डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स

Submitted by अतुल ठाकुर on 6 December, 2013 - 11:15

ambedkar1-300x206.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे. सर्व मानवी समस्यांची उत्तरे आहेत. जग बदलण्याची वेळ आलेली आहे. जग संक्रमणावस्थेत आहे. आता क्रांती होणारच आहे या आणि असल्या भ्रामक कल्पनांनी पछाडलेल्यांना पुढे प्रमाणिक राहताच येत नाही. बाबासाहेबांच्या काही वाक्यांना ओढुन ताणुन वेगळा रंग देण्याचा काही मार्क्सवाद्यांचा प्रयत्न हा त्याचेच फलित आहे. मात्र या काळात, जेव्हा मार्क्सवाद हा जागतिक पटलावरुन जवळपास नाहीसा होण्याचा मार्गावर असताना, त्यातील फोलपणा रशियाच्या विघटनानंतर लक्षात आला असताना आपल्याकडे बाबासाहेबांच्या निबंधातील मार्क्सवादाबद्दलची मते कितपत महत्वाची आहेत? असा जर विचार केला तर हे दिसुन येते कि आजच्या काळात त्या निबंधाचे महत्व आणखि वाढले आहे. अलिकडेच डॉ. आनंद तेलतुंबडेंच्या वक्तव्याबाबत जो गदारोळ उठला त्यावरुन हे दिसुन येते कि मार्क्सवाद आणि दलित समस्या यांच्यातील संबंध दुर्लक्षिण्याजोगे नाहीत. निदान भारतात तरी, जेथे जातीयता अजुनही संपलेली नाही, संपण्याची शक्यता नजिकच्या काळात दिसत नाही तेथे या संबंधातील गुंतागुंत अधुनमधुन डोके वर काढणारच.

पुढे जाण्याअगोदर एका हळव्या गोष्टीला स्पर्श करणं भाग आहे कारण त्यावरुन दलितसमाजात मार्क्सवादाचा संबंध हा बाबासाहेबांनंतर कुठे आला हे स्पष्ट होईल. दलित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर १९७२ साली दलितपँथरची स्थापना झाली. अल्पावधीत या संघटनेचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं. जगातील मोठमोठ्या नेत्यांनी या संघटनेची दखल घेतली. आणि १९७५ साली फुट पडुन दलितपॅंथरचा प्रभाव संपला. त्यानंतर काही वर्षांनी लता मुरुगकरांनी दलित पँथरवर प्रबंध लिहिला. त्यात फुटीच्या कारणांचा सविस्तर उहापोह केला आहे. तत्कालिन नेत्यांच्या मुलाखतींवर हा प्रबंध आधारलेला असल्याने त्याला वेगळे महत्व आहे. तूर्तास या लेखासाठी त्यातील इतर कारणांकडे जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही. मात्र अनेक कारणामध्ये महत्वाचे कारण हे वैचारिक मतभेदांचे होते हे दिसुन येते. राजा ढाले हे आंबेडकरवादी आणि नामदेव ढसाळ यांचा कल मार्क्सवादाकडे यातुन हे मतभेद झाल्याचे मुरुगकरांचे निरिक्षण आहे. आजदेखिल सभेत हा विषय निघाला कि त्यावेळच्या दलित नेत्यांच्या चेहर्‍यावर खंत दाटुन येते. खुद्द बाबासाहेबांचा याबाबत अनुभव काय होता हे जाणुन घेणं देखिल महत्वाचं आहेच. भारताच्या संदर्भात खुद्द मार्क्सचे निरिक्षण चुकले. भारतातील जातीव्यवस्था आधुनिकतेच्या रेट्याखाली संपेल असे मार्क्सला वाटले होते. तसे झाले नाही. ५ ऑगस्ट १८५३ च्या “न्युयॉर्क डेली ट्रीब्युन मध्ये मार्क्स लिहितो…Modern industry, resulting from the railway system, will dissolve the hereditary divisions of labor, upon which rest the Indian castes, those decisive impediments to Indian progress and Indian power. हे अर्थातच प्रत्यक्षात आले नाही. भारतातल्या कारखानदारी, शहरीकरण, आधुनिकता येऊनही जातीसंस्था हि वेगळ्या स्वरुपात चालुच राहिली.

अलिकडे काही मार्क्सवादी हे मान्य करतात कि जातीसंस्थेबद्दल त्यांचे आकलन चुकले. विशेषतः वर्ग नाहीसे झाले कि जाती आपोआपच नाहीशा होतील आणि वर्ग हा जातीपेक्षा महत्वाचा प्रश्न आहे हि दोन्ही गृहीतके चुकली. मुळात मार्क्सवाद्यांच्या दृष्टीने जात महत्वाची नव्हतीच. जातीचा प्रश्न धर्माशी निगडीत होता आणि धर्म ही अफुची गोळी होती. अर्थ हा base आणि धर्म किंवा तत्सम कुठलेही तत्वज्ञान हे superstructure अशी ती मांडणी होती. सर्वतर्‍हेची विषमता लहानपणापासुन ते अगदी उच्चविद्याविभुषित झाल्यावरसुद्धा अनुभवलेले बाबासाहेब मात्र अगदी वेगळ्या मार्गाने गेले. भारतीय जनमानसातील धर्माचं महत्व त्यांनी अचुक ओळखलं होतं. मनुस्मृतीचा प्रभाव त्यांना माहित होता. भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या जातीसंस्थेचं उच्चटन वर्ग नाहीसे झाल्याने होईल या भ्रमात ते नव्हते. शिवाय मार्क्सवाद्यांनी त्यांना एका बाबतीत निराश केलं होतं. मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये अस्पृश्यांना विणकाम खात्यात प्रवेश नव्हता. तेथे धागा चोखुन काम करावे लागत असे. अशा तर्‍हेच्या भेदभाव नाहीसा करण्यासाठी कम्युनिस्टांनी कुठलिही पावले उचलली नव्हती. त्यामुळे आयुष्याच्या अखेरीला बाबासाहेबांनी मार्क्सवादाबद्दल आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. हा निबंध प्रदीर्घ आहे. पण लेखाच्या दृष्टीने त्याचा गोषवारा देणे आवश्यक आहे.

बाबासाहेबांनी बुद्धाच्या आणि मार्क्सच्या तत्वप्रणालीची सर्वप्रथम मांडणी केली आहे. त्यात मार्क्सवादाबद्दल आपले भाष्य करताना ते म्हणतात कि” …समाजवाद अटळ आहे हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. …साम्यवादाने रशियात पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वी पुष्कळ हिंसा व रक्तपात घडवुन जाणीवपुर्वक योजना आखावी लागली….इतिहासाचे एकमेव स्पष्टीकरण म्हणुन आता कोणीही इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण स्विकारत नाही. कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले आहे हे कोणीही मान्य करत नाही.” मात्र बाबासाहेबांना मार्क्स हा अत्यंत महत्वाचा विचारवंत वाटत होता. त्याची चार तत्वे त्यांना महत्वाची वाटली मात्र त्यावरील बुद्धाचे उपाय त्यांना परिणामकारक वाटले. ती चार तत्वे म्हणजे १. तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्र्चना करणे आहे. २. वर्गावर्गामध्ये हितसंबंधांचा कलह आहे. ३. संपत्तीच्या खाजगी मालकिमुळे एका वर्गाला सत्त मिळते तर दुसर्‍या वर्गाला त्याची पिळवणुक झाल्यामुळे दु:ख मिळते. ४. समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ते नष्ट करुन हे दु:ख दूर करणे आवश्यक आहे.

या चारही गोष्टींवर बुद्ध धर्मामध्ये परीणामकारक उपाय आहेत असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यानी या निबंधात जागोजाग निरनिराळे दाखले दिलेले आहेत. विशेषतः बुद्ध व त्याचा शिष्य आनंद यांच्या संवादातुन बाबासाहेबांनी हे स्पष्ट केले कि हाव असण्याचे कारण मालकी असे बुद्ध धर्म मानतो. भिक्षुंना खाजगी संपत्ती बाळगण्याची परवानगी नाही. त्यात मार्क्सच्या चौथ्या तत्वाचे निवारण होते. तथापी मार्क्सवाद्याची साधने त्यांना कधीही पटली नाहीत. विशेषतः हिंसेच्या ते विरुद्ध होते. बाबासाहेबांना धर्म महत्वाचा वाटत होता. मार्क्सवाद्यांच्या धर्मद्वेषाला त्यांची कधीही मान्यता नव्हती. एक कायमची हुकुमशाही म्हणुन राज्याविषयी असलेला मार्क्सवादी सिद्धांत त्यांना पटला नव्हता. “जर अखेरीला राज्य नष्ट होणार” तर ते केव्हा नष्ट होणार याचा कालावधी साम्यवादी सांगु शकत नाहीत. शिवाय हुकुमशाहीने तिचे कार्य केल्यावर, लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनवल्यावर स्वतः संपुष्टात का येऊ नये? हा बाबासाहेबांचा घाणाघाती आक्षेप होता. सरतेशेवटी ते म्हणतात “साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो, (समता,सहभाव व स्वातंत्र्य या)सर्व गोष्टी देऊ शकत नाही”. इतक्या स्पष्ट आक्षेपांनंतर बाबासाहेबांच्या विचारांशी मार्क्सवादाची सांगड घालण्याचा अप्रामाणिकपणा करण्यात अर्थ नाही हे कुणालाही पटेल. तरीही हे प्रयत्न का होतात? याचे उत्तर मार्क्सवाद्यांच्या ढोंगीपणात दडलेले आहे.

मार्क्सवाद हा जगभरातुन नाहीसा होत असला तरी विचारवंत विद्वानांमध्ये ते चलनी नाणं आहे. आणि हे विचारवंत आणि विद्वान घाऊक प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात आणि विद्यापिठात सापडतात. फर्ड्या इंग्रजीत मार्क्सवरची गाडाभर पुस्तके वाचावीत, त्यावर क्रिटीकल थिंकर्सनी लिहिलेली आणखि खंडीभर पुस्तके वाचावीत. पेपर्स लिहावेत, सेमिनारमध्ये वाचावेत. गरीबांच्या शोषणावर वातानुकुलित गाड्यांमधुन प्रवास करुन व्याख्याने द्यावीत, पिचलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये भाषणे आयोजित करावीत. आणि हे सारं अतिक्लिष्ट भाषेत करावं म्हणजे विद्वत्तेला आणखि झळाळी प्राप्त होते. बाबासाहेबांनी कितीही स्पष्टपणे लिहिलं तरी बाबासाहेबांचा आणि मार्क्सचा सांधा जुळवण्याचं याचं काम सुरुच असतं. कारण बाबासाहेबांना खोडुन काढता येत नाही. तेवढी त्यांची कुवतही नसते. मग पुढे यांची मजल “मुळात बाबासाहेबांच्या काळापर्यंत मार्क्सचे महत्वाचे ग्रंथ उपलब्ध नव्हते” हे म्हणण्यापर्यंत जाते. त्यातुन त्यांना हे ध्वनित करायचे असते कि जणुकाही हे ग्रंथ बाबासाहेबांच्या हाती लागले असते तर त्यांच्या विचारात फरक पडला असता. खरंतर रशियाच्या विघटनापर्यंत बाबासाहेब हयात असते तर त्यांनी मार्क्सवादावर आणखि हल्ला चढवला असता. ज्या बाबासाहेबांना मार्क्स हा अत्यंत महत्वाचा विचारवंत वाटत होता. त्याच्या ग्रंथांचे अध्ययन बाबासाहेबांनी केले नसेल हे त्यांचे अजस्त्र वाचन ज्यांना माहित आहे त्यांना पटणारच नाही. या सार्‍या बाबी वैयक्तीक पातळीवर सुरु असतील तर एकवेळ समजता येईल मात्र विद्यार्थ्यांना शिकवताना आंबेडकरांचे सुप्रसिद्ध “अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट” हे भाषण घ्यावे कारण त्यात जातीसंस्थेवर प्रखर हल्ला आहे मात्र “बुद्ध कि कार्ल मार्क्स” या निबंधाला हातदेखिल लाऊ नये याला संधिसाधु अप्रामाणिकपणाशिवाय दुसरे काहीही म्हणता येत नाही. मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्ह्टले आहे मात्र खुद्द मार्क्सवाद हा आता बुद्धीमंतांसाठी अफूची गोळी ठरला आहे हे नक्की.

अतुल ठाकुर

संदर्भ:
बुद्ध कि कार्ल मार्क्स – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
Dalit Panther Movement of Maharashtra – A Sociological Appraisal – Dr. Lata Murugkar

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख चांगला आहे पण अजून विस्तृत होऊ शकला असता.
उदा बुद्ध कि कार्ल मार्क्स ह्या पुस्तकातील काही उतारे / विवेचन देऊन वगैरे. तसेच आंबेडकर हे धर्मवादी होते की नाही, हे ह्या लेखावरून वाचकाल स्पष्ट होत नाही. केवळ धर्म ही अफुची गोळी आता नाही एवढेच वाचकाल कळते. त्यामुळे मला वाटले की विषयाला हात घातलाच तर सखोल मांडणीही करता आली असती.

एका वेगळ्या आणि महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.

ह्म्म्म, इंटरेस्टिंग लेख. आवडला. या विषयाचा अभ्यास नसल्याने फारशी टिप्पणी करता येणार नाही.

मला वाटतं विसंगत गोष्टींचंही 'अ‍ॅप्रोप्रिएशन'/सामीलीकरण करून घेणं ही आपली पारंपरिक मानसिकता आहे. त्यातूनच मूळ सनातन धर्माचारण व त्यावर आधारित समाजरचनेला छेद/आव्हान देणार्‍या संन्यासी परंपरेला आश्रमव्यवस्थेद्वारे सामावून घेतलं गेलं. बुद्धाला विष्णूचा अवतार मानलं गेलं. विविध लोकदैवतं, उपासना परंपरा इ. मूळ वैदिक देवतापंथांची पुनर्मांडणी करून, नवे देव, देवतामंडलं तयार करून घेऊन त्यात सामील करून घेण्यात आली.
त्यामुळे कितीही नाही म्हणलं तरी त्याच मानसिकता-परंपरेतून निघालेले भारतीय विद्वान मार्क्सवादाच्या किंवा आपण ज्या कोणत्या विचारधारेचे असू त्या मुख्यधारेत आंबेडकरांना सामील करून घ्यायचा प्रयत्न करत आहेत नि काय!! Wink

गरीबांच्या शोषणावर वातानुकुलित गाड्यांमधुन प्रवास करुन व्याख्याने द्यावीत, पिचलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये भाषणे आयोजित करावीत. आणि हे सारं अतिक्लिष्ट भाषेत करावं म्हणजे विद्वत्तेला आणखि झळाळी प्राप्त होते>> Proud - अ‍ॅकेडेमिक्सचा धंदा आहे बाबानु! ते तरी काय करणार? फार बेस लेव्हलला काम केलं तर मग विद्यापीठीय राजकारणात, परदेशी शिष्यवृत्तींच्या स्पर्धेत कस्काय वरती सरकणार? हां, आता त्यात वास्तवतेशी, तळागाळाशी संपर्क कमी कमी होत जातो, ज्यांचे पैसे त्यांचा अजेन्डा बोलण्यावागण्यात दिसतो असे कायकाय साईड इफेक्ट्स होतात... पण तेवढं चालायचंच की! व्यवहार कुणाला चुकलाय??

उत्तम लेख आणि विषय, पण आणखी विस्तृत असायला हवा होता, या केदारच्या मताशी मी सहमत आहे.
मला वाटतं विसंगत गोष्टींचंही 'अ‍ॅप्रोप्रिएशन'/सामीलीकरण करून घेणं ही आपली पारंपरिक मानसिकता आहे. अगदी अगदी. Happy जी जी निघाली चांदणी, त्या त्या परीने देखणी.

छान लेख आणि विषय.

मला वाटतं विसंगत गोष्टींचंही 'अ‍ॅप्रोप्रिएशन'/सामीलीकरण करून घेणं ही आपली पारंपरिक मानसिकता आहे.>>> वरदा, हे एकदम thought provoking आहे. या गोष्टी एखादी संस्था, एखादा गट ठरवून करतो (आणि उर्वरित समाज जास्त विचार न करता त्या गटाला/संस्थेला वैचारिक नेतेपद देउन केवळ ते सांगतील तेच करतो) की समाजात जे स्वाभाविक सांस्कृतिक प्रवाह असतात त्यातून हे आपोआप होत जाते असा प्रश्न पडतो.

विशेषतः पूर्वी एकमेकांपासून शेकडो मैल दूर असलेले समाजाचे प्रमुख लोक हे सगळे एका सुसंगत पद्धतीने कसे करू शकले असतील अशीही शंका येते.

गरीबांच्या शोषणावर वातानुकुलित गाड्यांमधुन प्रवास करुन व्याख्याने द्यावीत, पिचलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये भाषणे आयोजित करावीत. आणि हे सारं अतिक्लिष्ट भाषेत करावं म्हणजे विद्वत्तेला आणखि झळाळी प्राप्त होते>> फिदीफिदी - अ‍ॅकेडेमिक्सचा धंदा आहे बाबानु!>>>

हे ही इंटरेस्टिंग आहे. एकदा एखाद्या फील्ड मधे करीयर करायचे म्हंटले की त्या क्षेत्रातील प्रत्यक्षातले काम व त्या क्षेत्रातील करीयर मधे पुढे जाण्यासाठी केल्या जाणार्‍या गोष्टी यातील तफावत अपरिहार्य असते. खेडोपाडी जाउन लोकांच्या समस्या सोडवणे ही पहिली पायरी, त्या समस्या इतरांपुढे मांडून त्यांची मदत घेता येते हे लक्षात आल्यावर ते करणे ही दुसरी, मग एन्जीओ किंवा इतर फंडिंग करू शकणार्‍या लोकांपुढे गेले तर त्याहीपेक्षा मोठा परिणाम होउ शकतो म्हणून जरा पॉश सर्कल्स मधे त्या समस्येबद्दल बोलणे ही त्यापुढची पायरी, अशातून मूळचे तळागाळातील समाजसेवक एकदम नंतर वेगळेच होउन जात असतील. पण हे जवळजवळ सर्व क्षेत्रात होते. आता कदाचित मूळ समाजसेवाच न करता या मूळच्या लेखात लिहील्याप्रमाणे डायरेक्ट "शो" करणारे, व्याख्याने देणारे ही महाभाग असतील Happy

प्रतिसाद त्यांची लांबी आणि दर्जा पाहूनच अशा इथल्या वाचकांना अशा तर्‍हेचे लेख किती हवेहवेसे वाटताहेत हे दिसतच आहे.

एकंदरीत अशा तर्‍हेच्या वैचारिक / विचारांना चालना देणार्‍या विषयांवरील लेख अथवा सर्वच माध्यमांमधल्या साहित्यांची कमतरता बघता आपले मनापासून अभिनंदन व स्वागत आहे.
पण (डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स या प्रत्येकांवरच लिहावे तितके कमी हे लक्षात घेता कुठेतरी थांबावे लागणारच हे लक्षात घेऊनही) लेखाच्या विषयवस्तूंना संपुर्ण न्याय देण्याच्या दृष्टीने लेखाच विस्तार त्रोटक आणि संदर्भ-सुची अगदीच कमी आहे असे म्हणावेसे वाटते.

या विषयाचा अभ्यास नसल्याने फारशी टिप्पणी करता येणार नाही.>>> याला मम
अजूनही लिहा, वाचायला आवडते आहे, अधिक वाचनास उद्युक्त करत आहात त्याबद्दल विशेष धन्यवाद Happy

प्रस्तुत लेखकाने लेखनाचा आधार म्हणून ज्या ग्रंथांचा उल्लेख केला आहे....आणि त्यानी त्या अभ्यासावरून लेखासाठी आपले मत बनविले असले तरी त्यांचा स्वतःचाही त्या क्षेत्रात स्वतंत्र असा अभ्यास असल्याने लेखाची मांडणी प्रभावी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. ज्या डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या भाषणाचा उल्लेख त्यानी केला आहे ते जर चंदिगड येथील असेल तर ते चांगलेच गदारोळ उठविणारे ठरले होते. डॉ. आनंद तेलतुंबडे आंबेडकरवाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा देतात. या पार्श्वभूमीवर खरेच आंबेडकरवाद असे ज्याला म्हणता येईल अशी विचारधारा अस्तित्वात आहे किंवा नाही याची तपासणी केली पाहिजे. समाजवादाच्या मांडणीला मार्क्सपासूनच सुरुवात होते असे जगभरातील विद्वान मानतात. मानवजातीचा इतिहासच साक्षीदार आहे की विषमतेचा हा झगडा होता/आहे तो हितसंबंधांचे जनत करण्यासाठी आणि जातीआधारित अग्रहक्क मिळविण्याचे प्रयत्न. डॉ.आंबेडकरांना विषमतेच्या रगाड्यातून दलितांना बाहेर काढण्यासाठी जी प्रेरणा मिळाली तीही ह्या समाजवादाच्या अभ्यासातूनच मिळाली असे म्हटले पाहिजे.

मला वाटते, एंजल्सनेच कुठेतरी म्हटले होते की मानवी इतिहासामध्ये आपणास ज्या समाजरचना पाहावयास मिळतात, त्या सगळ्या समाजरचना गरजांशी तडजोड करून निर्माण झालेल्या आहेत. त्यातही दलितांची गरज तर जगण्याची आहे....ऐषआरामाची नव्हे, हे बाबासाहेबांनी ओळखले होते....ते प्रथम मग पुढील उड्डाणे....यासाठी सार्वत्रिक शिक्षण अभियान. त्याची फळे आज कितीतरी मोठ्या प्रमाणात दलित वर्ग घेताना दिसतो हे नाकारून चालणार नाही.

अतुल....तुमच्या लेखातील प्रत्येक उतार्‍याला अनुसरून प्रतिसाद देता येणार नाही मला....कारण माझे या विषयावर काहीसे वाचन आहे....अभ्यास नाही. तरीही तुम्हाला, "...गरीबांच्या शोषणावर वातानुकुलित गाड्यांमधुन प्रवास करुन व्याख्याने द्यावीत, पिचलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये भाषणे आयोजित करावीत. आणि हे सारं अतिक्लिष्ट भाषेत करावं म्हणजे विद्वत्तेला आणखि झळाळी प्राप्त होते....." यातून जे काही सुचवायचे आहे त्यामुळे मी गोंधळात पडलो आहे. मार्क्सवाद या विषयावर मी तुम्हाला व्याख्यानाचे निमंत्रण दिले, ते तुम्ही स्वीकारले तर माझ्या गटावर तुम्हाला मुंबई ते कोल्हापूर व परत हा प्रवास करण्यासाठी गाडी दिलीच पाहिजे ना ? सारीच व्याख्याने पंचतारांकित हॉटेल्समध्ये नाही आयोजित केली जात.....त्यासाठी वेगळे मंच असतातच. व्याख्याताची चांगली सोय करावी हा एक सदहेतू असतो त्यामागे. बाकी राहता राहिला प्रश्न अतिक्लिष्ट भाषेचा ज्यामुळे विद्वत्तेला झळाळी प्राप्त होईल.....नो, नो....अतुल, असे सर्वत्रच होते असे बिलकुल मानू नका....गेली तीसपस्तीस वर्षे मी विविध विषयावरील, विविध वक्त्यांची भाषणे ऐकत आलो आहे....आणि क्लिष्ट वाटावे असे काही घडत नाही. तसे वाटत असेल तर हॉल सोडून जाण्याची सोय असतेच. फर्ड्या इंग्रजी इतकेच फर्डे मराठी देखील न कळणारे श्रोते सभागृहात असतात....तरीदेखील व्याख्यान ऐकण्यास ते येतात....व्यक्त केलेले विचार स्वीकारायचे की नाही ही बाब अलाहिदा....पण मूळातच विद्यापीठातील अभ्यासकांची व्याख्याने दिखावू ठरतात हा विचार शोचनीय आहे.

मार्क्सवाद्यांची वाताहात पोथीनिष्ठतेने तर झालीच पण त्याहूनही खरे ग्रामीण, शोषित, दलित वर्गातले नेतृत्व त्यांच्यात तयार न झाल्याचा फट्का जास्त मोठा आहे. भारतीय समाजमानसाला अपील होईल असा साम्यवाद उभारता न येणे हे प्रचंड मोठे दुर्दैव आहे असे मी मानतो. वरदा म्हणते तशी 'अ‍ॅसिमिलेशन'ची परंपरा असूनही हे घडले याचा दोष इथल्या कम्युनिस्ट नेत्यांनाच जातो.
The leftist cause, it will be surely argued, is too important to be left to leftists!
http://indiatoday.intoday.in/story/m-j-akbar-writes-on-west-bengal-polls...

फारएण्ड,

आपला इथला प्रतिसाद वाचला. काही बाबींवर मतप्रदर्शन करू इच्छितो.

१.
>> एखादा गट ठरवून करतो (आणि उर्वरित समाज जास्त विचार न करता त्या गटाला/संस्थेला वैचारिक नेतेपद
>> देउन केवळ ते सांगतील तेच करतो) की समाजात जे स्वाभाविक सांस्कृतिक प्रवाह असतात त्यातून हे
>> आपोआप होत जाते असा प्रश्न पडतो.

मला वाटतं की हे स्वाभाविकपणे घडतं. त्यामुळे विसंगती नक्की कशाला म्हणावं, हाही एक प्रश्नच आहे. जे समाजघटक आहेत (म्हणजे जनता) त्यांनाच जर ही विसंगती वाटत नसेल तर चार भिंतीत बसणार्‍या कुण्या कुडमुड्या प्राध्यापकाला ती तशी का वाटावी?

२.
>> विशेषतः पूर्वी एकमेकांपासून शेकडो मैल दूर असलेले समाजाचे प्रमुख लोक हे सगळे एका सुसंगत पद्धतीने
>> कसे करू शकले असतील अशीही शंका येते.

म्हणूनच मला वाटतं की हे सगळं स्वाभाविक पद्धतीने होत गेलं असलं पाहिजे. यालाच धर्म म्हणतात. यामागे कोणी एकछत्री अंमलधारी यंत्रणा होती असं मानणं चुकीचं आहे. भारतीय समाजातील फार मोठा घटक मनुष्यजन्म हा कर्तव्यपूर्तीसाठी आहे असं मानतो. धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम.

धर्माचं आचरण न केल्याने कालानुक्रमे समाजात दोषही शिरले. हे दोष निवारण्याचा मार्गही धर्मचिकित्सा करून योग्य ते धर्माचरण करण्यातच आहे. विवेकानंदांचं हेच मत होतं. पण समाजवाद्यांना धर्म मुळातच मान्य नाही, तर त्यांना धर्माचा उपयोग काय समजणार.

आ.न.,
-गा.पै.

सखोल चिंतनात्मक लेख, प्रतिसाद.माझ्याही हा अभ्यासाचा विषय नाही , लेख व प्रतिसाद वाचनाचा आनंद घेताना काही विचार मनात आले ..

मानवी जीवनातील अभावग्रस्ततेचा तीन अगदी वेगळ्या पातळ्यांवर ( सामाजिक-सांस्कृतिक, आध्यात्मिक , आर्थिक ) प्रत्यय घेऊन मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे हे तीन महापुरुष. बाबासाहेबांनी प्रेरणेसाठी मार्क्स ऐवजी बुद्धाकडे पाहण्याचे लेखात अतुलनी दिलेले कारण >>.भारतीय जनमानसातील धर्माचं महत्व त्यांनी अचुक ओळखलं होतं. मनुस्मृतीचा प्रभाव त्यांना माहित होता. भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या जातीसंस्थेचं उच्चटन वर्ग नाहीसे झाल्याने होईल या भ्रमात ते नव्हते >> पटते . शिवाय या भूमीतील दुखण्यावर बाबासाहेबांनी येथील तत्वज्ञानातच आश्रय शोधला यात त्यांचे लोकनेतेपण व द्रष्टेपण दिसून येते.
असं असलं तरी ''समाजवादाच्या मांडणीला मार्क्सपासूनच सुरुवात होते असे जगभरातील विद्वान मानतात. '' हे अशोक यांचं प्रतिपादन बरोबरच आहे.आधुनिक जगातील साम्यवादाचा विषमताविरोधी लढा कितीही भरकटला असला तरी केवळ आध्यात्मिक अधिष्ठान शोधणे व न्याय्य हक्कांसाठी लढा देणे यात फरक आहेच. एका महापरिवर्तनाच्या लढ्याची पाळेमुळे या समकालीन स्रोतांना पारखी नसावीत..

पण मूळातच विद्यापीठातील अभ्यासकांची व्याख्याने दिखावू ठरतात हा विचार शोचनीय आहे.

अशोकराव, माझे मत असे नाही आणि मला सरसकटीकरणदेखिल करायचे नाही.

मात्र अलिकडे धंदेवाईक सेमिनारीयन निर्माण झाले आहेत असे दिसते. सगळीकडे त्यांच्या लाडक्या संकल्पनांची मांडणी करीत फिरणे हेच काम. समाज रचना ही गुंतागुंतीची असते आणि त्यातील व्युह हा सोपा करुन पाहता येत नाही हे कट्टर मार्क्सवादी असलेल्या गुरुवर्य कुरुंदकरांचे मत. ते मला नेहेमीच पटले आहे. मात्र ते सोप्या, सर्वांना समजेल अशा भाषेत का सांगता येऊ नये हे आजवर मलातरी न उलगडलेले कोडे आहे. त्यातुन समाज शास्त्र म्हणजे कुठल्याही गोष्टीवर एकमत होऊ न शकणारे शास्त्र (हे आपलं माझं मत). साधी "कल्चर" शब्दाची व्याख्या पाहायला गेलं तरी अनेकानेक सापडतील. त्यामुळे वादविवादांना भरपूर वाव. त्यातच काही जण वक्त्याला घेरता कसे येईल या तयारीतच बसलेले. काहीजण मटणाचं जड जेवण झाल्याने फुल्ल एसीत पेंग देणारे. पण तरबेज असे की व्याख्यान संपल्याव्र बरोबर प्रश्न विचारणारे. खैर.

सांगण्याचा उद्देश असा कि सेमिनार भरवणे हा अलिकडे एक प्रकारचा उयोगच झालेला दिसतो. त्यातुन काय आणि कितपत साध्य होते हा प्रश्नच आहे. हां. कदाचित त्यामुळे बायोडेटा फुगत असेलही कदाचित. फर्ड्या इंग्रजीत फडतुस प्रश्न विचारणार्‍याबद्दल आदर आणि गंभीर प्रश्न भाषेअभावी न मांडता येणार्‍याचे गोची हा नेहेमीचाच प्रकार.

हॉल सोडुन जाण्याची सोय एम ए ला असताना नव्हती हो अशोकराव Happy आमचे दु:ख आम्हालाच माहीत. समोर आमचे प्रोफेसर बसलेले असायचे Happy

बायदवे खैरलाजीवरील सेमिनारला त्यातील तळागाळाच्या कार्यकर्त्यांना बोलायला बोलावलं होतं. तेव्हा काम करणारे आणि फक्त सेमिनार घेणारे यातला फरक उठुन दिसला होता. Happy

एकदा एखाद्या फील्ड मधे करीयर करायचे म्हंटले की त्या क्षेत्रातील प्रत्यक्षातले काम व त्या क्षेत्रातील करीयर मधे पुढे जाण्यासाठी केल्या जाणार्‍या गोष्टी यातील तफावत अपरिहार्य असते.

हा विचार करण्याजोगा मुद्दा मला वाटतो.

आणि ही सर्व मायबोलीकरांनाच विनंती. कृपया अतुल या नावानेच संबोधावे Happy त्यामुळे आपलेपणा येऊन मलाही लिहीताना मोकळेपणा वाटेल Happy

कमीत कमी शब्दांत बरेच काही मांडायचा प्रयत्न केलाय लेखकाने. तरीही मुद्दा कळतो पण 'कळ' निसटते.
आगाऊ, एकदम पर्फेक्ट!
इथे 'गांधी अन् मंडेला' सारखेच म्हणणारे लोक आहेत. मग 'आंबेडकरांची मार्क्स' सोबत जोडी जुळणारच!

लेख आवडला पण थोडासा त्रोटक झाला असे वाटले.

आगाऊ ++१.

मार्क्सवाद भारतात रुजला नाही याचे एक कारण समाजाची शोषक आणी शोषित अशी बायनरी विभागणी करायचा अट्टाहास असे मला वाटते. एखादा शेतकरी आपला माल कवडीमोलाने दलालाला विकतो तेव्हा तो शोषित असतो पण आपल्या शेतात कमीत कमी मजूरी देऊन मजूर आणू पहातो तेव्हा शोषकही असतो.

पंचतारांकित मार्क्सवद्यांची संख्या भारतात आता कमी झाली असावी. सोव्हियेत रशिया होता तेव्हा त्या सरकारकडून स्कॉलरशिप वगैरे आशा असत.

औद्योगीकरणाने जात नष्ट होईल या एंगल्सच्या आशावादापेक्षा जात नाही ती जात हे आंबेडकरांचे वास्तववादी विधानच खरे आहे असे वाटू लागले आहे.

शेषराव मोरेंनी सावरकरवाद आणी आंबेडकरवाद यांचे साम्य दाखवणारे अभ्यासपूर्ण पुस्तकही लिहिले आहे जे मला पटले नाही.

एकदा एखाद्या फील्ड मधे करीयर करायचे म्हंटले की त्या क्षेत्रातील प्रत्यक्षातले काम व त्या क्षेत्रातील करीयर मधे पुढे जाण्यासाठी केल्या जाणार्‍या गोष्टी यातील तफावत अपरिहार्य असते.>> हो थोडीफार तफावत रहाणार आणि मी वरती लिहिल्याप्रमाणे व्यवहार कुणाला चुकत नाही हे सगळं खरं असलं तरीही प्रत्येक समाजशास्त्रज्ञाने स्वत:ची एक 'बेसिक इंटिग्रिटी' टिकवून ठेवली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. ती ठेवता येतेही. पण वरती अतुलने लिहिल्याप्रमाणे जी सेमिनारियन्सची जमात असते, त्यातही विशेषतः दिल्लीसारख्या ठिकाणी त्यातल्या बर्‍याच जणांची विद्वत्ता ही शो-बाजी/पॅकेजिंग अशात जास्त अडकून पडलेली दिसते.
हल्लीचे बहुतेक सगळे समाजशास्त्रज्ञ एक गोष्ट विसरलेले दिसतात ती म्हणजे ज्या समाजाविषयी आपण संशोधन करतो त्यांच्यापर्यंत आपले विचार पोचवणं. सेमिनार मधे, संशोधनाच्या व्यावसायिक लिखाणामधे जार्गन, क्लिष्ट भाषा टाळता येत नाही - विशेषतः तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचे विचार मांडायचे असतील, त्या वर्तुळात स्वीकारले जायला हवे अस्तील तर हे आवश्यक असतं. जार्गन ही फक्त मुद्दाम इम्प्रेशन पाडायला वापरलेली क्लिष्ट भाषा नसते तर त्या शब्दांमधे काही तात्विक, सांस्कृतिक विचारप्रक्रिया अनुस्यूत असतात आणि त्या नेमक्या छटेने आणायच्या तर त्या शब्दांना आणि तात्विक विचारचौकटींच्या घटपटादि चर्चांना पर्याय नसतो. पण हा व्यावसायिकतेचा भाग आहे. आपण समाजशास्त्रातलं संशोधन हे समाजाच्याच पैशांनी, त्यालाच वर्ण्यविषय बनवून करतो. मग त्यांच्यापर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत लिहिणंही समाजशास्त्रज्ञांनी 'मस्ट' आहे. तुम्ही जे संशोधन तांत्रिक भाषेत लिहिता ते जनसामान्यांना कळेल अशा भाषेत गोषवारा स्वरूपात लिहिणं फार अवघड नसतं. फक्त ते सामाजिक बांधिलकीचं भान राखून केलं जात नाही, असा आक्षेप माझ्यासारख्या अनेकांचा आहे/असेल

फर्ड्या इंग्रजीत फडतुस प्रश्न विचारणार्‍याबद्दल आदर आणि गंभीर प्रश्न भाषेअभावी न मांडता येणार्‍याचे गोची हा नेहेमीचाच प्रकार.>> हे वरवर पहाता कितीही बरोबर असलं तरी यात एक मेख आहे. जी व्यक्ती समाजशास्त्राचा अभ्यास करायला उतरलेली आहे (अगदी कायम फील्डमधेच काम करणारे कार्यकर्ते सोडून - विशेषतः जे शहरी समाजाच्या बाहेरून आलेत) तिने स्वतःचं इंग्लिश 'फर्डं' करण्यात अडचण काय आहे? आज जर काही मूलग्राही संशोधन करायचं असेल आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडायचं असेल किंवा असं संशोधन समजावून घ्यायचं असेल तर उत्तम इंग्लिशला पर्याय नाही. त्या भाषेतली त्यात्या विद्वत्शाखेची परिभाषा समजून घेऊन आत्मसात करणं यालाही पर्याय नाही. हे आधी थोडंसं अवघड वाटलं तरी अजिबातच अशक्य वगैरे नसतं. पण आपल्याकडे एकूणच (विशेषतः महाराष्ट्रात) या विषयी प्रचंड उदासीनता आहे असं खूप वेळा आढळून येतं. मग अशा परिस्थितीत 'चमकून' जातात ते वरती उल्लेखलेले सेमिनारियन्स!

फारेण्ड - हे 'अ‍ॅसिमिलेशन/अ‍ॅप्रोप्रिएशन' असं ठरवून एका व्यक्ती/समाजगटाकडून होतं असं नाही तर कालौघात होतं. समाज म्हणून एक 'कलेक्टिव्ह बिहेव्हियर' असतं... प्रत्येक समाजाचं/संस्कृतीचं वेगळं असतं. भारतीय उपखंडात प्राचीन काळी सहसा संघर्षापेक्षा को-एक्झिस्टन्स, अ‍ॅप्रोप्रिएशन आणि अ‍ॅसिमिलेशन हेच दिसून येतं..

मूळ मुद्याला बरंचसं अवांतर पोस्ट झालेलं आहे पण वरच्या काही प्रतिसादांवर प्रतिसाद द्यावेसे वाटले!

<<ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे. सर्व मानवी समस्यांची उत्तरे आहेत. जग बदलण्याची वेळ आलेली आहे. जग संक्रमणावस्थेत आहे. आता क्रांती होणारच आहे या आणि असल्या भ्रामक कल्पनांनी पछाडलेल्यांना पुढे प्रमाणिक राहताच येत नाही. >> हे आता बरंचसं आंबेडकरप्रणित बौद्ध चळवळीचं आजचं जे रूप आहे त्यालाही लागू पडतं असं नाही का वाटत? आंबेडकरांना आणि बुद्धाला देव बनवून टाकलं आहे. ती 'देवमाणसं' होती. देव नव्हेत. त्यांनी मांडलेल्या वैचारिक बैठकी, तात्विक चौकटी मुळात त्यात्या ऐतिहासिक-सांस्कृतिक पटलातून उद्भवलेल्या आहेत. त्यांच्यात कालानुरूप बदल करावेही लागतील याचं भान आज खरंच कितपत लोकांना आहे? त्या तत्कालीन न ठरता जवळजवळ सार्वकालिक म्हणता येतील इतक्या दूरगामी काळासाठी 'रिलेव्हन्ट' ठरल्या यात त्यांचा महानपणा आहे. पण म्हणून त्या काळ्या दगडावर खोदलेल्या न पुसता येण्या सारख्या रेषा आहेत किंवा त्यांच्या वैचारिक मांडणीत कधीही कुठलीही चूक आढळणार नाही हीही टोकाची पोथिनिष्ठताच आहे! ज्या वैचारिक चळवळी स्थलकालाच्या बदलत्या परिघांनुसार, बदलत्या परिस्थितींनुसार स्वतःला चांगल्या अर्थाने बदलत/सुधारत नाहीत त्या कालबाह्य ठरणार हे अगदी उघड आहे. आज दिसत असणारं दलित चळवळीचं निराशाजानक रूप ही या कालबाह्यतेची नांदी ठरू नये एवढीच इच्छा. कारण यात दलितांचा नाही तर सगळ्या भारतीय समाजाचाच पराभव असणार आहे, की समाजपरिवर्तनाची उत्तम सुरुवात करूनही आपण सामाजिक समतेकडे सक्षमपणे वाटचाल करू शकलो नाही, फक्त एक वेगळा 'धर्म' निर्माण करून आणखी काही मठांची आणि मठाधिपतांची सोय केली!

दुर्दैवाने आजही दलित समाजामधे जातीच्या, उच्चनीचतेच्या भावना पुसल्या गेल्या नाहीयेत. बामण भटजी किंवा बौद्ध भिक्खु यांच्याशिवाय विधी होत नाहीत (हे भिक्खु परत नवबौद्धांमधले 'एलीट्स' - यात 'ब्राह्मणवृत्ती' असते की नाही मला माहित नाही. आशा आहे की तसं नसावं). म्हणजेच उर्वरित हिंदू समाज ज्या रूढी पाळतो त्याच थोड्याफार फरकाने इथेही पाळल्या जातात. मग हळूहळू या चौकटीतही सामाजिक शोषणाच्या/उच्चनीचतेच्या वाटा तयार व्हायला वाव मिळू शकतोच की! तेव्हा बुद्ध येवो की मार्क्स की आंबेडकर... ते एक जादूची कांडी फिरवून काहीच बदलू शकत नाहीत.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडायचं असेल किंवा असं संशोधन समजावून घ्यायचं असेल तर उत्तम इंग्लिशला पर्याय नाही.

यात अमान्य असण्यासारखं काहीच नाही पण मला डॉ. बाविस्करांचं उदाहरण प्रातिनिधीक वाटतं. त्यांचं संशोधन भाषेमुळे भारतात नाकारलं गेलं आणि बाहेरील देशाने त्यांच्या संमतीने काही किरकोळ बदल त्यांच्या लिखाणात करुन ते संशोधन स्विकारलंअसं ऐकुन आहे. या गोष्टीचे तपशील आता आठवत नाहीत.इंग्रजी उत्तम असलेच पाहीजे यात वाद नाही. मात्र ही गोष्ट जादुच्या कांडीप्रमाणे एका दिवसात साध्य होणार नाही. ती होईपर्यंत समोरच्या माणसाने इंग्रजी येत नाही म्ह्णुन कुत्सीतपणे वागु नयेत. विद्यार्थ्याला भाषेमुळे संधी गमवण्याची पाळी येऊ नये. सडलेल्या उंदराकडे पाहतात त्याप्रमाणे त्याच्याकडे पाहिले जाऊ नये. सर्वांसमोर त्याचा अपमान केला जाऊ नये या अपेक्षा मला वाटतं वाजवी आहेत.

आपण समाजशास्त्रातलं संशोधन हे समाजाच्याच पैशांनी, त्यालाच वर्ण्यविषय बनवून करतो. मग त्यांच्यापर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत लिहिणंही समाजशास्त्रज्ञांनी 'मस्ट' आहे.

हा मुद्दा कळीचा आहे. मात्र शैक्षणिक क्षेत्रात मला आलेला अनुभव अगदी उलटा आहे.

फारेण्ड - हे 'अ‍ॅसिमिलेशन/अ‍ॅप्रोप्रिएशन' असं ठरवून एका व्यक्ती/समाजगटाकडून होतं असं नाही तर कालौघात होतं. समाज म्हणून एक 'कलेक्टिव्ह बिहेव्हियर' असतं... प्रत्येक समाजाचं/संस्कृतीचं वेगळं असतं. भारतीय उपखंडात प्राचीन काळी सहसा संघर्षापेक्षा को-एक्झिस्टन्स, अ‍ॅप्रोप्रिएशन आणि अ‍ॅसिमिलेशन हेच दिसून येतं..

हे मान्य होणं कठीण आहे. बुद्धाला दशावतारात स्थान देणं किंवा अलिकडे संघाच्या प्रातःस्मरणात गांधींचा समावेश याला नक्की काय म्हणायचं?

वरदाजी आपला प्रतिसाद अतिशय सुंदर आहे. इतर मुद्द्यावर लवकरच लिहेन Happy धन्यवाद Happy

ती होईपर्यंत समोरच्या माणसाने इंग्रजी येत नाही म्ह्णुन कुत्सीतपणे वागु नयेत. विद्यार्थ्याला भाषेमुळे संधी गमवण्याची पाळी येऊ नये. सडलेल्या उंदराकडे पाहतात त्याप्रमाणे त्याच्याकडे पाहिले जाऊ नये. सर्वांसमोर त्याचा अपमान केला जाऊ नये या अपेक्षा मला वाटतं वाजवी आहेत.>> अगदी मान्य!! फक्त विद्यार्थ्यांकडूनही त्या दिशेने प्रयत्न व्हायला लागतात. दुर्दैवाने महाराष्ट्रात समाजशास्त्राच्या शिक्षणात हे शिकवलंच जात नाही की भाषिक कौशल्य आत्मसात करणे हेही अत्यंत गरजेचे आहे. बरेच वेळा शिक्षक स्वतःच त्या भाषिक पात्रतेत बसणारे नसतात. मग 'अवघड' सैद्धांतिक लेखन मूळ इंग्लिशमधून वाचलं/शिकवलंच जात नाही. आणि मग ते एक दुष्टचक्र होऊन बसतं. जोपर्यंत मुळातलं सैद्धांतिक वाचन वाढत नाही तोपर्यंत भाषाही सुधारत नाही.. सध्या हे सगळं आकळून घेऊन विद्यार्थी तयार केलेच जात नाहीत. इंग्लिशला फक्त 'स्टेटस सिम्बॉल' बनवून ठेवलं आहे हीच दु:खाची बाब आहे!

बुद्धाला दशावतारात स्थान देणं किंवा अलिकडे संघाच्या प्रातःस्मरणात गांधींचा समावेश याला नक्की काय म्हणायचं?>> या अ‍ॅप्रोप्रिएशनच म्हणायचं ना? Uhoh

भारतीय उपखंडात प्राचीन काळी सहसा संघर्षापेक्षा को-एक्झिस्टन्स, अ‍ॅप्रोप्रिएशन आणि अ‍ॅसिमिलेशन हेच दिसून येतं..

आणि संधीसाधुपणाचं काय? जी माणसे आपल्या धर्मातील तत्त्वाविरुद्ध लढली, ज्यांनी बंडखोरी केली, नवीन तत्त्वज्ञान निर्माण केलं त्यांना पुढे आपल्यात सामिल करुन तेही आमचेच आहेत असे म्हणुन त्या लढाईतला कणाच काढुन टाकायचा याला काय म्ह्णायचं? बुद्ध म्हणजे काय फक्त यज्ञविधीविरोधकच होता काय? जयदेवाच्या गीतगोविंदात "निन्दसी यज्ञविधे रहहं श्रुतीजातं...सदय हृदय दर्शित पशूघातम... असं म्हटलं आहे.

वरदा, त्यांचा रोख बहुधा < ' ठरवून एका व्यक्ती/समाजगटाकडून होतं असं नाही ' > ह्या म्हणण्यावर असावा.

चलाखीच आहे! नैसर्गिक आहे म्हणतच नाहीये, पण भारतीय समाजात हे असं वारंवार घडत आलेलं आहे की विरोधी/विसंगत गोष्टींना अ‍ॅप्रोप्रिएट करून घ्यायचं म्हणजे कालांतराने त्यांचा कणाच मोडून पडतो! फक्त त्याकाळी ते कशा पद्धतीने - ठरवून, त्या गोष्टीच्या समाजातल्या वाढत्या लोकप्रियतेच्या रेट्याने का आणखी कुठल्या कारणाने/ कुणी/ किती काळामधे - इ.चे तपशील आपल्याला उपलब्ध नाहीत. तेव्हा आपण फक्त 'एन्ड रिझल्ट्स' पाहून ही प्रक्रिया झाली याचा निष्कर्ष काढू शकतो.
उदा: कुरुंदकरांनी महाभारताबद्दल शकुन्तलेवरच्या लेखात जे लिहिलेलं आहे - काण्व, भृगू इ. ऋषीकुलांतल्या स्पर्धेबद्दल, त्यांचे त्यांचे रंग महाभारताला देण्याबद्दल.. त्याची प्रक्रिया नक्की कशी झाली याचा काय पुरावा आहे आपल्याकडे?

प्रत्येक 'ग्रेटर ट्रॅडिशन'चे विरोधी गट/व्यक्ती/मतप्रवाह/लिटिल ट्रॅडीशन यांच्याशी 'डील' करताना काही पॅटर्न्स दिसून येतात. उदा: सेमिटिक समाजांमधे/विशेषतः धर्मांमधे संघर्ष्/हिंसा इ.वर जास्त भर होता. तसंच भारतामधे उघड हिंसा, संघर्ष न करता अ‍ॅप्रोप्रिएशन करायचं किंवा अ‍ॅसिमिलेशन करायचं असा पॅटर्न दिसून येतो.

उत्तम लेख, त्यावरची चर्चा त्याहूनही उत्तम.

मार्क्सवाद मी काही फार जास्त वाचलेला नाही, पण जेवढा वाचलाय त्यावरून भारतामधे तो जास्त रीलेव्हंट नाही असं वाटलं होतं कारण, भारतीय समाज काही अपवाद वगळता एका लार्ज स्केलवर कायमच शोषक आणि शोषित या दोन्ही पायर्‍यांवर उभा राहिलेला दिसतो.

कारण यात दलितांचा नाही तर सगळ्या भारतीय समाजाचाच पराभव असणार आहे, की समाजपरिवर्तनाची उत्तम सुरुवात करूनही आपण सामाजिक समतेकडे सक्षमपणे वाटचाल करू शकलो नाही, फक्त एक वेगळा 'धर्म' निर्माण करून आणखी काही मठांची आणि मठाधिपतांची सोय केली!
>>>> वरदाची ही अख्खी पोस्ट पटली. सध्या जे काही चालू आहे, त्यामधे सामाजिक समता आणण्याहीपेक्षा भूतकाळ कुरवाळत बसणे आणि द्वेष करणे यापलिकडे काहीही होत नाही. प्रत्येकाकडूनच.

अतुल, अतिशय चांगला लेख अन अशोकमामा, वरदा आदींचे तितकेच अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचले. खरतर या पुढे माझा फारसे वाचन वा अभ्यास नसताना लिहिलेला हा प्रतिसाद म्हणजे ताजमहालाला विटांच जोडकाम करण्यासारख काही तरी..... पण या चर्चेत एका मुद्याबाबत जे मनात आल ते लिहितो.

मला ही चलाखी वाटते. ती तशी नाहीय का? की हे नैसर्गीक आहे असे आपल्याला वाटते?>>>>
चलाखीच आहे! नैसर्गिक आहे म्हणतच नाहीये, पण भारतीय समाजात हे असं वारंवार घडत आलेलं आहे की विरोधी/विसंगत गोष्टींना अ‍ॅप्रोप्रिएट करून घ्यायचं म्हणजे कालांतराने त्यांचा कणाच मोडून पडतो!>>>>>

भूतकाळात ज्या ज्या महान व्यक्ती होउन गेल्या, त्या व त्यांचे विचार आमचे - तो आमचा ही वारसा अस आज म्हणणार्‍यांवर--- (कधीकाळी विरोधी विचार असल्याने म्हणा वा तशी प्रतिमा असल्याने म्हणा)--- हा ढोंगीपणा आहे अशा आशयाची टीकाटिप्पणी केली जाते.

इथे अपेक्षित काय आहे? एक समाज म्हणून जुने त्याज्य असे विचार दूर सारून नवे प्रगतीशील विचार / ते देणार्‍या महान व्यक्तींना स्वीकारण की कधीकाळी विरोध होता म्हणून आजही त्याच जुन्या विचारांना कवटाळून बसण? दोन मधल समाजासाठी चांगल काय?

सहज आठवल मी लहानपणी अकोल्यास असताना घरी नागपूर पत्रिका हे वर्तमानपत्र येत असे त्याच्या मास्ट खाली वेदांमधल एक वचन असे "आनो भद्रा: ऋतवो ( की क्रतवो ?) यन्तु विश्वतः" त्याच्याच खाली "सार्‍या विश्वातून आमच्या कडे चांगले विचार येवोत " असा त्या वचनाचा अर्थ ही असे. मला वाटत या वेदवाक्याच्या परंपरेशी सुसंगतच अस हे सारं विरोधी/विसंगत गोष्टींना अ‍ॅप्रोप्रिएट करण आहे. बघण्या चा दृष्टीकोन कसा त्यावर सार काही आहे. आज अमेरिके ला मेल्टिंग पॉट म्हणून ओळखल जात. मला वाटत भारत हा ही एक प्राचीनकाळपासून घडत आलेला व आजही घडणारा मेल्टिंग पॉट आहे.

>>आज अमेरिके ला मेल्टिंग पॉट म्हणून ओळखल जात. मला वाटत भारत हा ही एक प्राचीनकाळपासून घडत आलेला व आजही घडणारा मेल्टिंग पॉट आहे.
पण हे कोणी मान्य करेल तर ना.
भारत, पुर्वी, चांगलं, इ. असे काही शब्द जरा जरी एकत्र येताना दिसले तरी आक्रमक होऊन येतात लोकं आजकाल. Sad

Pages