लेकुरवाळे वृक्ष

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

इंदिरा संत यांची एक कविता आम्हाला अभ्यासाला होती. त्यात त्यांनी फणसच्या झाडाला, लेकुरवाळा
असा शब्द वापरला आहे. मे महिन्यात फणसाच्या एखाद्या झाडाकडे बघितल्यास, हि उपमा अगदी
पटतेच.
निवृत्ती हा खांद्यावरी, चोखामेळा बरोबरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, असे ध्यान असते, त्या झाडाचे.
फळे म्हणजे आपल्या डोक्यात एक साधारण कल्पना असते. फ़ांद्यांच्या टोकाला आधी मस्त मोहोर
वा फुले येणार. मग आधी छोटी फ़ळ, दिसामाजी ती वाढत जाणार. मग हळूच एक दिवशी, पिकून
पिवळी वा लाल वगैरे होणार. फणसाच्या बाबतीत, या पायर्‍या कधी लक्षातच येत नाहीत.
झाडांची फुले म्हणजे वेगळे काही नसते, तर पानांनी घेतलेले वेगळे रुप असते.
पानांच्या या वैषिष्ठपूर्ण रचनेचा आत, झाडाचे बिजनिर्मिती करणारे अवयव असतात.
बोगनवेलीकडे बघा, नक्कीच हे पटेल. त्यामुळे फुलांच्या सोबतीला पाने असणार, हे जवळजवळ बहुतेक झाडांच्या बाबतीत खरे आहे.

पण काही झाडे मात्र हा नियम झुगारुन देतात. अश्याच काही झाडांची आणि त्यांच्या फळांची ओळख करुन घेऊ या.

फणसाला फुल असे नसतेच. अंगठ्याएवढ्या आकाराचा, छोटासा फणसच, एका हिरव्या आवरणात
येतो. खरे तर तेच फुल. हे छोटे फणस, झाडभर लागडलेले असतात, पण ते सहसा नजरेत येत
नाहीत. त्यातले बहुतेक झाडाखाली गळून पडतात. त्यांना कोके म्हणतात, आणि लहान मुलांना
खेळण्यासाठी ते उपयोगी पडतात. (त्याशिवाय त्यांचा काहीच उपयोग नसतो. पण बिहार मधे त्याची कोशिंबीर करुन खातात, असे माझ्या भाभीने सांगितले, जास्त खाल्ली तर घसा बसतो असेही सांगितले.)
पण जे छोटे फणस, झाडाच्या मुख्य खोडाला लागतात, ते मात्र तग धरतात. (त्यांचे परागीभवन
झालेले असते. फणसावरचे काटे, हे त्या फुलांचे अवशेष) एकदा का त्यांनी तग धरला, म्हणजे त्यांची वाढ होऊ लागते.
फणसाच्या झाडाचा विस्तार बहुदा उभाच असतो. म्हणजे एकच मुख्य खोड असते. आडव्या फ़ांद्या अगदी तुरळक दिसतात. म्हणजे आडवा विस्तार असतच नाही असे नाही, पण त्या फांद्या बारीक असतात.
पण जिथे आडव्या फांद्या मजबूत असतात, तिथे आडव्या फांद्यांनाही फणस लगडलेले दिसतात.
माझ्या बघण्यात अशी काही झाडे आहेत.

काहि काहि झाडांना तर अगदी जमिनीपासूनच फणस लागायला सुरवात होते. (काहि झाडांना
जमिनीच्या खाली पण फणस लागतात, असे मी ऐकलेय. पण ते कोकणी फकाणे असावेत, असे मला वाटायचे. पण त्याला एका मित्राने दुजोरा दिला. )
मुख्य खोडाला मात्र जागोजाग फणस लगडलेले दिसतात. कधी कधी एखाद्या लांब देठाला पण
फणस लागलेले दिसतात. हे फणस अगदी हाताच्या पंज्याएवढे झाले कि त्याचा खाण्यासाठी
उपयोग होतो. अगदी छोट्या फणसाची भाजी, म्हणजे कोकणी खासियतच (हि भाजी अगदी विदर्भ, बिहार, बंगाल, दिल्ली सगळीकडेच आवडीने खातात.)
अगदी छोटी कुयरी (छोटा फणस) असली तर त्यात गरे नसतातच. पण तिची भाजी मात्र
रुचकर होते. याच दिवसात कोकणात ओले काजू यायला सुरवात होते. आणि या भाजीत ते
अलगद जाऊन बसतात. या कुयर्‍या अगदी हातभर लांब झाल्या तरी त्याची भाजी करता
येते. यात आता छोटे छोटे गरे तयार झालेले असतात.

असे छोटे छोटे फणस एकतर आपसुक गळून पडतात किंवा मुद्दाम काढतात. झाडाला एकेजागी
चार ते सहा फणस लागलेले असतात. त्यातले काही काढले, तरच बाकिचे नीट वाढू शकतात.
साधारण एप्रिल महिन्यात फणसातील गरे पूर्ण वाढलेले असतात. अशा फणसातील गरे काढून
लाल मिरची आणि खोबरे घालून, त्याची मस्त भाजी होते. कोकणात अनेक गरिब लोकांचा,
हि भाजी, करवंदाची चटणी आणि चतकोर भाकरी, असा आहार असतो.
हे गरे पांढरेच असतात. त्यानंतर ते किंचीत पिवळे होतात. अशा गर्‍यांची तळून कापे करतात.
तूरीच्या डाळीत घालून तळ पण केला जातो.
मग मात्र जसा मे महिन्यातील उन्हाळा चढू लागतो, तसे फणस पिकायला लागतात. त्याचा’घमघमाट
सगळीकडे पसरतो. पुर्वी मुंबईतील चाकरमानी, हे फणस घेऊन जात असत. त्यांचा दरवळ
एस्टीभर पसरत असे.

जरा घट्ट गर्‍यांचा कापा आणि मऊसर गर्‍यांचा तो रसाळ किंवा बरका, अशा आपल्याकडच्या दोन
जाती. काप्या फणसाच्या चिप्स वगैरे करतात. रसाळ फणसापासून साटं (फणसपोळी) करायची
एकच धांदल असते. आता त्याचा रस मिक्सरवर काढतात, पण पुर्वी किसणीवर त्याचा रस काढत
असत. असा रस मग स्टीलच्या ताटात ओतून कौलावर वाळवत असत. याच रसापासून सांदणे
करतात.

फणसातून गरे काढणे हे पण कौशल्याचे काम आहे. फणसाची मधली पाव न कापता गरे वेगळे
करावे लागतात (त्या पावेत बराच चिक असतो.) गरे पण अखंड काढावे लागतात. हा चिक नंतर
नीट निघावा, म्हणून हाताला आणि सुरीला तेल लावावे लागते. त्यामानाने बरक्या फणसाचे गरे
पटकन निघतात. हे गरे खायलाही सोपे जातात, कारण ते अजिबात चावावे लागत नाहीत. काप्या फणसाचे गरे मात्र चावूनच खावे लागतात. काप्या फणसाचे गरे खाल्ल्यानंतर पाणी प्यायचे नसते, कारण त्याने पोटात दुखते असा समज आहे. बरक्या फणसाचे गरे खाल्ल्यानंतर मात्र पाणी प्यायले
तरी चालते.

हे गरे काढल्यानंतर जे उरते त्याला म्हणतात चारकांड. त्याचा कचरा खुपच होतो. गायी म्हशी
ते आवडीने खातात, पण मूळात कोकणात त्यांचीच वानवा आहे ना ! या चारकांडाचा एक
वेगळा उपयोग, मला आमच्या कुर्गी शेजारणीने सांगितला होता. हि चारकांडे घराच्या कोपर्‍यात
ठेवली तर त्यावर माश्या बसतात आणि त्या तिथेच अडकून बसतात. अशा रितीने फ्लायट्रॅप म्हणुन
ती वापरता येतात.

गरे खाल्ल्यानंतर आतल्या बिया म्हणजेच आठल्या, अगदी आवडीने खाल्ल्या जातात. जास्त टिकण्या
साठी त्यांना राख लावून ठेवतात. या भाजून वा उकडून खाल्ल्या जातात. डाळीच्या आमटीत, गवार
काळ्या वाटाण्याच्या भाजीत, मायाळूच्या आमटीत त्या रुचकर लागतात. नुसत्या आठळ्यांची पण
भाजी करतात.
पण एकदा का पावसाला सुरवात झाली, कि मात्र फणसांकडे दुर्ल़क्ष होते. त्यांचा गोडवा पण कमी
होतो. मग ते झाडावरुन काढायचे पण कष्ट घेतले जात नाहीत. आणि कोकणातल्या कांडेचोरांचे
फावते. (हा एक प्राणी असतो. तो झाडावरचे फणस सोलुन खाऊ शकतो.) वटपोर्णिमेच्या वाणात
मात्र फणसाचे गरे लागतात, आणि त्यावेळी परत एकदा फणसाला किंमत येते. आपल्याकडे
मर्यादित काळात मिळणारा फणस, दक्षिणेकडील राज्यात मात्र, जवळजवळ वर्षभर मिळतो.

गोव्यामधे तर फणसाचे आणखी काही खास प्रकार केले जातात. फणसाच्या गरांच्या रसात तांदळाचे पिठ मिसळून भाकरी केली जाते. शिवाय अनसाफ़णसाची भाजी हा एक अत्यंत रुचकर प्रकार केला
जातो. (यात अननसाचे तूकडे, फणसाचे गरे आणि रसाळ आंबे एकत्र करुन त्याला नारळाचे वाटण
लावून रसभाजी करतात.)

फणसाची पानेहि तशी ताठ असतात. तांदळाच्या सालपापड्या करण्यासाठी ती वापरता येतात. या चार
पानांचा एक द्रोण बांधून त्यात इडली करता येते. या पानांना, पिंपळाच्या पानाप्रमाणेच जाळीदेखील
पडते.
फणसाच्या लाकडाचा रंग पिवळसर असतो. त्याचा उपयोग वाद्ये बनवण्यासाठी होतो. काहिवेळा
फर्निचरमधे पण त्याचा वापर होतो.

फणसाचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus . हे मलबेरी म्हणजेच तुतीचे कूळ आहे. (आता
म्हणाल, कुठे तुतीची इवलीशी फळे आणि कुठे अगडबंब फणस. पण निसर्गात असे अडनिडे नातेसंबंध
असतातच.) फणसाचा उगम दक्षिण आशिया मानतात. बांगला देशाचे ते राष्ट्रिय़ फळ आहे.
फणस हा पोटभरीचा जिन्नस आहे. फणसाचा चीक, तेलात खलून, भाजलेल्या त्वचेवर लावत असत.
पण सध्या असा उपयोग होताना दिसत नाही.

मी वर चारकांडाचा उल्लेख केलाय खरा, पण अगदी कमी चारकांड असणारी एक जात Artocarpus integer भारताच्या दक्षिण भागात लागवडीखाली आहे. केरळमधे या फळाला चक्का असे म्हणतात. यातील गरेही आकाराने मोठे असतात. मी माझ्या केरळी मित्रमैत्रिणींकडून या फळाबद्दल बरेच ऐकले आहे, पण मुंबईत तरी ते दिसत नाही.
फणसाबरोबर आठवण येते ति नीरफ़णसाची Artocarpus altilis वा विलायती फणसाची. यालाच ब्रेडफ्रूट पण म्हणतात. याचे काटे बोथट असतात. आणि फळ म्हणून खाण्यापेक्षा तो भाजी म्हणून जास्त खाल्ला जातो.
हे फ़ळ भाजून वा उकडूनही खाता येते. भाजल्यावर ते पावाप्रमाणे लागते, म्हणुन ते नाव. याचेही
झाड खुप मोठे असते. याची पाने ३० सेमी लांब व तेवढीच रुंद असतात. पण ही फळे मात्र
थेट खोडाला न लागता, फांद्याच्या टोकांना लागतात, म्हणून इथे जास्त सविस्तर लिहित नाही.
गोव्यामधे आणखी एका फळाला, काटेफणस असे नाव आहे. हे फळ सिताफळ आणि फणस
यांचे मिश्रण वाटते. पण तेही खोडाला न लागता, फांद्यांच्या टोकालाच लागते. गोव्याच्या बाजारातही
ते अभावानेच दिसते. त्याचे इंग्रजी नाव ग्रॅविओला. या फ़ळात चोथ्याचे प्रमाण, जास्त असल्याने,
त्याचा रस काढून पिणे, जास्त सोयीचे होते. असा रस आग्नेय आशियाई देशात, तसेच
पुर्व आणि पश्चिम आफ़्रिकन देशात, दक्षिण अमेरिकन देशांत, आवडीने पितात. या फळात
कॅन्सर विरोधी गुणधर्म आहेत, असे वाचण्यात आले होते.

फणसाबरोबर आणखी एका फळाचा उल्लेख करायला पाहिजे तो दुरियानचा. Durio zibethinus
तेही थेट खोडालाच लागते, पण भारतात याची लागवड बहुदा नाहीच. (पण फणसाप्रमाणे मुख्य खोडाला न लागता, आडव्या फांद्याना लागते ) सिंगापूर, थायलंड, जावा, सुमात्रा आदी देशांत त्याची लागवड होते, पण तिथेही हे दुरियान अतिशय बदनाम आहे.
याचे स्वरुप फणसारखेच असले तरी, आकार छोटा आणि गोल असतो.(क्वचित लंबगोल आकार पण दिसतो)
काटे फणसापेक्षा, जास्त मोठे आणि टोकदार असतात. या दुरियान मधे चार ते पाच उभे कप्पे असतात, आणि आत पिवळसर सोनेरी रंगाचे गरे असतात, खाण्याजोगा भाग, फणसापेक्षा जास्त असतो. या कप्प्यांचे पापुद्रे सोडले, तर आत चारकांडासारखे काहि नसते.
फणसापेक्षा हे जास्त गोड, आणि चवीला मधुर लागते. पण दुरियानला बदनाम करतो तो त्याचा
वास. अनेकजणांना हा वास सहनसुद्धा होत नाही.या वासामूळेच, सार्वजनिक वाहनांत, हे दुरियान
नेता येत नाही. (मी स्वत: हे फळ खाल्ले आहे. याचा वास फणसासारखाच असतो, आणि
त्याचा उगाचच बाऊ केला जातो असे मला वाटते.)

याचे झाडही उंच वाढते पण याच्या फांद्या विरळ असतात. माकडासारख्या प्राण्यांना हे फळ फार
आवडते, आणि त्याच्या वासाने ती, लांबून या झाडाकडे आकर्षित होतात.
दुरियानमधे मेदाचे प्रमाण जवळजवळ ५ टक्के असते. शिवाय त्यात साखरेचे प्रमाणही बर्‍यापैकी
असते. या वासाचा अडथळा सोडला, तर त्याची चव खरेच छान असते. (मानवाला वास आणि
चव वेगेवेगळे अनुभवता येत नाहीत.) या वासाची तीव्रता कमी असणार्‍या काही जाती,
थायलंडमधे विकसित केल्या गेल्या आहेत.

आवळा तसा सर्वांना माहीत आहेत. मोठा आवळा, म्हणजेच डोंगरी आवळा पण तसा खोडालाच लागल्यासारखा वाटतो, याचे कारण त्याचा दाट पर्णसंभार. पण खरे तर त्यामागे व्यवस्थित देठ असतो. संस्कृत मधे त्याला धात्री, म्हणजेच आई, असे नाव आहे. डॉ. शरदिनी डहाणुकर म्हणायच्या, कि जर पृथ्वी सोडून, दुसर्‍या ग्रहावर जायचे असेल, आणि एकच झाड सोबत न्यायची परवानगी असेल, तर त्या हे झाड निवडतील.

क जीवनसत्वाचा हा एक उत्तम स्त्रोत आहे, आणि यातील क जीवनसत्व, प्रक्रिया केल्यावरही टिकून राहते. च्यवनप्राश या औषधातला तो मुख्य घटक. त्रिफळा चूर्णातील पण तो एक घटक. पण मला इथे उल्लेख करायचा आहे तो, दुसर्‍या प्रकारच्या आवळ्याचा, म्हणजे रायाअवळ्याचा.
आपण या दोन्ही फळांना आवळे म्हणत असलो, तरी हे दोन अगदी वेगळे वृक्ष आहेत.
या रायआवळ्याचे झाड अत्यंत देखणे असते. पानांचा रंग अत्यंत नयनरम्य असा हिरवा असतो. आणि त्यांची ठेवणही अत्यंत मोहक. (डोहाळजेवणांपैकी आवळी भोजन बहुदा याच झाडाखाली करतात.)
या झाडाला फुलोरा येतो, तो थेट खोडालाच. तशी ही फुले अगदीच छोटी, आणि रंगानेही हिरवटच असतात. मग हळूहळू त्यांना अगदी छोटे हिरवे मणी लागतात. दिसामासाने वाढू लागतात.
मग त्याना जेड या खनिज दगडासारखा रंग येऊ लागतो. पुढे त्यात किंचीत पिवळी छटा येते.
झाडाचा बुंधा हलवला, कि झाडाखाली टपाटप हे आवळे पडतात. तिखट मीठ लावून खायला मस्त लागतात. या दोन्ही आवळ्यांच्या चवीत पण फरक आहे. डोंगरी आवळा, तूरट लागतो. पण तो खाल्ल्यावर पाणी प्यायले, तर पाणी गोड लागते. रायआवळ्याची चव मात्र आंबट असते. मिरची, खोबरे, जिरे घालून याची चटणी करतात. याचा मोरंबा वा जॅमही करतात.

या रायआवळ्याचे कूळ Averrhoa. याच कूळातील आणखी दोन झाडांची ओळख करुन घेऊ या.
थायलंड मधे असतानाचा, मी स्टार फ़्रुट, हे नाव पहिल्यांदा ऐकले. अगदी चांदणीच्या आकाराच्या
या फळाच्या चकत्या, तिथे तिखट, मीठ, साखर लावून, सुकवतात. त्याची चव बघितल्यावर मात्र
मला लगेच ओळख पटली. हे तर आपले कर्मक किंवा करमळ. Averrhoa Carambola
शाळेच्या बाहेर, पाच धारांचे, चमकदार हिरव्या पोपटी रंगाचे फळ विकायला असायचे. त्याला
तिखट मीठ लावून आम्ही खात असू. खरे तर ते फळ खुपच आंबट असते. पिकून पिवळे
झाले तरी, ते तसे गोड लागत नाही. आणि हे फळ खाणे, अनेकजणांना जमत नाही.
पण ज्यांना याची चव माहीत आहे, त्यांना नुसता वरचा फोटो बघूनच, तोंडाला पाणी सुटेल.
याची थायलंड मधे मिळणारी, जात मात्र बर्‍यापैकी गोड (आंबटगोड) असते. साखरेचे प्रमाण
४ % असते आणि क जीवनस्त्व, फॉस्फोरस, पोटॅशियम चे प्रमाणही बरे असते.
कच्चे खाल्ल्यास, यातून बर्‍यापैकी अँटीऑस्किडंट्स मिळतात, पण मूतखड्याचा त्रास
असलेल्यानी, हे जरा जपूनच खावे. या फळामूळे काही औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात,
त्यामुळे, जर काही वैद्यकिय उपचार चालू असतील, तर हे फळ शक्यतो खाऊ नये.
याचे झाड, साधारण आवळ्याच्या झाडासारखेच दिसते. पण पाने जरा मोठी आणि विरळ
असतात. हे फळही थेट खोडालाच लागते. उभ्या खोडाबरोबरच, आडव्या फांद्यांवरही हि फळे
दिसतात. याचे फुल, छोटेसे आणि जांभळट गुलाबी रंगाचे असते.
याचे मूळ स्थान फिलीपीन्स अथवा श्रीलंका असले तरी, अनेक आशियाई देश, पूर्व आफ़्रिका, दक्षिण अमेरिका इथे, याची लागवड केलेली आहे. (मुंबईतदेखील याची झाडे आहेत. एक झाड रुईया सिग्नलजवळच्या एका इमारतीच्या आवारात आहे.)

कर्मक शक्यतो कच्चेच खाल्ले जाते. पण फळांचे बार्बेक्यू वगैरे करताना, त्याचा वापर करता येतो.
याला मीठ लावल्यावर लगेच पाणी सुटते.

करमळाच्या जोडीने आठवतात त्या बिमल्या किंवा बिलिंबी. Averrhoa bilimbi
याचे झाड ही आवळ्यासारखेच दिसते, पण पाने जास्त मुलायम असतात. याचा उगम इंडोनेशिया
मधे झाला असला तरी सर्व आशियाई देशात, आता ते लागवडीखाली आहे.
मुंबईतही कालिना, बोरिवली मधे मी याची झाडे बघितली आहेत. या बिमल्याही थेट खोडांनाच
लागतात. अगदी पुर्ण खोड या बिमल्यांनी भरुन जाते. आकाराने साधारण तोंडल्यासारखे
दिसणारे हे फ़ळ, रंगाने चमकदार हिरव्या रंगाचे असते.
चवीला हे खुपच आंबट असते, पण त्याचबरोबर तोंडाला चवही आणते. यातील घटकद्रव्ये
जवळजवळ करमळांसारखीच आहेत. गोव्यामधे वरील दोन्ही झाडे, सहसा घराजवळ असतातच.
तिथे या फळांचा उपयोग, तांब्या पितळेची भांडि लख्ख घासण्यासाठी पण करतात.
बिमलीची फुले पण खुप सुंदर दिसतात. गडद किरमीजी रंगाची हि फुले, झाडाला गुच्छाने लागतात.
हि फुलेही चवीला आंबट लागतात, आणि त्याचा मोरंबा करतात.
नुसते तिखट मीठ लावून बिमल्या खातातच, पण जेवणातही त्याचा उपयोग करतात. माश्याच्या
आमटीत ती वापरतात. नारळाच्या दूधात बिमल्या घालून, मस्त कढी करता येते. यापासून जॅम,
मोरंबा पण करतात.
याचे लोणचेही, गोवा कारवार भागात करतात. हे लोणचे करताना एक खास काळजी घ्यावी लागते,
ती म्हणजे बाकिच्या फळांची लोणची करताना, जसे फोडींना मीठ लावतात, तसे बिमल्यांच्या
बाबतीत करता येत नाही. मीठा सकट बाकी सर्व मसाला एकत्र करुन, त्यात बिमल्या कापून
टाकाव्या लागतात. चवीला मात्र हे लोणचे, खासच लागते.
या कूळातले नाही, पण तरीही खोडाला लागणार्‍या आणखी एका फळाची ओळख करु घेऊ या.
चॉकलेटचे नाव घेतले कि आपल्याला, स्वित्झर्लंड, फ्रान्स यासारखे युरपमधलेच देश आठवतात. पण या चॉकलेटसाठी लागणारा कच्चा माल मात्र, त्या देशात पिकत नाही.

हा कोको येतो, तो पश्चिम आफ़्रिकेतील देश, खास करुन, आयव्हरी कोष्ट, नायजेरिया, घाना आदी देशांतून.
या कोकोचा उगम मेक्सिको किंवा अमेझॉनचे खोरे असावे, पण सध्या तरी पश्चिम आफ़्रिकेतील देशांचे
कोको उत्पादनात वर्चस्व आहे.
कोकोचे झाड साधारण मध्यम उंचीचे, तीन ते पाच मीटर्स वाढणारे असते. याची पाने साधी, लांब आणि
दाट असतात. या झाडाला भरपुर पाऊस, उष्ण हवामान आणि सावली लागते. (अर्थातच हे हवामान युरपमधे नाही.)

या झाडाची शान वाढते ती त्याला फुले आल्यानंतर, हि फुले थेट खोडालाच येतात. कळ्या अगदी छोट्या.
साधारण तगरीच्या कळीच्या आकाराच्या. त्या इतक्या छोट्या असतात, कि खोडांवर त्यांचे अस्तित्व आधी
लक्षातच येत नाही. फुलांचा आकार जेमतेम एक सेमी असतो. रंग पांढरट गुलाबी. पण या फुलांची रचना
खुपच सौंदर्यपूर्ण असते.

या फुलांचे परागीकरण एका खास माशीतर्फ़े होते. मग याला फळ धरते. हे फळ साधारण पपईच्या आकाराचे असते. रंगाने ते पिवळे, लाल, तपकिरी वा पोपटी असू शकते. (आपल्याकडे दक्षिणेंकडील राज्यात याची लागवड केली जाते. गोव्यातही हि झाडे आहे. मुंबईला राणीच्या बागेत, दोन झाडे आहेत. त्यांना भरपूर फुले लागतात. पण फळे मात्र मोठी झालेली दिसत नाहीत.)

नायजेरियात हे फळ क्वचित रस्त्यावर विकायला दिसते. मी ते तिथे खाऊनही बघितले आहे. या फळांपासून
चॉकलेट करतात, हे सांगून खरे वाटू नये. इतके ते स्वादाला आणि रंगाला वेगळे असते.
याचे आवरण बर्‍यापैकी जाड पण मऊ असते. लाकडाच्या सहाय्याने सहज तोडता येते. (ते लाकडानेच
तोडायचे असते.) आता गुलबट पांढर्‍या आवरणात मोठ्या बिया असतात. या बिया खाता येतात.
त्यांना तशी काहीच चव लागत नाही. त्यातील जवळजवळ ५० टक्के मेदामुळे, त्या तूपकट लागतात.
पण फार नाही खाऊ शकत आपण. (नायजेरियातल्याच इबादान गावच्या एका झू मधल्या चिपांझीला
आम्ही ते फळ दिले होते, तर त्याने ते आमच्यावरच फेकले होते.)

या बियांपासून कोको करण्यासाठी या बिया, एका बांबूच्या टोपलीत, केळीची पाने पसरुन, त्यावर
ठेवतात.वरुनही केळीची पाने झाकतात. साधारण सात दिवस असे झाकून ठेवले, कि बियांना तो रंग आणि स्वाद येतो. या दरम्यान बियांना मोड येतात, पण असे झाकून ठेवल्याने, जी उष्णता निर्माण होते, त्यात ते कोंब नष्ट होतात. उत्तम स्वाद येण्यासाठी, बियांना मोड येणे आवश्यक आहे.

मग या बिया उन्हात सुकवून वा इतर मार्गाने वाळवल्या जातात. मग त्याची टरफले काढतात.
अजूनही हि प्रक्रिया पूर्ण झालेली नसते. या गरातले मेद, म्हणजेच कोको बटर, बर्‍याच प्रमाणात
काढून टाकावे लागते. (गरज भासल्यास चॉकलेट करताना, ते परत मिसळता येते.)
नंतर जी पावडर उरते, ती कोको पावडर. ती अत्यंत बारीक केली जाते. तरीपण त्यात काही
मेद राहतेच. त्यामूळे नूसता कोको, दूधात सहज विरघळत नाही. या कोकोवर परत
काही प्रक्रिया करुन, त्यात बाकीचे घटक मिसळून, चॉकलेट्स तयार करतात. या कोकोपासून
लिकरही करतात. कोको बटर, सौंदर्य प्रसाधनात वापरतात.

चॉकलेटचे नाव काढले तर आपल्याला काहीतरी गोड गोड वाटते (प्रेमात पडलेली माणसे, जास्त
चॉकलेट खातात असे म्हणतात. किंवा जास्त चॉकलेट खाल्ल्यानेच, माणसे प्रेमात पडत असावीत,
असेही असेल.) पण मी कडवट लागणारी फ्रेंच चॉकलेट्स खाल्ली आहेत. मेक्सिकोमधे तर चक्क मिरची घालून पण कोकोचे पदार्थ करतात.

आणखी एका झाडाचा उल्लेख करावाच लागेल. ते म्हणजे उंबर. श्री दत्तगुरुंशी हे झाड निगडीत आहे.
हे उंबर ज्या फ़ायकस कुळात येते, त्यातच वड, पिंपळ, रबर आदी झाडे येतात. हे सगळे कुळ
अस्सल भारतीय आहे. यातल्या बाकिच्या झाडांची फळे छोटी असतात, आणि आपण सहसा ती
खात नाही, पण उंबर मात्र अवश्य खावे. इतकेच नव्हे तर उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी
उंबर खावे, असे म्हणतात.

उंबराची फळे अंजीराइतकी नसली तरी बर्‍यापैकी गोड असतात. पण उंबर खाणे, अनेकांना
आवडत नाही, कारण त्यात हमखास किडे असतात. सुधीर फडके यांनी, गायलेल्या
जग हे बंदी:शाला, या गाण्यात,
उंबरामधले किडे मकोडे, उंबरी करती लिला, अशा ओळी आहेत. ते सत्य आहेच, पण हे किडे
खरेतर उंबराच्या झाडाला मदतच करतात. कसे ते बघुया.

उंबराचे फूल, हि पण एक कविकल्पना. आशा भोसले यांनी गायलेल्या एका गाण्यात, माझेच मी
म्हणू कि, हे भाग्य या घराचे, दिसले मला कधीचे हे फूल उंबराचे, अश्या ओळी आहेत. अर्थातच
उंबराचे फूल बघणे शक्य नाही.
गावातल्या पारावर अनेक गप्पा ऐकायला मिळतील. उंबराचे फूल म्हणे रात्रीच उमलते, ते फक्त
भाग्यवान माणसालाच दिसते. आणि म्हणे ते बैलगाडीच्या चाकाएवढे असते, अर्थात याही सर्व
गावगप्पाच.
उंबराच्या झाडाला एकदम थेट छोटी छोटी फळेच लागलेली दिसतात. हि फळेही थेट खोडालाच
येतात. हि फळे म्हणजे फुलांचे एक रुप आहे. या फळांना देठाच्या समोर एक छिद्र असते,
त्यातून आत जाऊन एका जातीच्या किटकांची मादि अंडी घालते. त्या फळाच्या आतच
त्या किटकांचे मिलन होते. आणि नवीन किटक त्या छिद्रातूनच बाहेर पडतात. या छिद्राजवळच
नरफुले असतात. आणि या किटकांद्वारे या फुलांचे परागीभवन होते. (हि प्रक्रिया
इथे लिहिण्यासाठी खुपच क्लिष्ट आहे. बीबीसी ने याचे चित्रीकरण केलेले आहे.) ही परस्पर
सहाकार्याची प्रथा, कित्येक कोटी वर्षे सातत्याने सुरु आहे.

उंबर आणखी एका प्रकारे किटकांना आधार देतो. या झाडाच्या पानांवर कायम लालसर रंगांच्या
गाठी दिसतात. कधी कधी तर पूर्ण पान, या गाठींनी भरलेले दिसते. या गाठींच्या आत एक प्रकारचा
किटक पोसतो, आणि ती गाठ फ़ोडून बाहेर येतो.(ही गाठ हळूच उघडली, तर आत जिवंत किटक दिसतो.)

उंबराची पिकलेली फळे म्हणजे अनेक पक्ष्यांचा आवडता खाऊ असतो. कावळे आणि धनेश (हॉर्नबील)
हे महत्वाचे. कारण त्यांच्या पोटाची उब मिळाल्याशिवाय, या बिया रुजत नाहीत. (हे या कुळातील
सर्वच झाडांना लागू पडते.)

उंबराचे झाड, जमिनीलगतच्या पाण्याच्या प्रवाहाजवळ चांगले पोसते. त्यामुळे उंबराच्या जवळ
विहिर खोदली, तर तिला हमखास पाणी लागते. उंबराची फांदी तोडली तरी त्यातून पाणी निघत
राहते. हे उंबराचे पाणी, उष्णतेच्या विकारावर गुणकारी आहे. उंबराचा चीकही औषधी असतो.
उंबराचे लाकुड मजबूत असते. आणि घराच्या दारात या लाकडाची पट्टी ठेवायची प्रथा आहे.
म्हणून तर त्याला, उंबरठा म्हणायचे.
उंबराच्या कच्च्या फळांची भाजी करतात, तसेच उंबराची पाने, गुरांसाठी चारा म्हणून उपयोगी
पडतात.
आदीवासी लोकात, लेकिसाठी सासर बघताना, त्या घराच्या आजूबाजूला उंबराचे झाड आहे ना,
याची खात्री करुन घेतात. त्यामागचा विचार अगदी साधा. जर लेकीला सासूने उपाशी ठेवले,
घराबाहेर काढले, तर ती निदान उंबराची फळे खाऊन गुजराण करु शकेल. उंबराची फळे
खाल्ल्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही. म्हणून मी नेहमी, ट्रेकर्सना, उंबराचे
झाड दिसल्यास, त्याची फळे खायचा सल्ला देतो.
तर हि काही लेकुरवाळ्या झाडांची ओळख. या लेखासोबत बरेच फोटो देता येण्यासारखे आहेत, पण एक दोन टाकून मोह आवरतो.

हि आहेत बिमलीची फूले
bimaleechee fule.jpg

आणि हे कोकोचे फूल

cocoche phool.jpg

खास आग्रहास्तव आणखी फोटो टाकतोय.

हे आहेत करमक (स्पाइस गार्डन, फोंडा, गोवा )

Karmak2.jpg

या आहेत बिमल्या (पर्वरी, गोवा, मराठी भवनच्या मागे )

bimali1.jpg

हे आहे उंबराने लगडलेले झाड (तामडी सुर्ला, गोवा)

oombar.jpg

विषय: 
प्रकार: 

तर हि काही लेकुरवाळ्या झाडांची ओळख. या लेखासोबत बरेच फोटो देता येण्यासारखे आहेत, पण एक दोन टाकून मोह आवरतो.>>> दा, मोह आवरू नका Happy

वा दिनेशदा. एक छान, वेगळ्याच गटाची माहिती.

कोकणात दापोलीला लहानपणी आजी-आजोबांबरोबर गेले असताना, हाताने फणस काढलेत. बरका फणस जर छान पिकला असेल तर कापायला सुरीची गरजच पडत नाही. दोन पायात फणस असा पकडायचा की देठ आपल्यापासून दूर असेल. मग तो देठ पकडून आपल्या दिशेनी खेचायचा की फणस अलगद उलगडत जातो. मग काय? अजिबात वेळ न दवडता पोटभर खायचा.

आणि हो, योगेश२४ नी म्हटल्याप्रमाणे, फोटो टाका बुवा भरपूर!

खुपच छान..नवख्या झाडांची नव-नवीन माहिती कळली ..फोटो वरुन तर वास्तविकता कळतेय..त्यामुळे फोटो पाहिजेच....कमरख हे बारमासी फळ आहे..याची लसुण घालुन चटणी पंजाबी-लोक करतात..भोपाळ ला हे फळ भाजीवाल्यांकडे सर्रास मिळ्ते...बिमली ची फुले किती सुंदर दिसतातेत...दुरियान,बिमली अन कोको बद्दल नवीन माहिती मिळाली...

धन्यवाद दिनेशदा,खूपच छान माहिती.
मामींनी बरका फणस सुरी न वापरता कसा काढावा या बद्दल छान सांगीतलेय... पण मला हे कधीच जमले नाही. Sad
असो... फोटो टाकण्याचा मोह आवरु नका दिनेशदा. Happy

निवृत्ती हा खांद्यावरी, चोखामेळा बरोबरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, असे ध्यान असते, त्या झाडाचे
दिनेशदा !
वाह ! काय सुरुवात आहे, हे एक वाक्य वाचुनच मी प्रतिक्रिया देत आहे !
लई बेस लिहिता बघा तुम्ही !
Happy

दिनेशदा,
उंबर्‍याची ,बेलाची झाडे पुर्वीइतकी आता दिसत नाहीत, जुनी झाडे तर तोडली पण नविन कुणी लावताना दिसत नाही, लहानपणी कितीतरी वेळ उंबर्‍याच्या,कवठाच्या,नारळाच्या झाडावर चढुन खाल्लेले दिवस आठवले
पण आता हे वाचुन पुन्हा गावाकडे गेल्यावर एकदा उंबर खायचं म्हणतोय,बेलाचं झाड देखिल कुठे दिसतं का ते बघणार आहे
Happy

आभार, छान वाटले प्रतिक्रिया वाचून.
योगेश, माझ्याकडचा फणसाचा फोटो, इतका चांगला नव्हता !
मामी खरंच, छान पिकलेला बरका फणस हातानेही उकलता येतो.
डॉक्टरसाहेब, स्कालपेल चालवण्यापेक्षा खुपच सोपे आहे ते.
सुलेखा, मुंबईत करमळ मिळणेच अप्रुपाचे. म्हणून ती तशीच खातात. आता चटणी करुन बघायला पाहिजे.
वर्षू, वेलकम बॅक..
अनिल, मुबईत पण आहेत बेलाची / उंबराची झाडे. अगदी पत्ते सांगू शकेन.

मस्त माहिती दिनेश. ब-याच दिवसांनी या विषयावर तुमचा लेख वाचला.

कापा फणस माझ्या अगदी आवडीचा. फणसाच्या वासाने मात्र काही जणांचे डोके उठते. घरात फणस आणला की माझ्या आईचे डोके हमखास दुखायचेच.

पुलंनी पुर्वरंग मध्ये डुरियनचा उल्लेख केलाय. भयाण वासाचे हे फळ जाकार्ता की इंडोनेशियातले लोक कसे खातात असे त्यांना वाटलेले.

उंबराची फळे मीही लहानपणी खाल्लीत. माझी मावशी उंबराचे जरा ब-यापैकी शाबुत असलेले फळ हातात घेऊन ते दोन्ही तळव्यानी घासायची, ते करताना काहीतरी ओवीसारखे बोलतही असायची. असे पाच-दहा मिनिटे घासत राहिले की आतली चिलटे सगळी उडुन जायची. मग ते फळ फोडुन आम्ही खायचो.

गेल्या वेळी गावी गेलेले तेव्हा भाजी करण्यासाठी फणस शोधत बसले. आंबोलीत तर आंबा-फणस अजिबात नाही. वाडीला जायचे माझ्या जिवावर येते. शेवटी आज-याच्या रस्त्यावर धनगरमळेमधल्या एका नातलगाकडे फणस मिळेल अशी बातमी मिळाल्यावर लगेच गाडी काढुन पोचले तिच्याकडे. वर लागलेला फणस कधी उतरवताना पाहिला नव्हता. मला वाटले सुरी घेऊन झाडावर चढुन मुलगा फणस तोडेल. पण तसे न करता त्याने झाडावर चढल्यावर तो भला मोठा फणस हाताने शक्य तितक्या जोरात गोलगोल फिरवला. साताठ वेळा फिरवल्यावर फिरवल्यावर फणस फांदीपासुन तुटला आणि धब्बाककन खाली पडला. Happy

"कुटुंबवत्सल ईथे फणस हा, कटिखांद्यावर घेऊन बाळे" इंदिरा संत नी काय सुरेख उपमा दिलेय. आणि दिनेशदा तुम्ही काय सुंदर वर्णन केलेय. लहानपणी आम्ही यथेच्छ फणस, आंबे, काजू, रामफळे, खाल्लीत. शहाळी तर झाडावर माकडं खात असतानाचा सोहळा बघण्यासारखा. आता एप्रिल्-मे मधे लक्ष्मीरोडवर हातगाडीवर विकत पाव किलो-अर्धा किलो गरे घेताना ते दिवस सर्कन डोळ्यासमोरून जतात आणि डोळ्यात पाणी तरळ्याचा भास होतो.

दिनेशदा तसे पाहिले तर सगळेच वृक्ष लेकुरवाळे असतात. काहीनाकाही त्यातून निर्माण होतेच. अगदी छान लेख आहे. मस्त.

वा मस्तच ! अगदी माहितीपुर्णे लेख आहे. यातल्या काही झाडांबद्द्ल अगदीच माहित नव्हतं. आणि तुमच्या त्या उंबराबद्द्लच्या एका लेखामुळे त्याबद्दल मात्र अगदी डिटेल्ड माहिती होती. Happy

उंबराचं झाड छान आहे.. रंग छान आहेत. आमच्या शेजारच्या बंगाली भाभीनी कच्च्या उंबराची भाजी केली होती.. मी कधी केली तर इथे टाकेन

मस्त लेख दिनेशदा, आजच वाचनात आला.
उंबराच्या झाडाची माहीती खुप आवडली, आणि त्याच झाडाचे लाकूड दरवाज्यात वापरल्यामूळे उंबरठा म्हणतात हे नविनच माहीती पडल.

धन्यवाद

उंबर म्हणजेच औदुंबर का? आमच्या बिल्डींगजवळ, अगदी चार फूटावर एक थोडे मोठे रोप आहे जास्वंदबरोबर. त्याची नीट काळजी घेतली जावी असे वाटते. दोन्ही रोपे जाळीमधे कैद आहेत. काय करायचे?

उंबर / औदुंबर एकच. पण ते झाड इमारतीच्या इतके जवळ वाढू देऊ नका. लहान असेल तर मूळासकट उपटून जरा लांब रुजवा.

उंबराच्या झाडाखाली त्यची फळॅ पडुन खुप कचरा होतो. त्यामुळे ते जवळ नसलेलेच बरे. तसेही मोठे वृक्ष इमारतीच्या जवळ नसलेले बरे. त्यांची मुळॅ खाली पसरुन इमारतीच्या पायाला धोका निर्माण करु शकतात.

फारच छान लेख. माझ्या बागेत अन्जिराचे झाड आहे. फुले दिसत नाहीत कधीच. पण फळे उदण्ड येतात.
रसरशीत, गोड फळे.

वा मस्तच, माहितीपूर्ण लेख.

दीड वर्षांपूर्वी कोकणात गेलो होतो तेव्हा आमच्या बागेतल्या फणसाची भाजी खाल्ली आणि इथे येताना फणस घेऊन आलो ते आठवले. एकदम झाडाच्या वरती लागलेले फणस काढायला कोणी मिळाले नाही तर पिकून खाली पडतात.

डोंगरी आवळेपण मला खूप आवडतात, रायआवळे नाही आवडत. इतर माहित नसलेली फळे ह्या लेखामुळे कळली, दुरीयनचे डिस्कव्हरी chanellला बघितले होते.

आदीवासी लोकांत उंबराचे झाड बघून लेकीला देतात हा उल्लेख 'गोईण' पुस्तकात आहे का दिनेशदा? मी कुठेतरी वाचल्यासारखे वाटते, आत्ता नक्की आठवत नाहीये.

हो अन्जू, त्याच पुस्तकात आहे हा उल्लेख. फणस झाडावरून पडताना बदकन आवाज येतो आणि तो फुटला कि नुसता दरवळ सुटतो.

सोनटक्का, आपल्याकडे अंजीर फक्त थंड कोरड्या हवामानातच होते. पण मी न्यू झीलंडमधे अगदी समुद्रकिनार्‍यावर आपोआप वाढलेली झाडे बघितली आहेत. आणि अर्थातच फळेही तोडून खाल्ली आहेत.
बागायती अंजीर करताना त्याच्या खोडांना मुद्दाम जखमा करतात, म्हणजे फलधारणा चांगली होते.

माझ्याकडच्या फणसाला गेली दोन वर्षे खूप संख्येने फणस लागतात पण बोटाएवढे होऊन गळून पडतात... एकही मोठा होत नाही... काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे