कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या

Submitted by बेफ़िकीर on 27 November, 2013 - 13:19

कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या
तुलाही वाटते ना सांग माझी लाज तारुण्या

तुला जोमात आणायास ही खोडे जुनी झाली
नको होऊस म्हातार्‍यांवरी नाराज तारुण्या

अकाली प्रौढ होण्याला नको ठेवूस तू नांवे
मला आलाच नाही रे तुझा अंदाज तारुण्या

तश्याही घ्यायच्या आहेत मरतानाच झोकांड्या
स्वतःही पी हवी तितकी......मलाही पाज तारुण्या

कुठे ती आणि कोठे तू...... कुठे नामानिराळा मी
कसा देऊ तिला आता पुन्हा आवाज तारुण्या

हवा होतो अश्यांना मी नकोसा वाटतो आता
कसे फेडू तुझे हे व्याज मी निर्व्याज तारुण्या

प्रवासातील टप्पा एक ज्याला पूजती सारे
कशाचा नेमका आहे तुला हा माज तारुण्या

मराठीतून छोटे व्हायला पडतात मर्यादा
बड्या उर्दू बुजुर्गासारखे नावाज तारुण्या

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला जोमात आणायास ही खोडे जुनी झाली
नको होऊस म्हातार्‍यांवरी नाराज तारुण्या...
... एकदम भन्नाट!

तुला जोमात आणायास ही खोडे जुनी झाली
नको होऊस म्हातार्‍यांवरी नाराज तारुण्या

तश्याही घ्यायच्या आहेत मरतानाच झोकांड्या
स्वतःही पी हवी तितकी......मलाही पाज तारुण्या

खूप आवडले हे शेर!

बेफी गझल आवडली खूप. मला गझलेतलं काहीच कळत नाही (हे लिहिण्याची माझी कितवी बरं वेळ? :अओ:) असो तर मी गझल हा प्रकार फक्त आशयासाठी वाचते आणि मला नेहमी आश्चर्य वाटतं की इतकं अर्थपुर्ण काहीतरी तुम्ही लोक २ च ओळित किती प्रभावीपणे मांडता.

एकच सांगावसं वाटतंय आधीच कविता गझल हा माझा प्रांत नसताना मोठे कष्ट घेऊन या गोष्टी मला वाचाव्या/समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे माझी दमछाक होते. त्यात तुमची गझल म्हणजे रेल्वेसारखी लांबलचक.... माझा पेशन्स मधेच संपतो अर्थ समजून घेण्याचा.

बाकी छान. Happy

दक्षिणा,

>> गझल आवडली खूप. मला गझलेतलं काहीच कळत नाही (हे लिहिण्याची माझी कितवी बरं वेळ? आता काय
>> करायचं) असो तर मी गझल हा प्रकार फक्त आशयासाठी वाचते आणि मला नेहमी आश्चर्य वाटतं की इतकं
>> अर्थपुर्ण काहीतरी तुम्ही लोक २ च ओळित किती प्रभावीपणे मांडता.

मलाही हेच म्हणायचंय! धन्यवाद. Happy

थोडं पुढे जाउन म्हणेन की शेरांची मालिका ही रमीक्रमैव (रमीच्या सीक्वेन्ससारखी) आहे. एकच अर्थ पुन्हापुन्हा ध्वनित होतो किंवा एकातून दुसर्‍या अर्थाचा पदर उलगडत जातो. बेफिकीरांची गझल वाचून असे अपेक्षातरंग मनी उठतात! Happy

आ.न.,
-गा.पै.

बेफि,
सर्व द्वीपदी आवडल्या! Happy

@ दक्षिणा आणि गामा पै.

दोन ओळींची कविता याचा अर्थ काय? द्वीपदी वाचा, आनंद घ्या, दाद द्या आणि पुढच्या द्वीपदीकडे वळल्यावर पाठीमागील द्वीपदीचा विचार करू नका. कारण त्यातच तुम्ही गुरफटून जाल आणि पुढील द्वीपदीचा आनंद लुटू शकणार नाही! Happy

बेफिकीर,

पुन्हा एकदा सुंदर गझल.

*** तश्याही घ्यायच्या आहेत मरतानाच झोकांड्या

या ठिकाणी,
मरताना झोकांड्याच घ्यायच्या आहेत, असे म्हणायचे असेल तर....
मरतानाच मधील च खटकतो आहे.

किंवा असे म्हणायचे आहे काय की, झोकांड्या फक्त मरतानाच घ्यायच्या आहेत.. एरवी नाहीत.
असे म्हणायचे असेल तर, स्वतःही पी आणि मलाही पाज असे म्हणताना - काळ - नक्की होत नाहीये. म्हणजे, आयुष्यभर पाज की मरतानाच पाज असे.

असो.

गझल आवडली.

कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या
तुलाही वाटते ना सांग माझी लाज तारुण्या

तुला जोमात आणायास ही खोडे जुनी झाली
नको होऊस म्हातार्‍यांवरी नाराज तारुण्या

अकाली प्रौढ होण्याला नको ठेवूस तू नांवे
मला आलाच नाही रे तुझा अंदाज तारुण्या

>> हे तिन्ही फार आवडले. खासकरून 'नाराज'..

मरतानाच मधला च भरीचा वाटत असणार्‍यांनी आपल्याला हा शेर समजला नाही आहे असे बिनदिक्कतपणे मानावे

कवी म्हणतो आहे की आपल्याला (मोस्टली मला ह्या अर्थाने ) मरतानाच झोकांडया घ्यायच्या आहेत बेहोशीत पावले लडखडणे तोल डळमळणे हे प्रकार शेवटी शेवटी... मरण आल्यावर आपण करणार आहोत त्या मुळे माझ्या तारुण्या तू ही हवी तितकी पी आणि मलाही पाज ...आपण काही एवढ्या तेवढ्याने तोल सोडत नाही इतका आपला आपल्यावर कंट्रोल आहे त्यामुळे तू बेफिकीर होवून पी आणि मी तर बेफिकीर आहेच मलाही पाज

एक तर हवीतितकी दारू वर सोबतीला तारुण्य इतकी नशा असतानाही कवीचा तोल डळमळत नाही असे कवीला म्हणायचे आहे ...असावे ....

ह्या प्रतिसादावरून हा शेर मलाच समजला नाही असे खात्रीपूर्वक वाटल्यास प्लीज निदर्शनास आण्नून दयावेत ही विनंती

असो माझाच एक शेर आठवला (नेहमीप्रमाणे सहजच आठवला मुद्दाम नाही गै न )

उरलेल्या ओलाव्याने हा मौनाचा ग्लास विसळतो मी
इतका गहिवर प्याल्यावरही बघ मुद्देसूद बरळतो मी

Happy