कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या

कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या

Submitted by बेफ़िकीर on 27 November, 2013 - 13:19

कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या
तुलाही वाटते ना सांग माझी लाज तारुण्या

तुला जोमात आणायास ही खोडे जुनी झाली
नको होऊस म्हातार्‍यांवरी नाराज तारुण्या

अकाली प्रौढ होण्याला नको ठेवूस तू नांवे
मला आलाच नाही रे तुझा अंदाज तारुण्या

तश्याही घ्यायच्या आहेत मरतानाच झोकांड्या
स्वतःही पी हवी तितकी......मलाही पाज तारुण्या

कुठे ती आणि कोठे तू...... कुठे नामानिराळा मी
कसा देऊ तिला आता पुन्हा आवाज तारुण्या

हवा होतो अश्यांना मी नकोसा वाटतो आता
कसे फेडू तुझे हे व्याज मी निर्व्याज तारुण्या

प्रवासातील टप्पा एक ज्याला पूजती सारे
कशाचा नेमका आहे तुला हा माज तारुण्या

Subscribe to RSS - कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या