रोहन प्रकाशन - मायबोली.कॉम आयोजित लेखनस्पर्धेचा निकाल

Submitted by admin on 25 November, 2013 - 00:31

गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही मायबोलीवर आपण लेखनस्पर्धा आयोजित केली होती. रोहन प्रकाशन हे या स्पर्धेचे प्रायोजक होते.

स्पर्धेसाठी एकूण तीन विषय होते व एकूण २८ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.

ज्येष्ठ संपादक श्री. आनंद आगाशे व सुप्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर यांनी तिन्ही विषयांसाठी परीक्षक म्हणून काम केलं.

गुणांकन करताना कुठली प्रवेशिका कोणी लिहिली आहे, हे परीक्षकांना माहीत नव्हतं.

तिसर्‍या विषयातील एकही प्रवेशिका परीक्षकांना पारितोषिकयोग्य वाटली नाही. मात्र पहिल्या दोन्ही विषयांमध्ये अनेक चांगल्या प्रवेशिका असल्याने या दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी चार विजेते निवडले आहेत. या बक्षिसांची रक्कमही वाढवली आहे.

***

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -

विषय पहिला -

पहिला क्रमांक - शोभनाताई - सामर्थ्य आहे दूरशिक्षणाचे -

दुसरा क्रमांक - अनया - काळरात्रीनंतरचा उषःकाल

तिसरा क्रमांक - Adm - सुवर्णकाळाची स्वप्न दाखवणारं कांस्य पदक

उत्तेजनार्थ बक्षीस
- जाई. - संघ लोकसेवा आयोगाची स्थापना

विषय दुसरा -

पहिला क्रमांक - नंदिनी - दूरदर्शन

दुसरा क्रमांक - हर्पेन - प्रसिद्धीपराङ्मुख राजकारणी नेता - त्रिभुवनदास पटेल

तिसरा क्रमांक - जीएस - माणसे पेरणारा माणूस

उत्तेजनार्थ बक्षीस - अश्विनी के - तेल क्षेत्रात भारत स्वावलंबी होण्यासाठी निर्माण झालेली भारताची मूळ राष्ट्रीय तेल कंपनी - इंडियनऑयल

***

लेखनस्पर्धेच्या विजेत्यांना रोहन प्रकाशन, पुणे आणि मायबोली.कॉम यांनी प्रायोजित केलेली बक्षिसं दिली जातील.

पहिलं बक्षीस - रोहन प्रकाशनातर्फे रु. १७५० किमतीची रोहन प्रकाशनाची पुस्तकं.

दुसरं बक्षीस - रोहन प्रकाशनातर्फे रु. १२५० किमतीची रोहन प्रकाशनाची पुस्तकं.

तिसरं बक्षीस - रोहन प्रकाशनातर्फे रु. ७५० किमतीची रोहन प्रकाशनाची पुस्तकं

उत्तेजनार्थ बक्षीस - मायबोली.कॉमतर्फे रु. ५००चं गिफ्ट सर्टिफिकेट

सर्व विजेत्यांशी मायबोलीच्या संपर्कसुविधेतून लवकरच आम्ही संपर्क साधू.

***

स्पर्धेच्या परीक्षकांच्या वतीनं श्री. आनंद आगाशे यांचं मनोगत -

तीन महत्त्वाच्या आणि रोचक विषयांवर 'मायबोली'ने आयोजित केलेल्या लेखनस्पर्धेत कशा स्वरुपाचे लिखाण येते, हे जाणून घेण्याची परीक्षक म्हणून मोठी उत्कंठा होती. मिळालेला वाचनानुभव आनंददायी होता, हे सुरुवातीलाच सांगितले पाहिजे. पहिल्या दोनही विषयांतर्गत स्पर्धकांनी केलेली निवड, त्या विषयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि प्रतिपादन करण्याची प्रत्येकाची पद्धत, या सगळ्यांच बाबतीत भरपूर विविधता होती. भारताचे कॅलिडोस्कोपिक स्वरूप आणि स्पर्धेच्या आयोजकांची चिकित्सक नजर, या दोन्हींना मिळालेली ही पोचपावतीच म्हणायला हवी.

स्वातंत्रोत्तर भारताचा प्रवास गुंगवून टाकणारा आहे. तो काही वेळा सरळसोट हमरस्त्याने भरधाव झाला, तर काही वेळा दर्‍याखोर्‍यांतून, वळणावळणाने, अडखळत. तो समजावून घेताना अनेकजण निराशेने पछाडतात. "गेल्या ६६ वर्षांत एवढंच अंतर आपण कापलं? अमूक लोकांनी अमूक केलं असतं, आणि तमूक लोकांनी तमूक केलं नसतं, तर आपण आतापर्यंत कुठल्य़ा कुठे पोचलो असतो..." असा एकूण सूर असतो. याउलट, आपण गेल्या साडेसहा दशकांत खूप मोठी मजल मारली असल्याचे मानणारे बरेचजण प्रफुल्लित होऊन म्हणतात, "सगळ्या मर्यादा लक्षात घेता आपण १९४७पासून खूपच मोठा पल्ला गाठला आहे. अमूक लोकांनी अमूक केलं आणि तमूक लोकांनी तमूक केलं नाही, म्हणूनच हे शक्य झालं!''

भाबड्या आशावादापेक्षा किंवा दुर्धर निराशावादापेक्षा निखळ वास्तववाद अंगीकारणे, हे कधीही अधिक शहाणपणाचे, उपयोगाचे. पण परिस्थितीचे प्रामाणिक विश्लेषण करत असताना आनंदाचे कवडसे मुबलकपणे वेचता आले, तरच उद्याचा प्रकाशमार्ग प्रशस्त करता येतो. त्या दृष्टीने ‘मायबोली’कारांनी स्पर्धेसाठी ठेवलेले विषय लक्षणीय होते.

स्वातंत्र्योत्तर भारतातील एक सकारात्मक घटना / घडामोड, महत्त्वाची व्यक्ती / संस्था आणि लक्षवेधी कलाकृती, असे हे तीन विषय. आपला इतिहास भारदस्त आणि भरगच्च असल्यामुळे यातील प्रत्येक विषयांतर्गत गेल्या ६६ वर्षांत निवडण्यासारखे प्रचंड काही होते. राजकारण, समाजकारण, शिक्षण, प्रशासन, कला, विज्ञान, संशोधन, साहित्य, क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रांमधे इतक्या लोकांनी इतके काही घडवून आणले आहे, की त्याची नुसती जंत्री करायची झाली तरी एखाद्याची दमछाक होईल. अशा स्थितीत कोणत्याही एका घडामोडीची, व्यक्तीची / संस्थेची, कलाकृतीची निवड करणे आव्हानात्मक होते. अखेर स्पर्धकाचे परिप्रेक्ष्य काय आहे यावर त्याने केलेली निवड अवलंबून असणार हे उघड आहे. म्हणूनच कोणत्याही एका निवडीबाबत ‘चूक’ किंवा ‘बरोबर’ असा निःसंदिग्ध निवाडा करणे अयोग्य आहे.

स्वतःच्या व्यक्तिगत मतांच्या फूटपट्टीवर स्पर्धकांनी केलेल्या निवडींचे मोजमाप करायचे नाही हे एकदा मनाशी ठरविल्यावर परीक्षण करण्याचे निकष आपोआप आकाराला आले.

देश स्वतंत्र झाल्यापासूनचा विस्तृत पट लक्षात घेऊन संबंधित स्पर्धकाने घटना / घडामोड, व्यक्ती / संस्था व कलाकृतीची निवड केली आहे की नाही, हा पहिला निकष. अशी निवड करताना बर्‍याचजणांची गफलत होते. एकतर अगदी अलीकडची किंवा अगदी जुनी अशी त्या वेळेला स्वतःला भावून गेलेली बाब निवडली जाते. तिच्या व्याप्तीचा पुरेसा विचार केला गेला आहे, असे जाणवत नाही. त्यामुळे असा विचार ज्या अन्य स्पर्धकांनी केला आहे त्यांच्या तुलनेत ही निवड थिटी पडते.

केलेल्या निवडीचे समर्थन स्पर्धकाने केले आहे की नाही, आणि केले असेल तर कितपत प्रभावीपणे केले आहे, हा निकष क्रमांक दोन. निवड विवाद्य पण समर्थन परिणामकारक किंवा निवड उत्तम पण समर्थन कच्चे, असे दोन्ही प्रकार आढळतात. पुन्हा इथे वकिली पद्धतीने केलेले एकतर्फी समर्थन अपेक्षित नाही. परिस्थितीचा सांगोपांग विचार, आणि त्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या निवडीची कारणमीमांसा इथे अपेक्षित आहे. केलेल्या निवडीची शक्तिस्थळे उलगडत असताना तिच्या मर्यादासुद्धा स्पष्ट करण्याचे भान स्पर्धकाने दाखविले असेल, तर अधिक चांगले. असे करण्याने निवडीची ‘उंची’ कमी न होता उलट तिची ‘खोली’ वाढते.

तिसरा निकष लेखाच्या मांडणीशी संबंधित आहे. चांगल्या मांडणीत तीन घटक येतात. लेखकाने निवड करण्यापूर्वी त्या विषयासंबंधी पुरेशी माहिती जमा केली आहे की नाही, कागदपत्रे, भेटीगाठी, पुस्तके किंवा संकेतस्थळांवरून जमा केलेल्या माहितीला लेखकाच्या स्वतःच्या अनुभवाची काही जोड आहे का, आणि प्रतिपादन करताना या सगळ्या ‘गृहपाठा’मध्ये लेखकाच्या स्वतःच्या चिंतनाचा अंतर्भाव आहे का, हे ते तीन घटक. या तीन घटकांचा अंतर्गत समतोल नीट राखला जाण्यामुळे लेखन अधिक परिणामकारक होते.

भाषा हे या अभिव्यक्तीचे वाहन असल्याने हा चौथा निकष ओघानेच येतो. आपल्या मायबोलीच्या शुद्ध-अशुद्धतेबाबत ‘मायबोली’कारांची भूमिका किती आग्रही आहे, याची कल्पना नाही. पण आपले विद्यमान सामाजिक / सांस्कृतिक वास्तव लक्षात घेता, याबाबत प्रस्तुत परीक्षकांनी काहीशी लवचिकता जाणीवपूर्वक स्वीकारली आहे. एखाद्या लेखकाची शब्दयोजना आणि वाक्यरचना ‘शंभर नंबरी’ नसली, तरी मुद्दा योग्यप्रकारे मांडण्यासाठी ती पुरेशी ठरली आहे की नाही, याला महत्त्व दिले आहे.

हे चार निकष अर्थातच परस्पर-निरपेक्ष नाहीत. किंबहुना त्यांची परस्परांमधील गुंफण किती बेमालूम झाली आहे, यावरच लेखाचे रसायन ठरते. स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांमधून पारितोषिकप्राप्त लेखांची निवड करत असताना या रसायनशास्त्राचा (की रसायनकलेचा?) सर्वाधिक विचार झाला.

विषय क्रमांक एक आणि क्रमांक दोनमध्ये प्रत्येकी चार-चार पारितोषिकांसाठी निवड केलेली आहे. विषय तीनसाठी प्रवेशिकांची संख्या तुलनेने कमी होती व आलेल्या प्रवेशिका पारितोषिक देण्यायोग्य वाटल्या नाहीत.
पहिल्या दोन्ही विषयांत पारितोषिके मिळवू न शकलेले काही लेख खरे म्हणजे उल्लेखनीय आहेत. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे ‘रसायन’ जमून येण्यामध्ये ते लेख काकणभर कमी पडले. अर्थात त्यामध्येही सापेक्षता आलीच! पण ती टाळता येण्यासारखी नाही. म्हणूनच, केवळ पारितोषिकविजेत्याच नव्हे, तर सर्वच स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते.

स्पर्धेचे परीक्षण करताना अशुद्धलेखन, व्याकरणाच्या चुका काहीशा नजरेआड केल्या असल्या, तरी अशा चुका लेखनात असू नयेत यासाठी काळजी घेणे, हे वाचकाला उत्तम वाचनानुभव देण्याच्या दृष्टीने लेखकाचे कर्तव्य आहे. छापील माध्यमात लेखन प्रकाशित होण्यापूर्वी संपादन व मुद्रितशोधन या दोन पायर्‍या असतात. लेखात मुद्द्यांची मांडणी योग्य असावी, वाक्यरचना सदोष नसावी याची काळजी संपादक घेतात. लेखकाशी चर्चा करून मुद्दे कमीजास्त करणे, पुनर्लेखन करून घेणे, व्याकरणाच्या चुका दुरुस्त करणे ही कामेही संपादक करतात. नंतर मुद्रितशोधक त्यांचे काम करतात. ब्लॉगांवर लिहिताना किंवा 'मायबोली'सारख्या संकेतस्थळांवर लिहिताना लेखकानेच संपादक व मुद्रितशोधक होणे अपेक्षित असते. तरच लेखन योग्यप्रकारे वाचकांपर्यंत पोहोचू शकेल. मुद्द्यांच्या मांडणीतला असमतोल, शुद्धलेखनातल्या चुका वाचकाचा रसभंग करतात. त्यामुळे लेखन झाल्यावर ते लगेच प्रकाशित करण्याची घाई न करता थोडा अवधी जाऊ द्यावा. ते लेखन पुनःपुन्हा वाचावे. त्या लेखनात काही बदल करावेसे वाटले, तर ते करावेत. शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त कराव्यात आणि मगच ते लेखन प्रकाशित करावे.

परीक्षणासाठीच्या ज्या चार निकषांचा उल्लेख सुरुवातीला केला आहे, त्याचा उपयोग केवळ स्पर्धेत भाग घेण्यासाठीच्या लिखाणापुरता न करता लेखकांनी नेहमीच करायला हवा. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, वाचन, स्वानुभव, चिंतन आणि नियमित लिखाणाचा सराव, यांना पर्याय नाही. असे करण्यामुळे स्पर्धांमध्ये यश मिळेलच, अशी हमी देता येणार नाही, पण स्वानंद पुरेपूर लाभेल, याची शंभर टक्के खात्री देता येईल.

***

पारितोषिकविजेत्या प्रवेशिकांच्या निवडीबद्दल परीक्षकांचे भाष्य -

विषय पहिला -

पहिलं बक्षीस - निवडीतील वेगळेपण आणि सुयोग्य मांडणी यांच्या जोडीला लेखकाने / लेखिकेने मिळवलेली ठोस माहिती, स्वानुभव आणि त्यावर केलेले चिंतन, ही या लेखाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

दुसरं बक्षीस - लेखकाने / लेखिकेने विषयाची विचारपूर्वक निवड केली आहे, हे जाणवते. मात्र प्रत्यक्ष लिखाणात आणीबाणीपूर्व काळावर थोडा जास्त भर दिला गेला आहे. त्याचप्रमाणे १९७७ या वर्षाचे मर्म नेमकेपणे मांडले गेले असले, तरी ते थोडे तपशिलात उलगडले असते, तर आवडले असते.

तिसरं बक्षीस - याच घटनेची निवड का केली, हे पुरेशा प्रभावीपणे लेखक स्पष्ट करू शकलेला नाही. परंतु लेखन उत्तम आहे आणि विषयांतर झाल्याचे कोठेही जाणवत नाही.

उत्तेजनार्थ बक्षीस - काही ’रुक्ष’ वाटणारी ही निवड आहे, त्यामुळे लिखाणात चटपटीतपणा येऊ शकलेला नाही. तरीही लोकसेवा आयोगाची स्थापना ही पायाभूत स्वरूपाची, बहुस्पर्शी आणि दूरगामी परिणाम करणारी कशी आहे, हे चांगल्या पद्धतीने लेखात मांडले आहे.

विषय दुसरा -

पहिलं बक्षीस - छान निवड, उत्तम माहिती आणि प्रभावी लिखाण ही या लेखाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर ’दूरदर्शन’च्या मर्यादांचाही ऊहापोह चांगल्या पद्धतीने केला आहे. ’दूरदर्शन’ऐवजी ’दूरचित्रवाणी’ हे शीर्षक अधिक शोभले असते.

दुसरं बक्षीस - चांगली निवड व अभ्यासाला प्रभावी मांडणीची जोड लेखात आहे. त्याचप्रमाणे श्री. पटेल यांच्या कर्तबगारीबद्दल लिहिताना श्री. वर्गीस कुरियन यांना कुठेही कमीपणा येऊ न देण्याची खबरदारी घेतली गेली आहे.

तिसरं बक्षीस - लेखकाने केलेली ही निवड ’धाडसी’ (काहीशी पोलिटिकली इनकरेक्ट) म्हणायला हवी. लेखन व प्रतिपादन ठोस आहे. मात्र गोळवलकर गुरुजींच्या कामाच्या मर्यादा, त्यातल्या त्रुटींचा विचार लेखकाने अजिबात केलेला दिसत नाही.

उत्तेजनार्थ बक्षीस - लेखकाने केलेली निवड चांगली आहे आणि लिखाण पूर्णत: विषयाला धरून आहे. परंतु सामाजिक / आर्थिक / राजकीय संदर्भांचा ऊहापोह थोडा अधिक केला असता, तर लिखाण अधिक प्रभावी झाले असते.

***

अतिशय व्यग्र असूनही या स्पर्धेचं परीक्षण केल्याबद्दल श्री. आनंद आगाशे व श्री. सुनील सुकथनकर यांचे मन:पूर्वक आभार.

स्पर्धेच्या विजेत्यांची बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल रोहन प्रकाशन, पुणे, यांचे आम्ही आभारी आहोत.

या स्पर्धेसाठी लेखन करणार्‍या आणि या लेखांवर भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. या उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व मायबोलीकरांना धन्यवाद.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास काही अपरिहार्य कारणांमुळे उशीर झाला. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

धन्यवाद.

***
विषय: 

उत्तमोत्तम लेखांची मालिका दिल्याबद्दल संयोजक, मायबोलीकर ह्यांचे...

तसेच दर्जेदार निकष ठेवून त्यानुसार अनुक्रम ठरवणार्‍या परिक्षकांचे

व सर्व डिझर्व्हिंग विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

ह्या स्पर्धेने मागे वळून कित्येक अश्या गोष्टी पाहण्यास मदत केली ज्या काळाच्या ओघात एक तर विस्मृतीत तरी गेल्या होत्या किंवा ज्यांचे ठसे मनावर अद्याप असूनही ज्यांचे आभार मानायचे राहूनच गेले होते. Happy

पुनःश्च अभिनंदन!

-'बेफिकीर'!

सर्व विजेत्यांचे तसेच स्पर्धेत अत्यंत आवडीने सहभाग दिलेल्या सर्वच लेखकांचे हार्दिक अभिनंदन. अशा स्पर्धा आणि पारितोषिके लेखकांना नक्कीच पुढील वाटचालीसाठी सातत्याने स्फुरण देत राहातात....त्यासाठीही विजेत्यांना सदिच्छा.

श्री.आनंद आगाशे यांचे विचार वाचले आणि ते अत्यंत सविस्तरपणे लिहिले गेले आहे....स्पर्धक वाचतीलच, तरीही त्यांच्या विचारातील "....वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, वाचन, स्वानुभव, चिंतन आणि नियमित लिखाणाचा सराव, यांना पर्याय नाही......" ही सूचना खूप महत्वाचे आहे, जिचे पालन सर्वच करतील.

अरेच्चा!!

धन्यवाद, मायबोलीकर आणि परीक्षक!!! छान वाटलं वाचून. परीक्षकांचे मनोगत फार मुद्देसूद आणि विचार करण्यासारखे आहे.

या उपक्रमाबद्दल मायबोली टीमला खास धन्यवाद. आलेले लेख वाचणे हा सुंदर अनुभव होताच, पण आपण लिहायचे ठरवल्यावर विषय ठरवण्यापासून ते लिखाण होइपर्यंत अभ्यास झाला, त्यामुळे खूप मजा आली.

अरे वा!

धन्यवाद मायबोली परिवार आणि परीक्षक :-). बाकीच्या विजेत्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी लिखाण केले आहे अश्या सगळ्यांचे अभिनंदन. ह्या स्पर्धेत लिहिणं हेच अभिनंदन करण्यायोग्य वाटत होतं Wink
परीक्षकांचे मनोगत फार मुद्देसूद आणि विचार करण्यासारखे आहे. >>> +१

ह्या निमित्ताने वेगळ्याच दृष्टीकोनातून अभ्यास केला गेला आणि जमेल तसा मांडला गेला. ह्या प्रक्रियेतही खूप आनंद मिळाला Happy

अभिनंदन करणाऱ्यांचे, रोहन प्रकाशन आणि मायबोली, सर्वांचे मनःपूर्वक आभार. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्या त्या विषयांचा अभ्यास करण्याची प्रोसेस खूप छान होती. परीक्षकांच्या सूचना खूप चांगल्या आहेत.

मला लिखाणाची वाट मायबोलीमुळे दिसली. कधी काही लिहू शकेन, अशी शंकाही कधी मनात आली नव्हती. आता बक्षीस मिळाल्यामुळे फार छान वाटतय!

सर्व विजेत्यांचे तसेच स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन .......

रोहन प्रकाशन - या प्रकारची एक वेगळीच लेखनस्पर्धा ठेवल्याबद्दल विशेष आभार .....

परीक्षकांचे मनोगत फार मुद्देसूद आणि विचार करण्यासारखे आहे. >>>> +१०...

सर्व विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन .. अतिशय व्यापक परिघ असलेल्या अशा या स्पर्धेसाठी अपेक्षित कष्ट घेऊन त्यांनी स्पर्धा यशस्वी केली व आम्हालाही वाचनानंद दिला म्हणून खूप आभारही त्यांचे व आयोजकांचे .

मायबोली आणि रोहन प्रकाशनाचे अशी आगळी-वेगळी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल विशेष आभार

इतर सर्व विजेत्यांचेही मनापासून अभिनंदन...

सर्व अभिनंदनकर्त्यांना मनापासून अनेकानेक धन्यवाद.

Pages