शापित

Submitted by मुग्धमानसी on 17 December, 2013 - 00:58

"जिन्यातले दिवेही नेमके आजच कुठे तीर्थयात्रेला गेलेत देव जाणे!!"
करवादत अंधारलेल्या जिन्याच्या भिंती चाचपडत अलका स्वतःशीच पुटपुटत होती. सावकाश तशीच काही पायर्‍या चडून वर आल्यावर ती शांत होऊन कानोसा घेऊ लागली. आज सगळं जरा जास्तच शांत आहे असं उगाचच वाटलं तिला. तसं एरवीही तसं शांतच असतं इथं. ती राहते त्या मजल्यावर ती सोडून फक्त एकच बिर्हाड! ते दोघे नवरा-बायको भाडेकरू सकाळी कधी जायचे आणि रात्री कधी परत यायचे कुणालाच कळायचे नाही. कधीमधी सुट्टीच्या दिवशी जरा जाग दिसायची. कधीकधी दोघं एकत्रसुद्धा दिसायची... कधी बघून हसायची... पण बास! त्यापलीकडे काही नाही. वरच्या मजल्यावर कोपर्‍यात मात्र बर्‍यापैकी जाग असते नेहमी. प्रधानांच्या त्या भरल्या बिर्‍हाडात एकूण साडेचार माणसं आहेत! आणि त्या बिर्‍हाडातलं ते शेवटचं अर्ध माणूस सगळ्या ईमारतीत जाग ठेवत असतं!

पण आज त्या प्रधानांच्या परीचीही कुठे किलबिल ऐकू येईना....
अलका काही क्षण तिथंच उभी राहून कानोसा घेत राहिली. पण काहीच आवाज येईना तशी अस्वस्थ झाली. कुणालातरी हाक मारावी का... असाही विचार केला तिने, पण का कोण जाणे... कुणाचेच नाव तोंडात आले नाही. ती तशीच चाचपडत वर चढत राहिली. घरापाशी आलीच होती म्हणा आता. कुलूप आणि किल्लीचा या अंधारात मेळ जमला एकदा म्हणजे मिळवले!

दारीशी कुलूप-किल्लीची बराच वेळ खाडखूड झाल्यावर अखेर धाडकन् दार उघडलं आणि आतला कोंडलेला गडद अंधार भस्सकन तिच्या अंगावर धावून आला. रोजच तिला असाच भेटणारा हा अंधार आज मात्र तिला अजिबात आवडला नाही. चक्क दचकली ती!
त्या अंधाराला होता तो नेहमीचाच एकटेपणाचा केविलवाणा गंध. पण आज अजूनही काहीतरी होतं त्यात... काहितरी विचित्र... भय.... भीती!
भीती? हं!!!..... घाबरण्यासारखं काय आहे इथे? माझ्याच घरात? हा अंधार? हाSSS पळाला....!
चट्कन अलकाने आत येऊन चप्पल काढता काढताच दिवे लावले. खोली उजळून निघाली तसं तिला भयंकर हायसं वाटलं. तशी अंधाराला भित-बित नव्हती ती कधीच... पण आज जरा त्या नताशाच्या बोलण्यामुळे....

"मी सांगते शापित आहे तो चौक! किती बळी घेतलेत त्या चौकाने आजवर ते देवाला माहीत. किती अतृप्त जीवांनी विव्हळत तळमळत प्राण सोडले असतील...."

नताशाचे बसमध्ये चाललेल्या चर्चेदरम्यानचे शब्द आठवून अलकाच्या अंगावर पुन्हा शहारा आला.
अलकाच्या घराच्या बरोब्बर समोरचा तो चौक. तिच्या गॅलरीतून समोरच दिसणारा. मागच्याच आठवड्यात इथं एका स्कूटरला एका टेम्पोने दिलेल्या धडकीत दोघं नवराबायको जागीच गतप्राण झाले होते. दुपारी झालेला अपघात... त्यादिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना पोलिसांचा आणि बघ्यांचा नुसता मेळा लागला होता तिथं. बिल्डिंगखालीच प्रधानांची शमिका भेटली आणि न विचारताच तिनं इत्थंभूत वर्णन ऐकवलं तिला त्या अपघाताचं. अलकाने ऐकून शास्त्रालासुद्धा हळहळ व्यक्त केली नाही. ’चालायचंच...’ फक्त एवढाच शब्द बोलून ती तडक घरात निघून आली होती आणि मग गॅलरीत बसून गरम चहाचे घोट पित निवांत समोरच्या गोंधळनाट्याकडे पहात राहिली होती.
मृत्यू... या गोष्टीचं आता तिला फारसं काही अप्रूप राहिलेलंच नव्हतं!
घराच्या भिंतींवर लागलेली फोटोंची रांग बाबा गेल्यावर तिनं स्वतःच गुंडाळून कपाटात ठेऊन दिली. फक्त बाबांचा आणि त्याशेजारी आईचा फोटो राहू दिला. आईच्या फोटोला खोट्या फुलांचा हार तरी होता... बाबांनी घातलेला... पण खुद्द बाबांचा फोटो मात्र तसाच! मोकळा! जणू समोरच होते ते... तिच्यात आणि त्यांच्यात फक्त एका निर्जीव चौकटीचं अंतर!

तीनं देवापुढं दिवा लावला... सवयीनं रामरक्षा गुणगुणत आईबाबांच्या फोटोंना उदबत्ती फिरवून नमस्कार केला. स्वत:साठी चहा टाकत एकीकडे वरणभाताचा कुकर लावला. अधून-मधून तरिही तिचे कान बाहेरचा कानोसा घेत होते. परिचा अजुनही आवाज नाही! एव्हाना शमिकाचा परिच्या नावाने ठो-ठो शंखनाद सुरू झालेला असतो आणि मागोमाग जिन्यावर दाण-दाण पाय वाजवत ’आले गं..’ करत पळणार्‍या परिचा आवाज! आज यातलं काहीच कसं काय नाही? प्रधान कुटूंबिय कुठे बाहेर गेलेत की काय?
चहा झाला की जरा परीला हाक टाकावी असा विचार करतच हातात वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन अलका गॅलरीत आली. समोर पसरलेला तोच भारदस्त चौक. रहदारी... लगबग... सगळं तेच.
गेली तीस वर्ष बघते आहे या चौकाला. असाच आहे... इथेच आहे. तोही आणि मीही. मृत्यूला आम्ही दोघांनीही पाहिलंय अगदी जवळून....
हा चौक जर शापित... तर मीही शापितच की!
तेवढ्यात कचकचून ब्रेक दाबल्याचा एक भयंकर आवाज आला आणि रस्त्यावर एका रिक्षापुढे एक पांढरीशुभ्र कार भर चौकात अगदी गळाभेट घेण्याच्या पावित्र्यात येऊन थांबली. काही क्षणातच आजूबाजूला जमलेल्या गाड्यांच्या गर्दीत रिक्षावाला आणि कारवाला यांची प्रमळ जुगलबंदी जमली आणि गॅलरीतून हे सगळं तटस्थपणे बघणारी अलका किंचित हसली. बर्‍याच वेळाने माणसांचे आवाज ऐकून उगाचच हायसं वाटलं तिला.

चहा पिऊन झाला आणि घरात येऊन कप ठेवायला जाता जाता तिनं टिव्ही ऑन केला. टिव्हीवर काय चालू आहे ते न बघताच ती किचनमध्ये गेली आणि हातासरशी कप विसळून ठेऊन दिला. टिव्हीचं काम तिच्यासाठी फक्त घरात जागतेपण ठेवणं एवढंच होतं. तिची आवडीची सिरियल लागायला अजून १५ मिनिटं होती. कुकर अजून होत होता.

तिनं पर्स जवळ ओढली आणि तिच्यात हात घालून काहितरी शोधू लागली. ऑफिसमध्ये आज त्या शिंदेचा वाढदिवस म्हणून त्याने पार्टी दिली. कसले मेले म्हातारे रिटायर व्हायला आले आता तरी वाढदिवस साजरे करतायत! पर्समध्ये हात थोडासा ढवळल्यानंतर तीचा हात एक स्टीलचा छोटासा डबा घेऊन बाहेर आला. त्यात चार काजूकतल्या होत्या. शिंदेच्या पार्टीतल्या.
डबा हातात धरून ती दार उघडून बाहेर आली. जिन्यात अजून अंधारच होता. तिच्याच दारापुढे सांडलेल्या प्रकाशात उभं राहून वर बघत तिनं हाक टाकली. "परी.... ए परी..."
वरून काहीच प्रतिसाद आला नाही तशी अलका गोंधळली. असं कधी होत नाही. तीनं परत हाक दिली. "शमिकाSSS". तरिही शांतच.
शेवटी अस्वस्थ होऊन अलका डबा हातात घट्ट धरून अपुर्‍या प्रकाशात पायर्‍या चढून वर जाऊ लागली. तेवढ्यात तिच्या शेजारच्या बिर्‍हाडाचं दार उघडलं. इतका वेळ अलकाला त्या घराला कुलूप नसल्याचं लक्षातच आलेलं नव्हतं. "काकू..." तो मध्यमवयीन माणूस अलकाशीच बोलत होता. दोनच वर्षांपुर्वी हे दोघं नवरा-बायको इथं रहायला आले होते. पण समोरासमोर बोलणं असं आज पहिल्यांदाच! अलका किंचित अवघडली.
"काकू... अहो तुम्ही वर प्रधानांकडे जाताय का?"
"अं... हो. परीचा आवाज नाही आला बराच वेळ... म्हटलं जरा चौकशी करावी."
"परी घरात नाही काकू."
"घरात नाही? कुठे गेली? तुम्हाला कसं माहीत?"
"ते... काकू.... परी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. खूप ताप होता तिला. डॉक्टरांनी डेंग्यू सांगितलाय."
"अरे देवा!" अलका हतबुद्ध झाली. खळाळून हसणारी, नाचरी खेळकर परी... घरात शिरून माझ्या बेडवर नाचणारी... मी चिडले की पोट धरून हसणारी... थेट किचनध्ये शिरून चुरमुरे मागणारी.... परी... अवघा पाच वर्षांचा कोवळा जीव! नको... नको रे....
अलकाच्या डोळ्यांत नकळत तळं जमा झालं... आधीच अंधारलेल्या जिन्यात तिला आता समोरचं काहीच दिसेनासं झालं.
"काकू... काकू... बसा जरा. स्मिता.... बाहेर ये गं."

"स्मिता... माझी बायको... हिची तब्येत जरा बरी नव्हती आज म्हणून ही घरीच होती, दुपारी हिचा फोन आला मला. प्रधानांच्या परिची तब्यत खूप बिघडलीये म्हणून. तडक निघून आलो. डॉक्टर बोलावले तर त्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितलं. आम्हीही गेलो सोबत. आताच परतलो...."
ते गृहस्थ बोलत होते पण अलकाला किती नी काय ऐकू येत होतं देव जाणे! मधून मधून त्यांची बायको मागे मुसमुसत होती.
"आता... कशी आहे परी....? कधी घरी येईल म्हणाले डॉक्टर?"
काहीच उत्तर आले नाही. शांततेनं दिलेली उत्तरं अलकाला त्या क्षणी ऐकायची नव्हती.

"काकू... आम्हाला मुलबाळ नाही हो... लग्नाला सात वर्ष झाली. देवाच्या दयेनं परिच्या रुपानं आमच्या संसाराला लेकराचे पाय लागले. देवानं मला न्यावं... पण ते लेकरू..."
______________________________________

अलका सुन्नपणे आढ्यावर गरगर फिरणार्‍या पंख्याकडे पहात होती. घरभर कुकरमध्ये करपून गेलेल्या वरणभाताचा करपट वास आणि धूर पसरलेला होता. टिव्ही बंद होता. टिव्हीसमोरच्याच कॉटवर अलका पहूडलेली होती. आधीच कृष असलेल्या तिच्या देहातले त्राण निघून गेल्यासारखे झाले होते. तिच्या डोक्यात मात्र विचारांच्या वावटळीला भलतंच बळ आलेलं होतं!

सुरूवात केली संदिपनं. त्याच्या पाठोपाठ आई गेली... त्याच्या धक्क्यातून सावरूच नाही शकली. मग काही कारण नसताना सरूताई गेली. तिच्याच घरात पडली आणि डोकं आपटलं. ब्रेन हॅमरेज होऊन आठवड्याभरातच गेली. त्यानंतर भावोजी सुद्धा दोन वर्षांत हृदयविकाराने गेले. अग एकटे बाबा उरले होते... आणि मी अर्थात! बाबा सुद्धा वयोमानाने थकले आणि मागल्या वर्षी तेही गेले. मी मात्र उरले. अजूनही. फोटोबाहेर.
आणि मागच्या आठवड्यात दिप्तीही गेली. तिच्या नवर्‍यासोबत. याच समोरच्या चौकात... तिच्या संदिपच्याच घरासमोर प्राण सोडले तिनं.
दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये फोटो छापून आला होता ना तिचा... चांगली गरगरीत बाई दिसायला लागली होती की! पंचवीस वर्षांपूर्वी याच दिप्तीच्या प्रेमात पडून निराश झालेल्या संदिपनं याच घरात विषारी औषध पिऊन आत्महत्त्या केली यावर आता कुणाचा विश्वास बसेल?

अलकाच्या डोळ्यांतून झरझर गळणार्‍या पाण्याने तिच्या कानांकडची उशी भिजवून टाकली होती. पण आज तिला हे विचारसत्र थांबवावंसं वाटेना. वाटलं असतं तरी थांबवू शकली नसतीच ती काही.
तिच्या हातात नव्हतंच काही... कधीच... ना विचारांना थांबवणं... ना माणसांना... ना आठवांना!

अलकाने कूस बदलली.

मी लग्न केलं असतं तर... कदाचित माझंही कुटुंब असलं असतं. माझी काळजी घेणारं, माझी समजूत काढणारं, माझ्यावर लक्ष ठेवणारं. कदाचित परिसारखी एखादी गोड मुलगी असली असती मला. पण.... तसं होणं नव्हतंच नशिबात कदाचित. सरूताईनं फार लवकर लग्न केलं आणि संदिपच्या शिक्षणाच्या जवाबदारीमुळे मी माझं लग्न लांबवलं. तो गेला.. मग आई-बाबांच्या काळजीपोटी... मग आई गेल्यावर बाबांना एकटं कसं सोडायचं म्हणून... ’लग्न’ हा विषय कधी आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींच्या यादित आलाच नाही.
योगेशनंही लग्न केलं. किती काळ तोही वाट पाहणार होता माझी? अजूनही ऑफिसमध्ये भेटतोच की आम्ही रोज. परवाच त्यानं त्याच्या मुलाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली म्हणून ऑफिसमध्ये पेढे वाटले.
सगळ्यांनी कुठले ना कुठले तीर गाठले. मी मात्र अशीच, इथंच अकारण तरंगते आहे.... कधीची! माझा ना ऐलतीर... ना पैलतीर! मी इथे आहे याचा कुणाला ना फायदा, ना तोटा!

’अलके... दोन वर्षांत रिटायर होशील. एकटीच त्या घरात कशी राहशील गं? माझं ऐक आणि पहिल्यांदा घर बदल बाई. मी सांगते ना... तो सगळा परिसर शापित आहे. गेल्या वर्षी त्या कोपर्‍यावरच्या नर्सिंग होमला पोलिसांनी टाळं ठोकून त्या डॉक्टरला अटक केली ना? तो डॉक्टर कित्येक वर्ष गर्भार बायकांचा गर्भपात करवून देत होता आणि ती कोवळी अर्भकं त्याच चौकाच्या शेजारच्या झाडीत खड्ड्यात टाकून देत होता म्हणे. ती कोवळी निष्पाप लेकरं... त्या मुली... त्यांचाच शाप आहे त्या परिसराला असं म्हणतात लोकं! बघ ना अगं तूच... तुझ्याच घरासमोर किती अपघातांत कित्येक जीव गेले असतील... काही कारण नसताना.... विचार कर बाई. काळजी वाटते म्हणून बोलते. एकटीच आहेस... पुढे-मागे बघणारं कुणी नाही....’

........... पुन्हा एकदा नताशाचे शब्द अलकाच्या कानात घुमू लागले. अलकाला दरदरून घाम फुटला. गॅलरीतून पुन्हा एकदा कचकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला तशी अलका धडपडत कॉटवरून उठली. अंगातली सगळी ताकद पणाला लावल्याप्रमाणे झोके खात गॅलरीच्या दिशेने गेली आणि गॅलरीचं दार घट्ट लावून घेतलं.

स्वयंपाकघरातून काकणांचा किणकिण आवाज आला तशी अलका गॅलरीच्या दरवाजातून गर्रकन् फिरली. आईच्या बांगड्यांचा आवाज. ती भिंतीचा आधार घेत स्वयंपाकघराकडे गेली. आत कुणीच नव्हतं.
"ताई... दिप्तीच्या बाबांशी बोल ना गं एकदा..." कुजबुजल्यासारखा केविलवाणा आवाज अलकाच्या कानांत शिरला आणि अलका भेदरून घरभर नजर फिरवत राहिली.

"अलके... काय करपलं गं घरात?"... बाबांचा आवाज!

"अकू... तेवढी तुझी ती निळी साडी काढून ठेव बाई मला परवा नेसायला..."..... सरूताई!!!

अलका मट्कन भिंतीच्या आधाराने खाली बसली. तिला दरदरून घाम फुटला होता. अंग चिंब भिजून गेलं.
"मी नाही भित! मी नाही भित मरणाला! मी नाही भित एकटं जगायला. मला घाबरवू नका तुम्ही सगळे... एकदा गेलायत ना मला सोडून? मला नाही आता तुमची कुणाचीच गरज! चालते व्हा सगळे!" अलका थरथरत्या आवाजात बोलत होती.

अचानक गॅलरीच्या दारातून लहान बाळांच्या रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. अलकाने डोळे घट्ट मिटून घेतले.

"आSSSSज्जी..... काजूकत्ती द्दे!"
अलकाने डोळे खाड्कन् उघडले. समोर चिमुकली परी उजवा हात पसरून गोड हसत उभी होती.
______________________________________________

सकाळी अलकाच्या घरासमोर गोंधळ चालला होता. शेजारची स्मिता दार थाड थाड वाजवत होती.
"अलकाकाकू..... अलकाकाकू.... दार उघडा. काकू.... अहो आम्ही हॉस्पिटलला चाललोय.. परीला भेटायला. तुम्ही पण या ना सोबत... काकू..... शिरीष.... काकू दार उघड्त नाहीत. बघ ना रे काय झालंय.... भिती वाटतेय रे मला....काकूSSSS"
_______________________________________________

- मुग्धमानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख कथा आहे.
तिच्या मनातील सोडून गेलेल्यांच्या आठवणी आणि परिसर शापीत असल्याच्या समजुतीचं सावट.. अखेरीस तीही त्यांच्याच मार्गाने त्याच परिसराचा एक हिस्सा बनून गेली!

मुग्धमानसी, जबरी जमलीये कथा. आत्ता ह्यावेळी घरात कुणी नाहीये आणि वाचायला नको होती असं वाटलं क्षणभर..
ह्यातच आलं सगळं Happy

Sad

तुमच नाव वाचुन अशा प्रकारच्या कथेची अपेक्षा नव्हती. >> +१००

मस्तच .

Pages