श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३

Submitted by पुरंदरे शशांक on 24 November, 2013 - 22:09

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ३

मागील भागात आपण पाहिले की श्री ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे. म्हणजेच इथे वाचकाच्या ह्रदयात सद्भाव असणे खूप गरजेचे आहे. भावपूर्ण, हळुवार अंतःकरणानेच हा ग्रंथ वाचावा, नव्हे तो अनुभवावा असे स्वतः माऊलींनीच सांगितले आहे.

आता माऊली किती रसिकतेने काय काय लिहितात ते पाहू ..... अध्याय पहिला - महाभारतकार व्यासांचे गुणगौरव माऊली करताहेत -

नाना कथारूपें भारती| प्रकटली असे त्रिजगतीं|
आविष्करोनि महामतीं| व्यासाचिये ||३२|| ...................(भारती = महाभारत)

म्हणौनि हा काव्यांरावो| ग्रंथ गुरुवतीचा ठावो|
एथूनि रसां झाला आवो| रसाळपणाचा ||३३|| .........(गुरुवती = गौरवाचे, ठावो = ठिकाण, आवो = डौल)

तेवींचि आइका आणिक एक| एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक|
आणि महाबोधीं कोंवळीक| दुणावली ||३४||
(पावली शब्दश्री | येथे सत्शास्त्रता | वाढली मृदुता | महाबोधी || - स्वामी स्वरुपानंद)

एथ चातुर्य शहाणें झालें| प्रमेय रुचीस आलें|
आणि सौभाग्य पोखलें| सुखाचें एथ ||३५||

माधुर्यीं मधुरता| श्रुंगारीं सुरेखता|
रूढपण उचितां| दिसे भलें ||३६||

एथ कळाविदपण कळा| पुण्यासि प्रतापु आगळा|
म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा| दोष हरले ||३७||....( कळाविदपण = कुशलता, अवलीळा = सहज)

आणि पाहतां नावेक| रंगीं सुरंगतेची आगळीक|
गुणां सगुणपणाचें बिक| बहुवस एथ ||३८||.. ( नावेक=जरा/थोडेसे/अंमळ, आगळीक=अधिकपणा,
........................................ बिक =थोरपण, बहुवस=जास्त)

भानुचेनि तेजें धवळलें| जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें|
तैसें व्यासमति कवळिलें| मिरवे विश्व ||३९||..... (धवळले=प्रकाशले,उजळले)

कां सुक्षेत्रीं बीज घातलें| तें आपुलियापरी विस्तारलें|
तैसें भारतीं सुरवाडलें| अर्थजात ||४०|| ....... (सुरवाडलें=फुलले, अर्थजात =पुरुषार्थ )

ना तरी नगरांतरीं वसिजे| तरी नागराचि होईजे|
तैसें व्यासोक्तितेजें| धवळत सकळ ||४१||

कीं प्रथमवयसाकाळीं| लावण्याची नव्हाळी|
प्रगटे जैसी आगळी| अंगनाअंगीं ||४२||.....(प्रथमवयसाकळी = नुकतेच तारुण्य लाभलेली, ...............
................................................................नव्हाळी = बहर, अंगना = स्त्री)

ना तरी उद्यानीं माधवी घडे| तेथ वनशोभेची खाणी उघडे|
आदिलापासौनि अपाडें| जियापरी ||४३||.................(माधवी = वसंत, आदिलापासौनि = मूळच्यापेक्षा वेगळे, .......................................................अपाडे = असाधारण)

नानाघनीभूत सुवर्ण| जैसें न्याहाळितां साधारण|
मग अलंकारीं बरवेपण| निवाडु दावी ||४४||....(बरवेपण = सौंदर्य, निवाडु = वेगळेपण)

तैसें व्यासोक्ति अळंकारिलें| आवडे तें बरवेपण पातलें|
तें जाणोनि काय आश्रयिलें| इतिहासीं ||४५|| ....(बरवेपण = सौंदर्य, निवाडु = वेगळेपण)

माउली म्हणतात - व्यासमुनींच्या महामतीतून हे प्रगट झाले आहे. हे नुसते काव्य नसून - काव्यराज आहे, श्रेष्ठ ग्रंथ आहे. यात सर्व साहित्यरसांना रसाळपणा प्राप्त झाला आहे.
चातुर्य शहाणे होणे, सिद्धांतांना रुची प्राप्त होणे, सुखाला सौभाग्य लाभणे, माधुर्यी मधुरता, शृंगारी सुरेखता - ही खास माऊलींची प्रतिभाशैली आहे - हे असे सारे त्यांनाच सुचू जाणे - या अशा ओव्यांचा अर्थ केव्हा समजून येईल तर - या ओव्या नुसत्या वाचत गेलो तरीही - यांना जी एक अवीट गोडी आहे ती वाचतानाच लक्षात यावी....

ज्ञानेश्वरी वाचताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नुसते शब्दार्थ कळले की ज्ञानेश्वरी कळली असे होणार नाही - तर त्यातील सौंदर्य, रसिकता, भावार्थ हे सगळेच्या सगळे ज्ञानेश्वरी वाचता वाचता हळुहळु जेव्हा आपल्या अंतरात उतरत जाईल तेव्हाच त्याची खरी गोडी चाखता येईल.

अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर समजा आपण खूप सुरेल शास्त्रीय संगीत ऐकत आहोत. त्यातले राग, त्या ताना, पलटे, समेवर येणे किंवा ते तबल्याचे बोल आपल्याला काही कळत नाहीये - तरीही तो संपूर्ण स्वरमाहोल जसा आपल्याला अगदी भुरळ घालतो, गुंगवून ठेवतो - तसेच सुरुवातीच्या ज्ञानेश्वरी वाचनाचे आहे - याकरता ती आधी वाचणे फार गरजेचे आहे.
यानंतरची गोष्ट आहे ती ज्ञानेश्वरीचे सौंदर्य, भावार्थ जाणून घेण्याची... जसे - गानमैफिलीत समोरचा कलाकार समेवर अलगद कसा येतो हे आपल्याला कळणे कठीण वाटत असतानाच शेजारील एखाद्या जाणकार रसिकाने दिलेल्या दिलखुलास वाहवामुळे ते सहज समजून येते, आपल्याही नकळत आपल्याला हळुहळु ते चक्क कळू लागते तसेच हे आहे. एखादी अवघड तान कशी तीन सप्तकात लीलया घेतात हे कोणी थोडे उलगडून सांगितले तर तेही समजू लागते तसेच या ग्रंथाचे आहे - याचे सौंदर्य उलगडून दाखवणारा कोणी भेटला -जशी स्वामी स्वरुपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी - तर हे सारे नक्कीच कळू लागेल. ज्ञानेश्वरीची खर्‍या अर्थाने गोडी लागेल.

आता परत वर दिलेल्या ओव्या पाहूया ....

नुकतेच तारुण्य प्राप्त झालेली स्त्री जशी जास्तच सुंदर दिसते, एखाद्या वनाला/ बागेला वसंत ऋतूत जसे आगळेच सौंदर्य प्राप्त होते, अलंकारामुळे मूळचे घनीभूत सुवर्ण जसे खर्‍या अर्थाने (वेगळेपणाने) उठून दिसते तसे व्यासांच्या कौशल्यामुळे हे सगळे उठून दिसते आहे. म्हणून की काय इतिहासाने भारताचा (महाभारताचा) आश्रय घेतला आहे.

अशी ही रसाळ, अद्वितीय ज्ञानेश्वरी आहे.
वाचे बरवें कवित्व| कवित्वीं बरवें रसिकत्व| रसिकत्वीं परतत्व| स्पर्शु जैसा || ३४७ - अ. १८||
(जसे वाणीचे सौंदर्य कवित्वामुळे खुलते, यापुढे हे कवित्वही रसपूर्ण असावे, आणि अजून उत्कट गोष्ट म्हणजे या रसास परतत्वाचा स्पर्श - म्हणजेच ते जीवनाचे रहस्य उलगडून दाखवणारे असावे) - अशी जी चढती श्रेणी माऊलींनीच सांगितली आहे तशी वाटचाल करण्याचा हा एक अल्प प्रयत्न....
कारण हे कवित्व, रसाळता हे सर्व परतत्वाकडे वाटचाल करणारे आहे म्हणून ते अद्वितीय.

ती अक्षरे नव्हती देखा | ब्रह्मसाम्राज्यदीपिका | अर्जुनालागी चित्कळिका | उजळिल्या श्रीकृष्णे || १७८- अ. ११||
माऊलींचे शब्द हे साधे शब्द नव्हेतच - या जणू ब्रह्मसाम्राज्य दाखविणार्‍या चित्कळिका कशा आहेत हेच आपल्याला हळुहळु जाणून घ्यायचे आहे ...

असाच हा अभ्यास वाढवत नेऊया.....
----------------------------------------------------------------------------------------
जनमेजयाचे अवलीळा| दोष हरले = एक पौराणिक दाखला - जनमेजयाने (अभिमन्यूचा नातू) भागवत ऐकल्यामुळे त्याचे अनेक शारीरिक दोष नाहीसे झाले.
-------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग १

http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ४
------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ -

१] http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/abhang/svarup/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांकजी ग्रेट. अनेक धन्यवाद तुम्हाला, तुम्ही किती सुंदर उलगडून दाखवता, नुसती ज्ञानेश्वरी वाचून खरंच मला एवढी कळणार नाही जरी ती रसाळ असली तरी, छानच.

फारच सुंदर. एक विनंती आहे, प्रत्येक ओवी खाली(च) अर्थ / सौंदर्यस्थळं लिहाल का?
आभारी आहो.

सर्व माऊली भक्तांना सादर नमस्कार....

विजय देशमुख - प्रत्येक ओवी खाली(च) अर्थ / सौंदर्यस्थळं लिहाल का? >>>>> पुढील भागात तो प्रयत्न केलाय - जरुर बघून कळवा ...

पलटे, समेवर येणे किंवा ते तबल्याचे बोल आपल्याला काही कळत नाहीये - तरीही तो संपूर्ण स्वरमाहोल जसा आपल्याला अगदी भुरळ घालतो, गुंगवून ठेवतो - >>> समर्पक!

शशांकजी,
उत्तम.
एक सुधारणा: "जनमेजयाने (अभिमन्यूचा नातू) भागवत ऐकल्यामुळे त्याचे अनेक शारीरिक दोष नाहीसे झाले."
शारीरिक दोष नव्हेत Happy
जनमेजयाने सर्पसत्र केल्यामुळे त्यास दोष लागला होता. ते पाप भागवत श्रवणाने नाहीसे झाले.
दुसरे एक पटले नाही: अर्थजात =पुरुषार्थ. पण त्याचा नक्की अर्थ कळत नाही.

आकाश नील - सप्रेम नमस्कार,
तुमच्या सारखे मर्मज्ञ वाचक इथे आहेत याचा अपार संतोष आहे. एवढ्या अभ्यासपूर्वक तुम्ही सगळे हे वाचत आहात यामुळे मला एकीकडे हुरुपही येतो व दुसरीकडे आपले कान धरणारे कोणी आहे यामुळे जबाबदारीची जाणीवही होते (आपण चुकीचा तर अर्थ देत नाही ना अशी भितीही वाटते... Happy )

जनमेजयाची नक्की कथा मला माहित नाही - अभंग ज्ञानेश्वरीच्या शेवटी जी सूची आहे - (पुराणातल्या वेगवेगळ्या कथांची) त्यावरुन हे मी घेतले आहे. त्यामुळे तुम्ही म्हणत आहात तेही बरोबरच असावे.

कां सुक्षेत्रीं बीज घातलें| तें आपुलियापरी विस्तारलें| तैसें भारतीं सुरवाडलें| अर्थजात ||४०||
अर्थजात =पुरुषार्थ. हा अर्थ घरोघरी ज्ञानेश्वरी मधे दिलेला आहे.
चोखाळोनि भूमि | पेरियले बीज | विस्तारे सहज | जैशा स्थिती ||
यथारुचि तैसे | स्वभावे सर्वार्थ | झाले प्रफुल्लित | भारती ह्या || - अभंग ज्ञानेश्वरी ||

यातला पहिला अर्थ मला योग्य वाटला, कारण व्यास महर्षिंचे ते प्रख्यात उद्गार आहेत ना - की याच नरजन्मात धर्माच्या पायावर आधारीत व मोक्षाकडे वाटचाल करीत असताना अर्थ आणि काम कोणीही भोगू शकतो - असे चारी पुरुषार्थ याच जीवनात सफल होतात - पण न हि कश्चित श्रुणोति माम् ....
(अशा अर्थाचे ते उद्गार आहेत, नेमके न आठवल्याने मी मतितार्थ देत आहे...)
यातील पुरुषार्थ हा अर्थ मला जास्त संयुक्तिक वाटला.

अगदी पहिल्या भागातच मी म्हटले होते की अजून कोणी ज्ञानेश्वरीचा जाणकार, अभ्यासक जास्त चांगला/ सुयोग्य अर्थ देत असेल तर त्याचे इथे स्वागतच आहे - त्याला अनुसरुन मी तुम्हालाही विनंती करतो की - तुम्हाला अजून योग्य अर्थ वाटत असेल तर जरुर देणे, तो जास्त संयुक्तिक वाटत असेल तर तो स्वीकारायची माझी तयारी आहे.

मी ज्ञानेश्वरीचा फार मोठा अभ्यासक नाहीये व अधिकारी तर अजिबात नाहीये, ज्ञानेश्वरीविषयी जे थोडेबहुत प्रेम मला वाटते त्यातून हा लेखन प्रपंच प्रगटला आहे - तो परिपूर्णच आहे असे मी कदापि म्हणणार नाही - यात भर घालणारे, अजून सोप्या पद्धतीने समजावून देणारे कोणी असेल तर मला मनापासून आनंदच होईल, अशा कोणाचेही इथे नक्कीच स्वागत आहे .....
ज्ञानेश्वरीवर चर्चा करणे, त्यातील अर्थ समजावून घेणे, सौंदर्यस्थळे शोधणे, तत्वज्ञान समजावून घेणे यापरता दुसरा आनंद नाही --- त्यामुळे असे शेअर करणारा, सांगणारा कोणी असेल तर मला फार फार आवडेलच ...