स्वयंपाकघरातील फुलं

Submitted by मामी on 20 November, 2013 - 23:12

मध्यंतरी दार्जिंलिंगच्या एका टी- इस्टेट वर सॅलड खाल्लं त्यात नॅस्टरशियम (Nasturtium) या झाडाची पानं आणि फुलं देखिल होती. आजूबाजूला बागेतच उगवलेली ती सुंदर रंगित फुलं अशी सॅलडमध्ये सजून धजून समोर आली आणि मी त्या कल्पनेच्या प्रेमातच पडले.

आता सध्या बागकाम करायला घेतली तर लगेच जाऊन त्याच्या बिया आणल्या आहेत. दिसायलाही सुरेख आणि सॅलडलाही उपयोगी. भारीच उत्सुक आहे आता की केव्हा एकदा घरी ती फुलं फुलताहेत आणि मी ती सॅलडमध्ये वापरतेय ......

त्यावरून मनात विचार आला की आपण फारच कमी फुलं खातो. आजूबाजूला इतकी प्रचंड प्रमाणात विविध प्रकारची फुलं असताना आपल्या स्वयंपाकात मात्र त्यांचा वापर अगदी मर्यादित आहे. असं का?

गुलाबाच्या पाकळ्या, शेवग्याची आणि कुड्याची फुलं, केळफूल आणि भोपळ्याची फुलं ... मला तरी इतकीच माहित आहेत / आठवताहेत.

केशराच्या फुलांच्या मधल्या काड्या वापरल्या जातात. शिवाय गुलाब, केवडा अशा फुलांच्या पासून बनवलेले गुलाबजल, केवडाजल स्वयंपाकात वापरले जाते. गुलकंद तर सगळ्यांना माहित आहेच.

माझ्या या वरच्या यादीत आता नॅस्टरशियमच्या फुलांची भर पडली. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये झुकिनीच्या फुलं आतमध्ये काही स्टफिंग भरून ग्रिल करून वापरताना दिसतात. शिवाय इतरही अनेक फुलं सजवण्यासाठी आणि मग अर्थात खाण्यासाठी वापरताना दिसतात. मी घरी आता भोपळ्याचा वेलही लावलाय केवळ त्याची फुलं वापरण्याकरता. Happy

याव्यतिरिक्त अजून काही फुलं आपल्याकडे अथवा इतर देशांत वापरली जात असल्यास इथे कृपया नमुद करा. याच धाग्यावर त्यांच्या पाककृतीही शेअर केल्या तरी चालतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ikade kahi kahi padarthat prajktachi fule waprtat. prajktachya fulanchi bhaj, fule ghalun pulaw vagaire.

दगडफुलाचे नाव फूल असले तरी तो मसाल्याचा पदार्थ आहे रिया.
गुलकंद, गुलाबजल वगैरे कधी खाल्ले नाहीस का? केवडा जल? केळफुलाची भाजी, केळफुलाचे वडे, इत्यादि खाऊन बघ.

मला इथे आल्यावर केळफुलाची भाजी, केळीच्या गाभ्याची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला.

प्राची, प्राजक्तच्या फुलांची भाजी वगैरे रेसिपी देना. इन्टरेस्टींग वाटतंय.

मामी, मस्त धागा!!!!!

धन्यवाद लोक्स.

प्राची इकडे म्हणजे कुठे? प्राजक्ताची फुलं कशी वापरतात .... जरा सविस्तर लिही ना प्लीज. खरंच इंटरेस्टिंग वाटतंय. Happy

इकडे म्हणजे आसामात.
मध्यंतरी आसामी भाज्यांबद्दल माहिती शोधताना मला प्राजक्ताच्या फुलाच्या पाकृ मिळाल्या होत्या.
आता परत शोधून लिंक्स देते इकडे. मी कधी बनवली/खाल्ली नाहीये.

मग गावठी गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या चहात उकळवुन तो चहा पिऊन पहा.:खोखो:

आम्ही पीत होतो, कारण घरी गुलाबाचा सुकाळ्.:स्मित:

गुलमोहर पाकळ्या, बडिशेपेचे तुरे,तुळशीची इवली फुले खाल्ली आहेत लहानपणी...

नागकेशर, केशर,दगडफुल हे मसाल्याचे घटक...

अम्बाडीची फुलं (करकेरा),त्त्यांचं सरबत..(मायबोलीकर दिनेश यंन्च्या मुळे ही माहिती मिळाली होती) ... Happy

गुलकंद, कमलकाकडी भाजी, केळ्फुल भाजी..

काही मुली झेंडूची फुले पण कच्ची खात असत...

वा वा प्राचीताईंनी लगेच मनावर घेतलंय. मस्त दिसताहेत. तू करून आता मायबोलीवर टाक हे! Happy

गीता छान लिस्ट. पण त्यात सगळीच फुलं नाहीयेत. उदा. बडिशेपेचे तुरे या बिया आहेत. कमलकाकडी कमळाचे देठ आहेत, दगडफूल मॉस आहे.

गुलमोहोराची फक्त ठिपकेदार पाकळी खातात बहुतेक. झेंडुच्या फुलांच्या पाकळ्या काढून आतला पांढरा भाग खायचो आम्ही.

पाळी नियमित आणि सुसह्य होण्यासाठी मुलींना जास्वंदीच्या पाकळ्या तुपात परतून चुरून पिठीसाखर घालून खायला देतात. प्रमाण माहिती नाही.

मस्त धागा. लिंका बघते.
दगडफूल हे शेवाळ नाही. लायकेन आहे. लायकेन म्हणजे नॉर्मली अल्गल (शेवाळी, मॉस यात येतात) आणि फंगल (बुरशी ते मश्रूम्स) कल्चर एकत्र असतं.
लायकेन्स हे पोल्यूशन इंडिकेटर्स असतात. म्हणजे जिथे पोल्यूशन नाही तिथेच दिसतात.
दगडांवर किंवा झाडाच्या खोडांवर असू शकतात.
( टिवायबीएस्सीला केलेला अभ्यास कामी आला! )

त्यातली एक स्पेसी आपण दगडफूल म्हणून वापरतो.

आम्ही घाणेरीच्या फुलांचे देठ चोखायचो. एक कणभर गोड चव मिळायची तेवढ्यासाठी.
मोगर्‍याची वाळवलेली फुले हिरव्या चहात हा माझा आवडता द्रव पदार्थ आहे. Happy

बाकी मग केळफूल, गुलाब, केशर वगळता अजून खाऊची फुले माहित नाहीत फारशी

मोगर्‍याची वाळवलेली फुले हिरव्या चहात >>> येस्स! Happy

आम्ही घाणेरीच्या फुलांचे देठ चोखायचो. हो हो. तसंच ती एक्झोराची केशरी लांब दांड्याची फुलं देखिल चोखून मध प्यायचो. शिवाय पिवळी बिट्टीची फुलं देखिल अशीच चोखता येतात.

निवडुंगाची बोंडं (म्हणजे कळ्या का?) देखिल स्वयंपाकात वापरतात असं कधीतरी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. प्रकाश टाका प्लीज.

Pages