किलर फ्रॉम हैद्राबाद - १

Submitted by स्पार्टाकस on 5 December, 2013 - 00:28

आताचं आंध्र प्रदेश राज्यं जिथे आहे, त्याचा बराचसा भाग ब्रिटीश आमदानीच्या काळात ब्रिटीशांचा साथीदार असलेल्या निजामाच्या हैद्राबाद संस्थानाचा भाग होता. तत्कालीन म्हैसूर राज्याच्या उत्तरेला असलेले आणि हैद्राबाद च्या दक्षिणेचे अनंतपूर, कुर्नूल, नंदयाल हे तेलुगू भाषिक जिल्हे मात्र मद्रास प्रांतात मोडत होते. त्याकाळात हा सर्व भाग विकासापासून संपूर्णपणे वंचित होता. वर्षाचे दहा महिने उन्हाळा (आणि उरलेले दोन महिने असह्य भाजून काढणारा उन्हाळा!) आणि जेमतेम पडणारा पाऊस यामुळे इथलं आयुष्यं फारच खडतर होतं. अनंतपूर, कुर्नूल, नंदयाल ही जिल्ह्याची मुख्य ठिकाणं असलेली शहरं सोडली तर बाकी सर्वत्र लहान-सहान खेडी विखुरलेली होती.

मुंबई - मद्रास हा ब्रॉड्गेज रेल्वेमार्ग या जिल्ह्यांतून जातो. गुंटकल हे या मार्गावरचं महत्वाचं जंक्शन. गुंटकलहून तीन मीटरगेजचे फाटे तीन वेगळ्या दिशांना जातात. एक पश्चिमेला बेल्लारी आणि हुबळीच्या दिशेने, एक दक्षिणेला बंगलोरच्या दिशेने आणि एक पूर्वेला द्रोणाचलम, नंदयाल मार्गे बेझवाड्याच्या दिशेने. बेझवाडा इथे हा मार्ग मद्रास - कलकत्ता या दुस-या ब्रॉडगेज मार्गाला मिळतो. द्रोणाचलम येथे उत्तरेला सिकंदराबाद - हैद्राबाद हून येणारा आणखीन एक फाटा येऊन मिळतो. ब्रॉडगेजच्या तुलनेत मीटरगेजची इंजिनं कमी ताकदीची आणि तुलनेने कमी वेगाने धावणारी असतात.

नंदयाल नंतर पूर्वेला बेझवाड्याच्या दिशेने जाणा-या मार्गावर गाझुलापल्ली, बसवपुरम, चेलमा, बोगोटा आणि दिगुवामेट्टा ही स्टेशने आहेत. ही सर्व स्टेशने घनदाट अरण्यात आहेत. उत्तरेला कृष्णा नदीपर्यंत आणि पलिकडे हैद्राबाद संस्थानात आणि दक्षिणेला कडप्पा शहरापर्यंत हे जंगल पसरलेलं आहे. या मार्गावरुन जाणा-या गाड्यांच्या इंजिन ड्रायव्हरना रात्रीच्या अंधारात कित्येकदा रेल्वे रुळ ओलांडून जाणारे जंगली प्राणी दृष्टीस पडत. क्वचितप्रसंगी शेवटच्या क्षणी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारं हरिण किंवा रानडुक्कर गाडीखालीही येत असे. या पाचही स्टेशनांपासून अरूंद आणि खडबडीत बैलगाडीच्या चाको-या आणि मुख्यतः पायवाटा जंगलात विखुरलेल्या खेडेगावांत जात होत्या.

गेल्या काही वर्षांत जंगलात भटकणा-या शिका-यांची एक नवीनच पिढी उदयास आलेली आहे. अतिउत्साही आणि खिलाडूवृत्तीचा पूर्ण पणे अभाव असलेले हे तरुण रात्रीच्या वेळी मोटारीतून जंगलात हिंडत असतात आणि हातातल्या स्पॉटलाईटच्या प्रकाशात डोळे चमकणा-या कोणत्याही प्राण्याच्या दिशेने गोळी झाडतात. आपण कोणत्या जनावरावर गोळी झाडतो आहोत हे देखील त्यांना माहीत नसतं. जखमी जनावराचा माग काढून त्याला वेदनामुक्त करण्याइतकी हिम्मत त्यांच्यात नसतेच. कित्येकदा जनावर खुरडत-सरपटंत जंगलात दूरवर जातं आणि अत्यंत वेदनामय मृत्यू त्यच्या वाट्याला येतो. वाघ किंवा चित्ता असेल आणि गोळीच्या जखमेमुळे आपलं नैसर्गीक भक्ष्य पकडण्यास तो असमर्थ झाला तर नरभक्षक होण्याचीही शक्यता असते. जंगलातील साधनसंपत्ती आणि प्राणीजीवनाची अपरिमीत हानी होण्यास कारणीभूत असलेल्या या शिका-यांना रोखण्याचे प्रयत्न तत्कालीन ब्रिटीश सरकार आणि स्वातंत्र्यानंतर आताच्या भारत सरकारकडून सतत सुरू असतात, पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप म्हणावं तसं यश आलेलं नाही.

मी वर उल्लेख केल्याप्रमाणे या पाचही स्टेशनांच्या परिसरात मोटार जाऊ शकेल असे रस्ते नसल्याने इथला निसर्ग मात्र अद्याप कारमधून फिरणा-या शिकारी कम् खाटकांच्या तावडीत सापडलेला नव्हता. ब्रेकचा कर्णकर्कश SS आवाज, पाठोपाठ गोळीचा बार आणि जनावराचं विव्हळणं हे दृष्य सुदैवाने इथे नजरेस पडत नव्हतं!

या जंगलात राहणारे आदिवासी चेंचू जमातीचे होते. चेंचू पुरुष आणि स्त्रिया मुख्यतः धोतरासारखे कापड अंगाभोवती गुंडाळतात. पुरुष जवळ धनुष्य-बाण बाळगतात आणि गळ्यात वेगवेगळ्या पिसांच्या माळा घालतात. मोरपिसांचं त्यांना खास आकर्षण असतं आणि विशेष प्रसंगी ते मोराची पिसं आपल्या केसात माळतात. मोहाच्या फुलांपासून आणि बाभळीच्या चिकापासून बनवलेली दारु त्यांना अतीप्रिय ! मोहाची झाडं विपुल प्रमाणात असल्याने तत्कालीन ब्रिटीश सरकार आणि आता दारुबंदी असलेल्या आंध्र प्रदेश सरकारच्या दृष्टीने हे आदिवासी म्हणजे मोठी डोकेदुखी होते.

असो. ही कथा कारमधून फिरणा-या शिका-यांमुळे होणा-या नुकसानीची नाही, दारुबंदीवरचं प्रवचन नाही आणि चेंचूंचा जीवनक्रम वर्णन करणारीही नाही. तब्बल चार वर्षे या परिसरात धुमाकूळ घालणा-या एका मोठ्या नरभक्षक वाघोबाची ही कथा आहे ! या वाघोबाने हैद्राबाद संस्थानातल्या जंगलात आपले हे उपद्व्याप सुरू केले. त्या भागात चेंचू आदिवासी आणि एकटे-दुकटे प्रवासी यांच्यावर तो गुजराण करत राहीला. सुमारे सहा महिन्यांनी भटकत तो दक्षिणेकडे आला. चेलमा स्टेशनहून भल्या सकाळी बसवपुरमच्या दिशेने रेल्वे रुळांची पाहणी करण्यासाठी निघालेल्या एका रेल्वे गँगमनला उचलून त्याने आपलं या परिसरातलं आगमन जाहीर केलं !

त्याकाळी या जंगलात अनेक वाघ होते. पण त्यांचं नैसर्गीक भक्ष्यं विपुल प्रमाणात असल्याने क्वचित एखादी गाय किंवा बैल उचलण्यापलीकडे आदिवासींना त्यांचा तसा उपद्रव नव्हता. त्या गँगमनच्या अदृष्य होण्यामागे एखाद्या नरभक्षकाचा हात असेल अशी शंकादेखील कोणाला आली नाही. त्याचे अवशेषही कोणाच्या नजरेस पडले नव्हते त्यामुळे काहीतरी कारणामुळे त्याने आपणहूनच तो परिसर सोडून दुसरीकडे आश्रय घेतला असावा अशीच सर्वांची समजूत झाली. नंतरच्या काही महिन्यात अधूनमधून चेंचू गायब होऊ लागले आणि काहीतरी वेगळा प्रकार असावा आणि एखादा वाघ अथवा चित्ता यामागे असावा अशी शंका लोकांना येऊ लागली. अर्थात वाघांच्या विपुल संख्येमुळे आणि एकाही चेंचूचे किंवा त्या गँगमनचे कोणतेही अवशेष न सापडल्यामुळे कोणालाही कसलीच खात्री देता येत नव्हती. काही महिन्यांपूर्वी उत्तरेला हैद्राबादच्या जंगलात बळी घेणारा वाघ या भागात आला असेल हे तर कोणाच्या स्वप्नातही आलं नसावं.

तो गँगमन नाहीसा झाल्यानंतर तीन-चार महिन्यांनी एका संध्याकाळी दोन आदिवासी जंगलाला लागूनच असलेल्या वडापल्ली नावाच्या लहानशा खेड्यात परतत होते. गावापासून अर्ध्या मैलावर पुढे चालणा-या माणसाला एका झाडावरच्या घरट्यातून उडालेली कोकीळा नजरेस पडली. कोकीळा आपली अंडी नेहमी दुस-या पक्ष्यांच्या घरट्यात घालते आणि ते पक्षी आपल्या अंड्यांबरोबर नकळत कोकीळेचीही अंडी उबवतात ! कोकीळेची अंडी रुचकर असल्याने ती सर्व आदिवासींना आवडतात. कोकीळेची अंडी कोणत्याही पक्ष्याच्या घरट्यात असल्याने आदिवासींच्या दृष्टीने दुर्मिळच असतात. अशी एक दुर्मिळ संधी आता चालून आली होती. पुढच्या माणसाने मागच्या तरूणाचं लक्षं तिथे वेधताच मागच्या तरूणाने झाडावर चढायला सुरवात केली.

झाडावर चढलेला तरूण घरट्यापर्यंत जवळपास पोहोचला असतानाच त्याला खालून जोरदार किंकाळी ऐकू आली. डोळे विस्फारून तो खालचं दृष्यं पाहतच राहीला. एक मोठा थोराड वाघ त्याच्या जोडीदाराला तोंडात धरून शांतपणे जंगलात जात होता ! वाघाच्या तोंडातून लोंबकळणारा तो माणूस मोठमोठ्याने मदतीसाठी धावा करत होता. त्या तरूणाने त्या झाडाची सर्वात वरची फांदी गाठली आणि जीव मुठीत धरून रात्रभर कुडकुडत तो त्या झाडावर बसून राहीला. त्याच्या जोडीदाराला उचलून नेणारा वाघ रात्रीतून कधीही परतून येईल या भीतीने तो त्या झाडावरून हलला नाही. सकाळ होताच त्याने मोठमोठ्याने गावक-यांच्या नावाने हाका मारण्यास सुरवात केली. त्याच्या सुदैवाने गावक-यांच्या कानावर त्याचा आवाज गेला आणि त्यांच्या आगमनानंतरच तो तरूण झाडावरून खाली उतरला !
चेलमा परिसरात नरभक्षकाचं आगमन अशा रितीने जाहीर झालं !

वडापल्लीच्या चेंचूंनी या घटनेची खबर चेलमाच्या स्टेशनमास्तरला दिली. स्टेशनमास्तरने नंदयाल इथल्या आपल्या मुख्य अधिका-याला तारेने ही बातमी कळवली. तिथून ही बातमी पोलीस, वनविभागाचे अधिकारी आणि जिल्ह्याच्या कलेक्टरपर्यंत सर्वांना मिळाली. गेल्या काही महिन्यांत नाहीसे झालेले चेंचू आणि तो गँगमन यांच्या गायब होण्यामागे नरभक्षक वाघ होता याची आता कुठे सर्वांना कल्पना आली !

सामन्यतः एखाद्या विभागात नरभक्षकाचं अस्तित्व समोर येतं तेव्हा वनविभागाकडून तो विभाग ' फ्री शूटींग झोन ' ( परवान्याशिवाय शिकारीसाठी ) म्हणून जाहीर केला जातो. नरभक्षकाचा लवकरात लवकर अंत व्हावा हा त्यामागे हेतू असतो. वनविभागाने तातडीने हे पाऊल उचललं, पण त्याला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. नरभक्षकाचा संचार असलेल्या प्रदेशात रस्ते नव्हते. इथला इंच न् इंच भूभाग पायी तुडवण्याला पर्याय नव्हता. बहुधा याच कारणामुळे शिका-यांनी या वाघाच्या बातम्यांकडे दुर्लक्षं केलं असावं.

एक-दोन रेल्वे अधिका-यांनी गाझुलापल्ली आणि चेलमा स्टेशनांच्या दरम्यान रेल्वेच्या ट्रॉलीमधून भरलेली रायफल घेऊन फे-या मारल्या होत्या. वाघोबा आपल्याकडून गोळी घालून घेण्यासाठी रूळांच्या शेजारी वाटच बघत बसलेले असतील अशी बहुधा त्यांची कल्पना असावी. अर्थातच वाघाने त्यांना ठेंगा दाखवला आणि आणखीन चेंचू उचलण्यास सुरवात केली. त्याच्या बळींची संख्या गँगमन धरून आता ११ पर्यंत पोहोचली होती. यापैकी केवळ दोनच बळींचे अवशेष लाठ्या-काठ्या आणि धनुष्य-बाणांसह शोधाशोध करून आदिवासींनी ताब्यात घेतले होते. बाकीच्या बळींचं नखही कोणाला दिसलं नव्हतं. अर्थात त्यात आदिवासींचा दोष नव्हता. चोहीकडे अफाट जंगल पसरलेलं होतं. मधून-मधून फक्त पायवाटा होत्या. बळी पडलेल्या माणसाचे अवशेष शोधणा-यांवर नरभक्षकाने बेधडक हल्ला केला तर अजून किमान एकाच्या तरी प्राणांवर बेतणार होतं आणि आपण होऊन मरण पत्करण्याची कोणाचीही तयारी नव्हती. मृत व्यक्तीचे अर्धवट खाल्लेले अवशेष मिळवण्यासाठी आणखी कोणी कशासाठी मृत्यूमुखी पडावं हा त्यांचा सरळ-साधा युक्तीवाद होता.

अकरा बळी घेतल्यावर नरभक्षक त्या प्रदेशातून अदृष्य झाला. तीन-चार महिने त्याची कोणतीही बातमी आली नाही, पण आता जंगलाच्या उत्तरेकडच्या भागात कृष्णा नदीच्या काठावर माणसं बळी पडू लागली आणि आता कुठे हैद्राबादचा आणि चेलमा विभागात आलेला नरभक्षक एकच असल्याची सर्वांना कल्पना आली.

हैद्राबाद परिसरात वाघाच्या शिकारीच्या आव्हानाला ब-याच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्या विभागात असलेल्या एक-दोन नवाबांनी या वाघाच्या शिकारीची मोहीम हाती घेतली. काही दिवसांतच वाघाने मदिकोंडा गावाजवळ एका वाटसरूचा बळी घेतला. या वेळी गावक-यांनी आरडा-ओरडा करून शिकारीचा लचका तोडण्यापूर्वीच वाघाला पळवून लावलं. सुदैवाने जवळच एका वाघाच्या शिकारीसाठी आलेल्या नवाबाचा तळ होता. त्याला ताबडतोब ही बातमी कळवण्यात आली.

खबर मिळताच नवाब तातडीने तिथे पोहोचला. बळी पडलेला माणूस भटक्या असल्याने त्या परिसरात त्याचे कोणी नातेवाईक नव्हते. त्यामुळे त्याच्या शरिराचा आमिष म्हणून उपयोग करून माचाणावर बसण्याला कोणाची आडकाठी नव्हती. या वाघाने आपल्यावर गोळी झाडण्याची दिलेली ही आतापर्यंतची एकमेव संधी होती. माचाण बांधून नवाब बसला आणि गावकरी परतले.

नवाबाच्या दुर्दैवाने वाघाच्या भक्ष्यावर परतण्याच्या नेमक्या वेळीच अनपेक्षीतपणे मोठं वादळ झालं. नवाबाने तरी तसा दावा केला. अंधारात दिसणा-या जनावराच्या दिशेने त्याने गोळी झाडली. दुस-या दिवशी सकाळी तपास केल्यावर गवतावर रक्ताचे अस्पष्टसे डाग दिसून आले. किमान आपली गोळी वाघाला लागल्याचं तरी नवाबाला समाधान मिळालं. रक्तावरून माग काढून वाघाचा मृतदेह ताब्यात घेण्याच्या भानगडीत मात्र कोणी पडलं नाही. वाघ जंगलाच्या अंतर्भागात जाऊन मेला असावा अशी नवाबासकट सगळ्यांची खात्री पटली होती !

काही आठवडे शांततेत गेले. मग गाझुलापल्ली जवळच्या जंगलात राहणारा एक चेंचू नाहीसा झाला. हा चेंचू फासेपारधी होता आणि जंगलातून विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी पकडून तो आपली गुजराण करीत असे, आदल्या दिवशी लावून ठेवलेल्या सापळ्यांमध्ये कोणी जनावर किंवा प्राणी सापडला असावा याचा तपास करायला तो सकाळी लवकरच जंगलात गेला होता. दुपारच्या जेवणापूर्वी परत येतो असं सांगून गेलेला तो चेंचू संध्याकाळ झाली तरी परत आला नाही म्हटल्यावर त्याची बायको आणि मुलगा काळजीत पडले. त्यांनी चेलमा परिसरातल्या नरभक्षकाच्या कथा ऐकल्या होत्या, पण त्याला काही महीने होऊन गेले होते आणि या वाघाचा सर्वांनाच विसर पडला होता. मात्र दुस-याही दिवशी तो चेंचू न परतल्याने वेगवेगळ्या शंका-कुशंकानी त्याच्या बायको-मुलाचं मन भरून गेलं होतं. दुस-या दिवशी जंगलात त्या तरूण मुलाला आपल्या बापाचे अवशेष मिळाले होते.

एखादा वाघ नरभक्षक होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. काही कारणाने आपलं नैसर्गीक भक्ष्यं पकडण्यास असमर्थ झालेला, शिका-याने झाडलेल्या गोळीने जखमी झालेला, क्वचित प्रसंगी लहानपणी आईने मारलेलं मानवी भक्ष्यं खाल्ल्याने आणि त्याची चटक लागल्याने वाघ नरभक्षक होतो. सुरवातीला अधेमधे माणसावर हल्ला करणा-या वाघाला जसजशी स्वतःच्या शक्तीची आणि माणसाच्या दुबळेपणाची आणि असहायतेची कल्पना येते तशी त्याच्या बळींची संख्या वाढत जाते. बहुतेक सर्व नरभक्षक वाघ-चित्त्यांना एक प्रकारचा ' सिक्स्थ सेन्स ' किंवा सहावं इंद्रीयं असतं जे त्यांना मनुष्यप्राण्यापासून सतत सावध राहण्याची सूचना देत असतं. अनेक शिकारी त्याची संभावना भित्रेपणा म्हणून करतात. नरभक्षक शक्यतो एकट्या-दुकट्या माणसावर नकळतपणे हल्ला करतो किंवा माणसांच्या रांगेतल्या शेवटच्या माणसाला उचलतो. एकत्र घोळक्याने जाणा-या माणसांवर नरभकाने हल्ला केल्याचं उदाहरण दुर्मीळच. उलट कित्येकदा हल्ला झालेल्या माणसाने प्रतिकार केल्यावर नरभक्षकाने हल्ल्याचा बेत रद्द करून पलायन केल्याची कित्येक उदाहरणं आहेत. वाघापेक्षा चित्त्यांच्या बाबतीत अशी उदाहरणं जास्तं आढळतात कारण वाघाच्या तावडीत सापडलेले फारच थोडे जण आपले अनुभव सांगायला बचावून जीवंत राहतात ! सिक्स्थ सेन्स किंवा सहावं इंद्रीयं म्हणा किंवा भित्रेपणा म्हणा पण नरभक्षकाचा लवकरात लवकर निकाल लावणं हे फार महत्वाचं असतं. जसजसे त्याच्या शिकारीचे प्रयत्न होत जातात तसा तो अधिकाधीक सावध आणि धूर्त होत जातो आणि मग त्याची शिकार करणं अतिशय जिकीरीचं आणि वेळखाऊ काम होऊन बसतं.

नरभक्षक वाघ हा सामान्यतः एका विशिष्ट मार्गावरून फिरत राहतो. हा मार्ग वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार आणि शेकडो मैलांचा असू शकतो. एखाद्या भागात बळी घ्यावेत एक-दोन आठवडे मुक्काम करावा आणि पुढे कूच करावं असा त्याचा शिरस्ता असतो. त्यामुळे एखाद्या भागात शिका-यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात करेपर्यंत अनेकदा तो दुस-या नवीन विभागात निघून गेलेला असतो. त्याच्या आगमनाची आगाऊ कल्पना न आल्याने त्याला आयतीच शिकार गवसते. तसेच एखाद्या विभागातून तो निघून गेल्यावर नेहमीची सावधगीरी माणसं सैलावतात आणि पुढच्या फेरीत सहजपणे वाघाच्या तावडीत सापडतात. एखाद्या विभागातून तो निघून गेल्यावर साधारण किती दिवसांनी पुन्हा परतेल हे वाघाचा मार्ग किती मोठा आहे यावर अवलंबून असतं. वाघाचा वावर ज्या परिसरात आहे त्याचा नकाशा आणि वाघाने बळी घेतलेल्या बळींची तारीखवार यादी मिळाल्यास चाणाक्ष शिका-याला त्याच्या हालचालींचा आठ-दहा दिवसांच्या फरकाने अंदाज करता येऊ शकतो.

चित्त्याच्या बाबतीत असा अंदाज बांधणं मात्र अशक्यं असतं. तो इथे-तिथे कोणत्याही क्षणी कुठेही असू शकतो. चित्ता नेहमी रात्रीच्या अंधारातच शिकार करतो. भरदिवसा माणसावर हल्ला करणार चित्ता हा तसा अपवादच. आकाराने लहान असल्याने चित्ता कुठेही लपून बसू शकतो. त्याचा धाडसीपणा आणि आक्रमकता वाढली की तो बेधडकपणे झोपडीत घुसून माणसं उचलून नेतो. वाघाने अशा पध्द्तीने माणसं उचलल्याची फार थोडी उदाहरणं आढळून येतात. वाघ नरभक्षक झाला की त्याच्या मनातली माणसाबद्दलची भीती समूळ नाहीशी होते. त्यामु़ळे दिवसाच्या कोणत्याही वेळी तो माणसावर हल्ला करतो.

नरभक्षकाने घेतलेल्या प्रत्येक बळीची कथा तुम्हांला सांगून तुम्हांला कंटाळा आणायची माझी इच्छा नाही. प्रत्येक कहाणी थोड्याफार फरकाने सारखीच होती. गाझुलापल्ली - चेलमा विभागात आणि उत्तरेला कृष्णा नदीच्या काठी त्याने अनेक माणसं उचलली. त्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने हा सगळा परिसर खूप मोठा होता. मदिकोंडा गावाजवळ नवाबाने झाडलेल्या गोळीनंतर तर तो अधिकच संशयी आणि धूर्त बनला होता. सावधगिरीचा उपाय म्हणून तो एका वेळेस एक माणूस मारुन खाल्ल्यावर पुन्हा परतून त्याच्या अवशेषांवर येईनासा झाला. त्याने घेतलेल्या बळींवर माचाण बांधून बसलेल्या शिका-यांचा त्यामुळे निरुपाय झाला होता.एकावेळी जमेल तितकं मांस खाऊन पुन्हा न परतण्याच्या त्याच्या सवयीमुळे एरवी पडली नसती त्यापेक्षा कित्येक जास्तं माणसं त्याला बळी जाऊ लागली. अवघ्या साडेतीन वर्षांत ८० माणसांचा त्याने फडशा पाडला होता !

नरभक्षकाच्या जोडीला तिथे अनेक वाघ आणि चित्ते होते. या सर्वांनी बळी घेतलेल्या गुराढोरांची संख्या शेकड्यांनी होती. यातली नेमकी किती जनावरं नरभक्षकाने उचलली याचा अंदाज करणं कठीण असलं तरी थोडीफार तरी नक्कीच त्याल बळी पडली होती. नरमांसाच्या जोडीला वाघ इतर जनावरांचीही शिकार करत होता हे उघडच होतं. अन्यथा केवळ ८० माणसांच्या मांसावर तो इतके दिवस राहूच शकला नसता. याचा अर्थ उघड होता. वाघाच्या हालचालींचा योग्य अंदाज बांधता आला तर त्याच्या साठी आमिष बांधून पाळत ठेवता येणार होती.

या वाघाच्या हालचालींच्या वर्तमानपत्रात येणा-या सर्व बातम्या मी वाचल्या होत्या. वनविभागाकडून या वाघाच्या शिकारीसाठी मला अनेकदा विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी मी त्याकडे दुर्लक्षचं केलं होतं. एकतर मला सलग रजा मिळू शकणार नव्हती आणि वाघाचा वावर असलेला परिसर बंगलोर पासून इतका दूर होता की वाघाने घेतलेल्या बळीची बातमी कळल्यावर निघून वेळेवर तिथे पोहोचणं कठीणंच होतं. मी मद्रास आणि हैद्राबाद प्रांतांच्या वनविभागाला आणि पोलीसांना पत्र लिहून नरभक्षकाच्या प्रत्येक बळीची तारीखवार माहीती मागवली होती.या सर्व माहीतीवरून आणि माझ्याजवळच्या नकाशावरून असं दिसत होतं की नरभक्षक दोन-तीन महिने गाझुलापल्ली - चेलमा विभागात संचार केल्यावर उत्तरेला कृष्णेकाठी हैद्राबाद विभागात जात होता आणि चार महिने तिकडे घालवल्यावर परतून येत होता. गाझुलापल्लीहून बसवपुरम ६ मैल आणि बसवपुरमहून चेलमा ५ मैल. साधरणतः या तीनही स्टेशनांच्या परिसरातल्या पंधरा मैलाच्या परिसरात मुख्यतः नरभक्षकाचा वावर होता. हैद्राबाद पेक्षा हा सारा प्रदेश बंगलोरहून तुलनेने जवळ होता आणि मीटरगेज रेल्वेने बंगलोरला जोडलेला होता. तसेच उत्तरेच्या तुलनेत या प्रदेशात जास्त मनुष्यवस्ती होती त्यामुळे स्थानिकांची साथ आणि नरभक्षकाने घेतलेल्या बळींची माहीती चटकन मिळणार होती.

या वाघाच्या मागावर जाण्याबद्द्ल माझं तळयात-मळ्यात सुरू असताना खुद्द वाघोबानेच या द्विधा मनस्थीतीतून माझी सुटका केली !

रेल्वे खात्याचा एक अधिकारी एक दिवस ट्रॉलीवरून रूळ तपासत चेलमाहून बसवपुरमच्या दिशेने निघाला होता. ही ट्रॉली म्हणजे चाकांवर असलेला सुमारे सहा फूट लांबीचा एक प्लॅटफॉर्म आणि त्यावर एक बेंच असा संच असतो. रेल्वे अधिकारी या बेंचवर बसतो. ट्रॉली ढकलणारे मजूर अनवाणी पायांनी रेल्वे रूळांवर धावत ही ट्रॉली ढकलतात ! सपाटीवर ताशी ८ मैलाच्या वेगाने आणि चढावर साध्या चालण्याच्या वेगाने ही ट्रॉली ढकलली जाते. उतारावर वेग नियंत्रणासाठी अधिका-याच्या बेंचवर ब्रेकची सोय असते आणि येणा-या - जाणा-या गाड्यांना मार्ग मोकळा करण्यासाठी ट्रॉली रूळांवरून उचलून बाजूला ठेवण्यात येते.

त्या दिवशी त्या अधिका-याने एका खोलगट जागी ब्रेक दाबून ट्रॉली थांबवली आणि रूळाची तपासणी करण्यासाठी तो खाली उतरला. रूळाच्या दोन्ही बाजूला सुमारे सात फूट उंचीवर जमीनीवर अनेक झुडपं उगवलेली होती, ट्रॉली ढकलणा-या दोन मजुरांपैकी एकजण ट्रॉलीवर आडवा झाला. दुसरा मजूराने तो चढ चढून वरच्या जमिनीवर बैठक मारली आणि खिशातून विडी काढून शिलगावली.

रुळाची तपासणी करत तो रेल्वे अधिकारी सुमारे शंभर यार्ड चालून गेला. मागे वळून त्याने सहजच ट्रॉली आणि त्या दोन मजुरांकडे पाहीलं. ट्रॉलीवर झोपलेला मजूर अद्याप झोपलेलाच होता. उताराच्या काठापासून सुमारे पन्नास यार्डांवर जंगल होतं. काही झुडूपं मात्र काठाच्या बरीच जवळ होती. अधिका-याची नजर वरच्या काठावर बसलेल्या मजूराच्या शेजारीच असलेल्या एका झुडूपाने वेधून घेतली. त्या झुडूपाच्या आड लपलेलं 'काहीतरी' हलल्याचा त्याला भास झाला. त्या झुडूपाची पानं सूर्यप्रकाशात चमकत होती आणि झुडुपाच्या सावलीत हे 'काहीतरी' लपलेलं होतं. ते नक्की काय असावं याचा विचार तो अधिकारी करत असतानाच ते जमिनीवर आडवं झाल्यासारखं अधिका-याच्या दृष्टीआड झालं.

अधिका-याने रूळ ओलांडला आणि दुस-या बाजूच्या रूळाची तपासणी करत तो ट्रॉलीच्या दिशेने चालू लागला. त्या झुडूपाचा विचार त्याने डो़क्यातून काढून टाकला होता.जेमतेम काही पावलं तो चालून गेला असेल तोच त्याने घुसमटत्या आवाजतली एक आरोळी ऐकली. अधिका-याने मान वर करून पाहीलं तो उताराच्या कडेला बसलेला तो मजूर मागच्या मागे ओढला जात असल्याचं त्याच्या नजरेस पडलं ! नक्की काय झालं असावं याचा विचार करतच तो धावत उतारावरून चढून वर पोहोचला आणि समोरचं दृष्यं पाहून जागीच खिळून उभा राहीला. एक मोठा वाघ त्या मजूराला तोंडात शांतपणे धरून जंगलात चालला होता !

काही क्षण तो अधिकारी गोठल्यासारखा उभा राहीला आणि मग उतार उतरून ट्रॉलीच्या दिशेने धावत सुटला. ट्रॉलीवर झोपलेला मजूर एव्हाना जागा झाला होता, पण नक्की काय झालं असावं या विचारने तो गोंधळला होता. आपला साहेब समोरून धावत येताना पाहून तर तो अधीकच चक्रावून गेला.
ट्रॉलीजवळ पोहोचताच तो अधिकारी धपापत्या सुरात म्हणाला,
" वाघ ! रेड्डीला घेऊन गेला ! ट्रॉलीला धक्का मार ! जल्दी !"
दुस-या मजूराच्या ध्यानात सगळा प्रकार आला. दोघांनी मिळून शक्य तितक्या घाईघाईत त्या भयानक जागेपासून ट्रॉली ढकलत उताराच्या टोकापर्यंत नेली आणि उतारावर ती घसरू लागताच त्यावर उड्या मारून तिथून पोबारा केला.

या घटनेला जोरदार प्रसिध्दी मिळाली. त्या रेल्वे अधिका-यावर भरपूर टीका झाली. आपल्या एका साथीदाराला वाघाच्या जबड्यात सोडून आलेला तो एक भित्रा माणूस आहे आणि माणसाच्या जन्माला न येता त्याला एखाद्या किडा-मुंगीचा जन्म मिळायला हवा होता असा एकंदर टीकेचा सूर होता. त्याच्यावर टीका करणा-यांनी त्या परिस्थितीत वेगळं काय केलं असतं त्यांचं त्यांनाच माहीत. नि:श्स्त्र अवस्थेत तो त्या वाघाचा प्रतिकार कसा करणार होता हा विचारही कोणाच्या मनात आला नव्हता.

त्या रात्री मी बंगलोरहून निघणारी गाडी पकडली आणि दुस-या दिवशी दुपारी गाझुलापल्लीला उतरलो. त्या प्रदेशात मधूनच सुरवात करण्यापेक्षा एका टोकाच्या स्टेशनपासून चौकशीला सुरवात करून दुस-या टोकापर्यंत जाणं शहाणपणाचं ठरलं असतं. या प्रदेशात मी पूर्वी कधी न फिरकल्याने मला स्थानिक आदिवासींच्या मदतीची नितांत आवश्यकता होती. माझ्याजवळ वाघाचा वावर असलेल्या प्रदेशाचा नकाशा होता. त्या फासेपारध्याच्या मुलाला मदतीला घ्यावं असा माझा बेत होता.

स्टेशनवर उतरताच मी स्टेशनमास्तर आणि इतर कर्मचा-यांची भेट घेतली आणि माझ्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. माझ्या आगमनानं त्यांना आनंद झाला होता. मागेन ती मदत देण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलं. इथे भाषेची अडचण होती. माझं तेलुगू भाषेचं ज्ञान काही शब्दांपुरतंच मर्यादीत होतं पण इथल्या ब-याच लोकांना मोडकंतोडकं तामिळ आणि हिंदी येत होतं. स्टेशनमास्तरला इंग्रजी येत असल्याने प्रश्न नव्हता. तो माझा दुभाषा झाला आणि मी त्यांना वाघाची माहिती विचारायला सुरवात केली. तो एक खूप मोठा वाघ होता या व्यतिरिक्त काही महत्वाची माहीती त्यांच्यापाशी नव्हती. मग मी त्या फासेपारध्याच्या मुलाची चौकशी केली. ते सर्वजण त्याला चेह-याने ओळखत होते आणि तो जंगलात कुठेतरी राहतो इतकंच त्यांना ठाऊक होतं. त्याच्याविषयी जास्तं माहिती तिथले वनरक्षक देऊ शकतील असंही त्यांनी मला सांगीतलं.

माझ्या विनंतीवरुन एक गँगमन वनरक्षकांना बोलावून आणण्यास गेला होता. वीसेक मिनीटांत दोन्ही वनरक्षकांसह तो परत आला. त्या दोघांपैकी एकजण अली बेग नावाचा मुस्लिम होता. त्याला अर्थातच हिंदी येत असल्याने माझा भाषेचा प्रश्न आपोआपच मिटला होता. दुसरा कृष्णप्पा नावाचा चेंचू होता. त्याला तेलुगूशिवाय कोणतीच भाषा येत नव्हती. त्यांना घेऊन मी स्टेशनबाहेरच्या आंब्याच्या झाडाखाली सावलीत येऊन बसलो आणि त्यांना वाघाची माहिती विचारायला सुरवात केली.

त्या दोघांनीही नरभक्षकाला पाहिलं होतं. त्याने बळी घेण्यास सुरवात केल्यापासून ते दोघंही जोडीनंच आणि तेदेखील कु-हाडी घेऊनच जंगलात जात असत. गावापासून फार दूरवर जाण्याचं त्यांनी कटाक्षाने टाळलं होतं. दहा दिवसांपूर्वीच त्यांना गावापासून मैलभर अंतरावर वाघाचं दर्शन घडलं होतं. त्यांना पाहताच वाघ जंगलात निघून गेला होता. महिन्याभरापूर्वी सकाळी नऊच्या सुमाराला एका पाणवठ्याजवळ दिसलेल्या वाघानेही त्यांना पाहताच जंगलात दडी मारली होती. त्याआधी जवळपास चार महिन्यांपूर्वी गावापासून जेमतेम पाव मैल अंतरावर वाघ त्यांच्या नजरेस पडला होता. त्यांना पाहून या वाघाने पळून न जाता जमिनीवर दबून झेप घेण्याचा पवित्रा घेतला आणि तो गुरगुरू लागला ! त्याबरोबर दोघांची चांगलीच तंतरली पण धीर करून दोघांनी मोठमोठ्याने आरोळ्या ठोकल्या होत्या. उत्तरादाखल वाघाचा गुरगुराट वाढला, पण त्याने त्यांच्यावर हल्ला मात्र केला नाही. त्यांच्याकडे वळून-वळून पाहत, गुरगुरत तो जंगलात निघून गेला. तो दिसेनासा होताच दोघांनी गावात धूम ठोकली होती.

त्यांच्याशी बोलत असताना एका गोष्टीने माझं लक्षं वेधून घेतलं होतं.
चार महिने !
चार महिन्यांचा कालावधी आणि त्या वाघाचा आक्रमक पवित्रा याचा एकच अर्थ निघू शकत होता. गाझुलापल्ली भागात नरभक्षकाच्या गेल्या फेरीच्या वेळी त्या दोघांची त्याच्याशी गाठ पडली होती ! त्या दोघांचही तेच मत होतं.

मी त्यांच्याकडे बघून गुरगुरणा-या वाघाविषयी खोदून-खोदून चौकशी केली. इतर वाघांमधून त्याला ओळखता येईल अशी एखादी गोष्ट त्यांना आठवत होती का? अली बेगच्या मते तो वाघ चांगलाच थोराड होता. कृष्णप्पाला तो नर असल्याची खात्री होती. त्याच्या मते बाकीच्या वाघांपेक्षा त्याचा रंग फिकट होता.

" त्यावेळी आम्ही खूप घाबरलो होतो साहेब !" तो म्हणाला, " तो आमच्यावर हल्ला करेल असं आम्हांला वाटलं होतं ! त्यामुळे आमच्या काही लक्षात आलं नाही! "

मी त्यांच्याकडे त्या चेंचू फासेपारध्याच्या मुलाची चौकशी केली. ते दोघंही त्याला ओळखत होते. तो स्टेशनच्या उत्तरेला दोन मैलांवर जंगलातल्या झोपडीत आई आणि बायको-मुलासह राहत होता. कित्येक वेळा त्यांनी त्याच्या बापाला पकडून त्याला दंड केला होता, पण त्याने कधीही आपला व्यवसाय सोडला नाही. मुलानेही बापाच्या पावलावर पाऊल टाकून बापाचा व्यवसाय पुढे चालू ठेवला होता. कधीकधी त्यांना त्याच्याकडून एखादा प्राणी मेजवानीसाठी मिळत असे त्यामुळे पुष्कळदा ते त्याच्याकडे काणाडोळा करत असत. मात्र आता हे सत्र बंद पडलं होतं. या नरभक्षकामुळे आपल्या कुटुंबासाठीच पोटापुरतं मिळवताना त्याची दमछाक होत असावी तो यांना कुठून देणार ?

मी रायफल उचलली आणि त्या फासेपारधी तरूणाला भेटायला निघालो. रूळ ओलांडून एका पायवाटेने आम्ही जंगलात शिरलो. वाटेच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल होतं. चाणाक्ष नजरेने आजूबाजूला पाहत कृष्णप्पा पुढे, त्याच्या पाठी अली बेग आणि कोणत्याही क्षणी लोड केलेली रायफल झाडायच्या तयारीत त्याच्यापाठी मी अशी आमची वाटचाल सुरू झाली. वाघाने आमच्यावर हल्ला केलाच तर पुढे असलेल्या कृष्ण्प्पावर किंवा शेवटी माझ्यावर केला असता. आमच्या मध्ये असल्याने अली बेग तसा सुरक्षीत होता.

दोन मैलांपेक्षा बरंच अंतर काटल्यावर आम्ही एक दगडी झरा ओलांडला. झ-याला अजूनही थोडंसं पाणी होतं. झरा ओलांडल्यावर एक लहनशी टेकडी लागली आणि वर चढून आल्यावर समोरच एक झोपडी दिसली. झोपडीच्या दारातच एक विशीचा तरूण धारदार सुरीने बांबू तासत होता. माझ्या अंदाजाप्रमाणे शेजारीच एक अर्धवट तयार झालेला सापळा पडला होता !

आम्हांला पाहताच उठून उभं राहत त्याने सलाम केला. कृष्ण्प्पाने माझी ओळख करून दिली. त्याचं नाव बाला असं होतं. आम्ही बोलत असतानाच झोपडीतून दोन स्त्रिया बाहेर आल्या. त्यापैकी म्हातारी त्याची आई आणि दुसरी सतरा-अठरा वर्षांची तरूणी त्याची पत्नी होती. तिच्या कडेवर वर्षाभराचं मूल होतं. झोपडीपासून काही अंतरावर आम्ही गवतावर बैठक मारली. मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं आणि त्याच्या उत्तराचं अली बेग भाषांतर करत होता.

" तुम्हांला त्या वाघाला मारण्यासाठी मी नक्की मदत करीन दोराई !" तो म्हणाला, " या कामासाठी मला एक पैसाही नको. माझ्या वडिलांच्या आत्म्याला त्याने वेदना होतील! त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणून कोणत्याही प्रकारे त्या वाघाचा सर्वनाश करणं हे माझं कर्तव्यं आहे !"

त्याने किती तरी वेळेस जवळून नरभक्षकाचं दर्शन घेतलं होतं. एकदा आम्ही नुकताच ओलांडून आलेल्या झ-यातून दुपारच्या जेवणापूर्वी पाणी आणण्यासाठी तो गेला होता. झ-याच्या पाण्यात भांडं बुडवतानाच त्याला पलीकडच्या किना-यापासून शंभर यार्डांवर त्याच्या दिशेने पुढे सरकत असलेला वाघ दिसला होता. सुदैवानेच त्याने वाघाला वेळीच पाहीलं होतं. हातातलं भांडं तसंच टाकून त्याने झोपडी गाठली. झोपडीत परतताच दार लावून घेत त्यांनी आतून काटेरी कुंपण घातलं. कोणत्याही क्षणी वाघ झोपडीवर हल्ला करेल असं त्यांना वाटंत होतं. कित्येक रात्री त्याने वाघाचा आवाज ऐकला होता. वाघ नेहमी त्या झ-यावर पाणी पिण्यास येत असे. तो एक मोठा नर वाघ होता आणि इतर वाघांच्या तुलनेत त्याच्या अंगावरचे पट्टे खूपच अरूंद आणि जवळजवळ होते. नरभक्षकाला त्याने शेवटचं चार महिन्यांपूर्वी पाहिलं होतं. त्यानंतरही त्याने जंगलात दुसरे वाघ पाहिले होते, पण ते त्याला पाहताच जंगलात पसार झाले होते.

त्यानंतर त्याने ज्या बातमीची मी आतुरतेने प्रतिक्षा करत होतो ती बातमी सांगीतली ! त्याच्या मते वाघ पुन्हा या परिसरात आला होता ! त्याला वाघाचं दर्शन झालं नव्हतं किंवा आवाजही आला नव्हता, पण त्याला वाघाच्या पंजांचे ठसे आढळले होते ! त्याच्या वडीलांचा बळी घेणा-या नरभक्षकाचेच ते ठसे होते असं त्याचं ठाम मत होतं.

मी बालासमवेत ते ठसे तपासायला निघालो. निघण्यापूर्वी त्याने आपल्या आईला आणि पत्नीला झोपडीबाहेर न पडण्याचं बजावून सांगीतलं. ज्या ठिकाणी आम्ही तो झरा ओलांडला तिथून सुमारे तीन फर्लांग अंतरावर झ-याचं पात्रं रुंदावलं होतं. या पात्रातल्या वाळूवरच एका भल्या मोठ्या वाघाचे ठसे आम्हाला दुरूनही स्पष्ट दिसत होते ! पावलांच्या ठशांवरून तो एक चांगलाच थोराड नर वाघ होता हे माझ्या ध्यानात आलं.

आधुनीक जगात आपण अनेक शूरवीरांच्या कथा ऐकतो आणि वाचतो. युध्दात मर्दुमकी गाजवणा-या सैनिकांच्या शौर्यकथाही आपण आवडीने ऐकतो आणि त्यांच्या शौर्याचा यथोचित सन्मानही केला जातो. आपणहून मृत्युमूखी जाणा-या आणि देशासाठी मरण पत्करणा-या गुप्तहेरांनाही आपण आदराने अभिवादन करतो. त्या दिवशी नरभक्षकाच्या भीतीच्या छायेखाली जंगलात राहणा-या त्या चेंचू कुटुंबाच्या असामान्य धैर्यापुढेही मी नतमस्तक झालो. घरातल्या कर्त्या पुरुषाचा वाघाने बळी घेतलेला, उद्या हीच वेळ कोणावरही येऊ शकेल किंबहूना येण्याची जवळपास खात्रीच असताना आणि झोपडीबाहेर वाघाच्या रुपाने साक्षात मृत्यू वावरत आहे अशा परिस्थितीत त्या एकाकी झोपडीत राहणं हे माझ्या कल्पनेपलीकडचं होतं.

आम्ही झोपडीत परतलो. मी त्या भागात असेपर्यंत बालाने आपल्या कुटुंबासहीत गाझुलापल्ली गावात येऊन राहवं असं मी त्याला सुचवलं. अली बेग आणि कृष्णप्पाने माझ्या म्हणण्याला पाठींबा दिला. त्याचं कुटुंब गावात सुरक्षीत राहणार होतं आणि तो माझ्या मदतीला मोकळा राहणार होता. आम्ही गवतावर वाट बघत बसलो असतानांच बालाने आपला सगळ संसार तीन बोचक्यांत गुंडाळला. झोपडीचं काटेरी दार लावून घेतलं आणि एका सरळ ओळीत आम्ही गावच्या दिशेने निघालो.

रात्री स्टेशनमास्तर बालसुब्रमण्यमच्या आमंत्रणावरून त्याच्या घरी भरपेट जेवण झालं. जेवणानंतर भरपूर कॉफी झाली. जेवणानंतर अली बेग, कृष्णप्पा आणि बाला यांच्या सहाय्याने मला पुढची योजना आखायची होती. बालसुब्रमण्यमच्या सूचनेवरून आम्ही परत स्टेशनवर आलो आणि प्लॅटफॉर्मवरच्या एका बाकड्यावर बैठक मारली. गुंटकलकडे जाणारी मेल आणि दोन-तीन मालगाड्या रात्री त्या मार्गाने जाणार असल्याने त्याला स्टेशनवर हजर राहणं आवश्यक होतं आणि आमच्या चर्चेत भागही घेता येणार होता.

अली बेग आणि कृष्णप्पाला त्या वाघाने जिथे घाबरवलं होतं तिथे एक आणि बालाच्या झोपडीपासून जवळच असलेल्या झ-याजवळ जिथे आम्हांला वाघाचे ठसे आढळले होते तिथे दुसरं आमिष बांधायचं असं मी ठरवलं. बाला आणि कृष्णप्पा त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी मागे थांबणार होते. मी अली बेगसह बसवपुरम आणि चेलमा इथे पुढची चौकशी करणयासाठी जाणार होतो. वाघाने दोनपैकी एखाद्या जनावरावर हल्ला केला तर बालसुब्रमण्यमने मला बसवपुरम किंवा चेलमा यापैकी माझा मुक्काम असेल तिथे मला तारेने खबर पोचवायची होती.

बालसुब्रमण्यमबरोबर मी त्याच्या ऑफीसमध्ये आलो. त्याने तार करून बसवपुरम आणि चेलमा इथल्या स्टेशनमास्तरांकडे वाघाची चौकशी केली. कोणतीही नवीन बातमी नव्हती. चेलमाच्या स्टेशनमास्तरने ट्रॉली स्टेशनवर आणण्यात आली असून मला आवश्यकता भासलीच तर ती वापरण्यासाठी नंदयाल इथल्या वरिष्ठ अधिका-याकडून परवानगी घेण्याची सूचना केली. बालसुब्रमण्यमने ताबडतोब तशी तार नंदयालला पाठवून दिली ! माझ्या मोहीमेत रेल्वेच्या या अधिका-यांनी मला शक्यं ती सर्व मदत आनंदाने केली.

बालसुब्रमण्यमला त्याच्या ऑफीसमध्ये सोडून माझ्या तीन सहका-यांसह मी वाघासाठी आमिष म्हणून जनावरं विकत घेण्यासाठी गावात गेलो. साधारणतः वाघ-चित्त्यासाठी आमिष बांधण्यासाठी जनावर विकायला म्हैसूर राज्यातले गुराखी-मेंढपाळ सहसा तयार होत नाहीत. वाघ किंवा चित्ता नरभक्षक असला तरीही त्याच्यासाठी आमिष म्हणून जीवंत जनावर बांधणं त्यांना अमानुषपणाचं वाटतं. कित्येकदा जनावर विकण्यासाठी त्यांची तासन् तास मनधरणी करावी लागते. त्यातच अशा अपरात्री जनावर विकत घेण्यासाठी जाणं म्हणजे नकार मिळण्याची खात्रीच !

या प्रदेशातले लोक मात्र अत्यंत व्यवहारी होते. माझ्या येण्याचा हेतू कळताच त्या शेतक-याने मला जनावरं विकाण्याची ताबडतोब तयारी दर्शवलीच वर मला हवी ती जनावरं निवडून घेण्याची मुभाही दिली ! मी प्रत्येकी पस्तीस रुपयांना दोन अर्धवट वाढलेले तपकीरी गो-हे विकत घेतले. दुस-या दिवशी सकाळी जनावरं ताब्यात घेण्याचं ठरवून आम्ही बाहेर पडलो..

आम्ही स्टेशनवर परतलो तो एक लांबलचक मालगाडी स्टेशनात येऊन थांबली होती. मालगाडीचा अँग्लो इंडीयन ड्रायव्हर स्टेशनमास्तरच्या ऑफीसमध्ये गप्पा मारत बसलेला होता. मी तिथे पोहोचलो तेव्हा त्यांच्या गप्पांचा विषय नेमका वाघ हाच होता. त्याचं नाव विल्यम रॉजर्स होतं. कॉफीचे घुटके घेताना त्याने मला अवघ्या चार दिवसांपूर्वीच नंदयालच्या दिशेने मैलभर अंतरावर रात्रीच्या वेळेला रूळ ओलांडून गेलेल्या वाघाविषयी सांगीतलं. इंजिनाच्या हेडलाईटच्या प्रकाशात आणि तेपण काही क्षणंच वाघ दिसल्याने त्याला वाघाविषयी काही विशेष निरीक्षण करायची संधी मिळाली नव्हती. पण तो एक खूप मोठा वाघ होता एवढं मात्र निश्चित. मला शिकारीत रस असेल तर इथल्यापेक्षा दिगुवामेट्टाच्या आसपास चांगली शिकार मिळू शकेल असंही त्याने सांगीतलं.

त्याने दिलेल्या माहितीबद्दल मी त्याचे आभार मानले. एव्हाना त्याच्या गाडीला सिग्नल मिळाला होता. आमचा निरोप घेऊन तो इंजिनमध्ये चढला आणि एक जोरदार शिट्टी देऊन त्याची गाडी गडद अंधारात दिसेनाशी झाली. त्याचवेळी नंदयालहून मला आवश्यकता भासल्यास ट्रॉली वापरण्याची परवानगी देणारी तार आली.

बालसुब्रमण्यमने मला वेटींग रूम उघडून दिली. माझी रायफल, बिछाना आणि इतर सामान बालाने आत आणलं. मी एकुलता एक मिणमिणता कंदील पेटवला. बाथरूममध्ये पाणी नव्हतं आणि खोलीत पलंग नव्हता. एक टेबल, दोन मोडक्या खुर्च्या आणि एक आरामखुर्ची होती. आरामखुर्चीच्या मधोमध मोठं भोक पडलेलं होतं ! माझ्या डोक्यावर किमान छप्पर होतं हे माझं नशीबचं म्हणायचं ! आरामखुर्चीत मी बसलो आणि पडलेल्या भोकातून अर्धा देह बाहेर आला ! अर्थात मी इतका दमलो होतो की काही क्षणांतच मी झोपेच्या अधीन झालो होतो.

पहाटे साडेचारच्या सुमाराला आणखीन एक मालगाडी आली तेव्हा माझी झोप थोडी चाळवली, पण लवकरच मी पुन्हा झोपून गेलो. सकाळी बालाने मला उठवलं तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. बालसुब्रमण्यम झोप काढण्यासाठी घरी गेला होता. बालाला मी तीन दगडांची चूल पेटवायला सांगीतली आणि त्यावर चहासाठी आधण ठेवलं. माझा प्रायमस स्टो पेटवून मी थोडासा ब्रेड भाजला. चहाला अद्याप उकळी न आल्याने मी प्लॅटफॉर्मच्या टोकाला असलेल्या पाण्याच्या मोठ्या टाक्याशी आलो आणि नळाखाली उभा राहीलो नळ चालू केला. पाण्याचा लोंढा पूर्ण वेगात माझ्यावर आदळला आणि मी जवळजवळ कोलमडलोच ! सकाळची सगळी आन्हीकं आटपून मी परत आलो तोपर्यंत चहा झाला होता. चहा, ब्रेड आणि चपात्या असा भरपेट नाष्टा झाला.

नाष्टा आटपल्यावर अली बेग, कृष्णप्पा आणि बाला यांच्यासह मी बाहेर पडलो. आदल्या रात्री विकत घेतलेले दोन्ही गो-हे ताब्यात घेतले. दोघा वनरक्षकांना वाघ दिसला होता तिथून जवळच माचाण बांधायला सोईस्कर असलेल्या झाडापासून सुमारे पंधरा यार्डांवर त्यापैकी एक गो-हा बांधून ठेवला. परतून आम्ही रेल्वे रूळ ओलांडले आणि बालाच्या झोपडीपासून जवळच असलेला झरा गाठला. वाघाचे ताजे माग कुठेही दिसत नव्हते. झ-याच्या एका अंगाला आदल्या दिवशी पाहिलेल्या पंजांच्या ठशांपासून सुमारे पन्नास यार्डांवर दुसरा बैल बांधला.

दोन्ही आमीषं बांधून आम्ही स्टेशनवर परतलो तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. बालसुब्रमण्यमने मी भोजनासाठी घरी यावं म्हणून आग्रह केला, पण त्याला नम्रपणे नकार देऊन दोघा वनरक्षकांसह मी गावातल्या एकुलत्या एका ' हॉटेल ' मध्ये जेवायला गेलो. जेवण आटपून आम्ही परत स्टेशनवर आलो. बाला आणि कृष्णप्पा दोन्ही आमिषांच्या चारा-पाण्याची व्यवस्था पाहणार होते. दोन्हीपैकी एकाही जनावराचा वाघाने बळी घेतला तर बालसुब्रमण्यम मला तारेने कळवणार होताच !

मला या शिकार मोहीमेत भेटलेल्या सर्वोत्तम माणसांपैकी बालसुब्रमण्यम हा एक होता. कोणत्याही मदतीला सदैव तत्पर असलेला हा माणूस धर्माने कट्टर हिंदू होता. गाय किंवा बैल या जनावरांचा बळी देणं हे त्याच्या धर्माच्या शिकवणुकीच्या विरुध्द होतं, पण नरभक्षकाचा निकाल लावणं जास्त महत्वाचं असल्याने त्याने त्याच्या धार्मि़क तत्वांना मुरड घातली होती आणि मला संपूर्ण सहकार्य देवू केलं होतं !

बसवपुरमला जाणारी गाडी दुपारी अडीच वाजता आली. ड्रायव्हरच्या परवानगीने मी त्याच्याबरोबर इंजीनमध्ये शिरलो. रूळांच्या दोन्ही बाजूच्या जंगलाचं निरीक्षण करणं हा माझा मुख्य हेतू होता. अली बेग मागच्याच तिस-या वर्गाच्या डब्यात शिरला. गाडीने गाझुलापल्ली सोडलं आणि ती बसवपुरमच्या दिशेने निघाली. सहा मैलाचं अंतर कापण्यासाठी गाडीला पंचवीस मिनीटं लागली. रुळाच्या दोन्ही बाजूंचं जंगल माझ्या दृष्टीस पडत होतं तशी वाघाला गाठण्याची माझी आशा संपुष्टात येऊ लागली. हा सगळा प्रदेश भरगच्च जंगलाने व्यापलेला होता. वाघाला लपण्यासाठी तिथं शेकड्याने जागा असणार होत्या. एवढ्या मोठ्या प्रदेशात त्याचा शोध घेणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं. वाघासाठी मी गाझुलापल्लीच्या जंगलात दोन आमीषं बांधली होती खरी, पण त्यापैकीच एका जनावराचा वाघ बळी घेईल अशी आशा करणं हा निव्वळ भाबडा आशावाद ठरला असता. वाघ बसवपुरम किंवा चेलमाच्याही आसपास कुठेही असू शकत होता.

बसवपुरमचं स्टेशन म्हणजे गाझुलापल्लीचीच दुसरी आवृत्ती होती. तिथला स्टेशनमास्तर मसिलामोनी नावाचा तमिळ भाषि़क होता. त्याने मला स्टेशनवरच्या वेटींग रुम मध्ये मुक्काम करण्याचा आग्रह केला. वाघ बसवपुरमच्याच परिसरात सापडेल असं त्याचं मत पडलं. तिथल्या वनरक्षकाचं नाव किट्टू होतं. त्याचा जोडीदार आजारपणाच्या रजेवर नंदयालला गेला होता. स्टेशनच्या उत्तरेला सुमारे मैलभर अंतरावर एक लहानसं डबकंवजा तळं होतं. या तळ्याच्या परिसरात त्याने वाघाच्या पंजांचे ठसे पाहिले होते.

किट्टूला बरोबर घेऊन मी ते तळं गाठलं. तळ्याच्या आजूबाजूला वाघाचे जुने माग दिसत होते. एका मोठ्या नर चित्त्याचे ठसेही मला तिथे आढळले. चित्त्याचा वावर माझ्या दृष्टीने तापदायक होता. वाघासाठी मी बांधलेलं कोणतंही जनावर चित्ता मटकावणार याची मला खात्री होती.

रात्री मी स्टेशनवरच्या वेटींग रुममध्ये झोप काढली. दुस-या दिवशी सकाळी मी एक अर्धवट वाढलेलं रेडकू तळ्यापासून सुमारे अर्ध्या मैलावर जंगलात बांधलं. त्याच्या चारा-पाण्याची व्यवस्था किट्टूला लावून दिली, रेडकू बळी गेलं तर मसिलामोनीने बालसुब्रमण्यमप्रमाणेच मला तारेने कळवायचं कबूल केलं.

दुपारी सव्वातीनच्या सुमाराला आलेल्या गाडीने मी बसवपुरम सोडलं आणि चेलमाकडे निघालो. या गाडीच्या इंजीन ड्रायव्हरने मला वाघाने त्या ट्रॉली ढकलणा-या दुर्दैवी मजुराला उचलून नेलं होतं ती जागा दाखवली. ही जागा दोन्ही स्टेशनांच्या बरोबर मध्यावर घनदाट जंगलात होती.

चेलमाला पोहोचल्यावर मी तिथल्या स्टेशनमास्तरची मी गाठ घेतली. त्याच्या सहका-यांकडून त्याला माझ्या आगमनाची आधीच सूचना मिळाली होती. त्याने तिथल्या दोन्ही वनरक्षकांना आधीच निरोप धाडला होता. मी चेलमाला पोहोचलो तेव्हा ते माझी वाट पाहत प्लॅटफॉर्मवर बसून होते.

त्यांच्याकडून मला एक अनपेक्षीत बातमी मिळाली. वाघाने सोळा मैल अंतरावरच्या दिगुवामेट्टा गावाजवळ एका बाईचा बळी घेतला होता ! ही बातमी रात्रीच्या वेळी आलेल्या मालगाडीच्या गार्डने आणली होती. मी बसवपुरमच्या वेटींग रुम मध्ये गाढ झोपेत असताना ही मालगाडी तिथे न थांबता निघून गेली होती त्यामुळे मला ही बातमी ताबड्तोब कळवणं त्याला जमलं नव्हतं.

वाघाने घेतलेल्या या ताज्या बळी मुळे माझी सगळी गणितं उलटी-पालटी झाली होती. पूर्वीपेक्षा खूपच मोठ्या प्रदेशात आता त्याचा तपास करावा लागणार होता. त्याच्या हालचालींविषयी मी काळजीपूर्वक आखलेल्या वेळापत्रकाचा तर त्याने पार धुव्वा उडावला होता. तो गाझुलापल्लीच्या आसपास कुठेतरी असावा अशी माझी जवळपास खात्री होती आणि त्याने सत्तावीस मैलांवर दिगुवामेट्टा इथे शिकार साधली होती.

सत्तावीस मैल अंतर वाघासाठी फार नसतं, शिका-यासाठी असतं !

मी स्टेशनमास्तर बरोबर त्याच्या ऑफीसमध्ये आलो. त्याने त्या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी दिगुवामेट्टा इथे तार केली. पंधरा मिनीटांतच दिगुवामेट्टाच्या स्टेशनमास्तरचं तारेने उत्तर आलं. दोन दिवसांपूर्वी मोहाची फुलं गोळा करायला गेलेल्या एका स्त्रीला वाघाने उचललं होतं. गावक-यांना तिची फुलांनी अर्धी भरलेली टोपलीच फक्तं मिळाली होती. दिगुवामेट्टाच्या पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली होती. स्टेशनमास्तरने मी गाझुलापल्ली आणि बसवपुरमच्या परिसरात वाघाला आमिष म्हणून जनावरं बांधल्याचं ऐकलं होतं. चेलमा, दिगुवामेट्टा आणि बोगोटाच्या आसपासही मी जनावरं बांधावीत असा त्याने सल्ला दिला होता.

या वाघाला गाठण्यासाठी मला प्रत्येक स्टेशनाच्या परिसरात जनावरं बांधून ठेवावी लागणार होती तर !

दुस-या दिवशी सकाळी चेलमा गावी मी वाघासाठी जनावर बांधलं. त्या स्त्रीचा बळी गेल्याचं कळताच मी तातडीनं दिगुवामेट्टा का गाठलं नाही असा प्रश्न तुम्हांला पडला असेल. एकतर तिचा बळी गेल्याला दोन दिवस होऊन गेले होते. मी तिथे पोहोचून तिच्या अवशेषांचा पत्ता लावण्यात यशस्वी झालो असतो तरीही तिची जेमतेम हाडं हाती लागली असती. अशा परिस्थितीत घाई करण्यात काहीच अर्थ नव्हता.

त्या दुपारच्या गाडीने मी बोगोटा गाठून वाघासाठी आणखीन एक आमिष बांधलं. दुस-या दिवशी सकाळच्या मालगाडीने मी दिगुवामेट्टा गाठलं. वाघानं त्या स्त्रीला उचललं होतं तिथे एक आणि गुरांची पायवाट जिथे एका झ-याला छेदून जात होती तिथे जंगलाच्या कडेल दुसरं अशी दोन जनावरं बांधली.

आतापर्यंत त्या परिसरात मी एकूण पाच दिवस घालवले होते आणि वाघासाठी आमिष म्हणून सात जनावरं बांधली होती. वाघाची पुसटशी चाहूलही कुठे लागली नव्हती.

( मूळ कथा : केनेथ अ‍ॅंडरसन )

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लवकर येऊ दे पुढचा भाग.

मागच्या काही लेखांप्रमाणेच ओघवत्या शैलीतला हा पण अनुवाद सरस उतरलाय. Happy

चित्त्याच्या बाबतीत असा अंदाज बांधणं मात्र अशक्यं असतं. तो इथे-तिथे कोणत्याही क्षणी कुठेही असू शकतो. चित्ता नेहमी रात्रीच्या अंधारातच शिकार करतो. >>>>>>> बिबळ्या म्हणायच का तुम्हाला????