किलर फ्रॉम हैद्राबाद - २ (अंतिम)

Submitted by स्पार्टाकस on 5 December, 2013 - 20:56

किलर फ्रॉम हैद्राबाद - १ - http://www.maayboli.com/node/46667

दिगुवामेट्टाला वनखात्याची कचेरी होती. तिथे जोसेफ नावाचा एक ख्रिश्चन फॉरेस्ट ऑफीसर होता. मी दिगुवामेट्टाला दोन जनावरं बांधल्यावर त्याला साथीला घेऊन दिवसभर जंगल पालथं घातलं होतं. या परिसरात अनेक वाघ होते आणि माचाणावरुन त्यांची शिकार करणं नित्याचंच होतं असं त्याने मला सांगीतलं. जोसेफ ब्रम्हचारी होता. त्याच्याबरोबर त्याच्या घरी मी राहण्यात त्याची कोणतीच अडचण होणार नाही असं त्याने मला खात्रीपूर्वक सांगीतल्यावर मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं. रेल्वेच्या वेटींग रूम मध्ये येणा-या - जाणा-या गाड्यांमुळे माझ्या झोपेत सतत व्यत्यय येत असे. जोसेफच्या घरी राहील्याने मला शांत झोप मिळणार होतीच पण त्याचा मल्याळी स्वैपाकी असल्याने रोज माझं जेवण बनविण्याच्या कामातूनही मला मोकळीक मिळणार होती.

दिगुवामेट्टाला राहण्याचा मी निर्णय घेतला त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे इथेच वाघाने तीन दिवसांपूर्वी शेवटचा बळी घेतला होता. तिच्या अवशेषांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात मात्र काही अर्थ नव्हता. एकतर वाघाने तीन दिवसांत तिचा पूर्ण फडशा पाडला असणार यात कोणतीच शंका नव्हती. दुसरं म्हणजे तिला घेऊन वाघ कोणत्या दिशेला गेला होता याची कोणालाच कल्पना नव्हती. त्या स्त्रीची फुलांची परडी पडलेली होती त्याच्या आसपासचा सुमारे ३०० यार्डांचा परिसर आम्ही चाळून काढला होता. वाघाचा कोणताही माग मिळाला नाहीच, पण त्या स्त्रीच्या वस्त्राची बोटभर चिंधीदेखील कुठे आढळली नाही.

हे जंगल म्हणजे शिका-याच्या दृष्टीने स्वर्ग होता. कित्येक प्रकारची शिकार तिथे उपलब्ध होती. चितळांचे कितीतरी कळप आमच्या नजरेस पडले. गवताच्या पात्याच्या टोकांना असलेल्या बियांच्या वजनामुळे गवत अर्ध्यातून वाकलं होतं. त्यामुळे दूरवरचा प्रदेश न्याहाळता येत होता. संध्याकाळी आम्हांला एका ऐटदार नर सांबराने दर्शन दिलं. आमची चाहूल लागताच तो जंगलात पसार झाला. सांबराच्या उपस्थितीमुळे वाघ जवळपास नसल्याचं आपोआपच स्पष्ट झालं. इथे इतक्या विपुल प्रमाणात शिकार उपलब्ध होती की मी बांधलेल्या जनावराकडे ढुंकूनही बघण्याची वाघाला आवश्यकता नव्हती. याच न्यायाने विचार करता मुळात वाघाला माणसावर हल्ला करण्याचंही काही कारण नव्हतं.

अली बेगचं तिकीट काढून मी रात्रीच्या मेलने त्याला गाझुलापल्लीला परत पाठवून दिलं. इथे मला त्याची आवश्यकता नव्हती. जोसेफच्या घराच्या व्हरांड्यात मी रेल्वे गाड्यांच्या आवाजाच्या व्यत्ययाविना पुढचे दहा तास निवांत झोप काढली. सकाळी थंडगार पाण्याने स्नान करून आणि खास मद्रासी पध्दतीच्या ' पुट्टू राईस ' चा नाष्टा करून मी संपूर्णपणे ताजातवाना झालो. जोसेफ तयार होऊन माझी वाटच पाहत होता. त्याच्या हाताखालच्या दोन वनरक्षकांसह आम्ही आदल्या दिवशी बांधलेल्या दोन्ही आमिषांना भेट दिली. दोन्ही जनावरं ठणठणीत जीवंत होती. त्यांच्या चारा-पाण्याचं काम त्या दोन्ही वनरक्षकांवर सोपवून आम्ही जोसेफच्या घरी परतलो.

वाघासाठी मी एकूण सात जनावरं वेगवेगळ्या ठिकाणी बांधली होती. त्याच्या हालचालींची बातमी त्वरित मला मिळेल याची व्यवस्था माझे स्टेशनमास्तर मित्र करणार होते. कोणत्याही बातमीविना वाघाचा शोध घेत जंगलात भटकणं म्हणजे वेळ आणि श्रम वाया घालवणं होतं. दिगुवामेट्टा ते गाझुलापल्लीच्या सत्तावीस मैलाच्या प्रदेशात वाघ कुठेही असू शकणार होता. लवकरात लवकर कोणत्या न् कोणत्या मार्गाने वाघाची खबर देणारी एखादी तरी घटना घडून येईल अशी अपेक्षा करण्याव्यतिरि़क्त त्या परिस्थितीत माझ्या हाती दुसरं काही नव्हतं.

आणि एकापाठोपाठ एक घटना घडायला सुरवात झाली ! दुस-या दिवशी सकाळी बसवपुरमच्या स्टेशनमास्तर मसिलामोनीची तार आली. मी वाघासाठी बांधलेलं रेडकू आदल्या रात्री मारण्यात आलं होतं. अर्थात ही बातमी ऐकून मी फारसा आनंदी झालो नव्हतो. तुम्हांला आठवत असेल बसवपुरमच्या जंगलात मला चित्त्याचे ताजे माग आढळले होते. हे रेडकू चित्त्याने मारलं असावं अशी माझी जवळपास खात्रीच होती. मसिलामोनीला मी किट्टूकडे अधिक चौकशी करण्याची सूचना दिली. काही मिनीटांतच मसिलामोनीची तार आली. माझा कयास अचूक ठरला होता. माझं रेडकू चित्त्यानेच मारलं असल्याचं किट्टूने खात्रीपूर्वक सांगीतलं. त्याने मला या चित्त्याच्या शिकारीसाठी बसवपुरमला येण्याची गळ घातली. वाघासाठी बांधलेलं कोणतंही आमिष चित्त्याला फुकटची मेजवानी ठरणार यात शंकाच नव्हती.

या सगळ्यात एक अडचणीची गोष्ट होती ती म्हणजे माझ्याजवळ त्या विभागातल्या शिकारीसाठी आवश्यक परवाना नव्हता. मी मद्रासच्या वनखात्याच्या वरिष्ठ अधिका-यांच्या विनंतीवरून केवळ नरभक्षकाच्या मागावर तिथे आलो होतो. अर्थात यातून सोईस्कर मार्ग काढणं मला सहज शक्यं होतं. चित्त्याची शिकार केल्यावर मला त्याची शिकार करण्यामागचा माझा हेतू मी पत्राद्वारे त्यांना कळवू शकत होतो. त्यातूनही काही वाद उद्भवलाच, तर शिकारीच्या परवान्याची आवश्यक ती किंमत मोजण्याची माझी तयारी होती.

बसवपुरमच्या दिशेने दिवसभरात जाणारी कोणतीही पॅसेंजर ट्रेन नव्हती. माझ्या विनंतीवरून दिगुवामेट्टाच्या स्टेशनमास्तरने सकाळी अकराच्या सुमाराला गाझुलापल्लीकडे जाणारी मालगाडी थांबवली आणि मी गार्डाच्या डब्यातून बसवपुरम गाठलं. जोसेफने माझ्याबरोबर येण्याचा आग्रह धरला.

किट्टूबरोबर मी भक्ष्याला भेट दिली. रेडकू चित्त्यानेच मारलं होतं यात कोणतीच शंका नव्हती. त्याच्या नरड्यात घुसलेल्या दातांच्या खुणांपासून ते पोटाला पडलेल्या भोकातून मांस खाण्यापर्यंत जागोजागी हे चित्त्याचं कृत्य असल्याचं निदर्शनास येत होतं. चित्त्याने रेडकावर चांगलाच ताव मारला होता, त्यामुळे तो रात्री उशीराच परतण्याची शक्यता होती. गावात परत येऊन आम्ही किट्टूची बाज घेतली आणि त्याचं झकास माचाण बांधलं. जेमतेम चार वाजले होते. स्टेशनवर जाऊन जेवण करून येण्यास अद्यापही वेळ होता. त्यामुळे चपात्या, केळी, बिस्कीटं आणि भरपूर चहा पिऊन साडेपाचच्या सुमाराला मी माचाणावर येऊन बसलो. जोसेफने माझ्याबरोबर बसण्याचा हट्ट केल्याने त्याला मी बरोबर घेतलं होतं.

चित्ता रात्री उशिराने भक्ष्याकडे परतेल असा माझा अंदाज होता. तो साफ चुकीचा ठरला. आम्ही माचाणात बसून जेमतेम वीस मिनीटं झाली असतील तोच बाजूच्या झुडूपात सळसळ झाली आणि एका सुरेख चित्त्याने उघड्यावर पाऊल टाकलं !

भारतीय जंगलातल्या या सर्वात देखण्या प्राण्याला ज्यांनी त्याच्या नैसर्गीक अवस्थेत पाहिलेलं नाही ते खरोखरच दुर्दैवी. प्राणीसंग्रहालयातील अर्धपोटी खंगलेल्या चित्त्याला पाहून जे त्याची यःकश्चित जनावर म्हणून संभावना करतात तो त्याचा घोर अपमानच आहे. उमद्या स्वभावाचा तो एक दिलदार प्राणी आहे. धाडसीपणात तर तो वाघापेक्षा तसूभरही कमी पडणार नाही.

माझ्यासमोरचा चित्ता ऐन तारूण्यातला उमदा नर होता. क्षणभर त्याला जीवदान द्यावं असा मला मोह पडला. पण वाघासाठी मी बांधलेलं प्रत्येक जनावर तो फस्त करणार यात शंका नव्हती. त्याचं त्या प्रदेशातलं अस्तित्वं माझ्या दृष्टीने तापदायक ठरणार होतं. त्याच्या डाव्या खांद्यामागे नेम ध्ररून मी गोळी झाडली. गोळी लागताच तो जागच्या जागी कोसळला.

आम्ही इतक्या लवकर स्टेशनवर परतल्यामुळे किट्टू आणी मसिलामोनी चकीतच झाले. पेट्रोमॅक्स कंदील घेऊन आम्ही त्या जागी परतलो आणि चित्त्याचा मृतदेह स्टेशनवर आणला. मसिलामोनीने मला चित्त्याचं कातडं देण्याची केलेली विनंती मी मान्य केली. कातडं सोडवून घेतल्यावर मी त्याला ते खराब न होण्यासाठी तूर्त कॉपर सल्फेट आणि मीठाच्या सोल्युशन मध्ये बुडवून ठेवण्याच्या आणि लवकरात लवकर कमावण्यासाठी बंगलोरच्या व्यावसायिकाकडे पाठविण्याची सूचना दिली.

चित्त्याची शिकार करून दुपारच्या गाडीने जोसेफसह दिगुवामेट्टाला परतण्याचा माझा बेत होता. पण ते रेडकू बांधून आम्ही स्टेशनवर परतलो तेव्हा एक नवीनच बातमी माझी वाट पाहत होती. चेलमा स्टेशनजवळ बांधलेल्या बैलाचा आदल्या रात्री वाघाने बळी घेतला होता. चेलमाच्या स्टेशनमास्तरने ही बातमी तारेने मसिलामोनीला कळवली होती. सकाळचे दहा वाजत आले होते. चेलमाला जाण्यासाठी - पुढचे चार तास - दुपारशिवाय गाडी नव्हती. मी पाच मैलाचं अंतर पायी चालत जाण्याचं ठरवलं. जोसेफ एका पायावर तयार होताच ! साडेअकराच्या सुमाराला आम्ही तिथे पोहोचलो.

चेलमाचा स्टेशनमास्तर आणि दोन्ही वनरक्षक आमची वाटच पाहत होते. ते सर्वजण कमालीचे उत्तेजीत झाले होते. वनरक्षक रोजच्याप्रमाणे सकाळी पाहणी करायला गेले असताना त्यांना बैलाचं अर्धवट खाऊन टाकलेलं कलेवर दिसलं होतं. जवळच एका मोठ्याथोरल्या वाघाच्या पंजांचे ठसे आढळले होते. गिधाडांपासून भक्ष्याचे उरलेले अवशेष झाकून ठेवण्यइतकाच वेळ लावून ते धावत-पळत स्टेशनवर आले होते आणि त्यांनी स्टेशनमास्तरला खबर दिली होती.

नरभक्षकासाठी आमिष म्हणून जनावर बांधताना मी प्रत्येक ठिकाणी माचाण बांधता येईल अशा सोईस्कर झाडाची निवड अगोदरच केलेली होती. चित्त्याच्या शिकारीच्या वेळी माझ्या या काळजीपूर्वक आखलेल्या योजनेचा फायदा झालाच होता.

स्टेशनमास्तर आणि जोसेफसह मी गावातल्या एकुलत्या एका हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणासाठी गेलो. जेवताना जोसेफने रात्री माझ्याबरोबर माचाणावर बसायची ईच्छा प्रदर्शीत केली, पण मी त्याला ठामपणे नकार दिला. चित्त्याच्या शिकारीला त्याने सोबत असणं आणि नरभक्षकाच्या शिकारीला असणं यात जमिन-आसमानाचा फरक होता. एखादा लहानसा आवाज, एखादीच बारीकशी हालचाल अशावेळी यश आणि अपयश यातील फरकास कारणीभूत ठरू शकते. मारून टाकलेल्या भक्ष्याकडे परतताना नरभक्षक कमालीचा सावध असतो. मला पूर्वी माचाणावर बसलेल्या जोडीदारांचे वाईट अनुभव आलेले होते. विशेषतः रात्रभर पाळत ठेवून बसावं लागलं तर आपल्या जोडीदाराची किंचीतशी चूकही आपल्या प्रयत्नांवर पाणी टाकणारी ठरते. माझ्या नकारामुळे नाराज होऊनही समजुतदारपणे जोसेफने माझं म्हणणं मान्यं केलं.

बळीची जागा स्टेशनपासून सुमारे तीन मैलांवर भर जंगलात होती. तासाभरात आम्ही तिथे पोहोचलो. दोघे वनरक्षक आणि जोसेफ माचाण बांधत असताना मी भक्ष्याची पाहणी केली. इथली जमीन चांगलीच टणक होती त्यामुळे वाघाच्या पंजांचे ठसे पूर्णपणे उमटले नव्हते परंतु ठशांवरून तो एक मोठा नर वाघ होता हे मात्र मी ओळखू शकत होतो. मात्र बालाच्या झोपडीजवळच्या झ-याच्या काठी आढळलेल्या ठशांशी हे ठसे मिळतेजुळते आहेत हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हतो. तिथे उमटलेले ठसे वाळूमुळे पसरट दिसत होते तर इथले टणक जमिनीवर अर्धवट !

सुमारे साडेचारच्या सुमाराला मी माचाणावर स्थानापन्न झालो. माझी चहाची आणि पाण्याची बाटली मी शेजारी ठेवली. रात्रीच्या जेवणासाठी गावातल्या हॉटेलमधून तीन मोठ्या चपात्या केळीच्या पानात गुंडाळून पाठवण्यात आल्या होत्या. त्याच्या शेजारी माझा जास्तीचा टॉर्च आणि काडतुसं. रात्री थंडी नसल्याने माझा कोट मी आणला नव्हता. माझा मोठ टॉर्च मी रायफलच्या क्लॅम्पवर बसवून टाकला.

माझ्या सूचनेनुसार जोसेफ आणि दोघं वनरक्षक गावात परतले. रात्रीच्या अंधारात मला स्टेशनपर्यंत रस्ता शोधण्यात अडचण येणार नाही असा माझा कयास होता.

अंधार पडण्यास सुरवात झाली आणि मला पायाखाली काटकी मोडल्याचा हलकासा आवाज आला. मी ज्या झाडावर बसलो होतो ते झाड चिंचेचं होतं त्यामुळे अगदी पुसटसा आवाज आला होता पण तो वाघाच्या आगमनाची सूचना देण्यास पुरेसा होता. माचाणावरून मी हलकेच वाकून पाहिलं आणि मी बसलो होतो त्याच झाडाखाली उभा असलेला वाघ दिसला !

काही क्षण तो एकदम दिसेनासा झाला, पण लवकरच तो परतला आणि दमदार पावलं टाकत मारून टाकलेल्या बैलाकडे गेला. त्याचं तोंड माझ्या विरूध्द बाजूला असल्याने मला त्याचा फक्त त्याच्या शरिराची डावी बाजू, पार्श्वभाग आणि शेपटी इतकंच दिसत होतं. जंगलात रात्रीच्या अंधारात दिसणारे रंग आणि आकार नेहमी फसवे असतात. आकारावरून तो चांगलाच थोराड वाटत होता मात्र त्याच्या रंगाच्या फिकटपणाविषयी मला काहीच कल्पना येईना. त्याच्या देहावरचे पट्टे जेमतेम दिसत होते.

माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याने मी टॉर्चचं बटण दाबलं. वाघाची डावी बाजू आणि त्याचं भक्ष्यं प्रकाशात उजळून निघालं. वाघाला अद्याप टॉर्चचा प्रकाश आपल्या मागून आला याचा पत्ताच नव्हता. मृत बैलाच्या दिशेने प्रकाश येत असावा अशीच त्याची समजूत झालेली दिसली. तो उभा राहून पुढे पाहत राहीला.

मी नेम धरून त्याच्या डाव्या खांद्यामागे गोळी झाडली. तो बैलाजवळ कोसळला आणि उजव्या बाजूला वळला. माझ्यासमोर त्याची छाती आणि पोट दिसताच मी दुसरी गोळी झाडली. टॉर्चच्या प्रकाशात मी निरीक्षण करत असतानाच वाघाने प्राण सोडला.

मी वीस मिनीटं वाट पाहीली आणि झाडावरून खाली उतरून वाघपाशी गेलो. तो म्ररण पावल्याची मला पक्की खात्री होती. तो एक मोठा नर वाघ होता पण बालाने केलेलं वर्णन या वाघाशी जुळत नव्हतं ! त्याची कातडी फिकट नसून पिवळीधमक होती आणि त्याच्या देहावरचे पट्टे आखूड नसून चांगले रूंद होते. याचा अर्थ माझ्या गोळीला चुकीचा वाघ बळी पडला होता ? का हाच वाघ नरभक्षक होता ? बालाने पाहिलेला वाघ दुसराच एखादा म्हातारा वाघ होता ? हे सर्व प्रश्न माझ्या मनात एकापाठोपाठ एक चमकून गेले. अर्थात येणारा काळच त्याचं उत्तर देण्यास समर्थ होता.

माझ्या टॉर्चच्या प्रकाशात स्टेशनपर्यंतची तीन मैलाची वाट शोधण्यास मला प्रयास पडले नाहीत. नऊ वाजण्याच्या सुमाराला मी स्टेशनवर पोहोचलो तेव्हा जोसेफ वेटींग रूम मध्ये आणि दोघं वनरक्षक प्लॅटफॉर्मवर चटई टाकून झोपलेलेल होते. त्यांना जागं करून मी शिकारीची बातमी सांगीतली. मी इतक्या लवकर परत आल्यामुळे त्यांना वाटलेल्या आश्चर्याचं रुपांतर आनंदात झालं. जोसेफने माझ्याशी हस्तांदोलन करून माझं मनःपूर्वक अभिनंदन केलं. मी त्याच्या अभिनंदनाचा स्वीकार केला पण मी नरभक्षकाऐवजी दुसराच वाघ मारला असण्याची शक्यता बोलून दाखवली. जोसेफ आणि दोन्ही वनरक्षकांचा माझ्या म्हणण्यावर अजिबात विश्वास बसला नाही. मी नरभक्षकाचीच शिकार केल्याची त्यांना खात्री वाटत होती ! अर्थात त्यांचंही बरोबरच होतं म्हणा. मी बांधलेला बैल वाघाने मारला होता. बैलाच्या देहाजवळ वाघाच्या पंजाचे ठसे त्यांनी पाहिले होते आणि नेम़क्या त्या ठिकाणी वाघ माझ्या गोळीला बळी पडला होता. अशा परिस्थितीत केवळ त्याच्या अंगावरचे पट्टे अरूंद नाहीत आणि रंग फिकट नाही या माझ्या मतावर ते कसे विश्वास ठेवणार होते ? गंमत म्हणजे सर्व वाघांच्या देहावरचे पट्टे आणि पायांचे ठसे एकसारखे असतात अशी त्यांची ठाम समजूत होती.

आमचं बोलणं सुरू असतानाच स्टेशनमास्तर तिथे आला. सर्वांप्रमाणेच त्यालाही नरभक्षकाचीच शिकार झाल्याची खात्री वाटत होती ! वाघाचा मृतदेह आणण्यासाठी मदत मिळवण्यासाठी ते गावाकडे धावले. सुमारे तासाभराने दहा माणसं, बांबू, मजबूत दोर आणि दोन कंदील यांसह दोघे परतले.

रात्री बारा-साडेबाराच्या सुमाराला वाघाला घेऊन आम्ही स्टेशनवर परतलो. प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला रेल्वे यार्डाची हद्द दर्शवणा-या लोखंडी कुंपणाजवळ मी वाघाचा देह ठेवला. दोन कंदील आणि जोसेफने धरलेला माझा टॉर्च याच्या प्रकाशात मी वाघाचं कातडं काढण्यास सुरवात केली. माझ्या साथीदारांपैकी कोणालाच या कामाची काहीच कल्पना नव्हती. वाघाचं कातडं काढण्याचं काम अर्ध्यावर आलं असताना गुंटकलला जाणारी रात्रीची मेल स्टेशनात शिरली.

मेलमधले यच्चयावत प्रवासी, ड्रायव्हर आणि गार्ड माझ्यासमोर वर्तुळाकार उभे राहून वाघाची कातडी काढण्याचं काम पाहत राहीले ! त्या रात्री मला प्रचंड प्रसिध्दी मिळाली. या सगळ्या भानगडीत गाडी तब्बल पंधरा मिनीटे उशीराने सुटली पण कोणालाही त्याविषयी कसलीच तक्रार नव्हती ! रेल्वे कर्मचा-यांच्या मते गाडीला झालेला उशीर वाजवी होता. हिंदुस्थानसारख्या देशातही अपरात्री एका मोठ्या वाघाची कातडी काढण्याचा कार्यक्रम आणि तो देखील रेल्वे स्टेशनवर हे दृष्यं तसं दुर्मीळच होतं.

वाघाचं कातडं मी कॉपर सल्फेट आणि मीठाच्या सोल्युशनमध्ये बुडवून ठेवलं. मी बंगलोरला परतेपर्यंत ते सुरक्षीत राहणार होतं,

दुसरा संपूर्ण दिवस मी आराम केला. चेलमाच्या स्टेशनमास्तरने नरभक्षकाची शिकार झाल्याची बातमी आपल्या इतर सहका-यांना कळवली. सर्वजण निर्धास्त झाले. त्या सर्वांमध्ये मीच एक असा होतो ज्याला नरभक्षक अद्यापही जीवंत आहे असं खात्रीलायक रितीने वाटत होतं. मी अजून एक आठवडाभर त्या भागात राहण्याचा निर्णय घेतला. मी आमिष म्हणून बांधलेली जनावरं होतीच. बंगलोरला परतून जाणं आणि पुन्हा यावं लागलं तर पुन्हा जनावरं बांधणं यापेक्षा तिथे थांबणं शहाणपणाचं ठरलं असतं. काहीतरी अप्रिय घटना घडणार असं मला राहून राहून वाटत होतं.

चार दिवस गेले आणि गाझुलापल्लीहून चमत्कारीक बातमी आली. बालाच्या बायकोला वाघानं खाल्लं !

नरभकाने चार महिन्याचं आपलं वेळापत्रक अखेर अचूक पाळलं होतं !

जोसेफ दिगुवामेट्टाला परतला होता. बालसुब्रमण्यमला मी बालाला बोलावून घेण्याची तार केली. पुढचे तीन-चार तास गाझुलापल्लीला जाणारी कोणतीही गाडी अथवा मालगाडी नसल्याने चेलमा इथे असलेल्या ट्रॉलीचा उपयोग करायची आता वेळ आली होती. दीड तासात मी गाझुलापल्लीला पोहोचलो तेव्हा बालसुब्रमण्यम, अली बेग, कृष्णप्पा आणि दुर्दैवी बाला प्लॅटफॉर्मवर माझी वाटच पाहत होते.

त्याची हकीकत छोटीशी परंतु दु:खद होती. मी चेलमा इथे वाघाची शिकार केली होती आणि माझ्या इतर कोणत्याही जनावरावर अद्याप हल्ला झाला नव्हता. नरभक्षकाचा धोका आता पूर्ण टळला या हिशेबाने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबासहीत तो जंगलातल्या झोपडीत परतला होता. त्या दिवशी पहाटे बालाची पत्नी जागी झाली आणि आपल्या मुलाला त्याच्या शेजारी झोपवून प्रातर्विधी साठी झोपडीच्या बाहेर पडली. काही क्षणांतच त्याला अस्पष्ट धडपडीचा आवाज आला. त्याबरोबर हातात कु-हाड घेऊन तो बाहेर पडला, परंतु अंधारात त्याला काहीही दिसलं नाही.

बालाने पत्नीच्या नावाने मोठ्याने हाका मारल्या परंतु तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही. धावतच ती जाण्याची शक्यता असलेल्या जागी झोपडीच्या मागच्या बाजूस तो पोहोचला पण तिची कोणतीही खूण त्याला तिथे आढळली नाही. दवामुळे गवत ओलं झालं होतं. उजाडत्या प्रकाशात त्याला एखादा वजनदार प्राणी त्या गवतावरून चालत गेल्याच्या स्पष्ट खुणा दिसल्या. रक्ताचा थेंबही त्याला दिसला नाही पण तरीही आपल्या पत्नीला उचलून नेणा-या नरभक्षकाच्या मागावर आपण आहोत याची त्याला कल्पना आली.

त्यानंतर बालाने विलक्षण धाडसी परंतु अत्यंत अविचारी कृती केली. आपली छोटीशी कु-हाड घेऊन तो वाघाच्या पाठलागावर निघाला !

सुमारे दोन फर्लांग अंतरावर त्याला रक्ताचा माग गवसला. वाघाने त्या तरूणीच्या शरिरावरची पहिली पकड त्या ठिकाणी काही क्षणांकरता सोडली होती. तिथून पुढे रक्ताच्या डागांवरुन माग काढत बालाने एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत बसलेल्या वाघाला अखेर गाठलं ! वाघाने अद्याप तिच्या मांसाला तोंड लावलं नव्हतं. बालाला पाहताच वाघाने आपले कान पसरले आणि गुरगुरत आक्रमणाचा पवित्रा घेतला. आणखीन एखाद्या सेकंदातच त्याने बालावर झेप टाकली असती. परंतु आपल्या प्रिय पत्नीचं अचेतन शरीर वाघाच्या तोंडात पाहून बाला संतापाने बेभान झाला होता. मोठ्याने ओरडत हातातली कु-हाड परजत तो थेट वाघावर धावून गेला !

मी आधीच म्हटल्याप्रमाणे जवळपास सर्वच नरभक्षक काहीसे भित्रे असतात. सावजावर नकळतपणे हल्ला करण्यास ते कचरत नाहीत पण सावजाने प्रतिकार केल्यास मात्र ते हमखास माघार घेतात. त्या सकाळी या नरभक्षकानेही तोच मार्ग पत्करला. बाला त्याच्यापासून जेमतेम हाताच्या अंतरावर पोहोचलेला असताना वाघाने धूम ठोकली !

सुदैवाने बालाचं डोकं योग्य वेळी ठिकाणावर आलं ! तो तसाच वाघाच्या मागे धावला असता तर एव्हाना आश्चर्याच्या धक्क्यातून सावरलेल्या वाघाने एका क्षणात त्याचा निकाल लावला असता. बालाने वाघाचा नाद सोडला आणि आपल्या पत्नीचं शव उचलून झोपडी गाठली.

झोपडीत परत येताच शोक करण्यात वेळ न दवडता बालाने आपल्या पत्नीचा मृतदेह तिथे ठेवला, झोपडीचं दार काटेरी झुडूपं लावून बंद केलं आणि आपल्या आई आणि मुलासह मला खबर देण्यासाठी स्टेशन गाठलं ! बालाने केलेल्या हल्ल्यामुळे हादरलेल्या वाघाला परतण्यास वेळ मिळण्यापूर्वीच ते स्टेशनवर पोहोचले होते.

त्या तरूण चेंचूविषयीच्या सहानुभूतीने आणि त्याच्या असामान्य धैर्याबद्द्ल आदराने माझं मन भरून आलं. या देशाचा खरा साहसी वीर होता तो! मला सगळी हकीकत सांगून झाल्यावर तो नि:शब्दपणे आश्रू गाळत होता. मी त्याला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. माझ्या नुसत्या शाब्दीक सहानुभूतीने ना त्याचं दु़:खं कमी होणार होतं ना त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून निघणार होती.

पण लवकरच तो सावरला. दहा मिनीटांनी तो उठून उभा राहीला आणि वाघाच्या मागावर जाण्यासाठी आपण तयार असल्याचं त्याने बोलून दाखवलं.

माझ्या डोक्यात एक योजना आकार घेत होती. मात्र त्या योजनेला मूर्तीमंत स्वरूप येण्यासाठी बालाला फार मोठा त्याग करावा लागणार होता ! त्याला त्याविषयी विचारण्यास मी धजावत नव्हतो. पण बालाने माझ्या नजरेला नजर देताच माझ्या मनातले विचार ओळखले असावे. आम्हां दोघांत जंगलाविषयीच्या प्रेमाचा आणि परस्परांविषयी स्नेहाचा जो एक अनोखा भावबंध जुळला होता त्यामुळे माझ्या योजनेला त्याने मनोमन होकार दिला असावा.

" दोराईं, मला तुमची विनंती मान्य आहे! " अली बेगमार्फत त्याने मला सांगीतलं, " ती माझी पत्नी होती. अद्यापही माझं तिच्यावर प्रेम आहे, पण माझ्या प्रिय पत्नीचा आणि वडिलांचा जीव घेणा-या वाघासाठी आमिष म्हणून तुम्हांला तिचा देह मिळेल !"

बोलण्यासारखं आता काही शिल्लक नव्हतं. त्या आदिवासी तरूणाने माझ्या शब्दाखातर असामान्य त्याग केला होता आणि त्याच्यासाठी मी त्या वाघाला ठार मारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा माझा निश्चय होता. बालसुब्रमण्यमने माझ्यासाठी आपल्या घरून मागवून घेतलेलं जेवण आटपून मी चहा आणि पाण्याने दोन्ही बाटल्या भरून घेतल्या आणि दोन्ही वनरक्षक आणि बालासह त्याच्या झोपडीकडे निघालो.

बालाच्या पत्नीच्या देहावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या, परंतु बालाने एकुलत्या एका साडीने तिचा देह झाकला होता. तिच्या चेह-यावर विलक्षण शांत भाव होते. तिच्या पाठीवरच्या जखमांतून झिरपलेलं रक्त मातीत मिळून गेलं होतं. तिच्या गळ्याभोवतीच्या जखमांतून वाहिलेल्या रक्ताचं तिच्या छातीवर थारोळं झालं होतं. आमच्या समोर असलेला मृतदेह त्या सकाळीच एक आनंदी माता, पत्नी आणि सून होती या जाणिवेने आम्हांला वाईट वाटलं. तिच्या मृतदेहासमोर मिनीटभर शांत उभं राहून आम्ही श्रध्दांजली वाहीली.

आम्ही झोपडीबाहेर आलो आणि बालाने ज्या ठिकाणी वाघाच्या तावडीतून तिचा मृतदेह सोडवून आणला होता त्या जागेकडे प्रस्थान केलं. सकाळी पडलेलं दवं एव्हाना गवतावर मागमूसदेखील नव्हता. काही अंतर चालून गेल्यावर बाला सकाळी रक्ताचे डाग दिसलेल्या जागी आला. तिथून रक्ताचा माग काढत वाघ ज्या झाडाखाली भोजनास बसला होता ते वठलेलं झाड शोधण्यास आम्हाला फारसे प्रयास पडले नाहीत. त्या झाडाच्या पायथ्याशी वाळलेल्या गवताचा थर होता. वाघाच्या पंजाचे ठसे मात्र आसपास दिसून आले नाहीत.

हा वाघ एकदा मारलेल्या मानवी भक्ष्यावर परत न येण्याबद्दल प्रसिध्द होता. हैद्राबादच्या त्या नवाबाने झाडलेल्या गोळीने सावध झालेल्या वाघाने भक्ष्यावर परतण्याचं आजतागायत टाळलं होतं. या वेळीही तो परत येईल याची शाश्वती नव्हती. मात्र या वेळी त्या वाघाला एक घासही मांस खाता आलं नव्हतं, त्यामुळे तो कदचित परत येण्याची शक्यता होती. अर्थात बालाने त्याच्यावर चढवलेल्या हल्ल्याची स्मॄती त्याच्या मनात अद्याप ताजी असणार होती हे मात्र निश्चित. अर्थात काहीही झालं तरी त्या वाघासाठी बसण्याचा माझा ठाम निश्चय होता.

आता माचाण बांधण्यासाठी सोईस्कर झाड शोधून काढणं आवश्यक होतं. त्या वठलेल्या झाडाच्या आसपासच्या जागेवर भरपूर खुरटी झुडूपं माजली होती. सर्वात जवळचं झाड तिथून कमीत कमी तीस यार्डांवर होतं आणि त्या झाडाच्या शेंड्यावर बसल्याशिवाय मला वाघ दिसू शकणार नव्हता. मधल्या कुठल्याही फांदीवर बसल्यास माझ्या टॉर्चचा प्रकाश झुडूपांच्या दाटीमुळे वाघापर्यंत पोहोचणार नव्हता आणि वाघ अंधार पडल्यावरच येणार हे उघड होतं. मी ते झाड गाठलं, पण त्याच्या शेंड्याजवळच्या फांद्या जेमतेम बोटभर जाडीच्या होत्या. माचाणासकट माझं वजन पेलण्यास त्या अर्थातच असमर्थ होत्या. त्या झाडापासून दहा यार्डांवर आणखीन एक झाड होतं, पण त्या झाडावरुन त्या वठलेल्या झाडाच्या काही फांद्याच दिसत होत्या.

वाघासाठी कुठे बसावं हा प्रश्न आता आ SS वासून उभा राहिला !

मी पुन्हा त्या वठलेल्या झाडापाशी आलो आणि त्याला प्रदक्षिणा घातली. तो एक भला थोरला वृक्ष होता. कोणती तरी कीड पडल्यामुळे किंवा लहान-सहान प्राण्यांनी त्याची मुळं कुरतडल्यामुळे तो वठला असावा. सुमारे दहा-बारा फूट परिघ असलेला त्याचा बुंधा आणि वाळलेल्या फांद्याच काय त्या शिल्लक होत्या.

झाडाच्या बुंध्यावर माझ्या डोक्याएवढ्या उंचीवर तीन फांद्या फुटल्या होत्या. त्या फांद्यांच्या बेचक्याखालीच एक ढोली तयार झाली होती. त्या मृत तरूणीला खाण्यासाठी जिथे वाघ बसला होता तिथून ही ढोली सहजासहाजी दिसून येत नव्हती. मी टॉर्चच्या उजेडात ढोलीची तपासणी केली. एखादा साप अथवा विंचू तिथे वास्तव्यास असता तर भलतीच आफत ओढवली असती. सुदैवाने ढोली अगदी ओस पडलेली होती.

माझ्या सूचनेनुसार बाला त्या ढोलीत उतरला. माझ्यापेक्षा बुटका असल्याने तो लगेच दिसेनासा झाला. त्या अरूंद ढोलीत तो जेमतेम मावत होता. मी त्याच्यापेक्षा जाड असल्याने मला त्या ढोलीत शिरण्यासाठी ढोलीचं तोंड मोठं करणं आवश्यक होतं. पुढचे दोन तास बाला आणि कृष्णप्पाच्या कु-हाडींच्या सहाय्याने आम्ही ते झाड पोखरून काढलं. गुडघ्याच्या उंचीपर्यंत पोखरलेल्या बुंध्यातून अखेर मला त्या ढोलीत प्रवेश करता आला. ढोलीत उतरल्यावर मला आम्ही मोठया केलेल्या ढोलीच्या तोंडातून रायफल झाडणं शक्यं होणार होतं.

अर्थात या व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. वाघ ज्या जागी त्या तरूणीला खाण्यास बसला होता ती जागा माझ्या मागच्या बाजूस होती. मध्ये झाडाचा बुंधा असल्याने मला वळून गोळी झाडणं अशक्यं होतं. यावर उपाय म्हणजे ते झाड आरपार पोखरणं, पण आमच्यापाशी तेवढा वेळ नव्हता. त्या ढोलीत बसून गोळी झाडण्याची संधी हवी असेल तर तिचा मॄतदेह मूळ जागी न ठेवता ढोलीच्या समोर ठेवावा लागणार होता. तसं न केल्यास वाघ आलाच तर एकतर तो तिचा देह घेऊन दुसरीकडे निघून गेला असता किंवा माझ्या मागच्या बाजूस पाच-सहा यार्डांवर बसून त्याने तिचा फन्ना उडवला असता आणि मला काहीही करणं शक्यं झालं नसतं. ढोलीतून बाहेर पडून आणि बुंध्याला वळसा घालून वाघावर गोळी घालणं हा एक मार्ग होता पण त्या प्रयत्नांत माझ्याकडून निश्चितच काही ना काही आवाज झाला असता. त्या आवाजाने एकतर वाघ निघून गेला असता किंवा दुसरी भीतीदायक शक्यता म्हणजे तो माझ्यावर आला असता ! मला रात्रभर त्या ढोलीत उभं राहवं लागणार होतं. भक्ष्यापाशी परतणारा वाघ अत्यंत सावध असतो. प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करून कोणताही धोका नसल्याची पूर्ण खात्री पटल्याशिवाय वाघ परतून येत नाही. मी आत लपल्यावर ती ढोली झाकण्यासाठी आम्हाला अर्थातच थोडीफार पानं आणि काटक्य-डहाळ्या वापराव्या लागणार होत्या. सकाळी एकही पान नसलेल्या झाडावर अचानक एका जागी पानं आणि डहाळ्या उगवलेल्या पाहून वागाला संशय आला तर सगळंच मुसळ केरात जाणार होतं. त्यातून रात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी एखादा नाग अथवा विंचवाने ढोलीचा आश्रय घेतला तर माझी कंबख्तीच ओढवली असती. या सगळ्या शक्यतांचा आणि त्यांच्या परिणामांचा विचार करूनही मी शेवटी ढोलीतच बसण्याचा निश्चय केला.

मी माझा कोट जमिनीवर पसरला. आम्ही ढोली पोखरून काढलेल्या लाकडाचा एकूण एक तुकडा त्यावर ठेवला आणि दूर नेऊन टाकला. मग आम्ही झोपडीत परतलो. बालाने आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेतला. आम्ही पुन्हा त्या झाडापाशी परतलो. माझ्या सूचनेवरून बालाने तिचा देह ढोलीच्या बरोबर समोर न ठेवता थोडा डाव्या बाजूला ठेवला. वाघ तिच्याकडे पाहताना मी त्याच्या नजरेसमोर येणार नव्हतो. ढोलीत माझ्या रायफलव्यतिरिक्त काही ठेवण्यास जागा नव्हती. मी चहाबरोबर एक चपाती खाऊन घेतली आणि ढोलीत उतरलो.

बाला आणि कृष्णप्पाने ढोली काटक्या आणि पानं वापरून झाकून टाकली. बाला वेगवेगळ्या कोनातून ढोलीत लपलेला माणूस दिसत तर नाहीना याची खात्री करून घेत होता. त्याने लाकडाची एक मोठी काठी माझ्यासमोर छातीच्या उंचीला येईल अशी ठेवली होती. त्याच्या आधाराने मला रायफल झाडता येणार होती. कोणताही आवाज न होता मला ढोलीत रायफल उचलून नेम धरता येत आहे हे मी पुन्हा-पुन्हा तपासून पाहिलं. त्यानंतर त्यांनी ढोलीच्या तोंडासमोर आणखीन पानं आणि डहाळ्या रचल्या. त्यांचं काम आटपलं तेव्हा मी त्या ढोलीत जवळपास चिणल्यासारखा बंदीस्त झालो होतो !

निघण्यापूर्वी बालाने आपल्या पत्नीचं अखेरचं दर्शन घेतलं. तिच्या थंडगार कपाळाचं त्याने चुंबन घेतलं. त्यानंतर तिच्या मृतदेहाला त्याने साष्टांग नमस्कार केला. वाघाला आमिष म्हणून तिचं शरीर वापरत असल्याबद्दल त्याने तिच्या आत्म्याची क्षमा मागितली. आपल्या प्रिय पत्नीचं अंत्यदर्शन घेताना त्याला अश्रू अनावर झाले होते.

तो उठून उभा राहिला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाण्याचा थेंबही नव्हता. परत जाण्यापूर्वी त्याने वळून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतले भाव मी जाणले. तो जणू म्हणत होता, ' मला शक्यं होतं ते सगळं मी केलं दोराई. माझ्या पत्नीचा मृतदेह देखील आमिष म्हणून तुमच्या हाती सोपवला. आता सगळं तुमच्या हाती.' मी मनोमन त्याला सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं वचन दिलं. मला सोडून ते तिघं झोपडीत परतले.

मी घड्याळावर नजर टाकली. पावणे पाच वाजले होते. माझ्यासमोर त्या दुर्दैवी तरुणीचा मृतदेह होता. तिचं शरीर ताठरण्यास सुरवात झाली होती परंतु तिच्या चेह-यावरचे शांत भाव अद्यापही तसेच होते. मधूनच येणा-या वा-याची झुळूक तिची साडी अथवा जमिनीवर पसरलेले मोकळे केस हलवून जात होती. बिचारा बाला ! या नरभक्षकाने आधी त्याच्या वडिलांची हत्या केली होती आणि आता त्याच्या पत्नीचाही बळी घेतला होता. त्याच्यासाठी वाघावर गोळी झाडण्याची एकतरी संधी मला हवी होती.

मधूनच येणा-या वा-याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही हालचाल होत नव्हती. माझ्या मनगटावरच्या घड्याळाची टिक् टिक् सोडली तर दुसरा कोणताही आवाज कानावर येत नव्हता. ढोलीत सतत उभं राहिल्याने माझ्या पायांना रग लागली होती. मधूनच एकेक पाय हलकेच उचलून मी पायांना मुंग्या येणार नाहीत याची दक्षता घेत होतो. मल कदाचित रात्रभर त्या ढोलीत उभं राहवं लागण्याची शक्यता होती.

सुमारे पाऊण तासांनी जंगलातल्या पक्ष्यांचे आवाज येऊ लागले. एका रानकोंबड्याने कूक कू कू कूक अशी जोरदार आवाजात बांग दिली. त्याला जवळूनच दुस-या रानकोंबड्याच जवाब मिळाला. पहिल्या रानकोंबड्याने आपलं सर्वांग झाडलं आणि आवाजाच्या दिशेने रोखून पाहिलं. नेमक्या त्याच वेळी वा-याने त्या तरूणीच्या देहावरची साडी किंचीतशी हलल्याचा भास झाला. त्यासरशी रानकोंबडा उडून गेला. काही वेळाने मियाSSऊ असा मोराचा आवाज आला. त्याला दुस-या मोराने साद घातली. मोरांच्या सगळा थवा उडून झाडावर बसल्याचे आवाज आले. दिवसभर या फुलावरुन त्या फुलांवर बागडणारी फुलपाखरं आणि इतर कीटक आपापल्या रात्रीच्या आस-या कडे परतत होते.

दिवस मावळत आला होता. दिवसभर आकाशात विहार करून दमलेले पक्षी आपापल्या घरट्यांत विसावले होते. माझ्या समोरच्या जमिनीवर एक घार हळूच उतरली. काही क्षण निश्चलपणे बसून तिने आकाशात भरारी मारली आणि नी दिसेनाशी झाली. मी ज्या झाडाच्या ढोलीत बसलो होतो त्या झाडाभोवती दोन वटवाघळं चकरा मारून गेली. बहुधा रात्रीच्या आस-याला परतणा-या किड्यांच्या मागावर असावीत.

दिवस आणि रात्रीचं प्राणीजीवनाचं हे चक्र मी पूर्वी कितीतरी वेळा अनुभवलं होतं. अर्थात त्या वेळच्या आणि आताच्या माझ्या परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक होता. काही वेळातच चोहीकडे गडद अंधार पसरला. वेळाने त्या आकाशात एक एक करून चांदण्या लुकलुकायला सुरवात झाली. त्यांच्या उजेडातचा अर्थातच मला काही उपयोग नव्हता. ती अमावस्येची रात्रं असल्याने चंद्र्प्रकाशाचा प्रश्नच नव्हता.

काही वेळातच डासांना माझा पत्ता लागला. त्यांची सगळी फौज माझ्या अंगावर कोसळली. खालच्या ओठाने हळूच फुंकर मारून मी त्यांना माझ्या चेह-यावरुन उडवून लावत होतो. एव्हाना रात्रीचे आठ वाजून गेले होते. अधून-मधून एकेक पाय उचलून आणि एक पाय दुस-या पायावर दाबून पायांना मुंग्या येऊ न देण्याचा उद्योग मी सुरूच ठेवला होता. आपणहून मी त्या ढोलीत स्वत़:ला बंद करून घेतलं होतं. ते देखील अशा एका नरभक्षकाच्या प्रतीक्षेत ज्याची आपल्या भक्ष्यावर परतून न येण्याबद्द्ल ख्याती होती. माझ्या मनात बाला आणि माझ्यासमोरच अंधारात पडलेल्या त्याच्या मृत पत्नीचा विचार आला. त्यांच्यासाठी एवढं करणं हे माझं कर्तव्यच होतं.

एकाएकी मी पूर्णपणे सावध झालो. मला काहीही दिसलं नव्हतं ना काही ऐकू आलं होतं, पण माझी पंचेंद्रीये अचानक तल्लख झाली. नरभक्षक जवळपास आला असल्याची जाणीव माझ्या अंतर्मनाने मला दिली होती ! आतापर्यंत मी वाघाचा किंवा त्याच्या आगमनाची सूचना देणा-या कोणत्याही प्राण्याचा किंवा पक्ष्याचा आवाज ऐकला नव्हता. तरीही तो तिथे होता याबद्दल मला पूर्ण खात्री होती. मात्र त्याच्या हालचालीचा पुसटसाही आवाज आला नव्हता. मी कोणत्याही क्षणी गोळी झाडण्याच्या तयारीत होतो.

वाघाच्या शांत असण्याचा एकच अर्थ निघू शकत होता. त्याला निश्चीतच कसला तरी संशय आला होता ! सकाळी याच जागी बालाने त्याच्यावर हल्ला करुन त्याला पळवून लावलं होतं. त्या घटनेची स्मृती अद्याप त्याच्या मनात ताजी राहिली असावी का ? की आसपास एखादी त्याने विचित्र गोष्ट पाहिली होती ? त्याने मी तिथे असल्याचं ओळखलं होतं का ? की मला पाहिलं होतं ?

शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी वाटेल ती किंमत मोजायला तयार होतो !

किती वेळ गेला कोणास ठाऊक. अचानक मला वाघाचा पुसटसा आवाज आला. आणि मग काहीतरी ओढत नेत असल्याचे आवाज आले. याचं एकंच स्पष्टीकरण असू शकत होतं. वाघ बालाच्या पत्नीचा मृतदेह ओढून नेत होता. आणखी काही सेकंदातच तो तिथून निघून गेला असता. तो निघून जाण्यापूर्वी गोळी झाडण्याची संधी घ्यावी या हेतूने मी टोर्चचं बटण दाबणार तोच तो आवाज एकदम बंद झाला.

आणि मांस टराटरा फाडल्याचा, हाडं दातांनी फोडल्याचा आवाज ऐकू येऊ लागला ! हा आवाज माझ्या पाठीच्या दिशेने ढोलीच्या मागून येत होता.

याचं अर्थ उघड होता. काहीतरी कारणामुळे वाघाने त्या तरूणीचा देह सकाळी ज्या जागी टाकला होता त्याच जागी नेऊन भोजनास सुरवात केली होती. त्याला कोणताही संशय आला नव्हता अथवा त्याने मला पाहिलं नव्हतं. तसं असतं तर एकतर तो निघून गेला असता किंवा त्याने माझ्यावर हल्ला केला असता ! परंतु त्याने तसं काहीच केलं नव्हतं. आपलं भक्ष्यं मूळच्या जागीच नेऊन खाण्याचा त्याचा विचार असावा. कदाचित एखाद्या कोल्ह्याने अथवा तरसाने भक्ष्यं हलवून वेगळ्या जागी नेलं असावं अशी त्याची समजूत झाली असावी.

वाघाला माझा सुगावा न लागल्याबद्द्ल मी सुटकेचा नि:श्वास टाकतो आहे तोच एका नवीनच समस्या माझ्यासमोर उभी ठाकली. वाघाला टिपण्यासाठी आता मला ढोलीतून बाहेर पडून झाडाच्या बुंध्याला वळसा घालून गोळी झाडावी लागणार होती !

तुम्हांला आठवतच असेल बाला आणि कृष्णप्पाने मला पानं आणि डहाळ्या वापरून त्या ढोलीत ' बंदीस्त ' करून टाकलं होतं. ढोलीतून बाहेर पडण्यापूर्वी मला हे सगळे अडथळे दूर करावे लागणार होते. हे करताना किंचीतसा देखील आवाज होऊन चालणार नव्हतं. एकतर वाघ सावध होऊन दूर निघून गेला असता किंवा आवाजाची तपासणी करण्यासाठी ढोलीजवळ आला असता. मी त्याचा समाचार घेण्याच्या तयारीत नसताना त्याने मला गाठलं असतं तर माझी खैर नव्हती. माझ्यापुढे एकच पर्याय होता तो म्हणजे वाघ भोजनात मग्नं होईपर्यंत वाट पाहणं !

दरवेळी मांस फाडल्याचा किंवा हाड फोडल्याचा आवाज झाला की मी ह़ळूच एखादं पान अथवा एखादी डहाळी ढोलीत माझ्या पायापाशी सोडत होतो. काही वेळातच ढोलीचं तोंड मला बाहेर येण्याइतपत मोठं करण्यात मला यश आलं. मग मी हळूच माझा उजवा पाय ढोलीतून बाहेर काढला. वाघ अद्याप खाण्यातच मग्न होता. मग डाव्या हाताचा आधार घेऊन मी माझा डावा पाय ढोलीतून बाहेर काढला. या क्षणी मी अधांतरी अवस्थेत होतो आणि वाघाने माझ्यावर हल्ला केला असता तर माझी धडगत नव्हती. पण माझ्या सुदैवाने वाघ भोजनात गुंग झाला होता.

इंचाइंचाने सरकत मी झाडाच्या बुंध्याला वळसा घातला. त्या तरूणीच्या देहावर ताव मारण्यासाठी बसताना वाघाची नजर त्या झाडाकडे असली तर कोणत्याही क्षणी मी त्याच्या नजरेस पडणार होतो. मात्रं त्याची पाठ असल्यास त्याला माझा सुगावा लागण्याची शक्यता कमी होती.

अखेर ती वेळ येऊन ठेपली होती. माझ्या रायफलचा दस्ता खांद्याला लावून मी एक पाऊल पुढे टाकलं. झाडाच्या बुंध्याआडून मी पाहीलं आणि मला वाघाची आकृती दिसली. त्या अभागी तरूणीच्या अवशेषांवरच बालाच्या झोपडीच्या दिशेने तोंड करून वाघ पहुडला होता !

मी टॉर्चचं बटण दाबत असतानाच वाघाला काहीतरी धोका असल्याची जाणीव झाली. मान वळवून त्याने मागे नजर टाकली आणि प्रखर प्रकाशात त्याचा चेहरा आणि डोकं उजळून निघालं ! रक्ताने माखलेल्या त्याच्या तोंडातले मांसाचे तुकडे मला त्या प्रकाशात स्पष्ट दिसत होते !

माझ्या पहिल्या गोळीने त्याच्या मानेचा वेध घेतला. गोळी लागताच प्रचंड डरकाळी फोडून तो उस़ळला, मी दुसरी आणि पाठोपाठ तिसरी गोळी त्याच्यावर झाडली. दोन्ही गोळ्या त्याला लागल्याचं मी पाहिलं. त्यानंतर काय झालं हे आजतागायत मला न उलगडलेलं कोडं आहे. झेप टाकून तो दिसेनासा झाला.

माझी पहिली गोळी लागताक्षणापासून तो दु:खाने आणि वेदनेने डरकाळ्या फोडत होता. संतापाच्या भरात तो झुडूपांवर तुटून पडल्या आणि ती उपटून फेकल्याचेही आवाज ऐकू येत होते. वेदनेने तो वेडापिसा झाला होता, पण झुडूपांत दडी मारल्याने तो माझ्या दृष्टीस पडत नव्हता.

मी धावतच ढोली गाठली आणि आत उडी टाकली. रायफलच्या चापावर बोट ठेऊन कानोसा घेत राहीलो. तीन गोळ्या झाडल्यावर रायफलच्या मॅगझीन मध्ये अजून गोळ्या भरण्याची माझी ईच्छा होती, पण ढोलीतल्या अडचणीच्या जागेत ते शक्यंच नव्हतं. माझ्या विंचेस्टर रायफलच्या मॅगझीन मधे पाच काडतूसं मावत असली तरीही मी नेहमी चारच काडतुसं भरतो. एकापाठोपाठ एक गोळ्या झाडाव्या लागल्यास होणारा ' जाम ' टाळण्याचा तो एक सोपा उपाय आहे. माझ्या रायफलमध्ये अजून एक गोळी शिल्लक होती. वाघाला मी नक्कीच थोपवून धरू शकत होतो.

ढोलीत परत येऊन द्डण्यात मी चूक तर केली नाही ना असा विचार माझ्या मनात आला. बाहेर असतो तर वाघाने माझ्यावर हल्ला करण्यापूर्वीच मी त्याला पाहू शकत होतो. इथे मात्र झुडूपातून वाघ बाहेर आल्यावर शेवटच्या क्षणीच तो दिसणार होता. अर्थात माझा आता नाईलाज होता. मी ढोलीत निश्चलपणे उभा राहिलो. माझ्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या.

वाघाच्या वेदनेने भरलेल्या डरकाळ्यांचे आणि विव्हळण्याचे आवाज येतच होते. मात्र हळूहळू ते आवाज दूरवर जात नाहीसे झाले. वाघ मरण पावला नव्हता पण कमीत कमी दूर निघून गेला होता. आता मी सुरक्षीत आहे या कल्पनेने मला हायसं वाटलं.

दुर्दैवाने वाघ निघून गेला ती दिशा त्या सगळ्या गदारोळात माझ्या ध्यानात राहिली नव्हती. अशा परिस्थितीत बालाच्या झोपडीपर्यंत जाणं म्हणजे साक्षात आत्महत्या ठरणार होती. मला टॉर्चचा वापर करावा लागला असता आणि कोणत्याही झुडूपात नरभक्षक दडलेला असता तर त्याने माझ्यावर झडप घातलीच असती. नुकत्याच जखमी झालेल्या वाघाइतका भयंकर प्राणी जगात कोणताही नसेल. त्यातून हा तर नरभक्षक ! त्या ढोलीतच रात्रभर उभं राहून काढण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. मी सुखरूप होतो हेच माझं नशीब !

उजाडताच मी त्या ढोलीतून बाहेर पडलो आणि गवतावर थोडावेळ बसून राहीलो. तुम्ही कधी रात्रभर सलग बारा-तेरा तास एका जागी उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे ? नसेल तर कधीतरी घेऊन बघा म्हणजे पायांची कशी हालत होते याची तुम्हांला कल्पना येईल !

सुमारे पंधरा-वीस मिनीटे गवतावर बसून विश्रांती घेतल्यावर मी त्या तरूणीच्या मृतदेहाची पाहणी करण्यास गेलो. त्या ढोलीतून बाहेर पडण्यास त्या रात्री मला दहा फारतर पंधरा मिनीटंच लागली असावीत, पण तेवढ्या कालावधीत वाघाने तिच्या शरिराच्या अर्ध्या भागाचा फन्ना उडवला होता. तिचं मस्तक आणि हात देहापासून तुटून बाजूला पडलेले होते. एक मांडी आणि पाय तसाच होता. दुस-या पायाचा थोडासा भाग शिल्लक होता. तिच्या आतड्यांचे तुकडे आणि कमरेची थोडी हाडं वगळता उरलेलं सर्व वाघाने फस्तं केलं होतं. रक्त-मांसाचा नुसता चिखल झाला होता.

माझी पहिली गोळी ज्या जागी वाघाला लागली होती, तिथल्या जमिनीची वादळात सापडल्यासारखी अवस्था झाली होती. वेदनेने डरकाळ्या फोडताना त्याने झुडूपांच्या खोडांना चावे घेतलेले दिसत होते. त्याचं रक्तं आजूबाजूच्या पानांवर लागलं होतं. तीन गोळ्या झाडल्यानंतर ढोलीत लपून मी त्याचा अदमास घेत असताना या झुडूपांत त्याने संतापाने आणि दु:खाने धुमाकूळ घातला होता. वाघाच्या रक्ताचा मी काही अंतरापर्यंत माग काढला. वाघ पूर्वेच्या दिशेला गेल्याचं दिसत होतं.

मी झोपडीत परतलो. बाला आणि दोन्ही वनरक्षकांनी माझ्या गोळ्यांचे आवाज ऐकले होते. रात्रभर ते तिघंही जागेच होते. पहाट होताच ते झोपडीतून झाडाच्या दिशेने येण्यास निघाले होते. अली बेगने वाघ फक्तं जखमी झाला असल्याची शक्यता बोलून दाखवली नसती तर ते थेट त्या झाडापर्यंतही पोहोचले असते.

रात्रीच्या सर्व घटना मी त्यांना सांगीतल्या. मी वाघावर रात्री साडेआठच्या सुमाराला गोळ्या झाडल्या होत्या. आता सकाळचे साडे सहा वाजत आले होते. दहा तास उलटून गेले होते. वाघ मेला असावा किंवा जबर जखमी तरी निश्चीतच झाला असावा याची मला खात्री वाटत होती. वाघाच्या रक्तावरून त्याचा माग काढण्याचं आम्ही सर्वानुमते ठरवलं. अली बेग नि:शस्त्र होता, त्यामुळे त्याने बालाच्या झोपडीत आमची वाट पाहवी असा मी प्रस्ताव मांडला, पण त्याची तिथे एकट्याने थांबायची हिम्म्त होत नव्हती. आम्ही सर्वजण झाडापाशी आलो.

वाघाला त्याच्या पत्नीच्या देहाचे लचके तोडू देण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता आणि वाघ खाण्यात मग्नं झाल्याशिवाय मला ढोलीतून बाहेर येणं शक्यं नव्हतं हे मी हे मी बालाला परोपरीने पटवून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्याला ते पटलं होतं. पण तिच्या देहाची छिन्न-विच्छीन्न अवस्था पाहून मात्रं त्याला अश्रू आवरणं अशक्यं झालं. मोठमोठ्याने रडत तो विलाप करू लागला. रडू आवरल्यावर आपल्या पत्नीचं दहन केल्याशिवाय तिथून हलण्यास त्याने साफ नकार दिला. मोठ्या मुष्कीलीनेच त्याला त्या विचारापासून परावृत्त करण्यात दोघा वनरक्षकांच्या मदतीने मी यशस्वी झालो. अली बेगने कडक शब्दांत त्याला वस्तुस्थीतीची जाणीव करून दिली. या घटनेची पोलीसांत तक्रार करणं आवश्यक होतं. पोलीस तपास आणि पंचनामा होण्यापूर्वी तिचे अंत्यसंस्कार केल्यास आम्ही सर्वजण विशेषतः स्वतः बाला मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता होती. अली बेगने स्पष्टपणे ठणकवल्यावर बालाने अखेर आपला बेत रहित केला. गिधाडांपासून तिचा देह वाचवण्यासाठी झुडूपांच्या डहाळ्यांनी आम्ही तो झा़कून ठेवला आणि वाघाच्या मागावर निघालो.

वाघ जवळच मरून पडलेला किंवा मरणपंथाला लागलेला आढळेल अशी आमची अटकळ होती. रक्ताचा माग झाडाझुडूपांतून जात होता, रक्ताच्या मागावरून वाघाला दोन जखमा झाल्याचं स्पष्टं दिसत होतं. पहिली जखम शरिराच्या वरच्या भागात झाली होती. वाघाच्या मानेत माझी गोळी शिरल्याचं मी पाहीलं होतं. काही अंतरावर एका झुडूपात आम्हाला रक्ताची मोठी गुठळी आणि वाघाच्या आतड्याचा छोटासा तुकडा सापडला. वाघाला पोटावर निश्चीतच मोठी जखम झाली असावी. या जखमेतून रक्ताची धार लागलेली दिसत होती.

सुमारे दोन फर्लांगावर एका झाडाखाली वाघाने प्रथमच बसल्याच्या खुणा दिसत होत्या. इथे वाघाला जोरदार उलटी झालेली दिसत होती. त्या दुर्दैवी तरूणीचं मांस उलटून पडलेलं होतं. आणखीन अर्ध्या मैलावर तो गवतात लोळला होता. रक्ताची दोन मोठी थारोळी तिथे दिसत होती. वाघाच्या पोटाला झालेल्या जखमेतून ब-याच प्रमाणात रक्तस्त्राव झालेला दिसत होता.

वाघ अद्यापही पुढे पुढे जातच होता. रक्ताचे माग आता हळूहळू विरळ होत चालले होते. चरबीमुळे वाघाच्या पोटाला झालेली जखम बंद झाली असावी असा मी कयास केला. मानेच्या जखमेतून वाहणा-या रक्ताचा माग मात्र पुढेही दिसून येत होता. काही वेळाने आम्ही एका झ-यापाशी पोहोचलो. झ-याच्या पाण्यावर अद्यापही लालसर झाक दिसत होती. पलीकडच्या तीरावर चिखलात अद्यापही रक्तं आढळून येत होतं. झ-याकाठी वाघाच्या पंजांचे ठसे उमटलेल दिसत होते. ठशांवरून तो एक मोठा नर वाघ होता हे माझ्या ध्यानात आलं.

वाघाची आगेकूच सुरुच होती. रक्ताचा एखादा थेंबच आता तो गेल्याची दिशा दर्शवत होता.

माझी पहिली गोळी वाघाच्या मानेत घुसल्याचं मी रात्रीच पाहिलं होतं. गोळी लागल्याबरोबर तो उंच उसळून खाली आपटला होता. दुस-या गोळीने त्याच्या पोटाला बरीच मोठी जखम झालेली होती. त्याच्या आतड्याचा सापडलेला तुकडा आणि त्या तरूणीचं त्याने ओकलेलं मांस यावरुन हे सिध्द होत होतं. वेदनेने ज्या जागी त्याने धुमाकूळ घातला होता तिथून रक्ताचा माग इथपर्यंत आला होता. वाघ वाटेत दोन वेळा बसला होता. त्याच्या जखमांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. या सर्व गोष्टींचा विचार करता आणि आतापर्यंतचा माझा अनुभव पाहता वाघ कुठेतरी मरून पडलेला एव्हाना आढळायला हवा होता.

उलटपक्षी वाघ अद्यापही उत्तर दिशेला पुढे जात होता ! रक्ताचा एखादा थेंबच आता पानांवर उडालेला दिसत होता. आतापर्यंत आम्ही कित्येक मैल जंगलाच्या अंतर्भागात आलो होतो. इथे खडकाळ प्रदेश पसरलेला होता. अनेक ठिकाणी पाण्याचे छोटे छोटे ओहोळ दिसत होते. त्यातल्या कित्येक ओहोळांत वाघाने आपली तहान भागवलेली दिसत होती. मोठ्या झाडांची जागा इथे लहान सहान झुडूपांनी आणि लँटनाच्या जंगलाने घेतलेली होती.

एक वाजण्यास दहा मिनीटे बाकी असताना आम्ही अशा जागी आलो जिथून पुढे रक्ताचा माग अदृष्य झाला होता. आम्ही चारही दिशांना कसून शोध घेतला पण वाघाची एकही खूण आम्हाला आढळली नाही. निरुपायाने आम्ही परत फिरलो. गाझुलापल्लीला पोहोचेपर्यंत मी इतका दमलो होतो की वेटींग रुम मधल्या आरामखुर्चीत पडताक्षणी मी झोपेच्या अधीन झालो.

बालसुब्रमण्यमने नंदयालच्या पोलीस ठाण्यात तार केली होती. दुस-या दिवशी पोलीसांचं एक पथक घटनेच्या तपासासाठी त्या जागी आलं. त्या तरूणीच्या प्रेताला आता दुर्गंधी येऊ लागली होती. मी सब-इन्स्पे़क्टरला मी रात्री लपून बसलेली ढोली दाखवली. रात्रीची सगळी हकीकत मी त्याला तपशीलवार सांगीतली. जाब-जवाब झाल्यावर बालाने आपल्या पत्नीचा अंत्यसंस्कार करण्याची त्याच्याकडे परवानगी मागीतली. तो मॄतदेह पोस्टमॉर्टेम ला नेण्याचा सब-इन्स्पेक्टरचा विचार होता, पण अली बेग आणि कृष्णप्पाने रदबदली केल्यावर त्याने होकार दिला. मृतदेहाचा मी वाघासाठी आमिष म्हणून वापर केल्याचं सब-इन्स्पेक्टरला फारसं रूचलं नव्हतं त्यामुळे मी त्याला समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. बाला आणि दोघा वनरक्षकांनी थोड्या वेळातच लाकडं तोडून चिता रचली आणि त्या अवशेषांना अग्नी दिला. केवळ बालाच्या भावना लक्षात घेऊन मी त्या जागी थांबलो होतो. पोलीस पार्टी सगळं आटपेपर्यंत दूरवर उभी होती.

बालाच्या नजरेला नजर मिळवणं मला अवघड झालं. त्याला दिलेलं वचन पूर्ण न करू शकल्याची खंत माझ्या मनात होती. बालाला त्याची कल्पना आली असावी. बालसुब्रमण्यमसह तो मला वेटींग रुम मध्ये भेटायला आला.

" तुम्ही वाईट वाटून घेऊ नका दोराई ! तुम्हाला शक्यं होतं ते सगळं तुम्ही केलंत ! " बालसुब्रमण्यम मार्फत त्याने मला सांगीतलं. " तुमच्या जागी मी जरी असतो तरी मी यापेक्षा जास्तं काही करू शकलो नसतो ! "

त्याच्या शब्दांनी माझ्या मनावरचं ओझं उतरलं. त्याने मला दिलेल्या सहकार्याबद्द्ल मी त्याचे मनापासून आभार मानले.

अजून एक आठवडा मी गाझुलापल्लीला काढला. नरभक्षकाची कोणतीही बातमी आली नाही. दिगुवामेट्टा इथे मी बांधलेल्या दोनपैकी एक जनावर चित्त्याने उचलल्याची बातमी आली. मी तिथे जाऊन खात्री करून घेतली. चित्त्याची शिकार न करता मी परतल्यामुळे जोसेफ माझ्यावर नाराज झाला.

आठवडाभराने मला बहुमोल मदत करणा-या सर्व सहका-यांचा मी निरोप घेतला. आमिष म्हणून घेतलेली जनावरं वेगवेगळ्या वनरक्षकांना भेट म्हणून दिली. बालाला खास वेगळी भेट देण्यास मी विसरलो नाही.

मी बंगलोरला परतल्याला तीन महीने उलटले. वाघाने हैद्राबाद विभागात कृष्णा नदीजवळ एक माणूस उचलला. आणखी तीन महिन्यांनी बोगोटा स्टेशनच्या उत्तरेला एक चेंचू चिरडला. मानवी बळींच्या बातम्या आता कमी झाल्या असल्या तरी अधून मधून येतच असतात.

मी जखमी केलेला वाघ बरा झाला होता का ? माणसं मारुन खाण्याचे आपले उद्योग त्याने पुन्हा सुरू केले होते का ? की तिथे दोन नरभक्षक होते ? दिगुवामेट्टा इथे मोहाची फुलं गोळा करणा-या बाईला उचलणारा नरभक्षक आणि बालाच्या पत्नीला खाणारा नरभक्षक एकच होता की दोन वेगवेगळे ? यापैकी कोणी ताज्या बळींना जबाबदार होता का ? का एखादा तिसराच नरभक्षक या भागात अवतरला होता ?

या पैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळवण्यास लागेल ती किंमत देण्याची माझी तयारी आहे !

( मूळ कथा : केनेथ अँडरसन )

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त.....

"बाला"च्या असीम धैर्यापुढे नतमस्तकच......

लेखनशैली केवळ अप्रतिम.....

मनापासून धन्यवाद ......

स्पार्टाकस
लेखकाला आलेल्या अनुभूतीचा अनुभव तुम्ही वाचकांना पुन्हा एकदा दिलात. कथेतील गावांची नावं अत्यंत अपरिचित असली तरी ओघवत्या वाचनात खंड पडत नाही. वाचताना मला एकदम जिम कार्बेट यांच्या पुस्तकाची आठवण झाली.
तुमची कथाशैली सुंदर आहे. दोन किंवा तीन भागात कथा संपवता हे ही छानच. मुळ कथा इंग्रजीत असतील. त्यामुळे तुमची इंग्रजी भाषा म्हणून किती उत्तम असेल याची कल्पना भाषांतरावरून नक्की येते.
अशाच अनेक कथांच्या प्रतिक्षेत...

पुढे वाघाचे काय झाले याची चुटपुट राहिली., "बाला"च्या असीम धैर्यापुढे नतमस्तकच......>> अनुमोदन

परत एकदा मस्त वाचनानुभव दिल्याबद्दल धन्यवाद.

कथेचं संपूर्ण श्रेय अर्थात अँडरसन साहेबाला >> हे मान्य केले तरी अप्रतीम ओघवत्या अनुवादाचे तरी श्रेय घ्याल की नाही.

इतका सुंदर अनुवाद झालाय चर्चा तर होणारच... होउ दे अजून (वेळ) खर्च, येऊदे अजून अनुवाद Wink

स्पार्टकस,
अति उत्तम लेखन आहे!!!, ह्या कथेमुळे मला जिम कॉर्बेट आठवले, ब्रिटीश अन त्यातही स्कॉच अन आयरीश लोकांचे रांगडेपण अन चिकित्सक वृत्ती ह्याच्या सोबतच ह्या आंग्ल मंडळींचे भुगोलाचे ज्ञान किती सखोल असते ह्याने स्तिमित व्हायला होते, तुमचा अनुवाद तर इतका जब-या आहे की खोलीत बसुन वाचताना बाहेर खिडकीला केळीचे पान घसपटले तरी झटक्यात नजर तिकडे फिरते

बापू

खुप सुंदर अनुवाद. वाचताना संपुच नये असे वाटते.
इतका सुंदर अनुवाद झालाय चर्चा तर होणारच... होउ दे अजून (वेळ) खर्च, येऊदे अजून अनुवाद +१

जबरदस्त !!! भिती वाटली वाचताना..

पुढे वाघाचे काय झाले याची चुटपुट राहिली., "बाला"च्या असीम धैर्यापुढे नतमस्तकच...... >>> अनुमोदन

अनुवाद उत्तम जमलाय !

फारच मस्त लिहिले आहे. कमाल !
गावांची नावं अत्यंत अपरिचित असली तरी ओघवत्या शैलीमुळे वाचनात खंड पडत नाही. +१११
बालाची मानसिक स्थिती काय झाली असेल विचारही करवत नाही Sad
बाला, केनेथ अँडरसन आणि स्पार्टाकस तिघानाही सलाम Happy जबरदस्त !