जगामध्येच मी विरघळून गेलो...

Submitted by अ. अ. जोशी on 21 November, 2013 - 11:03

जगाला वाटले ते करून गेलो
जगामध्येच मी विरघळून गेलो

तसे नव्हते मनी पण स्वभाव आहे
जगाशी भांडलो, मग जुळून गेलो

जगाला जिंकले एवढ्याचसाठी
जगासाठीच शेवट हरून गेलो

कुठेही माज ना राखला कधी मी
सहज साऱ्या जगाला मिळून गेलो

सरळ जाणे जिथे त्रास देत होते
कशाला वाद घालू? वळून गेलो

स्वत:चा काढला(मांडला) मी लिलाव होता
कुणाचा ना कुणाचा बनून गेलो

जिथे मज वाटले की जगां मिळावे
तिथे नकळत कुणाच्या पळून गेलो

करा थट्टा कुणीही खुशाल माझी
अरे, मी त्याचसाठी जगून गेलो

नसे आलो तुझी मिळविण्यास टाळी
तुला मी फक्त थोडे थटून गेलो

सुखाशी देह केवळ जुळून आला
मनाने मात्र मी विस्कटून गेलो

'कुणाची बंधने मानणार नाही'
स्वत:च्या बंधनातच म्हणून गेलो

चुका करण्यात सारी हयात गेली
जसा आलो तसा मी चुकून गेलो

जशी आली जवळ सानथोर नाती
अता ती वेळ आली कळून गेलो

तुझा नव्हतोच जीवा; उधार होतो
जशी आज्ञा मिळाली, उडून गेलो

नऊ द्वारे सदा मोकळीच होती
तरी आत्ताच का मी इथून गेलो

कुठे आला न अश्रू, न बांध फुटला
बघा, मी आसवेही पुसून गेलो

तसा मी एकटा, फाटकीच वस्त्रें
पहा, मिळताच खांदा सजून गेलो

धुराने व्यापली बघ धरा गझलच्या
चितेच्या आत जेंव्हा जळून गेलो

जगाने पाहिले थेंब पापण्यांवर
'अजय'ला वाटले की हसून गेलो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुखाशी देह केवळ जुळून आला
मनाने मात्र मी विस्कटून गेलो

जशी आली जवळ सानथोर नाती
अता ती वेळ आली कळून गेलो

व्वा.

विजयशी सहमत.

सुखाशी देह केवळ जुळून आला
मनाने मात्र मी विस्कटून गेलो

वा आवडला हा शेर ! खासच !

सर...खूप छान आहे गझल.. खूप आवडली...

Happy

<<चुका करण्यात सारी हयात गेली
जसा आलो तसा मी चुकून गेलो

सरळ जाणे जिथे त्रास देत होते
कशाला वाद घालू? वळून गेलो

सुखाशी देह केवळ जुळून आला
मनाने मात्र मी विस्कटून गेलो>>

हे खूप आवडले