'वेक अप सिड' - मला जाणवलेला - (Wake Up Sid - Movie Review)

Submitted by रसप on 12 December, 2013 - 01:15

काही वेळेस बोलायला खूप काही असतं. कदाचित, भेटणारी व्यक्ती बऱ्याच काळानंतर भेटलेली असते किंवा अचानक बरंच काही घडलेलंही असतं. अश्या संवादात वेळ चटकन निघून न गेल्यासच नवल. बरेचदा जर बोलण्यासारखं खूप काही असेल, तर अक्षरश: कुणीही बोलायला चालून जातं ! पण खरी दोस्ती तेव्हा कळते, जेव्हा बोलायला खूप कमी असतं किंवा नसतंही, तरी वेळ चटकन निघून जातो. न बोलताही, बरंच काही बोललं जातं. 'क्वालिटी टाईम' ह्यालाच म्हणत असावेत.

एक कलाकार आणि त्याचा श्रोता/ वाचक/ प्रेक्षक ह्यांच्यातल्या नात्याचा विचार करतानाही असेच काहीसे विचार माझ्या मनात येतात. तूर्तास आपण चित्रपटाबद्दल बोलू. समजा एखादी कहाणीच जबरदस्त असेल. जसं की 'मुघल-ए-आझम'. तीन साडे तीन ताससुद्धा सर्रकन् निघून जातात. किंवा (जुना) 'वक़्त'. राजकुमारसुद्धा चालून जातो. पण खरी गंमत तेव्हा असते जेव्हा 'प्लॉट' छोटासाच असतो किंवा काही विशेष असा नसतो, पण तरीही मन गुंतून राहातं.

'वेक अप सिड'.
अगदी सामान्य कहाणी. कुठलेच धक्के, झटके नाहीत. जे जे जसं जसं आहे/ होईल, ते ते तसं तसं दाखवलेलं. प्रामाणिकपणे. पण किंवा म्हणूनच मन गुंततं. इथला प्रत्येक चेहरा आपल्याला परिचित वाटतो. कुणाचा राग येतो, कुणाची कीव येते, कुणाला आपण 'हुं' करून उडवून लावतो आणि कुणी अगदी आपलंसं वाटतं.

सिद्धार्थ मेहरा - सिड - (रणबीर कपूर) एक बडे बाप की बिगडी औलाद. दक्षिण मुंबईच्या अनेक गल्ल्यांत, भागांत असे सिड दिसून येतात. बापाच्या पैश्यावर ऐश करणारे. पब्स-डिस्कोज मध्ये थिरकणारे, महागड्या गाडयांतून मित्रांसोबत मस्तवाल घोड्यासारखे उधळणारे आणि हे सगळं करताना त्यात काही विशेष न वाटणारे. सिडसाठी आयुष्य खूप सोपं आहे. मित्र, त्यांच्याबरोबर टाईमपास, पार्ट्या, मजा-मस्करी, नाईट आऊट्स आणि जेव्हा जे मनात येईल तेव्हा ते करणं. जे तोंडाला येईल ते बोलणं, कुणालाही उडवून लावताना क्षणभर विचारही न करणं. मग ती आई असो वा बाप.
वडिल (अनुपम खेर) एक 'सेल्फ मेड' यशस्वी माणूस. अत्यंत साधारण परिस्थितीतून वर येऊन स्वत:चं एक मोठ्ठं Business Empire उभारलेला एक नावाजलेला उद्योजक. साहजिकच कामाच्या व्यापात मुलाच्या बेमुर्वतखोर वागण्याकडे विशेष लक्ष न देता येणारा, एक हताश, पराभूत बाप. आई (सुप्रिया पाठक), एक अर्धशिक्षित गृहिणी. जिचं जग म्हणजे नवरा व मुलगा, इतकंच. त्यापलीकडे काही नाही. स्वत:सुद्धा नाही.
दुसरीकडे आयेशा (कोंकणा सेन-शर्मा) - लेखिका बनण्याचं स्वप्न घेऊन, कोलकत्याहून मुंबईला एकटीच आलेली एक उत्साही, कॉन्फिडण्ट तरुणी. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, आयुष्याकडून मोजक्याच पण विशिष्ट अपेक्षा व त्या अपेक्षांची पूर्ती करवून घेण्याचा आत्मविश्वास असणारी आयेशा अति-लाडावलेल्या, लक्ष्य-हीन सिडच्या आयुष्यात येते. किंबहुना, दोघेही एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि क्षणाक्षणातून आनंद टिपणाऱ्या दोघांच्या दृष्टीला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा कोन मिळतो. स्वत:च्याच नकळत सिडमध्ये आमुलाग्र बदल घडवणारी आयेशा, त्याच नकळतपणे तिच्या दृष्टीने तिच्यासाठी पूर्णपणे मिसफिट असलेल्या सिडकडे आकर्षित होते आणि स्वत:च्या आत जाणीवपूर्वक जपलेला 'बच्चा' आयेशाच्या सहवासात कधी मोठा, जबाबदार होतो हे स्वत: सिडलाही कळत नाही.

wake-up-sid.jpg

आपल्याला माहित असतं की पुढे काय होणार आहे. तरी प्रत्येक दृश्य बघावंसं वाटत राहतं. ह्यामागे पडद्यावरील व्यक्तिरेखांचा सहजसुंदर अभिनय खूप महत्वाचा आहे.

रणबीर कपूरने, तसं पाहिल्यास भावनिक चौकट अगदीच छोटीशी असणारं 'सिड'चं पात्र अत्युत्तम साकारलं आहे. त्याची बदलत जाणारी शारीरिक भाषा, त्याच्यातलं खट्याळ लहान मूल त्याच्या डोळ्यांतून दिसणं, त्याचा 'हू केअर्स !' अटिट्यूड आपल्याला अगदी पटतो. काही ठिकाणी त्याच्या वागण्याचा संताप येणं, काही ठिकाणी त्याचा हेवा वाटणं आणि काही ठिकाणी त्याची गंमत वाटणं ह्या आपल्या भावना रणबीरने साकारलेल्या 'सिड'च्या यशाचं द्योतक मानता येऊ शकतात.
सुप्रिया पाठक आणि अनुपम खेर ह्यांना तसं कमी काम आहे. पण प्रत्येक दृश्यात दोघेही जान ओततात.
रणबीर - अनुपम खेरच्या वादाचा आणि नंतर ऑफिसमध्ये संवादाचा असे दोन प्रसंग ह्या सिनेमाचे हायलाईट्स आहेत.

कोंकणाची 'आयेशा' मात्र मन जिंकते. बॉसने डेटची ऑफर दिल्यावर तिचं खट्याळ हसणं, घरातला पसारा पाहून वैतागणं, प्रेमभावनेची जाणीव होणं, अश्या छोट्या-मोठ्या प्रसंगातून तिने अशी काही करामत केली आहे की सिडच्या आधी आपणच तिच्या प्रेमात पडतो. तिचा वावर इतका सहज आहे की जणू हे तिचंच आयुष्य ती जगत असावी. गालावर खळ्या नाहीत, मधाळ चेहरा नाही, दिलखेचक फिगर नाही तरीही ही अभिनेत्री जगातली सगळ्यात सुंदर स्त्री वाटते. Hats off !

शंकर-एहसान-लॉय आणि अमित त्रिवेदीचं संगीत टवटवीत फुलांसारखं तजेलदार आहे. अमित त्रिवेदीचं 'इकतारा' नि:संशय गेल्या अनेक वर्षांत तयार झालेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे.

सो गयी रात जा के दिन है अब जाग उठा
आँखें मसलता है सारा यह समां
आवाजें भी लेती है अंगडाइयाँ - (जावेद अख्तर)

किंवा

बीती रात बासी बासी पड़ी है सिर्हाने
बंद दरवाजा देखे लौटी है सुबह
ठण्डी है अँगिठी, सीली सीली हैं दिवारें
गूँजे टकराके इनमें दिल की सदा - (अमिताभ भट्टाचार्य)

अश्या सहजसुंदर शब्दांतून पडद्यावरील पात्र व्यक्त होतात.

निरंजन अयंगारचे संवादही साधेच, कुठलीही फेकाफेक नसलेले आहेत, अगदी तसेच जशी अयान मुखर्जीच्या कथेची गरज आहे.

अत्यंत सामान्य कथानकाला एखाद्या कवितेसारखं सादर करणाऱ्या दिग्दर्शक अयान मुखर्जीचं मन:पूर्वक अभिनंदन ! प्रत्येक दृश्य, प्रत्येक क्षण अत्यंत तजेलदार ठेवल्याने हा चित्रपट तरुणाईची एक जादूई, हळुवार झुळुक अंगावरून नेतो. सिडने बोलता बोलता आयेशाला सहज प्रपोज करणं आणि तिने त्यावर त्याला त्याच सहजतेने नाकारणं, अशी काही दृश्यं रंगवताना अयान मुखर्जीने हा विचार केलेला जाणवतं की हे खऱ्या आयुष्यात घडलं असतं, तर कसं घडलं असतं ?
दोन सव्वा दोन तासानंतर चित्रपट संपल्यावर गालावर मोरपीस फिरल्यासारखं हलकं हसू आपल्या चेहऱ्यावर राहतं. असं आजकाल क्वचितच अनुभवायला मिळतं, नाही ?

'वेक अप सिड' ही एक सोप्या शब्दांतली प्रामाणिक कविता आहे. त्यात काही ठिकाणी काही चुका असतील, पण तरी तिचा परिणाम कमी होत नाही. हा चित्रपट सर्वश्रेष्ठ नसेल, पण पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा निश्चितच आहे.

....रसप….

ह्या चित्रपटावर लिहिण्याची प्रेरणा दिल्याबद्दल फेसबुकवरील मीनाक्षी कुलकर्णी ह्यांचे मनापासून आभार !

http://www.ranjeetparadkar.com/2013/12/wake-up-sid-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच लागला होता... पुन्हा पाहिला.... Happy
अ‍ॅक्ट्रेस म्हणून कोंकणा ज्ज्ज्जाम आवडते मला.. पेज थ्री आणि मि. अँड मिसेस अय्यर मध्ये जबरा काम केलंय तिने...

एक चांगल्या फिल्मची ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद! अमी>>>> सेम हिअर !

आजच पाहिला. पारायण करायच्याच लायकीचा ( हे मी प्रेमाने म्हणतेय ) चित्रपट !

रसप,

>> गालावर खळ्या नाहीत, मधाळ चेहरा नाही, दिलखेचक फिगर नाही तरीही ही अभिनेत्री जगातली सगळ्यात
>> सुंदर स्त्री वाटते.

सहमत. तिचा अभिनय सहजसुंदर आहे. लबाचामध्ये शेवटी फरहान अख्तर तिला पुनर्संगाची (पॅचअप) गळ घालतो त्यावेळी तिच्या मनस्थितीचा अभिनय अफलातून साकारला आहे. एकीकडे त्याच्याविषयी असलेली प्रचंड ओढ आणि दुसरीकडे तोंडघशी पडण्याची चिंता यांतली ओढाताण फारच समर्पक रीतीने हाताळली आहे. शेवटी जो निर्णय घेते त्यासाठी आवश्यक असलेले मानसिक स्थैर्य आणण्याचा यत्न तिच्या मुद्रेवरून ताडता येतो. हिंदी चित्रपटसृष्टीत असे बारकावे असलेला अभिनय कितपत पाहायला मिळेल अशी शंकाच आहे (याबाबतीत माझे ज्ञान तोकडे आहे).

आ.न.,
-गा.पै.

मला पण खूप आवडला होता सिनेमा Happy
<<कोंकणापण खुप आवडती. ती आवडली नाही असे कधीच झाले नाहिये कोणत्याच सिनेमात.>>अगदी अगदी

>>अत्यंत सामान्य कथानकाला एखाद्या कवितेसारखं सादर करणाऱ्या दिग्दर्शक अयान मुखर्जीचं मन:पूर्वक अभिनंदन !

अगदी अगदी.
वर गा.पै. नी दिलेले लक बाय चान्समधील उदाहरण कोंकोनाच्या अभिनयसामर्थ्याचा एक उत्तम नमुनाच आहे.

मस्त रिव्यु. कोंकणा नेहमीच आवडते. तिची पर्सनॅलिटी जबरी आहे. सौदर्यांच्या टिपिकल कल्पनांचा मापदंड तिच्यासाठी लावायची गरज पडतच नाही त्यामुळं.
गापै , तुम्ही लिहिलेला प्रसंग अगदी सुरेख आहे.

Pages