसेबसे पारीचे तोंड बंद करुन पोळी लाटायला घ्यावी. पहिलीच पोळी न फुटता लाटली जाइल (कारण सारण पुरेसे भरलेच नाही). अत्यानंदाने दोन्ही हातांवर छान तोलत ती तव्यावर टाकावी. पुरी फुगावी तशी ती पोळी टम्म फुगेल (कारण सारण पुरेसे भरलेच नाही...लक्षात येतय का ?). पहिली पोळी भाजून दहा मिनिटे झाली तरी दुसरी अर्धीच लाटली गेली आहे ह्याचे वाईट वाटून घेऊ नये. त्याला कारण म्हणजे लाटणे. त्या लाटण्याने पोळ्या भराभरा लाटल्याच जात नाहीत. दुसरे लाटणे आपल्या बाळाच्या कृपेने गेस्ट रुममधल्या बेडखाली सापडेल. पहिले टाकून हे दुसरे (स्वच्छ धुवून) घ्यावे. उरलेली पोळी लाटून तव्यावर. ही पण टम्म फुगेल. पहिली गार झालेली पोळी उचलुन बघावी तर त्याचा खुळखुळा (कारण सारण पुरेसे भरलेच नाही...आले लक्षात). सारण कोरडे असल्याने नीट भरले जात नाहीये लक्षात आल्यावर सारणाला कोमट दुधाचा हात लावावा. सारण ओलसर झाल्यावर त्याला आई करते तशा सारणाचा रंग येइल (मग जरा हुश्श वाटेल). आता वेळ न घालवता सारणाचे गोळे करुन ठेवावेत. पारीसाठी लाट्या कराव्यात आणि (नव्या लाटण्याने) जोमात पोळ्या लाटायला घ्याव्यात. छान कडेपर्यंत सारण पसरत जाऊन सरसर पोळ्या लाटल्या जातील. अर्धा डझन तरी कराव्याच (पहिल्या दोन माकाचु सदस्य वगळून). ताजं तूप लावलेली पोळी लेकाला खाऊ घालून त्याचे तोंड सुद्धा न धुता गूळपोळ्या केल्याची खुषखबर पार्ल्यात द्यावी. तिथल्या काकवांची आणि काकांची गूळपोळी केव्हाचीच करुन, खाऊन, पचवून झाल्यामुळे ते तुमचा आणि तुमच्या गूळपोळीचा अनुल्लेख करतील. पण इतक्या खटपटींनंतर यशस्वी गूळपोळी करुन तुम्ही स्वत:ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे तिथुनच पार्लेकरांकडे तु क टाकावा. अशी ही तु.क. ने सुरु होऊन तु. क. वर संपलेली गूळपोळीची यशस्वी कृती. पहा बरं तुम्हाला आवडते का ? Wink

त. टि. वर सांगितलेले सर्व प्रसंग, पूनम-पग्या-प्रीति-फचिन ही पात्र (:फिदी:), पोलपाट, दोन्ही लाटणी आणि पोळ्या काल्पनिक नाहीत.

विषय: 
प्रकार: 

धमाल लेख!

'मी पण गूळपोळी करणार' असे एकीच्या विपूत जाहिर करावे. एक ते दोन तासांत सगळ्या मायबोलीवर खबर पोचेल आणि (न विचारताच) गूळपोळी विषयावर विपूमागून विपू येतील. गूळपोळी बिघडल्यास त्याचा मायक्रोवेव्हमधे बकलावा करावा (आणि सासरच्या पाहुण्यांना खाऊ घालावा) अशा पण विपू येतील.

हा हा, एक नंबर!

>>आता तुला या धाग्यावर यायची गरज नाही Proud

नाही कशी? आले नाही तर फोटो कसा टाकणार? Proud

आधी एकदोनदा केल्या होत्या. पण गूळपोळीपेक्षा गूळभाकरी झाली होती. पारीत डाळीच्या पिठाची आयडिया मस्तं आहे. त्यामुळे की काय, पोळी कमी फाटली.

gooLpoLyaa-maayboli.jpg

वा वा सुंदर दिसताएत पोळ्या. त्या निमित्ताने गूळपोळीचा टिआर्पी वाढला. आता तृप्ती आवटींना वेगळी रिक्षा फिरवायला नको Proud

धन्यवाद! फोटोत धड रंग दिसत नाहीत. प्रत्यक्षात त्या ब्लाँड सुंदरीच्या केशसंभाराइतक्या सुंदर सोनेरी दिस्तात. Proud

पण तुपाची वाटी फारच छोटुली आहे का? >>> तेच की... थंडीत आपल्या शरीराला जास्त स्निग्ध पदार्थांची गरज असते Wink ते वाटीतलं तूप एका पोळीलाही पुरणार नाही.

छान दिसत आहेत पोळ्या.

वॉव. पोळ्या फक्कड दिसतायेत मृण.

मी या वर्षी ऑर्गॅनिक गूळ आणला होता पोळ्यांसाठी. पण सिंडीने डिक्लेअर केलं की त्याने तिळगूळ काही नीट होत नाही, त्यामुळे गुळपोळीचाही बेत बारगळला. आता हा लेख आणि मृणचे फोटो पाहून परत हात शिवशिवत आहेत. काय करू? Uhoh Proud

करून बघ आणि इकडे लिही कश्या झाल्या ते...म्हणजे घडल्या की बिघडल्या? मग मी ठरवेन... करायच्या की नाहीत ते. Proud

तिळगूळ काही नीट होत नाही, त्यामुळे गुळपोळीचाही बेत बारगळला >>> शिवाय संक्रांत मंगळवारी आली Wink

मी पण नाही केल्या. आमच्या सासुबाईंच्या भावजयीच्या माहेरी मंगळवारी गूळपोळ्या करत नाहीत म्हणे Proud

>>मी पण नाही केल्या. आमच्या सासुबाईंच्या भावजयीच्या माहेरी मंगळवारी गूळपोळ्या करत नाहीत म्हणे >> Lol

सगळ्यांना धन्यवाद!

खरंच करून बघा. पारीचं प्रमाण चुकवलं नाही. सारण एकत्र केल्यावर मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घेतलं. त्यामुळे मस्तं झाल्यात.

हो हो. तूप तेवढंच खायचं. Proud तर्जनीचं टोक वाटीत (एकदाच) बुडवून एका पोळीला लावायचं. इकडे देहात ऑलरेडी स्निग्ध पदार्थरिझर्व्ह्स भरपूर आहेत. पुढल्या अनेक थंड्यांना पुरतील. Proud

सायो, गूळ अगदीच भंकस आहे. देशी दुकानातला, नॉन-कोल्हापुरी, भगराळ. पण माय्क्रोवेव्हमधे कोमट करून खपल्या काढल्यावर मऊ झाला.

>>मी पण नाही केल्या. आमच्या सासुबाईंच्या भावजयीच्या माहेरी मंगळवारी गूळपोळ्या करत नाहीत म्हणे Lol

आमच्या सासुबाईंच्या भावजयीच्या माहेरी मंगळवारी गूळपोळ्या करत नाहीत म्हणे >>> Rofl

अखेर मर्त्य मानव असल्याने मोहाला बळी पडलेच Wink केल्याच शेवटी आज. ऑर्गॅनिक गुळाच्या. छान झाल्या आहेत.

मीही मोहाला बळी पडुन काल केल्या गुळपोळ्या.
माझ्या काही पोळ्या तव्याला फार आवडल्या. त्याने त्या धरुन ठेवल्या. भरपूर गूळ बाहेर आला. राडा झाला.
पण निम्म्यापेक्शा जास्त पोळ्या उत्तम झाल्या. सोप्प्या रेसिपीसाठी धन्यवाद.

आता पोळ्या फुटू नयेत म्हणुन टिप्स द्या बरे.

हा अगाध धागा वर आणून जगावर संक्रांतीच्या दिवशी कृपा केल्याबद्दल अनंत धन्यु!

(धागा वाचून झाला आहे. पोळ्या केल्या की नाही केल्या असे विचारायचे नाही Proud )

Pages