करायला गेले गूळपोळी...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

साहित्य: सारणासाठी- दोन वाट्या किसलेला गूळ, पाऊण वाटी तिळाचा कूट, एक वाटी बेसन, १/४ जायफळ
पारीसाठी- दोन वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, एक कणी मीठ, एक डाव तेल

कृती: इ.स. १८५७ मधे आपल्या मातोश्रींना विचारुन गूळपोळीची कृती एका चिठोर्‍यावर लिहून घेणे. घर बदलले, नोकरी बदलली, घरात लहान बाळ आल्यावर आयुष्य उलटे-पालटे बदलले तरी तो चिठोरा प्राणांहुन अधिक जपून ठेवणे. पूढे २०१० सालात संक्रांतीच्या आगेमागे कुणी नवी-जुनी गृहिणी "पाककृती माहिती आहे का" धाग्यावर गूळपोळीची कृती विचारेल. तिच्या पाठोपाठ अजून एखादी 'घरात तूर डाळ, राजगिरा आणि धाकट्याच्या वाढदिवसाला केक करायला आणली होती ती ब्राऊन शुगर एवढेच जिन्नस आहेत. दुकानात जायला वेळ नाही. तेव्हा आहे त्या सामानात गूळपोळी करता येइल अशी कृती सांगा की' अशी लाडिक विनवणी करेल. मायबोलीवरील दादा लोक तुरीच्या डाळीपासून अमृत बनवु शकतात तर गूळपोळी क्या चीज ? ह्या विनंत्यांचा मान ठेवून लगबगीने एक फक्कड हमखास यशस्वी कृती येइल. ह्या सर्वांकडे 'काय पण स्वयंपाकी जमलेत' असा विचार करुन तु क टाकावा. संक्रांत जवळ येइल तशा 'माकाचु' वरील पोस्टींची वाढती संख्या बघून गालातल्या गालात हसावे. गूळपोळीच्या नावाने तोंडाला पाणी सुटेल त्याकडे लक्षपुर्वक दुर्लक्ष करावे. पण मग आपल्या मैत्रिणींच्या विपू, नेहेमीचे बाफ, पाककृती विभाग असे सगळे नुसते गूळपोळीमय झाल्यावर 'मी पण गूळपोळी करणार' असे एकीच्या विपूत जाहिर करावे. एक ते दोन तासांत सगळ्या मायबोलीवर खबर पोचेल आणि (न विचारताच) गूळपोळी विषयावर विपूमागून विपू येतील. गूळपोळी बिघडल्यास त्याचा मायक्रोवेव्हमधे बकलावा करावा (आणि सासरच्या पाहुण्यांना खाऊ घालावा) अशा पण विपू येतील. त्या सर्व विपू फक्त वाचाव्यात. आपल्या सुगरणपणाच्या कमाल आणि किमान मर्यादा फक्त एक आपली जन्मदात्री ओळखून असते त्यामुळे तिने सांगितलेल्या कृतीनेच गूळपोळी करावी. त्यासाठी घरी येऊन निमूट "तो" चिठोरा शोधावा.

ती कृती वाचता वाचता माकाचु वरील पोस्टी आठवून पोटात गोळा येइल. नकोच ती गूळपोळी त्यापेक्षा भारतात जाऊन खाऊन येते असा विचार करुन चिठोरा रोज दिसेल अशा ठिकाणी ठेऊन द्यावा. तसे पण आईच्या हातची सर येणार आहे का माझ्या गूळपोळीला ? पण गूळपेळी करणार अशी खबर कानोकानी झाल्याने 'मी करणार(च) आहे' असे शक्य होइल तिथे सांगत रहावे. संक्रातीच्या दिवशी सगळ्यांना 'केली का गूळपोळी ?' विचारत सुटावे. एखादी मैत्रिण आस्थेने गूळपोळी कशी झाली विचारेल तर संक्रांत वीक डे ला आहे ह्याचा (गैर)फायदा घेऊन नोकरीच्या नावाने 'नै बै..वीक डे ला गूळपोळी ? छे छे काय शक्यय हाश्श हुश्श' करावे. आईला पण 'अगं वीक एंडला करणारच आहे गूळपोळी' असे सांगून प्रत्यक्ष करायची वेळ येइल तेव्हा गव्हाची खीर करावी. ह्याच दरम्यान भारतातून आणलेले सामान देण्याच्या निमित्ताने (आणि गूळपोळीच्या मिषाने) फचिन घरी यायचं म्हणेल. त्याला मामा बनवण्याचे सर्व हक्क अपल्या लेकाने राखून ठेवल्याचा फायदा घ्यावा आणि गूळपोळी व्यतिरिक्त इतर चारीठाव स्वयंपाक करावा. संक्रांत उलटुन रथसप्प्तमी सुद्धा गेल्यावर गूळपोळीच्या प्रकरणावर पडदा पडला अशी स्वत:ची समजूत घालावी.

अशातच एके दिवशी अचानक ध्यानीमनी नसताना प्रीतिकडे गूळपोळी खायचा योग येइल आणि गूळपोळीची खुमखुमी टरारुन वर आलेल्या हरभर्‍यासारखी (साभारः प्रा. देशपांडे) वर येईल. ह्यानंतर वीक डे/वीक एंड ह्याची पर्वा न करता जो पहिला रिकामा दिवस हाती लागेल तेव्हा "तो" चिठोरा बाहेर काढावा आणि मग.....

पारीसाठी साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तशी कणिक भिजवून घेणे. त्याला तेलाचा हात लावून झाकून ठेवणे. मग गूळपोळीसाठी गूळ किसून घ्यायचा असतो हे विसरुन सुरीने गुळाच्या जमेल तशा खपल्या काढायला सुरुवात करणे. तुम्ही रहात असाल तिथल्या हवामानामुळे गूळ कोरडा पडला असेल तर सुरीने भोस्कुन त्याचे वेडेवाकडे खडे पाडणे. मनात 'पग्या आणि पूनम येडेच आहेत म्हणे कूकरमधे गूळ मऊ करुन घ्या' वगैरे विचार चालु द्यावेत. एकीकडे तूप घालुन बेसन भाजायला घेणे. थंड हवेत नदी थिजते तुपाची काय कथा हे लक्षात आल्यावर ते बेसन बाजुला ठेवून अर्धी वाटी बेसन तेल घालून पुन्हा भाजायला घेणे. गुळाच्या पुरेशा खपल्या आणि खडे जमले की त्यात तिळाचा कूट घालणे. एव्हाना गूळ किसून घ्यायचा असतो ह्याची आठवण येइलच. काय मी करु, कसं मी करु ह्या अवस्थेत थोडा वेळ गेल्यावर करपत्या बेसनाच्या वासाने भान येइल. भर्रकन ते एका ताटात काढून गार करायला ठेवणे. त्या खड्यांचं काय मी करु, कसं मी करु सुरुच ठेवणे. पण....घाबरायचे काही कारणच नाही. स्वत:मधल्या कप्लक सुगरणीची ओळख पटवून द्यायची हीच वेळ आहे. गरम बेसन जर गुळात घातले तर ते खडे नक्कीच वितळतील. विचार पूर्ण व्हायच्या आत कृती करावी. नाही तर "बेसन गरम असताना गुळात घालु नकोस, गूळ वितळायला लागेल आणि सारण चिक्कट होइल" हा आईने दिलेला सल्ला आठवेल. योग्य वेळ टळुन गेल्यावर हा सल्ला आठवला की पुन्हा काय मी करु, कसं मी करु !!! हृदयाचे ठोके जरा सावकाश पडायला लागले की इकडे तिकडे नजर टाकावी. नवरा नजरेच्या टप्प्यात आल्यास त्याला 'अब (ये गूळ वितळने लगा तो) मै क्या करु ?' असे विचारावे. तो अर्थातच 'आमच्यात गूळपोळी खात नाहीत, करत तर त्याहुन नाहीत' असं म्हणून जबाबदारी झटकेल तेव्हा नुसत्या नजरेने त्याला टप्प्याबाहेर घालवावे. आता तीच नजर इकडे-तिकडे गरागरा फिरवत काय मी करु, कसं मी करु !!! चॉप सेटिंगवर मिक्सरमधून काढले सगळे तर खडे फुटतील काय ? सुगरण लागली कामाला. ते सगळं मिक्सरच्या भांड्यात ओतून ऑन बटन दाबले रे दाबले पुर्वायुष्यातली एक नको ती आठवण येइल. पहिल्यांदा बटाट्याचे पराठे करायचे होते तेव्हा अर्धवट शिजलेल्या बटाट्यातले खडे फोडण्यासाठी सारण असेच मिक्सरमधे फिरवले होते. चिक्कट झालेले ते भांडे दोनदा डिश वॉशरमधे आणि अर्धा डझनवेळा हाताने धुवावे लागले होते. पण त्यात काssssय..होतं असं कधी कधी...नै का ? ह्या सारणाचं तसं होइलच असं काही नाही. आणि झालं तsssssर ? नुसत्या विचारानेच ठोके धावु लागतील. ते काबूत आणून एका डावाने सगळे मिश्रण हलवावे. गूळ पुरेसा कोरडा असल्याने चिकट्ट वगैरे काही झाले नसेल. मग नव्या जोमाने मिक्सर चालु करावा व शक्य तेव्हढे दळण दळावे. काही कुच्चर खडे तसेच राहतील ते आपल्या पोळी लाटण्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवून राहु द्यावेत. हुश्श !!! आता जरा दम खावा.

आता गूळपोळी करायला घ्यावी. सारण बर्‍यापैकी कोरडे आसल्याने पारीत भरुन त्याचा गोळा वळताना तारांबळ उडेल. 'इतकी तारांबळ तर लेकाला पहिल्यांदा आंघोळ घालताना झाली नव्हती' असे शेरे घरातल्या काही व्यक्ती देतील पण त्यांना मह्त्व द्यायचे कारण नाही. कसेबसे पारीचे तोंड बंद करुन पोळी लाटायला घ्यावी. पहिलीच पोळी न फुटता लाटली जाइल (कारण सारण पुरेसे भरलेच नाही). अत्यानंदाने दोन्ही हातांवर छान तोलत ती तव्यावर टाकावी. पुरी फुगावी तशी ती पोळी टम्म फुगेल (कारण सारण पुरेसे भरलेच नाही...लक्षात येतय का ?). पहिली पोळी भाजून दहा मिनिटे झाली तरी दुसरी अर्धीच लाटली गेली आहे ह्याचे वाईट वाटून घेऊ नये. त्याला कारण म्हणजे लाटणे. त्या लाटण्याने पोळ्या भराभरा लाटल्याच जात नाहीत. दुसरे लाटणे आपल्या बाळाच्या कृपेने गेस्ट रुममधल्या बेडखाली सापडेल. पहिले टाकून हे दुसरे (स्वच्छ धुवून) घ्यावे. उरलेली पोळी लाटून तव्यावर. ही पण टम्म फुगेल. पहिली गार झालेली पोळी उचलुन बघावी तर त्याचा खुळखुळा (कारण सारण पुरेसे भरलेच नाही...आले लक्षात). सारण कोरडे असल्याने नीट भरले जात नाहीये लक्षात आल्यावर सारणाला कोमट दुधाचा हात लावावा. सारण ओलसर झाल्यावर त्याला आई करते तशा सारणाचा रंग येइल (मग जरा हुश्श वाटेल). आता वेळ न घालवता सारणाचे गोळे करुन ठेवावेत. पारीसाठी लाट्या कराव्यात आणि (नव्या लाटण्याने) जोमात पोळ्या लाटायला घ्याव्यात. छान कडेपर्यंत सारण पसरत जाऊन सरसर पोळ्या लाटल्या जातील. अर्धा डझन तरी कराव्याच (पहिल्या दोन माकाचु सदस्य वगळून). ताजं तूप लावलेली पोळी लेकाला खाऊ घालून त्याचे तोंड सुद्धा न धुता गूळपोळ्या केल्याची खुषखबर पार्ल्यात द्यावी. तिथल्या काकवांची आणि काकांची गूळपोळी केव्हाचीच करुन, खाऊन, पचवून झाल्यामुळे ते तुमचा आणि तुमच्या गूळपोळीचा अनुल्लेख करतील. पण इतक्या खटपटींनंतर यशस्वी गूळपोळी करुन तुम्ही स्वत:ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे तिथुनच पार्लेकरांकडे तु क टाकावा. अशी ही तु.क. ने सुरु होऊन तु. क. वर संपलेली गूळपोळीची यशस्वी कृती. पहा बरं तुम्हाला आवडते का ? Wink

त. टि. वर सांगितलेले सर्व प्रसंग, पूनम-पग्या-प्रीति-फचिन ही पात्र (:फिदी:), पोलपाट, दोन्ही लाटणी आणि पोळ्या काल्पनिक नाहीत.

विषय: 
प्रकार: 

सिंडे, धमाल जमलंय!

>>>ताजं तूप लावलेली पोळी लेकाला खाऊ घालून त्याचे तोंड सुद्धा न धुता गूळपोळ्या केल्याची खुषखबर पार्ल्यात द्यावी. Lol

Rofl आवडलं.
>>>>गूळपोळ्या केल्याची खुषखबर पार्ल्यात द्यावी. तिथल्या काकवांची आणि काकांची गूळपोळी केव्हाचीच करुन, खाऊन, पचवून झाल्यामुळे ते तुमचा आणि तुमच्या गूळपोळीचा अनुल्लेख करतील. पण इतक्या खटपटींनंतर यशस्वी गूळपोळी करुन तुम्ही स्वत:ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे तिथुनच पार्लेकरांकडे तु क टाकावा>>>>>> Lol त्यापेक्षा काय गुळपोळ्या नी पुरणपोळ्या करुन, खाऊन कॅलरीज वाढवतात म्हणून तु.क. टाकणं जास्त सोप्पं नाही का?

अशक्य लिहिली आहेस सिंड्रेला..खूप खूप हसले..माझी गूळपोळी आजतागायत घडली नाहिये..चिठोरा मात्र अगदी जपून ठेवला आहे Happy

आवडली गुळपोळी...! Lol अजुन रेसिपीज येऊ देत.
>>>आपल्या सुगरणपणाच्या कमाल आणि किमान मर्यादा फक्त एक आपली जन्मदात्री ओळखून असते त्यामुळे तिने सांगितलेल्या कृतीनेच गूळपोळी करा>>>हे केवळ गुळपोळीसाठी न वापरता सर्व पाककृतींसाठी लक्षात ठेवावे.(स्वानुभव)

माझा साध्या पोळ्यांच्या बाबतीतही आनंदी-आनंद आहे, रोज Trial and Error basis वर करते पोळ्या. त्यामुळे पुरणपोळ्या व गूळपोळ्या म्हणजे माझ्यासाठी एव्हरेस्टवर चढाईसारखंच आहे.

सिंडे! Rofl
मी जर असे लिहायला घेतले तर गूळपोळीच काय प्रत्येक पदार्थावर एक लेख असे 'अँटी स्वयंपाक' नावाचे 'स्वयंपाक' ला काटशह देणारे पुस्तकच तयार होईल. Proud

थंड हवेत नदी थिजते तुपाची काय कथा >>
काही कुच्चर खडे तसेच राहतील ते आपल्या पोळी लाटण्याच्या कौशल्यावर विश्वास ठेवून राहु द्यावेत. >>
पण....घाबरायचे काही कारणच नाही. स्वत:मधल्या कप्लक सुगरणीची ओळख पटवून द्यायची हीच वेळ आहे. >> जबरी जमली आहेत ही वाक्य! Lol (स्वानुभवाने जास्तच आवडली आहेत म्हण ना! Wink )

Lol
सिंडी, माझा अनुभव याहून वेगळा नाही. आयुष्यात एकदाच गुळपोळी केली पण नवर्‍याने हलवा समजून खल्ले. वर म्हणे चांगला जमलाय, नेहमी करत जा Proud

झकाऽऽऽस............ ! Lol
>>> खुळखुळा होईल.... कारण सारण पुरेसे भरलेच नाही...आले लक्षात
>>>> दुसरे लाटणे स्वच्छ धूऊन घ्यावे
>>>> तूरडाळ बाऊनशुगर पासून गुळपोळी????
>>>> ओव्हनमधे बकलावा तयार करावा Lol [आणि जीटीजीमधे वाटावा.... होना? Proud ]
आयला, काय बारकावे टिपलेत!
(प्यारेग्राफ केले अस्ते तर वाचायला सोपे गेले अस्ते)

अशक्य हसले.. मला मीच दिसत होते किचनमध्ये सैपाक करत असलेली... Happy
पण तरीही एक बरे आहे तुझे, तुला पदार्थ करतानाच आठवते काय काय मिसले ते आणि मग लगेच करेक्टिव अ‍ॅक्शन घेता येते.... मला पदार्थ खाताना आठवते काय काय टाकायचे राहिले ते... Happy

परवाच स्पाँज केक केला आणि आयुष्यात पहिल्यांदाच फ्रेश क्रिम फेटुन त्या केकचे रुपांतर सुंदर पेस्ट्रीज मध्ये केले. मग एक पेस्ट्री घरात सापडलेल्या पहिल्याच गिनी पिग ला खायला दिली आणि उत्सुकतेने त्याच्या तोंडाकडे पाहात राहिले, आता काहीतरी चांगला शब्द येईल, मग येईल म्हणुन..

पेस्ट्री खाताना त्याची मान जोरात आडवी हलत होती ते पाहुनच पोटात खड्डा पडायला लागलेला... मग खाऊन झाल्यावर त्याने पेस्ट्रीला अंड्याचा भयानक वास येतोय हे शुभवर्तमान जाहिर केले, तेव्हा मला अचानक आठवले, अंडी फेटताना दोन चमचे वॅनिला इसेंस टाकायचा राहुनच गेला Sad (उरलेल्या पेस्ट्रिज अजुन फ्रिजमध्ये आहेत Sad )

Lol मस्त लिहिलंयस.
मी आपुलकीने दिलेल्या सल्ल्यावर तु क??? हा हन्त हा हन्त! बघून घेईन Proud

आपल्या सुगरणपणाच्या कमाल आणि किमान मर्यादा फक्त एक आपली जन्मदात्री ओळखून असते त्यामुळे तिने सांगितलेल्या कृतीनेच गूळपोळी करावी.>>>> हेच ते वैश्विक सत्य! Happy

Pages